महाराष्ट्राचे मूळ रहिवासी कोण?

ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात अत्यंत प्राचीन काळी कोळी, भोई, महार आणि रठ्ठ यांची वस्ती होती. त्यातही येथे प्रथम महारांची वस्ती असणे व मागाहून भोयांची वस्ती असणे हा त्यांना अत्यंत शक्‍य असा इतिहास वाटतो. ते सांगतात, की म्हारांखेरीज सर्व महाराष्ट्रभर पसरलेली अशी दुसरी जातच प्राचीनकाळी नसावी. या महार आणि दुसऱ्या रठ्ठ या दोन राष्ट्र जातींच्या नामांचा संयोग होऊन "महारठ्ठ' असे रूप तयार झाले आणि त्याचे पुढे "महाराष्ट्रिक', कालांतराने "महाराष्ट्र' असे संस्कृतीकरण झाले. रठ्ठ या शब्दाचा अर्थ राष्ट्र किंवा लोक असाच असावा असं ते सांगतात.

मोल्स्वर्थ यांनीही आपल्या मराठी शब्दकोशात महार या अस्पृश्‍य जातीवरून महाराष्ट्र हे नाव पडले असावे, अशा तऱ्हेचा अर्थ दिला आहे. आणि जॉन विल्सन यांनीही अशाच अर्थाची पुनरावृत्ती केली आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा ही जात सर्वत्र दिसून येते. मराठ्यांच्या जातीचा रजपुतांशी संबंध असल्याचं दिसून येतं. पण रजपुतांची आडनावं मराठ्यांप्रमाणे महारांमध्येही आढळतात. महारांमध्ये कुलपरंपरा फारशी अबाधित राहिलेली नाही. त्यमुळे निश्‍चित विधान करणं कठीण आहे, परंतु एवढं म्हणता येईल, की महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन लोकांचे वंशज महार हेच असावेत.

आता महार या मूळ जातीवरुन या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडलं हे मत येथील अनेकांना पचायला खूपच जड आहे यात शंका नाही. इतिहासाचार्य राजवाडे, भांडारकर, काणे वगैरे मंडळींनी महाराष्ट्र या शब्दाचं वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण करण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु ज्ञानकोशकारांनी आपल्या "प्राचीन महाराष्ट्र' या ग्रंथात सर्व आक्षेप निकालात काढून महार या जातीवरून महाराष्ट्र असं नाव पडलं असा निर्वाळा दिला आहे.

महार पूर्वीपासून स्वतःस "धरतीचे पूत' किंवा "भूमिपुत्र' म्हणवून घेतात. त्याचा अर्थ हा असा आहे.

संदर्भ -
प्राचीन महाराष्ट्र - आदिपर्व + शातवाहनपर्व कुरुयुद्धापासून शकारंभापर्यंत - ज्ञानकोशकार केतकर, वरदा बुक्‍स, दुसरी आवृत्ती, 1989, विभाग 2, पाने - 24 ते 31.

4 comments:

स्वाती आंबोळे said...

Read something interesting and rather curious recently :
http://mohalla.blogspot.com/2008/01/blog-post_1376.html

visoba said...

स‌्वातीजी, आपण पाठिविलेल्या लिंकवर छानच माहिती आहे. यासंदर्भात पु. ग. स‌हस्रबुद्धे यांनी त्यांच्या महाराष्ट्रसंस्कृती या ग्रंथातही खूप मनोरंजक माहिती दिली आहे.

आजानुकर्ण said...

mast ahe visoba sheth

pankaj said...

या लेखाचा दुवा उपक्रमाच्या एका चर्चेत दिला होता. त्याला आलेले खालील प्रतिसाद.
http://mr.upakram.org/node/818
प्रतिसाद तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करतोय. कदाचित तुम्हीच त्यावर प्रतिक्रिया देवू शकाल. :)

-------------------------

खट्टामिठावरील या लेखात "मोल्स्वर्थ यांनीही आपल्या मराठी शब्दकोशात महार या अस्पृश्‍य जातीवरून महाराष्ट्र हे नाव पडले असावे, अशा तऱ्हेचा अर्थ दिला आहे. " असे वाक्य येते.

हा मोल्जवर्थचा ऑनलाईन दुवा. मलातरी असा अर्थ मिळाला नाही.

----------------------

इतिहासाचा अर्थ कसाही काढता येतो. छत्रपती शिवरायांना लुटारू-पेंढारी म्हणणारेही (अजूनही) आहेतच.
रामदास केवळ ठोसर होते म्हणून ते शिवरायांचे गुरू नव्हतेच असे म्हणण्यापर्यंत मजल पोचली आहे.
छत्रपतींचे बिरुद फक्त " क्षत्रियकुलावतंस" इतकेच होते असा (जावई)शोध लागल्यास नवल नको.

उपरोल्लेखित ब्लॉगस्पॉटवर नेहमी एका विशिष्ट जातीवर चिखलफेक आढळते. हे एकप्रकारे जातीयवादी लेखनच आहे.
इतिहासाचे प्रतिक्रियात्मक लेखन असे निवडून-निवडून देणारा हा ब्लॉग एका कावीळग्रस्त माणसाचा आहे असे वाटले.
त्यावर दिलेले पुस्तकांचे उतारे कोणत्या विचारसरणीच्या किंवा वादाच्या लेखकांचे आहे हे पाहिले असता
ते एकांगी आहेत याची खात्री पटते.