मद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)

वैदिक धर्मशास्त्रामध्ये मद्यपान निषिद्ध मानण्यात आले आहे. मनुने तर मद्य जाणताच काय, पण अजाणतासुद्धा पिऊ नये अशी आज्ञा दिली आहे.
धार्मिक हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि पूज्य असलेल्या अशा मनुस्मृतीमधील ही आज्ञा आहे. तेव्हा तिचे महत्त्व लक्षात यावे. हा ग्रंथ स्थूलमानाने इ.स. २०० ते ३०० या काळातला आहे. मौर्य सम्राट ब्रहद्रथ मौर्य याचा त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने खून केला आणि स्वत:ला सम्राट म्हणून घोषित केले. त्याच्या काळात वैदिक धर्माला खूप चांगले दिवस आले. मनुस्मृती ही त्या शुंगकाळातली. हिंदूंचे धर्म कायदे त्यात सांगितले असल्याने तो अतिशय महत्त्वाचा ठरतो, तर या ग्रंथाने दारू पिणे हे पाप असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते-
सुरा वै मलमन्नानां पाप्मा च मलमुच्यते
तस्माद् ब्रा’राजन्यौ वैशच्य न सुरां पिबेत्
(मनु. ११.९३)

दारू म्हणजे अन्नाचा मळ. आणि मळास पाप म्हणतात. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी दारू पिऊ नये. शूद्रांबाबत येथे मनू काही सांगत नाही. त्यांचे मद्यसेवन त्याने दुर्लक्षिले आहे. ब्राह्मणांना मात्र तो सूट देण्यास तयार नाही. कारण ज्या ब्राह्मणाच्या देहातील वेदज्ञान एकदासुद्धा दारूत बुडते त्याला शूद्रत्व प्राप्त होते (मनु. ११.९७), असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्राह्मणाने दारू जाणूनबुजून तर पिऊच नये, पण अज्ञानाने प्यायली तरी त्याला मनुने कडक प्रायश्चित्त सांगितले आहे. 
मनुस्मृती (संपा. पं. तुलसीराम स्वामी, स्वामी प्रेस, मेरठ, १९१२) सांगते –
सुरां पीत्वा द्विजो महादग्निवर्णां सुरां पिवेत
तया स काये निर्दग्धे मुच्यतेकिल्विशात्तत: (मनु. ११.९०)

म्हणजे ब्राह्मणाने अज्ञानाने दारू प्याल्यास त्याने उकळती दारू प्यावी. त्याने शरीर पोळले की त्याला मद्यपानाच्या पापापासून सुटका मिळते.
हे प्रायश्चित्त जरा अधिकच कडक असल्याने मनुस्मृतीने त्याला एक पर्यायही दिला आहे.-
गोमूत्रमग्निवर्ण वा पिवेदुकमेव वा
पयो घृतं वा२२२मरणाद् गोशकृद्रसमेव वा (मनु. ११.९१)

किंवा गोमूत्र किंवा पाणी गरम करून प्यावे किंवा आजन्म दूध आणि तूप पिऊनच राहावे किंवा गोबराचा रस प्यावा. म्हणजे मद्यपानाच्या पापापासून सुटका मिळेल.
मद्यपानाचा निषेध सर्वच स्मृतींनी केला आहे. केवळ दारू पिण्याचाच नव्हे, तर दारूचा नुसता वास घेतला वा दारुडय़ाचा स्पर्श झाला तरी काही स्मृतींनी त्यावर प्रायश्चित्त सांगितले आहे. सर्व पुराणांनीही दारू निषिद्ध मानली आहे. हे सर्व पाहता आणि तत्कालीन समाजावरील धर्मशास्त्राचा प्रभाव पाहता तेव्हाचे समाजजीवन या पापापासून मुक्त असेल असे कोणी म्हणेल तर मात्र मोठीच फसगत होईल. अगदी रामराज्यात डोकावून पाहिले तरी वेगळेच चित्र दिसेल. अर्थात येथेही रामाचा हा काळ नेमका कधीचा याबाबत गोंधळच आहे. काहींच्या मते रामकथा इसवी सन पूर्व सात-साडेसात हजार वर्षांंपूर्वी घडली. बुद्धिवादी अभ्यासक मात्र एवढय़ा दूर जात नाहीत. त्यांच्या मते रामकथा इसवी सन पूर्व हजार वा दीड हजार वर्षांंपूर्वीची असावी आणि वाल्मिकींनी ती काव्यबद्ध केली ती इ.स. पू. सहाव्या वा सातव्या शतकात. या रामकथेत नंतर भर पडत गेली. परंतु सध्या आपल्यासमोर जे उत्तरकांडासह रामायण आहे त्यात दारू निषिद्ध असल्याचे काही दिसत नाही.
वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडात कैकयीच्या संदर्भात एका ठिकाणी सुरेचा उल्लेख आला आहे तो उपमा म्हणून. ती म्हणते –
राज्यं गतजनं साधो पीतमण्डां सुरामिव
निरास्वाद्यतमं शून्यं भरतो नाभिपत्स्यते

हे साधो, सारहीन दारूसारखे हे धनहीन आणि जनशून्य राज्य भरत घेणार नाही- कैकयी
त्यानंतर सुरेचा उल्लेख येतो तो अयोध्याकांडात सीतेच्यासंदर्भात. गुहाच्या नौकेत बसून गंगा पार करताना ती जी प्रार्थना करते त्यात गंगेला मद्य आणि मांसाचा नैवेद्य अर्पण करीन असे म्हणते.
सा त्वां दि नमस्यामि प्रशंसामि च शोभने
प्राप्तराज्ये नरव्याघ्रे शिवेन पुनरागते
गवां शतसहस्त्रं चं वस्त्रण्यन्नं च पेशलम
ब्राह्मण्येभ्य: प्रदास्यामि तव प्रियचिकीर्पया
सुराघटसहष्टद्धr(२२९ेाण मांसभतौदनेन च
यक्ष्ये त्वां प्रयता देवि पुरीं पुनरूपागता

तेव्हा हे शोभने, मी तुला प्रणाम करते आणि तुझी स्तुती करते. जेव्हा श्रीरामचंद्र वनातून सकुशल परत येतील आणि त्यांना राज्य प्राप्त होईल तेव्हा तुझ्या प्रसन्नतेसाठी मी एक लक्ष गायी, सुंदर वस्त्रे आणि अन्न ब्राह्मणांना दान करीन. सुरेचे एक हजार घडे आणि मांसयुक्त भात मी तुला वाहून तुझी पूजा करीन, ही सीतेची प्रार्थना आहे.
किष्किंधाकांडात तर किष्किंधा नगरीतील हमरस्ते मैरेय आणि मधु नामक मद्याच्या गंधाने दरवळलेले होते असे वर्णन आले आहे. (मैरेयाणां मधूनां च सम्मोदितमहापथं)
याचा अर्थ स्पष्ट आहे. रामायण काळामध्ये मद्यप्राशन हे पाप मानले जात नसे. पूजेमध्ये मद्य अर्पण करण्याची प्रथा होती आणि सुग्रीव, हनुमानाच्या किष्किंधेसारख्या राजधानीच्या शहरातही मद्य मुबलक उपलब्ध होते. तेथील एक प्रसंग मोठा विचित्र आहे. सुग्रीवाच्या राजवाडय़ात लक्ष्मण आलेला आहे. तेथील छानछौकी अन् विलास पाहून तो संतापलेला आहे. तेव्हा त्याचा राग दूर करण्यासाठी सुग्रीव ताराला त्याच्याकडे जाण्यास सांगतो. ती सुग्रीवाची राणी. ती लक्ष्मणाकडे येते तेव्हा.. वाल्मीकी सांगतात –
सा प्रस्खलन्ती मदविव्हलाक्षी
प्रलम्बकांचीगुणहेमसूत्रा
सुलक्षणा लक्ष्मणसन्निधानं
जगाम तारा नमिताङ्गयष्टि:

सुलक्षणा तारा लक्ष्मणाकडे गेली, परंतु नशेने तिचे डोळे लाल झाले होते, करधनी आणि सुवर्णहार अस्ताव्यस्त लटकत होते. नशेमुळे तिचे पाय लडखडत होते आणि स्तनांच्या ओझ्याने ती झुकलेली होती.
पुढे वाल्मीकी सांगतात – मद्य पिऊन तारा लज्जाहीन झाली होती. (सा पानयोगाद्विनिवृत्तलज्जा) या ठिकाणी मात्र लक्ष्मणाच्या तोंडून मद्यनिषेध आला आहे. तो म्हणतो –
न हि धर्मार्थसिर्धथ पानमेवं प्रशस्यते
पानादर्थश्च धर्मश्च कामश्च परिहीयते

(धर्म आणि अर्थाच्या सिद्धीसाठी दारू पिणे चांगले नाही. कारण दारूने धर्म, अर्थ आणि काम नष्ट होतात.)
हे झाले वानरांचे मद्यपान. राक्षस तर पिणारेच. पण नंतर उत्तरकांडात तर राम आणि सीता सुरापान करतात असा उल्लेख आला आहे. तेथे म्हटले आहे-
कुशास्तरणसंस्तीर्णे राम: सन्निसपाद ह
सीतामादाय हस्तेन मधु मैरेयकं शुचि

श्रीरामांनी तेथे अंथरलेल्या कुश – गवताच्या चटईवर सीतेसह सुरापान केल्याचा उल्लेख आहे.
उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे. ते वाल्मीकींच्या रामायणाला लावलेले ठिगळ आहे असे मानले, तरी त्यावरून तत्कालीन समाजाचा मद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. महाभारतात तर जागोजागी मद्याचे उल्लेख आहेत. यादवांनी तर दारू पिऊन एवढी हाणामारी केली की त्यात तो वंश बुडण्याची वेळ आली.
एक मात्र खरे की मद्यपान हा प्राचीन काळापासूनचा भारतीयांचा एक आवडता उद्योग आहे. वेदांत सोमरसाचे मुबलक उल्लेख आहेत. स्तुती आहे. तेथे ती देवता मानली आहे. पण मुळात सोम हे आर्याचे उत्साहवर्धक पेय आहे. सोमवल्ली कुटून ते केले जाई. त्यासाठी ग्राव हा कठीण दगड वापरला जाई. एका सूक्तात म्हटले आहे –
अद्रिभि: सुत: पवते गभस्त्योर्वृषायते नभसा वेपते मती। (ऋ. ९.७१.३) – ग्राव्यांनी चुरलेला सोमरस ऋत्विजांच्या दोन्ही हातांतून पात्रांत वाहत आहे. नभोमंडळामुळे तो वीर्यभराने फोफावतो आणि मननस्तुतीने हलून जातो.
तर असे हे सोम वेली कुटून तयार केलेले उत्साहवर्धक पेय. खूप प्याल्यानंतर ते इंद्रालाही चढते. पहिल्याच मंडलात एक उल्लेख आहे – य: कुक्षि: सोमपातम: समुद्र इव पिन्वते। उर्वीरापो न काकुद:।। (ऋ. १.८.७) खूप सोमपान करणाऱ्या इंद्राचे पोट समुद्रासारखे फुगते. तो सोमरस जिभेतून गळणाऱ्या रसांप्रमाणे सारखा गळतो. म्हणजे ते मादकद्रव्य मद्य आहे. पण त्यात दूध किंवा दही घालतात असेही उल्लेख येतात.
सुतपाव्ने सुता इमे शुचयो यन्ति वीतये। सोमासो दध्याशिर:।। (ऋ. १.५.५) हा गाळून घेतलेला शुद्ध केलेला दहीमिश्रित सोमरस, सोमपानाची इच्छा करणाऱ्या इंद्रदेवास प्राप्त होवो.
किंवा
तीव्रा: सोमास आ गह्य़शीर्वन्त: सुता इमे। वायो तान्प्रस्थितान्पिब ।। (ऋ. १.२३.१) हे वायुदेव, अभिषुत सोमरस तिखट झाल्याने त्यात दूध टाकून तो तयार करून आणण्यात आला आहे. तुम्ही या आणि उत्तर वेदीजवळ आणलेल्या या सोमरसाचे पान करा.
पं. राहुल सांकृत्यायन यांच्या मते सोमामध्ये घोडीचे दूध मिसळले जाई. तेव्हा ते आपण समजतो तसे मद्य नाही. ती भांग आहे आणि ती ऋग्वेदकालीन लोकांच्या नित्यसेवनात होती. आणि तिचे सेवन आरोग्यास चांगले समजले जाई. पहिल्या मंडलातील गोतम राहूगण या ऋषींनी रचलेल्या ९१व्या सूक्तात तर सोम हा औषधी आहे. तो मृत्यूपासून वाचवू शकतो अशी त्याची स्तुती केली आहे. (त्वं च सोम नो वशो जीवातुं न मरामहे। प्रियस्तोत्रो वनस्पति:।। (ऋ. १.९१.६) हे सोमदेव, तुम्ही आमच्या दीर्घजीवनासाठी प्रशंसनीय औषधिरूप आहात. आपण अनुकूल असल्यास आम्ही मृत्यूपासून वाचू शकू.)
वेदात वर्णिलेले सोम हे वरिष्ठ वर्णीयांचे उत्तेजक द्रव्य होते. सर्वसामान्यांत सुराप्राशनाची चाल होती. एकंदर ही परंपरा ऋग्वेदकालापासून चालत आली आहे. तेव्हा तो भारतीय संस्कृतीचा एक भागच म्हणावयास हवा. धर्माच्या बाबतीत म्हणाल तर तो पूर्वीपासून होताच. आपल्या काही धर्मविचारांनी तर मद्यपान हे साधनेस आवश्यक कृत्य मानले आहे. त्याचवेळी काही धर्मपंथांनी तिला स्पर्शही न करण्याचा दंडक घालून दिला आहे.
एकीकडे मद्यपान पाप आहे. दुसरीकडे आपलेच काही धर्मविचार ती पुण्याची गोष्ट असल्याचे सांगत आहेत. एकीकडे मद्य ही देवता आहे. दुसरीकडे ती राक्षसी आहे. थोडक्यात दारूधोरणाबद्दलचा आपला गोंधळ मुळापासूनचाच आहे. त्यासाठी केवळ सरकारला नावे ठेवण्यात काय अर्थ?

1 comment:

Unknown said...

Lekhakachhach lihitanna gondhal vatto.