मस्तानीची बदनामी : एक माजघरी कारस्थान!


बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाणे हे इतिहासाला धरून नसल्याने त्याविरोधात गेल्या महिन्यात (नोव्हेंबर-डिसेंबर २०१५) संतापाची लाट निर्माण झाली. सर्वांचे म्हणणे एकच होते, की इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, करता कामा नये. ही एक चांगलीच गोष्ट झाली. इतिहासाशी वृथा खेळ नको असा आग्रह धरला जाणे ही नक्कीच अभिनंदनीय बाब आहे. असा आग्रह धरल्यामुळे आणखी एक झाले. ते फारसे कुणाच्या लक्षात आलेले दिसत नाही, पण पुराव्यांनिशी इतिहास जे सांगतो ते आणि तेवढेच मान्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या अंगावर आली.


काशीबाई ही पेशव्यांची पत्नी. तशात ती एका पायाने अधू. त्यात पुन्हा तो काळ. सोवळ्या ओवळ्याचा, पडदागोशाचा. तेव्हा काशीबाई काही अशा नाचणार नाहीत. असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. पण हे म्हणताना मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. ती पेलायची तर त्याकरीता मस्तानी कोण होती येथून सुरूवात करावी लागणार आहे. त्यासाठी गंभीर साधनांद्वारे इतिहास समजावून घ्यावा लागणार आहे. मनावरील कादंबरीमय इतिहासाची आणि ऐकीव आख्यायिकांची भूल उतरवून फेकावी लागणार आहे. खरा तोच इतिहास दाखवा असे संजय लीला भन्साळीला बजावताना खरा तो इतिहास जाणून घेण्याचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. शिवाय हे केवळ तेवढ्यावरच भागणारे नाही.

आपल्यासमोर जो इतिहास पुराव्यांच्या पायावर सध्या उभा आहे तो पचविण्याची कुवत आपल्याला दाखवावी लागणार आहे. अशी ताकद खरोखरच आपल्यात आहे का?कृष्णाजी विनायक सोहनी यांच्या पेशव्यांच्या बखरीतून, नागेश विनायक बापट यांच्या बाजीराव चरित्रातून आपल्यासमोर येणारी मस्तानी हीच खरी मस्तानी असे आपण मानत आलो आहोत. बापटांची जी मस्तानी आहे ती निजामाच्या नाटकशाळेची मुलगी आहे. ती निजामाच्या जनानखान्यातून पुरूशवेश करून पळाली आणि बाजीरावास त्याच्या छावणीत येऊन भेटली. तिच्या धाडसावर, रूपावर खुश होऊन बाजीरावाने तिला ठेवून घेतली. सोहनींची मस्तानी अजून वेगळी आहे. ती मुघल सरदार शहाजतखान याची कलावंतीण आहे. ती पहिल्यांदा चिमाजी अप्पाला भेटली. अंगाखाली घे म्हणाली. त्याने तिला बाजीरावांकडे नेले. ते तिच्यावर भाळले आणि अंगाखाली घेतो म्हणाले. अशी ती वारांगनेसारखी होती. तिच्या दिसण्याबद्दल बोलताना कृष्णाजी सोहनी यांनी लिहिले आहे की ती एवढी नाजूक होती, की तिने विडा खाऊन पिंक गिळली तरी दिसावी. हे त्यांनी कोणत्या संदर्भात लिहिले आहे ते नीट पाहिले की लक्षात येते की ती एवढी सुंदर होती आणि त्यामुळेच त्या मुघल सरदाराने तिला ठेवून घेतली होती. ती एवढी सुंदर होती म्हणूनच बाजीराव तिच्यावर भाळले.


हा मस्तानीचा लोकप्रिय इतिहास आहे. पण तो खोटा आहे. तिच्या साध्या सौंदर्याच्या वाखाणणीआड बाजीरावाची बदनामी आहे हेही त्या खोटेपणामुळे आपल्या लक्षात येत नाही. मस्तानी ही एक राजकन्या होती. ती छत्रसालाची मुलगी. त्यांच्या पर्शियन उपपत्नीपासून झालेली. ती औरस की अनौरस हा प्रश्नच नाही. कारण छत्रसाल तिला औरस मानत आलेला आहे. हे सगळे आता सुस्पष्ट झाले आहे. तरीही तिच्याबाबतची असत्ये सुमारे तीनशे वर्षे या महाराष्ट्रात नांदत आहेत. तरीही तिला यावनी, कंचनी म्हणून हिणवण्यात येत आहे. ते का, हे समजून घेतले पाहिजे. १८९३ साली बापूसाहेब कुरुंदवाडकर यांनी लिहिलेल्या ‘भट्टवंश’ या काव्यात म्हटले आहे –
मस्तानी नामे भुवनैक रम्या । अन्यंतरा दृष्टिसही अगम्या ।
स्वस्त्रीसही किंबहुना सुनम्या । वेश्या असे साजतखान गम्या ।। 
बाजीराव पेशव्यांच्या पत्नीचा वेश्या असा उल्लेख करण्यास कोणी धजावतो आणि तरीही एरवी आपले सदाहळवे असलेले भावनांचे गळू दुखत नाही, याचे कारण काय हे जाणून घेतले पाहिजे. कृष्णाजी सोहनी यांची बखर १८१८ नंतरची आहे. बापटांचे बाजीराव चरित्र एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले. सोहनींच्या बखरीला ऐकीव आठवणींचा आधार आहे. बापटांनी कुठल्याशा बखरीचा आधार सांगितला आहे. पण तशी बखर अजून सापडली नसल्याचे द. ग. गोडसे यांनी त्यांच्या ‘मस्तानी’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. (आणि मुसलमान पोरीशी लग्न करायला बाजीराव काय वेडे होते काय, असा सवाल करणारे बाजीरावप्रेमी अस्सल मराठी साधने म्हणून यांचा हवाला देत आहेत!) असे असले तरी सोहनी, बापट आदी मंडळी जी मस्तानी उभी करतात ती काही त्यांच्या मन की बात नाही. त्या थापा कोणीतरी आधीच मारून ठेवलेल्या आहेत. त्या कुणी आणि का मारल्या याचे रहस्य शोधणे गरजेचे आहे आणि त्याची चावी जशी मस्तानीच्या प्रणामीपंथी असण्यात आहे, तशीच ती तेव्हाच्या पुण्यातील ब्राह्मण्यवादी मानसिकतेत आहे आणि भट घराण्यातील काही व्यक्तींनी रचलेल्या कारस्थानातही आहे. मस्तानीची बदनामी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठे आणि तेवढेच यशस्वी असे माजघरी कारस्थान आहे!

या कारस्थानाचा पर्दाफाश केला तो द. ग. गोडसे यांनी. हा व्यासंगी चित्रकार, साहित्यिक मस्तानी चरित्रात गुंतला तो एका चित्रपटानिमित्ताने. ख्यातकीर्त साहित्यिक-दिग्दर्शक विश्राम बेडेकर बाजीराव-मस्तानी या चित्रपटावर काम करीत असताना गोडसे त्यांच्यासोबत होते. तो चित्रपट काही पूर्ण झाला नाही. पण त्या सहा महिन्यांच्या काळात गोडसे यांना मस्तानीच्या इतिहासाने जणू झपाटलेच. अच्युतराव कोल्हटकरांचे मस्तानी हे भडक नाटक त्यांनी पूर्वी कधी तरी पाहिले होते. त्या नाटकाने मस्तानीबाबत निर्माण झालेले कुतुहल या चित्रपटाच्या निमित्ताने उफाळून वर आले आणि गोडसे यांनी मस्तानीची खरी प्रतिमा शोधण्यासाठी इतिहासाची असंख्य फडताळे तपासली. त्यातून १९८९ साली त्यांचा मस्तानी हा ग्रंथ साकारला. त्यात त्यांनी हे कारस्थान व्यवस्थित उलगडून दाखविले आहे. बाजीरावांचा मस्तानीशी विवाह झाला होता या गोष्टीवर आज काळाची पुटे चढली आहेत. गोडसे सांगतात, की त्यांचा खांडा पद्धतीने विवाह झाला होता. त्या लग्नाला देवा-ब्राह्मणांची साक्ष नसेल, पण तेव्हा बाजीरावाच्या सैन्यातील त्यांचे अनेक सरदार उपस्थित होते. अर्थात ते नसते तरी काही बिघडत नव्हते. कारण बाजीरावांनी मस्तानीला पत्नी म्हणून स्वीकारले होते. ठेवलेल्या बाईसाठी आपल्या वाड्यात कोणी खोली बांधून देत नसतो. बाजीरावांनी मस्तानीसाठी शनिवारवाड्यात स्वतंत्र महाल बांधला होता. पण मस्तानी या शब्दाचीही पेशवे कुटुंबाला एवढी घृणा की दुस-या बाजीरावाने नंतर हा महालच खणून सपाट करून त्यावर झाडे लावली. आज पुण्यात दाखविला जाणारा मस्तानीचा सज्जा हा त्या मूळ महालाचा नाहीच, असे गोडसे सांगतात.
बाजीरावापासून मस्तानीला एक मुलगाही झाला. त्याचे नाव समशेर बहाद्दर. मस्तानीने त्याचे आणखी एक नाव ठेवले होते. कृष्णसिंह. हा मस्तानीच्या कृष्णभक्तीचा प्रभाव. ती नमाज पढायची तशीच कृष्णाची भक्तीही करायची. याचे कारण ती प्रणामी या उपासनास्वातंत्र्य मानणा-या निधर्मी पंथातील होती. श्रीकृष्ण, महंमद, देवचंद्र, प्राणनाथ आणि छत्रसाल हे प्रणामी पंथाचे पंचक मानले जाते. त्यात छत्रसालांचा समावेश आहे. अशा पुरूषाची कन्या केवळ मुसलमान मानण्यात यावी? ती कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी नृत्य करायची. त्यात कोणाला तिचा निधर्मीपणा दिसला नाही, ती बुंदेलखंडाच्या अंगात लयताल असलेल्या संस्कृतीतून आली आहे हे दिसले नाही. दिसली ती कलावंतीण! तिचे नृत्य पाहून शनिवारवाड्यातील बायका आणि बटक्या पदराआड फिदीफिदी हसल्याही असतील, त्यांनी तिची कुत्सित टवाळीही केली असेल. काळच तसा होता तो. पण आजही तिची तशी टवाळी व्हावी? ती बाजीरावपत्नी भरदरबारात नाचताना भन्साळींच्या चित्रपटात दिसते. ते कोणालाही खटकू नये?
मस्तानीसारखी स्त्री शनिवारवाड्यात येणे हे तेव्हा अब्रह्मण्यमच मानले गेले. बरे ती रखेली होती असे मानले तरी शनिवारवाड्याला रखेल्या ठेवण्यात गैर वाटत होते अशातलाही भाग नव्हता. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचीही ‘खासे चाकरी’ची स्त्री होती आणि तिच्यापासून झालेला लेकावळ भिकाजी शिंदे हा बाजीरावाच्या सैन्यात पागेदार होता. तेव्हा शनिवारवाड्याला त्याचे फार दुःख होण्याचे कारण नव्हते. सल होता तो मस्तानीशी बाजीरावांचा विवाह झाल्याचा. तिच्या धार्मिक आचारविचारांचा. त्यामुळेच तिला पहिल्यापासूनच बदनाम करण्याची मोहीम उघडण्यात आली. बाजीराव पेशवे मद्यप्राशन, मांसाहार करीत असत. ती सवय त्यांना मस्तानीने लावली असे पसरविण्यात आले. पेशवे दप्तराच्या नवव्या खंडात चिमाजी अप्पाने बाजीरावपुत्र नानासाहेबांस लिहिलेले बाजीरावांबाबतचे एक पत्र आहे. –
“वाटेस घोड्यावर बसोन चालले होते. तेव्हा एके गावचा पाटील भेटीस आला. तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले, जे कोंबड्याचे प्रयोजन आहे. घेऊन येणे. काय बोलतो हा अर्थ चित्तात नाही. हे विचार मस्तानीजवळून निर्माण जाले असेत. ती पीडा जाईल तेव्हा पुण्यच प्राप्त होईल. न होई ऐसे दिसत नाही.”
छत्रपती शिवरायांनंतरचा भारतातली सर्वांत पराक्रमी सेनापती, अजेय योद्धा बाजीराव आपल्या बायकोच्या आहारी जाऊन नशाबाजी करतो असे त्याच्या घरातील मंडळीच म्हणतात, यात बाजीरावांची बदनामी नाही? भन्साळीचा बाजीराव मल्हारी या गाण्यावर रांगडेपणाने नाचताना पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. ती अशा ठिकाणीही जायला हवी.

मस्तानीच्या बदनामीचा कहर झाला तो मात्र वेगळ्याच प्रकरणात. हे प्रकरण होते मस्तानीला चारित्र्यहीन ठरविण्याचे. आणि त्यात खुद्द बाजीरावाच्या मातोश्री राधाबाई, बंधु चिमाजीअप्पा आणि पुत्र नानासाहेब यांचा समावेश असल्याचे गोडसे यांनी दाखवून दिले आहे. ते सांगतात, ‘मस्तानीला कंचनी ठरवून तिला बदनाम करण्याचे, तिला अटक करून बाजीरावापासून दूर करण्याचे, तिच्या निष्ठेविषयी बाजीरावाच्या मनात शंका निर्माण होईल असे कट रचण्याचे आणि तिच्या जिवाला अपाय करून शेवटी तिचा कायमचा बंदोबस्त करण्याचे निर्घृण उद्योग, तिच्या आणि बाजीरावाच्या हयातीत प्रत्यक्ष पेशवे कुटंबियांकडूनच अव्याहत कसे चालू होते याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावे उपलब्ध कागदपत्रांतून मिळतात.’
हा बाजीरावाच्या मनी मस्तानीच्या निष्ठेविषयी शंका निर्माण करणारा कट कोणता होता? गोडसे सांगतात, नानासाहेब हा काशीबाईचा मुलगा. १७३८-३९च्या सुमारास तो १७ वर्षांचा होता. विविहित होता. मस्तानी आणि काशीबाई यांचे चांगले संबंध होते. मस्तानी काशीबाईला ताई म्हणून संबोधित असे. तसा उल्लेख एका पत्रात आहे. काशीबाईप्रमाणेच नानासाहेबाशीही मस्तानीचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे वर्तन होते. बाजीराव युद्धमोहिमांच्या निमित्ताने एक पावसाळा सोडला तर सतत दूर असे. या परिस्थितीचा फायदा घेऊन ‘नानासाहेबाने मस्तानीशी असलेला स्नेह वाढवून त्याला सलगीचे स्वरूप द्यायचे व पुण्यातील समाजात त्याचा बोभाटा करायचा,’ असा कट रचण्यात आला. त्यानुसार ‘नानासाहेबाने मस्तानीकडे आपले जाणे-येणे मुद्दाम वाढविले. ग्रहणाच्या निमित्ताने भीमा नदीवर स्नानास तो गेला त्या वेळी मस्तानीस त्याने मुद्दाम बरोबर नेले होते. या सलगीबद्दल नानासाहेब आपल्या आईस म्हणजे काशीबाईस लिहितो – 
“...लोकही बाहेर बोलू लागले आहे की नानांची मस्तानीशी मैत्रिकी जाहली.” 
बाजीरावाचा हा ‘सुपुत्र’ याच पत्रात आपल्या मातोश्रीला सुचवितो, 
“ताई (काशीबाई) स्वामीस (बाजीरावास) हे वर्तमान (नाना-मस्तानीच्या सलगीचे) लिहितील, यास्तव हे लिहिले आहे. पुढे जशी आज्ञा होईल तशी वर्तणूक करू.” 
परंतु नानासाहेबांच्या ‘मात्रागमनी’ प्रयोगाची मस्तानीला चाहूल लागताच तिने नानासाहेबांशी बोलणेही वर्ज्य केले. या कुटिल हेतूबद्दल तिने नानासाहेबांची निर्भत्सनाही केली असावी असे नानासाहेबांच्या पुढील वागणुकीवरून वाटते. मस्तानीस तोंड दाखविण्याची त्यास शरम वाटत होती व मस्तानीस भेटण्याचे तो टाळीत होता असे त्या वेळच्या एका पत्रावरून स्पष्ट होते.’

याहून भयंकर म्हणजे मस्तानीला अपाय करण्याचाही कट शिजला होता. त्यानुसार मस्तानीस नानासाहेबाने अटकही केली होती. परंतु शाहू छत्रपतींमुळे मस्तानी वाचली. त्यांचे चिटणीस गोविंद खंडो यांचे नानासाहेबांना लिहिलेले पत्र आहे. त्यात म्हटले आहे – 
‘राजश्री स्वामीची मरजी पाहता ते वस्तू त्याजबरोबर न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी, त्यामुळे राजश्री राऊ खटे जाले त-ही करावे ऐसी नाही. त्यांची वस्तू त्यांस द्यावी. त्यांचे समाधान करावे.’
रियासतकार सरदेसाई लिहितात, की मस्तानीच्या जीवास अपाय झाला नाही याचे श्रेय महाराजांना दिले पाहिजे.
हा मस्तानीच्या इतिहासाचा एक तुकडा. तिच्याबाबतचे हे माजघरी कारस्थान. काशीबाई वा बाजीराव यांचे नृत्य चित्रपटात दाखविल्याने इतिहासाचा अपलाप झाला हे खरेच. त्यामुळे संतापणे योग्यच. हीच संतापणारी डोकी बाजीरावपत्नी मस्तानीच्या इतिहासाचा अपलाप मात्र चवीचवीने चघळतात याला काय म्हणावे?
(संदर्भ – मस्तानी – दत्तात्रय गणेश गोडसे. पॉप्युलर प्रकाशन, दुसरी आवृत्ती, १९९३)

लोकप्रभाच्या ११ डिसेंबर २०१५च्या अंकातील 
टाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख.

2 comments:

Unknown said...

नेहमीसारखेच आपले लिखाण वाचनीय आहे.
फक्त एक प्रश्न आहे की हे गोडसेंचे पुस्तक आता कुठे मिळेल.
कृपया सांगावे
आभार आणि शुभ इच्छा !

Unknown said...

खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली असेल.

नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.