आग्र्याहून सुटका अन् पेटा-याची सुरस कथा


शके १५८८ पराभव संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजी राजे आगरिया जाऊन औरंगजेबाची भेट घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादशी आगरियातून पेटारियात बैसोन पळाले. यावरी राजश्री संभाजी राजेसह वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस रायगडास आले.
- जेधे शकावली.
ही ३४७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.
मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते.
प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाचे शाहजहानलाही ते जमले नव्हते.
पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले.
आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला.
ती तारीख होती – १७ ऑगस्ट १६६६.


पण या घटनेस प्रारंभ होतो तो १२ जून १६६५ रोजी.
त्या दिवशी मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. पुढे मिर्झा राजांनी महाराजांना आग्र्यास पाठविले. ते गोळकोंड्याच्या कुतुबशहाला जाऊन मिळतील असे भय मिर्झा राजांना वाटत होते. महाराजांची औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण मिर्झा राजांनी आग्रह धरला. त्यांना जावे लागले.

जयपूरच्या दफ्तरखान्यातील राजस्थानी हिंदीच्या डिंगल या बोलीभाषेत लिहिलेल्या पत्रसंग्रहानुसार, राजे ११ मे १६६६ रोजी आग्र्याजवळील मलूकचंद सराई येथे पोचले. १२ मे रोजी ते आग्र्यात आले.
त्याच दिवशी त्यांची आणि औरंगजेबाची पहिली आणि अखेरची भेट झाली.

रामसिंगचा रजपूत सरदार परकालदासचे पत्र सांगते –
या अवधीत बादशहा हा दिवाण-ए- आममधून उठून गुसलखान्यात (दिवाण-ए-खास) जाऊन बसला होता. शिवाजी गुसलखान्यात आला. बादशहाने बख्शी असदखान याला आज्ञा केली, की शिवाजीला घेऊन या आणि मुलाजमत (भेट) करवा. असदखानाने शिवाजीला बादशहापाशी आणले. शिवाजीने एक हजार मोहरा आणि दोन हजार रुपये बादशहा नजर केले. आणि पाच हजार रुपये निसार म्हणून (म्हणजे ओवाळून टाकण्यासाठी) ठेवले. यानंतर शिवाजीचा मुलगा संभाजी पुढे झाला. त्याने पाचशे मोहरा आणि एक हजार रुपये नजर म्हणून आणि दोन हजार रुपये निसार म्हणून दिले.
यानंतर शिवाजीला ताहिरखानाच्या जागेवर राजा रायसिंग याच्यापुढे उभे करण्यात आले. बादशहा काहीच बोलला नाही.
तो दिवस बादशहाच्या वाढदिवसाचा होता. समारंभाचे पानविडे शहाजादे आणि उमराव यांना देण्यात आले. शिवाजीलाही हा विडा देण्यात आला. यानंतर शहाजादे, मुख्य प्रधान जाफरखान आणि राजा जसवंतसिंग यांना खिलतीची वस्त्रे देण्यात आली. यावर –
तब सेवो दिलगीर हुवो, गुस्सा खायो, गलगलीसी आख्यां हुवो.
शिवाजीला क्षोभ झाला. त्याला क्रोध आला आणि त्याचे डोळे क्षोभाने पाणावले. हे बादशहाच्या दृष्टीस पडले. त्याने कुमार रामसिंगाला आज्ञा केली, शिवाला विचारा की काय होत आहे? रामसिंग शिवाजीपाशी आला. तसे त्याने म्हटले –
तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाही देख्या. मैं ऐसा आदमी हों यु मुझे गोर करने खडा रखो. मैं तुम्हारा मन्सीब छोड्या. मुझे खडा तो करीना सीर रख्या होता.
तुम्ही पाहिलेत, तुमच्या वडिलांनी पाहिले, बादशहाने पण पाहिले आहे, की मी कशा प्रकारचा मनुष्य आहे. असे असूनही मला मुद्दाम इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मन्सब टाकून देतो. मला उभे करायचे होते तर रीतसर व्यवस्थितपणे आणि योग्य पद्धतीने करायचे होते.
(थोर इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांच्या मते परकालदासच्या पत्रात आलेले हे हिंदी उद्गार प्रत्यक्ष महाराजांच्या तोंडचे असावेत. परकालदासच्या हिंदीकडे निर्देश करून ते सांगतात, महाराजांनी आग्र्यात रजपूत आणि इतरांशी हिंदीत बोलावे लागे.)

यानंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता.
१४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले.
महाराजांना त्यांच्या तळावरच कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले.
त्यानंतर बादशहाने महाराजांना निरोप पाठविला, की तुम्ही आपल्याजवळील किल्ले मला देऊन टाका. मी तुमची मन्सब बहाल करतो.
महाराजांनी त्याला नकार दिला. तशातच रामसिंगाचे राजपूत सैनिक त्याच्या राज्यातून आग्र्यास येत असल्याची खबर बादशहाला लागली. त्याला यात कटाचा संशय आला आणि त्याने शिद्दी फौलाद आणि तोफखान्याला हुकूम दिला – सेवा को जाई पकडी मारो. शिवाजीला धरून मारा.
पण रामसिंगाने सैन्याबद्दल खुलासा केला. शिवाय बेगम जहानआरा हिने महाराजांना ठार मारू नका असे निक्षून सांगितले. मिर्झा राजे जयसिंग यांचा कौल घेऊन शिवाजी येथे आला आहे. त्याला मारलेत तर आपल्या वचनावर कोण विश्वास ठेवील, असा तिचा सवाल होता.

नंतर हळूहळू महाराजांनी आपल्या सोबत आणलेल्या लोकांना स्वराज्यात पाठविण्यास सुरूवात केली.
रामसिंगलाही आपली जामिनकी मागे घेण्यास सांगितले.
१४ ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांच्या भोवती चौकी-पहारे कडक केले. त्याना विठ्ठलदासांच्या हवेलीत नेऊन ठेवण्याचा हुकूम केला.
ते याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी रामसिंगच्या तळावर गेले, तर रामसिंगने त्यांना भेट नाकारली. थोडा वेळ वाट पाहून महाराज परत गेले.
तब सेवौ जाणौ अब बुरा हौ, तब भाग्यो.
तेव्हाच त्यांनी ओळखले, की आता अनर्थ होणार. त्यांनी आग्र्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि १७ ऑगस्टला त्यांनी पिंजरा फोडला.

(रजपुतांच्या पत्रात ही तारीख १८ ऑगस्ट आहे, तर आलमगीरनामा या औरंगजेबाच्या अधिकृत आणि समकालीन चरित्रात ती २० ऑगस्ट आहे, असे सेतुमाधवराव सांगतात.)


पेटा-याची सुरसकथा

महाराजांच्या तळावरील पहा-यांची स्थिती पाहा.
महाराजांच्या राहण्याच्या जागेभोवती आतील पहा-यावर रामकृष्ण ब्राह्मण, जिवा जोशी, श्रीकृष्ण उपाध्याय आणि पुरोहित बलराम ही कुमार रामसिंगाची खास मंडळी होती. देवडीच्या दरवाजाबाहेर बर्कंदाजांचा पहारा होता. तळाभोवती राजस्थानातील चौफर मीना या जमातीच्या शिपायांचा पहारा होता. त्यांच्या मागे बादशाही सैनिक असत आणि शेवटी शिद्दी फौलादखानाच्या सैनिकांचा पहारा होता. 
मुंगीलाही प्रवेश करणे कठीण जावे अशा या चौकी-पहा-यातून महाराज निसटले. पण कसे?
सर्वसामान्य मान्यता अशी, की ते मिठाईच्या पेटा-यात बसून निसटले.
या पेटा-यांच्या कहाणीचा पहिला उल्लेख येतो तो राजस्थानी पत्रांत. हे पत्र परकालदासचे आहे आणि ते ३ सप्टेंबर १६६६चे आहे. तो लिहितो –
दिवस चार घटका वर आला असता बातमी आली, की शिवाजी पळाला. चौक्या-पहा-यांवर एक हजार माणसे होती. तो नक्की कोणत्या क्षणी पळाला आणि कोणत्या चौकीतून पार झाला. त्यावेळी कुणाचा पहारा होता, हे कोणीही सांगू शकले नाही.
तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यरां कीं आमगरफ्त भी सो पट्यारा मे बैठ निकल्यो.
मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष निघाला की, पेटा-यांची ये-जा होती. त्यामुळे तो पेटा-यांत बसून निघाला असावा.

मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना हा यावेळी औरंगाबादेस होता. तो तारीखे दिल्कुशा या आपल्या आत्मचरित्रात लिहितो –
देवाचा प्रसाद म्हणून शिवाजी दर गुरूवारी मिठाईचे मोठमोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागला. हे पेटारे इतके मोठे असत की एकेक वाहून नेण्यासाठी काही माणसे लागत. मिठाई वाटण्याच्या वेळी शिवाजीच्या निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर खूप गर्दी जमू लागली. पोलादखानाच्या माणसांबरोबर शिवाजीने अशी काही वागणूक ठेवली की ते लोक त्याच्या भजनी लागले.
आणि मग एक दिवशी शिवाजीने एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले. मिठाईचे दोन पेटारे रिकामे केले आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.

जेधे शकावली, सभासद, एक्क्याण्णव कलमी बखर यांतही महाराज पेटा-यांत बसून पळाले असा उल्लेख येतो.

या सर्वांना आधार आहे तो राजस्थानी पत्रात व्यक्त झालेल्या माहितीचा. परंतु ती माहिती तर्काधारित आहे. तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की... या विधानावरून हे स्पष्ट होते, की विचारविनिमय करून केलेला हा एक तर्क आहे.

आलमगिरनामा हा औरंगजेबाच्या कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांचा अधिकृत इतिहास. त्याचा लेखक महंमद काजम हा औरगजेबाचा अधिकारी होता आणि हा ग्रंथ त्याने औरंगजेबाच्या देखरेखीखाली लिहिला, असे त्याने म्हटले आहे. या ग्रंथात महाराज पेटा-यात बसून पळाले असा उल्लेख नाही.
मोगल अकबार या उल्लेखास दुजोरा देत नाही.
सेतुमाधवराव सांगतात, की तेथे निष्कर्ष आहे वेशांतराचा.
पेटा-यांची ये-जा होती. ते पाहणा-यांच्या गर्दीत महाराज वेशांतर करून मिसळले आणि निसटले. संभाजीराजांना पेटा-यात बसविले असणे शक्य आहे. पण महाराज स्वतःला अगतिक आणि कुचंबलेल्या अवस्थेत पेटा-यात कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावावरून आणि सावधगिरीवरून शक्य वाटत नाही, असे सेतुमाधवराव म्हणतात.

मग ही पेटा-यात बसल्याची कथा कशी आली?
सेतुमाधवराव म्हणातात –
पेटा-यात लपून गेले त्यामुळे आम्हांला दिसले नाहीत, असे सांगून आपली सुटका करून घेण्याची ही मोगल अधिका-यांची युक्ती नसेल कशावरून? खुद्द औरंगजेबाचा या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता.

त्या काळात स्वराज्यातही अनेकांना तसे वाटत नव्हते. कवि भूषणचे उदाहरण पाहण्यासारखे आहे.
कवि म्हणतात –
कांधे धरि कांवर चल्योदी जबचाव सेती एकलिये
जात एक जात चले देवा की
भेषको उतारि डारि डंवर निवारी
डा-यौ ध-यौ भेष ओर
जब चल्यौ साथ मेवा की
पौन हो कि पंछी हो कि गुटका की
गौन होकि देखो
कौन भांति गयौ करामत सेवा की
वेष बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटा-याबरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले की वारा बनून गेले? काय चमत्कार करून गेले याचा पहारेक-यांना पत्ताही लागला नाही.

त्याचा शंभर टक्के खात्रीलायक पत्ता तसा अजूनही लागलेला नाही.
अर्थात महाराज कसे याहून, सुटले याला मोल आहे.


संदर्भ : श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ, 
सेतुमाधवराव पगडी, 
परचुरे प्रकाशन मन्दिर, 
१ मे २०११, पृ. १४ ते ३५
छायाचित्र : आग्रा किल्ल्यासमोरील शिवछत्रपतींचा पुतळा

4 comments:

सागर भंडारे said...

मित्रा लेख सुंदर आणि अभ्यासपूर्णच आहे यात शंकाच नाही. येथे एक गोष्ट निदर्शनास आणवून देऊ इच्छितो की. जेधे शकावली ही महाराजांना समकालीन होती आणि तिच्यातील सर्व उल्लेख हे महाराजांबरोबर असलेल्या व्यक्तींकडच्या माहितीवरच आधारित आहे. महाराजांची नेमकी जन्मतिथी सर्वात पहिली नोंदवली आहे ती जेधे शकावलीतच. आणि आज तिलाच ऐतिहासिक प्रमाण मानले जाते. मधे ब.मो. पुरंदरे व तत्सम इतिहासकारांनी शिव-जन्मतिथीचा जो घोळ घालून ठेवला त्यातूनही तरुन जेधे शकावली ऐतिहासिक कसोट्यांवर पूर्ण खरी उतरते. तेव्हा जेधे शकावलीत असलेल्या माहितीचा या राजस्थानी पत्राशी संबंध असण्याची शक्यता नाहिये. कारण राजस्थानी पत्राचे ऐतिहासिक मूल्य आज आपण समजू शकतो. पण जेधे शकावली जेव्हा लिहिली गेली तेव्हा त्यांनी एका राजस्थानी पत्रातील दाखल्या ग्राह्य धरण्यासाठी आजच्यासारखे सखोल संशोधन करण्याचे काहीच कारण नव्हते. आणि तेव्हा ती प्रथाही नव्हती. तेव्हा त्या काळी प्रत्येक ऐतिहासिक सामग्रीत आलेल्या नोंदींची छाननी तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भातही करणे म्हणूनच आवश्यक ठरते. त्या अनुषंगाने तुझी मते ऐकायला नक्की आवडतील

Tveedee said...

मला हि नेहमी हेच वाटत आले आहे .. पेटार्यात बसून आग्र्याहून सुटका हे मुगल अधिकाऱ्यांनी स्वताचा जीव वाचवण्या साठी रचलेली कहाणी असावी .. खरी कहाणी वेगळीच असावी !

Unknown said...

सागर भंडारी
आता लक्षात आली अक्क्ल तुमची
ब.मो. पुरंदरे व तत्सम इतिहासकारांनी शिव-जन्मतिथीचा घोळ नाही घातला साहेब...
जन्म तिथि चा कसला ही घोळ नव्हताच
कारण महाराजांची जन्म तिथि जेधे शकावली मधे जी आहे ती सगळ्या इतिहासकाराना मान्यच होती हे तुमच्या लक्षांमधे सुद्धा नाही आलेल

पण काही फालतू लोकांना ही जन्मतिथि मान्यच होती पण महाराजांची जी जन्म तिथि जेधे शकावली मधे दिली आहे त्या तिथिला शिवजयंती साजरी न करता इंग्रजी तारखे नुसार त्या तिथि दिवशी जी तारीख येते त्या तारखे प्रमाणे शिवजयंती साजरी करायची होती

तर पुरंदरेंच मत अस होत की इंग्रजी तारखे प्रमाणे शिवजयंती साजरी करू नये
तर महाराजांची जी जन्म तिथि जेधे शकावली मधे दिली आहे त्या तिथि नुसार शिवजयंती साजरी करावी

तुमच्या पोष्ट वरुण एक गोष्ट लक्षात आली की वाद काय होता ते तुम्हाला माहितच नाही
पण काही लोक बोलतात म्हणून तुम्ही पण बोलता
तिथि ही हिंदू केलेंडर प्रमाणे येणार
आणि
तारीख ही इंग्रजी केलेंडर प्रमाणे येते

तर महाराजांची जन्म वेळ ही हिन्दू पंचांगा प्रमाणे नोंदवाली आहे तर शिवजयंती सुद्धा हिन्दू पंचांगा प्रमानेच साजरी करावी हे मत पुरंदरेंच होत

तर काही मराठा म्हंवणाऱ्या इतिहास संशोधकांच् मत होत की शिवजयंती ही हिन्दू पंचांगा ऐवजी इंग्रजी केलेंडर प्रमाणे साजरी करावी

हे तुमच इंग्रजी प्रेम आणि अक्क्ल...!!
जे इंग्रजी केलेंडर हे महाराजांच्या जन्मा वेळी अस्तित्वातच नव्हतं त्या इंग्रजी केलेंडर ची गणित मांडून तुम्ही तुम्ही तारखेचा शोध लावायचा जावई शोध लावला आहे

Mina said...

लेख चांगला आहेत पण महारांजाना आग्राहुन सुटका करण्यासाठी महाराज यांच्या पहार्यावर मीना मेव आदीवासी सैनिक होते त्यांच्या मदतीने आगाराच्या कील्लातुन छञपती शिवाजी महाराज यांची सुटका झाली होती आदीवासी मीना मुळे शिवाजी महाराज यांचा प्रवास चाळीस दिवसांचा आरवली पहाडातुन महाराष्ट्र झाला त्यावेळी आग्रात आसलेले पहारेकरी मीना मेव यांचे मोघल दुश्मन झाले त्यांमुळे तेथील मीना लोकांनी व मेवाती नी राजस्थान मधुन पलायन करुन महाराष्ट्रत आले आहे.
आज औरंगाबाद जलगाव जालना या जिल्हा मीना हे परदेशी नावाने ओळखले जाते.