संभाजीराजे. मराठी राज्याचे वारसदार. ते स्वराज्याच्या शत्रूस जाऊन मिळाले. गोष्ट मोठी दुर्दैवी आहे. संभाजी राजांच्या चरित्रावरील हा सर्वात मोठा, कोणत्याही युक्तिवादाने, कोणत्याही कारणाने पुसला न जाणारा कलंक आहे.
एरवी सरदार, वतनदार यांनी असे पक्षांतर करणे ही तर त्या काळची रीतच होती. माणसं निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून मोगलांकडे अशी जात-येत असत. खुद्द औरंगजेबाचा मुलगा मराठ्यांना सामील झाला होता. पण संभाजीराजे हे काही सामान्य जहागिरदार, वतनदार, सरदार नव्हते. ते कोणा भोसलेशाहीचे वारसदारही नव्हते. शिवाजीराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. ते रयतेसाठीचे राज्य होते. ते हिंदवी स्वराज्य होते. श्रींच्या इच्छेने झालेले ते राज्य होते. आणि म्हणूनच संभाजीराजांचे पक्षांतर ही सर्वांचेच काळीज खाणारी गोष्ट बनली होती. प्रा. वसंतराव कानेटकरांनी तर संभाजीराजांच्या या कृत्यामुळे शिवरायांना एवढा धक्का बसला, की ते खचलेच, असे म्हटले आहे. "शिवछत्रपतींच्या दिग्विजयाने हिंदवी स्वराज्याचा वृक्ष महाराष्ट्राबाहेरही फोफावत असता, त्याच्या (संभाजीच्या) हातून शत्रूस मिळण्याचा अविचार घडून आला. त्याबद्दल इतिहास त्यास कधीच क्षमा करू शकत नाही," अशा शब्दांत डॉ. जयसिगराव पवार यांनी आपला क्षोभ व्यक्त केला आहे.
हे सर्व असले, तरी एक प्रश्न उरतोच, की छत्रपतींसारख्या युगपुरुषाचा हा पुत्र, छत्रपती आणि जिजाऊंच्या संस्कारात वाढलेला हा सुसंस्कृत युवराज, एकाएकी उठतो आणि शत्रूच्या गोटास जाऊन मिळतो, ते कोणत्या कारणाने?
औरंगजेबाच्या आदेशाने दिलेरखानाने संभाजीराजांस आपल्या बाजूस आणण्यासाठी जे पत्र लिहिले त्याला उत्तर म्हणून संभाजीराजांनी एक गुप्त पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, "माझ्या हिताची म्हणून तुम्ही जी गोष्ट सांगितली ती तशी घडून येईल, याहून वेगळे नाही, असे माझ्या मनात आहे. आपल्या पत्रातून मला असे दिसून आले की, सर्वांची मने एकच असतात. परंतु ज्या प्रदेशाची जबाबदारी माझ्यावर सोपवून दुसरा प्रदेश जिंकण्यासाठी अगदी बिनधास्तपणे माझे वडील निघून गेले आहेत ते इथे परत येईपर्यंत मी आपण सुचविलेली मोहीम स्वीकारू शकत नाही. आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही. परंतु आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या वैभवाने मी त्यांना संतुष्ट करीन. स्वतःची खरी योग्यता स्वीकारण्यात परिश्रम कसले? आणि दिल्लीपती माझ्या बाजूस आल्यावर काय सांगावे? (ही चांगलीच गोष्ट आहे.) माझ्या बाजूचे म्हणून आपण मला पाठविलेले पत्र आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. मैत्रीच्या बाबतीत आधार आहे. आपण आपल्या पत्रामध्ये 'आपला' असे संबोधून स्नेह जुळविला आहे. तो स्नेह प्रत्यक्षात साकार होईल अथवा नाही, याबद्दल मुळीच संशय नको." (परमानंदकाव्यम्, संपादक - गो. स. सरदेसाई, बडोदा, 1952, पृ. 78, श्लोक 22-31)
या पत्रातील 'मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही' हे उद्गार काय सांगतात? मनात चलबिचल असताना, संभाजीराजांच्या मनात वडिलांबद्दल अशा भावना होत्या. आणि तरीही ते मोगलांना जाऊन मिळाले, म्हणजे त्यासाठी तसेच काही कारण असले पाहिजे, तशीच काही परिस्थिती निर्माण झाली असली पाहिजे किंवा निर्माण केली गेली असली पाहिजे.
काय होते ते कारण? काय होती ती परिस्थिती?
6 जून 1676 रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर गृहकलह निर्माण झाला. राजाभिषेक प्रसंगीच आपणास पट्टराणीचा मान मिळाला तरी आपल्या पुत्रास युवराजपदाचा मान न मिळता तो संभाजीराजांकडे गेला, याचा अर्थ राज्याचा वारसा आपल्या मुलाला मिळणार नाही, याचे दुःख सोयराबाईस झाले असले पाहिजे असा तर्क 'शिवपुत्र संभाजी'कार डॉ. कमल गोखले करतात. जिजाऊसाहेबांच्या मृत्युनंतर सोयराबाईंच्या मनातील या विचारास प्रकटीकरणाचे धैर्य झाले असणार.
या काळात एकीकडे सोयराबाई अस्वस्थ झाल्या होत्या आणि दुसरीकडे अष्टप्रधानमंडळातील काही प्रधानही संभाजीराजांवर नाराज होते. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार संभाजीराजे राज्यकारभारात लक्ष घालू लागल्यानंतर त्यांच्या आणि प्रधानांच्या वितुष्टास प्रारंभ झाला असावा. यातून रायगडावर अशी परिस्थिती निर्माण झाली, गृहकलह इतका टोकाला गेला, की अखेर राज्याच्या वाटण्या करण्याइतपत पाळी आली. कवि परमानंदाचा पुत्र देवदत्त याने रचलेल्या 'अनुपुराणा'वरून मुळातच शिवाजी महाराजांना राज्याचे विभाजन मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी राजारामासाठी वेगळेच राज्य निर्माण करण्याचा पर्याय शोधून काढला, असे दिसते. पण सोयराबाई आपल्या पुत्रासाठी महाराष्ट्र देशीचे राज्य मागत होती आणि महाराज कर्नाटक देशीचे भावी राज्य त्यास देतो असे म्हणत होते. "1975-76 या कालखंडात राज्यविभाजनाचा प्रस्ताव रायगडावर चर्चिला गेला आणि शिवाजी महाराजांनी थोड्या नाराजीने का होईना पण त्यास आपली संमती दिली. असे वाटते की पितापुत्रांच्या बेबनावाला इथूनच सुरुवात झाली. संभाजीराजास राज्याचे विभाजनच मंजूर नव्हते. कारण महाराज कर्नाचकात जे जिंकणार होते, तोही मराठी राज्याचाच एक भाग बनणार होता." या सर्व राजकारणात मोरोपंत, आण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी यांची भूमिका युवराज संभाजीराजांना विरोध करण्याची व राणी सोयराबाईंचा पक्ष उचलून धरण्याची होती.
याच काळात शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची तयारी सुरू केली होती. 6 ऑक्टोबर 1676 रोजी दस-याच्या मुहुर्तावर महाराजांनी कर्नाटक स्वारीसाठी प्रयाण केले. मात्र आपण रायगडावर नसताना, तेथे सोयराबाई आणि त्यांच्या गटाच्या कोंडाळ्यात संभाजीराजांना ठेवणे योग्य ठरणार नाही, हे शिवरायांनी जाणले होते. तेव्हा त्यांनी संभाजीरांना कोकणातील शृंगारपूर येथे धाडले. शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी संभाजीराजांकडे सोपविली. याच ठिकाणी संभाजीराजे शाक्त पंथीयांच्या प्रभावाखाली आले. तेथेच कवि कलशाने पुढाकार घेऊन राजांचा कलशाभिषेक केला.
एप्रिल-मे 1678च्या सुमारास शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवरून परतले. पण इतिहासकारांच्या मते त्यानंतर शिवाजीराजे आणि संभाजीची भेटच झाली नाही. रायगडावर परतल्यानंतर शिवाजीराजांनी संभाजीराजांना शृंगारपूरहून समर्थभेटीसाठी सज्जनगडास जाण्याचा हुकूम दिला. गडावरील धार्मिक वातावरणात संभाजीराजांचा राग शांत होईल, असे छत्रपतींना वाटले असावे. 'अनुपुराणा'नुसार शिवाजी महाराजांनी स्वहस्ते पत्र लिहून संभाजीराजांना कळविले, की "तू प्रजेला अभय देतोस, पण प्रजा कर बुडवीत आहे. तू अमात्यांचा उघड अपमान करीत आहेस. तरी शृंगारपुराहून उठून तू सज्जनगडास जा." संभाजीराजे सज्जनगडावर गेले, पण तेथे रामदासस्वामी नव्हते. तेथेच दिलेरखानास जाऊन मिळण्याचा संभाजीराजांचा विचार पक्का झाल्याचे दिसते. संगम माहुलीस तीर्थस्नानास जातो म्हणून त्यांनी सज्जनगडच्या किल्लेदाराचा निरोप घेतला आणि माहुलीवरून ते थेट दिलेरखानाच्या छावणीत जाऊन पोचले.
संभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे एका ब्राह्मणास दिलेले दानपत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपल्या या कृत्याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट सल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या सल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. राजाने राणीच्या बाजूने पक्षपात केला. त्यामुळे तो आपल्या विरुद्ध झाला. असे असूनही त्याने आपल्या वडिलांच्या सेवेत आणि निष्ठेत काही म्हणता काही कसूर केली नाही. आपल्या कर्तव्यपालनात तो स्वतः (संभाजी) दशरथी रामाप्रमाणे होता. त्याने दीड कोटी रूपयांची दौलत, किल्ले, राजाचा दर्जा, मान आणि सन्मानही गवताप्रमाणे तुच्छ मानून त्यांचा त्याग केला." (छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी, पृ. 142)एकंदर राणी सोयराबाई आणि प्रधानांनी केलेल्या कुटील कारवायांमुळे संभाजीराजांना मोगलांना जाऊन मिळण्याचे कृत्य करावे लागले, असा या मजकुराचा मथितार्थ आहे.
या कारवाया कोणत्या होत्या?
संभाजीराजांना राज्य मिळू नये यासाठी या लोकांनी कोणते मार्ग अवलंबले? या प्रश्नाच्या उत्तरातच संभाजी राजांची बदनामी कोणी केली या सवालाचे उत्तरही दडलेले आहे!
डॉ. जयसिंगराव पवार सांगतात -
"...कुटिल राजकारणी व मत्सरग्रस्त प्रधान एकत्र आल्यानंतर या दोहोंच्या समान प्रतिस्पर्ध्यास - संभाजीराजांस - हतबल करण्यासाठी अनेक डावपेच लढविणे आवश्यक ठरले. संभाजीराजांचे चारित्र्यहनन हा अशाच एका डावपेचाचा भाग असावा. राजकारणातील सत्तास्पर्धेत प्रतिपक्षाचे चारित्र्यहनन करून त्यास बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आपणास अगदी अलीकडच्या इतिहासातसुद्धा सापडू शकतील. संभाजीराजांच्या चारित्र्याविषयी ज्या अनेक दंतकथा अथवा अफवा त्यांच्या हयातीत निर्माण झाल्या त्यांचा शोध या कुटिल राजकारणाच्या पार्श्वभूमिवर घेतला तर मग खाफीखान, मनुची आदींच्या कानापर्यंत जाऊन पोहचलेल्या संभाजीराजांच्या 'इष्का'च्या कथा मुळातच कोणी निर्माण केल्या असतील याचा अंदाज बांधता येतो." आणि मग संभाजीराजांची बदनामी करणारी बखर लिहिणारा मल्हार रामराव याचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असतो, याचे मर्म उलगडते.
('संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी?' या लेखाचे तिन्ही भाग पूर्णतः डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मराठेशाहीचा मागोवा' (मंजुश्री प्रकाशन, 1993) या पुस्तकातील 'युवराज संभाजीराजे - एक चिकित्सा' या प्रकरणाच्या आधारे लिहिले आहेत.)
11 comments:
अप्रतिम लेखन आहे
खलपुरुष मालिका चांगली आहे. असेच लिहीत रहा.
शिवाजीमहाराजांचे सर्व महत्वाचे व विश्वासाचे मंत्री संभाजीला प्रतिकूल कां बनले असावेत हाहि एक प्रश्न आहे. आणि अखेर कोणत्याही कारणाने असो पण संभाजी दिलेरखानाला जाऊन मिळाला याबद्दल त्याला माफ करता येत नाही. विरोधात असलेले मंत्री यानंतर परत कधीच त्याला अनुकूल झाले नाहीत यात नवल नाही. राज्यावर आल्यावर अपली योग्यता सिध्द करून दाखवली हेहि निर्विवाद आहे.
खुप गोष्टि समजल्या...
खरच असंच झालं असणार....
आणखिन काही माहिती मिळू शकेल का?
Great Job ..
Continue work..
BEST OF LUCK..
चांगले लिहिय !!!
या बाबतीत विश्वास पाटील यांचे सुद्धा लेखन फार छान आहे.जरूर वाचा
जावे त्याच्या वंशा... "संभाजी राजांना क्षमा नाही" हे बोलण्याची सुद्धा आपल्या पैकी कुणाचीही योग्यता नाही... हेच वाक्य तुलापुराशी जावे आणि बोलावेसे वाटते का पहावे...
"संभाजी राजांना क्षमा नाही" हे बोलण्याची सुद्धा आपल्या पैकी कुणाचीही योग्यता नाही... हेच वाक्य तुलापुराशी जावे आणि बोलावेसे वाटते का पहावे...
Ekdam barobar.............
एकांगी विचार ..लेखक ब्रिगेड च्या नादी लागलेले दिसतात. समतोल विचार करा आणि पुरावे पहा..अगदीच उद्दात्तीकरण किंवा अगदीच खलपुरुष करणे योग्य नव्हे !
विषय मंत्री प्रतिकूल बनायचा नाही
तर स्वराज्याचा नवा राजा कोण असावा हे ठरवान्याचा अधिकार हां महाराजांचा असला पाहिजे
सल्लागार मंत्री सल्ला देऊ शकत होते पण त्यानी त्यही पुढे जाऊन आपलाच सल्ला कसा योग्य आहे हे सिद्ध करण्या साठी षड्यंत्र पण रचलि आहेत हे लक्षात घ्या
म्हणजे मंत्री प्रतिकूल होण समाजु शकतो पण ती प्रतिकूलता कोणत्या थराला गेली हे लक्षात घ्यायला हव...!!!
आणि जी षड्यंत्र वारंवार रचलि गेली त्याचा परिणाम हां संभाजी महाराज दिलेर खानाला मिळन्यत झाला
आणि मंत्र्यांच्या विचारा प्रमाणे जर संभाजी अयोग्य आणि राजाराम हां छत्रपति बनायला योग्य होता तर
भविष्याने त्या गोष्टी च उत्तर दिलच आहे
म्हणजे संभाजी ची कारकीर्द आणि पराक्रम पहा आणि राजारामाचा पराक्रम आणि कारकीर्द पहा
म्हणजे मंत्री चुकीचे होते ही गोष्ट लक्षात येते
विषय मंत्री प्रतिकूल बनायचा नाही
तर स्वराज्याचा नवा राजा कोण असावा हे ठरवान्याचा अधिकार हां महाराजांचा असला पाहिजे
सल्लागार मंत्री सल्ला देऊ शकत होते पण त्यानी त्यही पुढे जाऊन आपलाच सल्ला कसा योग्य आहे हे सिद्ध करण्या साठी षड्यंत्र पण रचलि आहेत हे लक्षात घ्या
म्हणजे मंत्री प्रतिकूल होण समाजु शकतो पण ती प्रतिकूलता कोणत्या थराला गेली हे लक्षात घ्यायला हव...!!!
आणि जी षड्यंत्र वारंवार रचलि गेली त्याचा परिणाम हां संभाजी महाराज दिलेर खानाला मिळन्यत झाला
आणि मंत्र्यांच्या विचारा प्रमाणे जर संभाजी अयोग्य आणि राजाराम हां छत्रपति बनायला योग्य होता तर
भविष्याने त्या गोष्टी च उत्तर दिलच आहे
म्हणजे संभाजी ची कारकीर्द आणि पराक्रम पहा आणि राजारामाचा पराक्रम आणि कारकीर्द पहा
म्हणजे मंत्री चुकीचे होते ही गोष्ट लक्षात येते
Post a Comment