तुका लोकी निराळा - तुलसी आंबिले


संत तुकाराम यांच्या दोन प्रतिमा आहेत. एक लोकप्रिय. समाजमनात ठसलेली. त्यातले तुकाराम म्हणजे भोळेभाबडे. व्यवहारशून्य आणि त्यामुळेच परिस्थितीने गांजलेले. तशात बायको कजाग कर्कशा. ती प्रत्यक्ष विठ्ठलालाही शिव्या घालते म्हटल्यावर तुकोबांची काय पत्रास? त्यामुळे घर सोडून रानोमाळ, भंडा-यावर वगैरे जाऊन अभंग म्हणत बसणारे. त्यांच्या कविता मात्र उत्तम. त्यामुळे तुकाराम प्रसिद्धीस पावले. अशा संतांच्या आयुष्यात एक तरी चमत्कार असावाच लागतो. नमस्कारासाठी त्यांना ती अर्हता प्राप्त करावीच लागते. त्यामुळे दाऊ नेणे जडीबुटी। चमत्कार उठाउठी।। म्हणणा-या तुकोबांच्या जीवनातही दोन-तीन चमत्कार टाकण्यात आलेच. वह्यांचा, सदेह वैकुंठगमनाचा. ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वदवून, वेद तर काय रेडाही घोकू शकतो, हे दाखवून दिले. तुकोबांनी गाईचे वळ आपल्या अंगावर घेतले. चित्रपटांत असे चमत्कार नक्कीच टाळ्या घेतात. अशा चित्रपटांनी, कादंब-यांनी आणि गल्लाभरू कथेक-यांनी निर्माण केलेली ही तुकारामांची एक प्रतिमा.

त्यांची दुसरी प्रतिमा आहे ती मात्र नेमकी याच्या उलट आहे. तेथील तुकाराम भोळाभाबडा नाही. परिस्थितीने गांजलेला आहे, खटनाठाळांमुळे त्रासलेला आहे, प्रपंचातून मन उडालेला आहे, पण तो हरलेला नाही. सत्यासाठी हिमतीने उभा राहणारा असा तो उंच सुळका आहे. त्या काळात सामाजिक दंभ आणि छळवादी पुरोहितशाही याविरोधात नैतिक बंड करायचे, तर माणूसही तेवढाच ताकदीचा हवा. तुकोबा तसा ताकदीचा पाईक आहे. उजळावया आलो वाटा। खरा खोटा निवाड।। असा आत्मविश्वास पेलणे हे येरागबाळ्यांचे काम नोहे. तुकोबांमध्ये ते आत्मबळ आहे. आम्ही झालों गांवगुंड। अवघ्या पुंड भूतांसी।। असा लढाऊ बाणा आहे. आणि मीचि मज व्यालों। पोटा आपुलिया आलों।। अशी मुक्तीची स्थिती आहे. शब्दाची च रत्ने आणि शस्त्रे असलेल्या गाथ्यातील अभंगांतून आपल्यासमोर येते ती ही प्रतिमा. तुकोबांच्या कवितांची अनेक वैशिष्ट्ये समीक्षक मंडळी सांगतील. पण त्यातील एक वैशिष्ट्य मोठे वेधक आहे. ते असे, की या सगळ्या कविता एकत्र केल्या, त्यातील बिंदू जोडले, की तुकोबांचे एक मोठेच्या मोठे चरित्रचित्र आपल्यासमोर उभे राहते. तुकोबा म्हणतात – अनुभवे आले अंगा। ते या जगा देतसे।। तेव्हा गाथा हे तुकोबांचे आत्मचरित्रच जणू. बरे तुकाराम म्हणजे निवृत्तीनंतर प्रकाशकाकडून भरपूर पैसे घेऊन आत्मचरित्र लिहिणारे सनदी अधिकारी नसल्याने त्यांच्या आत्मचरित्रावर विश्वास ठेवण्यास हरकत असायचे कारण नाही.     

पण तुका आकाशाएवढा म्हणता म्हणता आपण त्यांची ही प्रतिमा नेहमीच डोळ्यांआड केली. तुकोबा नावाचे हे आकाश दिठीच्या चिमटीत न मावणारे आहे हे खरे. पण त्याचा जो तुकडा आपणांस दिसला तोही नेमका असा वेडावाकुडाच का असावा? तुकोबाला भोळाभाबडा रंजलेला गांजलेला संत म्हणून उभा करण्यातून आपण त्यांच्या गाथ्यावरच अन्याय करीत आहोत हे आपल्या लक्षात कसे आले नाही? की जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले? बहुधा तसेच असावे. अन्यथा उठता-बसता तुकयाचे अभंग गाणा-यांतील अनेकांना त्यातील खरा अर्थ लक्षात आल्याशिवाय राहिला असता काय? तो टाळून मंडळी तुकारामांना भेटतात याचा अर्थ उघड आहे. त्यात मोठा घोटाळा आहे. तो नेमका काय आहे हे जाणून घेतानाच तुकारामांच्या अभंगांतील अर्थाला आजच्या काळाच्या संदर्भात भिडण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हे सदर. आता प्रश्न असा येतो, की हे करण्याची आवश्यकता काय? तुकारामांनी त्यांच्या अभंगांतून त्यांचे जे चरित्र मांडले, त्यातून जे पाठ दिले त्याच्या अर्थाशी भिडून आजच्या काळात आपण काय कमावणार आहोत? याचे उत्तर तुकारामांचे आपल्या समाजातील जे स्थान आहे त्यामध्ये दडलेले आहे.

पंढरीच्या वारीचा इव्हेन्ट आणि तुकारामांच्या वा अन्य सर्वच संतांच्या पालख्यांचा सोहळा करण्याच्या नादात आपण हे विसरूनच गेलो आहोत की गेल्या सुमारे आठशे वर्षांपासून महाराष्ट्र समाज-संस्कृतीची पालखी हे संत वाहात आहेत. संताळ्यांनी परमार्थाच्या नादी लागून महाराष्ट्राला पंगू करून टाकले असे इतिहासाचार्य राजवाडे यांनी कितीही म्हटले तरी एक गोष्ट आता सर्वांनाच समजून चुकली आहे ती ही, की तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्राच्या पाचवीला पुजलेल्या अंदाधुंदीतून समाजाची व्यवस्था लावून देणे या महत्त्वाच्या सामाजिक कार्यात संतांचा थोरला वाटा आहे. महाराष्ट्रातील भागवत धर्मातील संतांच्या या इमारतीचा कळस म्हणजे तुकाराम. त्यांनी त्यांच्या सुमारे साडेचार हजार अभंगांतून, कवितांतून सामाजिक नैतिकतेचा, बंडखोरीचा जो आदर्श घालून दिला आहे त्यावर आजही मराठी समाज-संस्कृतीचा गाडा चाललेला आहे. साध्या रोजच्या व्यवहारातील बोलीभाषेचा वापर करून त्यांनी रचलेले हे काव्य. ते आजही सर्वसामान्यांच्या नैतिक आधाराच्या कामी येते. एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी कसे वागावे, कसे बोलावे हे ते सांगते. ही शिकवण जेवढी पारमार्थिक आहे, धर्माचा व्यवहार उलगडून दाखविणारी आहे, तेवढीच ती रोकडी व्यावहारिकही आहे. आणि म्हणूनच तिच्या मूल्यात कणमात्र घसारा झालेला नाही. ते सतराव्या शतकात जेवढे होते, तेवढेच आजही आहे.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।
अंतर्बाह्य जग आणि मन।।
हा त्याच काळातील संघर्ष होता असे नव्हे. तो आजही आहे.
वर्ण अभिमाने कोण जाले पावन।
ऐसे द्या सांगून मजपाशी।।


हा प्रश्न त्याच काळातील होता असे नव्हे. तो आजही आहे. फरक असेल तर कदाचित एवढाच, की आजच्या काळात हे असे प्रश्न अधिक गडद झाले आहेत. संत तुकारामांचे गाथाकृत चरित्र समजून घेत त्यांच्या या शिकवणीचा ऊहापोह आपण येथे करणार आहोत. त्याने जेथे जातो तेथे पडतो मतोळा (घोटाळा) ही माहिती-तंत्रज्ञानयुगजन्य समस्या दूर होण्यासही कदाचित साह्य होईल. तुकाराम तेवढे अप टू डेट नक्कीच आहेत.

(http://www.loksatta.com/lokrang-category/tuka-loki-nirala/)




संतांच्या अनेक खुणा अनेकांनी सांगितल्या आहेत. पण त्यातील एक खूण मात्र नीट ध्यानी घेतली जात नाही. ती म्हणजे बंडखोरी. संत सारेच बंडखोर असतात. असावयास हवेत. तुकाराम तसे होते. खरेतर ते म्हणजे बंडखोरांतले बंडखोर. प्रस्थापितांच्या विरोधात तुकाराम नेहमीच उभे राहिल्याचे दिसतात. ही अर्थातच त्यांच्या विष्णुपंत पागनिसी रूपड्याच्या विरोधातील प्रतिमा आहे. पण गाथ्यातून उभे राहणारे तुकाराम असेच आहेत. नाठाळपणा कराल तर डोक्यात काठी घालणारे. कोणाचीही भीडभाड न बाळगणारे. धट. फटकळ. बरे पुन्हा अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली।। असे सतराव्या शतकात ते म्हणत आहेत. तेव्हा हा नुसता फटकळपणा नसतो, तर त्यामागे प्रचंड हिम्मत असते. नैतिक ताकद असते. तुकारामांचे चरित्र आणि विचार समजून घेताना, त्यामागील ही नैतिक ताकद कदापि विसरता येणार नाही.

तुकोबांच्या या विचारांमागे एक सूत्र आहे. त्याची एक कडी इतिहासात जोडलेली आहे आणि दुसरी तेव्हाच्या व्यवस्थेत. या इतिहासाला प्रारंभ होतो तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात. हा महाराष्ट्रातील संतचळवळीच्या प्रारंभीचा काळ. या काळात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. राजा रामदेवराय राज्य करीत होता. हा मोठा कर्ता पुरुष. थेट काशीपर्यंत जाऊन ते तीर्थ जिंकणारा. वैदिक धर्माभिमानी. आपल्या देशीकार लेण्यात ज्ञानदेवांनी त्याचा तेथ यदुवंशविलासु। जो सकळकळानिवासु। न्यायातें पोषी क्षितीशु। श्रीरामचंद्रु।। असा उल्लेख केला आहे. हेमाद्रीपंडीत त्याचा मंत्री. चतुर्वर्गचिंतामणी हा त्याचाच ग्रंथ. त्याच्या व्रतखंडात सुमारे दोन हजार व्रतांची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. आता एवढी व्रतवैकल्ये करणारा समाज केवढा सुखसंपन्न असणार! रामदेवरायाच्या संपन्नतेची कल्पना फेरीस्ता या बखरकाराने केलेल्या एका उल्लेखातून येते. १२९४ ला अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाकडून ६०० मण मोती, २०० मण हिरे-माणके-पाचू वगैरे, एक हजार मण चांदी, चार हजार रेशमी तागे, याशिवाय अगणित मौल्यवान वस्तू खंडणीस्वरूपात नेल्या असे फेरिस्ताने लिहून ठेवले आहे. पण हे वरवरचे चित्र आहे. अगदी आजच्यासारखेच. त्यातून सत्ताधा-यांचे वैभव दिसते. सर्वसामान्यांची अवस्था मात्र तेव्हाही वाईट होती. ज्ञानेश्वरी हा काही समाजशास्त्रीय ग्रंथ नाही. पण त्यातला कुळवाडी रिणे दाटली हा उल्लेख तत्कालीन समाजाबद्दल बरेच काही सांगून जातो. तत्कालीन महानुभावांच्या साहित्यातही तेव्हाच्या नागरिकांचे दरिद्री जीणे कोठे कोठे डोकावून जाते. एकंदर एकीकडे संपन्न सत्ताधारी वर्ग – जो प्रामुख्याने वैदिक धर्मानुयायी, उच्चवर्णीय होता, दुसरीकडे कर आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली प्रजा आणि तिसरीकडे सनातनी वैदिक धर्माला आलेला बहर असा तो समाज होता. या बहराची साधी कल्पना करायची असेल तर ज्ञानदेवांचे चरित्र डोळ्यांपुढे आणावे. त्यांच्या माता-पित्याला घ्यावे लागलेले देहान्त प्रायश्चित्त, निवृत्ता-ज्ञानदेव-सोपान-मुक्ता या बालकांची ससेहोलपट नजरेसमोर आणावी. संतांच्या चळवळीला प्रारंभ या अशा वातावरणात झालेला आहे.

सर्वसामान्यांचे जीवन बद्ध करणा-या, व्रतवैकल्यांचा बुजबुजाट असलेल्या, बहुसंख्यांचे जगणे नरकप्राय करणा-या वैदिक धर्माविरोधात तेव्हा आधी चक्रधरांनी बंड पुकारले. हेमाद्रीपंडिताने १२७४ मध्ये त्यांची हत्या केली. (त्यानंतर ते जिवंत झाले व उत्तरपंथास गेले अशी महानुभावांची मान्यता आहे.) या हत्येचे कारण चक्रधरांनी वर्णविषमतेविरोधात ठोकलेले दंड होते हे उघडच आहे. स्रियांच्या मासिक धर्माचीही अस्पृश्यता न मानणारा हा महात्मा. लीळाचरित्रातील त्यांचे हे विचार आज तर मुद्दामहून मुळातून पाहण्यासारखे आहेत. सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा वीटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’ एकविसाव्या शतकालाही जड जाणारा हा विचार तेराव्या शतकातला आहे हे पाहिले की त्याची धग किती मोठी असेल हे लक्षात येते. अशीच आग दिसते ती नामदेवांमध्ये. ज्ञानदेवांवर तत्कालीन ब्रह्मवृंदाने शूद्रत्व लादले होते. नामदेव जन्माने शूद्र. जन्मजात विषमतेचे बळी. ही क्रूर विषमता ज्या सनातनी वैदिक धर्मातून आली त्या विरोधात ते उभे राहिले. कुश्चळ भूमीवरी उगवली तुळशी। अपवित्र तियेसी म्हणों नये। नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देऊं नये। असे बजावत त्यांनी मराठी मातीत भक्तीमार्गाची पताका रोवली. या भक्तीमार्गाने आव्हान दिले होते ते एकीकडे तेव्हाच्या ब्राह्मणशाहीला आणि दुसरीकडे वाढत्या इस्लामी आक्रमणाला. क्षुद्र देवतांची उपासना, तीर्थक्षेत्रांना जाणे, कर्मकांडांत रमणे यांत अजिबात अर्थ नाही, असे सांगणे याचा अर्थ पुरोहितवर्गाचा पाया डळमळीत करणे असाच होता. नामदेव तेच करीत होते. तुकोबांना वारसा लाभलेला आहे तो या इतिहासदत्त बंडखोरीचा. नामदेवें केलें स्वप्नामाजी जागेअसे आपल्या काव्यप्रेरणेविषयी बोलताना तुकाराम सांगतात तेव्हा त्याचा अर्थ हा असतो.

नामदेव आणि तुकोबा यांच्यात तीन शतकांचे अंतर आहे. या काळात महाराष्ट्रातील नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेले. या मधल्या काळात येथील समाजजीवनाचा पुरता –हास झाला होता. एकीकडे इस्लाम प्रबळ होत होता. धर्मांतराला ऊत आला होता. अनेक ब्राह्मणही मुसलमानांचे दास बनले होते. अनेकांनी इस्लाम स्वीकारला होता. पंधराव्या शतकात व-हाडात इमादशाहीची स्थापना झाली. त्याचा संस्थापक होता फतहुल्ला नावाचा सरदार. तो मूळचा तैलंगी ब्राह्मण. निजामशाहीचा संस्थापकही मूळचा ब्राह्मणच. त्याचे मूळ नाव तिमाभट. व-हाडच्या पाथरी गावचा भैरव कुलकर्णी याचा तो मुलगा. ही काही वानगीदाखल उदाहरणे. अशा प्रकारे इस्लाम स्वीकारावा, मुस्लिम राज्यकर्त्यांची सेवा करावी हा तेव्हाच्या ब्राह्मण, क्षत्रियांचा परमधर्म बनलेला असतानाच सनातनी वैदिक धर्म पुन्हा प्रबळ होऊ पाहात होता. समाजजीवनात भ्रष्टता दाटून आली होती.

ऐसे धर्म जाले कळी । पुण्य रंक पाप बळी।।
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर।।
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासीं तोडी।।
अवघे बाह्य रंग । आत हिरवे वरी सोंग।।

हे तेव्हाचे समाजचित्र होते. अशा काळात तुकारामांचा उदय होणे ही, आज वाटते, एक प्रकारची अपरिहार्यताच होती. समाजाला ग्लानी येते तेव्हाही असे महापुरूष जन्मास येतच असतात.
तुकारामांनी स्पष्टच म्हटले आहे –
उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाड ।।
तुकोबांनी उजळविलेली वाट मुळात होती कशी हे पुढच्या लेखात पाहू. इतिहासाची कडी थोडक्यात समजून घेतल्यानंतर दुसरी कडी जी तत्कालीन व्यवस्थेची, ती समजून घेणेही महत्त्वाचे आहे.

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/saints-tukaram-1193423/)




सतराव्या शतकाचा प्रारंभीचा काळ. मुहमद तुघलक याच्या पदरीच्या गंगू ब्राह्मणाचा चाकर जफरखान उर्फ हसन याने स्थापन केलेल्या बहमनी साम्राज्याचे कधीच विघटन झाले होते. निजामशाही, आदिलशाही आणि कुत्बशाही एकमेकांशी आणि दिल्लीशी झगडत होती. तो सत्तेचा लढा होता. पण शिया विरुद्ध सुन्नी असेही त्याचे एक रूप होते. त्यात मराठे सरदार कधी याची तर कधी त्याची चाकरी करीत होते. निजामशाहीत मलिक अंबर सर्वसत्ताधीश झाला होता आणि तो मुघलांबरोबर लढत होता. तशात १६०५ मध्ये अकबराचा मृत्यू झाला. जहांगीर सत्तेवर आला आणि त्याने पुन्हा दक्षिणेकडे लक्ष वळविले. १६०८मध्ये त्याने खानखानान याला दक्षिणेच्या बंदोबस्तासाठी पाठविले. अहमदनगर हे त्याचे एक लक्ष्य होते. त्य भोवतीचा अवघा परिसर रणभूमी झाला होता. देहू नावाचे एक छोटेसे गाव हे त्याच युद्धछायेतले. तेथे १६०८मध्ये तुकारामांचा जन्म झाला.

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग असे तुकाराम म्हणतात, तेव्हा ते केवळ त्यांच्या आंतरिक संघर्षाबद्दलच नसते, तर ते या युद्धलिप्त परिस्थितीबद्दलही असते. हा युद्धाचा प्रसंग कसा होता? गनिमाची टोळधाड यावी आणि गावेच्या गावे, शेतेच्या शेते उद्धवस्त करून जावी. पिकल्या वावरांत घोडे घालावेत. उभी पिके कापून न्यावीत. कणग्या लुटून न्याव्यात. जुलूम-जबरदस्ती करावी. बाया बाटवाव्यात. शत्रूची अशी रहदारी झाली की काय होई याची कल्पना शिवकालीन पत्रसारसंग्रहातील एका पत्रावरून यावी. त्यात पिंपळगावचा पाटिल लिहितो –
साल गुदस्ता मोगली गावावरी धावणी करून गाव मारिला. वस्तभाव, गुरेढोरे तमाम गावाचा बंद धरून नगरास आणिला. माणसे, दादले व बाइला व लेकरे यैसी सेदीडसे बंदी राहिली. कितेक बंदीखानी मेली. मग दरम्यान भले लोक होऊन खंडणी होनु २५०० झाडा करणे कुलबंद सोडनुक केली.

अशा परिस्थितीत कसले स्थैर्य आणि कसला धर्म? सारी नैतिकता सत्तेच्या पायी सांडलेली. तुकारामांनी एकेठिकाणी उद्वेगाने म्हटले आहे –
संता नाहीं मान। देव मानी मुसलमान।।
ऐसें पोटाचे मारिले। देवा आशा विटंबिले।।
घाली लोटांगण। वंदी निचाचे चरण।।

हे जनसामान्यांचेच लक्षण होते असे नाही. तत्कालीन ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्येही याच वृत्तीने मूळ धरले होते. तुकयाबंधू कान्होबांनी यावर नेमके बोट ठेवले आहे. - विडे घेऊनी ब्राह्मण आविंदवाणी वदताती, अश्वाचियेपरी कुमारी विकती वेदवक्ते, राजे झाले प्रजांचे अंतक. ब्राह्मण अविंदवाणी बोलतात. वेद सांगणारे घोड्यांप्रमाणे मुलींची विक्री करतात. ज्यांना राखावयाचे तेच प्रजेचे मारेकरी झाले आहेत. आणि सर्वसामान्यांचा व्यवहार कसा होता? तुकयाबंधू सांगतात – पिते पुत्र सहोदर एकाएक। शत्रुघातें वर्तती।। कुटुंबव्यवस्थेची अशी दैना झाली होती. पुत्र ते पितियापाशीं। सेवा घेती सेवका ऐसी।। सुनांचिया दासी। सासा झाल्या आंदण्या।। एकंदर असत्यासी रिझले जन ही तेव्हाची समाजगत होती.

याच काळात हिंदु धर्मात पंथापंथांचा गल्बला झाला होता. सनातन वैदिक धर्मात कर्मकांडाचा बुजबुजाट होता. वैदिक धर्मासमोर एकीकडून इस्लामचे आव्हान उभे ठाकले होते आणि दुसरीकडून नाथ, महानुभाव, गाणपत्य, शाक्त आदींच्यामागे समाज जात होता. सामान्य लोक सांडूनिया द्विजवर। दावलपीर स्मरताती ही जशी तुकयाबंधुची खंत होती, तसेच ब्राह्मणांतील कित्येक दावलमलकास जाती। कित्येक पीरास भजती। कित्येक तुरूक होती। आपले इच्छेने हा समर्थ रामदासांच्या संतापाचा विषय होता. या विरोधात भक्तीचळवळीने पहिल्यापासूनच आघाडी उघडली होती. एकनाथांसारखे संत हिंदु-तुर्क संवादातून आम्हांसी म्हणता पूजिता फत्तरें। तुम्ही का मुडद्यावर ठेविता चिरे। दगडाचे पूजितां हाजी रे। पीर खरें ते माना।। केवळ जे का मेले मढें। त्याची जतन करतां हाडें। फूल गफल फातरियावरी चढें। ऊदसो पुढें तुम्ही जाळा। असे सांगत हिन्दूकू पकडकर मुसलमान करो। हिन्दू करितां खुदा चुकला। त्याहून थोर तुमच्या अकला। हिन्दुस मुसलमान केला। गुन्हा लावला देवासी। असे बजावत होते आणि इकडे तुकाराम अल्ला देवे अल्ला दिलावे। अल्ला दारू अल्ला खिलावे। अल्ला बिगर नहीं कोय। अल्ला करे सोहि होय। असे सांगतानाच सब रसोंका किया मार। भजनगोली एक हि सार। असा भक्तीमार्गाचा उपदेश करीत होते. मेरी दारू जिन्हें खाया। दिदार दरगा सो हि पाया। हा तुकारामांचा दखनी बोल भक्तीचळवळीच्या आत्मविश्वासातूनच प्रकटला होता. पण तुकारामांपुढचे खरे आव्हान होते ते सामाजिक आणि धार्मिक अनैतिकतेचे.

ही अनैतिकता, हा भ्रष्टाचार, समाजाचा –हास हे सगळे कोठून आले? तुकोबांनाही हा प्रश्न पडलेला आहे. वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य। न करिती विचार कां हिताचा।। समाज असा एकाएकी कोसळून का पडला? त्याला सुलतानी संकटे कारणीभूत होतीच, पण अस्मानी संकटांनीही त्याच्या मूल्यविवेकाचा घात केला होता, ही बाब नीट ध्यानी घेतली पाहिजे. या अस्मानी संकटांचे तुकारामांच्या चरित्रात महत्त्वाचे स्थान आहे.
हे संकट होते थोरल्या दुष्काळाचे. साल होते सन १६३०. शिवजन्माचे.

भेणे मंद झाली मेघवृष्टी। त्याकारणे – अपीक धान्यें दिवसें दिवसें। गाई म्हैसी चेवल्या गोरसें। नगरें दिसती उध्वंसे। पिकली बहुवसे पाखांडे।। असे या दुष्काळाबद्दल तुकयाबंधु सांगतात. डच कंपनीतील एक व्यापारी व्हॅन ट्विस्ट यानेही असेच लिहून ठेवले आहे. – पाऊस इतका अल्प पडला की पेरणी केलेले बी तर वाया गेलेच पण साधे गवतसुद्धा उगवले नाही. गुरेढोरे मेली. शहरांतून आणि खेड्यांतून शेतात आणि रस्त्यांवर प्रेतांच्या राशी पडल्यामुळे इतकी दुर्गंधी सुटली होती की रस्त्यावरून जाणे भयावह होते. गवत नसल्यामुळे गुरेढोरे प्रेतेच खाऊ लागली. रामदास लिहितात – देश नासला नासला!

अशा काळात समाजाला ना नासलेपणाची चिंता असते, ना नितीमूल्यांची काळजी. त्याला कसेही करून जगायचे असते. केवळ तग धरण्याच्या त्या प्रयत्नांतून येथे सामाजिक नीतिभ्रष्टतेचा, अनैतिकतेचा टारफुला फोफावला. 
या दुष्काळाने अवघ्या एकविशीतल्या तुकारामांचे अवघे जगणे विस्कटून टाकले. ते सांगतात - दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली।। लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखे। वेवसाय देखें तुटी येतां।। या दुष्काळाने त्यांचे दिवाळे वाजविले. त्यांचे असे झाले, की – काय खावें आता कोणीकडे जावें। गावांत रहावें कोण्या बळें। कोपला पाटील गांवींचे हें लोक। आतां घाली भीक कोण मज।। आतां येणे चवी सांडिली म्हणती। निवाडा करिती दिवाणांत।। तुकोबा म्हणतात, काय बिटंबना सांगो किती। पाषाण फुटती ऐसे दुःख।

ही तशी वैयक्तिक वेदना. पण व्यक्तीकडून समष्टीकडे, पिंडातून ब्रह्मांडाकडे जातात ते महापुरुष असतात. आपले कौटुंबिक दुःख तुकोबांच्या जीवनी सामाजिक झाले. आणि त्यातून त्यांच्या आयुष्याचा भला थोरला अध्याय सुरू झाला...

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/sant-tukaram-birth-1199206/)



जिवासी उदार जालो आता

थोरल्या दुष्काळाने तुकारामांच्या अवघ्या मनोधारणा बदलून गेल्या होत्या. १६०८ ते १६२९ या काळातले तुकोबा आता राहिले नव्हते. अवघ्या २१-२२ वर्षांचा हा तरूण स्वतःच्या आणि देवाच्या शोधात वेडापिसा झाला होता. सिणलो दातारा। करिता वेरझारा। आता सोडवीं संसारा। पासोनिया।। हे त्यांचे मागणे होते.

तशी तुकारामांची वृत्ती पहिल्यापासूनच भाविक. घरात कुटुंबाच्या मालकीचे विठोबाचे देऊळ. माता-पिता, थोरला बंधु विठ्ठलभक्त. तेव्हा घरातील वातावरण भाविक असणे स्वाभाविकच होते. घरचेच विठ्ठलमंदीर म्हटल्यावर तेथे होणा-या भजन-कीर्तनातील चार शब्द आपसूकच कानावरून जात असणार. पण हे अजून तेवढ्यापुरतेच होते. तुकोबा सांगतात – आरंभी कीर्तन। करी एकादशी। नव्हते अभ्यासी। चित्त आधी।। बाकी हे कुटुंब अन्य चांगल्या सधन, प्रतिष्ठित कुटुंबासारखेच होते. घरात वारसाहक्काने चालत आलेली देहूची महाजनकी होती. ही बाब येथे महत्त्वाची आहे. 

शिवकालातील गावगाड्यात पाटील, कुलकर्णी, चौगुले यांच्याप्रमाणेच शेटे-महाजन हेही महत्त्वाचे पद आहे. गावात पेठ वठवायची जबाबदारी शेटे-महाजनांकडे असे. शेट्यांकडे पेठेची जबाबदारी असे आणि पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम महाजनांकडे असे. पेठेकडून या दोघांना रोकड आणि वस्तूंच्या रूपाने हक्क मिळत असत. याशिवाय त्यांचे (बहुधा आठवडे बाजारात लावावयाचे) दुकानही होते. इनामात मिळालेली १५ एकर बागायती शेती होती. आणि वयाच्या सतराव्या वर्षी माता-पिता गेल्यानंतर, विरक्त होऊन थोरले बंधु घर सोडून गेल्यानंतर तुकोबा हा सारा बारदाना व्यवस्थित सांभाळत होते. ही गोष्ट तुकोबांचा भोळसटपणा दाखवित नाही. त्यातून प्रकट होते ती व्यवहारकुशलता. पुढे एका अभंगात त्यांनी आपल्या या काळातील वर्तनाचे वर्णन केले आहे. ते म्हणतात –
लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष। पत्नी दोनी भेदाभेद। पितृवचनीं घडली अवज्ञा अविचार। कुटाळ कुचरवादी निंद्य।। आणिक किती सांगों तें अवगुण। न वळे जिव्हा कांपे मन। भूतदया उपकार नाहीं शब्दा धीर। विषय लंपट शब्दहीन।।
या शब्दांमध्ये पश्चात्तापदग्धता आहे. अतिशयोक्ती तर नक्कीच महामूर आहे. पण तरीही तुकोबा शेती, व्यापार करीत होते त्याकाळातील त्यांचे वर्तन कसे चारचौघां प्रापंचिकांसारखेच होते याचे प्रतिबिंब त्यातून उमटत आहे. वयाच्या तेराव्या वर्षी, १६२१ ला तुकोबांचा पहिला विवाह झाला. पत्नीचे नाव रखुमाई. तिला दम्याचा विकार होता. त्यामुळे काही वर्षांतच त्यांचा दुसरा विवाह करण्यात आला. या पत्नीचे नाव जिजाई. ती पुण्यातल्या गुळवे सावकारांची कन्या. पहिला विवाह झालेला असूनही पुण्यातले एक सावकार त्यांना आपली मुलगी देतात, याचा अन्वयार्थ तुकोबांच्या या व्यवहारकुशल वर्तनातच शोधावा लागतो.

१६३०च्या दुष्काळाने हे सर्व चित्र पालटले. या अकालाने माणसांचे भूकबळी जात होते, त्यानंतर आलेल्या कॉल-याच्या साथीने माणसे चिलटासारखी मरत होती. पण सत्ताधीशांना त्याची पर्वा नव्हती. अशा आपत्काळात १६३२च्या सुमारास आदिलशाही सरदार रायाराव याने शहाजी राजांच्या मोकाश्यातील पुणे गावातून गाढवाचा नांगर फिरवला. गाव बेचिराग केले. पुण्यापासून देहू अवघ्या १९ मैलांवर. त्याला याची झळ बसली असणारच. तशात १६३३ मध्ये पुन्हा अवर्षण आले. पुन्हा तेच दुःख, तीच दैना झाली. हे सर्व तुकारामांच्या दृष्टीसमोर घडत होते आणि वैराग्य त्यांना खुणावत होते. पडिलो बाहेरी। आपल्या कर्तव्ये। संसाराचा जीवे। वीट आला।। ही त्यांची तेव्हाची भावना होती.

ही पुढची, १६३१-३२ ते १६४० पर्यंतची आठ-नऊ वर्षे म्हणजे तुकारामांच्या परीक्षेचाच काळ. आपल्या अल्पचरित्रात्मक अभंगात या अध्यात्मिक जडणघडणीविषयी ते सांगतात –
सत्यअसत्यासी। मन केले ग्वाही।
मानियेले नाही। बहुमता।।
हाही काळ तसा संघर्षाचाच. आंतरिक आणि बाह्य अशा. तसा तो सर्वांच्याच वाट्याला येतो. पण फक्त काहींना पेलता येतो. या काळात तुकारामांची खरी लढाई सुरू होती ती स्वतःशी, आंतरिक अशांतीशी.
माझिया मीपणावर। पडो पाषाण। जळो हे भूषण। नाम माझे।। किंवा
जाळा तुम्ही माझे। जाणते मीपण। येणे माझा खूण। मांडियेला।।
अशी चकमक सदा सुरू होती. मनासी संवाद आणि आपुलाचि वाद आपणासी सुरू होता. तुका म्हणे बहु। करितो विचार।। उतरे डोंगर। एक चढे।। असे कोणाही अभ्यासकाला सोसावे लागणारे कष्ट. तुकोबाही ते उपसत होते.

भंडा-याच्या डोंगरावरील भामनाथाच्या मंदिरात एकांतवासात ध्यानधारणा करून ते हा लढा लढत होते. वेदना, पश्चाताप, विरक्ती, भक्ती आणि आत्मवेदनेच्या गर्भातून साकारलेली मानवतेबद्दलची असहाय आर्तता ही त्यांची शस्त्रे होती. अध्यात्मातील एकेक गड ते जिंकत होते. त्यांच्या गाथ्यात ठिकठिकाणी याच्या खुणा आढळतात. तुकारामांचे संतत्वात उन्नयन होण्याचा हा काळ. त्याची प्रचिती पुढे त्यांच्या आम्ही वैकुंठवासी। आलो या चि कारणासी।। किंवा आमचा स्वदेश। भुवनत्रयामध्ये वास। या उद्गारांतून येते. हे उद्गार साध्या भजनक-याचे नसतात. माझे लेखी देव मेला। असो त्याला असेल।। ही बंडखोरी भोळ्या भाविकाची नसते. ते जाणत्याचे विचार आहेत.

कृष्णराव केळुसकरांच्या तुकारामबावांचे चरित्रानुसार भंडा-यावरील साधनेनंतर कधी तरी रात्री तुकारामांना नामदेव आणि विठ्ठलाचे स्वप्नात दर्शन झाले. नामदेवांनी त्यांना कविता करण्याची आज्ञा दिली आणि त्यांच्या कवित्वाला प्रारंभ झाला. यातील बराचसा भाग आत्मनिष्ठ भक्तीपर आहे. ते स्वाभाविकच होते. पण तुकोबांच्या बंडखोर मनाला समाजात माजलेला भ्रष्टाचार, धर्माच्या नावाखाली चाललेला अनाचार, हिंसाचार, नीतिशून्यता हे सगळे अस्वस्थ करीत होते. भक्ती चळवळीतून आलेल्या नैतिक शिकवणुकीच्या विरोधात चाललेले सामाजिक वर्तन बोचत होते. हिंदुंचे वेदप्रामाण्य, चालीरिती, कर्मकांड यांचा तीव्र उपहास ते करीत होते. सामाजिक विषमतेवर कोरडे ओढत होते. त्यामागे बुडतां हें जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणऊनि।। हे कारण होते,
धर्माचें पाळण। करणे पाखांड खंडण।।
हेचिं आम्हां करणें काम। बीज वाढवावें नाम।
तीक्ष्ण उत्तरें। हातीं घेऊनि बाण फिरे।
नाहीं भीडा भार। तुका म्हणे साना थोर।।
ही भूमिका होती. आणि करीन कोल्हाळ। आतां हाचि सर्वकाळ।। ही प्रतिज्ञा होती. हे महाराष्ट्रीय समाजाची नवी मनोभूमिका घडविण्याचे काम होते. त्याला विरोध हा होणारच होता.

तुकारामांच्या चरित्रातील हा गाभ्याचा भाग आहे. एकीकडे त्यांचे संतत्व आणि कवित्व खुपणारे धर्ममार्तंड त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत आणि दुसरीकडे ज्या समाजाच्या भल्याची तळमळ त्यांच्या मनाला लागलेली आहे तो विविध पंथांच्या, दैवतांच्या आणि कर्मकांडाच्या नादी लागून भुललेला आहे. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक गुलामीत ज्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत, अशांचा धर्म आणि ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला आहे तो धर्म यांची चकमक आता उडणारच होती.
माझिये मनींचा। जाणा हा निर्धार। जिवासीं उदार। जालों आता।। असे सांगत तुकोबा जनलोकांत उतरले होते. हाती शब्दाचीच शस्त्रे होती आणि अंतरी आपुलिया बळें। नाही मी बोलत। सखा भगवंत। वाचा त्याची। हा आत्मविश्वास होता.
अजून शिवराय शहाजी राजांसमवेत बेंगळुरूला होते. स्वराज्याचे रणशिंग फुंकले जाण्यास बराच अवकाश होता. मराठी मातीतला सामाजिक लढा मात्र पुन्हा एकदा सुरू झाला होता...

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/life-of-sant-tukaram-1205228/)




तेणे जन नाडिले...

सतराव्या शतकातील महाराष्ट्र पाहा. पुरोहितवर्गाचा कर्मठ सनातन धर्म, त्यातून फारकत घेऊन निर्माण झालेले काही पंथ, शूद्रातिशूद्रांचा बहुदेवतात्मक, जादूमंत्रादी आचारावर आधारलेला आदिम धर्म आणि यां सर्वांना आव्हान देत उभा राहिलेला आक्रमक इस्लाम असे तेव्हाचे धार्मिक वातावरण आहे. गोव्यात तोवर ख्रिस्ती धर्माने बस्तान बसविले होते. परंतु त्याची झळ अजून उर्वरित महाराष्ट्रीय भूभागास लागलेली दिसत नाही. सुफी संत आणि मुस्लिम सत्ताधीश यांमुळे मात्र हिंदु धर्मापुढे चांगलेच आव्हान उभे ठाकले होते. तेव्हाच्या हिंदु धर्माची, समाजाची अवस्था काय होती? तुकोबा सांगतात -

ऐसें कलियुगाच्या मुळें। झाले धर्माचें वाटोळें।।
सांडूनिया रामराम। ब्राह्मण म्हणती दोम दोम।।
शिवों नये ती निळीं। वस्त्रें पांघरती काळीं।।
तुका म्हणे वृत्ति। सांडूनि गदा मागत जाती।।

धर्माचे वाटोळे झाले म्हणजे काय झाले, तर ब्राह्मण दावलमलकाचा म्हणजे फकिराचा वेष घेऊन दोमदोम म्हणून भीक मागू लागले आहेत. ज्यांना स्पर्शही करू नये अशी काळीनिळी वस्त्रे पांघरत आहेत. महानुभाव पंथाचा स्वीकार करीत आहेत. वृत्ती सांडून गदा मागत आहेत, म्हणजे ओले अन्न वा धान्य मागून आणत आहेत. भीक मागत आहेत. ते कशासाठी तर कंदुरीसाठी. पण हे एवढेच नाही. गुरूमार्गामुळें भ्रष्ट झाले सकळ हेही तुकोबांचे निरीक्षण आहे. हा गुरूमार्ग म्हणजे शाक्तांचा मार्ग. समाजाचे पुढारपण करणा-या वर्गाचे सामाजिक चारित्र्य असे बिघडत चालले होते आणि शूद्रातिशूद्र बहुजन समाज शेंद-या हेंद-या शूद्र देवतांच्या पूजेत रमलेला होता. सेंदराचे दैवत केलें। नवस बोले तयासी।। हाच त्याचा धर्म उरला होता. सेंदरीहेंदरी दैवतें। कोण तीं पूजी भूतेंखेतें।। आपुल्या पोटा जीं रडतें। मागती शितें अवदान।। अशा दैवतांची पूजा कशासाठी करावी, हा तुकोबांचा सवाल आहे. पण सर्वत्र तेच केले जात होते. हा जो शूद्रातिशूद्रांचा बहुदेवतात्मक धर्म आहे, तो केवळ तुकोबांनी नव्हे, तर सर्वच वारकरी संतांनी सातत्याने धिक्कारला आहे. याचे साधे कारण म्हणजे वारकरी संतमंडळींचे – साम्यवादी भाषेत सांगायचे तर – वर्गचरित्र. ते प्रामुख्याने अलुतेदार-बलुतेदारांचे आहे. बहुतेक संत हे याच वर्गातून आलेले आहेत आणि ते ज्या समाजव्यवस्थेचे भाग आहेत ती या धर्मामुळे मोडकळीस आलेली आहे. ती इमारत पुन्हा उभारायची असेल, तर त्या व्यवस्थेतील कमअस्सल ते बाजूला सारणे आवश्यक होते. धर्माचा खोटा उदीम बंद करणे आवश्यक होते. विविध दैवतांच्या पूजा-उपासनेतून सामाजिक शक्ती आणि नैतिकतेचा होणारा –हास थांबविणे गरजेचे होते. तुकोबांनी त्यासाठीच शब्दांची शस्त्रे परजली होती. ते म्हणतात –

नव्हे जाखाई जोखाई। मायाराणी मेसाबाई।।
बळिया माझा पंढरीराव। जो ह्या देवांचाही देव।।
रंडी चंडी शक्ती। मद्यमांस भक्षिती।।
बहिरव खंडेराव। रोटी सुटीसाठी देव।।
गणोबा विक्राळ। लाडुमोदकांचा काळ।।
मुंजा म्हैसासुरें। हें तों कोण लेखी पोरें।
वेताळें फेताळें। जळो त्यांचें तोंड काळें।।

जाखाई, जोखाई, रंडी, चंडी अशा शूद्र देवतांचा तर ते धिक्कार करतातच, परंतु खंडोबा, बहिरोबा या अनेकांच्या कुलदेवतांनाही त्यांनी तुच्छले आहे. ते भरीत आणि रोडग्याचे देव आहेत, अशा शब्दांत त्यांचे स्थान दर्शविले आहे. गणपती ही लोकप्रिय देवता. देहूजवळच चिंचडवडला गणेशाचे महत्त्वाचे मंदिर आहे. तेथे मोरया (मोरोबा) गोसावी यांची समाधी आहे. ते तुकोबांचे समकालीन. थोर गणेशभक्त. त्यांना गणेशाचा अवतार मानले जाते. त्यांची आणि तुकोबांची भेट झाल्याचेही दाखले आहेत. असे असतानाही तुकोबांनी गणपतीची लाडू-मोदकांचा काळ अशी संभावना केलेली आहे. गणपतीच्या तांत्रिकांशी असलेल्या संबंधामुळे ते असे म्हणत आहेत हे निश्चित. गाथ्यात तंत्रवादी शाक्तांवर १३ अभंग आहेत. त्यातील एका अभंगात शाक्तांना मनुष्य परी कुतरी ती असे संबोधून ते पुढे म्हणतात, पूजिती विकट दोंद। पशु सोंड गजाची।। हे गणपतीचे वर्णन आहे.

एकंदरच तुकोबांचा शाक्तांवर प्रचंडच राग आहे. शाक्ताची सूकरी माय। विष्ठा खाय बिदीची।।, शाक्ताची गाढवी माय। भुंकत जाय वेसदारा।। अशा शिव्याच घालतात ते त्यांना. ते म्हणतात, हा शाक्त गधडा जये देशीं। तेथें राशी पापाच्या असतात. शाक्त वास करिती तो देश, तेथील राजा, प्रजा यांचे द्वाडच होते. ते एवढे चिडून, संतापून बोलतात याचे कारण त्या पंथाच्या स्वरूपात दडलेले आहे. हा तसा जुनाच पंथ. गुप्तोत्तर काळात उदयाला आलेला. तो एवढा लोकप्रिय होता, की हिंदु धर्मातील महत्त्वाच्या पाच – वैष्णव, शैव, शाक्त, सौर आणि गाणपत्य या – संप्रदायांत त्याचा समावेश आहे. याच्या उपासनाविधीमध्ये पाच म-कारांना महत्त्व असते. ते म्हणजे मत्स्य, मांस, मुद्रा, मद्य आणि मैथून. धर्माच्या नावाने व्यभिचाराचा मिळालेला खुला परवानाच तो. तुकोबा त्या विरोधात ज्या पोटतिडिकेने आणि चिडीने बोलतात ते पाहता त्या काळात महाराष्ट्रात हा संप्रदाय चांगलाच बोकाळला होता, असे दिसते. तुकोबा सांगतच आहेत, की – गुरूमार्गामुळें भ्रष्ट झाले सकळ।
डोहोर लोहार दासी बलुती बारा। उपदेशिती फारा रांडापोरें।।
हे शाक्त ढोर, लोहार आदी बारा बलुतेदारांना, त्यांच्या बायका-पोरांना उपदेश करतातच, पण - 
कांही टाण्या टोँण्या विप्र शिष्य होती। उघडी फजिती स्वधर्माची।।
त्यांच्या मंत्र-तंत्राच्या लालचेने ब्राह्मणही त्यांचे शिष्य होऊन आपल्याच धर्माची फजिती करतात. हे शाक्त
नसता करूनि होम खातीं एके ठायीं। म्हणती पाप नाहीं मोक्ष येणें।।
इंद्रियांचे पेटे भला कौल देती। मर्यादा जकाती माफ केली।।
खोटाच एखादा होम करून, एकत्र बसून खातात आणि वर सांगतात की यात काहीही पाप नाही. मोक्षच आहे. मर्यादारूपी जकातीची माफी देऊन इंद्रिय व्यवहारांत चांगलीच मोकळीक देतात. सर्वच वर्गांमध्ये असा वामाचार बळावलेला असणे हे समाजाला लागलेल्या किडीचेच लक्षण. ती साफ करणे हे सोपे काम नव्हते. कारण तो नुसताच मूळ धरून नव्हता, तर प्रभावीही होता. अगदी छत्रपती शिवरायांनाही गागाभट्टाने केलेल्या राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी तांत्रिक पद्धतीने अभिषेक करवून घ्यावा लागला होता. यातून त्या तंत्रसांप्रदायिकांच्या प्रभावाची कल्पना यावी. अगदी शिवकालानंतरही हा संप्रदाय महाराष्ट्रात टिकून राहिल्याचे दिसते. पेशवाईत याचाच एक पंथ घटकंचुकी पंथ या नावाने ओळखला जात होता. पुढे ओशो रजनीशांनी या अध्यात्मविचारालाच नव्याने उजाळा दिला. आजही अनेक बाबा-बापूंच्या तंत्रलीला पाहावयास मिळतात. तो या धर्माचाच भाग.

तुकारामांभोवताली असलेल्या समाजाची नैतिक पातळी किती खालावलेली होती हेच यातून दिसत आहे. एकीकडे शूद्र दैवतांची उपासना आणि दुसरीकडे असा वामाचार. यातून आपण काही वाईट करतो आहोत याचे भानही त्या समाजाला राहिलेले नव्हते. त्यांना हाताला धरून आडमार्गाला जाऊ नका असे सांगितले, तरी ऐकत नाहीत. – वारितां बळें धरितां हाती। जुलुमें जाती नरकामधीं।। रंडीदासाप्रति कांहीं। उपदेश तोही चालेना।। ही तुकारामांची खंत आहे. विशेष म्हणजे ती आजही तेवढीच ताजी आहे. आजही धर्माचा खोटा उदीम बळावलेला दिसतो. आजही बुवाबाजी माजलेली आहे. तेव्हाही ती होती आणि तुकोबा त्याविरोधात लढत होते. कारण तेणे जन नाडिलें हा त्यांच्या काळजीचा विषय होता...

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/article-on-orthodox-sanatan-dharma-1211618/)



ऐसे कैसे झाले भोंदू


रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणारा तो साधु. ज्याचे अंतःकरण लोण्यासारखे मऊ आहे तो साधु. निराश्रितांना हृदयी धरतो तो साधु. आपल्या नोकरांवर पुत्रवत प्रेम करतो तो साधु. ही तुकोबांनी सांगितलेली साधु-संतांची व्याख्या. साधीच. पण असे साधु द्यादिसा दिवा लावूनही दिसणे कठीण. ही आजची गत. सतराव्या शतकातही याहून वेगळी अवस्था नव्हती. बुवाबाजीचा टारफुला तसा कोणत्याही भूमीत तरारतो. भूमी दारिद्र्याची, वेदनेची, भूकेची असो, की श्रीमंतीची, ऐश्वर्याची असो, असमाधान, असुरक्षितता, भयादी भावना तेथे वस्तीला असतातच. सर्वांनाच त्यातून सुटका हवी असते. त्या सुटकेचे मार्ग सांगणारे धर्माच्या हाटात दुकाने मांडून असतातच. धर्माच्या नावाखाली, धार्मिक कर्मकांडांची अवडंबरे माजवून हे तथाकथित साधु, संत, बाबा, महाराज स्वतःच्या तुंबड्या तेवढ्या भरत असतात. तुकोबांच्या काळातही अशा भिन्न पंथीय बाबाबुवाची बंडे माजलेली होतीच. तुकोबा हे काही भारतभर फिरलेले नाहीत. त्यांचा वावर प्रामुख्याने देहू, लोहगाव असा मावळातला. मीठ वगैरे नेण्यासाठी ते कधी कोकणात पेण-पनवेलाकडे उतरत असत असे सांगतात.  तेव्हा भ्रमंती अशी फार नाहीच. पण त्यांच्याकडे दृष्टी होती आणि त्या दृष्टीला पडत होते ते चित्र बुवाबाजीचा बुजबुजाट झालेल्या, आणिक पाखांडे असती उदंडें अशा समाजाचेही होते.

चार ग्रंथ वाचायचे. चार मंत्र म्हणायचे. भगवी, सफेद, काळी, पिवळी वस्त्रे पांघरायची. अध्यात्मिक गडबडगुंडा करायचा. चमत्कार दाखवायचे आणि जन नाडायचे हाच या भोंदू संतांचा उद्योग. पण त्यावर त्यांनी इतका धार्मिक मुलामा चढविलेला असतो की त्यांच्याविरोधात आवाज काढणाराच देव आणि धर्मद्रोही ठरण्याची शक्यता. पण तुकाराम त्याची पर्वा करणा-यांतले नाहीत. त्यांनी शाक्तांवर आसूड ओढले, तसेच ते अन्य धर्मपंथांवरही तुटून पडले आहेत. त्यांनी भगवी लुगडी नेसणा-या, पण कदान्नाची निंदा करीत देवान्नाची इच्छा करणा-या, विषयांच्या वासनेत बुडालेल्या आणि मान मिळवू पाहणा-या संन्याशांची निंदा केली आहे. जटा वाढवून, कासोटा नेसून, सर्वांगावर विभूती लेपन करून मिष्टान्नाची आशा धरणा-या संतांवर कोरडे ओढले आहेत. सनातनी वैदिक ब्राह्मणी धर्माविरुद्ध हिंदूंचे महानुभावांपासून वारक-यांपर्यंतचे अनेक पंथ उभे राहिलेले आहेत. मत्स्येंद्र-गोरखप्रणीत नाथपंथ हा त्यातलाच एक अखिल हिंदुस्तानात पसरलेला पंथ. खुद्द ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ या पंथाचे. (संत निळोबारायांनी नाथ संप्रदायाची थोरी। प्रगट केली ज्ञानेश्वरी।। अशा शब्दांत ज्ञानेश्वरीचे वर्णन केले आहे.) विषयविध्वंसैकवीर अशा विशेषणाने ज्ञानदेव ज्यांचा गौरव करतात, त्या गोरक्षनाथांनी त्यांचे गुरू मत्स्येंद्रनाथ यांची योगिनींच्या जाळ्यातून सुटका केल्याची कथा सांगितली जाते. मत्स्येंद्रनाथ वामाचारी कौलमताचे अनुयायी बनले होते. गोरक्षांनी त्यांना त्या मार्गापासून दूर आणले असा याचा अर्थ. शाक्त, कापालिक, वज्रयान, सहजयान या तंत्रसाधनांविरोधात गोरक्षनाथ उभे राहिले म्हणून ते विषयविध्वंसैकवीर ठरले. पण पुढे नाथपंथात वामाचारी साधना शिरल्या. बाह्य अवडंबराला महत्त्व आले. तेव्हा तुकोबांनी त्यांच्यावरही टीकेची झोड उठविली.

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती। नाथ म्हणविती जगामाजीं।।
घालोनिया फेरा मागती द्रव्यासी। परि शंकरासी नोळखती।।
पोट भरावया शिकती उपाय। तुका म्हणे जाय नरकलोका।।

अशा शब्दांत तुकोबा त्यांचा समाचार घेतात. अशा संतांची आणखी एक जात आपणांस अलीकडे प्रामुख्याने कुंभमेळ्याच्या निमित्ताने किंवा दूरचित्रवणी वाहिन्यांवरील धर्म विषयक चर्चांमध्ये हटकून दिसते. तुकारामांनी  त्यांच्याविषयी लिहून ठेवले आहे, की -  

ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।
अशा भोंदूंबद्दल ते म्हणतात -
अल्प असे ज्ञान। अंगीं ताठा अभिमान।।
तुका म्हणे लंड। त्याचें हाणोनि फोडा तोंड।।

अशाचप्रकारे त्यांनी मलंगांचाही धिक्कार केला आहे. इस्लाममधीस सुफी दरवेशांचा एक संप्रदाय. त्यांच्याबद्दल तुकोबा लिहितात. – कौडी कौडीसाठी फोडिताती शिर। काढूनि रुधीर मलंग ते।। चार पैशांसाठी डोके फोडून रक्त काढून दाखवतात. पण त्यांना त्यांचा स्वधर्म समजलेलाच नाही. महानुभाव, वीरशैव यांच्यावरही तुकारामांचे टीकास्त्र चाललेले आहे. महानुभावांबद्दल ते म्हणतात – मानभाव पंथाचे लोक हे दाढी आणि डोके यांचे मुंडन करतात. काळी वस्त्रे परिधान करतात. उफराटी काठी हातात घेऊन सर्वांना उपदेश करतात. बायकामुलांना फसवून आपला वेश त्यांना देतात. अशा लोकांना यम शिक्षा करील.

तुकोबा ही सगळी टीका करीत आहेत ती दोन स्तरीय आहे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. वारकरी संप्रदायाहून भिन्न असलेल्या धर्मपंथांचा ते उपहास करीत आहेतच, परंतु ते ऐसे नाना वेष घेऊनी हिंडती। पोटासाठीं घेती परिग्रह।। म्हणजे असे नानाप्रकारचे वेश घेऊन हिंडणा-या, पोटासाठी दान घेणा-या भोंदू संतमहंतांचे वाभाडे काढीत आहेत. वाट्टेल ते कर्म करून स्वतःला साधु म्हणविणारे, सर्वांगाला राख लावून लोकांच्या नजरेआड पापकर्म करणारे, वैराग्य दाखवून विषयांत लोळणारे असे भोंदू हे त्यांचे लक्ष्य आहेत. ते म्हणतात –

ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।।
अंगा लावूनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।। 

विविध कर्मकांडे, आचार, नवससायास यांतून लोकांचे होत असलेल्या मानसिक आणि आर्थिकही शोषणाबद्दलच्या रागातून आलेला हा विरोध आहे. ते म्हणतात -

द्रव्यइच्छेसाठी करितसे कथा। काय त्या पापिष्टा न मिळे खाया।।
पोट पोसावया तोंडें बडबडी। नाहीं धडफुडी एक गोष्टी।।

पैशासाठी जो धर्म सांगतो, तो पापी असतो. पोट भरण्यासाठी जो वृथा बडबड करतो, त्याच्याजवळ निश्चयात्मक अशी एकही गोष्ट नसते. या शब्दांत ते आर्थिक शोषणाविरोधात बोलत आहेत. असा धर्माचा लटिका वेव्हार करणा-याची संभावना ते महाखर – महागाढव म्हणून करतात. त्याच्याबद्दल तुका म्हणे तया काय व्याली रांड असा सवाल करतात. हा कळवळ्यातून आलेला संताप आहे. समाजात माजलेल्या अनाचाराविरोधातली चीड आहे. जेथे दोष बळीवंत झाले आहेत, पापाचिया मुळें सत्याचे वाटोळे झाले आहे असा समाज त्यांच्या आजुबाजूला आहे. त्या विरोधातले हे नैतिक आंदोलन आहे.

पण त्यांच्या आयुष्यातील पाखंड खंडनाची खरी लढाई आणखी वेगळीच होती. ती अधिक मोठी, अधिक व्यापक होती. अक्षरशः जीवन-मरणाची होती. कारण त्यांच्यासमोर उभा होता सनातन वैदिक धर्म. त्याविरोधात लढण्याचा प्रयत्न यापूर्वी अऩेकदा झाला होता. तो चक्रधरांनी केला होता, गोरक्षनाथांनी केला, नामदेवांनी केला होता. आता तुकाराम महाराज आपल्या भक्तीसामर्थ्यानिशी त्याला धडक देत होते. प्रत्यक्ष वेदांनाच त्यांनी आव्हान दिले होते. संत बहिणाबाई तुकोबांना बुद्धाचा अवतार का मानतात त्याचे उत्तर या आव्हानात होते...

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/miracles-of-the-saint-1217145/)




वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा

 हिंदु धर्म किताबी नाही. त्याला एकच एक धर्मग्रंथ नाही. वेद, उपनिषदे, इतिहास, ब्राह्मणे, पुराणे, भगवद्गीता हे आणि असे सर्वच ग्रंथ हे हिंदुंचे धर्मग्रंथ. त्यात पुन्हा तंत्राधिष्ठीत आगमही आले. यातही मौज अशी हे सर्व धर्मग्रंथ मानणारे जसे हिंदु असतात, तसेच ते न मानणारेही हिंदु असतात. वैदिक जसे हिंदु असतात तसेच अवैदिकही. हिंदुंमधील बहुसंख्य लोकांचे काम या ग्रंथांहून चालू शकते, चाललेले आहे. या ग्रंथांमध्ये वेद सर्वांत महत्त्वाचे. कारण ते अपौरुषेय मानले जातात. ते श्रुतींमध्ये मोडतात. त्यांना कोणी रचयिता नाही. ते ऋषींना दिसले. त्यांनी ते नोंदवून ठेवले अशी धार्मिक मान्यता आहे. हे वेद हाच सनातन हिंदुधर्माचा आधार असल्याची कल्पना आहे. हजारो वर्षे लोक ही समजूत बाळगून आहेत. आजही ती श्रद्धा आहे. तशीच ती सतराव्या शतकातही होती. सनातन वैदिक आर्यधर्म ही हिंदुंमधील प्रमुख धारा होती आणि वेदप्रामाण्य हा त्याचा आधार होता.

या वेदांचा अभ्यास करण्याची जी षडंग वेदाध्ययनाची पद्धत आहे त्यातला कल्प हा एक भाग आहे. त्यात पौराहित्याचे सर्व कर्म आणि पुरोहितांच्या संरक्षणाच्या सोयी आहेत. या कल्पाचे तीन भाग असतात. गृह्यसूत्र, श्रौतसूत्र आणि धर्मसूत्रे. सर्वसाधारणतः गृह्यसूत्रात घरगुती धर्मकृत्ये, संस्कार यांची माहिती असते. श्रौतसूत्रात सार्वजनिक यज्ञयागांचे विवेचन असते आणि धर्मसूत्रात इहलौकिक आचारविचार, पाप-पुण्य, न्याय-अन्याय अशा गोष्टी येतात. मनुस्मृती हा याच धर्मसूत्रांचा भाग. हा हिंदुंचा कायदा सांगणारा ग्रंथ. इ.स. २०० ते ३०० या कालखंडातील हा ग्रंथ. तोही पुन्हा धर्माचा आधार वेद हाच असल्याचे सांगतो. आता कोणत्याही काळात मनुस्मृतीचा कायदा जसाच्या तसा लागू होणे व्यवहारतः शक्य नव्हते. पण मनुने सांगितलेली विषमता हा मात्र सगळ्याच सामाजिक व्यवहारांचा पाया होता. या विषमतेच्या व्यवहाराला, चातुर्वण्याला वेदांचे समर्थन होते. या सनातन वैदिक धर्माचे एकंदर स्वरूप आधार वेदांचा, व्यवहार पौराण धर्माचा आणि सामाजिक कायद्यात अंतिम शब्द मनुस्मृतीचा असे होते. वस्तुतः सर्व देशभर हिंदुंचा जो कायदा प्रचलित आहे तो बाराव्या शतकात विज्ञानेश्वराने लिहिलेल्या मिताक्षरा या ग्रंथावर आधारलेला आहे. याशिवाय जिमूतवाहनाच्या दायभाग या टीकाग्रंथावरील एक कायदा आहे. तो बंगाल, आसामात लागू होता. हे दोन्ही टीकाग्रंथ याज्ञवल्क्यस्मृतीवरील आहेत. पण या स्मृतीलाही आधार घेतला जातो तो अखेरीस मनुस्मृतीचा.

हा श्रुती-स्मृती-पुराणोक्त धर्म तुकोबांच्या काळात पुन्हा प्रबळ बनू लागलेला होता. तुकारामांचा खरा लढा या सनातन वैदिक धर्मातून येणा-या विषमतेच्याविरोधात होते. वेदप्रामाण्याविरोधात येथे गौतम बुद्ध, महावीर, चक्रधरस्वामी यांसारख्या अनेक महामानवांनी बंड पुकारले होते. तुकाराम हे त्याच परंपरेचे वारसदार होते. धर्मरक्षणासाठी करणे आटी आम्हांसी असे सांगतच ते वेदप्रामाण्याला आव्हान देत होते. सनातनी वैदिक ब्राह्मणांचे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पीठ जे पैठण, त्याला सोळाव्या शतकात संत एकनाथांनी हादरे दिले होते. त्यांच्यानंतर अवघ्या नऊ वर्षांनी जन्मलेल्या तुकारामांनी पुन्हा एकदा त्या पीठाचा पाया खिळखिळा करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. वेदपाठ करणा-या ब्राह्मणांना त्याचा अर्थच कळत नाही आणि इतरांना तर वेदश्रवण-पठणाचा अधिकारच नाही. वेदाचें गव्हर न कळे पाठकां। अधिकार लोकां नाही येरा असे ते सांगत होते. हे वैदिक ब्राह्मण म्हणजे निव्वळ हमाल. धनाने भरलेला हंडा घेऊन जाणा-या मजुराला जसा आतील धनाचा लाभ नसतो, नुसत्याच पाहणा-याला जशी खाण्याची गोडी अनुभवता येत नसते, तसेच त्यांचे. अशी टीका करतानाच तुकोबा आत्मविश्वासाने सांगत होते,  वेदाचा अर्थ त्या भारवाहकांना नव्हे, तर केवळ आम्हांलाच ठाऊक आहे.

वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं। भार धन वाही मजुरीचें।।

मग वेदाचा खरा अर्थ काय आहे? तुकोबा सांगतात –

वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।
सकळशास्त्रांचा विचार। अंतीं इतुलाचि निर्धार।।
अठरापुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।

वेदांनी अनेक विषय सांगितले आहेत. पण त्यांचा मुख्य अर्थ हाच की विठ्ठलाला शरण जाऊन निजनिष्ठेने त्याचे नाम गावे. सगळ्या शास्त्रांचा, अठरा पुराणांचा हाच सारांश आहे, सिद्धांत आहे. याही पुढे जाऊन ते म्हणतात – विठ्ठल हा शास्त्रांचें सार आहे, वेदांची मूर्ती आहे. आणि तोच आमचा सांगाती प्राणसखा आहे. म्हणऊनि नाही आणिकांचा पांग। सर्व झालें सांग नामें एका।।

विठ्ठलाच्या नावातच सगळा वेदांचा अर्थ आहे, असे सांगून तुकोबा वेदप्रामाण्यावर आधारलेल्या सनातन वैदिक धर्माला धक्का देत आहेत. नेणती वेद श्रुती कोणी। आम्हां भाविकांवाचूनि।। असे म्हणत ते ब्राह्मणांच्या अधिकारांनाही आव्हान देत आहेत. वेदांचा बोल ऐकण्याचाही अधिकार ज्या वैश्य, शूद्र, चांडाळांना नाही, त्यांच्यापुढे ते हा नवाच वेदार्थ ठेवत आहेत.

सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर। पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार। बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।। 

पंढरीचा हा जो स्वामी आहे तोच सकळ शास्त्रांचे सार आहे. वेदांचाही मुख्यार्थ तोच आहे. सर्व वर्णियांना, आबालवृद्धांना, स्त्री-पुरुषांना, एवढेच काय चांडाळ आणि कसबिणींनाही त्याच्या भक्तीचा अधिकार आहे, असे ठामपणे ते सांगत आहेत. एवढेच नव्हे, तर चातुर्वण्याचे समर्थन करणा-या धर्माला एकीकडे समर्थासी नाही वर्णावर्ण भेद असे बजावत आहेत, तर दुसरीकडे वेदअभिमानी ब्राह्मणांना शूद्रवंशी जन्मलो। म्हणोनि दंभे मोकलिलो, बरें देवा कुणबी केलो। नाही तरी दंभे असतो मेलो, अशी चपराक देत आहेत.   

वर्णभेद, जातीभेद, त्यातून आलेली पुरोहितशाही यांना हा असा रांगडा विरोध हा तुकोबांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. आता हा विरोध केवळ चंद्रभागेच्या वाळवंटापुरताच मर्यादीत आहे, अध्यात्माच्या क्षेत्रापुरताच सीमित आहे, तो सामाजिक पातळीवर नाही असे म्हणणे सोपे आहे. पण ज्या समाजात शतकानुशतके सर्वच पातळ्यांवर अत्यंत खोलवर चातुर्वण्य व्यवस्था रूजलेली आहे, जिच्या समर्थनार्थ सगळे धर्मग्रंथ उभे आहेत, धार्मिक कायदा जिच्या बाजूला आहे, त्या व्यवस्थेला त्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रापुरता का होईना विरोध करणे हे किती कठीण काम होते हे पुढे खुद्द तुकोबांनाच जे सहन करावे लागले त्यावरून सहज लक्षात यावे. दुसरी बाब म्हणजे अध्यात्मातील समतेच्या पुरस्काराने विषमतेचे समर्थक जर एवढे संतापत असतील, तर त्या समता पुरस्काराचा परिणाम अध्यात्मक्षेत्रापुरताच मर्यादीत होता असे तरी कसे म्हणता येईल? तरीही न डगमगता त्यांनी हे वेदाधारित पाखांड मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नांना जोड होती, अभ्यासाची, नैतिकतेची, आत्मविश्वासाची. ते म्हणतात, वेदान्त वेदान्त तुम्ही आम्हांला काय सांगता? तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।। कारण –

तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते।
स्वयंभू आइते केले नव्हों।।

आम्ही साधेसुधे नाही, तर विधीचे बाप आहोत! आम्ही स्वतःसिद्ध आहोत!!

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/hindu-religion-1221838/)




घोंटविन लाळ ब्रह्मज्ञान्याहातीं!

एका शूद्र, ज्याला वेद पठनाचा अधिकार नाही (घोकाया अक्षर मज नाहीं अधिकार), तो जेव्हा वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा असे म्हणतो, तेव्हा त्या कृत्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आजच्या काळात समजणे तसे कठीणच. वेदांच्या विरोधातील अशी बंडे आधी झाली नव्हती असे नाही. त्या सर्वांत लोकायतांचे वा बार्हस्पत्यांचे बंड सर्वांत मोठे होते. त्यांनी तर त्रयो वेदस्य कर्तारः। भण्ड धूर्त निशाचराः म्हणजे तिन्ही वेदांचे कर्ते हे धूर्त, ढोंगी, लोकापहार करणारे आहेत, एवढेच नव्हे, तर
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुंठनम्।
बुद्धिपौरूषहीनानां जीविकेति बृहस्पतिः।।

म्हणजे वेदोक्त धर्म, त्यातील कर्मकांडे ही निर्बुद्ध आणि पौरुषहीन यांच्या उपजिविकेची साधने असल्याचे बृहस्पतीचे (हा बृहस्पती म्हणजे चार्वाकदर्शनाचा संस्थापक) मत आहे, असे सांगून वेदप्रामाण्याच्या चिंधड्या केल्या होत्या. त्याचा परिणाम पुढे असा झाला की हे जडवादी चिंतन पाखंडमत म्हणून धिक्कारण्यात आले. आज त्या दर्शनाचा
एकही मूळ ग्रंथ अस्तित्वात नाही. अपवाद फक्त तत्त्वोपप्लवसिंह हा जयराशिभट्ट यांचा ग्रंथ. तुमचेनि मुंगी रांड न होआवी (तुमच्या हातून मुंगीलाही वैधव्य येता कामा नये) असा अहिंसेचा संदेश देणा-या, उत्तम भणिजे ब्राह्मण : आन आधम भणिजे मातंग : ऐसे म्हणे : परी तोही मनुष्य देहची : परिवृथा कल्पना करी :’ असे परिवर्तनवादी विचार मांडून धर्माधिष्ठित विषमतेच्या मुळांवर घाव घालणा-या चक्रधरांचेही उदाहरण येथे घेता येईल. त्यांच्यावर या महाराष्ट्रात दोनदा विषप्रयोग करण्यात आले होते. पैठण येथे यंत्रासनावर बसवून ठार मारण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रयत्न करणारे होते यादवांचे प्रधानमंत्री पंडित हेमाद्री, राजगुरू ब्रह्मसानु आदी वैदिक चातुर्वण्य व्यवस्थेचे कट्टर पुरस्कर्ते. कारण काय तर, आता हे आमुचा मार्ग उच्छेदिती ही भीती. याच महाराष्ट्रात सनातनी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या माता-पित्याला धर्माच्या नावाखाली आत्महत्येला प्रवृत्त केले होते, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या चार बालकांचा छळ केला होता. हा अवघा इतिहास तुकारामांच्या समोर होता. त्याचप्रमाणे वेदांना कृपण म्हणणारे (वेदु संपन्न होय ठायीं। परि कृपणु ऐसा आनु नाही।), त्यांना ईश्वराच्या घोरण्याची उपमा देणारे (हा वेदार्थसागरू। जया निद्रिताचा घोरू।), वेद काय रेडाही बोलू शकतो हे दाखविणारे ज्ञानेश्वर वेदांचा नाही श्रुतिपरौती। माऊली जगी। असा गौरवही करीत होते. हाही इतिहास तुकारामांच्या समोर होता. आणि तरीही ते वेदांच्या विरोधात हाती शब्दांचिच शस्त्रे घेऊन ठाम उभे राहिले होते. याचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे.

तुकोबांच्या या बंडाचे मूळ पुन्हा वारकरी परंपरेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आज स्वतःस वारकरी म्हणवून घेणारे वारक-यांचे पीठाधिश आणि मठाधिपती जी परंपरा सांगतात ती मात्र ही नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये सनातन वैदिक धर्मप्रणीत चातुर्वण्यव्यवस्थेचे समर्थन सरसहा आढळेल. सांगे शूद्रघरी आघवी। पक्वान्नें आहाति बरवीं। तीं द्विजें केवीं सेवावीं। दुर्बळु जरी जाहला। अशा नाना ओव्या सांगता येतील. परंतु याच व्यवस्थेला अध्यात्माच्या क्षेत्रात ज्ञानेश्वरीने छेदही दिला आहे आणि हा वेदार्थसागरू। जया निद्रिताचा घोरू। तो स्वयें सर्वेश्वरू। प्रत्यक्ष अनुवादला।। या ओवीतून वेदांपेक्षा गीता श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादनही केले आहे. वेदांच्या श्रवण, अध्ययनापासून कित्येक मैल दूर असणारांची सोय लावण्यासाठी व्यासांनी भगवद्गीता रचली, अशी ज्ञानदेवांची भूमिका आहे आणि त्यातूनच त्यांनी गीतेवरील भाष्य रचले. स्त्री, शूद्रांना ब्रह्मज्ञान खुले केले. वैदिक धर्म वाचविण्याकरीता ज्ञानेश्वरांनी केलेले हे अवैदिक वर्तनच. आयुष्याच्या अखेरीस ज्ञानोबा चोखा महार, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव महाराज यांच्यासोबत भोजन करतात हेही एक बंडच होते. इ.स. ११९६मध्ये ज्ञानोबांनी समाधी घेतली. त्यानंतर चार शतकांनी एकनाथ येतात. त्यांचा जन्म इ.स. १५३२ मधला. ते एकीकडे वेदबळे वर्णाश्रम। नीज स्वधर्म चालविती असे सांगत आहेत. एका जनार्दनी ब्राह्मणांची पूजा। चुकवील खेपा संसारीच्या। असे म्हणत आहेत आणि त्याचवेळी आम्ही ब्राह्मण अनुष्ठानी। नित्य गांजा सुरापानी।। आम्ही करितों नित्य स्नान। वरवर धुतों अंतरीं बकध्यान।। असे कोरडेही ओढत आहेत. दुसरीकडे महाराच्या मुलाला कडेवर उचलून घेत आहेत, त्यांच्याघरी भोजन करीत आहेत. वारकरी संप्रदायाने चंद्रभागेच्या वाळवंटात अध्यात्मिक समतेचा घोष केला, त्याला ही अशी सामाजिक जीवनातील कृतीची जोड लाभलेली आहे. ही वारक-यांची परंपरा. तुकोबांचे वेदांविरोधातील बंड या परंपरेतून आलेले आहे. परंतु -

अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा। ओळखा जातीचा अंत्यज तो।।
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण। श्रेष्ठाचें वचन न मनी जो।।
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न। तैसा तो दुर्जन शिवों नये।।

म्हणजे अति वितंडवाद करणारा शुद्ध बीजाचा नसतो. तो जातीने अंत्यज आहे असे समजा. तो वेद, उपनिषदे आदींचे प्रमाण मानत नाही. तो श्रेष्ठांची वचने मानत नाही. जसे मद्यपानाबरोबरचे मिष्टान्न, तसाच तो दुर्जन. त्याला शिवू नये, असेही तुकोबा सांगत आहेत. यातून तर ते वेदांचे प्रामाण्यच सांगत आहेत. मग त्यांना वेदविरोधी कसे म्हणायचे, असा प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर तुकोबांच्या एका वचनात येते -
गाळुनिया भेद। प्रमाण तो ऐसा वेद।। 
भेदभावाचा भाग गाळला की उरलेला वेद आम्हांला प्रमाण आहे असे तुकोबा सांगतात. हा उरलेला वेद कसा आहे? वेदाचा तो अर्थ तुकोबांनी कसा लावलेला आहे? ते सांगतात –

वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।

आणि वर पुन्हा वेदांचा अधिकार असलेल्या ब्रह्मवृंदांना तरी वेदांचा अर्थ किती कळतो, असा प्रश्न उभा करतात. -
ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धि। पाहा श्रुतीमधीं विचारूनि।।

जयासी नावडे हरिनामकीर्तन। आणिक नर्तन वैष्णवांचे।।
सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार। मातेशीं वेव्हार अंत्यजाचा।।

ज्याला हरिनामकीर्तन आवडत नाही, तो ब्राह्मण नाहीच. श्रुतींमध्ये हेच म्हटले आहे! येथे अवघा वेदार्थच ते उलटा-पालटा करीत आहेत. हे करताना ते येथील वेदप्रामाण्यवादी धर्मरचनेलाच आव्हान देत असतात.

हा सनातन वैदिक धर्मविचार व्यवहारात पुरोहित वर्गाच्या हातातीतल शोषणाचे यंत्र असतो, हे तुकोबा अनुभवत होते. त्या विचाराला आणि व्यवस्थेलाच त्यांनी सरळसरळ आव्हान दिले होते. आणि ते आव्हान लोकप्रिय होत होते. तिकडे समर्थ रामदास गुरूत्व आले नीच याती। काही येक वाढली महंती। शूद्र आचार बुडविती। ब्राह्मणाचा अशी व्यथा मांडत होते आणि इकडे काही ब्राह्मणच तुकोबांच्या भजनी लागल्याचे दिसत होते.

येथील पुरोहितशाहीला हा धर्मद्रोह सहन होणे शक्यच नव्हते.

आणि तुकोबा तर, घोंटविन लाळ ब्रह्मज्ञान्याहातीं। – मी असे रसपूर्ण कीर्तन करीन की त्याने ब्रह्मज्ञान्यालाही लाळ घोटावयास लावीन, असे सांगत होते. अक्षर घोकण्याचाही अधिकार नसलेल्या शूद्राचे हे बंड. ते चिरडणे हे आता  पुरोहितशाहीचे धर्मकार्य बनले होते. पुरोहितशाहीची परशू तुकोबांवर कोसळणार होती...

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/history-of-sant-tukaram-1228058/)



निषेधाचा कांही पडिला आघात!

महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ। बोलिला लोकांत सर्वद्रष्टा।।

या बहिणाबाईंच्या ओळी. तत्कालिन सनातनी पुरोहितशाहीचा परशू तुकोबांवर कोसळणार होता तो यामुळेच. बहिणाबाईंच्या या ओळींतील दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक – वेदान्ताचा अर्थ आणि दुसरी – महाराष्ट्री शब्दांत. तुकोबांसारखा शूद्र वेदान्त सांगून घोर पातक तर करीत होताच, परंतु त्यावर कडी म्हणजे ते तो अर्थ थेट महाराष्ट्री शब्दांत, मराठीत, सर्वसामान्यांच्या भाषेत सांगत होता. पुरोहितशाहीच्या दृष्टीने हे महत्पाप होते. कारण तुकोबांची ही भाषिक कृती थेट पुरोहितशाहीच्या मुळावरच येणारी होती. हा भाषेच्या राजकारणाचा भाग आहे. काळ कोणताही असो, भाषा हे नेहमीच सत्ताधारी वर्गाच्या वर्चस्वाचे एक महत्त्वाचे साधन राहिलेले आहे. आज ते काम इंग्रजी भाषा करीत आहे. प्राचीन काळी संस्कृत करीत असे. ख्रिस्तपूर्व ६०० पर्यंत तरी भारतात संस्कृत ही बोलीभाषा होती. पुढे तिचे महत्त्व कमी होत गेले आणि ख्रिस्तपूर्व २०० पर्यंत प्राकृत भाषांचा व्यवहारात वापर सुरू झाला. तरीही धर्म आणि ज्ञानाच्या क्षेत्रातील संस्कृतचे स्थान अबाधित होते. कारण ती वेदांची आणि देवांची भाषा. ती ज्ञानभाषा, विश्वातील सगळे ज्ञान तिच्यात. ते सामान्यांच्या भाषेत आणणे म्हणजे देवभाषेचे महत्त्व कमी करणे आणि त्यातून संस्कृत भाषकांच्या वर्चस्वावर, त्यांच्या मक्तेदारीवर घाला घालणे. गौतम बुद्धाने नूतन धर्मप्रसारासाठी तेव्हाच्या व्यवहारातील पाली भाषेचा वापर केला, तो यामुळेच. महाराष्ट्रात हे भाषिक राजकारण पहिल्यांदा केले चक्रधर स्वामींनी. त्यांनी म-हाटीला धर्मभाषेचे स्थान दिले. तुमचा अस्मात् कस्मात् मी नेणें गा : मज श्री चक्रधरे निरिपिली म-हाटी : तियाचि पुसा :’ – हे चक्रधरशिष्य नागदेवाचार्यांचे विधान. हे मराठीचे अभिमानवाक्यच! पुढे हा वारसा ज्ञानोबांनीही चालविला. पण हे करताना त्यांनी आणखी एक गुन्हा केला. त्यांनी अमृतातें पैजे जिंकणा-या मराठीत भाष्य तर केलेच, पण त्यासाठी बाकीचे धर्मग्रंथ बाजूला ठेवून निवडली ती भगवद्गीता.

आपल्या धर्मपरंपरेनुसार गीतेचे स्थान वेदांच्या खालचे आहे. कारण गीता स्मृती आहे, वेद श्रुती. तेव्हा जेव्हा प्रामाण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रमाण वेद असतात. तरीही ज्ञानोबांनी भाष्यासाठी वेद, उपनिषदांऐवजी गीता निवडली. सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत ज्ञानेश्वरी सांगितली. त्याचा परिणाम काय झाला, तर येथील सनातनी वैदिकांनी चक्क गीतेशी वैर धरले. गीतेवर बहिष्कार टाकला. का? तर मराठी भाषेमुळे गीतेतील विचार स्त्री-शूद्रांपर्यंत गेले आणि ती विटाळशी झाली. हे आज अगदीच अविश्वासार्ह वाटते, पण त्यास खुद्द बहिणाबाईंचा दाखला आहे. त्या सांगतात -  
नामाचा विटाळ आमुचिये घरी। गीता शास्त्र वैरी कुळी आम्हां।।
तुकारामांचे शिष्य कचेश्वरभट्ट ब्रह्मे यांचाही हाच अनुभव आहे. त्यांचे घराणेही वैदिक ब्राह्मणांचे. ते चाकणचे. (आणि थोरल्या शाहू महाराजांचे राजगुरू. त्यावरून पुढे ब्रह्मेंचे राजगुरू असे झाले. हुतात्मा शिवराम राजगुरू हे त्यांच्याच घराण्यातील.) या कचेश्वरांना त्या काळी गीतावाचनाबद्दल मार खावा लागला होता. आपल्या आत्मचरित्रात्मक अभंगांत त्यांनी म्हटले आहे –

चित्ता दृढ आलें गीता ही पढावी। आनंदे पहावी नित्य टीका।।
एक दिसीं घरी पुस्तक वाचितां। कांहीं आलें चित्ता वडिलांच्या।।
तीर्थस्वरूपांनी घातलें ताडन। गीतार्थ नमन करूं नको।।
चोरूनियां गीता भावें पाठ केली। अविद्या चालली हळूहळू।।

कचेश्वरभट्ट यांना केवळ मारहाणच नव्हे, तर त्यांच्यावर विषप्रयोगही झाल्याचे सांगण्यात येते. तुकोबांचा गुन्हा त्यांच्याहून थोर. त्यांनी ज्ञानेश्वरांप्रमाणेच गीताभाष्य लिहिले, तेही आपल्या म-हाटमोळ्या बोलीमध्ये.

तुकोबांच्या नावावर असा एक गीतेचा अनुवाद आहे हेच अनेकांना माहीत नसते. त्यांच्या अनेक अभंगांतून गीतेचा भावार्थ प्रकट होतो हे सर्वांना मान्य आहे, परंतु त्यांनी मंत्रगीता हा गीतानुवाद रचला हा मात्र वादविषय आहे. वारकरी परंपरेला ही बाब मुळातूनच नामंजूर आहे. डॉ. भा. पं. बहिरट, डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याही मते हा ग्रंथ तुकोबांचा नाही. मात्र वा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या इतिहाससंशोधकांच्या मते हा ग्रंथ देहूच्या तुकोबांचाच आहे. स्वतः बेंद्रे यांनी १९५० मध्ये हा गीतानुवाद विविध पुराव्यांनिशी प्रसिद्ध केला. बहिणाबाईंच्या अभंगातील एक उल्लेख हा त्यातील एक महत्त्वाचा पुरावा. त्या कोल्हापूरास असताना तुकोबांनी त्यांना स्वप्नात गुरुपदेश केला. –

ठेवोनिया कर मस्तकीं बोलिला। मंत्र सांगितला कर्णरंध्री।।
म्यांही पायावरी ठेविलें मस्तक। दिधलें पुस्तक मंत्र गीता।।

येथे मंत्रगीता असा स्पष्ट उल्लेख आहे, ही बाब लक्षणीय आहे. बहिणाबाईंना गुरुपदेश झाला तो १६४० मध्ये. याचा अर्थ तुकोबांनी त्यापूर्वीच मंत्रगीता लिहिली होती. (बेंद्रे यांच्या मते हे साल १६४७ आहे. पण जलदिव्यात बुडविली ती मंत्रगीता या आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी हे साल पुढे आणले असावे अशी शक्यता आहे.)

गाथ्यात स्वामीस संतांनी पुसलें कीं, तुम्हांस वैराग्य कोणत्या प्रकारे झाले तें सांगा या प्रकरणातील तीन अभंगांतून तुकोबांनी आपले आत्मवृत्तच सांगितले आहे. त्यानुसार १६३०च्या थोरल्या दुष्काळाने आटिले द्रव्य नेला मान. व्यवसायाचे दिवाळे निघाले. स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली. तुकोबांना वैराग्य आले ते या आपदांनी. त्यानंतर दुष्काळाची छाया जरा दूर होताच तुकोबांनी काय केले, तर आपल्या घरातील देवळाचा जीर्णोद्धार. पूर्वी ते कीर्तनास जात, एकादशी करीत, परंतु नव्हते अभ्यासीं चित्त आधीं. यानंतर मात्र त्यांनी काही पाठ केलीं संतांचीं उत्तरे. कीर्तनात ध्रुपद धरण्यास सुरूवात केली. त्यांची साधना सुरू झाली. दूर डोंगरावर जावे. तेथील गुंफेत बसावे. ग्रंथ वाचावेत, चिंतन-मनन करावे, सत्यअसत्यासी मन ग्वाही करावे, हा तुकोबांचा दिनक्रम बनला होता. हा तुकारामांच्या आयुष्यातील आंतरिक उलथापालथीचा काळ होता. तशात एके दिवशी, नेमके सांगायचे तर माघ शुद्ध दशमी, वार गुरूवार, ता. १० जानेवारी १६३३ रोजी तुकोबांना स्वप्नात गुरूपदेश झाला.
तुकोबा सांगतात –

मानियेला स्वप्नीं गुरुचा उपदेश। धरिला विश्वास दृढ नामीं।।
यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ति। पाय धरिलें चित्तीं विठोबाचे।।

म्हणजे तुकारामांच्या कवित्वाला प्रारंभ झाला तो १६३३नंतर. याच काळात नामदेवांनी त्यांना स्वप्नात येऊन कवित्व करण्यास सांगितले असावे. त्यांची मंत्रगीता ही अर्थातच यानंतरची आणि १६४० आधीची.

तुकोबा कवित्व करतात, मराठीत गीतानुवाद करतात, गोब्राह्मणाहिता होऊनि निराळें। वेदाचें तें मूळ तुका म्हणे।। असा वेदांचा भलताच अर्थ सांगतात, हे कारण वैदिकांच्या दृष्टीने तुकोबांना शिक्षा करण्यास पुरेसे होते. याकामी पुढाकार घेतला तो रामेश्वरभट्ट यांनी. आपल्या आयुष्यातील या अत्यंत अवघड, खरे तर जीवघेण्या प्रसंगाबद्दल तुकोबा सांगतात –
निषेधाचा कांही पडिला आघात। तेणें मध्यें चित्त दुखवलें।।
चित्त दुखवले!
तुकोबांनी किती मवाळपणे हा प्रसंग उडवून लावला आहे. खरेतर तो त्यांच्या जगण्याच्या प्रयोजनालाच नख लावणारा असा प्रसंग होता. महाराष्ट्री शब्दांत वेदान्ताचा अर्थ सांगून पुरोहितशाहीच्या मक्तेदारीला दिलेल्या आव्हानाबद्दल रामेश्वरभट्टाच्या माध्यमातून अवघ्या सनातनी संस्कृतीने तुकारामांना मरणाहून भयंकर अशी शिक्षा फर्मावली होती.
नामदेवाने पांडुरंगासवे स्वप्नात येऊन जागे केले होते. करावे कवित्व हे काम सांगितले होते. तो अवघा अक्षरांचा श्रम आता पाण्यात बुडवायचा होता...

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/sant-tukaram-language-1233019/)



निवाडा करिती दिवाणांत


सन १६३८.
महाराष्ट्राची भूमी थोरल्या दुष्काळातून आता सावरली होती. कमकुवत झालेली अहमदनगरची निजामशाही वाचविण्यासाठी चाललेले शहाजीराजांचे प्रयत्न फोल ठरले होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी शरणागती पत्करून आदिलशाहीची चाकरी धरली होती. ते कर्नाटकात निघून गेले होते. अजून बहुधा बालशिवाजी आणि जिजाबाई यांचे वास्तव्य शिवनेरीवरच होते. पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती करण्यात आली होती. जहागिरीच्या प्रदेशात लावणी-संचणीची व्यवस्था लावण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. तरीही अस्मानी आणि सुलतानी संकटांनी अंधारलेल्या या प्रदेशात नवी पहाट अजून उजाडायची होती. त्यासाठी अजून चार वर्षांचा अवधी होता. १६४२मध्ये शिवराय बंगळुरातून पुण्यास परतणार होते.

याच काळात देहूच्या पंचक्रोशीत तुकाराम महाराज समाजात सद्विचारांची लावणी-संचणी करीत होते. १६३३ पासून, म्हणजे गेल्या सुमारे पाच वर्षांपासून ते अभंगरचना करीत होते. त्यांच्या भजन-कीर्तनाची किर्ती पंचक्रोशीत निनादत होती. बारा मावळातले बारा बलुतेदार, बळीभद्र कुणबी त्यांच्या अभंगवाणीवर जीव टाकू लागले होतेच, पण देहूचे कुळकर्णी महादाजी पंत, चिखलीचे कुळकर्णी मल्हारपंत, पुण्याचे कोंडोपंत लोहोकरे, तळेगावचे गंगाराम मवाळ यांच्यासारखे कित्येक ब्राह्मणही त्यांच्या भजनी लागले होते.

धर्मशास्त्रानुसार गुरू तो सकळांसी ब्राह्मण असे असताना ते काम हा शूद्र कुणबी-वाणी करीत होता. सेंदरी हेंदरी दैवते, तंत्र, शाक्त असे पंथ-मार्ग तर तो धिक्कारीत होताच, पण वैदिक कर्मकांडांलाही विरोध करीत होता. तीर्थी धोंडापाणी। देव रोकडा सज्जनी, काय काशी करिती गंगा। भीतरि चांगा नाही तो असे सांगून पुरोहितशाहीच्या पोटावरच पाय आणण्याचा प्रयत्न करीत होता. वर गोब्राह्मणाहिता होऊनी निराळें। वेदाचें तें मूळ तुका म्हणे असे सांगतानाच तुका म्हणे कांही। वेदा वीर्य शक्ति नाहीं असे जाहीर करून थेट वेदांनाच आव्हान देत होता. कर्मकांडे टाळून साध्या सरळ सोप्या भक्तीमार्गाचा प्रचार करणा-या या कुणबीवाण्याला सहन करणे आता कट्टर वैदिकांना अशक्य झाले होते. रामेश्वरभट्ट हे त्यांतलेच एक.

सत्तरी पार केलेला हा वृद्ध ब्राह्मण मुळचा पुण्याजवळच्या वाघोलीचा. त्यांचे घराणे ऋग्वेदी आश्वलायन मौन भार्गव गोत्री. वडिलांकडून चालत आलेली वाघोलीच्या कुलकर्णपणाची आणि जोशीपणाची वृत्ती त्यांच्याकडे होती, शिवाय बहुळ, चिंचोसी आणि सिंदेगव्हाण या गावांचेही ते कुलकर्णी, जोशी होते. या वृत्तीवरून त्यांचे भाऊबंदांशी वाद झाले होते. ती भांडणे न्यायालयात गेली होती आणि त्याला कंटाळून ते योगसाधनेकडे वळले होते. वतन सोडून आळंदीला जाऊन राहिले होते. ज्ञानेश्वरांवर त्यांची भक्ती होती. ल. रा. पांगारकर, वा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या तुकाराम चरित्रकारांनी त्यांचा सच्छील वगैरे शब्दांत गौरव केलेला आहे. पांगारकरांनी तर – आतां प्राकृत भाषेंत अधिकारसंपन्न शूद्रालाही धर्मरहस्य सांगायला हरकत नाहीं – कारण धर्मरहस्य भगवत्कृपेनें कोणत्याही जातीच्या शुद्धचित्त मनुष्यांत प्रगट होतें – ही गोष्ट सिद्ध करून देण्याला तुकोबाचा छळ होऊन ते त्यांत यशस्वी व्हावयास पाहिजे होते व ह्या छळाचा कस होण्याचा मान रामेश्वरभटास मिळाला!’ अशा शब्दांत रामेश्वरभट्टांची भलामण केली आहे. अशा या सच्छील रामेश्वरभट्टांनी तुकोबांवर दिवाणात दावा केला. संतचरित्रकार महिपतबाबा भक्तलीलामृतात रामेश्वरभट्टांबद्दल सांगतात -

त्याणें तुकयाची सत्कीर्ति पूर्ण। परस्परें केली श्रवण।
ऐकोनि द्वेष उपजला मनें। म्हणे पाखंड पूर्ण माजविलें।।
यासि उपाय योजावा निका। देशोधडी करावा तुका।

तुकारामबुवांची सत्किर्ती ऐकूण या सच्छील वैदिकाच्या मनात द्वेष उपजला आणि त्याने तुकारामांना देशोधडी लावण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने दिवाणात अर्ज केला. –

म्हणे तुका शूद्र जातीचा निश्चित। श्रुति मथितार्थ बोलतो।।
हरिकीर्तन करूनि तेणें। भाविक लोकांसि घातलें मोहन।
त्यासी नमस्कार करिती ब्राह्मण। हे आम्हांकारणें अश्लाघ्य।।
सकळ धर्म उडवूनि निश्चित। नाममहिमा बोले अद्भुत।
जनांत स्थापिला भक्तिपंथ। पाखांड मत हें दिसे।।

महिपतबुवांच्या या श्लोकांतून रामेश्वरभट्टांसारख्या वैदिक ब्राह्मणांच्या तळपायाची आग मस्तकी कशामुळे जात होती ते समजते. रामेश्वरभट्टांनी तुकारामांवर खटला गुदरला. तुकाराम सांगतात – केला चौघाचार नेलों पांचामधीं। चौघाचारांपुढे, पंचांपुढे नेणे, दिवाणांत घालणे ही तेव्हाची पद्धत. त्यानुसार ग्रामाधिका-याकडे तुकोबांविरुद्ध तक्रार करण्यात आली. ती ऐकून चित्ती क्षोभला ग्रामाधिकारी. त्याने देहूच्या पाटलास आदेश दिला, की तुक्यासि बाहेरी दवडावा. आपल्या मतांच्या विरोधात असणारांना आपला भाग सोडून जाण्यास सांगणे ही रीत तशी जुनीच.
तुकोबा या प्रसंगाबाबत लिहितात –

काय खावें आतां कोणीकडे जावें। गावात रहावें कोण्या बळें।।
कोपला पाटील गांवींचे हे लोक। आता घाली भीक कोण मज।।
आतां येणें चवीं सांडिली म्हणती। निवाडा करिती दिवाणांत।।
भले लोकीं याची सांगितलीं मात। केला माझा घात दुर्बळाचा।

गावचा पाटील कोपला आहे. विरोधातील लोक संतापले आहेत. गाव सोडून जाण्याचा निवाडा दिवाणात झाला आहे. याचे कारण काय, तर एका भल्या माणसाने घात केला. तुकारामांनी चव सांडली, अशी तक्रार केली. तुकोबा भले लोकी म्हणून येथे ज्यांचा उल्लेख करतात ते रामेश्वरभट्टच. हा उल्लेख अर्थात उपहासाने आलेला आहे. पण मौज अशी की पांगारकरांसारखे चरित्रकार हे तुकोबांनी रामेश्वरांना दिलेले प्रमाणपत्र मानत आहेत! रामेश्वरांच्या आणि अन्य विरोधातील लोकांच्या मते तुकोबांनी चव सांडली म्हणजे नेमके काय केले? तर ते आपल्या कवितांमधून श्रुतींचा मथितार्थ सांगतात. हे त्यांचे पहिले पाप. दुसरे पाप म्हणजे त्यांना ब्राह्मण नमस्कार करतात. आणि तिसरे पाप म्हणजे हरिकीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भाविक लोकांना मोहविले. या पापांची शिक्षा त्यांना भोगावीच लागणार होती. त्यांपैकी पहिली शिक्षा होती गाव सोडून जाण्याची. ज्या गावात तुकोबांच्या विठोबाचे मंदिर होते, ज्याची इतकी वर्षे सेवा केली, जेथे त्यांच्या पूर्वजांचे घर होते, आनंदओवरी होती, कुटुंबीय होते, सगेसोयरे होते, ते सोडून जाण्याची, तडिपारीची ही शिक्षा. सर्वत्र अंदाधुंदी असल्याच्या त्या काळात अशी शिक्षा मरणप्रायच. पण त्याहून अधिक भयंकर शिक्षा तुकारामांना देण्यात येणार होती. 

महिपतीबुवांनी सांगितलेल्या चरित्रानुसार, हा आदेश मिळाल्यानंतर तुकोबा रामेश्वरभट्टांना भेटण्यासाठी तातडीने वाघोलीला गेले. त्यावेळी रामेश्वरभट्ट स्नानसंध्येस बसले होते. त्यांना तुकोबांनी दंडवत घातले आणि तेथेच हरिकीर्तन मांडले. तुकोबांना वाटले असावे, आपले अभंग ऐकून या द्विजश्रेष्ठाचे मन द्रवेल. पण तो वैदिक धर्माचा अभिमानी ब्राह्मण म्हणाला, तूं तरी यातीचा शूद्र निश्चित।। कवित्व बोलसी कीर्तनांत। त्यात अर्थ उमटत श्रुतीचे।। अधिकार नसतां बोलसी कैसें। शास्त्रविरुद्ध आम्हांसि दिसे। तरी वक्तया आणि श्रोतयांस। रौरव असे यातना।। – तू अधिकार नसतानाही जो धर्म सांगतो आहे तो शास्त्रांविरोधात आहे. तो ऐकल्यास तुझ्याबरोबरच श्रोत्यांनाही रौरवनरकात पडावे लागेल. या पापकृत्याचा नाश करायचा एकच मार्ग होता. तो म्हणजे तुकोबांनी कविता करणे थांबविणे. आता प्रश्न उरला तो आधीच केलेल्या अभंगांचा. त्यांचे काय करायचे? रामेश्वराने सांगितले, लिहिले कवित्व आपुल्या हातें। बुडवीं उदकांत नेऊनी।।
ही धर्माची सेन्सॉरशिप. कोणाही कवीला, लेखकाला त्याच्याच हातून त्याचे साहित्य नष्ट करण्यास सांगणे म्हणजे जणू आत्महत्या करण्यासच भाग पाडणे. खरेतर येथे विचारांचा मुकाबला विचारांनी करता आला असता. पण धार्मिक कट्टरतेला मुळात विचारांचेच वावडे असते. विरोधी ते संपविणे हेच त्यांचे ध्येय असते.

(http://www.loksatta.com/tuka-loki-nirala-news/sant-tukaram-abhang-2-1238362/)


No comments: