मद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)

वैदिक धर्मशास्त्रामध्ये मद्यपान निषिद्ध मानण्यात आले आहे. मनुने तर मद्य जाणताच काय, पण अजाणतासुद्धा पिऊ नये अशी आज्ञा दिली आहे.
धार्मिक हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत पवित्र आणि पूज्य असलेल्या अशा मनुस्मृतीमधील ही आज्ञा आहे. तेव्हा तिचे महत्त्व लक्षात यावे. हा ग्रंथ स्थूलमानाने इ.स. २०० ते ३०० या काळातला आहे. मौर्य सम्राट ब्रहद्रथ मौर्य याचा त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने खून केला आणि स्वत:ला सम्राट म्हणून घोषित केले. त्याच्या काळात वैदिक धर्माला खूप चांगले दिवस आले. मनुस्मृती ही त्या शुंगकाळातली. हिंदूंचे धर्म कायदे त्यात सांगितले असल्याने तो अतिशय महत्त्वाचा ठरतो, तर या ग्रंथाने दारू पिणे हे पाप असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मते-
सुरा वै मलमन्नानां पाप्मा च मलमुच्यते
तस्माद् ब्रा’राजन्यौ वैशच्य न सुरां पिबेत्
(मनु. ११.९३)

दारू म्हणजे अन्नाचा मळ. आणि मळास पाप म्हणतात. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी दारू पिऊ नये. शूद्रांबाबत येथे मनू काही सांगत नाही. त्यांचे मद्यसेवन त्याने दुर्लक्षिले आहे. ब्राह्मणांना मात्र तो सूट देण्यास तयार नाही. कारण ज्या ब्राह्मणाच्या देहातील वेदज्ञान एकदासुद्धा दारूत बुडते त्याला शूद्रत्व प्राप्त होते (मनु. ११.९७), असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्राह्मणाने दारू जाणूनबुजून तर पिऊच नये, पण अज्ञानाने प्यायली तरी त्याला मनुने कडक प्रायश्चित्त सांगितले आहे.