
समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते काय, हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय राहिलेला आहे. या वादात स्वाभाविकच दोन पक्ष आहेत. पहिला पक्ष आहे महाराजांची व समर्थांची भेट शके 1571 मध्ये झाली होती असे मानणारांचा, तर दुस-या पक्षाचे म्हणणे आहे, ही भेट शके 1594 मध्ये झाली होती.
पक्ष पहिला
पहिल्या पक्षानुसार छत्रपती आणि रामदास स्वामी यांचे अतिशय निकटचे संबंध होते. शिवाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचे जे कार्य हाती घेतले होते, त्यामागील प्रेरणा समर्थांची होती. यास आधार म्हणून शिवाजी महाराजांनी रामदासांना लिहिलेले एक पत्र सादर करण्यात येते. चाफळची सनद म्हणून ते पत्र ओळखले जाते. ते असे -
" श. 1601-2
सु. 1080-81
इ. स. 1679-80
शिवाजी-रामदास
चरणरज शिवाजी राजे यानी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे, मजवर कृपा करूनु सनाथ केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव ब्राह्मणांची सेवा, प्रजेची पीडा दूर करून पाळणा रक्षण करावें. हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा; विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऎशीं स्थळें दुर्घट करावी; ऎसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें पूर्ण केलें. या उपरी राज्य संपादिलें. तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऎसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं, तुम्हास पूर्वी धर्म सांगितलें तेच करावे. तीच सेवा होय. ऎसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची स्थापना कोठे तरी होउनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऎशी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगव्हारी वास करुनु चाफळी श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंतविस्तिर्णता घडली."
(शिवकालीन पत्रसार संग्रह 2237)
या पत्राचा मायना पाहता शिवाजीराजे यांच्या जीवनात रामदासांचे अतिशय महत्त्वाचे स्थान होते, असे दिसते. शिवरायांनी रामदासांच्या झोळीत राज्य टाकले होते, अशी कथा सांगण्यात येते. तिचाही उल्लेख या पत्रात आहे. या पत्राचे महत्त्व हे, की यावरून स्वराज्याची उभारणी होण्यापूर्वीच समर्थांची व शिवरायांची भेट झाली असली पाहिजे हे स्पष्ट होते.
याशिवाय शिव-समर्थांच्या भेटीस अनेक कागदपत्रे आणि ऎतिहासिक संदर्भ यांचे पुरावे आहेत. यातील सर्वांत विश्वसनीय मानला जाणारा पुरावा आहे तो समर्थ वाकेनिशीचा. वाकेनिशी म्हणजे हकीकतीचे टिपण. समर्थ वाकेनिशीमध्ये त्यांच्या दिनचर्येचे वर्णन येते. ती त्यांच्या हयातीतच अनंत गोपाळ कुडाळकर (वाकेनिस) यांनी लिहून ठेवली होती. समर्थ समाधिस्त झाल्यानंतर तीनच दिवसांनी (म्हणजे 25 जानेवारी 1682 रोजी), त्यांच्या चरित्रातील महत्त्वाच्या गोष्टींचे टिपण वाकेनिसांनी लिहून ठेवले होते. तीच समर्थ वाकेनिशी या नावाने प्रसिद्ध आहे. या वाकेनिशीतील अठराव्या टिपणात पुढील नोंद आहे. - "शिवाजी महाराज यास अनुग्रह शके 1571त शिंगणवाडीचे बागेत वैशाख शुद्ध नवमीस गुरुवारी झाला."
हनुमंतस्वामी यांच्या बखरीतही हीच तारीख दिलेली आहे. हनुमतस्वामी हे समर्थांच्या घराण्यातीलच. समर्थांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी यांच्यापासून ते चौथे पुरुष होत. पूर्वीच्या काळी पूर्वजांच्या आठवणी लिहून ठेवण्याची पद्धत होती, तीनुसार त्यांनी ठोसर घराण्याच्या अनेक आठवणी नोंदविल्या आहेत. हनुमंत स्वामींनी समर्थ चरित्र सांगणारी ही बखर समर्थ समाधिस्त झाल्यानंतर एक वर्षाच्या आत लिहिली होती.
शिवाजी महाराजांनी 62 व्यक्तींना स्वतः राज्याभिषेकाचे आमंत्रण दिले होते. साता-याचे इतिहाससंशोधक पारसनीस यांनी या 62 लोकांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यात पहिले नाव रामदासांचे आहे. मात्र रामदास या समारंभास उपस्थित राहिले नव्हते. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो अशी त्यांची वृत्ती असल्याने ते या सोहळ्यास हजर नव्हते इतकेच.
चाफळ, सज्जनगड आणि शिवथर घळ येथे शिव-समर्थांच्या अनेक भेटी झाल्याचे गिरीधर स्वामींनी त्यांच्या समर्थ प्रतापमध्ये नमूद केले आहे.
यावरून शिवाजी महाराज यांची व समर्थ रामदासांची भेट शके 1571 मध्येच झाली आणि रामदास हे शिवाजीचे गुरू होते, असे स्पष्ट होते.
पक्ष दुसरा
शिवाजी महाराज व समर्थांची भेट शके 1571ची म्हटल्यावर शिवरायांच्या कार्यामागे समर्थांची प्रेरणा असल्याचे आपोआपच सिद्ध होऊन जाते. दुस-या पक्षास हे मान्य नसून, त्यांच्या म्हणण्यानुसार राजांच्या स्वराज्य उभारणीशी समर्थांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या मते ही भेट शके 1594 किंवा त्यानंतरची आहे. यावेळेपर्यंत शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभारणीचे काम संपत आले होते. तेव्हा रामदास हे जरी त्यांचे गुरू ठरले तरी ते केवळ मोक्षगुरू ठरतात.
हा 1594चा वाद सुमारे शंभर वर्षांपूर्वी रा. रा. गोविंद चांदोरकर यांनी प्रथम निर्माण केला. चांदोरकर हे वारकरी सांप्रदायाचे अभिमानी होते. आणि वारकरी सांप्रदायाच्या संतमालिकेत रामदासांना स्थान नाही, हे तर सर्वश्रुतच आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी समर्थांची बाजू घेऊन वारकरी संतांना टाळकुटे वगैरे म्हटल्याने चांदोरकर दुखावले होते. तशात त्यांना रामदासी सांप्रदायासंबंधी काही पत्रव्यवहार उपलब्ध झाला. त्यात त्यांनी शके 1594 साली केशव गोसावी यांनी दिवाकर गोसावी यास लिहिलेल्या एका पत्राची नक्कल सापडली. ते पत्र असे -
"श्री गुरुभक्त-परायण राजमान्य राजेश्री दिवाकर गोसावी यासी प्रतिपूर्वक केशव गोसावी नमस्कार. उपरि येथील कुशल. आपण पत्र पाठवले ते पावले. मजकूर समजला. राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते समजले. मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली. येणे होत नाही. मी इकडून येणेसाठी लिहिले. परंतु एकाचेही येणे व्हावयाचे नाही. गावी भानजी गोसावी तेथे असतील. राजे ह्यांची पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटेस आणावे. उपयोग होईल. झाडी बहुत आहे. लोभ करावा मीति चैत्र व।। 1 शके 1594 हे विज्ञाप्त."
या पत्रात 'राजे ह्यांची पहिलीच भेट आहे' असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ राजे व समर्थांची तत्पूर्वी भेटच झाली नव्हती असा होतो. त्यामुळे बाकीच्या बखरींचे सर्व पुरावे गळून पडतात व शिवरायांनी समर्थांचा अनुग्रह घेतला असेल, तर तो यानंतर म्हणजे वयाच्या 42व्या वर्षानंतर असे सिद्ध होते.
हे झाले दोन पक्ष. यात पहिल्या पक्षाचे पारडे जड आहे, हे दिसतेच आहे. त्यांच्याकडे भरपूर पुरावे आहेत. त्यातील काहींबाबत संशय घेण्यास जागा असली तरी हे पुरावे शिव-समर्थांचे संबंध शिवरायांनी कार्यारंभ केला तेव्हापासूनचे आहेत हे सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, असे दिसते व दुस-या पक्षाचा सर्व डोलारा केवळ पहिलीच भेट झाली या एका वाक्यावर अवलंबून आहे हेही दिसते.
तिसराच पक्ष
मात्र सध्या एक तिसरा पक्ष जोर धरू पाहात आहे. येथे त्याबाबत लिहावे की न लिहावे असा संभ्रम काही क्षण मला पडला होता. या पक्षाचे म्हणणे असे, की रामदास आणि शिवाजी यांची कधी भेटच झाली नव्हती. आता हे काही आजचे मत नाही. प्रा. न. र. फाटक यांनी तर 1929 मध्ये असे मत मांडले होते. जुलै 1929 च्या 'विविधज्ञानविस्तारा'त त्यांनी म्हटले आहे, की "जवळच्या समकालीन लेखकांनी या दोघांच्या आपसातील संबंधांचा ओझरतासुद्धा उल्लेख करू नये व मागून झालेल्या लेखकांनी तोच संबंध कादंबरीसारखा विलक्षण गुंतागुंतीच्या विस्तारासह नमूद करावा ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे." (पृ. 256) मात्र आज हे मत मांडताना सभ्यतेच्या किमान मर्यादाही पाळल्या जात नाहीत. त्याचे उदाहरण म्हणून नागपूरच्या प्रा. मा. म. देशमुख यांच्या 'रामदास आणि पेशवाई' या पुस्तकाकडे पाहता येईल.
या पूर्वीच्या दोन लेखांमध्ये आपण रा. रा. पु. ना. ओक आणि रा. रा. आचवल यांचे 'इतिहाससंशोधन' पाहिले होते. त्यांना त्याद्वारे वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व कथन करायचे होते. रा. रा. देशमुख यांना त्यांच्या संशोधनातून ब्राह्मणांना ठोकायचे असून, बहुजन समाजाला पेटवायचे आहे.
रा. रा. देशमुख यांच्या पुस्तकातील रामदासांविषयीच्या प्रकरणाचे नावच मुळी 'रामदास औरंगजेबाचा हेर होता' असे आहे. त्यांच्या मते - रामदास शिवाजीचे गुरू नव्हते. पण दिनायतराव, मुरार जगदेव, मुधोळचा बाजी घोरपडे या विजापूरच्या अदिलशहाच्या अंमलदारांचे, शिवाजीच्या शत्रूंचे ते गुरू होते. या अंमलदारांनी रामदासांच्या नव्या देवस्थानाला जमिनी इनाम दिल्याचा उल्लेख आहे. ज्या वर्षी शिवाजी राजांच्या पुंडाव्याबद्दल अदिलशहाने आपल्या अंमलदारांना जरबेची पत्रे लिहिली, त्याच वर्षी त्याच्याच हुकुमाने रामदासांनी मसुराच्या रामनवमीच्या उत्सवात आलेली आडव्या फांदीची अडचण निस्तरून घेतली.
रामदास आणि औरंगजेबाचे संबंध होते. कधी कधी प्रसंगोपात त्यांच्या भेटी होत. त्या भेटी देव एकच आहे हे सांगण्याकरीता होत, असे 'दासविश्रामधामा'त म्हटल्याचे रा. रा. देशमुख यांनी रा. रा. शंकरराव देव यांच्या 'समर्थचरित्रा'चा हवाला देत आपल्या लेखात म्हटले आहे.
संभाजीराजांचे वर्तन सुधारावे म्हणून शिवरायांनी त्यांना शृंगारपुरी ठेवले होते. संभाजी सोबत तेथे उमाजी पंडित होता. तेथून संभाजी सज्जनगडावर रामदासांची भेट घेण्यासाठी गेला आणि त्याच्या दुस-याच दिवशी सज्जनगडावरून तो थेट औरंगजेबाचा सुभेदार दिलेरखानाकडे गेला. तारीख होती 13 डिसेंबर 1678. ही घटना रा. रा. देशमुख यांनी रामदासांच्या हेरगिरीचा नमुना म्हणून दिली आहे! म्हणे, रामदासांच्या सत्संगतीचा संभाजीवर असा परिणाम झाला!
रा. रा. देशमुख यांची एवढी उद्धृते पुरेशी आहेत. या पुस्तकात त्यांनी याहून कहर केला असून, रामदासांवर थेट अनैतिक असल्याचे आरोप केले आहेत.
जातीयवादी प्रचाराचा उत्तम नमुना एवढेच म्हणून या पुस्तकाकडे पाहावे.
-----------------------------------------------------
वास्तविक शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी असे होते, त्यांनी त्यांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा दिली असे म्हटल्याने काहीही बिघडत नाही. शिवाजी महाराजांचे तसे गुरू आणखीही काही होते. त्या काळच्या अनेक संतसज्जनांशी त्यांचे संबंध होते. त्यांच्या भेटी ते घेत असत. प्रेरणांचे म्हणावे, तर ती जशी धार्मिक ग्रंथ नि पुरूषांपासून मिळते, तशीच ती आजुबाजूच्या वास्तवातूनही मिळत असते. आणि राजांचा या वास्तवाकडे कधीही काणाडोळा झालेला नाही. फार फार तर येथे एवढे म्हणता येईल, की रामदासांशी संबंध असल्याचे सांगून राजांना उगा हिंदुत्ववाद्यांच्या रथात नेऊन बसवू नये.
संदर्भ -
- महापूर - आचार्य अत्रे, परचुरे प्रकाशन मंदिर, पहिली आवृत्ती ऑगस्ट 1999, या पुस्तकातील समर्थांचे सत्वहरण भाग 1 ते 3 हे लेख - पा. 190 ते 203.
- छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे - प्र. न. देशपांडे, सुषमा प्रकाशन, धुळे, पहिली आवृत्ती 1983, पत्र क्र. 193, पा. 243.
- रामदास आणि पेशवाई - प्रा. मा. म. देशमुख, शिवभारती प्रकाशन, पहिली आवृत्ती 1992.
- शिव-समर्थ भेटीचे अनेक पुरावे - सुनिल चिंचोलकर, सज्जनगड मासिक पत्रिका, 16 फेब्रुवारी 2001, पा. 25 ते 28.
21 comments:
विसोबा उत्तम लेखन. टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष्य करा. पक्षनिरपेक्ष लेखन चालूच ठेवा. मला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूंबद्दल जाणुन घ्यायचे आहे.
Your view about Ram Dasa is +ve. While reading your previous posting I like your blog very much but RAMDASA is Originally SPY of ADILSHAHA and he was not GURU of Shivaji And also M.M Deshmukh wrote all true facts .
A.P.Patil
ra. ra. wamanrao,
netajinchi death ha mazahi autsukyacha ani abhyasacha vishay aahe.
mi nakkich tyavar yenar aahe. khare tar tyavar ekhade pustak lihave ase mazya mani aahe. tayari suru aahe.
- visoba
हा लेखही उत्तम आहे विसोबा. देशमुखांबाबत काय बोलावे? त्यांनी थोरल्या बाजीरावाचे पितृत्व धनाजी जाधवरावांना बहाल केलेले आहे. सोईचे वर्तमान हवे असेल, तर त्याला साजेलसा सोईचा इतिहासही तयार करायला नको का?
शके 1571 म्हणजे इसवी सण किती ?
बाकी तुमचा ब्लॉग खूप आवडला. एवढे सगळे पुस्तके तुम्ही कसे शोधता???????
स्वप्निल...
एकोनिसाव्या शत्काच्या आरंभी चिटनिसाने आपल्या बखरित रामदासला आणिले ब्राम्हनाभिमानी सनातन पक्षाने राम दासा ला पुढे केले,नको असलेल्या लोकांचे नको असलेले मत जनते समोर येवूच नये.अशी योजना कर न्यात ब्राम्हण आजतागायत यशस्वी झाले आहेत,पन हे किती दिवस चालायचे ?रामदास हा शिवरायांचा गुरु तर नव्हताच उलट तो आदिलशहाचा हेर होता.
रामदासाने आदिलशहास अर्जी केली होती की शिवरायाँच्या राज्याची धुलधान व्हावी,
सन्दर्भ :-
1)daasbodh(original print)
2)त्र्य शं शेलवलकर ह्यानी लिहिलेले शिवचरित्र
3)"ramdas ha adilshahacha her hota" at www.sambhajibrigade.blogspot.com
thank you.
उत्तम व अभ्यासपूर्ण लेख. या संदर्भात तीसराही पक्ष आहे याचा उलगडा मला आजच होतोय. हरकत नाही. शेवटी "सत्यमेव जयते". कधी कधी वेळ हा लागू शकतो.
जातीयवादी प्रचाराचा उत्तम नमुना एवढेच म्हणून या document kade पाहावे.
Sudhara jaratari.
Deshache kalyan Hoyil.
Tumache(YOU ALL) swatache kalyan hawe asel tar CONTINUE but I(WE) need to give you BEST OF LUCK because it is now very very difficult(IMPOSSIBLE).
I like to read these kind of documents .
I like your blog But I want to suggest you THINK TWICE before publishining anything .
BEST OF LUCK ..
--- > A person who wants to remove CASTE system from HINDU .
http://dhobipachhad.blogspot.com/2008/10/blog-post.html
नमस्कार विसोबा!
लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच्....मी समर्थांच्या या विवादासंदर्भात तिसरा प़क्ष आहे हे फक्त ऐकुन होते ...तुंम्ही ३र्या पक्षाच्या अनुषंगाने दिलेले संदर्भ विकत घेऊन वाचण्याजोगे नक्कीच नाहित या निष्कर्षाप्रत मी आले आहे...ज्यांचे विरोधात्मक प्रतिसाद आलेत त्यांना त्यांची मुळ ओळख देण्याचे देखिल धाडस होवू नये यावरुन त्यांच्या विकृत मानसिकतेचेच दर्शन घडतेय....आपल्या अनुदिनीवरील आपले सर्व लिखाण हे आपण निरपेक्षबुद्धिने करित असल्याचेच दर्शवते...बाकी अवास्तव टिका करणार्यांना अनुलेखानेच मारणे योग्य....
Pandya ha maza khas mitra ahe.....
Ajun 200 varshyanantar te kunalach mahiti nasanar ahe ...karan mi te kuthetari lihun thevale nahi.....
....Vadatun fact ekach hot.... vade vade jayate tatvbodha.......... Tya goshtitil bodh /satyapana nighun jato.......
>>>>>>>>>>>>> The great Nandu.......
Baki lekh chan ahe....... Satya katu asatach.....Tiraskar karanarya lokana te pachavanyachi shakti nasate mhanun te ugach swatachya mothepanasathi changalya kinva satya goshtila dushan lavat asatat........Aso ....al tar al nahitar tel lavat gel........
>>>>>>>>The great Nandu...
"शिवकालीन पत्रसार संग्रह 2237" या पत्राची प्रत जर पहावयास मिळाली तर बरे होईल. आणि जर तुम्ही या पत्राची एक प्रत स्क्यान करून याच पेज वर अपलोड केली तर बरेच प्रश्न सुटतील. सर्वांनाच हे असे ऐतिहासिक दस्त्वेज पहावयास व अभ्यासास मिळतातच असे नाही पण जर तुमच्या कडे असलेले हे पुरावे इथे पोस्त केलेत तर बरे होईल आम्हास.. धन्यवाद
पाटिल पाहिल का तुम्हाला 8 वर्षा मधे एकाने पण साधा रिप्लाय सुद्धा दिलेला नाही
यावरून स्वताची योग्यता ओळखा तुम्ही
दूसरी गोष्ट इथे दोन्ही बाजूचे पुरावे जे आहेत त्या
स्पष्ट पने पुराव्या सहित ईथे दिलेल्या आहेत
आता तुम्ही दिलेले पुरावे म्हणून संधर्भ एकदा स्वता पहा
दासबोध ओरिजनल प्रिंट मधून तुम्ही कोणता पुरावा दिला आहे ते सांगा...???
शेलवालकर हे काय महाराजांच्या दरबारा मधले भालदार आहेत की चोपदार आहेत तेंव्हा त्याचं पुस्तक हे पुरावा कस होईल..???
आणि राहिला प्रश्न संभाजी Bग्रेड च्या ब्लॉग चा तर तुमची Bग्रेड चा लेख हां पुरावा कसा होऊ शकतो..???
आता हे समजन्या एवढी अक्क्ल असती तर तू Bग्रेड मधे कसा गेला असता म्हणा
तुला खर सांगायच तर तुम्ही लोक आशा कुठेही प्रतिक्रिया नका देत जाऊ
कारण त्यामधुन तुम्हा लोकांच् अज्ञान दिसून येत
लोक हसतत रे तुम्हाला
थोड़ी अक्क्ल वापरात चला रे
||अवघे मिळाले आंधळे, तेथे डोळसाचे काय चाले||
छान लेख.. तटस्थ दृष्टीकोन... त्यामुळे लेख महत्त्वपूर्ण आहे
छान लेख.. तटस्थ दृष्टीकोन... त्यामुळे लेख महत्त्वपूर्ण आहे
ramdas smami he shivrayanche guru navhate ase tumhi kuthachya puravyavarun bolata.shivaji maharajanchi patre vachayal abhyas lagto.Ti vachali ani kalali asa nahi.Ti patra samjayala tyakalchya paristhicha abhyas karava lagato.Are dasbodh sarakha granth lihinara manus aurangjebachi satha karel kay.Tyamule kontyahi lekhakavar vishwas theun va kuthachyahi patracha ayogya artha kahun ramdas swaminna badhanam karu naye hi namra vinanti.
thank you
👍👍👍
आई वडील हे सर्वांचेच प्रथम गुरु असतात.त्यामुळे राजमाता जिजाऊसाहेब शिवरायांच्या गुरु होत्याच.शिवाय अनुभव हा प्रत्येकाचाच गुरु असतो.रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही हा वाद व्यर्थ आहे.रामदास शिवरायांचे गुरु होते म्हटल्याने शिवराय लहान होत नाहीत.शिवाजी महाराज प्रचंड मोठे होते म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे एवढे मोठे कार्य त्यांच्याकडून झाले.रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होते हे नक्कीच.तसेच संत तुकाराम महाराजांनी शिवरायांना उद्देशून केलेल्या अभंगातून व रामदास स्वामींना शिवाजी महाराजांबद्दल असलेल्या आदरावरून त्यांचं नातं गुरूशिष्याचं असावं हे सिद्ध होतं.वाद करण्यात अर्थ नाही.
अगदी बरोबर बोललात सर.कोर्टाने या बाबतीत समकालीन पुरावे पाहून योग्य तो निर्णय दिला आहे..
Post a Comment