छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद आता संपुष्टात आला असला, तरी शिवजयंतीचा शासकीय उत्सव नेमका कोणत्या तारखेला साजरा करायचा; म्हणजे तिथीनुसार दरवर्षी बदलणाऱ्या तारखेस की इंग्रजी तारखेस असा नवाच वाद निर्माण झालेला आहे.

15 एप्रिल 1896 रोजी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजयंती साजरी केली. तेव्हापासून महाराष्ट्रात शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू झाला. त्यावेळी लोकमान्यांना उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून शिवरायांचा जन्म वैशाख शुद्ध प्रतिपदेला झाल्याचे मानण्यात येत होते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संशोधन करून ही तिथी वैशाख शुद्ध पंचमी असल्याचे सांगितले.

पुढे 1914च्या सुमारास लोकमान्यांना छत्रपतींच्या जन्मकालाची नोंद "जेधे शकावली'त सापडली. शकावलीत शके 1551 शुक्‍ल संवत्सर या वर्षात "शिवजन्म फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार, घटी 18, पळे 31, गड 5, पळे 7 ये दिवसी झाला' अशी नोंद आढळते. (ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ही तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630 )
कवि परमानंद यांनी शिवरायांच्या सूचनेनुसार "शिवभारत' हे महाकाव्य रचले. त्यात मालोजी, शहाजी आणि शिवाजी या भोसले घराण्यातील तीन पिढ्यांच्या जीवनातील घटनांचे वर्णन आहे. त्यात, तसेच बनेडा बियावर व बिकानेर येथे सापडलेल्या कुंडल्यांमध्येही शिवजन्माची हीच तिथी देण्यात आली आहे.

हे पुरावे सापडल्यानंतर खरेतर वादाचे काही कारण नव्हते. परंतु इतिहासकारांमध्ये एकवाक्‍यता नव्हती. 1925चा शिवजयंती उत्सव फाल्गुन वद्य तृतीयेलाच व्हावा अशी जाहीर विनंती महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी "केसरी'मधून केली होती. पण या तारखेला काही अभ्यासकांनी आक्षेप घेतला. पोतदारांप्रमाणेच, ग. ह. खरे, बा. सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी यांना ही तारीख योग्य असल्याचे मान्य होते. परंतु न. र. फाटक यांनी मात्र याबाबत निर्णायक पुरावा नसल्याचे कारण दर्शवित त्यास विरोध दर्शविला. या विरोधाचे कारण बहुधा राजकीय असावे. कारण फाटक हे गोखलेवादी होते, तर पोतदार हे टिळकवादी. या वादास जहाल-मवाळ वादाचे एक परिमाण प्राप्त झाले.

पुढे 1967 मध्ये महाराष्ट्र सरकारने असे जाहीर केले, की इतिहासकारांमध्ये एकवाक्‍यता होईपर्यंत वैशाख शुद्ध द्वितिया, शके 1549 ही शिवजयंतीची प्रचलित तारीखच उत्सवासाठी स्वीकारली जाईल. श्री शिवदिग्विजय, धडफळे शकावली, प्रभानवल्ली शकावली, नागपूरकर भोसले बखर, न्यायशास्त्री पंडितराव बखर, शिवाजी प्रताप बखर, शेडगावकर बखर, तसेच पारसनीस व किंकेडकृत इतिहास या साधनांमध्ये ही तिथी देण्यात आली आहे. मल्हारराव चिटणीस यांनी लिहिलेल्या शिवचरित्रात, "जिजाबाईसाहेबांनी नवस केला जे पुत्र झाले म्हणजे शिवाई देवीचे नाव ठेवीन. नंतर गरोदर दिवस पूर्ण होऊन शिवनेरीस शुभसमयी वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 प्रभावनामे संवत्सरे वर्षी गुरुवारी पुत्र झाला,' अशी नोंद आढळते. इसवी कालगणनेनुसार ही तारीख होती 6 एप्रिल 1627. या तिथीस येणाऱ्या इंग्रजी तारखेस शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येऊ लागला, तरी वाद शमला नव्हता. साल 1627, 1628 की 1630 हा घोळ सुरूच होता.

अखेर इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी हा वाद एकदाचा निकालात काढला. राजस्थानात आढळलेल्या कुंडल्या, राजघराण्यांतील नोंदी, देशात ठिकठिकाणी उपलब्ध झालेले कागद, पत्रव्यवहार असे सर्व काही पडताळून आपल्या "श्री राजा शिवछत्रपती' या चरित्राच्या पहिल्या खंडात जाहीर केले, की
ल्गुन वद्य तृतीया, शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 हीच शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे.
इतर ज्येष्ठ इतिहासकारांनीही त्यांच्या संशोधन, पुरावे व निष्कर्षास मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही तारीख सरकारी सुट्टी व शिवजयंती उत्सवासाठी घोषित केली.

परंतु आता वाद आहे तो हा, की शिवजयंती साजरी करायची ती इंग्रजी तारखेनुसार की हिंदु पंचागानुसार?

बाबासाहेब पुरंदरे, इतिहासकार निनाद बेडेकर, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे मत उत्सव तिथीनुसारच करावा असे आहे. स्वतः शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहंदळे हेही, शिवजन्मतिथीचे शासकीय कार्यक्रम इसवी कालगणनेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी करण्याऐवजी भारतीय कालगणनेनुसार म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया या तिथीस करावेत, या मताशी सहमत आहेत.

हे मत मान्य होण्यास वास्तविक हरकत नसावी. कारण यापूर्वीही म्हणजे 1999 पर्यंत, पंचांगात दर्शविलेल्या वैशाख शुद्ध द्वितिया या तिथीला येणाऱ्या इंग्रजी तारखेलाच शासकीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असे.

संदर्भ -
- छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी, एनबीटी, सहावी आवृत्ती 2004, पृ. 2-3.
- आठवावा प्रताप! - अग्रलेख, महाराष्ट्र टाइम्स, 19 फेब्रुवारी 2000.
- कालनिर्णय दिनदर्शिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले इतिहास संशोधकांचे अभिप्राय, महाराष्ट्र टाइम्स, 20 जानेवारी 2001.
- श्री शिवछत्रपतींचे जन्मकाल विवेचन - भास्करपंत "काव्यशेखर', शिवगाथा, संपादक - दिलीप पिंपळे, पृ. 204.

15 comments:

Anonymous said...

आतापर्यन्तच्या रुढ सन्केतनुसार रा्ष्ट्रपुरुषा्न्ची जयन्ती ही ग्रॆगोरियन कालगणनॆनुसार साजरी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रा्ष्ट्रपुरुष आहेत. छत्रपती शिवाजीन्ची जयन्ती तारखेनुसार सा्जरी करणे यो्ग्यच आहे.

sachin patil said...

shivjayanti hi tarakhe nusarach sajari karayla havi ani shiv jayanti utsav ha mahatma phulenni suru kela tilakanni navhe

Unknown said...

हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे

राजे ग्रुप महामुलकरवाडी

Anonymous said...

जयंतीचा वाद फक्त शिवाजी महाराजांच्या बाबतीतच का निर्माण केला जातो? हाच वाद समर्थ रामदास किंवा द्यानेश्वर ह्यांच्या बाबतीत का केला जात नाही? आणि शिवजयंती टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी चालू केली.

Anonymous said...

Shri visoba,
Appan dilelei mahiati abhyas purn aahe. Tithi-tarakhe babat Shivajayanti sajari karanyachea vaad khare tar asu naye! maharajachi jayanti sajare karanya mul uddesh lakshyat gya ! aani kadhi hi asjari kara! pan ek gost ashi ki jya maharajani aayushya bhar je je parakiy te te nakarale tyanchi jayanati Engraji Tarakhe nusar?
maharajani parkiy topha nakot mhanun swatacha lkarhana ubharala !
swatachi nanya chi Tanksalubharali ! shiv shak suru zale te hi bharatiy kal ganae nusar ch ! tyani parkiy bhasha nako mhanun rajyavyavahar kosh nirman karaval ! PArviky rajya vayvashta nako mhanun swatache navin sankalpanene Ashtpradhan madal sthapan kele ! he hi lakshat ghya !
AAni jayanti cha vaad maharaja babat hoto yaatach maharajan che mothe pan disat nahi ka?
- - Pritam Bahitat

(are krupaya koni tari mala ithe marathit kase likhayache te sangakl ka?)

Anonymous said...

To, Pritam Bahitat
go to
http://bhashaindia.com/downloads/pages/home.aspx
download MARATHI INDIC INPUT 2, install it on your PC. हे सोफ्टवेअर वापरून तू कुठल्याही ब्राउझर वर किवा प्रोग्रम वर मराठी लिहू शकतोस
इतरही भारतीय भाषा उपलब्ध आहेत.

मधुसूदन चेरेकर said...

हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. नेहमी सर्वांनी सुख-संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कांस जपावे, असे ते म्हणत. या दंग्यांनंतरच लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. १८ सप्टेंबर १८९४ आणि १५ एप्रिल १८९६ या अनुक्रमे केसरीच्या दोन अंकांत त्यांनी या उत्सवांचे उद्देश स्पष्ट केले: राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्यजनांस करून देणे.

Unknown said...

जन्म दिन हा तिथी नुसारच साजरा करावा. कारण महाराज्यांच्या जन्माच्या वेळी कालगणना ही भारतीयच होती. अन्यथा राम व कृष्ण यांच्या जन्म तारखा सुद्धा इसवी सनात शोधण्याचा खटाटोप करावा लागेल.

Unknown said...

योग्य आहे जयंती असो किवा पुण्यतिथि असो ही आपल्या त्या कालीन तिथी नुसार च झाली पाहिजे तारीख नुसार सर्वसामान्य ची जयंती होत असते

Unknown said...

बरोबर

Unknown said...

हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे.

Unknown said...

हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे.

Unknown said...

हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे

Unknown said...

हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे

Unknown said...

हिंदू देवदेवतांच्या जयंत्या हया तिथीनुसार साजऱ्या केल्या जातात, तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा सगळ्यांचे आराध्य दैवत असल्याने त्यांचीही जयंती तिथीनुसार व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे