गोष्ट – लवणाची आणि एका महाकुंपणाची

महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. दांडीयात्रा म्हणून स्वातंत्र्याच्या इतिहासात ते प्रकरण येते. असे म्हणतात, की गांधीजींनी जेव्हा त्या सत्याग्रहाचा प्रस्ताव मांडला होता, तेव्हा काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा त्याला विरोध होता. त्यांचे म्हणणे असे, की त्याहून अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. जमिनीवरील कराचा प्रश्न आहे. तर त्याविरोधात सत्याग्रह करावा. परंतु गांधीजींनी मिठाच्या कराविरुद्ध आंदोलन छेडले. ते प्रचंड यशस्वी झाले.
हा सर्व इतिहास वाचत असताना नेहमीच एक प्रश्न पडत असे, की गांधीजींनी सत्याग्रहासाठी मीठच का निवडले? मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे. ती सर्वांसाठीच आवश्यक आहे. म्हणून त्यांनी त्यावरील कराचा प्रश्न हाती घेतला, हे समजते. तरीही एका साम्राज्याला आव्हान देण्यासाठी गांधीजींनी मिठाची निवड करावी आणि त्या साम्राज्यानेही प्रचंड ताकदीनिशी त्याचा प्रतिकार करावा, हे गणित काही नीट लक्षात येत नव्हते. येथे कुठेतरी काही तरी सुटते आहे असे सतत वाटत होते. त्याचे उत्तर रॉय मॉक्सहम यांच्या द ग्रेट हेज ऑफ इंडिया या पुस्तकातून मिळाले. (मॉक्सहम म्हणजे तेच – आऊटलॉ : इंडियाज बँडिट क्विन अँड मी या पुस्तकाचे लेखक.) आनंद अभ्यंकर यांनी केलेला या पुस्तकाचा अनुवाद अचानक हाती पडला आणि मीठ हे ब्रिटिश साम्राज्यासाठी किती महत्त्वाचे होते, हे समजले. त्याचबरोबर हिंदुस्थानच्या इतिहासातील एक अत्यंत रंजक अशी माहितीही हाती लागली. अशी माहिती, की जी आजवर कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकाने आपणांस दिलेली नव्हती, कोणीही आपणांस सांगितली नव्हती.

तर पहिल्यांदा हे पुस्तक मिठाच्या महत्त्वाविषयी काय सांगते ते पाहू. –
‘शरीराला आपली कार्ये चालविण्यासाठी सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाची गरज असते. शरीराच्या वजनाच्या १/४०० भाग इतके मिठाचे वजन असते. मानवाच्या शरीरात सरासरी सहा औंस (सुमारे १०० ग्रॅम) मीठ असते.
रक्तातील मिठाचे प्रमाण कायम राखण्यासाठी, घामातून झालेला जलक्षय भरून काढण्यासाठी आपण प्यालेलं सर्वच पाणी शरीर राखून ठेवेल असे नसते. जास्तीचे पाणी लघवीच्या रुपाने बाहेर टाकले जाते. अशा स्थितीत शरीरातील रक्ताचे आकारमान कमी होते. रक्तदाब त्यामुळे कमी होईल. मिठाचा क्षय अशा रीतीने सुरूच राहिला, तर रक्ताचे आकारमान आणखी कमी होईल आणि रक्तदाब सतत कमी होत राहील. मेंदूचा रक्तपुरवठा कमी होईल. त्यामुळे झीट येऊ शकते आणि अखेरीस संपूर्ण बेशुद्धावस्था येऊ शकते.’ 
तर मिठाअभावी माणसाचा मृत्यू होऊ शकतो. भारतासारख्या उष्ण हवामानाच्या देशात घाम येण्याचे प्रमाण अधिक. तेव्हा मिठाचे सेवनही अधिक.

अंतर्गत शुल्क विभाग आयुक्तांच्या १७६९च्या वार्षिक अहवालानुसार :
“ज्या ठिकाणी मीठ तयार होते ती क्षेत्रे व त्याच्या अगदी नजीकचे भाग वगळता सीमाशुल्क रेषेच्या बाहेरच्या १०० मैलांच्या टापूत – जेथे करविरहित मीठ उपलब्ध आहे – राहणा-या प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे मिठाचे सरासरी प्रमाण १३ पौंडांपैक्षा नक्कीच कमी नाही आणि प्रत्यक्षात कदाचित ह्यापेक्षा जास्त असू शकते. परंतु प्रत्यक्ष चौकशी व लोकसंख्या आणि त्यांना पुरवठा झालेल्या मिठाची राशी पाहता हे सिद्ध झाले आहे की, प्रत्येक प्रौढ माणसाची सरासरी मिठाची गरज – सीमाशुल्क रेषेच्या आतील भागात – ८ पौंडांपेक्षा जास्त नाही.”
पुन्हा हे मीठ केवळ माणसांनाच नाही, तर जनावरांनाही लागे. भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला मिठाचे व्यापारी महत्त्व बरोबर समजले. त्यांनी मिठावर कर लावला.

तसा ‘भारतात फार पुरातन काळापासून मिठावर कर लावण्यात येत आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य... याने मिठावर कर लावलेला होता... (तेव्हा) एक विशेष अधिकारी – ज्याला लवणाचार्य असे संबोधले आहे – तो मिठाच्या व्यवहारासंबंधी जबाबदार होता. मीठ तयार करणा-यांना शुल्क आकारून परवाना दिला जाई किंवा त्याच्या मिठाच्या उत्पादनाच्या एक षष्ठांश हिस्सा राजाला देण्याच्या हमीवर त्याला परवाना दिला जाई... असे वाटते की, मिठावर एकूण कर २५ टक्के इतका असावा. ब्रिटिश सरकार भारतात येण्यापूर्वी अशा स्वरूपाचा अथवा थोडा कमी कर कायम आकारला जात होता. ब्रिटिश आल्यावर तो थोडा वेगळा झाला.’

रॉबर्ट क्लाईव्ह हा मोठा लाचखोर अधिकारी होता. त्याने १७६५ मध्ये एक खासगी कंपनी स्थापन केली. या ‘नव्या कंपनीला तंबाखू, सुपारी आणि मीठ या वस्तूंवर कुठल्याही प्रकारे नफा मिळविण्याचे एकाधिकार दिले. कंपनीने इतरांना मीठ, सुपारी व तंबाखू यांच्या उत्पादनावर बंदी घातली. कंपनीच्या गोदामांत मीठ पोचविण्यासाठी कंत्राटे देण्यात आली आणि व्यापा-यांना याच कंपनीकडून मीठ घेण्याची सक्ती करण्यात आली. पुढे १७६७ मध्ये ब्रिटिश सरकारच्या दबावामुळे या कंपनीने तंबाखू आणि सुपारीवरील आणि १७६८ मध्ये मिठावरील एकाधिकार सोडून दिला. मात्र तोवर कंपनीने ६५ लाख ३१ हजार १७० रुपये इतका नफा कमावला होता.’

‘१७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने कारभार हाती घेतला. त्यावेळी मिठावर दर मणास सुमारे पाच आणे कर होता. त्यातून कंपनीला सालीना साडेचार लाख रूपये मिळत. हेस्टिंग्जने या उत्पन्नात वाढ करण्याचे ठरवले.’ त्याने अमलात आणलेल्या नव्या पद्धतीमुळे ‘पहिल्याच वर्षात म्हणजे सन १७८१-८२ मध्ये मिठापासून मिळालेले उत्पन्न २९ लाख ६० हजार १३० रुपये होते. सन १७८४-८५ या वर्षांपर्यंत ते वाढून ६२ लाख ५७ हजार ४७० रुपयांपर्यंत गेले.’

मिठावरील करामुळे ते आता परवडेनासे झाले होते. डॉ. जॉन क्रॉफर्ड या गृहस्थाने ब्रिटिश संसदेच्या विशेष समितीला सन १८३६ मध्ये दिलेल्या पुराव्यानुसार,
‘१८२३ मध्ये देशातील अनेक भागांत भेसळयुक्त मिठाची किंमत दर मणास १२ रुपये इतकी होती. ही किंमत मजुरांच्या सालीना उत्पन्नाच्या अर्धी होती.’ 
बंगालच्या दुष्काळात लक्षावधी माणसे अन्नान्न दशा होऊन मेली. त्यातील अनेकांच्या मृत्यूस मिठाची कमतरता कारणीभूत होती. सरकारने केलेली साठवणूक, वाढवलेले दर आणि प्रचंड कर यांचा तो परिणाम होता.

ब्रिटिशांनी हिंदुस्थानची कशी लुटमार केली त्याचे हे एक उदाहरण. महात्मा गांधींना मिठावरील कराचा प्रश्न इतका का महत्त्वाचा वाटत होता, त्याचे हे उत्तर. आणि त्यांच्या सत्याग्रहाला इतका प्रतिसाद का मिळाला, त्याचेही हेच उत्तर.

आता वर उल्लेख केलेल्या गौप्यस्फोटाविषयी...

कंपनीने मिठावर एकाधिकार प्रस्थापित केला. मिठाची किंमत वाढवली. त्यामुळे मग आपोआपच अनधिकृत मीठ निर्मिती सुरू झाली. लोकांनी स्वस्त मीठ विकण्याचे प्रयत्न सुरू केले. मिठाची तस्करी होऊ लागली. कंपनी सरकारच्या सत्तेच्या सीमेपलीकडील प्रदेशातून तस्करी करून मीठ आणले जाऊ लागले. त्यामुळे कंपनी सरकारच्या महसुलाला प्रचंड धोका निर्माण झाला. ही अवैध मीठविक्री रोखण्यासाठी कंपनीने कंबर कसली आणि त्यातून येथे निर्माण झाले – द ग्रेट हेज ऑफ इंडिया.
‘मिठाची तस्करी थांबविणे आणि साखर, तंबाखू व इतर किरकोळ पदार्थांवर सीमाशुल्क कर वसूल करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने बृहत् बंगालमध्ये सर्वत्र सीमाशुल्क भवने स्थापन केली. सन १८०३ च्या कायद्यात प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये एक सीमाशुल्क इमारत किंवा चौकी तयार करण्याची तरतूद करण्यात आली. त्याच्या पुढच्याच वर्षी आलेल्या एका नवीन कायद्यामुळे बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये प्रत्येक प्रमुख रस्त्यावर व नद्यांवर सीमाशुल्क कुंपण उभारण्यात आले.’ 
ही त्या महाकुंपणाची सुरूवात होती. याबाबत सर जॉन स्ट्रॅस्ट्रॉची यांची एक टिपण्णी आहे. ते लिहितात –
“मिठावरील लादलेल्या कराची निश्चितपणे वसुली करण्यासाठी एक राक्षसी पद्धत हळूहळू उदयाला आली. या पद्धतीची तुलना होईल असे उदाहरण कुठल्याही सुसंस्कृत मानवी समाजाच्या इतिहासात सापडणार नाही. ही पद्धत सबंध भारत देशात निर्माण करण्यात आली. सन १८६९ मध्ये ही रेषा सिंधू नदीपासून तत्कालीन मद्रास प्रांताच्या महानदीपर्यंत निर्माण करण्यात आली. या सीमारेषेची लांबी दोन हजार ५०० मैल होती व तिचे रक्षण १२ हजार माणसे करीत होती. ही लांबी म्हणजे लंडन ते कॉन्सँटिनोपल इतके अंतर होईल. ही सीमारेषा म्हणजे काटेरी झाडे व झुडुपे यांनी तयार केलेल प्रचंड अभेद्य असे कुंपण होते.”

पुस्तकातील नकाशानुसार हे कुंपण सध्याच्या पाकिस्तानातील तोरबेला, मुलतान असे पसरत पुढे फझिल्का, हिस्सार ते पुढे दिल्लीला वळसा घालून आग्रा, झाशी, होशंगाबाद, खांडवा, चंद्रपूर आणि रायपूरपर्यंत येऊन थेट ओरिसातील महानदीपर्यंत पसरलेले होते.

कसे होते हे कुंपण? तत्कालीन सीमाशुल्क आयुक्तांचा एक अहवाल सांगतो -
“हे अडथळे इतके मजबूत होते, की त्यामधून मनुष्य वा जनावर जाण्याची सुतराम शक्यता नाही... आदर्श स्थितीत कुंपण हे हिरव्या झाडाझुडपांचे असते. त्याची उंची दहा ते चौदा फूट आणि रुंदी सहा ते बारा फूट असते. ह्या झुडपांमध्ये मुख्यत्वे बाभूळ, बोर, करवंद, नागफणा आणि शेर अशा काटेरी झुडुपांचा जमिनीच्या मगदुराप्रमाणे समावेश केला जातो. ह्या सर्व झुडुपांची वेळोवेळी छाटणी करून त्यांचा आकार राखला जातो. ह्या झुडुंपावर काटेरी वेली सोडून संबंध कुंपण दाट केले जाते.”
विश्वास न बसावा अशी ही गोष्ट आहे. या भारतात इंग्रजांनी एवढे मोठे, दोन हजार ५०० मैलांचे कुंपण घातले होते. द ग्रेट हेज ऑफ इंडिया हे पुस्तक म्हणजे ब्रिटिश लेखक रॉय मॉक्सहम यांनी लावलेल्या या कुंपणाच्या शोधाची कहाणी आहे. १९९५ मध्ये त्यांनी घेतलेल्या एका पुस्तकात त्यांना या कुंपणाचा ओझरता उल्लेख आढळला. त्यांचे कुतुहल चाळवले आणि मग त्यांनी असंख्य कागदपत्रे पालथी घातली. भारतात आले. येथे भटकले. खूप भटकले आणि महत्प्रयासाने त्यांनी या कुंपणाचे अवशेष शोधून काढले. त्यांनी हे कुंपणच शोधले असे नव्हे, तर अनुवादक आनंद अभ्यंकर यांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश अमानुषतेची कुंपणनीतिच उजेडात आणली.

(जाता जाता : महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहाने भारतीय राजकारणाची दिशा बदलली. (हे मॉक्सहम यांचे मत.) पण अजून मिठावरील कर रद्द झाला नव्हता. तो ब्रिटिश भारत सोडून जाण्यापूर्वी सहा महिने, २८ फेब्रुवारी १९४७ रोजी रद्द झाला.)

मीठ : ब्रिटिश अमानुषतेची कुंपणनीति
The Great Hedge Of India या Roy Moxham 
यांच्या मुळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
अनुवादक – आनंद अभ्यंकर. 
मोरया प्रकाशन, प्रथमावृत्ती २००७, पाने २०८, किंमत २०० रु. 

3 comments:

Anonymous said...

क्या बात हैं! अडीच वर्षानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत… आपल्याच ब्लॉगवर…

sanjay kshirsagar said...

बऱ्याच दिवसांनी का होईना पण परत एकदा पण लेखन सुरु केल्याबद्दल आपले अभिनंदन !

Anonymous said...

Visoba, Kuthe Aahat?