ज्ञानेश्‍वरीचा कर्ता कोण?

ज्ञानेश्‍वरांची गुरूपरंपरा आदिनाथांपर्यंत मागे जाते. ज्ञानेश्‍वरांचा एक अभंग आहे -

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।1।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।2।।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।।3।।

ज्ञानदेव हे नाथपंथीय होते. परंपरेने ते शैव होते. आता या ठिकाणी असा प्रश्‍न पडतो, ती ज्ञानेश्‍वर जर शैव होते तर त्यांनी वैष्णवपंथी भागवत संप्रदायाचा पाया का रचला? ज्ञानेश्‍वरांचं विठ्ठलाची भक्ती करणं एकवेळ समजून घेता येऊ शकतं. कारण विठ्ठल हे शिव आणि विष्णू यांचं संयुक्त साकारलेलं रूप - हरिहर मानलं गेलं आहे. याआधी "विठ्ठल खरा कोण होता?' या प्रकरणात आपण ते पाहिलंच आहे. परंतु तरीही विठ्ठलभक्ती ही वैष्णव मानली गेली आहे. तेव्हा शैव, नाथपंथी ज्ञानदेवांनी निरूपणासाठी वैष्णव कृष्णाची गीता घेतली आहे, हे कसं हा प्रश्‍न उरतोच.

तर त्याचं उत्तर असं दिलं जातं, की भगवद्‌गीतेचा ग्रंथकार कृष्ण हा स्वतःही उपमन्यूपासून पाशुपत दीक्षा घेतलेला शैव होता आणि तो वैदिक संप्रदायाचा अनुयायी होता. मात्र हा कृष्ण वामाचारी शैव नव्हता. भगवद्‌गीता हा शैव ग्रंथ होता. म्हणूनच त्यावर अभिनवगुप्ताने टीका लिहिली. याचाच अर्थ ज्ञानेश्‍वरांची मूळ प्रेरणा शैव होती. परंतु त्यांनी गीतेवरील टीका लिहिताना सांप्रदायिक दृष्टी न ठेवता शंकर, रामानुज इ. वैष्णव टीकाकारांचेही "भाष्यकारांते वाट पुसतु' असं म्हणून आधार घेतला आहे. हे उत्तर अर्थातच समाधानकारक नाही. त्यामुळे मुळचा प्रश्‍न तसाच राहतो. शिवाय भगवद्‌गीता हा ग्रंथ शैव असल्याचा दावाही तसा फुसकाच आहे. असो. नाथपंथी ज्ञानेश्‍वर हा "ज्ञानेश्‍वरी'सारख्या वैष्णव ग्रंथाचा कर्ता आहे असं मानून घ्यावं लागतं!

ज्ञानेश्‍वरांच्या चरित्रातील असाच आणखी एक भाग अभ्यासकांना कोड्यात टाकणारा आहे. ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायात या ग्रंथाची निर्मिती आपण कशी केली ते ज्ञानेश्‍वरांनी सांगितलं आहे. निवृत्तीनाथांचे गुरू गहिनीनाथ. त्यांनी निवृत्तीनाथांना गीतेवर भाष्य करण्याची आज्ञा केली. निवृत्तीनाथांनी गुरूच्या आज्ञेनुसार गीताप्रवचने केली. त्यामागे भोवतीच्या अज्ञजनांच्या उद्धाराची आध्यात्मिक-सांप्रदायिक प्रेरणा होती. ज्ञानेश्‍वरांनी म्हटलं आहे -

आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।

आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ यांच्यापासून जे सांप्रदायिक ज्ञान गुरूपरंपरेने गहिनीनाथ यांना प्राप्त झालं, ते त्यांनी आपला शिष्य निवृत्तीनाथ यांना दिलं. आणि तेच त्यांनी गीताप्रवचनांच्या रूपाने सामान्य माणसांपर्यंत पोचवावं, त्यांना अज्ञानापासून मुक्त करावं, अशी गहिनीनाथांची आज्ञा होती. गुर्वाज्ञेनुसार निवृत्तीनाथांनी गीताप्रवचने केली. त्या प्रवचनांना एक श्रोता म्हणून ज्ञानेश्‍वर उपस्थित असत. जे श्रवण केलं त्यालाच ज्ञानेश्‍वरांनी ग्रंथरूप दिलं. तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्‍वरी.

एकंदर हे असं जर असेल, तर मग ज्ञानेश्‍वरीचं कर्तृत्व निवृत्तीनाथांकडे जातं. या ग्रंथाबद्दल लिहायचं तर ते "भावार्थदीपीका, चिंतन - निवृत्तीनाथ, शब्दांकन - ज्ञानेश्‍वर' असं लिहावं लागेल.

साठच्या दशकात ज्ञानेश्‍वरीच्या कर्त्याबाबत असाच प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. तो केला होता डॉ. मा. गो. देशमुख यांनी. त्यांच्या मते ज्ञानेश्‍वर ही मुळात यादवकालीन व्यक्ती नाहीच. ते विठ्ठलपंत कुळकर्णी यांनी निर्माण केलेलं केवळ एक वाङ्‌मयीन पात्र आहे. ज्ञानेश्‍वरीचा खरा निर्माता विठ्ठलपंत हा आहे!

अर्थात या वादास आज फार काही अर्थ आहे, अशातला भाग नाही. ज्ञानेश्‍वरी कोणी लिहिली यापेक्षा त्या काळात ज्ञानेश्‍वरी का लिहिण्यात आली, तिचं खरं प्रयोजन काय होतं हा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. मात्र त्याबद्दल नंतर पाहू. आज एवढंच म्हणू या, की अखेर नावात आहे तरी काय?

संदर्भ -
"प्रदीर्घ संशोधनाची व्यासंगी फलश्रुती' - डॉ. ग. ना. जोशी (शिवसूत्र - डॉ. ग. वा. तगारे, इम्प्रेशन्स पब्लिशिंग हाऊस, बेळगाव चे पुस्तक परीक्षण), महाराष्ट्र टाईम्स, 27 ऑक्‍टोबर 1996
निर्मितीचे श्रेय - डॉ. द. भि. कुलकर्णी, रूची, मे 1998, पान 2-3.

9 comments:

सोनु said...

खरचं खुप छान आहे.

Deepak Salunke said...

ज्ञानेश्वरी का लिहिण्यात आली, त्याचे प्रयोजन काय .. याबाबत पुढे वाचण्यास उत्सुक !

Anonymous said...

ठीक आहे

Anonymous said...

ज्ञानेश्वरीचे प्रयोजनासाठी संपर्क करा .....Facebook....
amar.dangat

संतचरणरज नितीन कळंबे. said...

ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी असाही संदर्भ आहे की ज्ञानेश्वर श्रोत्यांशी संवाद साधतात,निवृत्तिनाथ त्यांना सुचना करतात,सच्चिदानंदबाबा लिहीतात तसेच उत्तरकालीन सर्व संतांनी हे ग्रंथकर्तृत्व ज्ञानेश्वरांकडेच दिले आहे याकडे तर तुम्ही दुर्लक्षच केले आहे आणखी एक मुद्दा म्हणजे निवृत्तिनाथांचे साहित्य पाहिले तर दोघांच्या शैलीतील फरक अगदी ठसठशीतपणे नजरेस पडेल...त्यामुळे वरील सर्व चर्चाच अप्रस्तुत आहे असे मला तरी वाटते...धन्यवाद !

Rajendra Joshi said...

हे लेखन पुस्तक-पंडितांनी केले असल्यामुळे या संदर्भातील एक महत्वाची गोष्ट गाळून / अनुल्लेखाने बाजूला टाकून ते आपला निष्कर्ष काढत असावेत. सतरा-अठरा वर्षांचा लौकिक शिक्षण न मिळालेला मुलगा गीतेवर भाष्य लिहितो, त्यात अशा अध्यत्मिक – ध्यान / योग साधनेत येणाऱ्या अनुभवांबद्दल लिहितो की तसे अनुभव घेतलेल्या फार थोड्या लोकांनाच ते लक्षात येते. ज्ञानेश्वरी हे संस्कृतमधून केलेले शब्दश: भाषांतर नाही. आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण अशा व्यक्तीने केलेले कर्म-भक्ती-ज्ञान-योगमार्गाचे हे संपूर्ण ज्ञान आहे. हे सर्व समजण्यासाठी फक्त युनिव्हर्सिटीमध्ये मिळणारे लौकिक ज्ञान पुरेसे नाही, यासाठी अनुभूती पाहिजे. केवळ लहान वयात हे कसे शक्य आहे – हा पडणारा प्रश्नच या लोकांची अशी दिशाभूल करतो आणि कल्पनेला ताण देऊन काहीतरी उत्तर द्यायला भाग पाडतो. परंपरेतील गुरूंनी जे सांगितले ते ज्ञानेश्वरांनी सांगितले हे म्हणणे तसे खरेही आहे - कारण हे काही नवे ज्ञान नाही. पण ते निवृत्तीनाथांनी निरूपित केले आणि ज्ञानेश्वरांनी सांगितले “असावे” अशी कल्पना करण्याचे काही कारण नाही, कारण निवृत्तीनाथही ज्ञानेश्वरांहून दोन वर्षांनीच मोठे होते. अध्यात्मिक परंपरेत एखादा योग्य शिष्य गुरूंच्या मनातील गोष्टी, गुरू समोर नसतानाही एकाएकी स्वत:च्या हाताने लिहू लागतो. एरवी त्याच्या हातून तशी रचना होईलच असे नाही – हे अशा परंपरांची थोडी माहिती असणारे सांगू शकतील. हे लक्षात घेतले तर ज्ञानदेवांनी गुरू निवृत्तीनाथांची अनुमती मागितली आणि त्यांनी मान डोलावून ती दिली – त्यानंतर ज्ञानेश्वरांनी सांगायला सुरुवात केली; असे वर्णन येते त्याचा अर्थ ध्यानात येईल.

संतचरणरज नितीन कळंबे. said...

1) ज्ञानेश्वरांना लहान वयाचे समजणे ही एक चुक आहे कारण हे बुद्धीवैभव हे आजकालचे नसून बहू कल्पांतीच्या सत्यवादाचे तप आहे हे त्यानी स्वतः सांगितले आहे 2)आजकालच्या काही so called लौकीकार्थाने शिक्षित मंडळीना ज्ञानेश्वरीचा ज्ञ कळावयाचा नाही हे सुद्धा एक सत्य आहे 3)गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे श्रेष्ठ लोकांचे लक्षण आहे (हे सगळे गुरुचे असुन माझे त्यात काही नाही असा भाव) 3) ज्ञानेश्वरी वाचाणार्‍या श्रोत्यांची काही लक्षणे आहेत(उदा.अर्जुनचिये पांती वगैरे) त्यानाचं तिचा व्यवस्थित बोध होईल आणि बाकीच्यांनी तिच्याविषयी मत व्यक्त करणे उथळपणाचे ठरेल.
https://www.facebook.com/nkalambe/posts/563608070343890?comment_id=5663474&offset=0&total_comments=1&notif_t=share_comment

Anonymous said...

विसोबा,
कृपया मला आपल्या खालील दाव्याच्या अधारासंबंदी अधिक माहिती दहावी हि विनंती!

"शिवाय भगवद्गीता हा ग्रंथ शैव असल्याचा दावाही तसा फुसकाच आहे"

आपला कृपाभिलाषी,
सुहास घोडके

Shantanu Chaudhari said...

स्वच्छ ठिकाणी घाण करायची व तिचे चर्वित चर्वण करायचे हे आजकालच्या तथाकथित बुद्धी वाद्यांचे रिकामचोट उद्योग. याला याला बळी पडू नका.