महाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल

रा. रा. विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने महाराष्ट्रात इतिहास घडविला होता. हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्रह्मवृंदाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती. आज ते स‌र्व विरून गेले आहे.

मुळात तेंडुलकरांच्या नाटकाचा विषय घाशीराम कोतवाल नावाची व्यक्ती हा नव्हताच. राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी घाशीराम सारखी माणसे (वा संघटना) निर्माण करतात. त्यांच्याकडून आपली स‌र्व प्रकारची अनैतिक कामे करून घेतात आणि ही माणसे डोईजड झालीच तर त्यांचा काटा काढतात. हे तेंडुलकरांना शिवसेनेच्या संदर्भात सांगायचे होते. ते त्यांनी त्या नाटकातून सांगितले. त्यासाठी त्यांच्या कामास आली, ती घाशीरामची दंतकथा. एकंदर 'घाशीराम कोतवाल' या नाटकानंतर घाशीरामचा इतिहास लोकांसमोर फारसा आलाच नाही. आली ती फक्त दंतकथा.

मुळात माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत पुण्यास स्वतंत्र कोतवाल नव्हता. त्यांच्या काळात पुण्याचे महत्त्व फार वाढले, तेव्हा मग शहराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कोतवाल म्हणजेच पोलिस अधिकारी नेमण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार 18 फेब्रुवारी 1764 रोजी माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुणे शहराच्या व्यवस्थेचे काम सोपविले. नाना फडणीस अर्थात बाळाजी जनार्दन फडणीस हे सांगतिल तसे काम करीत जाणे असे त्यांना बजावण्यात आले होते.

नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले. शहराच्या बंदोबस्ताखेरीज लहान गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा स‌त्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली. त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला.

बाळाजी नारायण केतकरांनंतर बाबूराव राम, जनार्दन हरी, धोंडो बाबाजी व आनंदराव काशी असे कोतवाल झाले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1777 रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.

हा माणूस अतिशय सुस्वरूप, बुद्धिमान आणि गोडबोल्या होता. नाना फडणीसांची त्याच्यावर मोठी मर्जी होती. फितुरीसाठी, राघोबा दादा, तसेच अन्य काही स‌रदार-दरकदारांवर हेरगिरी करण्यासाठी नाना त्याचा वापर करीत असत. किंबहुना अशा गुप्तरीत्या मिळविलेल्या बातम्यांवरच पंधरा वर्षे नानांचा मुख्य कारभार सुरू होता. फंदफितुरी दाबात ठेवण्यासाठी नानांना घाशीरामच्या गुप्तहेरांकडून मिळणा-या बातम्यांचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याबद्दल नाना बक्षिसे वगैरे देऊन त्याची वारंवार प्रशंसा करीत असत. पण या काळात घाशीरामने अनेकांवर अन्याय केला. अतिशय निर्दयपणे पुण्याचा कारभार केला. त्यामुळे पुढे असा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण अखेर घाशीरामचे शंभर घडे भरलेच.

त्याच्या कारकीर्दीत 25 तेलंगी ब्राह्मण पुण्यास आले होते. ते आपल्या देशास जाण्यास निघाले असता, त्यांना घाशीरामच्या शिपायांनी कैद केले आणि भवानी पेठेतील चावडीत खणाचे भुयार होते तेथे कोंडले. त्या भुयारात वारा जाण्यास जागा नव्हती. त्यामुळे कोंडमारा होऊन 21 लोक मृत्यू पावले. (ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3373, पृ. 4536) मानाजी फाकडे नावाच्या गृहस्थांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी ती पेशव्यांच्या कानी घातली. 21 ब्राह्मणांचा कोंडून मृत्यू झाल्याची बातमी पुण्यात कळताच एकच हलकल्लोळ उडाला. पुण्यातील स‌र्व ब्रह्मवृंद पेशव्यांच्या वाड्यासमोर जमला. अत्याचारी घाशीरामाला हत्तीच्या पायी देऊन ठार करावे, अशी त्यांची मागणी होती.

घाशीरामचे म्हणणे मात्र वेगळेच होते. कोंडून ठेवल्याने त्या ब्राह्मणांचा मृत्यू झाला, ही हकीकत खोटी आहे. हे लोक शहरात चो-या करीत असत. त्यांना धरून आणून ठेवले असता, त्यांनी अफू खाऊन जीव दिला, असे त्याने सांगितले. त्यावर त्या ब्राह्मणांना मूठमाती देण्याची परवानगी दिली. त्याबरोबरच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. अय्याशास्त्रीजी यांच्याकडे चौकशीचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत घाशीराम दोषी ठरला. त्याच्या मुसक्या बांधून गारद्यांच्या पहा-यात ठेवण्यात आले.

घाशीरामला कैद केले तरी ब्रह्मवृंदांचे स‌माधान झाले नव्हते. त्याला हत्तीच्या पायी देण्याचा त्यांचा आग्रह होता. तेव्हा त्याला हत्तीवर बांधून शहरातून फिरविण्यात आले. त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला दगड मारले. त्यात त्याचे डोके फुटले. तरी ब्रह्मवृंद शांत होईना. शेवटी दुस-या दिवशी, 31 ऑगस्ट 1791 रोजी त्याला उंटावर उलटे बसवून गारपिरावर नेऊन सोडले. तेथे 'ब्राह्मणांनी त्यास धोंडे घालून मारिले. अद्यापि शरीर कोतवालाचे पडले आहे. नदीत टाकिले नाही,' असे मिरजकरांच्या वकीलाचे पत्र आहे. (ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3374, पृ. 4539) घाशीरामच्या दोघा मुलांना, तसेच त्याच्या दिवाणालाही बेड्या घालण्यात आल्या. घाशीरामच्या घरावरही जप्ती आणण्यात आली. अशा रीतीने घाशीराम प्रकरणाचा शेवट झाला.

तत्कालीन पुण्याच्या ढासळलेल्या नैतिकतेवर प्रकाश टाकणारे असेच हे प्रकरण आहे.

संदर्भ -
महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, पृ. 497-498.

9 comments:

मृण्मय said...
This comment has been removed by the author.
मृण्मय said...

रा.रा.विसोबा,

- 8 फेब्रुवारी 1977(?) रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.
- महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1907(?) ते 1818

कृपया टंकनदोष दूर करावेत.

(नाना फडणीस = बाळाजी जनार्दन भानू)

क.लो.अ.

visoba said...

thanks a lot mrunmay.

P K Phadnis said...

आपला लेख माहितीपूर्ण आहे. घाशीराम नंतर कोतवालपद पुन्हा केतकर घराण्याकडे गेले काय? आपणास माहिती असल्यास कळवावे.

P K Phadnis said...

नानाजी फाकडे नव्हे. मानाजी फाकडे. हा सरदार फार रुबाबदार व मर्दानी सौंदर्याचा नमुना असल्यामुळे त्याला फाकडा म्हणत. त्याचे खरे नाव स्मरणात नाही. त्यावेळी दोनतीन लोकांना फाकडा म्हणत.कॅप्टन स्ट्युअर्ट हा इंग्रज अधिकारी इस्टुर फाकडा म्हणून ओळखला जाई.

visoba said...

yes sir,
its manaji phakde.
i have corrected it.
thank you.

Akshay Mate said...

Visoba Kaka, Majhi site bagha na aaho please!! www.pakpakpakak.blogspot.com

sachinricha said...

mazya mahiti pramane mazya wachnyat ek lekh aala hota tya madhe asa spasht ullekh hota ki punya madhe tya weli vaishya ywawsai budhwar pethe madhe chalat ase ya aslya prakarala ghashiramcha virodh hota. ekda ghashiram kotwalane ek bramhan mansala asa vaishya barobar pakdla w shiksha keli pn ya shikshe madhe tyacha mrutu zala ya goshti warun sarv bramhan samaj khawalla w tyani peshwyanchi kan bharni karun tyala tabyat ghetle pn tabyat ghetlya nantar tyacha mrutu zala.
jara ya goshtichi pn choukashi kara.

Sanjay Kshirsagar said...

मानाजी फाकडे हा गृहस्थ शिंदे घराण्यातील असून पानिपतच्या युद्धात शिंद्यांच्या घराण्यातील सर्व प्रमुख मंडळी मरण पावल्यावर शिंद्यांची सरदारकी महादजीला न देता या मानाजीस देण्याचा घाट रघुनाथरावने घातला. मानाजी पराक्रमी असून रघुनाथरावास सामील असल्याने मराठी राज्याच्या सेवेत कमी पडला.