शिमगा : इतिहासाच्या पानांतून...

रंगोत्सव, १८५५
एका संवत्सराचा अंत आणि दुस-याचा आरंभ समारंभपूर्वक साजरा करण्याचा सण म्हणजे होळी. हाच शिमग्याचा सण. सीमग या शब्दापासून सीमगा आणि त्यापासून शिमगा असा हा शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ सीमग म्हणजेच सीमेप्रत आलेल्या सूर्याचा सण
हे नीट समजून घेतले पाहिजे. वेदांमध्ये वर्षारंभ वसंतापासून सुरु होतो. वर्षारंभ उत्तरायणाच्या आरंभी करावा असे धर्मशास्त्रांत सांगितले आहे. हल्ली उत्तरायण पौषात सुरू होते. पण सुमारे सहा हजार वर्षआंपूर्वी उत्तरायण फाल्गुनी पौर्णिमेस होत असे. या पौर्णिमैस सूर्य नक्षत्रचक्रांत दक्षिण दिशेच्या सीमेवर जाऊन उलटतो म्हणून तो सीमग म्हणजेच सीमेपाशी आलेला दिसला. एकंदर होळी म्हणजे फाल्गुनोत्सवच. हा सण चालतो पंचमीपर्यंत. म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होळी असते. वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली जाते आणि वद्य पंचमीला रंगोत्सव
या होळीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. होलिका ही लहान मुलांना खाणारी राक्षसीण. तिला गावक-यांनी जाळून मारले, याचे प्रतिक म्हणून होळी असे सांगितले जाते. महाराष्ट्रात हा सण तर दिवाळीपेक्षाही जुना असल्याचे सांगितले जाते. नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोक कर्नाटक आणि आंध्र प्रांतातून महाराष्ट्रात आले होते. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात त्यांच्या वसाहती होत्या. हे सारे गोपालक. गुरांचे मोठमोठे कळप असायचे त्यांच्याकडे. त्या गुरांचे शेण एकत्र साठविले जायचे आणि ते वर्षातून एकदा जाळायचे अशी प्रथा या लोकांनी सुरू केली होती. याच प्रघातातून होळीच्या सणाची सुरुवात आपल्याकडे झाली असे विद्वानांचे मत आहे
हा सण तसा देशव्यापी. पण प्रांतानुसार त्याच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आज आपण जी रंगांची होळी साजरी करतो, ती काही मूळ महाराष्ट्राची नाही. ती आपल्याकडे आली उत्तरेतून. त्याची काही कारणे आहेत इतिहासात आणि काही आहेत हिंदी चित्रपटांत. आपल्याकडे खरे महत्त्व असते ते होळी पेटविणे आणि धुळवड यांना
पूर्वी कसा साजरा केला जायचा हा सण? याचे उत्तर आपल्याला मिळते प्राचीन ग्रंथांतून

लीळाचरित्र हा त्यातलाच एक. त्यातील एका लीळेत होळी पेटविण्याचा विधी सांगितलेला आहे. तो असा
वीळीचां गोसावी नाथोबा करवि होळी वेंचविली : एकी वासना : रचविली : उपाध्यांकरवि गोसावी होळीची प्रतीष्ठा करविली : सर्वज्ञें म्हणीतलें : एथिचा विधी हा जाणे : मग उपाध्यीं जीए वेले होळी लाविली तीए वेळे होळी लाविली : (मुहूर्तावर) मग बाइसांते मांडा मागितला : तो बांधला : नीवेदु दाखविला : मग गोसावी तेथ बीजें केलें : होळिए प्रदक्षिणा केली : गोसावी फुटेयाचे दोन्ही पालव श्रीमुगुटावरि घातले होते’ 
चक्रधरांच्या काळी म्हणजेच बाराव्या-तेराव्या शतकात होळी कशी साजरी केली जायची हे यातून दिसते. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. म्हणजे होळीची विधिपूर्वक पूजा, तिला पुरणपोळीचा (मांडा) नैवेद्य अर्पण करणे हे तेव्हाही होते. यानंतरचा भाग धुळवडीचा
गोविंदप्रभुचरित्रात त्याचे वर्णन येते. गोसावीयांचे (म्हणजे श्रीप्रभूंचे) धाकुटेंपणीचे सवंगडे म्हांतारपणीं खेळावेया नीगाले : चीखलु : माती : राख : सेन : ऐसा खेळु केला : मग कापुरू : कस्तुरि : चंदन : मळणें : सेंदुर ऐसा खेळु जाला : मग मृदंगा काहाळा तुरे टीरी ऐसा खेळु खेळीनले
म्हणजे चीखल, माती, राख, शेण यांचा गारा करून एकमेकांना लावणे आणि मग कापूर, चंदन, कस्तुरी, शेंदूर लावणे असा तो खेळ वाद्ये वाजवित खेळला जायचा
उत्तरेतील होलिकोत्सवाचा उल्लेख आपल्याला आढळतो वात्सायनाच्या कामसूत्रात. त्यानुसार त्या काळी पळसाच्या फुलांचे रंग तयार केले जायचे. ते पिचकारीने उडविले जायचे. गुलाल, बुक्का एकमेकांच्या अंगावर फेकला जायचा. ही क्राडी फाल्गुनी पौर्णिमेला केली जायची.
हा रंग उधळण्याचा रंगारंग कार्यक्रम मदनोत्सवातही होत असे. हा उत्सव म्हणजेच वसंतोत्सव. अर्वाचीन पंचागांत चैत्र शुद्ध त्रयोदशीला साजरा केला जाणारा उत्सव तो होच. अनंगोत्सव हेच या मदनोत्सवाचे दुसरे नाव. याचे एक वर्णन आढळते श्री हर्षाच्यारत्नावली.
वारुणीमुळे बेभान झालेल्या कामिनींनी आपण होऊन करग्रहण केल्यामुळे आनंदाने नाचणा-या या नागरिकांनी एकमेकांवर पिचा-यांतील रंगाने चालविलेल्या मा-यामुळे या मदनमहोत्सवाला फारच मजा आली आहेजिकडे तिकडे ओंजळींनी फेकलेल्या गुलालाने सर्व दिशा लालभडक होऊन गेल्या आहेतक्रीडाचतुर पुरुषांनी पाण्याने भरलेल्या पिचका-या अंगावर उडविल्यामुळे मनोहर सीत्कार करणा-या या वेश्यांगनांचे हे विलास पाहा…’ असे मोठे रंगीतसंगीत वर्णनरत्नावली येते
हे झाले उत्तरेकडचे. पण प्राचीन काळी महाराष्ट्रात हा फाल्गुनोत्सव कसा साजरा केला जायचा? हे पाहायचे असेल, तर आपल्याला हाल सातवाहनांच्या गाथासप्तशतीपर्यंत जायला हवे. हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्यग्रंथ. निर्मिती काळ दोन हजार वर्षांपूर्वीचा. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकातला. महाराष्ट्रातील तत्कालिन ग्रामीण जीवनाचे, तेव्हाच्या लोकांच्या भावभावनांचे दर्शन घडविणा-या या काव्यसंग्रहातीलफाल्गुनोत्सवनामक काव्याची नायिका म्हणते
फग्गुच्छणणिद्दोसं केण वि कद्दमपाहणं दिण्णम्
थणअलसमूहपलोट्ठन्तसेअधोअं किणो धुअसि?’
प्राकृत महाराष्ट्रीतील या ओळींचा अर्थ असा, की (एक तरुणी तिच्या सखीस म्हणत आहे -) फाल्गुनोत्सवांत निर्दोष असणारा चिखलाचा अलंकार कोणी तरी तुझ्या अंगावर चढविला आहे. म्हणजे तुझा देह कुणी चिखलाने रंगविला आहे. ज्याने हे केले त्याच्याबद्दलच्या प्रेमामुळे सुटलेल्या घामाच्या धारांनी तुझे स्तनकलश अगोदरच धुतले गेले आहेत. आता ते आणखी कशास धुतेस? या शृंगारीक काव्यातील तरुणींची ती थट्टामस्करी बाजूला ठेवली, तर हे दिसते की त्या काळी फाल्गुनोत्सवात अंग चिखलाने बरबटून टाकणे हे निर्दोष मानले जात होते. लीळाचरित्रकालीन समाजातही हेच दिसते. महाराष्ट्रातील या सणांत कुठेही गुलाल-बुक्का सोडला तर रंगांचा उल्लेख आढळत नाही. मग हा होळीतील रंगोत्सव आपल्याकडे एवढा प्रचलित झाला कसा
तर तो आला पेशव्यांच्या काळात उत्तर भारतातून. राजपूत संस्थानांमध्ये ही रंग खेळण्याची प्रथा होती. उत्तरेत मोठ्या थाटामाटाने हा सण साजरा केला जाई. उत्तरेत आपले संस्थान उभारणारे पराक्रमी सरदार महादजी शिंदे हे ते पाहत होते. त्यांनी एकदा सवाई माधवराव पेशवे यांच्या दरबारात जयपूर, मथुरा, आग्रा, वृंदावन आदी ठिकाणी साज-या होणा-या या रंगोत्सवाचे सरभरीत वर्णन केले. ते ऐकून सर्वांनाच या उत्सवाबद्दल आकर्षण निर्माण झाले. आपणही असा उत्सव आयोजित करावा असे पेशव्यांच्या मनाने घेतले. पण हे वर्णन केले गेले तेव्हा फाल्गुन महिना उलटून गेला होता. तेव्हा पुण्यात पहिल्यांदा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्याचे ठरले. या रंगोत्सवासाठी सवाई माधवराव आणि नाना फडणीस यांच्या जोडीला रास्ते, विंचुरकर, ओंढेकर, राजे बहादर आदी सरदार आले होते. यावेळी आसमंतहजारो गुलालगोट्यांनीभरून गेला आणिपर्जन्य पडतो तसा रंग पडू लागला.’ गुलालगोटे म्हणजे हल्लीच्या रंगांच्या फुग्यांसारखेच. अंगावर मारले की ते फुटून गुलाल उधळला जाई. शनिवारवाड्यात असा रंगोत्सव झाल्यानंतर महादजींनी पेशव्यांना आपल्या वानवडी येथील निवास्थानी नेले. तेथेही असाच उत्सव आयोजित करण्यात आला होता. तेथील रंगोत्सवाबद्दल बखरकार सांगतात, असा रंग द्वापारयुगी श्रीकृष्ण भगवान खेळले. तसा कलियुगी श्रीमंत सवाई माधवराव खेळले. असा कोणीं पुढे खेळावयाचा नाही मागेही कोणी खेळला नाही.’
पेशव्यांच्या काळात होळीपासून रंगपंचमीपर्यंतच्या पाचही दिवसांमध्ये शनिवारवाड्यासमोर निरनिराळे करमणुकीचे कार्यक्रम होत असत. संध्याकाळी तमाशा असे. ही प्रथा पुढे सुरूच राहिली
दुस-या बाजीराव पेशव्यांच्या वेळेसही शिंदे पुण्याला खास येऊन रंगोत्सवात सहभागी झाले होते. 18 मार्च 1797 रोजी साज-या झालेल्या सणाचे वर्णन उपलब्ध आहे. त्यानुसार - शिंदे यांची स्वारी आली होती. बरोबर दोन हजार खासा चांगला होता. होळकर, मानाजी फाकडे, रास्ते समस्त मानकरी आले होते. समारंभ उत्तम जाहला. रंग गुलाल बहुत हंगामा जाहला. रंगाचे बंब चाहों कोनांस लावून उडविले. रंग खेळोन समस्त घरोघर गेले.’
अशा प्रकारे महाराष्ट्रात होळीचा रंगोत्सव प्रचलित झाला. उत्तरेने महाराष्ट्र संस्कृतीत हा वेगळाच शिमगा आणला

- विसोबा खेचर

(1. लीळाचरित्रातील समाजदर्शन - सुमन बेलवलकर, पॉप्युलर 2. हालसातवाहनाची गाथासप्तशती - संपादक - . . जोगळेकर, पद्मगंधा प्रकाशन आणि 3. पेशव्यांचे विलासी जीवन - डॉ. वर्षा शिरगांवकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन या पुस्तकांतून संकलित माहितीवर हा लेख बेतलेला आहे.)
पूर्वप्रसिद्धी - सकाळ, मुंबई, ९ मार्च २०२०

No comments: