महाराष्ट्रातले खलपुरूष 2 - राघोबादादा

राघोबादादा पेशवे यांनी मराठ्यांचा ध्वज अटकेपार नेला. याबद्दल त्यांचा गौरव जरूर केला पाहिजे. पण त्याचबरोबर हा मनुष्य महाराष्ट्राच्या इतिहासातील एका गाजलेल्या राजकीय हत्याकटाचा सूत्रधार होता, हेही विसरता येणार नाही.


पेशवाईची वस्त्रे मिळावीत यासाठी या माणसाने हयातभर कटकारस्थाने केली. नारायणराव पेशवे गादीवर आल्यानंतर राघोबादादांनी त्यांच्याविरुद्ध कारस्थाने सुरू केली. पेशव्यास दादांच्या गुप्त कारस्थानांची वार्ता कळताच ते नाशकाहून लगबगीने परत आले. राघोबा हैदरखानचा वकील आप्पाजीराम याच्यामार्फत हैदरखानाशी संधान साधून होते. तेव्हा आप्पाजीरामला बेड्या घालून पुरंदरावर ठेविले आणि राघोबादादास 11 एप्रिल 1773 रोजी वाड्यातच बंदीत ठेविले. (पृ. 347)

"दादास कैद दुःसह होऊन त्यांच्या मनाने घेतले, की आपणच नारायणरावास अटकेत ठेवून कारभार करावा.' (हरिवंशाची बखर, पृ. 1) दुसरीकडे पेशव्यांनी दादांच्या सर्व हालचाली बंद पाडून त्यांच्यावरील पहारा कडक केला. तेव्हा दादा पेशव्यांविरूद्ध कटाची उभारणी करू लागले. त्यात भवानराव प्रतिनिधी, सखाराम हरि व सखाराम बापू, चिंतो विठ्ठल आदी सरदार त्यांना सामील झाले. दादांचा हुजऱ्या तुळ्या पवार याने कटाची उभारणी केली.(तुळ्या पवारास नारायणराव पेशव्यांनी चाबकाने बडविले होते. म्हणून तो बदला घेण्याच्या विकाराने पछाडला होता.)

दादांच्या कैदेची देखरेख सुमेरसिंगाकडे पेशव्यांनी दिली होती. तुळ्या पवारने त्याला फितवले आणि दादांच्या पक्षास आणले. "सुमेरसिंग, महमद इसफ, बहादुरखान व खरकसिंग या गारदी सरदारांस पैशाची लालूच दाखवून तीन लक्षाचा करार लिहून कारभाऱ्यांनी (बापू व मोरोबा) दिला, की नारायणरावास धरावे. दादांनी ही चिठ्ठी स्वदस्तुरीने पुरी केली. ती चिठ्ठी आनंदीबाईनी पाहिली. त्यात "धरावे' होते त्या ठिकाणी "मारावे' असे केले,'' असा बखरीतला उल्लेख आहे. अशा रीतीने कटाची उभारणी झाली. त्यात मुधोजीचे वकीलही सामील झाले. अशा कटास ऑगस्ट महिना साधारणतः योग्य, कारण यावेळी पाऊस पडून शेतीच्या हंगामात सर्व सैनिक आपल्या वाडीवर जाऊन गुंतलेले असतात. त्यावेळी तीन ते चार हजार सैन्य पुण्यास होते. नारायणरावांच्या मनात आपला खून होईल याबद्दल कधी शंकासुद्धा आली नाही.

मात्र रघुजी आंग्रे यांच्याकडून पेशव्यास धोक्‍याची सूचना मिळाली होती. गारदी दंगा करणार असे पेशव्यांना समजताच त्यांनी हरिपंत फडके यास गारद्यांचा बंदोबस्त करण्यास फर्माविले. गारद्यांचे दंगे हे नेहमीचेच असतात. तेव्हा त्याचा बंदोबस्त आपण संध्याकाळी करू असा विचार करून हरिपंत गावातील भोजन समारंभास गेले.

त्याच दिवशी (30 ऑगस्ट 1773) दुपारच्या प्रहरी पेशवे वामकुक्षी करीत असता दोन हजार गारदी दिल्ली दरवाजाने आत आले. त्यापैकी शे-दोनशे लोक थोरले बाजीरावसाहेब यांचे दिवाणखान्यातून श्री गणपती महालाच्या दरवाजाजवलून मेघडंबरी बंगल्याचे दरवाजातून त पेशवे यांच्या दिवाणखान्यापुढे गाई बांधतात तेथे आले. देवघरच्या रंगमहालाचा दरवाजा बंद करून तेथे नारायणरावास कैद करावे अशा बेतात होते. इतक्‍यात रावसाहेब हुशार होऊन धावत सातखणीतून पार्वतीबाई याजकडे गेले. तेव्हा इच्छारामपंत ढेरे श्रीमंताच्या व गारद्यांच्या मध्ये आले. त्यांची झटापट गारद्यांशी होऊन गारद्यांनी त्यास तोडले. तेव्हा गारद्यांस पाहून देवघरात बसलेला नारोबा फाटक गवई भयभीत होऊन पळू लागला. हे पाहून हेच रावसाहेब असे समजून त्यास पाठीमागून वार करून ठार मारले. पहातात तो रावसाहेब नव्हते. मग गारदी प्रमुख खरकसिंग व सुमेरसिंग व तुळ्या पवार पेशव्यांच्या पिच्छास गेले. पेशवे पार्वतीबाईकडे गेले. तेव्हा बाईंनी सांगितले, की तुम्ही दादासाहेबांकडे संरक्षणास जावे, त्यावरून दादासाहेब दिवाणखान्यात निजले होते तेथे आले आणि समोर येऊन सांगितले, की मला मारावयास तिघे जण पाठीमागे आले आहेत. त्यावरून दादासाहेब यांनी सांगितले, की ""तू इथेच राहा. मी बाहेर जाऊन बंदोबस्त करतो असे सांगून उठावयास लागले.'' तोच रावसाहेब यांनी कमरेस मिठी घातली आणि म्हणू लागले की मला सोडून जाऊ नये. इतक्‍यात तुळाजी पवार वगैरे तीन असामी आत आले आणि नारायणराव याचे पाठीमागे होऊन पाय ओढू लागले. तुळाजी पवार वार करावयास आला. त्यास दादासाहेब यांनी उजवा हात पुढे केला तो तरवारेचा वार त्यांच्या हातास लागला. दुसरा वार खरकसिंग याने केला तो दादासाहेब यांचे पागोट्याचा पेच तुटून पुतळी कानापाठीमागे लागली. रक्तस्त्राव जाहला. तुळाजी पवार याने दुसरा वार केला तो नारायणराव यांचे कमरेवर लागला आणि दादासाहेबास म्हणू लागला की नारायणराव यास सोडावे नाहीपेक्षा दोघासही ठार मारितो. हे ऐकून गोविंद गणेश बारगीर याने येऊन दादासाहेबांचे कमरेची मिठी सोडविली तेव्हा सुमेरसिंग याने वार केला तो नारायणराव यांचे कुशीस लागून ठार जाहले. वाड्यात सर्वत्र एकच हाहाःकार जाहला. दादासाहेबास फडावरच्या खणात आणून बसविले. इतक्‍यात वाड्यात गडबड झाली ही बातमी शहरात पसरली. बातम्यावर बातम्या येऊ लागल्या. पहिली बातमी आली की नारायणराव ठार जाहले.
(ही हकीकत महादजी राम कर्दीकर या नावाच्या दादासाहेबांच्या आश्रिताने लिहून ठेविली. ती महाराष्ट्र अर्काईव्हज बुलेटिन, क्र. 4 मध्ये प्रसिद्ध झाली, त्यातून घेतली आहे.)

या दुष्कृत्यात एकंदर ब्राह्मण आसामी सात, एक हुजऱ्या, एक नाईक, दोन कुणबिणी व एक गाय इतकी ठार झाली. गारद्यांनी नंतर राघोबादादा पेशवे झाल्याची ग्वाही फिरविली. बाहेर मुत्सद्दयांनी शहर कोतवालाकडून शहरची नाकेबंदी करविली. सर्व मुत्सद्दी कोतवाल चावडीत जमले. भवानराव प्रतिनिधी आपल्या लोकास बाहेर ठेवून एकटेच आत गेले. त्यांनी दादांची भेट घेतली. त्यावेळी दादाजवळ तुळाजी पवार, खरकसिंग व सुमेरसिंग होते. त्यांनी अभय मागितले व आपले देणे पुरे करावयास लाविले. दादासाहेबास एकांती घेऊन भवानरावाने दादांच्या संमतीने आपले लोक आत घुसविले आणि ठिकठिकाणी चौकी पहारे बसविले. त्रिंबकराव मामास बोलावणे पाठविल्यावर ते आत येऊन त्यांनी दादांचा निषेध केला.

दादासाहेबांनी उत्तर केले की, होणारास उपाय नाही. तुम्ही आत जाऊन पुढील उपाय काय तो करणे. त्याप्रमाणे उत्तरकार्याची तजवीज पार्वतीबाईचे विचारे केली. श्रीमंतांचे प्रेत ओंकारेश्‍वरापासी नेण्यासाठी दिल्ली दरवाजाने बाहेर काढिले. ओंकारेश्‍वरावर सर्व मुत्सद्दी मंडळी जाऊन प्रायश्‍चित्त संस्कार करून मंत्राग्नि त्रिंबकराव मामा याजकडून दिला. दहन करून चौदा घटिका रात्री आपापले घरी सर्वत्र गेले. (पेशवे बखर, पृ. 71, मराठी दप्तर रूमाल 2, पृ. 101)

भवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे आणि राजाबा पुरंदरे यांनी राघोबादादांची त्याच रात्री वाड्यात भेट घेतली. तेव्हा त्यास आढळून आले, की दादा स्वतः गारद्यांचे कैदी बनलेले. कारण गारद्यांनी पुरंदर नगर आणि साष्टी येथील तीन किल्ले आणि बक्षिसादाखल पाच लाख रुपये दादासाहेबांकडे मागितले. जर ती रक्कम आपणास मिळाली नाही, तर आम्ही अलिबहादूर यास पेशवा करू अशी धमकी त्यांनी दादास दिली. शेवटी भवानराव प्रतिनिधींच्या मध्यस्तीने गारद्यांचा गुंता उरकला. तीन किल्ल्यांऐवजी पाच लाख रुपयांबरोबर आणखी तीन लाख घेण्याचे कबूल केले.

नारायणरावांबरोबर त्यांची बायको गंगाबाई सती जाण्यासाठी आकांडतांडव करीत होती. पण सतीचा शाप बाधेल या भीतीने दादांची बायको आनंदीबाई यांनी तीस खोलीत कोंडून ठेविली. (खरे, भा. 4, ले. 1257, 1262) शिवाय तिला दिवस गेले होते.

हा बनाव सहा महिने अगोदर शिजत होता. सखारामबापू व दादास साखळदंड घालून कैद करणार असे दोघांनाही समजल्यावरून हा कट सिद्धीस नेण्याची घाई त्यांनी केली. बहुतेक कारभारी नारायणरावास धरावे या कटात होते. ग्रॅंट डफसुद्धा ह्या "ध चा मा'त आनंदीबाईचा हात होता हे कबूल करतो. सखारामबापूचे "नारायणरावास धरावे' या कटात अंग होते. पण त्यांचा वध झाल्यावर मात्र बापू पश्‍चात्तापदग्ध होऊन कित्येक दिवस पर्वतीच्या रानात फिरत होते.

रामशास्त्री प्रभुणे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी खुनाच्या चौकशीचे काम हाती घेतले. त्यात असे दिसून आले, की नारायणरावाचा खून करण्याचा मूळ कट नसून त्यास धरावे असे होते. हा कट राघोबाचे पाठीराखे आणि हितचिंतक यांनी खुनाच्या अगोदर पुरे सहा महिने शिजवला. त्यात मुख्य सूत्रधार राघोबादादा असून आणखी 49 लोकांनी भाग घेतल होता. त्यापैकी 13 गारदी (8 हिंदू व 5 मुसलमान), 26 ब्राह्मण, 3 प्रभू व 7 मराठे गुन्हेगार होते.

सरदारांपैकी नाना फडणीस यास सखारमाबापू व चुलतभाऊ मोरोबा याचा संशय होता, शिवाय आनंदीबाईचाही वहीम होता. नाना फडणीसांनी सत्ताग्रहण केल्यावर पहिल्या दोघांस अन्य कारणास्तव कैदेत ठेविले. आनंदीबाईस नानांनी जिवंत असेपर्यंत कैदेतच जीवन काढण्यास भाग पाडले.

(महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - ड. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 350 ते 354)

(टीप - गारदी हे शनिवारवाड्याचे रखवालदार होते. त्यांच्यात भरणा उत्तर हिंदुस्तानातील पठाण, अबिसिरियन अरब, राजपूत पुरभय्या यांचा होता.)

6 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

लेख माहितीपूणं आहे. मात्र नारायणराव हा फार पोरकट व अविचारी होता व त्याच्याकडे पेशवाई राहिली असती तर कोणते अनर्थ कोसळले असते देव जाणे!

निळकंठ said...

ग्रांट डफ्फ हा काही फार विश्वासू इतिहास कार नाही.राघोबादादा बद्दल बरेच काही बोलले जाते,हा माणूस नक्कीच युद्धात कुशल होता,पानिपत सारख्या मोहिमेवर त्याला न पाठवता भाऊ साहेबाना पाठवले आणि नंतर कुमक करण्यस सुद्धा नाना साहे स्वता निघाले,जर का कुमक करण्यास दादा असते तर कदाचित अगदी कदाचित पानिपत बदलले पण असते.दादानी पेशवाई नाकारली होती(reference aathavat nahi).त्यांचे माधवरावान बरोबर सुद्धा फारसे सख्य नवते.बापू बोकील आणि इतर मंडळीच्या ते आहारी गेले होते............असो पण तरी हि त्यांचे व्यक्तिचित्र नक्की कसे असेल ते सांगता येत नाही कारण मंजे स्वभाव;त्यांना सांबा चा अवतार मान्ह्ले जाई,दान धर्म इत्यादीन वर त्याचा विश्वास होता.
एकंदरीतच फार इंटरेस्टिंग विषय आहे हा,दादाचा स्वभाव आणि दादा असे का वागले????

Santosh Karkhanis said...
This comment has been removed by the author.
Santosh Karkhanis said...

नारायणराव पेशवा हा अत्यंत पोरकट आणि हलक्या कानाचा होता. राघोबादादा हे अटक मोहिमेचे प्रमुख होते. अत्यंत शूर होते. परंतु त्यांची अत्यंत अवहेलना करण्यात आली. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांच्याबरोबर अटक मोहिमेत असलेल्या सरदारांना अत्यंत अपमानाची वागणूक देण्यात आली. अटक मोहिमेचे सेनापती आंबेगावकर गुप्ते या सरदारांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळून आंबेगाववर पेशव्यांचे सैन्य पाठविण्यात आले. आंबेगावकर गुप्ते आंबेगाववरून निघून बडोद्याच्या गायकवाडांकडे आश्रयास आले. त्यांच्या बरोबर अटक मोहिमेतील अनेक शूर सरदार गायकवाडांकडे आले. नारायणराव शनिवार वाड्यातील कारस्थानी लोकांच्या कारस्थानांना बळी पडून पेशवाईची वाताहत करीत होता. त्यामुळे पेशवाई वाचविण्यासाठी नाईलाजाने नारायणरावला पकडण्याची आज्ञा द्यावी लागली. यात नारायणराव पळाल्याने आपणास शिक्षा होईल या भीतीने गरद्यानी त्याला मारले. आनंदीबाईने 'ध' चा 'मा' केला ही राघोबादादाला वाचवून पेशवाईची प्रतिष्ठा राखण्याचा केलेला प्रयत्न वाटतो. शेवटी स्त्रीला आपल्या पतीसाठी बकरा बनविले.

Unknown said...

हे मात्र खरं आहे

Unknown said...

MandDoba, पानिपत च्या आधी रघुनाथ राव दोन वर्षे पंजाब प्रांती मोहिमेवर होता. म्हणून त्याला कदाचित vishramदेण्यात आला असावा .