बायबलनुसार येशू हा देवपूत्र आहे. तो प्रेषित, म्हणजे मानवजातीच्या उद्धारासाठी परमेश्वराने पाठविलेला प्रतिनिधी आहे. पण काही वर्षांपूर्वी आलेल्या 'दी दा विंची कोड' या कादंबरीने येशूने विवाह केला होता आणि त्यांना मुलंही झाली होती, असा दावा करून येशूला मर्त्य मानवाच्या कोटीत आणलं होतं. तर आता 'द लॉस्ट टॉम्ब ऑफ जीजस' या जेम्स कॅमेरून कार्यकारी निर्माते असलेल्या आणि सिम्चा जॅकोबोविसी यांनी निर्मिती लेखन व दिग्दर्शन केलेल्या माहितीपटाने येशूच्या पुनरुज्जीवनाच्या कथांनाच सुरूंग लावला आहे. नव्या करारातील शुभवार्तांनुसार 'एली एली ला मा सबख्तनी' (माझ्या देवा, मला का रे तू सोडलंस?) अशी आर्त प्रार्थना करत येशूने क्रूसावर प्राण त्यागले. त्यानंतर त्याच्या अनुयायांनी त्याचं शव एका खळग्यात ठेवलं. तिसऱ्या दिवशी येऊन पाहतात तो त्या खळग्यात शव नव्हतं.
येशूच्या मृत्यूची ही जी कथा आहे, तिचा अर्थ येशू सदेह स्वर्गात गेला असा होतो. पण जेरूसलेममधील ताल्पिऑट भागातील उत्खननात 28 मार्च 1980 रोजी सापडलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या कबरीतील चुनखडीच्या दहा पेट्यांमध्ये (ossuaries) ज्या अस्थी मिळाल्या, त्या अन्य कुणाच्या नव्हे, तर येशू आणि त्याच्या परिवारातील लोकांच्या आहेत, असा दावा 'द लॉस्ट टॉम्ब' या माहितीपटातून करण्यात आला आहे. आता वाद आहे तो एवढाच की त्या अस्थी येशूच्याच आहेत, याला पुरावा काय?
ते पाहण्यापूर्वी 'ऑस्युरिज' हा काय प्रकार आहे ते बघू या. इसवी सन पूर्व 30 ते इसवी सन 70 या कालखंडात जेरुसलेम मध्ये अंत्यसंस्काराची एक रीत प्रचलित होती. ते लोक प्रथम मृतदेह एका कापडात गुंडाळीत. त्यानंतर खडकात खोदलेल्या खास कबरीत तो ठेवला जाई. तेथे तो मृतदेह कुजून जाई. त्याच्या केवळ अस्थी उरल्या की त्या लाईमस्टोनपासून बनविलेल्या पेटीत सुरक्षित ठेवल्या जात. या पेट्यांना 'ऑस्युरिज' म्हणतात. ताल्पिऑटमध्ये तशा दहा पेट्या सापडल्या. त्यातील दोन पेट्यांवर 'जीजस सन ऑफ जोसेफ' आणि 'ज्युडा सन ऑफ जीजस' असे आरेमिक भाषेत कोरलेले आहे. दोन पेट्यांवर हिब्रुत 'मारिया' (मेरी), 'मातिया' (मॅथ्यू) असे लिहिलेले आहे, तर एका पेटीवर ग्रीकमध्ये 'मरियामेने ई मारा' (मास्टर म्हणून ओळखली जाणारी मेरी.) असे कोरलेले आहे. हे मेरी माग्दालिनचे नाव असावे. पण केवळ एवढ्यावरून ते लोक येशू ख्रिस्ताच्या परिवारातील आहेत असे मानायचे का? एकसारखी नावे अनेकांची असू शकतात. तर या आक्षेपाला उत्तर म्हणून जॅकोबोविसी यांनी संख्याशास्त्राचा आधार घेतला. टोरांटो विद्यापीठातील गणित आणि संख्याशास्त्राचे प्राध्यापक आंद्रे फ्युएरव्हर्जर यांनी त्या काळातील नावांमधील साम्य आणि वारंवारता यांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करून सांगितले, की ती नावे येशू आणि त्याच्या परिवारातील नसण्याची शक्यता 600मध्ये एक अशी आहे. याशिवाय जॅकोबोविसी यांनी जीजस आणि मेरी माग्दालिन यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून काही सॅम्पल्स घेऊन ती कॅनडातील ऑन्टॅरियो येथील लेकहेड विद्यापीठातील पॅलिओ-डिएनए प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिली. तेथे करण्यात आलेल्या मायटोकॉन्ड्रिअल डीएनए चाचणीत जीजस आणि मेरी यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून घेण्यात आलेल्या सॅम्पल्सचा एकमेकांशी संबंध नाही. जॅकोबोविसी यांच्या मते याचाच अर्थ जीजस आणि मेरी हे पती-पत्नी असावेत असा होतो आणि 'अखेरच्या भोजन'प्रसंगी येशूच्या मांडीवर एक मूल होते असा उल्लेख जॉन यांच्या शुभवार्तेत येतो, ते मूल म्हणजेच ज्यूडाह आहे.
प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. त्यातला एक तत्त्वज्ञानात्मक, अध्यात्मिक असतो. सर्वसामान्य धार्मिक त्याच्या नादी क्वचितच लागतात. लोकांना अधिक रूची असते, ती धर्माच्या कर्मकांडात्मक भागाशी. या कर्मकांडांची उभारणी काही मिथकं, चमत्कारकथा यांच्या पायावर करण्यात आलेली असते. त्या कथा नाकारल्या की पुढचा सगळाच डोलारा कोसळून पडतो. (जो पडणे गरजेचे असते.) 'लास्ट टॉम्ब'मधून नेमकं हेच साधू शकतं. म्हणूनच अशा साहित्याला, चित्रपटांना धर्ममार्तंडांचा विरोध असतो. एकदा धर्माचं अवडंबर दूर झालं की मग त्यांच्यासाठी राहिलं काय? येथे तर एका नव्हे, दोन धर्मांचा प्रश्न आहे. ख्रिस्त्यांप्रमाणेच मुस्लिमांचीही प्रेषित संकल्पनेवर श्रद्धा आहे. फार काय कुराण आणि बायबलमधील अनेक व्यक्तिरेखाही एकच आहेत. असो.
धर्मश्रद्धा दुखावल्या म्हणून होणारी ओरड नेहमीच श्रद्धेसाठी असते असं नाही. ती बऱ्याचदा सत्तेसाठीच असते. मात्र युरोप-अमेरिकेत, जेथे ख्रिस्ती धर्म बहुमतात आहे, जेथे मूलतत्त्ववाद जोर धरू पाहात आहे, अशा देशांमध्ये धर्मश्रद्धांना आव्हान देणारे आवाज उठतात आणि तरीही त्यांना मारहाण होत नाही, त्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली जात नाही, हे आपल्यासाठी काही तरी जगावेगळंच आहे.... चमत्कारसदृश!
(सकाळमधील विश्ववेध या सदरात प्रसिद्ध झालेला लेख. 6 मार्च 2007)
10 comments:
fter long time something interesting ..keep ot up
thank got finally you came back. will visit regularly.
http://hasya-vyang.blogspot.com/
विसोबा,
तब्बल एक वर्षानंतर दर्शन दिलंत. असो.
जोरदार पुनरागमन... यापुढे असेच लिहीते रहावे ही विनंती!
बर्याचदा अधुन मधुन येउन चेक करत असे. परत आलात लिहते झालात याबद्दल धन्यवाद.
SP, sandy, इनोबा आणि प्रसाद,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
यापुढे किमान नियमितता पाळण्याचे योजले आहे. बघु या, किती जमते ते.
पुन्हा एकदा धन्यवाद.
आणि सॅंडीजी,
हास्यव्यंग मोठं बहारदार आहे. मजा आली वाचताना.
विसोबा,
आपली माहिती आवडली. आणखी येऊ द्या.
ह्याच संदर्भातील काही वीडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, जे अर्थातच फार रोचक आहेत. ते पूर्वीच पाहिले होते फार, त्यामुळे गोंधळ झाला की हे नव्याने काय म्हणून. पण तळटीपेने खुलासा झाला. नवीन येऊद्यात. वाट पाहतोय!
good interesting
itihaas ranjak aahe. sagalyaa post vachalyaa. tai maharaj prakaran kaay aahe he kalaal.
..................
Zakasrao :)
http://jwalant-hindutw.blogspot.com/2010/03/blog-post_28.html
Post a Comment