वाद पहिलेपणाचा - मराठीतील पहिला शिलालेख कोणता?

श्रवणबेळगोळ (ता. चेन्नरायपट्टण, जि. हासन, कर्नाटक) येथे भगवान बाहुबली अथवा श्रीगोमटेश्‍वराची 57 फूट 6 इंच उंचीची विशालकाय मूर्ती आहे. तिच्या पायाशी शिल्पकाराने दगडी वारूळे दाखविली आहेत. त्यांतील डावीकडील वारूळाचा उजवा भाग आणि डावा पाय यांच्यामधील जागेत दोन मराठी, दोन कानडी, एक तमिळ असे एकूण पाच लेख खोदलेले आहेत. एकेकाळी जैन धर्मीयांचे अतिशय वैभवशाली व महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या या गावात साडेसातशेहून अधिक शिलालेख आहेत.

त्यातील पहिला मराठी शिलालेख - "श्रीचावुंडराजें करविलें' असा आहे.

दुसरा लेख "श्रीगंगराजे सुत्ताले करवियले' असा आहे.

श्रीचावुंडराय किंवा चामुंडराय हे गंग राजे राचमल्ल चतुर्थ यांचे सेनापती होते. ते थोर ग्रंथकारही होते. "त्रिपष्टीलक्षणमहापुराणम' हा त्यांचा कन्नड भाषेतील लेख. चामुंडराय पुराण म्हणूनही ओळखला जाणारा हा ग्रंथ कन्नडमधील आद्य गद्य ग्रंथ समजला जातो. त्यांनी श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीची विशाल प्रतिमा उभारली. गोम्मटराय हे श्रीचामुंडराय यांचे अपरनाम. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या मूर्तीला लोक गोमटेश्‍वर म्हणू लागले.

गंगराज राचमल्ल चतुर्थ यांचा राज्यकाल शकवर्ष 896 ते 906, इ.स. 974 ते 984 असा आहे. तेव्हा या मूर्तीचे निर्माणकार्य या दशकातच झाले असावे. चामुंडरायपुराण या ग्रंथाची निर्मिती शके 900 च्या सुमाराची. त्यात चामुंडरायने केलेल्या महान कृत्यांच्या यादीत या शिल्पनिर्मितीचा उल्लेख नाही. याचा अर्थ हे शिल्प या ग्रंथनिर्मितीनंतर, म्हणजे शके 900 ते 906 या कालावधीत निर्माण झाले असावे. गंगराज राजमल्ल चतुर्थ याच्या राज्यकालाचे शेवटचे वर्ष जरी घेतले, तरी हे शिल्प शके 905 मध्ये निर्माण झाले असे ठरते.

भषिक जनतेला या लेखाची ओळख करून देण्याचा मान इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्याकडे जातो. त्यांनी 1907 साली "विश्‍ववृत्त' या मासिकातून या शिलालेखाविषयी सविस्तर शास्त्रशुद्ध लेख लिहून, त्याला मराठी पहिल्या शिलालिखिताचा मान दिला. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, "महाराष्ट्र सारस्वत'कार वि. ल. भावे यांनीही हाच मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे मान्य केले आहे.

मात्र सर्वच संशोधक, अभ्यासकांना हे मंजूर नाही!

चिं. ग. कर्वे यांनी या शिलालेखाचा काळ शके 950 च्या मागे जाऊ शकत नाही असे आग्रही, परंतु विनाधार प्रतिपादन केले आहे.

डॉ. शं. गो. तुळपुळे यांचा "प्राचीन मराठी कोरीव लेख' हा एक भव्य ग्रंथ. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ""शके 905चा म्हणून समजला जाणारा श्रवणबेळगोळ येथील हा लेख उत्तरकालीन म्हणजे शके 1039 चा असण्याची पुष्कळच शक्‍यता आहे. त्यातील दोन ओळी एकाच वेळी, म्हणजे शके 1039 मध्ये कोरलेल्या असणे हेच डॉ. हुल्ट्‌शच्या (यांनी या लेखाचे वाचन करून ठसे घेतले होते.) मते अधिक शक्‍य आहे व तसे असल्यास त्या लेखाचे प्राचीनत्व सुमारे सव्वाशे वर्षांनी कमी होते.''

डॉ. तुळपुळे यांनी आद्य मराठी शिलालेखाचा मान अक्षी (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील लेखाला दिला आहे. या लेखाची शिळा अनेक वर्षे जमिनीत पडून राहिली असल्याने लेख अतिशय खराब झाला आहे. लेखात श्रीमहालक्ष्मीसाठी काही दान दिल्याची व पुण्यकृत्य केल्याची नोंद आहे. डॉ. तुळपुळे यांच्या मते या शिलालेखाची तिथी शके 934, प्रधावी वा परिधावी संवत्सर, अधिक मास, बहुल पक्ष, शुक्रवार (16 मे 1012) अशी आहे. लेखात "पसींमसमुद्राधिपती स्त्रीकोंकणाचक्रीवर्ती' (पश्‍चिमसमुद्राधिपती श्रीकोंकणचक्रवर्ती) केशिदेव याचे राज्य होते असा उल्लेख आहे. हा केशिदेव म्हणजे उत्तर कोंकणच्या शिलाहार वंशातील अरिकेसरिन्‌ अथवा केशिदेव प्रथम, असे तुळपुळे मानतात. त्याचा राज्यकाल शके 937 ते 947 (इ. स. 1015 ते 1025) असा आहे.

परंतु डॉ. मं. गो. दीक्षित यांच्या मते हा शिलालेख केशिदेव द्वितीय (शके 1117 ते 1162, इ.स. 1195 ते 1240) याचा असून, लेखातील शकांक 1132 असा आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनीही असेच मत दिले आहे. तेव्हा अक्षी येथील शिलालेखाला मराठीतील आद्य लेखाचा मान देता येणार नाही, असा अभिप्राय पडतो.

मात्र पहिलेपणाच्या या स्पर्धेत आणखी एक शिलालेख असून, तो सोलापूर येथील आहे.

सोलापूरहून विजापूर रोडने कुंडल नजीक मुख्य रस्त्यापासून आत, आठ-दहा कि.मी. अंतरावर सीना आणि भीमा नदीच्या संगमावर हेमाडपंथी बांधणीचे संगमेश्‍वराचे मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात छताजवळ असलेल्या दगडी तुळईवर हा शिलालेख कोरलेला आहे. त्याकाळी असलेल्या साधूमहाराजांचे नाव त्यावर असून, पुढे "वाछितो विजयी होईबा' (जो लेख वाचेल तो यशस्वी होईल) असे म्हटले आहे. हा लेख केव्हा कोरला हे कळावे म्हणून त्यावर "शके 940' (इ.स. 1018)अशी नोंद केलेली आहे. सोलापूर येथील आनंद कुंभार या शिलालेखांच्या अभ्यासकास हा 1972 साली हा लेख सापडला. अर्थात तत्पूर्वी पुरातत्त्व खात्याने त्याची नोंद घेतली होती. "नवभारत' च्या जुलै 1975च्या अंकात या शिलालेखावरील लेख असून, त्यातही हा शिलालेख शके 940चा म्हणजे श्रवणबेळगोळच्या शिलालेखाआधीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रा. डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी मात्र, या शिलालेखाचे "वाचन आणि अर्थ याचा काहीही आगापिच्छा नसल्यामुळे त्याविषयी न बोलणेच बरे,' असे मत दिले आहे.

एकंदर मराठीतील आद्य शिलालिखीत वाक्‍य म्हणून "श्रीचावुंडरायें करविलें' असल्याचे बहुमान्य असले, तरी सर्वांनाच ते मान्य आहे असे नाही. "वाछितो विजयी होईबा' हे वाक्‍यही पहिले वाक्‍य असू शकते.

संदर्भ -
- "मराठीतील पहिला शिलालेख कोणता?' - प्रा. डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक 1996, पृ. 91 ते 104.
- "मराठीतील पहिले वाक्‍य' - श्‍याम भुर्के, रुची (महाराष्ट्र दिन विशेष), मे 1997, पृ. 12.

5 comments:

Anonymous said...

This comment has been removed because it linked to malicious content. Learn more.

Madhu said...

हिन्दि मे खोज!
http://www.yanthram.com/hi/

हिन्दि खोज अपका सैटु के लिये!
http://hindiyanthram.blogspot.com/

हिन्दि खोज आपका गुगुल पहेला पेजि के लिये!
http://www.google.com/ig/adde?hl=en&moduleurl=http://hosting.gmodules.com/ig/gadgets/file/112207795736904815567/hindi-yanthram.xml&source=imag

P K Phadnis said...

या विषयावर इतक्या विद्वान व्यक्तीनी लिहूनही एकमत नाही. हे महाराष्ट्राचे वॆशिष्ट्य म्हटले पाहिजे!

Sunil said...

श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या पुतळ्याजवळचा मराठी भाषेतला शिलालेख पहिला की दुसरा हा वाद क्षणभर बाजूला ठेवूया. एकाही नियतकालिकाने वा ब्लॉगने तो शिलालेख संपूर्ण छापलेला नाही. चामुंडराये करविले अशी या शिलालेखाची सुरुवात आहे आणि शेवटचं वाक्य...तेयाची माय गाढवे झविजे, हे आहे. म्हणजे जो कोणी या पुतळ्याला हात लावेल त्याला कोणती शिक्षा दिली जाईल हेही या राजाज्ञेत स्पष्ट केलं आहे.

मराठी भाषा अमृताशीही पैजा जिंकू शकेल असा विश्वास ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यातून दिला हे खरं. पण आजचं मराठी, त्यातही तथाकथित ठाकरी भाषा मराठीच्या मूळ वळणाकडे जाते. त्याच भाषेला राजकारणात कमालीचा प्रतिसाद मिळतो.
सरकारचा रवय्याही सातवाहन काळातलाच राहिलेला दिसतो, म्हणजे प्रजेची माय गाढवानी झवण्याचा.

विद्वानांनी यावरही प्रकाश टाकावा.

सुनील

Unknown said...

Best