शिमगा : इतिहासाच्या पानांतून...

रंगोत्सव, १८५५
एका संवत्सराचा अंत आणि दुस-याचा आरंभ समारंभपूर्वक साजरा करण्याचा सण म्हणजे होळी. हाच शिमग्याचा सण. सीमग या शब्दापासून सीमगा आणि त्यापासून शिमगा असा हा शब्द तयार झालेला आहे. याचा अर्थ सीमग म्हणजेच सीमेप्रत आलेल्या सूर्याचा सण
हे नीट समजून घेतले पाहिजे. वेदांमध्ये वर्षारंभ वसंतापासून सुरु होतो. वर्षारंभ उत्तरायणाच्या आरंभी करावा असे धर्मशास्त्रांत सांगितले आहे. हल्ली उत्तरायण पौषात सुरू होते. पण सुमारे सहा हजार वर्षआंपूर्वी उत्तरायण फाल्गुनी पौर्णिमेस होत असे. या पौर्णिमैस सूर्य नक्षत्रचक्रांत दक्षिण दिशेच्या सीमेवर जाऊन उलटतो म्हणून तो सीमग म्हणजेच सीमेपाशी आलेला दिसला. एकंदर होळी म्हणजे फाल्गुनोत्सवच. हा सण चालतो पंचमीपर्यंत. म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होळी असते. वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी केली जाते आणि वद्य पंचमीला रंगोत्सव
या होळीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. होलिका ही लहान मुलांना खाणारी राक्षसीण. तिला गावक-यांनी जाळून मारले, याचे प्रतिक म्हणून होळी असे सांगितले जाते. महाराष्ट्रात हा सण तर दिवाळीपेक्षाही जुना असल्याचे सांगितले जाते. नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोक कर्नाटक आणि आंध्र प्रांतातून महाराष्ट्रात आले होते. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात त्यांच्या वसाहती होत्या. हे सारे गोपालक. गुरांचे मोठमोठे कळप असायचे त्यांच्याकडे. त्या गुरांचे शेण एकत्र साठविले जायचे आणि ते वर्षातून एकदा जाळायचे अशी प्रथा या लोकांनी सुरू केली होती. याच प्रघातातून होळीच्या सणाची सुरुवात आपल्याकडे झाली असे विद्वानांचे मत आहे
हा सण तसा देशव्यापी. पण प्रांतानुसार त्याच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. म्हणजे आज आपण जी रंगांची होळी साजरी करतो, ती काही मूळ महाराष्ट्राची नाही. ती आपल्याकडे आली उत्तरेतून. त्याची काही कारणे आहेत इतिहासात आणि काही आहेत हिंदी चित्रपटांत. आपल्याकडे खरे महत्त्व असते ते होळी पेटविणे आणि धुळवड यांना
पूर्वी कसा साजरा केला जायचा हा सण? याचे उत्तर आपल्याला मिळते प्राचीन ग्रंथांतून