वाद पहिलेपणाचा : आद्य मराठी वृत्तपत्र कोणते?

पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे "दर्पण' पत्र ओळखले जाते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले. पितामह दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या थोर पुरुषांचे ते गुरू होत. न्या. ना. ग. चंदावरकरांनी त्यांचा पश्‍चिम भारतातील "आद्य ऋषी' असा त्यांचा सार्थ गौरव केला होता.

"दर्पण'चा पहिला अंक शुक्रवार, दि. 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. पहिले काही महिने हे पत्र पाक्षिकच होते. 4 मे 1832च्या अंकापासून ते साप्ताहिक स्वरूपात निघू लागले. हे वृत्तपत्र आठ पानी होते व त्यात पानातील दोन स्तंभांपैकी डावीकडच्या स्तंभात इंग्रजी मजकूर व समोर उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर असे. गंमत म्हणजे दर्पणच्या अंकाला "कागद' असे म्हटले जात असे. तसा उल्लेख खुद्द बाळशास्त्री करीत असत. त्या काळी कोणत्याही वृत्तपत्राचा खप 300-400 प्रती याच्या पुढे नसे. वर्षभरातच दर्पणने 300ची मजल गाठली होती. हे पत्र सुमारे साडेआठ वर्षे चालले. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडले.

"दर्पण'ची ओळख आद्य मराठी पत्र अशी असली, तरी त्याच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. त्या वृत्तपत्राचे नाव "मुंबापूर वर्तमान' असे होते. रविवार, दि. 20 जुलै 1828 रोजी त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. या पत्राच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेला एक "विक्षिप्त' यांचा लेख "बॉम्बे गॅझेट' या मुंबईतील इंग्रजी पत्राने आपल्या 23 जुलै 1828 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. लंडन येथे निघणाऱ्या "एशियाटिक जर्नल ऍण्ड मंथली रजिस्टर (फॉर इंडिया ऍण्ड इट्‌स डिपेन्डन्सीज)' या मासिकाच्या फेब्रुवारी 1829च्या अंकात "महरट्टा न्यूजपेपर' या मथळ्याच्या वृत्तात "मुंबापूर वर्तमान' या पत्राचा उल्लेख होता. हे वृत्त "दी बॉम्बे गॅझेट' या पत्राच्या 23 जुलै 1828 च्या अंकावरून घेतल्याचाही उल्लेख एशियाटिक जर्नलमध्ये होता. "बॉम्बे गॅझेट' मध्ये 9 जुलै 1828च्या अंकात या पत्राची इंग्रजी व मराठी जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. परंतु या पत्राचे चालक, संपादक, प्रकाशक कोण होते, ते किती काळ चालले याची काहीच माहिती उपलब्ध नाही. एक मात्र खरे की ते 20 जुलै 1828 रोजी सुरू झाले. यावरून "मुंबई वर्तमान' हेच मराठीतील आद्य वृत्तपत्र असे म्हणता येईल.

पण त्यातही एक गोची अशी, की "बॉम्बे गॅझेट'च्या प्रास्ताविकात "एक नवीन मराठी वर्तमान पत्र' असा उल्लेख आहे. याचा अर्थ त्यापूर्वी एखादे पत्र निघत होते की काय, अशी शंका "मराठी वृत्तपत्रांचा इतिहास'कर्ते रा. के. लेले यांनी व्यक्त केली आहे.

परंतु कालानुक्रमे "दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणता आले नाही, तरी मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान "दर्पण'कडेच जातो, असा लेले यांचा अभिप्राय आहे.

संदर्भ :
वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती 1984, पृ. 54 ते 56.

मराठी साम्राज्याचा कर्ता - मलिक अंबर?

मराठी साम्राज्याच्या कर्तेपणाचा मान मलिक अंबरकडे जातो, असं प्रतिपादन करून ज्येष्ठ लेखक श्री. भालचंद्र नेमाडे यांनी मध्यंतरी हलकीशी खळबळ उडवून दिली होती. हलकीशी म्हणायचं कारण असं, की आजकाल असे वाद घालण्यात कोणाला फारसा रस आहे, असं दिसत नाही. झालेच वाद, तर त्याकडे लक्ष देण्यास येथील माणसांना वेळ आहे असंही दिसत नाही. आणि या माणसांत सगळेच आले. म्हणजे आपले पेपरवाले, लेखक, उरले-सुरले विचारवंत वगैरे सगळेच. असो.

तर मुद्दा असा, की 14 मे 2002 रोजी कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठान येथे श्री. भालचंद्र नेमाडे यांचं भाषण झालं. भाषणाचा विषय "साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण' असा होता. भाषणाच्या ओघात, "हिंदू' ही अस्मिता 1861 नंतर जेव्हा इंग्रजांनी खानेसुमारी सुरू केली तेव्हापासून आली, हा मुद्दा मांडत असताना ते म्हणाले,

""मराठा साम्राज्याची स्थापना कुणी केली असेल तर फार तर आपण शहाजीपर्यंत जातो. शहाजीच्या मागे जाणं आपल्याला परवडत नाही. कारण शहाजीच्या आधी मराठी साम्राज्याचा कर्ता मलिक अंबर असतो. मलिक अंबरनं प्रथम मराठ्यांना राष्ट्रीयत्वाचं भान आणून दिलं. उत्तरेकडच्या "हिंदुस्थानी' मोगलांविरूद्ध दखनी मराठे संघटीत केले, गनिमी कावा पहिल्यांदा यशस्वी रीतीनं शोधून वापरला. शहाजीसारखे सरदार तयार केले. खंडागळे विरुद्ध जाधव, जाधव विरुद्ध भोसले, दरोडेखोर, लुटारु आणि पुंड असे परस्परांशी लढणारे सगळे दखनी मराठे एकत्र करणारा मलिक अंबर महाराष्ट्राच्या आपल्या मध्यवर्ती संस्कृतीत धरायचा नाही?''

गेली अनेक वर्षे श्री. भालचंद्र नेमाडे हे "हिंदू' या नावाची कादंबरी लिहित आहेत. (ही कादंबरी अखेर यंदा प्रकाशित होणार आहे.) त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या वाचन-मनन-चिंतनातूनच त्यांचे उपरोक्त विचार आले असणार. तेव्हा ते उडवून न लावता त्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे. त्या अंगाने इतिहासाचे वाचन व्हायला हवे. मात्र या विषयातील तञ्ज्ञांकडे तो भाग सोपवून आपण प्रथम मलिक अंबरची थोडी माहिती घेऊ या.

अल्लाउद्दिन खिलजी याचा सेनापती मलिक काफूर हा मूळचा हिंदू. त्याने 1313 साली देवगिरीवर स्वारी करून शंकरदेवास ठार मारले आणि देवगिरीचे राज्य दिल्लीला जोडून घेतले. 1318 ला यादवांचे राज्य बुडून महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. त्यानंतर 1347 मध्ये हसन गंगू जाफरखान याने गुलबर्गा येथे आपले स्वतंत्र बहामनी राज्य स्थापन केले. हसन गंगू बहामनी हाही मूळचा हिंदूच होता व आधी तो कुणा शेख जुनैदी याचा चाकर होता. त्याने मुस्लिमांतील शिया पंथ स्वीकारला होता. 1490मध्ये बहामनी राज्याची सत्ता संपुष्टात आली आणि त्याचे पाच तुकडे पडून महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, बेरीदशाही व कुतुबशाही अशा पाच भिन्न शाह्या प्रस्थापित झाल्या.

(यातील बेरीदशाही स्थापन करणारा कासीम बेरीद हा प्रथम महंमद शहापाशी एक गुलाम होता. विजापुरचा युसूफ आदिलशहा हाही पूर्वी तुर्क गुलाम होता. तो इराणातून 1459 साठी दाभोळला आला आणि तीस वर्षात स्वतंत्र राजा बनला. इमादशाही स्थापन करणारा फतेहल्ला इमादशहा हा मूळचा हिंदू ब्राह्मण होता. विजयनगरबरोबर झालेल्या एका लढाईत तो मुसलमानांच्या कैदेत पडला. नंतर तो मुसलमान झाला. निजामशाही स्थापन करणारा अहंमद निजामशहा हाही एका ब्राह्मणाचा मुलगा. विजयनगरचा एक ब्राह्मण भिमाप्पा बहिरू याचा मुलगा लढाईत कैदी झाला. मग त्याला मुसलमान करण्यात आले. त्याचे नाव ठेवले मलिक नाईब निजाम उल्मुक. अहंमद निजामशहा हा त्याचा मुलगा.)

तर मलिक अंबर या पाच शाह्यांपैकी निजामशाहीचा वजीर होता. हाही मूळचा गुलाम. बगदादच्या एका व्यापाऱ्याच्या गुलामीत तो होता. त्या व्यापाऱ्याने याला निजामशाहीचा वजीर चंगीजखान याला विकले. पुढे आपल्या कर्तृत्त्वाने तो त्याच निजामशाहीचा वजीर बनला. लखूजी जाधवराव, मालोजी व शहाजी भोसले, बाबाजी काटे असे अनेक सरदार त्याच्या हाताखाली पराक्रम करीत असत. हा मोठा कर्तबगार मुत्सद्दी होता. औरंगाबाद हे शहर त्याने वसविले. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याची "मलिकंबरीतह' या नावाने ओळखली जाणारी वसुलीपद्धत.

1607 ते 1626 या दरम्यान त्याने दक्षिणची शेतवार पाहणी व मोजणी करून प्रतवारी बसविली आणि जमिनीच्या उत्पन्नाप्रमाणे दोन पंचमांश हिस्सा घासदाण्याच्या रूपाने वसूल घेण्याचा खुद्द गावाशी ठराव केला व वसुलाची जबाबदारी पाटलावर टाकली. 1614 नंतर त्याने काही ठिकाणच्या दरसालच्या वास्तविक उत्पन्नाच्या मानाने एक तृतीयांश नगदी वसूल घेण्याचा प्रघात सुरू केला. त्याने प्राचीन ग्रामसंस्थांचे पुनरुज्जीवन केले. कुणब्यांना मिरासपत्रे देऊन म्हणजे जमिनीचे मालक बनविले. त्यांना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे हक्क दिले. पाटील, कुलकर्णी व इतर ग्रामअधिकारी यांची वतने वंशपरंपरागत करून दिली. त्याने गावाला पड जमिनीतून वनचराई व गायराने काढून दिली आणि बाकीची जमीन "गावसंबंधी' किंवा "गाववर्दळ' म्हणून गावाच्या दिमतीला लावून दिली. ही वसूलपद्धतीची सुधारणा "मलिकंबरीतह' म्हणून ओळखली जाते.

मलिक अंबरचा गौरव करताना "गावगाडा'कार त्रिंबक नारायण आत्रे म्हणतात, ""कुणब्याचा किंबहुना कुणब्याअडाण्यांचा काळीशी एकजीव केल्यावाचून सरकारसाऱ्याची शाश्‍वती नाही, हे तत्त्व मलिकंबरने पूर्णपणे हृदयात वागविले आणि अजूनही लोक त्याचे गुण आठवितात.''

तर असा हा मलिक अंबर. तो मराठी साम्राज्याचा कर्ता असल्याचे जे मत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले आहे, ते म्हणूनच गांभीर्याने घेतले पाहिजे.

संदर्भ -
- "साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण' - भालचंद्र नेमाडे, लोकवाङ्‌मय गृह, पहिली आवृत्ती 2003, पृ. 14-15.
- "महाराष्ट्र संस्कृती' - पु. ग. सहस्त्रबुद्धे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, द्वितीयावृत्ती 1994, पृ. 248, 251, 263, 275.

एक छोटीशी दंतकथा

छत्रपती संभाजी राजांबद्दल एक कथा सांगितली जाते.
औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे संभाजीराजांची हत्या केली. मात्र तत्पूर्वी त्याने त्यांना, तू मुसलमान होतोस का, असं विचारलं होतं. त्यावर संभाजीराजांनी मोठ्या बाणेदारपणे त्याला उत्तर दिलं, ""तुझी जुलपुकार बेगम ही मुलगी मला देतोस, तर मी धर्मांतराला तयार होतो!''

ही जी कहाणी आहे ती मोठ्या अभिमानाने, संभाजीराजांची धर्मनिष्ठा अधोरेखीत करण्यासाठी सांगितली जाते. बखरकारांनी अगदी रंगवून रंगवून ही कथा सांगितली आहे. पण ही गोष्ट मुळातूनच खोटी आहे. कोणाही समकालिन लेखकाने या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही. साकी मुस्तईद खानाने "मआसिरे आलमगिरी'त अथवा भीमसेन सक्‍सेनाने त्याच्या "तारीख-ए-दिलकुशा' या ग्रंथात अशा भाकडकथांचा उल्लेख केलेला नाही.

संभाजीचा जन्म 14 मे 1657चा. मृत्यु 11 मार्च 1689चा. मृत्युसमयी त्याचं वय 32 होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या पाचांपैकी दोन मुली लग्नाच्या होत्या. त्यातील जेबुन्नीसा ही संभाजीपेक्षा 19 वर्षांनी मोठी होती आमि जिबतुन्नीसा ही 14 वर्षांनी मोठी होती.

सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे औरंगजेबाला जुलपुकार नावाची मुलगीच नव्हती! मुळात हे नाव पुरूषाचं आहे!!

(इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998.)

भवानी तलवारीचे गूढ

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्‍न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्‍न अधूनमधून चर्चेत येतोच, त्यावरून रान पेटते आणि मग तो पुन्हा बासनात जातो, असे घडताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये बकिंगहॅम राजवाड्यात भवानी तलवार आहे, अशी एक समजूत आहे. लोकमान्य टिळकांनी ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारी एक कविता गोविंदाग्रजांनी (राम गणेश गडकरी) लिहिली होती. 1980मध्ये बॅ. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, तर त्यांनी भवानी तलवार महाराष्ट्रात आणणारच अशी घोषणा करून मोठी मौज केली होती. त्यासाठी त्यांनी लंडनवारीही केली होती. तिकडून त्यांनी भवानी तलवार नाही आणली, पण तिचे चित्र तथाकथित चित्र मात्र आणले. यानंतर भवानी तलवार पुन्हा चर्चेत आली ती केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा. जून 2002मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी स्पेनच्या पाच दिवसीय भेटीवर गेले होते. त्यावेळी स्पेनमधील काही संशोधकांनी सांगितले, की शिवाजी महाराजांची भवानी तलवार स्पेनमधील तोलेदो या शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी नावाजलेल्या शहरातील कारागिरांनी तयार केली होती. त्यावरून काही काळ धुरळा उडाला. मग तो विरून गेला.

बखरी आणि काव्यांनुसार साक्षात्‌ तुळजाभवानीने शिवरायांना तलवार दिली, ती ही भवानी तलवार. तुळजाभवानीने महाराजांना दर्शन दिले आणि "राजा, मी तुझी तलवार होऊन राहिले आहे' असे म्हणाली, असे "शिवभारत' या काव्यामध्ये नमूद आहे. महाराजांकडे अनेक तलवारी होत्या. त्यातील एक त्यांनी शहाजीराजांनी दिली होती. तिचे नाव त्यांनी "तुळजा' असे ठेवले होते. महाराजांच्या दुसऱ्या एका तलवारीचे नाव "जगदंबा' असे होते. महाराज भवानीचे भक्त होते. तेव्हा अन्य एखाद्या तलवारीला त्यांनी "भवानी' असे नाव दिले असेल. यात काही वाद नाही. वाद आहे तो हा, की सध्या ही तलवार कुठे आहे?

सुमारे नव्वदेक वर्षांपूर्वी मुंबईतील कॅप्टन बहादुर मोदी नावाच्या गृहस्थांनी भवानी तलवार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तशी एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, खान बहादुर पदमजी यांच्याकडे भवानी तलवार होती व ती त्यांनी डॉ. कूर्तकोटी यांना दिली. नंतर ती त्यांच्या स्वतःकडे आली. या तलवारीवर "छत्रपती शिवाजी' असे कोरलेले होते. नंतर उघडकीस आले, की तो मजकूर या पदमजी नावाच्या इसमानेच कोरलेला होता!

इंदूर-महू येथे असलेली तलवार हीच भवानी तलवार आहे व ती महाराजांनी छत्रसाल बुंदेल्याला दिली होती, असा दावा काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी केला होता. परंतु त्या तलवारीवर नंतर छत्रसालाच्या सेनापतीचे नाव आढळून आले!

असाच आणखी एक दावा केला जातो, की खेम सावंताकडून महाराजांना पोर्तुगीज बनावटीची तलवार मिळाली व तीच भवानी तलवार होय. वस्तुतः ही भाकडकथा आहे. खेम सावंत हा कोणी महाराजांचा एकनिष्ठ पाईक नव्हता. आदिलशाहीचा हा वतनदार, दगलबाज होता. महाराजांनी त्याचा बिमोड करण्यासाठी त्याच्या मुलखावर हल्ला केला होता. क्षणभर असे मानले, की शरणागती पत्करल्यानंतर त्याने महाराजांना जे नजराणे धाडले, त्यात ही पोर्तुगीज बनावटीची तलवारही होती, तरी महाराज त्या तलवारीवरील रोमन अक्षरे तशीच ठेवून तिला "भवानी' तलवार असे म्हणणार नाहीत.

रियासतकारांच्या म्हणण्यानुसार, रायगड्या पाडावानंतर औरंगजेबाच्या हाती भवानी तलवार लागली. ती त्याने शाहू महाराजांना त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली. याचा अर्थ असा होतो, की भवानी तलवार सातारच्या छत्रपतींकडे आहे. सध्या ती उदयराजे भोसले यांच्या ताब्यात आहे. 1974 साली बाबासाहेब पुरंदरे यांनी मुंबईत "शिवसृष्टी' प्रदर्शन भरविले होते. तेव्हा त्यांनी सातारच्या राजघराण्यातील तलवार भवानी तलवार असल्याचे सांगून मिरवली होती. परंतु ज्येष्ठ इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी ही तलवार आधीच पाहिलेली होती. ती त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा डोळ्यांखालून घातली. खरे यांनी पुरंदरे यांना त्यावरील कोरीव मजकूर दाखवून ही तलवार भवानी नव्हे असे स्पष्ट केले. त्या तलवारीवर "सरकार राजा शाहू छत्रपती कदिम' असा उल्लेख होता.

1875 मध्ये इंग्लंडचे राजपूत्र, प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड इकडे आले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरच्या शस्त्रगारातील "तुळजा' व "जगदंबा' या दोन तलवारी नजर केल्या. यापैकी कोणतीही भवानी तलवार नव्हे. कोल्हापूरच्या राजघराण्याकडे अशी कोणती भवानी तलवार असती, तर ती त्यांच्या देवघरात पूजेत असती. ती त्यांनी कोणास नजराणा म्हणून दिली नसती. पण मुदलातच कोल्हापूर किंवा सातारा येथील राजघराण्यांच्या याद्यांमध्ये भवानी तलवारीचा उल्लेखही नाही.

बकिंगहॅम राजवाड्यातील दोन्ही तलवारी पोतुगीज बनावटीच्या आहेत. इतिहासकार वा. सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्या पाहून, त्यातील एकही भवानी तलवार नसल्याची खात्री दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना बकिंगहॅम राजवाडा व अन्य म्युझियम्समधील तलवारींची तपासणी करण्याची परवानगी नानासाहेब गोरे यांनी ते भारताचे इंग्लंडमधील हायकमिशनर असताना मिळवून दिली होती. त्या तलवारीवर अद्याप रोमन लिपीत "जे. एच.एस.' अशी अक्षरे आहेत. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या मते, ती जीजस ह्युमॅनन साल्वादोर या पोर्तुगीज नावाची अद्याक्षरे आहेत. ब्रिटिश म्युझियमेच डेप्युटी कीपर डग्लस बॅरेट यांनी, इंग्लंडमधील कोणत्याही म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही, असे 1969 साली कळविले होते.

भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहित नाही. ग. ह. खरे सांगतात, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कविच्या शंभुराजचरित्रात हिचा निर्देश आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर त्याचे तोंड बंद करणे शक्‍य नाही. तरीही इतिहास हे पुराव्याचे शास्त्र असल्याने आणि असा पुरावा त्या व्यक्तीस देता येत नसल्याने तञ्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता दाखविणार नाहीत.''

संदर्भ -
- इतिहास ः सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998, पृ. 132-133.
- "भावनांशी खेळ नको!' (29-11-1980) व "पुन्हा एकदा भवानी' (8-12-1980) हे गोविंदराव तळवलकर यांचे "महाराष्ट्र टाइम्स'मधील अग्रलेख.
- Desperately Seeking ShivajiH$s Sword - Times of India, 2 Jul 2002.

Also read : Politics of Shivaji - The James Laine Affair by Vidhyadar Date in EPW

'गोब्राह्मण प्रतिपालक' हे कोठून आलं?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या बिरूदावल्या लावल्या जातात त्यात "गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस' ही खूपच प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराज हे गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारे होते असं हे बिरूद सांगतं.
शिवरायांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रं उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःस "गोब्राह्मण प्रतिपालक' म्हणवून घेतलेलं नाही. शिवरायांच्या समकालिनांनी त्यांना लिहिलेली पत्रं आहेत. त्या पत्रांपैकीसुद्धा एकाही पत्रात कुणी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाही. महाराजांची राज्याभिषेक शक असलेली 29 पत्रं उपलब्ध झाली आहेत. या सर्व पत्रांत महाराज स्वतःस "क्षत्रिय कुलवतंस श्रीराजा शिवछत्रपती' असं म्हणवून घेतात. ते स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत नाहीत. मग हे प्रकरण आलं कोठून?

स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत असं बाबासाहेब पुरंदरे लिहितात. त्यासाठी त्यांनी शिवचरित्र साधने खंड 5, क्र. 534 व 537 असा आधार दिला आहे. परंतु या सर्व पत्रांची आणि आधारांची छाननी करून शेजवलकरांनी निर्वाळा दिला आहे, की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी महाराज स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत नाहीत, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण महाराजांस तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गोब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही! म्हणजे हे सर्वच झूट आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यांना तसं म्हणणं यातलं अंतर स्पष्ट आहे.

सर्व मराठे ज्याप्रमाणे महाराजांच्या बाजूने नव्हते, त्याचप्रमाणे सर्व ब्राह्मणही त्यांच्या बाजूने नव्हते. अनेक जण विरूद्धही होते. म्हणूनही शिवाजी महाराज "ब्राह्मण प्रतिपालक' अशी पदवी घेणे शक्‍य नव्हते. आणखी एक गमतीची बाब म्हणजे मिर्झाराजे जयसिंह शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांना शिवाजीविरूद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील काही ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ केला होता! महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदाने महाराजांना राज्याभिषेक करण्यास विरोध केला होता, हे सत्य तर सर्वांनाच माहित आहे.

(शिवाजी कोण होता? - गोविंद पानसरे, प्रकाशक स्वतः लेखक, चौथी आवृत्ती, 1991, पृ. 34-35.)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद आता संपुष्टात आला असला, तरी शिवजयंतीचा शासकीय उत्सव नेमका कोणत्या तारखेला साजरा करायचा; म्हणजे तिथीनुसार दरवर्षी बदलणाऱ्या तारखेस की इंग्रजी तारखेस असा नवाच वाद निर्माण झालेला आहे.

15 एप्रिल 1896 रोजी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजयंती साजरी केली. तेव्हापासून महाराष्ट्रात शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरू झाला. त्यावेळी लोकमान्यांना उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून शिवरायांचा जन्म वैशाख शुद्ध प्रतिपदेला झाल्याचे मानण्यात येत होते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संशोधन करून ही तिथी वैशाख शुद्ध पंचमी असल्याचे सांगितले.

पुढे 1914च्या सुमारास लोकमान्यांना छत्रपतींच्या जन्मकालाची नोंद "जेधे शकावली'त सापडली. शकावलीत शके 1551 शुक्‍ल संवत्सर या वर्षात "शिवजन्म फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार, घटी 18, पळे 31, गड 5, पळे 7 ये दिवसी झाला' अशी नोंद आढळते. (ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार ही तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630 )
कवि परमानंद यांनी शिवरायांच्या सूचनेनुसार "शिवभारत' हे महाकाव्य रचले. त्यात मालोजी, शहाजी आणि शिवाजी या भोसले घराण्यातील तीन पिढ्यांच्या जीवनातील घटनांचे वर्णन आहे. त्यात, तसेच बनेडा बियावर व बिकानेर येथे सापडलेल्या कुंडल्यांमध्येही शिवजन्माची हीच तिथी देण्यात आली आहे.

हे पुरावे सापडल्यानंतर खरेतर वादाचे काही कारण नव्हते. परंतु इतिहासकारांमध्ये एकवाक्‍यता नव्हती. 1925चा शिवजयंती उत्सव फाल्गुन वद्य तृतीयेलाच व्हावा अशी जाहीर विनंती महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी "केसरी'मधून केली होती. पण या तारखेला काही अभ्यासकांनी आक्षेप घेतला. पोतदारांप्रमाणेच, ग. ह. खरे, बा. सी. बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी यांना ही तारीख योग्य असल्याचे मान्य होते. परंतु न. र. फाटक यांनी मात्र याबाबत निर्णायक पुरावा नसल्याचे कारण दर्शवित त्यास विरोध दर्शविला. या विरोधाचे कारण बहुधा राजकीय असावे. कारण फाटक हे गोखलेवादी होते, तर पोतदार हे टिळकवादी. या वादास जहाल-मवाळ वादाचे एक परिमाण प्राप्त झाले.

पुढे 1967 मध्ये महाराष्ट्र सरकारने असे जाहीर केले, की इतिहासकारांमध्ये एकवाक्‍यता होईपर्यंत वैशाख शुद्ध द्वितिया, शके 1549 ही शिवजयंतीची प्रचलित तारीखच उत्सवासाठी स्वीकारली जाईल. श्री शिवदिग्विजय, धडफळे शकावली, प्रभानवल्ली शकावली, नागपूरकर भोसले बखर, न्यायशास्त्री पंडितराव बखर, शिवाजी प्रताप बखर, शेडगावकर बखर, तसेच पारसनीस व किंकेडकृत इतिहास या साधनांमध्ये ही तिथी देण्यात आली आहे. मल्हारराव चिटणीस यांनी लिहिलेल्या शिवचरित्रात, "जिजाबाईसाहेबांनी नवस केला जे पुत्र झाले म्हणजे शिवाई देवीचे नाव ठेवीन. नंतर गरोदर दिवस पूर्ण होऊन शिवनेरीस शुभसमयी वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 प्रभावनामे संवत्सरे वर्षी गुरुवारी पुत्र झाला,' अशी नोंद आढळते. इसवी कालगणनेनुसार ही तारीख होती 6 एप्रिल 1627. या तिथीस येणाऱ्या इंग्रजी तारखेस शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येऊ लागला, तरी वाद शमला नव्हता. साल 1627, 1628 की 1630 हा घोळ सुरूच होता.

अखेर इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी हा वाद एकदाचा निकालात काढला. राजस्थानात आढळलेल्या कुंडल्या, राजघराण्यांतील नोंदी, देशात ठिकठिकाणी उपलब्ध झालेले कागद, पत्रव्यवहार असे सर्व काही पडताळून आपल्या "श्री राजा शिवछत्रपती' या चरित्राच्या पहिल्या खंडात जाहीर केले, की
ल्गुन वद्य तृतीया, शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 हीच शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे.
इतर ज्येष्ठ इतिहासकारांनीही त्यांच्या संशोधन, पुरावे व निष्कर्षास मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही तारीख सरकारी सुट्टी व शिवजयंती उत्सवासाठी घोषित केली.

परंतु आता वाद आहे तो हा, की शिवजयंती साजरी करायची ती इंग्रजी तारखेनुसार की हिंदु पंचागानुसार?

बाबासाहेब पुरंदरे, इतिहासकार निनाद बेडेकर, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे मत उत्सव तिथीनुसारच करावा असे आहे. स्वतः शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहंदळे हेही, शिवजन्मतिथीचे शासकीय कार्यक्रम इसवी कालगणनेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी करण्याऐवजी भारतीय कालगणनेनुसार म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया या तिथीस करावेत, या मताशी सहमत आहेत.

हे मत मान्य होण्यास वास्तविक हरकत नसावी. कारण यापूर्वीही म्हणजे 1999 पर्यंत, पंचांगात दर्शविलेल्या वैशाख शुद्ध द्वितिया या तिथीला येणाऱ्या इंग्रजी तारखेलाच शासकीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असे.

संदर्भ -
- छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी, एनबीटी, सहावी आवृत्ती 2004, पृ. 2-3.
- आठवावा प्रताप! - अग्रलेख, महाराष्ट्र टाइम्स, 19 फेब्रुवारी 2000.
- कालनिर्णय दिनदर्शिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले इतिहास संशोधकांचे अभिप्राय, महाराष्ट्र टाइम्स, 20 जानेवारी 2001.
- श्री शिवछत्रपतींचे जन्मकाल विवेचन - भास्करपंत "काव्यशेखर', शिवगाथा, संपादक - दिलीप पिंपळे, पृ. 204.

जोधा-अकबरची स‌ुरस कहाणी!


आशुतोष गोवारीकरांच्या "जोधा-अकबर' या भव्य ऐतिहासपटावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात जोधाबाई आणि अकबर यांची विवाहोत्तर प्रेमकहाणी रेखाटली आहे. त्यामुळे राजस्थानातील काही लोक संतप्त झाले आहेत. त्यांच्या मते जोधाबाई ही अकबराची नव्हे, तर त्याच्या मुलाची - सलीम अर्थात जहांगीर याची बायको होती. दुसरीकडे गोवारीकर आणि मंडळी सांगतात, की त्यांनी इतिहासाची पाने धुंडाळूनच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यात नेमके खरे कोणाचे?

पंडित जवाहरलाल नेहरूंनी अकबराबाबत लिहिले आहे, ""कोणापुढेही मान न वाकवणारे, शरण न जाणारे कितीतरी अभिमानी रजपूत राणे अकबराने आपल्या बाजूला वळवून घेतले. रजपूत राजकन्येशी त्याने विवाह केला. त्याच्या मुलाच्या - जहांगीरच्या अंगात निम्मे हिंदू रक्त होते, निम्मे मोगल रक्त होते.''
पण पुढे त्यांनी असेही लिहिले आहे, की ""जहांगिरचा मुलगा शहाजहान याची आई हिंदूच होती.''

(यातून मोठा गमतीशीर निष्कर्ष पं. नेहरूंनी काढला आहे. अकबराची बायको हिंदू. (हिचे नाव मानकुँवर.ती अंबर म्हणजे हल्लीचे जयपूरच्या राजाची कन्या.) त्याच्या मुलाच्या-जहांगिरच्या अंगात निम्मे हिंदू रक्त. पुढे जहांगिरची बायको हिंदू. त्यांचा मुलगा शहाजहान यांच्या अंगात पुन्हा हिंदू रक्त. म्हणजे झाले काय, तर नेहरू सांगतात - ""अशा रीतीने तुर्की-मोगल असे हे घराणे तुर्की-मोगल असण्यापेक्षा अधिकाधिक हिंदीच होत गेले.'' पण ते असो.)

लोकहितवादी गोपाळराव हरि देशमुख यांनी आपल्या "उदेपूरचा इतिहास' या ग्रंथात याचा खुलासा केला आहे. ते लिहितात -

"".... त्या वेळी आपल्याला रजपुतांची अनुकूलता मिळविण्यासाठी जें जें करणे इष्ट व उचित वाटलें तें तें अकबरानें करण्यास हयगय केली नाहीं. व त्याप्रमाणें या नुस्त्ये मानसन्मानालाच लुब्ध होणारे लब्धप्रतिष्ठ व व जात्यभिमानशून्य असे अधम रजपूत त्याला पुष्कळ मिळत चालले. त्यांतही मारवाडच्या राठोडानें (ठाकूर मालदेव) तर आपला लोभीपणा आणि हलकट बुद्धि दाखविण्याची कमालच केली. त्याणें रजपूत जातीच्या अभिमानाला व वैभवाला अत्यंत अनुचित असे काम करण्याचा पाया घातला व त्या नीच कामाबद्दल जी त्याला देणगी आणि पदव्या मिळाल्या त्याबद्दल तो आपल्यास मोठें भूषण समजूं लागला. मारवाडच्या मालदेवानें अकबराशीं सख्य करण्याकरितां आपला पुत्र उदेसिंग यास देणगी व नजराणा देऊन पाठविल्याचें व त्याची व अकबराची नागोराजवळ गांठ पडल्याचें जें नुक्तेंच वर सांगितले, त्या उदेसिंगानें अकबराच्या चरणीं बापानें पाठविलेलीं खंडणी व नजर अर्पण करूनच नुस्ते "सख्य' जोडले नाहीं; तर आपली कन्या जोधाबाई ही उपवरा झाली होती. ती अकबर बादशाहाचे मुलास देऊन "सख्यसंबंध' जोडिला; (जोधाबाई ही अकबरपौत्र शहाजहान याची आई असून, तिची सुंदर व भव्य कबर आग्र्याजवळ सिकंदरा नावाच्या गावीं अकबराच्या कबरेजवळच आहे.) बादशाहीशीं केलेल्या या नव्या सोयरीकींबद्दल बादशाहानेंही त्याचे उपकार ठेविले नाहींत. या वधूदानानें उदेसिंग राठोड याचा बादशाहाचे दरबारीं सर्व रजपूत स्नेही राजांपेक्षा फार मोठा मानमरातब वाढला इतकेंच नव्हे; तर या अपूर्व महत्कृत्याबद्दल अकबर बादशाहानें आपल्या या रजपूत व्याह्यास पुढें लिहिलेला पंधरा लाखांचा मुलूख तोडून दिला ः- गोदवाड, 9 लाख; उज्जनप्रांत, 2 लाख; देवलपूर, 1।। लाख; व बडनावर, 2।। लाख. यामुळें मारवाडच्या राजाचें (जोधपूरचें) उत्पन्न दुप्पट वाढलें.''

लोकहितवादी पुढे लिहितात - ""बहुतकरून प्रत्येक रजपूत ठाकूर आपली बहीण, मुलगी किंवा आप्तस्वकीयांतील एखादी वधू मुसलमानी घराण्यांकडे देऊन दिल्ली दरबारचा अंकित सरदार झाला होता. इतकेंच नव्हे; तर किती एक रजपूत ठाकूरांनी स्वधर्मत्याग करून मुसलमानी धर्मही स्वीकारिला.''
यामुळे महाराणा प्रताप अतिशय संतप्त झाले.
""त्याणें मुसलमानांबरोबर कन्याव्यवहार ठेवणाऱ्या एकंदर रजपूत कुळांशी, निष्कलंक राहिलेल्या कोणाही रजपुतानें सोयरगत करूं नये, असा सक्त हुकूम केला... प्रतापसिंगाने जो हा ठराव केला तो त्याच्या अस्तित्वापर्यंत तर चाललाच. परंतु त्याचे पश्‍चात्‌ दिल्लीचें तख्त बुडेपर्यंतही तो नियम अव्याहत चालून जयपूर-जोधपूरच्या घराण्यांशीं मेवाडच्या राणेवंशीयांनीं मुळीच सोरयसंबंध ठेविला नाही.''

गंमत म्हणजे काही इतिहासकारांच्या मते जोधाबाई हे नाव कोणत्याही अकबरकालीन कागदपत्रांत येत नाही. त्याचा उल्लेख येतो तो थेट अठराव्या-एकोणीसाव्या शतकात.

संदर्भ -
- भारताचा शोध - पं. जवाहरलाल नेहरू; अनु. साने गुरुजी, ना. वि. करंदीकर; कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे; पहिली आवृत्ती 1976, पृ. 285.
- निवडक लोकहितवादी - संपादक - डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. ल. रा. नसिराबादकर; फडके बुकसेलर्स, कोल्हापूर; दुसरी आवृत्ती, जुलै, 1989, पृ. 123-125.

टीप - "निवडक लोकहितवादी'च्या प्रस्तावनेत संपादकांनी लोकहितवादींचा "अव्वल इंग्रजीतला पहिला इतिहासचिंतक लेखक' असा गौरव केला आहे. लोकहितवादींनी भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास, 1851), पाणिपतची लढाई (काशीराज पंडित याच्या फारसी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराचा तर्जुमा, 1877), "गुजराथ देशाचा इतिहास' (1855), "उदेपूरचा इतिहास' (कर्नल टॉड्‌च्या "ऍनल्स ऑफ राजस्थान'चा अनुवाद, 1893) आदी इतिहासलेखन केले आहे

शेक्‍सपियर खरा कोण होता?

"माझ्याकडे कान द्या. अफवा बोलू लागल्यावर कान देणार नाही असा महाभाग येथे असू शकेल काय?''
"किंग हेन्री चौथा' या नाटकात शेक्‍सपियरने चक्क अफवा (रूमर) नावाचं पात्रच रंगभूमीवर आणलं आहे. जिभाच जिभा चितारलेले वस्त्र लेवून हे पात्र रंगमंचावर प्रवेश करते आणि उपरोक्त शब्दांत स्वतःचा परिचय करून देते. गंमत म्हणजे खुद्द शेक्‍सपियरचा लौकिकही या पात्राच्या तावडीतून सुटलेला नाही! अफवा अशी आहे, की शेक्‍सपियरची नाटकं त्याने लिहिलीच नाहीत. खरं तर ही अफवा आहे की सत्य याचा निकाल अजून लागलेला नाही. तो लागेलच असंही सांगता येणार नाही.

विल्यम शेक्‍सपियरचा जन्म 1564 चा. 1616 मध्ये त्याचं निधन झालं. (त्यानंतर चौदा वर्षांनी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. म्हणजे काळ किती लोटला आहे पाहा.) तेव्हा आता चारशे वर्षांनंतर ती 37 नाटके शेक्‍सपियरच्याच लेखणीने प्रसवली याचा शुद्ध पुरावा कोण कोठून आणणार? पण त्याबाबत गेली तीन शतके वाद सुरूच आहे. बिस्मार्क, मार्क ट्‌वेन, सिग्मंड फ्रॉईड यांसारख्या मातब्बरांपासून ते आजच्या चार्ल्‌स ऑगबर्न, जॉन मिशेल, रिचर्ड व्हॅलेन आणि जोसेफ सोब्रान यांसारख्या संशोधकांपर्यंत अनेकांनी या वादात हिरिरीने भाग घेतलेला आहे.

ब्रिटनमधील "दी द-व्हिरे सोसायटी' या साहित्यिक संघटनेच्या म्हणण्यानुसार "अर्ल ऑफ ऑक्‍सफर्ड' एडवर्ड द-व्हिरे (1550-1604) यांनीच शेक्‍सपियरची सर्व नाटकं लिहिलेली आहेत. स्ट्रॅटफर्ड अपॉन ऍव्हॉन या शेक्‍सपियरच्या गावातल्या "शेक्‍सपियर बर्थप्लेस ट्रस्ट'ने अर्थातच हा दावा फेटाळून लावलेला आहे. हा पक्ष "स्ट्रॅटफर्डियन्स' म्हणून ओळखला जातो, तर एडवर्ड द-व्हिरे यांना शेक्‍सपियरच्या नाटकांच्या जनकत्वाचा मान देणारा पक्ष "ऑक्‍सफर्डियन्स' या नावाने संबोधला जातो.

गेल्या काही वर्षांत या पक्षाचा पुरस्कार करणारी "हू रोट शेक्‍सपियर?' (जॉन मिशेल, थेम्स अँड हडसन), "शेक्‍सपियर ः हू वॉज ही?' (रिचर्ड एफ. व्हॅलेन, प्रायेजर) आणि "एलियास शेक्‍सपियर' (जोसेफ सोब्रान, द फ्री प्रेस) अशी तीन महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. यातील जॉन मिशेल यांच्या मते शेक्‍सपियरचं सगळं वाङ्‌मय पाहता त्याच्याकडे अफाट शब्दसंग्रह होता हे दिसून येतं. त्याच्या संग्रहात किमान 15 हजार शब्द होते. पण त्याने आपलं जे विस्तृत आणि सखोल नोंदी असलेलं मृत्युपत्र लिहिलेलं आहे, त्यात ग्रंथसंग्रहाचा तर राहोच, साध्या एका पुस्तकाचाही उल्लेख नाही. त्याचे वडील जॉन शेक्‍सपियर आणि आई मेरी आर्डेन हे निरक्षर होते, असं मानलं जातं. ऍन हॅथवे ही त्याची पत्नी. सुसान आणि ज्युडीथ आणि हॅम्नेट या जुळ्या मुली अशा तीन मुली त्यांना होत्या. त्यांतील ज्युडिथलाही त्याने आपल्या आई-वडिलांप्रमाणेच निरक्षर ठेवलं होतं, याकडे मिशेल यांनी लक्ष वेधलं आहे. स्वतः शेक्‍सपियरचं शिक्षणही ग्रामर स्कूलच्या पुढं गेलेलं नव्हतं.

मिशेल सांगतात, की हॅम्लेट हे नाटक, तसेच शेक्‍सपियरची काही सुनीतं यांची थीम द-व्हिरे यांच्या वैयक्तिक जीवनाशी खूपच मिळती-जुळती आहे. शेक्‍सपियरच्या अनेक साहित्यकृतींची कथाबीजं, कथा यांचा स्रोत इटली हा देश असल्याचं आढळतं. पण शेक्‍सपियरने कधीही परदेश प्रवास केलेला नाही. द-व्हिरे यांनी मात्र इटलीला भेट दिली होती. त्यांच्याकडे "जिनिव्हा बायबल'ची 1569 ची प्रत होती. त्यातील अनेक परिच्छेद, वाक्‍ये त्यांनी अधोरेखित केलेले असल्याचं रॉजर स्ट्रीटमॅटर या संशोधकास 1994 मध्ये आढळून आलं. ते परिच्छेद, ती वाक्‍यं थोड्याफार फरकाने शेक्‍सपियरच्या साहित्यकृतींमध्ये आढळून आली आहेत. असे अनेक पुरावे(!) सोब्रान यांनीही सादर केले आहेत.
ते असं नोंदवतात, की वास्तविक शेक्‍सपियरची निर्मितीक्षमता त्याच्या पन्नाशी आणि साठीत, म्हणजे 1604 ते 1616 या कालावधीत सर्वाधिक असणं हे तर्कास धरून आहे. पण प्रत्यक्षात 1604 नंतर त्याने काहीही प्रसवलेलं दिसत नाही. कारण त्याच वर्षी एडवर्ड द-व्हिरे यांचं निधन झालं होतं!

सोब्रान यांनी आणखी एका गोष्टीकडे निर्देश केला आहे. "मिऱ्हा मदर ऑफ ऍडॉनिस' या विल्यम बर्कस्टीड यांच्या 1607 मधील पुस्तकात शेक्‍सपियरचा मृत्यु झाला असल्याची नोंद आहे. पण त्याचा मृत्यु तर 1616 मध्ये झाला. मग हा शेक्‍सपियर कोण? तो एकतर मार्लोवी असावा किंवा द-व्हिरे. द-व्हिरे यांचा मृत्यु 1604 मध्ये झाला. त्यांनी 1595 ते 1602 या काळात लिहिलेल्या चार पत्रांमध्ये स्वतःचा उल्लेख "लेम' असा केला आहे. शेक्‍सपियरच्या 37 आणि 89 क्रमांकाच्या सुनितांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेखही लेम असाच केला आहे.

आता प्रश्‍न असा उभा राहतो, की मग द-व्हिरे यांनी आपलं नाव गुप्त का ठेवलं? सोब्रान सुचवितात, की द-व्हिरे हे पहिल्या एलिझाबेथ राणीच्या दरबारातले एक प्रतिष्ठित सरदार होते. त्यांचं एका कुप्रसिद्ध, विक्षिप्त व्यक्तीशी प्रेमप्रकरण होतं. ते उजेडात येऊ नये म्हणून त्यांनी ही अशी लपवाछपवी केली!

शेक्‍सपियरच्या नाटकांचा कर्ता म्हणून आणखीही काही नावं घेतली जात आहेत. त्यात सर फ्रान्सिस बेकन, "काऊंटेस ऑफ पेम्ब्रुक' मेरी सिडने यांचा समावेश आहे.

खरं तर या बाबतीत कुसुमाग्रजांची भूमिका अत्यंत विवेकी आहे. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, ""शेक्‍सपियरच्या बाबतीत हे सर्व वाद निरर्थक निखळून पडतात. ज्या कोणी ही नाटके लिहिली असतील तो शेक्‍सपियर.''

नेतोजी पालकर - धर्मांतर ते धर्मांतर

नेताजी पालकर म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांचं नाव मुळात नेतोजी. त्याचं नेताजी कसं झालं हे माहित नाही. पण त्यांच्या पत्रातून मात्र नेतोजी असंच नाव येत.

तर हे नेतोजी पालकर शिवाजी महाराजांचे सरनौबत. महाराजांनी त्यांना हाकलून दिल्यावर ते आधी आदिलशाहीला आणि नंतर मुगलांना सामिल झाले. महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबाने नेतोजी पालकरला कैद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नेतोजीला धारुर इथं दग्याने पकडण्यात आलं आणि आग्र्याला पाठविण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर करण्यात आलं. मुहम्मद कुलीखान असं नाव आणि तीन हजाराची मनसब त्यांना देण्यात आली. आणि मग त्यांना काबूल-कंदहारला पाठविण्यात आलं. तेथून पळून जाण्याचा त्यांनी दोनदा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळेस त्यांना पकडण्यात आलं. 1676मध्ये दिलेरखानाच्या सैन्याबरोबर ते दक्षिणेत आले. आणि संधी मिळाली तसे ते मुगलांकडून शिवाजी महाराजांकडे परतले. नंतर त्यांची शुद्धी करण्यात आली आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आलं. "जेधे शकावली'नुसार ""शके 1598 नळ संवत्सर, आषाढ वद्य चतुर्दशी (11 जून 1676) नेताजी पालकर याने प्रायश्‍चित्त घेतले आणि ते शुद्ध झाले.''

शिवाजीने नेतोजीची शुद्धी केली ही कथा जाणीवपूर्वक उच्चरवाने सांगितली जाते. पण शुद्धी महाराजांनीच केली याला कसलाही कागदोपत्री पुरावा नाही! की नेतोजी मुगलांकडून परतल्यानंतर महाराजांनी त्यांना आपल्या नोकरीत ठेवल्याबद्दल कोणतीही कागदपत्रं उपलब्ध नाहीत! "शिवचरित्र साहित्य' खंड 3 मधील काही पत्रांनुसार इ.स. 1690च्या सुमारास, म्हणजे संभाजीराजांच्या मृत्युनंतर स्वराज्य संकटात सापडले असताना नेतोजी परत मुगलांना सामील झाल्यासारखा दिसतो. शिवाजीराजांनी इंदापूरच्या मशिदींची वतनं बंद केली होती. ती त्यांनी परत सुरू केली. यावेळी ते मुगल मनसबदार झालेले असावेत.

राजवाडे खंडात एका पत्रात नेतोजीबद्दल आणखी माहिती मिळते. शंकराजी नारायण सचिव यांनी बाजी सर्जाराव जेध्याला लिहिलेल्या या पत्रात असं म्हटलं आहे, की ""औरंगजेब पातशहाने या देशीचे कित्येक मुसलमान करावे ऐसे केले आहे. त्याउपर नेतोजीराजे.... घाटगे, जानोजीराजे यासहित कित्येक ब्राह्मणांसही मुसलमान केले आहे.'' हे पत्र 1690 मधील आहे. यातील नेतोजीराजे म्हणजे नेतोजी पालकर आणि जानोजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे जावई जानोजीराजे पालकर!

म्हणजे काय तर खुद्द शिवाजी महाराजांचे व्याही आणि जावई हे दोघे धर्मांतर करून मुसलमान झाले होते!!

नेतोजी पुढे नांदेडजवळ वारले. त्यांच्या वारसांकडे अनेक मुगल फर्मानं मिळाली आहेत.

संदर्भ -
- इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998.
- छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी, एनबीटी, सहावी आवृत्ती 2004, पृ. 79.

नेतोजी पालकर यांच्या जन्मगावाविषयी - http://www.giridarshan.com/forts/Irshalgad/Irshalgad2.html

वाघ्याच्या स‌माधीची गोष्ट


छत्रपती शिवाजी महाराजांचा कृष्णा घोडी आणि वाघ्या कुत्र्यावर फार जीव होता. ही दोन्ही जीवाला जीव देणारी इमानी जनावरं. त्यातही वाघ्याच्या स्वामीनिष्ठेची कथा काय वर्णावी! महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर दुःखाने वेड्यापिश्‍या झालेल्या वाघ्याने राजांच्या चितेवर झेप घेतली आणि आपलं जीवन संपवलं. मराठ्यांच्या इतिहासात या मुक्‍या जनावराची स्वामिनिष्ठा सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे. आजही धन्यावरील इमानाचा, श्रद्धेचा दाखला देताना वाघ्या कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं. धन्य तो वाघ्या! (यासंदर्भातील एक बातमी आहे. जरूर पाहा - http://dogsinthenews.com/issues/0207/articles/020705b.htm)

पण ही वाघ्याची कथा खरोखरच खरी आहे? खरेच असा कुत्रा महाराजांकडे होता? त्याने खरेच महाराजांच्या चितेवर झेप घेऊन प्राणार्पण केलं? आणि हे जर खरं नसेल, तर मग रायगडावर दाखविली जाते ती समाधी कोणत्या कुत्र्याची आहे? या सवालांचे जवाब मोठे विस्मयकारक आहेत. वाघ्या, त्याचं प्राणार्पण आणि त्याचं स्मारक ही सगळीच एक मिथ आहे. महाराजांच्या अंतकाळच्या वर्णनात ही गोष्ट नाही. या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. शिवकालीन, शिवपूर्व वा शिवोत्तरकालीन कागदपत्रांत कधीही, कुठेही, कोणत्याही कुत्र्याने आपल्या धन्याच्या मृतदेहाबरोबर स्वतःला जाळून घेतल्याचा उल्लेख नाही.

ही कथा आली कोठून? तर कविवर्य राम गणेश गडकरी यांच्या कविकल्पनेतून ही अचाट कहाणी निर्माण झाली. तीही केव्हा, तर राजांच्या निर्वाणानंतर दोन-अडीचशे वर्षांनी. गंमत म्हणजे कुत्र्याच्या समाधीवर जो मजकूर आहे, त्यातच ही कथा गडकऱ्यांच्या "राजसंन्यास' या नाटकावरून घेतली असल्याचा उल्लेख "संदर्भ' म्हणून केलेला आहे.

आता असं जर असेल, तर मग कुत्र्याचे स्मारक तिथं आलं कुठून? याचीही एक (सत्य)कथा आहे. 1918 मध्ये इंग्रजांनी रायगड जिंकला. त्यावेळी त्यांच्या तोफांच्या भडिमाराने गडावरील सर्व इमारती जमीनदोस्त झाल्या. गडाची वाताहत झाली. त्याच वर्षी पेशवाई बुडाली आणि मराठी साम्राज्याचा हा मणिहार, रायगड विस्मृतीच्या काळोखात बुडाला तो पुढील तब्बल 67 वर्षे. 1885 साली इंग्रज गव्हर्नरने रायगडाला प्रथम भेट दिली. त्यावेळी राजांच्या समाधीची दुरवस्था पाहून तो इंग्रज अधिकारी कळवळला. म्हणाला, ""अरे, तुमचा राजा केवढा थोर होता. आणि त्याच्या समाधीची ही अवस्था?'' त्याने समाधीच्या तेलवातीसाठी पाच रुपये काढून दिले. त्यानंतर दरवर्षीच पाच रुपये अनुदान त्याकामी मंजूर करण्यात आलं.

ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या कानावर गेली. त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं. त्यासंदर्भात 1896 मध्ये एक सर्वपक्षीय सभा घेतली. पण पुढं ते काम थंडावलं. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा स्मारक समितीने उचल खाल्ली. स्मारकासाठी निधी जमवायला काही मंडळी इंदूरला होळकरांकडे गेली. पण शिवस्मारकाच्या कामासाठी पैसे देणं हे इंग्रज स्वामींना आवडणार नाही या भयाने हे संस्थानिक स्मारक समितीच्या सभासदांची भेट घेण्याचं टाळू लागले. भेट टाळायची, तर त्यासाठी कारण काय; तर "महाराज सुतकात आहेत'. सुतक कसलं, तर महाराणीसाहेबांचे लाडके कुत्रे साहेब मेले होते त्याचे! समितीच्या सभासदांना तोवर महाराजांची नेमकी काय अडचण आहे हे बरोबर लक्षात आलं होतं. तेव्हा त्यांनी त्यावर एक अफलातून तोडगा सुचविला, की महाराजांनी त्यांच्या लाडक्‍या कुत्र्याच्या स्मारकानिमित्त देणगी द्यावी आणि त्या देणगीचा काही अंश खर्चून समितीने त्या कुत्र्याचा पुतळा उभारावा.

त्यानुसार त्या पैशातील काही भाग खर्चून रायगडावर कुत्र्याचा पुतळा उभारण्यात आला. महाराजांची समाधी म्हणून 1926पूर्वी जो अष्टकोनी चबुतरा दाखविला जातो, ज्यावर नंतर मेघडंबरी बांधली, त्या चबुतऱ्याजवळ जो चौकोनी चौथरा दुर्लक्षिलेल्या अवस्थेत पडलेला होता, त्याची पुनर्रचना करून त्यावर हा होळकरांच्या कुत्र्याचा पुतळा बसविण्यात आला.

संदर्भ -
- "इतिहास - सत्य आणि आभास' - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 98
- "शिवरायांची समाधी आहे कोठे?' - रविवार सकाळ, 28 मे 1995

"कृष्णावतार' बाजीराव!


छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याने जे राज्य स्थापन केलं ते बुडवलं धाकट्या बाजीरावाने. याच्याइतका विलासी, व्यभिचारी, बेजबाबदार आणि अकार्यक्षम राजा संपूर्ण मराठेशाहीत कधी झाला नव्हता.

कसा होता हा पेशवा? कशी होती त्याची दिनचर्या?

तो शनिवारवाड्यात कधी राहात नसे. कारण काय, तर काही लोकांनी त्याच्या मनात अशी भीती भरवली होती, की नारायणराव पेशव्याचं भूत वाड्यात फिरत असतं. त्यामुळे त्याने शनिवारवाडा वर्ज्य केला होता. त्याचा मुक्काम असायचा बुधवारवाडा, शुक्रवारवाडा आणि फूलशहर म्हणजे फूलगाव या ठिकाणी. शिवाय कोथरूडचा वाडा आणि पर्वती अशी ठिकाणंही होतीच. तो ज्या वाड्यात असायचा तिथं दोन-तिनशे वायका नित्य न्हावयास येत असत. हा न्हाण्याचा समारंभ सकाळी सुरू व्हायचा तो दुपारपर्यंत चालायचा. नंतर जेवणाची तयारी झाली, की मनात येईल त्या वाड्यात तो जायचा. त्याच्या पंक्तिभोजनाच्यावेळी या बायका सतत त्याच्याजवळ बसलेल्या असायच्या.

बाजीराव पेशवा बायकांचा इतका शौकिन की त्यासाठी तो त्याच्या आश्रितांची चार-चार, पाच-पाच लग्नं लावून द्यायचा. म्हणजे या आश्रितांनी आपली एक बायको घरी ठेवून बाकीच्या सरकार वाड्यावर पाठवायच्या. अन्याबा राहतेकर हे असेच त्याच्या एका आश्रिताचं नाव. पुन्हा जो गृहस्थ वाड्यावर बायतो पाठवणार नाही त्याच्यावर श्रीमंतांची इतराजी व्हायची. त्यामुळे अब्रुदार लोकांनी वाड्यात जाण्याचं सोडलं. काहींनी तर पुणंही सोडलं.

बयाबाई दातार, सीता शेंडे, काशी दीक्षित, उमा फडके, ताई पेठे अशा सुमारे दोन-चारशे उनाड बायकांचा थवा वाड्यात असायचा. या बायकांशी शिष्ये, पाणके यांचाही व्यभिचार चाले.

या पेशव्याचं जेवण, शृंगार वगैरे झाला की मग हे पर्वतीस वगैरे देवदर्शनास जायचे. तिथं शास्त्री, पंडित आणि भट यांची कचेरी व्हायची. तिथं काय चालायचं, तर कुणी म्हणायचं, की बाजी हा कृष्णावतार आहे! कुणी म्हणायचं, हा शिवाचा अवतार प्रकटला आहे. या अशा दिनचर्येत राज्यकारभाराला वेळ तो काय मिळणार? फार काय, पण साधी दौत आणि लेखणीही वाड्यात उपलब्ध होत नसे. मग बाकीची तर गोष्टच नको. याचा सर्व कारभार बायकांच्या हातून चाले.

या पेशव्याचा खर्चही मोठा असे. त्यत भोजनावळीचा खर्च सर्वात जास्त. पुन्हा ब्राह्मणांना संतुष्ट करण्यासाठी मोठाली दाने दिली जात. त्यामुळे मग फौजफाटा, पागा, हुजुरात, सरदार, मुत्सद्दी यांना पैसा कोठून मिळणार? हा पेशवा सर्व सरदारांचाही व्देष करीत असे.

असं सगळं असल्यावर राज्य जायला किती वेळ लागणार? 1818 मध्ये ते गेलंही.

संदर्भ -
निवडक लोकहितवादी - संपादक - फडकुले-नसिराबादकर, फडके बुकसेलर्स, 1989, पा. 144.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची सत्यकथा

इ. स. 1857 मध्ये भारतातील काही असंतुष्ट संस्थानिक आणि इंग्रज सेनेतील असंतुष्ट सैनिकांनी कंपनी सरकारविरूद्ध बंडाचं निशाण फडकावलं. "शिपायांचं बंड' म्हणून ते ओळखलं जातं. त्या युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने मोठा पराक्रम गाजवला आणि अखेरीस ती शूर स्त्री धारातिर्थी पडली. इंग्रजांनी तिचं संस्थान खालसा केलं, त्यावेळी ती बाणेदारपणे उद्‌गारली होती - ""मेरी झॉंसी नहीं दूँगी!''

1857च्या या बंडला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यात भाग घेणारे सर्वजण स्वातंत्र्ययोद्धे ठरले आहेत. खरं तर त्या बंडाकडे पाहण्याची ही दृष्टीच सदोष आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा त्या कालखंडातला व्यवहार पाहता हेच स्पष्ट होईल, की ही बाई शूर होती. पराक्रमी होती. पण आजच्य अर्थाने ती राष्ट्रभक्त नव्हती. तिला फक्त तिची सत्ता आणि तिचं संस्थान हवं होतं.

पहिल्या बाजीराव पेशव्याने छत्रसालास जी मदत केली, त्याबद्दल छत्रसालाकडून बाजीरावास बुंदेलखंड मिळाला. त्यातील त्यावेळी नेवाळकर घराण्याला मिळालेली जहागिरी म्हणजे झाशी. 1835 मध्ये या घराण्याचा अधिपती रामचंद्रराव याला, संस्थानाने दरवेळी इंग्रजांना जी मदत केली तिचा मोबदला म्हणून "महाराजाधिराज फिदवी बादशहा - जमाइंग्लिश्‍तान' ही पदवी मिळाली व झाशी एक संस्थान बनले.

लक्ष्मीबाईचा पती गंगाधरराव हा इंग्रजांच्या मेहेरबानीने संस्थानाधिपती झाला होता. 1843 साली त्याला राजेपदाचे हक्क मिळाले. लक्ष्मीबाई ही त्याची दुसरी पत्नी. विवाहसमयी तिचं वय 11-12 वर्षांचं होतं आणि मृत्युसमयी (1858) तिचं वय फार तर 23-24 वर्षांचं होतं.

गंगाधरराव 1853 साली वारला. त्यानंतर लक्ष्मीबाईने आपला दत्तक पूत्र दामोदर याला झाशीचा वारसा मिळावा यासाठी कसून प्रयत्न केला. या प्रसंगीचा तिचा मुख्य मुद्दा वंशपरंपरेने आपलं संस्थान इंग्रजांशी किती एकनिष्ठ राहिलं, आपापसात किती प्रेमाचे संबंध राहात आले, यावर बोट ठेवणं हा होता. परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि 1854 साली इंग्रजांनी तिला 60 हजाराचा तनखा मंजूर करून संस्थान खालसा केलं. त्यावेळी तिने ते तिचे ते "मेरी झॉंसी नहीं दूँगी!' हे प्रसिद्ध उद्‌गार काढले असं सांगण्यात येत असलं, तरी त्यावेळी मात्र तिने मुकाट्याने किल्ला खाली करून गावात राहणं पत्करलं. पुढं 57 सालापर्यंत गडबड न करता, अर्ज-विनंत्या-तक्रारी या चक्रात ती फिरत होती. प्रथम तिने पेन्शन नाकारलं. नंतर नाईलाजाने स्वीकारलं.

6 जून 1857 रोजी झाशीचा उठाव झाला आणि लक्ष्मीबाईने झाशीचा कारभार ताब्यात घेतला. पण नंतर तिने या घटनेसंबंधी इंग्रजांना स्पष्टिकरण दिलं आणि मग कमिशनरच्या हुकुमान्वये ती इंग्रजांच्या वतीने झाशीची कारभारीण बनली. फेब्रुवारी 1858 पर्यंत तिने इंग्रजांच्यासंबंधीचं मित्रत्त्वाचं धोरण बदललं नव्हतं असं मानण्यास जागा आहे. मार्चमध्ये इंग्रजी फौजांनी झाशीकडे कूच केलं. त्यावेळीही लक्ष्मीबाईने आपलं म्हणणं इंग्रजांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी ज्यावेळी तिच्यासमोर निश्‍चित स्वरुपात अशी वस्तुस्थिती उभी राहिली की झाशी संस्थान परत मिळणार नाही. इंग्रजांचा आपल्यावर विश्‍वास नाही. त्यांना शरण जाऊन मानहानीकारक जिणं जगावं किंवा फासावर चढावं हा एक मार्ग; किंवा लढून विजय प्रस्थापित करावा अगर हौतात्म्य पत्करावं हा दुसरा मार्ग, त्यावेळी तिने दुसरा मार्ग स्वीकारला आणि इथून पुढं तिने अतिशय शौर्याने लढा दिला.

संदर्भ -
परिचय - नरहर कुरुंदकर, इंद्रायणी साहित्य, 1987, पा. 117-118.

महाराष्ट्राचे मूळ रहिवासी कोण?

ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात अत्यंत प्राचीन काळी कोळी, भोई, महार आणि रठ्ठ यांची वस्ती होती. त्यातही येथे प्रथम महारांची वस्ती असणे व मागाहून भोयांची वस्ती असणे हा त्यांना अत्यंत शक्‍य असा इतिहास वाटतो. ते सांगतात, की म्हारांखेरीज सर्व महाराष्ट्रभर पसरलेली अशी दुसरी जातच प्राचीनकाळी नसावी. या महार आणि दुसऱ्या रठ्ठ या दोन राष्ट्र जातींच्या नामांचा संयोग होऊन "महारठ्ठ' असे रूप तयार झाले आणि त्याचे पुढे "महाराष्ट्रिक', कालांतराने "महाराष्ट्र' असे संस्कृतीकरण झाले. रठ्ठ या शब्दाचा अर्थ राष्ट्र किंवा लोक असाच असावा असं ते सांगतात.

मोल्स्वर्थ यांनीही आपल्या मराठी शब्दकोशात महार या अस्पृश्‍य जातीवरून महाराष्ट्र हे नाव पडले असावे, अशा तऱ्हेचा अर्थ दिला आहे. आणि जॉन विल्सन यांनीही अशाच अर्थाची पुनरावृत्ती केली आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठा ही जात सर्वत्र दिसून येते. मराठ्यांच्या जातीचा रजपुतांशी संबंध असल्याचं दिसून येतं. पण रजपुतांची आडनावं मराठ्यांप्रमाणे महारांमध्येही आढळतात. महारांमध्ये कुलपरंपरा फारशी अबाधित राहिलेली नाही. त्यमुळे निश्‍चित विधान करणं कठीण आहे, परंतु एवढं म्हणता येईल, की महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन लोकांचे वंशज महार हेच असावेत.

आता महार या मूळ जातीवरुन या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडलं हे मत येथील अनेकांना पचायला खूपच जड आहे यात शंका नाही. इतिहासाचार्य राजवाडे, भांडारकर, काणे वगैरे मंडळींनी महाराष्ट्र या शब्दाचं वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण करण्याचे प्रयत्न केले आहेत. परंतु ज्ञानकोशकारांनी आपल्या "प्राचीन महाराष्ट्र' या ग्रंथात सर्व आक्षेप निकालात काढून महार या जातीवरून महाराष्ट्र असं नाव पडलं असा निर्वाळा दिला आहे.

महार पूर्वीपासून स्वतःस "धरतीचे पूत' किंवा "भूमिपुत्र' म्हणवून घेतात. त्याचा अर्थ हा असा आहे.

संदर्भ -
प्राचीन महाराष्ट्र - आदिपर्व + शातवाहनपर्व कुरुयुद्धापासून शकारंभापर्यंत - ज्ञानकोशकार केतकर, वरदा बुक्‍स, दुसरी आवृत्ती, 1989, विभाग 2, पाने - 24 ते 31.

राणी पद्मिनीची भाकडकथा

चितोडची राणी पद्मिनी आणि तिने केलेला जोहार म्हणजे रजपुतांच्या आणि भारताच्या इतिहासातलं तेजस्वी पान आहे. शत्रूच्या, त्याही मुस्लिमधर्मी शत्रूच्या हाती लागून आपल्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून या मानी, तेजस्वी राजपूत कन्येने आत्मबलिदानाचा मार्ग निडरतेने स्वीकारला. म्हणून तिचा तो सर्व इतिहास आजही गौरवाने सांगितला जातो. आजही चितोडमध्ये राणी पद्मिनीने आपल्या वास्तव्याने पुनित केलेला राजमहाल (छायाचित्र पाहा) दाखविला जातो. ज्या सज्ज्यातून अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीचं आरशातलं प्रतिबिंब दाखविण्यात आलं होतं, तो सज्जाही दाखविण्यात येतो. पण....

पण राणी पद्मिनीचा हा इतिहास कधी घडलाच नव्हता! राणी पद्मिनी - जिचं वर्णन या कथेत केलं जातं - अशी कोणी स्त्री इतिहासात झालीच नाही! ही गोष्ट तद्दन काल्पनिक आहे.

पद्मिनीची ही कथा येते ती "पद्मावर्त' या काव्यात. सोळाव्या शतकात मलिक मुहम्मद जायसी याने हे रूपक लिहिलं. त्याने चितोड म्हणजे शरीर, राणा रतनसिंह म्हणजे मन, पद्मिनी म्हणजे शक्ती आणि अल्लाऊद्दीन म्हणजे वासना असं कल्पून हे काव्य रचलं आहे. आज त्याच काल्पनिक कथेला ऐतिहासिक समजून गौरविण्यात येत आहे.

पुराणांना, दंतकथांना इतिहास समजणाऱ्या देशात यापरतं वेगळ काय होणार?

संदर्भ -
इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998

(माहितीसाठी - http://en.wikipedia.org/wiki/Rani_Padmini)

शनिशिंगणापूरचं "रहस्य'!

शनीशिंगणापूर या गावात कोणी चोरी केल्यास, त्या चोराचे डोळे जातात, तो भ्रमिष्ट होतो, असं म्हटलं जातं. शनीची अशाप्रकारे कृपा असल्यामुळे या गावात चोरी होत नाही. आणि म्हणून तेथील घरांना दरवाजे नसतात, असं सांगितलं जातं. घरांना दरवाजे नसणारं गाव म्हणूनच आज हे गाव प्रसिद्ध आहे.

वस्तुतः अहमदनगर जिल्ह्यातलं हे एक साधं खेडेगाव. शेतीवर जगणारं. गरीब. त्याचं भाग्य फळफळण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत झाला तो "टी सिरिज' या कॅसेट कंपनीचा मालक गुलशनकुमार. त्याचं असं झालं, की 1992 मध्ये अहमदनगरमधील पत्रकार अनिल शाह आणि दूरचित्रवाणी निर्माते राम खंकाळ या दोघांनी शिंगणापूरवरचा माहितीपट बनविला होता. तो मुंबई दूरदर्शनवरून दाखविण्यात आला आणि नंतर हिंदीत डब करून तो दिल्ली दूरदर्शननेही प्रसारित केला. हा माहितीपट गुलशनकुमार यांच्या नजरेस पडला. तो पाहून त्यांनी लगेच "सूर्यपूत्र शनिदेव' हा व्हिडिओ तयार केला. या एका व्हिडिओमुळे शिंगणापूरची साडेसाती गेली. आणि आज ते भाविक भारताच्या नकाशावर दिमाखाने झळकत आहे. म्हणजे लोकांना एक उत्सुकता असते, की पाहू या बिनदाराचं हे गाव कसं आहे. त्यातच पुन्हा शनिदेवाचाही दरारा असा श्रद्धाळू मनात असतोच.

पण गंमत म्हणजे शिंगणापूरला चोऱ्या होत नाहीत, हाच मुळात मोठा भ्रम आहे. "श्री शनैश्वर ट्रस्ट'चे सुरक्षा अधिकारी आर. टी. जोंधळे (आता ते या पदावर आहेत की नाहीत हे माहित नाही. ही 1999ची गोष्ट आहे.) सांगतात, की पूर्वी इथं चोऱ्या झाल्याचं ऐकिवात नाही. पण अलीकडे मात्र होतात! परंतु चोऱ्या होत असल्या तरी नंतर चोरीचा माल परत मिळतोच, अशी पुस्ती ते जोडतात. पण त्याने चोऱ्या होतात हे वास्तव शिल्लक राहतंच.

शनिशिंगणापूरच्या पोलिस ठाण्यातलं रेकॉर्ड हेच वास्तव सांगतं, की शनिदेवाच्या या गावात चोऱ्या होतात. नमुन्यादाखल त्या ठाण्यातली चोरीच्या गुन्ह्याची ही नोंद पाहा. - गुन्हा नोंदणी क्रमांक सी. आर. 49/95/आयपीसी 379. गुन्हा दिनांक 29-4-95. बबन सरकारी लोखंडे, रा. शिंपी टाकळी, ता. निफाड, जि. नाशिक यांचे पाच हजार रूपये चोरीला गेले. कुणाची सायकल, कुणाची मोटारसायकल, तर कुणाची रोख रक्कम चोरीला गेली अशा गुन्ह्यांची तिथं नोंद आहे. या अनेक चोऱ्याप्रकरणांमध्ये ज्या काही थोड्या गुन्हेगारांना पकडण्यात आलं आहे, त्यांच्यावर शनिदेवाचा कोणताही कोप झालेला आढळला नाही, की त्यांचे डोळेही गेले नाहीत. फार फार तर त्यांना अटक झाली हाच शनिचा कोप असं कोणी म्हणू शकेल!!

विशेष म्हणजे तिथं चोरी झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात होऊच नये यासाठी खबरदारी घेतली जाते. स्थानिक लोकही चोरी होऊ नये यासाठी खास काळजी घेत असतात. म्हणजे आपल्याकडं काही किमती ऐवज असेल, तर तो ते कुठेतरी स्वयंपाकघरात एखाद्या डब्यात लपवून ठेवतात. घरात कुठेतरी खड्डा खणून त्यात पुरून ठेवतात. घरांना दारं नाहीत तेव्हा अशी काळजी घ्यायलाच हवी ना!

आता शिंगणापूरातील काही घरांना दारं नाहीत, ही वस्तुस्थिती मान्य करायलाच पाहिजे. पण यात श्रद्धेचा भाग अधिक आहे. आणि दुसरी एक बाब म्हणजे, नीट पाहिलं तर लक्षात येईल, की जिथं भेट देणारे भाविक लोक आपल्या मोटारी ठेवतात तिथं जाणीवपूर्वक शटर वा दारे नसलेली सिमेंट कॉंक्रिटची दुकानं अलीकडच्या काळात बांधलेली आहेत. हा अर्थातच शनिशिंगणापूरच्या मार्केटिंगचा भाग आहे.

एकूणच शनिशिंगणापूरबाबत असणारी चोरीविषयक समजूत लोकांचं अज्ञान आणि दैवी अवकृपेची भीती यातून निर्माण झाली आहे. त्यामुळे तिथं काही घरांना दारं नाहीत हीही वस्तुस्थिती आहे आणि तिथं चोऱ्या होतात व चोरी करणारांचे डोळे जात नाहीत की ते भ्रमिष्ट वगैरे होत नाहीत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.


संदर्भ -
Stairway to Heaven - Vinita Deshmukh, Indian Express, Flair, Sept 27,1998.
सत्य लपविण्याचे कारस्थान ही गैरवर्तणूक नाही काय? - टी. बी. खिलारे, रूची, मे 99, पा. 22 ते 24.

बातमी -
शनि शिंगणापूरला चोरी झाल्याच्या घटनेची एक बातमी २६ ऑक्टोबर २००९ रोजी लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली आहे. ई-सकाळवरील सदर बातमी -

शनिशिंगणापूर येथे चोरी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:15 AM (IST)
सोनई- "घर असून दरवाजा नाही. येथे कुलपाचा वापर होत नाही. असे असूनही येथे चोरी होत नाही,' असे मुलखावेगळे गाव म्हणून जगात ख्याती असलेल्या शनिशिंगणापूर येथे आज गुडगाव (हरियाणा) येथील भाविकाचा 35 हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली. दरम्यान, आमची श्रद्धा आहे, चोराला शिक्षा होणारच, असा विश्‍वास येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गुडगावच्या मंजूल सहरावत यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

शिर्डीतून एका एजंटाने आम्हाला प्रवासी जीपमधून शनिदर्शनासाठी आणले. गावातील बानकर वाहनतळ येथील हॉटेल वैष्णवीसमोर वाहन थांबवून ओल्या वस्त्राने दर्शन करण्याचा आग्रह केला. रामभरत राठोड व कुलभूषण यादव यांच्यासह दर्शनाला गेलो असता, आम्हाला मंदिरात सोडून एजंटाने वाहनात ठेवलेल्या कपड्यातून मोबाईल, कॅमेरा व रोख रक्कम असा 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

"चोराला शिक्षा होणारच'
देवस्थान विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब दरंदले यांनी या घटनेनंतर सांगितले, ""चोरीच्या या घटनेने शनिशिंगणापूरचे भाविक दुखावले गेले असले, तरी ग्रामस्थांची श्रद्धा कायम आहे. या प्रकारातील चोराला निश्‍चितच धडा मिळेल. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना "एजंटावर कारवाई करा,' असा आदेश दिला. मात्र, कारवाई न केल्यामुळेच चोरीची घटना घडली. बाहेरील लोक येथे येऊन भाविकांना दमदाटी, लूटमार, सक्ती मोठ्या प्रमाणात करतात. गावातील संबंध जपण्यासाठी पोलिस येत नाहीत. मात्र शनिशिंगणापूरचे पावित्र्य जपणे हे येथील ग्रामस्थांवर झालेले पिढ्यान्‌पिढ्यांचे संस्कार आहेत. ते कायम राहतील.''

दरम्यान, उपाध्यक्ष सुरेश बानकर यांनी सांगितले, ""येथे चोरी होत नाही. केल्यास त्याला लगेचच शिक्षा होते, असा इतिहास आहे. मात्र, झालेली शिक्षा कोणताच चोर पुढे येऊन सांगत नाही.''

श्रद्धा कायमच राहणार
शनिशिंगणापूर येथे चोरी होत नाही, अशी श्रद्धा आहे. मात्र येथे भाविकांची वेगळ्या मार्गांनी लूट होत असते. यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी, "चला चोरी करायला शनिशिंगणापूरला,' अशा रूपकात्मक आंदोलनाचा इशारा दिला होता. आता तेथे चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्याने या गावाविषयीची श्रद्धा कमी होऊ नये, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. चोरी करणाऱ्यांना शिक्षा होतेच, असा विश्वासही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.