शनिशिंगणापूरचं "रहस्य'!

शनीशिंगणापूर या गावात कोणी चोरी केल्यास, त्या चोराचे डोळे जातात, तो भ्रमिष्ट होतो, असं म्हटलं जातं. शनीची अशाप्रकारे कृपा असल्यामुळे या गावात चोरी होत नाही. आणि म्हणून तेथील घरांना दरवाजे नसतात, असं सांगितलं जातं. घरांना दरवाजे नसणारं गाव म्हणूनच आज हे गाव प्रसिद्ध आहे.

वस्तुतः अहमदनगर जिल्ह्यातलं हे एक साधं खेडेगाव. शेतीवर जगणारं. गरीब. त्याचं भाग्य फळफळण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत झाला तो "टी सिरिज' या कॅसेट कंपनीचा मालक गुलशनकुमार. त्याचं असं झालं, की 1992 मध्ये अहमदनगरमधील पत्रकार अनिल शाह आणि दूरचित्रवाणी निर्माते राम खंकाळ या दोघांनी शिंगणापूरवरचा माहितीपट बनविला होता. तो मुंबई दूरदर्शनवरून दाखविण्यात आला आणि नंतर हिंदीत डब करून तो दिल्ली दूरदर्शननेही प्रसारित केला. हा माहितीपट गुलशनकुमार यांच्या नजरेस पडला. तो पाहून त्यांनी लगेच "सूर्यपूत्र शनिदेव' हा व्हिडिओ तयार केला. या एका व्हिडिओमुळे शिंगणापूरची साडेसाती गेली. आणि आज ते भाविक भारताच्या नकाशावर दिमाखाने झळकत आहे. म्हणजे लोकांना एक उत्सुकता असते, की पाहू या बिनदाराचं हे गाव कसं आहे. त्यातच पुन्हा शनिदेवाचाही दरारा असा श्रद्धाळू मनात असतोच.

पण गंमत म्हणजे शिंगणापूरला चोऱ्या होत नाहीत, हाच मुळात मोठा भ्रम आहे. "श्री शनैश्वर ट्रस्ट'चे सुरक्षा अधिकारी आर. टी. जोंधळे (आता ते या पदावर आहेत की नाहीत हे माहित नाही. ही 1999ची गोष्ट आहे.) सांगतात, की पूर्वी इथं चोऱ्या झाल्याचं ऐकिवात नाही. पण अलीकडे मात्र होतात! परंतु चोऱ्या होत असल्या तरी नंतर चोरीचा माल परत मिळतोच, अशी पुस्ती ते जोडतात. पण त्याने चोऱ्या होतात हे वास्तव शिल्लक राहतंच.

शनिशिंगणापूरच्या पोलिस ठाण्यातलं रेकॉर्ड हेच वास्तव सांगतं, की शनिदेवाच्या या गावात चोऱ्या होतात. नमुन्यादाखल त्या ठाण्यातली चोरीच्या गुन्ह्याची ही नोंद पाहा. - गुन्हा नोंदणी क्रमांक सी. आर. 49/95/आयपीसी 379. गुन्हा दिनांक 29-4-95. बबन सरकारी लोखंडे, रा. शिंपी टाकळी, ता. निफाड, जि. नाशिक यांचे पाच हजार रूपये चोरीला गेले. कुणाची सायकल, कुणाची मोटारसायकल, तर कुणाची रोख रक्कम चोरीला गेली अशा गुन्ह्यांची तिथं नोंद आहे. या अनेक चोऱ्याप्रकरणांमध्ये ज्या काही थोड्या गुन्हेगारांना पकडण्यात आलं आहे, त्यांच्यावर शनिदेवाचा कोणताही कोप झालेला आढळला नाही, की त्यांचे डोळेही गेले नाहीत. फार फार तर त्यांना अटक झाली हाच शनिचा कोप असं कोणी म्हणू शकेल!!

विशेष म्हणजे तिथं चोरी झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात होऊच नये यासाठी खबरदारी घेतली जाते. स्थानिक लोकही चोरी होऊ नये यासाठी खास काळजी घेत असतात. म्हणजे आपल्याकडं काही किमती ऐवज असेल, तर तो ते कुठेतरी स्वयंपाकघरात एखाद्या डब्यात लपवून ठेवतात. घरात कुठेतरी खड्डा खणून त्यात पुरून ठेवतात. घरांना दारं नाहीत तेव्हा अशी काळजी घ्यायलाच हवी ना!

आता शिंगणापूरातील काही घरांना दारं नाहीत, ही वस्तुस्थिती मान्य करायलाच पाहिजे. पण यात श्रद्धेचा भाग अधिक आहे. आणि दुसरी एक बाब म्हणजे, नीट पाहिलं तर लक्षात येईल, की जिथं भेट देणारे भाविक लोक आपल्या मोटारी ठेवतात तिथं जाणीवपूर्वक शटर वा दारे नसलेली सिमेंट कॉंक्रिटची दुकानं अलीकडच्या काळात बांधलेली आहेत. हा अर्थातच शनिशिंगणापूरच्या मार्केटिंगचा भाग आहे.

एकूणच शनिशिंगणापूरबाबत असणारी चोरीविषयक समजूत लोकांचं अज्ञान आणि दैवी अवकृपेची भीती यातून निर्माण झाली आहे. त्यामुळे तिथं काही घरांना दारं नाहीत हीही वस्तुस्थिती आहे आणि तिथं चोऱ्या होतात व चोरी करणारांचे डोळे जात नाहीत की ते भ्रमिष्ट वगैरे होत नाहीत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.


संदर्भ -
Stairway to Heaven - Vinita Deshmukh, Indian Express, Flair, Sept 27,1998.
सत्य लपविण्याचे कारस्थान ही गैरवर्तणूक नाही काय? - टी. बी. खिलारे, रूची, मे 99, पा. 22 ते 24.

बातमी -
शनि शिंगणापूरला चोरी झाल्याच्या घटनेची एक बातमी २६ ऑक्टोबर २००९ रोजी लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली आहे. ई-सकाळवरील सदर बातमी -

शनिशिंगणापूर येथे चोरी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:15 AM (IST)
सोनई- "घर असून दरवाजा नाही. येथे कुलपाचा वापर होत नाही. असे असूनही येथे चोरी होत नाही,' असे मुलखावेगळे गाव म्हणून जगात ख्याती असलेल्या शनिशिंगणापूर येथे आज गुडगाव (हरियाणा) येथील भाविकाचा 35 हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली. दरम्यान, आमची श्रद्धा आहे, चोराला शिक्षा होणारच, असा विश्‍वास येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गुडगावच्या मंजूल सहरावत यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

शिर्डीतून एका एजंटाने आम्हाला प्रवासी जीपमधून शनिदर्शनासाठी आणले. गावातील बानकर वाहनतळ येथील हॉटेल वैष्णवीसमोर वाहन थांबवून ओल्या वस्त्राने दर्शन करण्याचा आग्रह केला. रामभरत राठोड व कुलभूषण यादव यांच्यासह दर्शनाला गेलो असता, आम्हाला मंदिरात सोडून एजंटाने वाहनात ठेवलेल्या कपड्यातून मोबाईल, कॅमेरा व रोख रक्कम असा 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

"चोराला शिक्षा होणारच'
देवस्थान विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब दरंदले यांनी या घटनेनंतर सांगितले, ""चोरीच्या या घटनेने शनिशिंगणापूरचे भाविक दुखावले गेले असले, तरी ग्रामस्थांची श्रद्धा कायम आहे. या प्रकारातील चोराला निश्‍चितच धडा मिळेल. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना "एजंटावर कारवाई करा,' असा आदेश दिला. मात्र, कारवाई न केल्यामुळेच चोरीची घटना घडली. बाहेरील लोक येथे येऊन भाविकांना दमदाटी, लूटमार, सक्ती मोठ्या प्रमाणात करतात. गावातील संबंध जपण्यासाठी पोलिस येत नाहीत. मात्र शनिशिंगणापूरचे पावित्र्य जपणे हे येथील ग्रामस्थांवर झालेले पिढ्यान्‌पिढ्यांचे संस्कार आहेत. ते कायम राहतील.''

दरम्यान, उपाध्यक्ष सुरेश बानकर यांनी सांगितले, ""येथे चोरी होत नाही. केल्यास त्याला लगेचच शिक्षा होते, असा इतिहास आहे. मात्र, झालेली शिक्षा कोणताच चोर पुढे येऊन सांगत नाही.''

श्रद्धा कायमच राहणार
शनिशिंगणापूर येथे चोरी होत नाही, अशी श्रद्धा आहे. मात्र येथे भाविकांची वेगळ्या मार्गांनी लूट होत असते. यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी, "चला चोरी करायला शनिशिंगणापूरला,' अशा रूपकात्मक आंदोलनाचा इशारा दिला होता. आता तेथे चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्याने या गावाविषयीची श्रद्धा कमी होऊ नये, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. चोरी करणाऱ्यांना शिक्षा होतेच, असा विश्वासही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

3 comments:

spartan said...

सर्वप्रथम धन्यवाद विसोबा....!!!!
आतापर्यंत इतिहासाबद्दल तुमची मते आणि माहिती वाचली होती आणि फक्त एक मनोरंजनात्मक म्हणून सोडून दिली होती कारण ज्या गोष्टींमुळे आजचा माणूस एकमेकांविरुद्ध शत्रू होईल त्यात मला तरी इंटरेस्ट नाही.याचा अर्थ मी तुमच्याशी असहमत आहे असा नाही.आणि तुम्ही जो लेख प्रपंच चालविला आहे तो तर खरोखरीच स्पृहणीय आहे यात शंका नाही कारण तुम्ही मानवतेचे पुजारी..!पण पुराणातले वांगे भाजण्याने त्याचा गैरवापर होण्याचा धोका आजच्या जगात अधिक. यास कारण आपल्या लेखांवर आलेल्या काही प्रतिक्रिया. असो...
आपला हा शनी शिंगणापूरचा लेख वाचून तर मी एकदमच खुश झालो.आजच्या जगात असे काही होते आणि समस्त जनता त्यावर भाबडेपणाने विश्वास ठेवते आणि त्याचा फायदा काही मतलबी स्वतःच्या हितासाठी करतात.सगळेच भयंकर...! मी स्वतः कोपरगावचा असून त्यावेळी सायकलीवर शिंगनापुरास जात असू .म्हणजे खूप पूर्वी नाही तर आता आता १९९२-१९९३ साली.त्यावेळी काहीच नव्हते तिथे.सायकली आम्ही थेट मूर्तीजवळ लावत असू.आता मात्र सगळेच पालटले.हि सगळी त्या गुलशन कुमारची कृपा.
आणि त्यावेळी आता जो दांभिकपणा चालतो तोही नव्हता .आता मात्र पार बाजार मांडला आहे तिथे.
तुम्ही बरे झाले वास्तव समोर आणले.
सगळेच लेख वाचले आहेत आणि पुढच्या लेखांची वाट पाहतोय.....!!!

Anonymous said...

'Dharmachi teerthe, Teerthancha bajar' lekhak- Dr. Pradip Patil
Prakashak- Maharashtra ANiS
Ya pustakat shani shinganapur baddal lekh Jarur vacha.

Unknown said...

Uttam lekh....
PN MALA EK PRSHN AHE....EKA VISHISHT AKARACHYA DAGDALA 'SHANI'KA MHNTAT???
APLYA SURYAMALET SUDHA EK 'SHANI'AHE....MG TYA SHNICHA ANI PRUTHVIVARIL YA SHANICHA KAHI SAMBANDH AHE KA?????
TYACHPRAMANE KAHI DIVSANPURVI EKA MULINE SHANIABHISHEK KELA TR TYAVR KHUP MOTHA VAAD UBHA
RAHILA HOTA ....