बखरी आणि काव्यांनुसार साक्षात् तुळजाभवानीने शिवरायांना तलवार दिली, ती ही भवानी तलवार.

सुमारे नव्वदेक वर्षांपूर्वी मुंबईतील कॅप्टन बहादुर मोदी नावाच्या गृहस्थांनी भवानी तलवार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तशी एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, खान बहादुर पदमजी यांच्याकडे भवानी तलवार होती व ती त्यांनी डॉ. कूर्तकोटी यांना दिली. नंतर ती त्यांच्या स्वतःकडे आली. या तलवारीवर "छत्रपती शिवाजी' असे कोरलेले होते. नंतर उघडकीस आले, की तो मजकूर या पदमजी नावाच्या इसमानेच कोरलेला होता!
इंदूर-महू येथे असलेली तलवार हीच भवानी तलवार आहे व ती महाराजांनी छत्रसाल बुंदेल्याला दिली होती, असा दावा काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी केला होता. परंतु त्या तलवारीवर नंतर छत्रसालाच्या सेनापतीचे नाव आढळून आले!
असाच आणखी एक दावा केला जातो, की खेम सावंताकडून महाराजांना पोर्तुगीज बनावटीची तलवार मिळाली व तीच भवानी तलवार होय. वस्तुतः ही भाकडकथा आहे. खेम सावंत हा कोणी महाराजांचा एकनिष्ठ पाईक नव्हता. आदिलशाहीचा हा वतनदार, दगलबाज होता. महाराजांनी त्याचा बिमोड करण्यासाठी त्याच्या मुलखावर हल्ला केला होता. क्षणभर असे मानले, की शरणागती पत्करल्यानंतर त्याने महाराजांना जे नजराणे धाडले, त्यात ही पोर्तुगीज बनावटीची तलवारही होती, तरी महाराज त्या तलवारीवरील रोमन अक्षरे तशीच ठेवून तिला "भवानी' तलवार असे म्हणणार नाहीत.
रियासतकारांच्या म्हणण्यानुसार, रायगड्या पाडावानंतर औरंगजेबाच्या हाती भवानी तलवार लागली. ती त्याने शाहू महाराजांना त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली. याचा अर्थ असा होतो, की भवानी तलवार सातारच्या छत्रपतींकडे आहे. सध्या ती उदयराजे भोसले यांच्या ताब्यात आहे. 1974 साली बाबासाहेब पुरंदरे यांनी मुंबईत "शिवसृष्टी' प्रदर्शन भरविले होते. तेव्हा त्यांनी सातारच्या राजघराण्यातील तलवार भवानी तलवार असल्याचे सांगून मिरवली होती. परंतु ज्येष्ठ इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी ही तलवार आधीच पाहिलेली होती. ती त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा डोळ्यांखालून घातली. खरे यांनी पुरंदरे यांना त्यावरील कोरीव मजकूर दाखवून ही तलवार भवानी नव्हे असे स्पष्ट केले. त्या तलवारीवर "सरकार राजा शाहू छत्रपती कदिम' असा उल्लेख होता.
1875 मध्ये इंग्लंडचे राजपूत्र, प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड इकडे आले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरच्या शस्त्रगारातील "तुळजा' व "जगदंबा' या दोन तलवारी नजर केल्या. यापैकी कोणतीही भवानी तलवार नव्हे. कोल्हापूरच्या राजघराण्याकडे अशी कोणती भवानी तलवार असती, तर ती त्यांच्या देवघरात पूजेत असती. ती त्यांनी कोणास नजराणा म्हणून दिली नसती. पण मुदलातच कोल्हापूर किंवा सातारा येथील राजघराण्यांच्या याद्यांमध्ये भवानी तलवारीचा उल्लेखही नाही.
बकिंगहॅम राजवाड्यातील दोन्ही तलवारी पोतुगीज बनावटीच्या आहेत. इतिहासकार वा. सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्या पाहून, त्यातील एकही भवानी तलवार नसल्याची खात्री दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना बकिंगहॅम राजवाडा व अन्य म्युझियम्समधील तलवारींची तपासणी करण्याची परवानगी नानासाहेब गोरे यांनी ते भारताचे इंग्लंडमधील हायकमिशनर असताना मिळवून दिली होती. त्या तलवारीवर अद्याप रोमन लिपीत "जे. एच.एस.' अशी अक्षरे आहेत. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या मते, ती जीजस ह्युमॅनन साल्वादोर या पोर्तुगीज नावाची अद्याक्षरे आहेत. ब्रिटिश म्युझियमेच डेप्युटी कीपर डग्लस बॅरेट यांनी, इंग्लंडमधील कोणत्याही म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही, असे 1969 साली कळविले होते.
भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहित नाही. ग. ह. खरे सांगतात, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कविच्या शंभुराजचरित्रात हिचा निर्देश आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर त्याचे तोंड बंद करणे शक्य नाही. तरीही इतिहास हे पुराव्याचे शास्त्र असल्याने आणि असा पुरावा त्या व्यक्तीस देता येत नसल्याने तञ्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता दाखविणार नाहीत.''
संदर्भ -
- इतिहास ः सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998, पृ. 132-133.
- "भावनांशी खेळ नको!' (29-11-1980) व "पुन्हा एकदा भवानी' (8-12-1980) हे गोविंदराव तळवलकर यांचे "महाराष्ट्र टाइम्स'मधील अग्रलेख.
- Desperately Seeking ShivajiH$s Sword - Times of India, 2 Jul 2002.
Also read : Politics of Shivaji - The James Laine Affair by Vidhyadar Date in EPW
5 comments:
kharach kupah mahatvapurna ani muddesut mahiti pramanik pane milavali ani vaicharik charcha ghadun anli ahe.
Itkey tr patalech ki hi talwar bhawani ne nahi dili pn ti kountya tari margavrun maharajana milali aahe.ek tr bimar kiva bet vastu
Vikat kiva bet vastu
तुम्ही दिलेली माहिती खुप महत्त्वाची आहे कृपया करून आत्ता पर्यंत कोणी कोणी महाराजांची तलवारीची मागणी केली आहे हे सांगु सकाल
भवानी तलवारी बद्दलचीली माहीती खोटी सांगितले आहे.
कोण होती भवानी ??
Post a Comment