दाशराज्ञ युद्ध

हिंदुस्तानच्या इतिहासातील दोन युद्धे प्रसिद्ध आहेत.
त्यातील एक म्हणजे पांडव-कौरवांतील महायुद्ध आणि दुसरे म्हणजे ऋग्वेदकालीन दाशराज्ञ युद्ध.

दाशराज्ञ युद्ध ही ऋग्वेदातील एक महत्त्वाची घटना आहे. हे युद्ध नेमके कधी झाले, हे सांगणे अवघड आहे कारण अद्याप ऋग्वेदाचा काळ निश्चित झालेला नाही. त्याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. मात्र सर्वसाधारणतः इसवी सन पूर्व दोन हजार ते इसवी सन पूर्व एक हजार चारशे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. या कालखंडात केव्हातरी हे युद्ध झाले. या युद्धास कारणीभूत ठरले ते दोन पुरोहितांमधील वैर. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे ते दोन पुरोहित. भरतांच्या कुशिकांच्या कुळात सुदास नावाचा राजा होता. विश्वामित्र हा या राजाचा पुरोहित. ऋग्वेदातील ऋचांवरून भरतांची टोळी इराणच्या पूर्व भागातून भारतीय उपखंडात शिरली असे दिसते.

विपाश (बियास) आणि शतुद्रि (सतलज) या दोन नद्यांच्या खो-यांतील जमातींचा पराभव करण्यास विश्वामित्राने सुदास राजाला मदत केली. पण नंतर सुदासाने विश्वामित्रास मुख्य पुरोहितपदावरून काढून टाकले आणि त्याच्याजागी वसिष्ठाची नियुक्ती केली. झाले! त्यामुळे विश्वामित्र चिडला. वसिष्ठ आणि त्याच्यात वैमनस्य निर्माण झाले. सुदास राजाला धडा शिकविण्याचा निश्चय विश्वामित्राने केला. (येथे चाणक्याची आठवण येते ना?) त्याने भरतांच्या विरोधात दहा जमातींच्या राजांचा एक गट तयार केला. पुरु, अनु, द्रुह्यु, यदु, तुर्वश, पख्त (पक्थ), भालाणस (भलानस), आलिन (अलिन), विषाणिन् (विशाणिन) आणि शिव या त्या दहा जमाती. यातील पुरु, अनु, द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पंचजन म्हणून ओळखल्या जातात.

हे पंचजन हे काय प्रकरण आहे ते प्रथम पाहूया.
सप्तसिंधुच्या प्रदेशात (म्हणजेच पश्चिमेकडे सिंधु आणि पूर्वेकडे सरस्वती या प्रदेशात सात नद्या वाहात होत्या. त्या अशा -
१. सरस्वती (भारतातील घग्गर, पाकिस्तानातील हाक्रा)
२. सिंधु
३. परुष्णी (रावी)
४. असिक्नि (चिनाब)
५. शतुद्रि (सतलज)
६. वितस्ता (झेलम)
७. विपाशा (बिआस)
तर या सात नद्यांच्या परिसरात वसलेल्या आर्यांच्या दोन शाखा होत्या. पहिली सूर्यवंशी इक्ष्वाकू आणि दुसरी चांद्रवंशीय ऐल. या ऐलांच्या पुरु, अनु, द्रुह्यु, यदु व तुर्वश अशा पाच जमाती होत्या. त्यांना पंचजन म्हणत. या शेतकरी जमाती असाव्यात. पंचकृष्टयः किंवा पंचकार्षणः असा त्यांचा उल्लेख आढळतो. याशिवायही तेथे काही छोट्या टोळ्या होत्या. त्या सर्वांत पुरु ही जमात बलाढ्य आणि प्रबळ होती.

अनु. द्रुह्यु, यदु आणि तुर्वश या जमाती पुरु आणि भरतांच्या आधी भारतात आल्या होत्या. अनु, द्रुह्यु आणि तुर्वश यांची चिनाब (असिक्नि) आणि रावी (परुष्णी)च्या प्रदेशात वस्ती होती. अनु आणि द्रुह्यु हे समुद्रापारच्या प्रदेशातून आल्याचे उल्लेख आहेत. त्यांनी त्यांचे देवही बरोबर आणले होते. त्यांना अ-वैदिक समजले जाई. या पंचजनांपैकी यदु आणि तुर्वशांचे आर्यांशी वैर होते. त्यांच्या नावावरूनही याला पुष्टी मिळते. अनु म्हणजे अनार्य, द्रुह्यु म्हणजे द्रोही, तुर्वश म्हणजे हल्लेखोर. ऋग्वेदात यदु आणि तुर्वश यांचा उल्लेख दास असाही केलेला आहे. महाभारताने त्यांना यवन (परकीय) म्हटलेले आहे, तर अनुंच्या पुत्रांचा उल्लेख म्लेंच्छ असा केला आहे. उत्तर वैदिक वाङमयातही यदु आणि अनु-द्रुह्यु यांना म्लेंच्छ म्हटले आहे. द्रुह्युंनी भारताबाहेर जाऊन म्लेंच्छांचे साम्राज्य स्थापन केले असे पुराणात सांगितले आहे. अर्थात त्या काळी म्लेंच्छ याचा अर्थ होता - संस्कृत नीट न बोलता येणारा. यदु ही पंचजनांतील महत्त्वाची जमात. दाशराज्ञ युद्ध काळात तिरींदर हा त्यांचा म्होरक्या होता. परसौ असा त्याचा उल्लेख येतो. त्यावरून तो पार्स देशातला म्हणजे पर्शिया (इराण) मधील असावा असा तर्क आहे. यदुंची वस्ती सिंधु नदीच्या खालच्या खो-यात होती आणि तेथून ते गुजराजमध्ये शिरले.

दाशराज्ञ युद्धात पख्तु (वा पक्थ) जमातीने भाग घेतला होता. पख्तु म्हणजे हल्लीचे पख्तून. ते वायव्य सरहद्द प्रांतात आणि त्या लगतच्या अफगाणिस्तानच्या प्रदेशात राहात असत. त्यांच्या दक्षिणेस काबुलिस्तानमध्ये भालाणस आणि ईशान्य अफगाणिस्तानमध्ये आलिन यांची वस्ती होती. विषाणिन् (शिंगे असणारा पशू - बहुधा वृषभ. विषाणिन् एकशिंगाचे शिरोभूषण वापरत असावेत म्हणून त्यांना हे नाव पडले. किंवा वृषभ हे या जमातीचे देवक - अर्थात टॉटेम असावे.) हे क्रुमु (कुर्रम) आणि गोमती (गोमल)च्या खो-यात राहात असत.

आता आपण परत दाशराज्ञ युद्धाकडे वळू या.
या युद्धात विश्वामित्राने दहा जमातींच्या राजांचा गट केला आणि तो सुदासच्या विरोधात उभा राहिला. सुदासच्या बाजूनेही दहा राजे होते. तत्सु, पर्शू, पृथू या त्यातील काही जमाती. यांच्यामध्ये परुष्णीच्या म्हणजेच रावी नदीच्या काठावर हरियुपिया (हडप्पा?) येथे लढाई झाली. दोन्ही बाजूंनी वीस राजे या युद्धात सहभागी झाले होते. सर्वमिळून सैनिकांची संख्या होती - सुमारे सहाशे! हे युद्ध भरतांचा मुख्य सुदास याने जिंकले. पुरुंचा पुरुकुत्स, अनु आणि द्रुह्यु नदीत बुडाले. पराभवानंतर पुरु पूर्वेकडे सरस्वती नदीच्या खो-यात आले. त्या प्रदेशाचे नाव शरण्यावत असे होते. तो प्रदेश म्हणजे हल्लीचा हरयाणा.

दाशराज्ञ युद्धानंतर यमुनेच्या तीरावर एक छोटे युद्ध झाले. त्यात सुदासाला अज, सिग्रु आणि यक्षांशी लढावे लागले. भेद हा त्यांचा पुढारी होता. या युद्धातही इंद्राने सुदासाला साह्य केले. या युद्धानंतर भरत यमुनेपर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी सरस्वती व यमुना यांमधील प्रदेशात वस्ती केली. या भागाला ब्रह्मावर्त हे नाव पडले. हिंदु धर्माचा उगम येथे झाला.

(संदर्भ - आर्यांच्या शोधात, मधुकर केशव ढवळीकर, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिली, मे २००८, किं. ९० रु., पान २४ ते २९)

येशूची कबर

बायबलनुसार येशू हा देवपूत्र आहे. तो प्रेषित, म्हणजे मानवजातीच्या उद्धारासाठी परमेश्‍वराने पाठविलेला प्रतिनिधी आहे. पण काही वर्षांपूर्वी आलेल्या 'दी दा विंची कोड' या कादंबरीने येशूने विवाह केला होता आणि त्यांना मुलंही झाली होती, असा दावा करून येशूला मर्त्य मानवाच्या कोटीत आणलं होतं. तर आता 'द लॉस्ट टॉम्ब ऑफ जीजस' या जेम्स कॅमेरून कार्यकारी निर्माते असलेल्या आणि सिम्चा जॅकोबोविसी यांनी निर्मिती लेखन व दिग्दर्शन केलेल्या माहितीपटाने येशूच्या पुनरुज्जीवनाच्या कथांनाच सुरूंग लावला आहे. नव्या करारातील शुभवार्तांनुसार 'एली एली ला मा सबख्तनी' (माझ्या देवा, मला का रे तू सोडलंस?) अशी आर्त प्रार्थना करत येशूने क्रूसावर प्राण त्यागले. त्यानंतर त्याच्या अनुयायांनी त्याचं शव एका खळग्यात ठेवलं. तिसऱ्या दिवशी येऊन पाहतात तो त्या खळग्यात शव नव्हतं.

येशूच्या मृत्यूची ही जी कथा आहे, तिचा अर्थ येशू सदेह स्वर्गात गेला असा होतो. पण जेरूसलेममधील ताल्पिऑट भागातील उत्खननात 28 मार्च 1980 रोजी सापडलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या कबरीतील चुनखडीच्या दहा पेट्यांमध्ये (ossuaries) ज्या अस्थी मिळाल्या, त्या अन्य कुणाच्या नव्हे, तर येशू आणि त्याच्या परिवारातील लोकांच्या आहेत, असा दावा 'द लॉस्ट टॉम्ब' या माहितीपटातून करण्यात आला आहे. आता वाद आहे तो एवढाच की त्या अस्थी येशूच्याच आहेत, याला पुरावा काय?

ते पाहण्यापूर्वी 'ऑस्युरिज' हा काय प्रकार आहे ते बघू या. इसवी सन पूर्व 30 ते इसवी सन 70 या कालखंडात जेरुसलेम मध्ये अंत्यसंस्काराची एक रीत प्रचलित होती. ते लोक प्रथम मृतदेह एका कापडात गुंडाळीत. त्यानंतर खडकात खोदलेल्या खास कबरीत तो ठेवला जाई. तेथे तो मृतदेह कुजून जाई. त्याच्या केवळ अस्थी उरल्या की त्या लाईमस्टोनपासून बनविलेल्या पेटीत सुरक्षित ठेवल्या जात. या पेट्यांना 'ऑस्युरिज' म्हणतात. ताल्पिऑटमध्ये तशा दहा पेट्या सापडल्या. त्यातील दोन पेट्यांवर 'जीजस सन ऑफ जोसेफ' आणि 'ज्युडा सन ऑफ जीजस' असे आरेमिक भाषेत कोरलेले आहे. दोन पेट्यांवर हिब्रुत 'मारिया' (मेरी), 'मातिया' (मॅथ्यू) असे लिहिलेले आहे, तर एका पेटीवर ग्रीकमध्ये 'मरियामेने ई मारा' (मास्टर म्हणून ओळखली जाणारी मेरी.) असे कोरलेले आहे. हे मेरी माग्दालिनचे नाव असावे. पण केवळ एवढ्यावरून ते लोक येशू ख्रिस्ताच्या परिवारातील आहेत असे मानायचे का? एकसारखी नावे अनेकांची असू शकतात. तर या आक्षेपाला उत्तर म्हणून जॅकोबोविसी यांनी संख्याशास्त्राचा आधार घेतला. टोरांटो विद्यापीठातील गणित आणि संख्याशास्त्राचे प्राध्यापक आंद्रे फ्युएरव्हर्जर यांनी त्या काळातील नावांमधील साम्य आणि वारंवारता यांचा संख्याशास्त्रीय अभ्यास करून सांगितले, की ती नावे येशू आणि त्याच्या परिवारातील नसण्याची शक्‍यता 600मध्ये एक अशी आहे. याशिवाय जॅकोबोविसी यांनी जीजस आणि मेरी माग्दालिन यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून काही सॅम्पल्स घेऊन ती कॅनडातील ऑन्टॅरियो येथील लेकहेड विद्यापीठातील पॅलिओ-डिएनए प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिली. तेथे करण्यात आलेल्या मायटोकॉन्ड्रिअल डीएनए चाचणीत जीजस आणि मेरी यांची नावं असलेल्या ऑस्युरिजमधून घेण्यात आलेल्या सॅम्पल्सचा एकमेकांशी संबंध नाही. जॅकोबोविसी यांच्या मते याचाच अर्थ जीजस आणि मेरी हे पती-पत्नी असावेत असा होतो आणि 'अखेरच्या भोजन'प्रसंगी येशूच्या मांडीवर एक मूल होते असा उल्लेख जॉन यांच्या शुभवार्तेत येतो, ते मूल म्हणजेच ज्यूडाह आहे.

प्रत्येक धर्माचे दोन भाग असतात. त्यातला एक तत्त्वज्ञानात्मक, अध्यात्मिक असतो. सर्वसामान्य धार्मिक त्याच्या नादी क्वचितच लागतात. लोकांना अधिक रूची असते, ती धर्माच्या कर्मकांडात्मक भागाशी. या कर्मकांडांची उभारणी काही मिथकं, चमत्कारकथा यांच्या पायावर करण्यात आलेली असते. त्या कथा नाकारल्या की पुढचा सगळाच डोलारा कोसळून पडतो. (जो पडणे गरजेचे असते.) 'लास्ट टॉम्ब'मधून नेमकं हेच साधू शकतं. म्हणूनच अशा साहित्याला, चित्रपटांना धर्ममार्तंडांचा विरोध असतो. एकदा धर्माचं अवडंबर दूर झालं की मग त्यांच्यासाठी राहिलं काय? येथे तर एका नव्हे, दोन धर्मांचा प्रश्‍न आहे. ख्रिस्त्यांप्रमाणेच मुस्लिमांचीही प्रेषित संकल्पनेवर श्रद्धा आहे. फार काय कुराण आणि बायबलमधील अनेक व्यक्तिरेखाही एकच आहेत. असो.

धर्मश्रद्धा दुखावल्या म्हणून होणारी ओरड नेहमीच श्रद्धेसाठी असते असं नाही. ती बऱ्याचदा सत्तेसाठीच असते. मात्र युरोप-अमेरिकेत, जेथे ख्रिस्ती धर्म बहुमतात आहे, जेथे मूलतत्त्ववाद जोर धरू पाहात आहे, अशा देशांमध्ये धर्मश्रद्धांना आव्हान देणारे आवाज उठतात आणि तरीही त्यांना मारहाण होत नाही, त्यांच्या कार्यालयांची तोडफोड केली जात नाही, हे आपल्यासाठी काही तरी जगावेगळंच आहे.... चमत्कारसदृश!

(सकाळमधील विश्ववेध या सदरात प्रसिद्ध झालेला लेख. 6 मार्च 2007)