दाशराज्ञ युद्ध

हिंदुस्तानच्या इतिहासातील दोन युद्धे प्रसिद्ध आहेत.
त्यातील एक म्हणजे पांडव-कौरवांतील महायुद्ध आणि दुसरे म्हणजे ऋग्वेदकालीन दाशराज्ञ युद्ध.

दाशराज्ञ युद्ध ही ऋग्वेदातील एक महत्त्वाची घटना आहे. हे युद्ध नेमके कधी झाले, हे सांगणे अवघड आहे कारण अद्याप ऋग्वेदाचा काळ निश्चित झालेला नाही. त्याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. मात्र सर्वसाधारणतः इसवी सन पूर्व दोन हजार ते इसवी सन पूर्व एक हजार चारशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. या कालखंडात केव्हातरी हे युद्ध झाले. या युद्धास कारणीभूत ठरले ते दोन पुरोहितांमधील वैर. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ते दोन पुरोहित. भरतांच्या कुशिकांच्या कुळात सुदास नावाचा राजा होता. विश्वामित्र हा या राजाचा पुरोहित. ऋग्वेदातील ऋचांवरून भरतांची टोळी इराणच्या पूर्व भागातून भारतीय उपखंडात शिरली असे दिसते.

विपाश (बियास) आणि शतुद्रि (सतलज) या दोन नद्यांच्या खो-यांतील जमातींचा पराभव करण्यास विश्वामित्राने सुदास राजाला मदत केली. पण नंतर सुदासाने विश्वामित्रास मुख्य पुरोहितपदावरून काढून टाकले आणि त्याच्याजागी वसिष्ठाची नियुक्ती केली. झाले! त्यामुळे विश्वामित्र चिडला. वसिष्ठ आणि त्याच्यात वैमनस्य निर्माण झाले. सुदास राजाला धडा शिकविण्याचा निश्चय विश्वामित्राने केला. (येथे चाणक्याची आठवण येते ना?) त्याने भरतांच्या विरोधात दहा जमातींच्या राजांचा एक गट तयार केला. पुरु, अनु, द्रुह्यु, यदु, तुर्वश, पख्त (पक्थ), भालाणस (भलानस), आलिन (अलिन), विषाणिन् (विशाणिन) आणि शिव या त्या दहा जमाती. यातील पुरु, अनु, द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पंचजन म्हणून ओळखल्या जातात.

हे पंचजन हे काय प्रकरण आहे ते प्रथम पाहूया.
सप्तसिंधुच्या प्रदेशात (म्हणजेच पश्चिमेकडे सिंधु आणि पूर्वेकडे सरस्वती या प्रदेशात सात नद्या वाहात होत्या. त्या अशा -
१. सरस्वती (भारतातील घग्गर, पाकिस्तानातील हाक्रा)
२. सिंधु
३. परुष्णी (रावी)
४. असिक्नि (चिनाब)
५. शतुद्रि (सतलज)
६. वितस्ता (झेलम)
७. विपाशा (बिआस)
तर या सात नद्यांच्या परिसरात वसलेल्या आर्यांच्या दोन शाखा होत्या. पहिली सूर्यवंशी इक्ष्वाकू आणि दुसरी चांद्रवंशीय ऐल. या ऐलांच्या पुरु, अनु, द्रुह्यु, यदु व तुर्वश अशा पाच जमाती होत्या. त्यांना पंचजन म्हणत. या शेतकरी जमाती असाव्यात. पंचकृष्टयः किंवा पंचकार्षणः असा त्यांचा उल्लेख आढळतो. याशिवायही तेथे काही छोट्या टोळ्या होत्या. त्या सर्वांत पुरु ही जमात बलाढ्य आणि प्रबळ होती.

अनु. द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पुरु आणि भरतांच्या आधी भारतात आल्या होत्या. अनु, द्रुह्यु आणि तुर्वश यांची चिनाब (असिक्नि) आणि रावी (परुष्णी)च्या प्रदेशात वस्ती होती. अनु आणि द्रुह्यु हे समुद्रापारच्या प्रदेशातून आल्याचे उल्लेख आहेत. त्यांनी त्यांचे देवही बरोबर आणले होते. त्यांना अ-वैदिक समजले जाई. या पंचजनांपैकी यदु आणि तुर्वशांचे आर्यांशी वैर होते. त्यांच्या नावावरूनही याला पुष्टी मिळते. अनु म्हणजे अनार्य, द्रुह्यु म्हणजे द्रोही, तुर्वश म्हणजे हल्लेखोर. ऋग्वेदात यदु आणि तुर्वश यांचा उल्लेख दास असाही केलेला आहे. महाभारताने त्यांना यवन (परकीय) म्हटलेले आहे, तर अनुंच्या पुत्रांचा उल्लेख म्लेंच्छ असा केला आहे. उत्तर वैदिक वाङमयातही यदु आणि अनु-द्रुह्यु यांना म्लेंच्छ म्हटले आहे. द्रुह्युंनी भारताबाहेर जाऊन म्लेंच्छांचे साम्राज्य स्थापन केले असे पुराणात सांगितले आहे. अर्थात त्या काळी म्लेंच्छ याचा अर्थ होता - संस्कृत नीट न बोलता येणारा. यदु ही पंचजनांतील महत्त्वाची जमात. दाशराज्ञ युद्ध काळात तिरींदर हा त्यांचा म्होरक्या होता. परसौ असा त्याचा उल्लेख येतो. त्यावरून तो पार्स देशातला म्हणजे पर्शिया (इराण) मधील असावा असा तर्क आहे. यदुंची वस्ती सिंधु नदीच्या खालच्या खो-यात होती आणि तेथून ते गुजराजमध्ये शिरले.

दाशराज्ञ युद्धात पख्तु (वा पक्थ) जमातीने भाग घेतला होता. पख्तु म्हणजे हल्लीचे पख्तून. ते वायव्य सरहद्द प्रांतात आणि त्या लगतच्या अफगाणिस्तानच्या प्रदेशात राहात असत. त्यांच्या दक्षिणेस काबुलिस्तानमध्ये भालाणस आणि ईशान्य अफगाणिस्तानमध्ये आलिन यांची वस्ती होती. विषाणिन् (शिंगे असणारा पशू - बहुधा वृषभ. विषाणिन् एकशिंगाचे शिरोभूषण वापरत असावेत म्हणून त्यांना हे नाव पडले. किंवा वृषभ हे या जमातीचे देवक - अर्थात टॉटेम असावे.) हे क्रुमु (कुर्रम) आणि गोमती (गोमल)च्या खो-यात राहात असत.

आता आपण परत दाशराज्ञ युद्धाकडे वळू या.
या युद्धात विश्वामित्राने दहा जमातींच्या राजांचा गट केला आणि तो सुदासच्या विरोधात उभा राहिला. सुदासच्या बाजूनेही दहा राजे होते. तत्सु, पर्शू, पृथू या त्यातील काही जमाती. यांच्यामध्ये परुष्णीच्या म्हणजेच रावी नदीच्या काठावर हरियुपिया (हडप्पा?) येथे लढाई झाली. दोन्ही बाजूंनी वीस राजे या युद्धात सहभागी झाले होते. सर्वमिळून सैनिकांची संख्या होती - सुमारे सहाशे! हे युद्ध भरतांचा मुख्य सुदास याने जिंकले. पुरुंचा पुरुकुत्स, अनु आणि द्रुह्यु नदीत बुडाले. पराभवानंतर पुरु पूर्वेकडे सरस्वती नदीच्या खो-यात आले. त्या प्रदेशाचे नाव शरण्यावत असे होते. तो प्रदेश म्हणजे हल्लीचा हरयाणा.

दाशराज्ञ युद्धानंतर यमुनेच्या तीरावर एक छोटे युद्ध झाले. त्यात सुदासाला अज, सिग्रु आणि यक्षांशी लढावे लागले. भेद हा त्यांचा पुढारी होता. या युद्धातही इंद्राने सुदासाला साह्य केले. या युद्धानंतर भरत यमुनेपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी सरस्वती व यमुना यांमधील प्रदेशात वस्ती केली. या भागाला ब्रह्मावर्त हे नाव पडले. हिंदु धर्माचा उगम येथे झाला.

(संदर्भ - आर्यांच्या शोधात, मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिली, मे २००८, किं. ९० रु., पान २४ ते २९)

10 comments:

KK RR said...
This comment has been removed by the author.
Shankar Gheware said...

It is very nice & useful information provided by you. I like to read history. Be continue with reagards.I waiting for next
Thanks & take care

. said...

शान, धन्यवाद.

मयुरेशजी, या लेखातील सर्व माहिती मी आर्यांच्या शोधात या पुस्तकातून घेतलेली आहे. लेखाखाली तो संदर्भ दिलेला आहे.
- विसोबा

KK RR said...
This comment has been removed by the author.
प्रसाद मुळे said...

छान उतारा विसोबा. पण सैनिकांची संख्या फक्त सहाशे कशी ? एवढ्या छोट्या टोळीच्या युद्धाचा इतिहास का जतन झाला आजवर ? महाभारतिय युद्धाचा इतिहास जतन झाला असेल कारण ते तेवढे मोठ्ठे युद्ध होते असे सांगितले जाते. (असे वाटते)

अधिक स्पष्टीकरण मिळाले तर समजुन घेण्यास मदत होईल. धन्यवाद.

Priyabhashini said...

ऋग्वेदाचा काळ इसवी सन पूर्व दोन हजार ते इसवी सन पूर्व एक हजार चारशे मानला तर रामायण आणि महाभारत कधी घडले? ऋग्वेदानंतर की आधी? तसेच हडप्पा आणि मोहेंजेदाडो संस्कृतींचा काळ सुमारे इ.स.पूर्व २६०० वर्षांपूर्वीचा गणला जातो. समूळ सिंधू संस्कृतीचा उगम इ.स.पूर्व ५००० वर्षांपूर्वीचा असण्याची शक्यता मानली जाते.तर हे काळाचे गणित नेमके कुठे फसते आहे?

ऐलांच्या पुरु, अनु, द्रुह्यु, यदु व तुर्वश या जमातीही शेतकरी नसाव्यात. गोपालन करणार्‍या भटक्या जमाती असाव्यात. यदुंचे महाभारतकालीन प्रसिद्ध स्थलांतर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच.

कामधेनूवरून विश्वामित्र (कौशिक राजा) आणि वसिष्ठ यांचे भांडण झाल्याची गोष्ट बहुधा रामायणात येते. हे भांडण नेमके कधी झाले? दाशराज युद्धाआधी का नंतर?

Anonymous said...

माझ्या मते दाशराज्ञ युद्ध हे इंद्रिय प्रेरणा प्रमाण मानणारी पितृपूजक संस्कृती आणि मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो असे मानणारी वसिष्ठप्रणीत संस्कृती या दोन संस्कृती यांच्यामधील संघर्षावर कलेले रूपक आहे. अशी युद्धे अनेकदा झाली असावीत आणि त्यातील एकाचा आधार या रूपकासाठी घेतला गेला.

Panchtarankit said...

आर्याच्या शोधात हे पुस्तक वाचले पाहिजे
धन्यवाद चांगला लेख

Anonymous said...

chan lekh aahe... thanks for the reference.

samsonjabs said...

What are the benefits of slots at the casino?
With slots being an integral part 삼척 출장안마 of most 진주 출장안마 casinos, you can be at your 안양 출장마사지 best to 울산광역 출장안마 have fun, and try a casino without risking 의정부 출장마사지 money. Slot games