Tuesday, April 15, 2008

ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप


आपल्या संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानला गेलेला असला, तरी त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी भल्तीच विचित्र, विकृत असते. त्यात पुन्हा एकपत्नीव्रत आणि पतिव्रता वगैरेंचे ओझेही आपल्या सामाजिक मानगुटीवर असतेच. (यावर काही लोक म्हणतील, की या पवित्र भावना तुम्हाला ओझे वाटतात म्हणजे भल्तेच! या पवित्र गोष्टी नसतील तर मग आपल्या पवित्र संस्कृतीचे व पवित्र कुटुंबसंस्थेचे कसे होणार? तर स‌भ्य स्त्री-पुरुषहो, तसे काही होत नसते. एक स्त्री कुलवधू असण्याच्या काळातही समाज रसरशीत होताच! वाचा - भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - विकार-विचारप्रदर्शनांच्या साधनांची उत्क्रांती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, लोकवाड्मयगृह, पाने - 118, मूल्य - 50 रु.)

आता हे स‌र्व असे असल्याने होते काय, की एखाद्याची बदनामी करायची म्हटल्यावर त्याच्या कामजीवनाबाबत नसत्या गप्पा पसरवायच्या, की झाले काम सोपे, हे आपण अनुभवाने शिकलेलो आहोत. व आपण एक स‌माज म्हणून अशा बाबतीत चांगलीच महारत मिळविलेली आहे, हे इतिहासात जाऊन पाहिले की लख्खपणे लक्षात येते. 'गीतारहस्य'कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या थोर माणसालाही अस‌ले किटाळ स‌हन करावे लागले होते. त्यांच्यावर चक्क बलात्काराचा आरोप झाला होता, अगदी न्यायालयात झाला होता आणि तो अर्थातच साफ खोटा होता.

लोकमान्यांच्या आयुष्यात त्यांना मनःस्ताप देणारी अनेक प्रकरणे येतात. ताईमहाराज प्रकरण हे त्यातलेच एक. याच खटल्यात त्यांच्यावर हा बलात्काराचा आरोप झाला होता. त्यात जाण्यापूर्वी हे ताईमहाराज प्रकरण काय होते ते थोडक्यात पाहू या...

लोकमान्य टिळकांचे एक स्नेही होते वासुदेव हरी ऊर्फ बाबामहाराज पंडित. हे पुण्यात राहात असत. त्यांना मुंबई स‌रकारने पहिल्या वर्गाचे स‌रदार म्हणून मान्यता दिलेली होती. ही आसामी चांगलीच श्रीमंत होती. पुणे, बेळगाव, सोलापूर या जिल्ह्यांत, तसेच कोल्हापूर संस्थानात त्यांच्या मालकीची मालमत्ता, जमीनजुमला विखुरलेला होता. पहिल्या पत्नीच्या अकाली निधनानंतर बाबामहाराजांनी सिन्नरकर नावाच्या एका पुस्तकविक्रेत्याच्या रुपवान मुलीशी लग्न केले. त्यांचे नाव स‌कवारबाई ऊर्फ ताईमहाराज. त्यांना शांताक्का नावाची मुलगी होती. 7 ऑगस्ट 1897 रोजी बाबामहाराजांचे कॉल-याने निधन झाले. तेव्हा ताईमहाराज गरोदर होत्या व त्यांना मुलगा होईल व आपल्या संपत्तीस वारस मिळेल, अशी मृत्युशय्येवर पडलेल्या बाबामहाराजांना आशा होती.

बाबामहाराज कॉल-याने आजारी पडल्याचे स‌मजल्यावर लोकमान्य त्यांना भेटावयास गेले. त्यांनी बाबामहाराजांना मृत्युपत्र करण्याचा स‌ल्ला दिला. आपल्यामागे आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त नेमणे आवश्यक आहे, असे बाबामहाराजांना वाटले. त्यांनी टिळकांना त्यासाठी गळ घातली. मित्राचे मन राखण्यासाठी टिळकांनी त्याला होकार दिला व बाबामहाराजांच्या इच्छेनुसार टिळकांप्रमाणेच बाबामहाराजांचे व्याही दादासाहेब ऊर्फ गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद स‌खाराम कुंभोजकर व बळवंत मार्तंड नागपूरकर हे विश्वस्त बनले. 7 ऑगस्ट 1897 रोजी स‌काळी बाबामहाराजांनी मृत्युपत्र तयार केले. त्याचा मजकूर टिळकांनीच सांगितला. त्यात म्हटले होते, "आमचे कुटुंब सौ. स‌कवारबाई हल्ली गरोदर आहे. तीस पुत्र न झाल्यास किंवा होऊन तो अल्पायुषी झाल्यास आमचे घराण्याचे नाव चालविण्याकरिता यथाशास्त्र जरूर लागेल तितक्या वेळेस आमचे कुटुंबाचे मांडीवर दत्तक वर लिहिलेल्या गृहस्थांच्या विचारे देऊन त्या मुलाचे वतीने तो वयात येईपर्यंत स‌दर पंचांनी (ट्रस्टी) स्थावर-जंगम इस्टेटीची व्यवस्था करावी."

त्यानंतर 18 जानेवारी 1898 रोजी मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे ताईमहाराजांनी शक्यतो आपल्या नात्यातल्या एखाद्या मुलास दत्तक घ्यावे असा विचार पुढे आला. बाबामहाराजांची मालमत्ता मोठी. बाई एकटी. तिला मुलगा नाही. तशात ती हलक्या कानाची. अशा परिस्थितीत तिच्याभोवती लोभी नातेवाईकांचे कोंडाळे न जमते तर नवलच. पण या नातेवाईकांना दूर सारून टिळक व अन्य विश्वस्तांनी, पंडित घराण्याच्या एका शाखेतील एका लहान मुलास दत्तक म्हणून निवडले. ताईमहाराजांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. हा मुलगा औरंगाबादजवळच्या निघोने गावचा होता. ठरल्यानुसार ताईमहाराज आनंदाने विश्वस्तांसह तेथे गेल्या व तेथे दत्तकविधान स‌मारंभ पार पडला.

पण पंडितांचे नातेवाईक गप्प बसणारे नव्हते. नागपूरकर हे विश्वस्त त्यांना सामील होते. त्यांनी ताईमहाराजांचे कान फुंकण्यास सुरूवात केली, की हा लहान मुलगा दत्तक घेऊन तुम्हांस काहीही फायदा होणार नाही. कारण तो स‌ज्ञान होईपर्यंत मालमत्तेवर विश्वस्तांचे नियंत्रण राहणार. त्यापेक्षा तुम्ही जर पंडित घराण्याच्या कोल्हापूर शाखेतील बाळामहाराज यांना दत्तक घेतले, तर किमान तीस हजाराचे दागिने वगैरे त्यांच्या हाती येतील. ते ऎकून ताईमहाराजांची मती फिरली. त्यांनी बाळामहाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. त्यास कोल्हापूर दरबारचा पाठिंबाही मिळविला. पण टिळकांनी हे दत्तकविधान बेकायदेशीर असल्याने ते थोपविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी कोर्टापासून पुण्याच्या तालिमबाज पठ्ठ्यांपर्यंत स‌र्वांची मदत त्यांनी घेतली. पण अखेर हा दत्तकसमांरभ पुण्याऎवजी कोल्हापूरात झालाच. त्यास शाहू छत्रपती उपस्थित होते. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी शाहू छत्रपती विरोधी बाजू घेतल्याने या प्रकरणात छत्रपतींनी टिळकांच्या विरोधी भूमिका घेतली, एवढाच याचा अर्थ.

या दत्तकविधानाविरोधात टिळकांनी 23 स‌प्टेंबर 1901 रोजी पुण्याच्या प्रथमवर्ग स‌बजज्जांच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. वास्तविक या खटल्यात टिळकांची बाजू अतिशय कमकुवत होती आणि त्याचे एकमेव कारण हेच होते, की न्यायाधीशापासून स‌रकारपर्यंत स‌गळेच त्यांच्याविरोधात होते. या न्यायाधीश अस्टनने तर, खोटी साक्ष देणे, बनावट दस्तऎवज व खोटा पुरावा तयार करून फसवणूक करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे वगैरे टिळकांवरील गंभीर आरोपांबाबत पोलिस चौकशी करून त्यांच्यावर खटला भरावा अशी जोरदार शिफारस स‌रकारला केली. त्यानुसार टिळकांवर फौजदारी खटला भरण्यात आला आणि त्यात 24 ऑगस्ट 1903 रोजी टिळकांना दीड वर्षांची स‌क्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. त्याविरोधात अर्थातच टिळक अपिलात गेले आणि अखरे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. नंतर दिवाणी खटल्यातही टिळकांच्याच बाजूने निकाल लागला. 31 जुलै 1906 रोजी जव्हेरीलाल ठाकोर या न्यायाधीशाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला. त्यावरोधात विरोधी पक्षाने उच्च न्यायलयात अपिल केले. त्यात टिळक हरले. मग ते प्रीव्ही कौन्सिलमध्ये गेले व तेथे जिंकले. बाबामहाराज पंडितांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी या खटल्यांच्या पायी टिळकांना कर्जबाजारी व्हावे लागले.

तर टिळकांवरील या फौजदारी खटल्यात पुरावा म्हणून एक पत्र सादर करण्यात आले होते. ''औरंगाबाद येथील मुक्कामात टिळकांनी ताईमहाराजांवर बलात्कार केला" असा आरोप त्या पत्रात करण्यात आला होता. विशेष म्हणजे खुद्द ताईमहाराज आणि त्याची ब्राह्मण सेविका गोदूबाई यांनी न्यायालयात तसे सूचित व्हावे अशा त-हेने साक्ष दिली होती. टिळक-चरित्रकार तात्यासाहेब केळकर सांगतात, "या जबान्या झाल्या त्या दिवशी कोर्टातून घरी आल्यावर टिळक रागाने लाल झाले होते की तस‌े लाल झालेले एरवी कोणी केव्हा पाहिले नव्हते. ते इतकेच म्हणाले की 'एखादी बाजारबसवी स्त्रीदेखील आपली बेअब्रू आपल्या तोंडाने कबूल करीत नाही, झाकून ठेवते पण एवढ्या मोठ्या स‌रदार घराण्यातील ही स्त्री निष्कारण आपली बेअब्रू आपल्या तोंडाने खोटे बोलून दाखविते तेव्हा तिचा धिक्कार असो.'" (पृ. 151)

टिळकांनी बलात्कार केल्याची ताईमहाराजांनी दिलेली साक्ष खोटीच होती. त्यांचे पत्रही बनावट होते. हे न्यायालयात स‌िद्धही झाले. ही पंडितमहाराज आणि नागपूरकर यांनी खेळलेली एक तेढी चाल होती, हेही लोकांच्या तेव्हा लक्षात आले.

या घाणेरड्या व खोट्या आरोपांनी टिळकांच्या चरित्रावर डाग पडावा एवढे त्यांचे चारित्र्य हलके नव्हते. यातून एकच दिसले, की स‌माजवंद्य माणूस लोकांच्या मनातून उतरावा यासाठी त्याचे चारित्र्यहनन करण्याची चाल विरोधक खेळतात, यातून टिळकही सुटले नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या दृष्टीने तो काळही आजच्या पेक्षा काही फार वेगळा नव्हता.

संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती, 1986, पृष्ठ - 102 ते 138 व 151.

Monday, April 14, 2008

वाद वेदोक्ताचा - 3

वेदोक्त प्रकरणाचा वणवा पेटला तो एका उर्मट, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उद्धट उद्गारांनी.

तो 1899 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा काळ होता. नेहमीच्या रिवाजानुसार त्या काळात शाहू छत्रपती पंचगंगेवर कार्तिकस्नानासाठी गेले होते. त्यांच्या स‌मवेत बरीच मंडळी होती. त्यात विख्यात ग्रंथकार राजारामशास्त्री भागवत हेही होते. महाराज स्नान करीत होते. नारायणभट नावाचा ब्राह्मण मंत्र म्हणत होता. पण तो वेदोक्त नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्री भागवतांच्या बरोबर लक्षात आले. त्यांनी ती गोष्ट महाराजांना सांगितली. महाराजांनी नारायण भटाला त्याबाबत विचारले. तेव्हा तो म्हणाला, शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगायचे असतात. ते म्हणण्यापूर्वी भटजीने स्वतः आंघोळ केली नसली तरी चालते. त्याच्या या जबाबाने महाराज साहजिकच संतापले.

कोल्हापूर छत्रपतींच्या पदरी असलेल्या सोळा शास्त्री घराण्यांपैकी एका घराण्यातील शास्त्री बाळाचार्य खुपरेकर यांनी याबाबतची आपली आठवण सांगितली आहे. त्यानुसार हा नारायण भट बाहेरख्याली होता. "या घटनेच्या आदल्या रात्री त्याचे त्याच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले होते व त्याने तिला मारहाणही केली होती. पहाटे वाड्यावरची गाडी आली, तेव्हा त्या भटजीच्या बायकोने ते घरात नाहीत म्हणून सांगितले. कुठे गेले म्हणून विचारल्यावर, गेले शेण खायला असे उत्तर दिले. गाडीवानाने अर्थ स‌मजून वेश्यावस्तीत जाऊन त्याला शोधून काढले व घरी जाण्यासाठी गाडी वळवली व आंघोळ लवकर उरकायला सांगितले. त्यावेळी आपले बिंग बाहेर पडले व आपली छीथू होणार हे पाहून रागावलेल्या स्थितीत त्याने हे उद्गार काढले. हुज-याने महाराजांना हा प्रकार सांगताच त्यांनी त्याला चाबकाने फोडून काढले. महाराज म्हणाले, आम्ही श्रद्धेने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही असले आचरण ठेवूऩ वर गाढवासारखं बडबडता! (1)

1901च्या भाद्रपदातील पितृपक्षात महाराज पन्हाळगडावर राहात होते. तेथे श्राद्धासारखी धर्मकृत्ये करण्यासाठी त्यांनी नारायण स‌दाशिव ऊर्फ अप्पासाहेब राजोपाध्ये यांना बोलावणे पाठविले. हे राजोपाध्ये म्हणजे कोल्हापूरकर भोसल्यांचे कुलगुरू व कुलोपाध्याय होते. पण ते छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास तयार नव्हते. तेव्हा 7 ऑगस्ट 1901ला महाराजांनी लेखी आदेशच दिला. राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जावीत असे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते. पण राजोपाध्यांनी या आदेशाची अंमलबजावणी काही काळ स्थगित ठेवावी अशी विनंती केली.

अशात नवरात्र उजाडले आणि कोल्हापूरात देवी विटाळल्याची बोंब झाली.ते प्रकरणही औरच होते. कोल्हापूरात नारायणशास्त्री गोविंद सेवेकरी वैद्य नावाचे ब्राह्मण होते. ते वेदोक्तास अनुकूल होते. त्यांनी 29 ऑगस्ट 1901 रोजी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांची श्रावणी केली. बापूसाहेब कागलकरांचीही श्रावणी त्यांनी केली. त्यामुळे स‌नातन्यांनी त्यांना वाळीत टाकले होते. या नारायणशास्त्र्यांनी 14 ऑक्टोबर 1901 रोजी अंबाबाईच्या देवळात जाऊन पूजा केली. शाहू छत्रपतींनीच त्यांना पूजेसाठी पाठविले होते. पण त्यांच्या स्पर्शाने देवी विटाळली असा आरडाओरडा स‌नातनी ब्राह्मणांनी केला. नारायणशास्त्रांना वाळीत टाकले असल्याची माहिती स‌नातन्यांच्या वतीने तेरा भिक्षुकांनी नायब कारभा-यांच्या कानावर घातली. याच तेरा भिक्षुकांनी नंतर शाहू छत्रपतींचीही भेट घेतली. तेव्हा छत्रपतींनी या तेरा जणांना देवळात प्रवेश करण्यास मनाई केली. तेव्हा ही ब्राह्मणमंडळी शाहू छत्रपतींच्या विरोधात इंग्रज स‌रकारकडे गेली. या ब्राह्मणांशी महाराजांच्याच कुलगुरूने हातमिळवणी केली असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

अप्पासाहेब राजोपाध्ये हे महाराजांचे कुलगुरू व कुलोपाध्याय. तेच वेदोक्ताच्या विरोधात होते, हे पाहिल्यावर मग महाराजांनी त्यांनाही धडा शिकविण्याचा निर्धार केला. 26 ऑक्टोबर 1901 रोजीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राजवाड्यावर जी धर्मकृत्ये करायची, ती वेदोक्ताने करणार नसाल, तर वाड्यावर येऊ नका, असा निरोप त्यांना छत्रपतींनी पाठविला. त्यानंतर रोजच स‌काळी त्यांना असाच तोंडी निरोप पाठविण्यात येत असे. हा प्रकार 8 नोव्हेंबरपर्यंत चालला. राजोपाध्ये पूजेस येत नव्हते आणि म्हणून त्यांना दक्षिणाही दिली जात नव्हती.

याच सुमारास लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी परजली आणि राजोपाध्यांच्या बाजूने त्यांनी 22 व 29 नोव्हेंबरच्या अंकात वेदोक्तावरचे अग्रलेख लिहिले. तेव्हाची बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांच्या हातातील असल्याने त्यांनीही शाहू छत्रपतींच्या विरोधात जणू आघाडी उघडली. टिळकांचा केसरी-मराठी तर त्यात होताच, पण प्रा. विजापूरकरांच्या प्रभावाखालील स‌मर्थ साप्ताहिक, शंकरशास्त्री गोखले यांचे विद्याविलास हे साप्ताहिक, साता-याचे प्रतोद, वाईचे भाऊशास्त्री लेल्यांचे मोदवृत्त, सोलापुरचे कल्पतरू, ठाण्याचे अरूणोदय व हिंदूपंच, नाशिकचे गुराखी या नियतकालिकांनीही छत्रपतींच्या विरोधात प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. स‌ावळाराम अमृतराव विचारे यांचे मराठा दिनबंधु हे कोल्हापुरातले वृत्तपत्र त्यांना आपल्यापरीने उत्तर देत होते. पण या स‌र्व कोलाहलात त्याचा आवाज कोणाला ऎकू जाणार?

वेदोक्ताच्या प्रकरणातील स‌त्य शोधण्यासाठी याच सुमारास शाहू छत्रपतींनी एक स‌मितीही नेमली. रा. ब. कृष्णाजी नारायण पंडित, स‌रन्यायाधीश विश्वनाथ बळवंत गोखले आणि विशेष म्हणजे आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचा या स‌मितीत स‌मावेश होता. 16 एप्रिल 1902 रोजी या स‌मितीने आपला अहवाल दिला. छत्रपती बाबासाहेब महाराज (1837-1866) यांच्या कारकीर्दीपर्यंत कोल्हापूरच्या राजघराण्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जात होती. बाबासाहेब महाराजांची मुले जगत नव्हती, तेव्हा रघुनाथशास्त्री पर्वते यांच्या स‌ल्ल्यावरून काही गृहकृत्ये पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरूवात करण्यात आली. हे पाहता छत्रपतींना वेदोक्त पद्धतीने गृहकृत्ये करायची असल्यास त्यांना ती करता येतील, अशी शिफारस स‌मितीने केली. पण या अहवालावर स‌ही करण्यास राजोपाध्ये यांनी नकार दिला. स‌मितीपुढे साक्ष देण्यास येण्यास बाहेरचे लोक येत नव्हते, महाराजांचे अधिकारी दबाव आणित होते, असा त्यांचा आरोप होता. पण विशेष म्हणजे स‌मितीचे कामकाज त्यांच्याच घरात पाच महिने चालले होते, त्यावेळी मात्र ते याबाबत चकार शब्दानेही बोलले नव्हते. तेव्हा अहवाल प्रतिकूल जाताच त्यांनी त्यास विरोध दर्शविला हे उघड आहे. अखेर शाहू महाराजांनी 6 मे 1902 रोजी राजोपाध्ये यांना रीतसर राजोपाध्येपदावरून काढून टाकले. त्यांची स‌र्व इनामे, वतने व त्यांचे दिवाणी, फौजदारी व महसूलविषयक अधिकार काढून घेतले. या निर्णयामुळे तर मोठाच गदारोळ झाला. राजोपाध्यांच्या पाठिराख्यांनी तर महाराजांविरोधात जणू बंडच पुकारले. अशा वातावरणात महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी एक परिपत्रक काढून कोल्हापूरातील स‌रकारी नोक-यांत मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण जाहीर केले. यामुळे तर ब्राह्मणवर्गात संतापाची लाट उसळली. केसरी-मराठ्यासकट स‌गळी ब्राह्मणी वृत्तपत्रे महाराजांवर तुटून पडली.

या वादाने किती उग्र रूप घेतले होते, ते महाराजांच्या दत्तक राजमातेचे निधन झाले तेव्हाच्या घटनांतून दिसून येते. 14 स‌प्टेंबर 1902 रोजी चौथ्या शिवाजीराजांच्या पत्नी मातोश्री आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी वेदोक्त पद्धतीने करण्यात येत होता, तर त्याला तेथेच काही ब्राह्मणांनी विरोध केला. त्यावर मोठी वादावादी झाली. अखेर अंत्यस‌ंस्कार वेदोक्त पद्धतीनेच करण्यात आले. त्याच दिवशी मध्यरात्री जुन्या राजवाड्याला आग लागली. ही आग काही उपद्व्यापी ब्राह्मणांनीच लावली असावी असा महाराजांना संशय होता. या आगीत जुन्या राजवाड्यातील प्रचंड दप्तरखाना खाक झाला. दुस-या दिवशी सकाळी कोल्हापुरातल्या अनेक घरांवर रक्ताची बोटे उमटलेली लोकांनी दिसली. हा महाराजांना 'इशारा' होता!

तिकडे राजोपाध्ये यांचे आपले इनाम व वतन वाचविण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी प्रथम गव्हर्नरकडे अर्ज केला होता. पण गव्हर्नरने छत्रपतींच्या बाजूने निकाल दिला. तेव्हा राजोपाध्यांनी थेट गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनकडे धाव घेतली. पण तेथेही राजोपाध्यांचा पराभव झाला. या निकालाने लोकमान्यांना मोठेच दुःख झाले. त्यांनी लिहिले, "राजोपाध्ये यांचे इनाम संस्थानात सामील झाले. याच न्यायाने पुढेमागे कोल्हापूर संस्थान इंग्रजी राज्यात सामील झाल्यास लोकांस‌ही स‌माधान वाटेल." राजोपाध्यांचे इनाम जप्त केल्याने संतापलेले लोकमान्य कोल्हापूर संस्थान जप्त करावे, असे सुचवित होते. जणू छत्रपतींनी राजोपाध्यांवर मोठा अन्यायच केला होता. वास्तविक त्यांचे इनाम हे चाकरी इनाम होते. पगाराप्रमाणे. काम करा, पगार घ्या, काम बंद, पगार बंद असे. जेव्हा चाकरी बंद तेव्हा इनामही बंद अशी त्याची कायदेशीर बाजू होती व ती लोकमान्य विसरले होते.

कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाप्रमाणेच तेथील शंकराचार्यही वेदोक्ताच्या विरोधात होते. शंकराचार्यांच्या मठावर 23 फेब्रुवारी 1903 रोजी काशीनाथ गोविंद ब्रह्मनाळकर या कीर्तनकाराची नेमणूक झाली. हा ब्रह्मनाळकरबुवा म्हणजे एक प्रकरणच होते. संन्याशी झाला, तरी त्याची धनसंपत्तीची हाव संपली नव्हती. पुढे त्याने त्या मठात एवढे गैरव्यवहार केले, की या पदाची सर्व इज्जत त्यांनी धुळीस मिळवली. लेलेशास्त्र्यांनीच पुढे त्यांच्या या लीला उजेडात आणल्या. ते भस्मात अत्तर घालून ते अंगास चोपडित असत. पानतंबाखू खात असत. झोपण्यासाठी शंकराचार्यांना मखमखलीच्या गाद्या लागत आणि ते नेहमी बायांकडून अंग रगडून घेत असत, वगैरे गोष्टी सांगून लेलेशास्त्र्यांनी त्याचा हा संन्याशाचा संसार किती विलासी होता, हे लोकांसमोर आणले. पण हे कधी तर शंकराचार्यांनी वेदोक्तास संमती दिली त्यानंतर. तत्पूर्वी शंकराचार्य ब्रह्मवृंदाचे नेतेच होते. शंकराचार्यांनी, शाहू महाराज हे शूद्र असल्याने त्यांना वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे मत दिल्यावर शाहू महाराजांनी त्यांनाही दणका दिला. त्यांनी मठाची स्थावरजंगम मालमत्ता जप्त करून स्वामीचे स‌र्व धार्मिक अधिकार बरखास्त केल्याची राजाज्ञा काढली.(मे 1903)

त्यामुळे चवताळलेल्या ब्रह्मनाळकरबुवांनी मग हवी तशी मुक्ताफळे उधळण्यास सुरूवात केली. ब्रह्मवृंदाची जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात दौरा काढला. पुण्यात त्यांची पालकी वाहणा-यांत लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे अशी खाशी मंडळी होती. याच दौ-यात त्यांचा मुक्काम महाड येथे असताना तेथील प्रभू जातीच्या काही लोकांनी त्यांची पाद्यपूजा वेदोक्त मंत्र म्हणून करण्याचे ठरविले. पण त्यांनी व महाडच्या ब्राह्मणांनी तो बेत हाणून पाडला. याच वेळी शंकराचार्यांच्या या उत्तराधिका-याने शिवछत्रपती क्षत्रिय नव्हते व त्यांनी गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतले, त्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला, असे उद्गार काढले.

पण आता या वादात छत्रपतींचीच स‌रशी होणार अशी चिन्हे दिसू लागली होती. राजोपाध्यांना इंग्रज स‌रकारने मोठी आशा होती. पण आता ती मावळली होती आणि त्यामुळे ब्रह्मवृंद आणि शंकराचार्यही हवेतून जमिनीवर उतरले होते.

शेवटी या प्रकरणात तडजोड झाली आणि जुलै 1905 मध्ये छत्रपतींचे भोसले घराणे क्षत्रिय असल्याचे आणि त्याला वेदोक्ताचा अधिकार असल्याचे शंकराचार्यांनी मान्य केले. 20 डिसेंबर 1905 रोजी कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाने स‌भा घेऊन शंकराचार्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि पाच-सात वर्षे चाललेला हा संघर्ष छत्रपतींच्या विजयाने समाप्त झाला.

पण हा संघर्ष खरेच स‌माप्त झाला?

1 जून 1909 च्या धर्म पाक्षिकात लेलेशास्त्र्यांनी लिहिले, "शूद्राला वेदाधिकारदान, गुरूद्रोह इत्यादी पातकांमुळे" ब्रह्मनाळकरांना क्षयरोग झाला!


संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पाने 62 ते 97
- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा संघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.

Saturday, April 12, 2008

वाद वेदोक्ताचा - 2

सर्व क्षुद्रांचा गलबला!

तुमचे शिवाजी महाराज असतील शककर्ते, किंबहुना ते नसते तर आमची सुंता वगैरे झाली असती असे जे कवि भूषणने म्हटले ते आम्हालाही मान्यच आहे. त्यासाठी आम्ही त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणू. पण त्यांना आम्ही क्षत्रिय मात्र म्हणणार नाही, कारण कलीत क्षत्रिय नाहीत, अशी अवघी पुराणमतवादी मानसिकता होती. गागाभट्टाने त्यांना आधी शूद्र म्हटले ते यातूनच.

त्याचे असे झाले, की शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांच्या मुलाचा व्रतबंध करायचा होता. ते ऎकल्यावर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्यांची कुचेष्टाच केली. कारण बाळाजी आवजी हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आणि ब्राह्मणांच्या लेखी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही जात तर वर्णसंकरातून तयार झालेली. तेव्हा त्यांना कसले आले वेदोक्त कर्माचे वगैरे अधिकार ! पण कायस्त प्रभूंना मात्र हे मत मान्य नव्हते. त्यांच्या मते ही क्षत्रिय जात असून, 'गोविंदभट्टी' या ग्रंथानुसार पंधराव्या शतकात त्यांचा वेदाधिकार मान्य झालेला आहे आणि स‌न 1663मध्ये कायस्थ प्रभूंचा मुंजीसारखे संस्कार करण्याचा अधिकार प्रस्थापित झालेला आहे. पण तरीही 1669 साली मोरोपंत पिंगळ्यांनी प्रभूंना हा हक्क नसल्याचे म्हटल्यावर बाळाजी काशीच्या पंडितांकडे धाव घेतली. पण हाय रे चिटणीसांचे दैव! काशीच्या विद्वान ब्राह्मणांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या म्हणण्यावरच शिक्कामोर्तब केले. त्यांनी बाळआजी आवजींनाच शूद्र ठरविले असे नाही, तर शिवाजी महाराजांनाही ते क्षत्रिय नस‌ल्याने छत्रसिंहासनाचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. तशा आशयाचे गागाभट्ट या पंडिताचे पत्र घेऊन केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित आणि सोमनाथभट्ट कात्रे महाराष्ट्रात आले. हा निर्णय पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी निळो येसाजी प्रभू पारस‌नीस यांना काशीला पाठविले. त्यानंतर गागाभट्ट स्वतः रायगडावर आले आणि त्यांचे मत बदलल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला.

महाराष्ट्रातल्या स‌नातनी ब्रह्मवृंदाला मात्र गागाभट्टांची ही करणी कधीच पसंत पडली नाही. वाई येथून निघणा-या 'धर्म' या साप्ताहिकाचे संपादक काशिनाथ वामन ऊर्फ भाऊशास्त्री लेले यांनी तर असे जाहीर केले, की शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करणारे गागाभट्ट काशीकर हे शिवाजी महाराजांचे उपदेशगुरूही नव्हते व कुलगुरूही नव्हते, तर ते एक भाडोत्री विद्वान होते. "जातिविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास शिवाजी महाराज शूद्र होते असे एक वेळच नव्हे परंतु अनंत वेळा जरी 'धर्म'संपादकाने प्रसिद्ध केले तरी त्यात त्याचा अपराध तो काय होणार आहे?" असा लेलेशास्त्रींचा स‌वाल होता.

तिकडे स‌याजीराव गायकवाड जेव्हा वेदोक्ताबाबत ब्राह्मण पंडितांचा स‌ल्ला घेत होते, तेव्हा राजारामशास्त्री टोपले हे महाराजांना इषारा देत होते, की "महाराज, आपण क्षत्रिय आहात वगैरे गोष्टी ख-या, परंतु या नव्या भानगडीत आपण पडणे इष्ट नाही, वेदोक्त हे विष आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून त्याजबद्दलचा हट्ट धरला त्यांचे कल्याण झाले नाही. त्यांच्या राज्यास अवनती प्राप्त झाली. स‌बब त्या विषाची परीक्षा आपण पाहू नये. " शिवछत्रपती शूद्र असताना त्यांनी वेदोक्त पद्धतीने आपणांस राज्याभिषेक करवून घेतला त्यामुळे त्यांना फार काळ राज्य लाभले नाही आणि त्यांच्या नंतर त्यांनी स्थापिलेल्या स्वराज्यावर गंडांतरे आली आणि राज्याचे तुकडे पडले. प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी तर याहीपुढे जाऊन लिहिले, की "शककर्ते शिवाजी महाराजांस ज्यांनी रायगडी राज्याभिषेक केला व 'क्षत्रियकुलावतंस' म्हटले त्यांचे (गागभट्टांचे) निधन शौचकूपात पतन पावून झाले अशी दंतकथा आहे. एकंदर काय बीज असेल ते असो. 'परमेश्वरो वै वेत्ति' मूळ अस्सल क्षत्रियकुळी असेल परंतु स‌हवास व शरीरसंबंधांचा परिणाम देवास आवडत नसेल."

शिवछत्रती क्षत्रिय असून, त्यांना छत्रसिंहासनाचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी बाळाजी आवजीने मोठी मुत्सद्देगिरीची कामगिरी केली. त्यांनी काय केले, तर भोसल्यांच्या वंशावळीचा धागा थेट उदेपूरच्या रजपूत राजघराण्याशी नेऊन भिडविला, असे प्रबोधनकार ठाकरे सांगतात. पण हे तरी स‌नातनी ब्राह्मणांना कुठे मान्य होते? त्या थोर ब्रह्मवृंदाचा धोशा एकच होता. कलीत क्षत्रिय नाहीत, असे स्मृती सांगत असल्याने रजपुतांना तरी क्षत्रिय कसे म्हणता येईल? लेलेशास्त्री लिहितात, "रजपूत हे क्षत्रिय नसून ते त्याहून निराळे आहेत. संस्कृतमध्ये त्यांना उग्र असे नाव आहे. त्यांची कर्मे गागाभट्टाच्या वंशातील गागभट्टापासून तिसरा पुरुष जो कमलाकरभट्ट त्याने शूद्र कमलाकरात सांगितली आहेत... शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी क्षत्रियापासून जो पुत्र उत्पन्न होतो त्याची जाती उग्र ही होय. शिवाजी हा रजपुतांचा वंशज होता असे जरी मानिले तरीही तो क्षत्रिय ठरणे मुळीच शक्य नाही. शिवाय शिवाजी हा जर क्षत्रिय असेल, तर विवाहापूर्वीच त्याचे उपनयनही व्हावयास पाहिजे होते, परंतु तसे मुळीच झालेले नाही. आजच्या मराठे जातीस एका विवाहावाचून दुसरा कोणताही संस्कार मुळीच माहीत नाही, हे निर्विवाद आहे.... 'विवाहमात्रं संस्कारं शूद्रोSपि लभते स‌दा' (शूद्रासही विवाह हा एकच संस्कार प्राप्त होतो) या स्मृतिवचनाप्रमाणे मराठे हे शूद्रच आहेत असे मानणे भागच आहे."

अर्थात जातीदंभ केवळ स‌नातनी भटभिक्षुकांमध्ये होता असे मानण्याचे काही कारण नाही. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी पंडितांची महासभा घेऊन स‌र्व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून घेतले. पण मग त्यांनाही ही जातिश्रेष्ठत्वाची बाधा झाली. स‌र्व मराठे क्षत्रिय आहेत हे या पंडितसभेत मान्य झाल्यानंतर ते स्वतःस सिसोदे राजे भोसले असे म्हणवून घेऊ लागले आणि ग्वाल्हेरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड यांना कुणबी म्हणून कमी लेखू लागले. "अलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातीत फितुर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही... हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरिक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक" अशी छत्रपती प्रतापसिंहांची स‌मजूत होती.

स‌याजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यानंतर असा हा स‌र्व क्षुद्र मतांचा गलबला सुरू होता.

बडोद्यास स‌याजीराव गायकवाडांना या शूद्रत्त्वाचा मोठा मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी वेदोक्ताचा आग्रह धरला. पण त्याला तेथील ब्रह्मवृंद त्यास तयार नव्हता. तेव्हा मग त्यांनी स‌रळ आपल्या सेवेतील ब्राह्मणांची हकालपट्टी करून, त्यांऎवजी गुजराती, मारवाडी ब्राह्मण नेमून वेदोक्तानुसार धर्मकर्मे सुरू केली. ते प्रकरण काही फारसे पेटले नाही. पण इकडे शाहू महाराजांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यावर मात्र जणू आभाळच कोसळले असे झाले. पुण्यात, कोल्हापुरात सनातन्यांचे जणू बंड माजले.

आधी म्हटल्याप्रमाणे हा वणवा पेटला, तो एका उद्धट, बाहेरख्याली ब्राह्मणाच्या उर्मट उद्गारांनी. काय होते ते उद्रार, की जे ऎकून शाहूंसारखा राजर्षि कोपायमान झाला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला चाबकाने फोडून काढले?


संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पृ. 39 -52

Thursday, April 10, 2008

वाद वेदोक्ताचा (1)

शिवछत्रपती शककर्ते, तरीही स‌नातन्यांच्या लेखी ते शूद्रच!

"शिवाजी क्षत्रिय नव्हताच. त्याने गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतलं. त्याच्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला."- कोल्हापूरचे शंकराचार्य ब्रह्मनाळकर स्वामी (इ.स. 1903 मध्ये शंकराचार्यांनी महाड मुक्कामी काढलेले उद्गार) (1)

"शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने करून त्यांचा क्षत्रियकुलावतंस असा जयजयकार करणा-या गागाभट्टाला त्याच्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणजे त्यास शौचकूपात पडून मृत्यू पत्करावा लागला."
- प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर, करवीर ब्रह्मवृंदाचे तत्कालिन नेते. (ग्रंथमाला मासिकातील वेदोक्तप्रकरणावरील लेखातील विचार.) (2)

विसाव्या शतकाच्या प्रारंभी करवीर संस्थानात वेदोक्त प्रकरणावरून वातावरण किती विषारी झाले होते, हे या दोन वाक्यांवरून लक्षात यावे. महाराष्ट्राच्या पुढील स‌र्व स‌माजकारणावर मोठा परिणाम घडवून आणणा-या या प्रकरणात अटीतटीला आलेली, एकमेकांविरोधात उभी ठाकलेली माणसे कोणी सामान्य नव्हती. शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारखे दिग्गज नेते तर या वादात एकमेकांविरोधात वाक्-शस्त्रे परजून होतेच, पण कोल्हापूर संस्थान व पुण्यातील ब्रह्मवृंदाची तसेच स‌त्यशोधक विचारसरणीची थोर नेतेमंडळीही त्यात होती. या प्रकरणाचा शेवट अखेर शाहू छत्रपतींच्या विजयाने झाला. विजय त्यांचा झाला, पण त्या संघर्षात महाराष्ट्रपुरुषाच्या काळजावर ज्या जखमा झाल्या त्या अजूनही पुरत्या भरलेल्या नाहीत.

एका सामान्य, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उर्मटपणातून सुरू झालेले हे प्रकरण. पण त्याची मुळं जातात ते थेट शिवकालापर्यंत, शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत की नाहीत या वादापर्यंत. गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. पण त्याने तो वाद काही मिटला नाही. मराठी राजसत्ता लयास गेल्यावर अव्वल आंग्लाईत सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत स‌न 1832 मध्ये हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला गेला होता. प्रतापसिंह महाराजांनी सातारच्या वेदशालेत ब्राह्मण पक्ष आणि क्षत्रिय पक्षाची धर्मपरिषद घेतली. ब्राह्मण पक्षाला सांगलीच्या पटवर्धनांचा पाठिंबा होता. क्षत्रियांची बाजू आबा पारसनीस या कायस्थ प्रभू पंडिताने मांडली होती. त्या वादविवादात अखेर क्षत्रियांचाच विजय झाला व भोसले, घाटगे, जाधव, शिर्के इ. मराठा घराणी क्षत्रिय असल्याचे सिद्ध झाले. यानंतर असाच प्रसंग बडोद्यात घडला. ऑक्टो. 1896 मध्ये स‌याजीराव महाराजांना त्यांच्या पुरोहिताने सुनावले, की ते शूद्र आहेत व वेदोक्ताचा अधिकार त्यांना नाही. (3)

येथे ही वेदोक्ताच्या अधिकाराची भानगड स‌मजून घेतली पाहिजे.

वेद हे आपल्या महान हिंदुधर्माचे आधारस्तंभ आहेत. ती ईश्वरी वाणी आहे. आपल्या थोरथोर ऋषिमुनींच्या नावे वेदांतील ऋचा येतात. पण ते काही त्या ऋचांचे रचनाकार नसतात. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. तेव्हा ती दैवीवाणीच. आणि म्हणून ती ऎकण्याची, म्हणण्याची मुभा फक्त द्विजांना.

हे द्विज म्हणजे काय, तर ज्यांचा दुसरा जन्म झाला आहे असे. दुसरा जन्म केव्हा होतो, तर मौंजीबंधनानंतर. हा मुंज करण्याचा अधिकार कोणाला तर फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना. म्हणून हे तीन वर्ण झाले द्विज. उरलेल्या शूद्रांना वेदश्रवणाचाही अधिकार नाही. कारण शूद्र जातीतील व्यक्ती हे हिंडते फिरते स्मशान असल्याने त्याच्याजवळ बसून वेदाध्ययन करण्यासही मनाई. शूद्र वेदश्रवण करू लागला तर त्याच्या कानात शिसे व लाख ही पातळ करून ओतावी, अशी शिक्षा तर स्मृतींनीच सांगितलेली. (4) हे प्रकरण एवढे कडक, की शंबूक नावाचा शूद्र वेदाध्ययन करत होता व त्याच्या या पापाचरणामुळे रामराज्यातील ब्राह्मणाचा पूत्र अकाली मरण पावला, हे स‌मजल्यानंतर स्वतः प्रभू रामचंद्राने त्या शंबुकाचे मस्तक धडावेगळे केले. रावणवधाइतकाच हा शंबूकवधही महत्त्वाचा!

बरे ही झाली खूप पूर्वीची गोष्ट. तेव्हा क्षत्रिय, वैश्य यांनाही वेदश्रवणाचा अधिकार होता. पण पुढे नंद घराण्याचा अंत झाला आणि त्याबरोबर समस्त पृथ्वीवरील क्षत्रियकुल संपले. आपल्या पवित्र पुराणांनी ही गोष्ट उच्चरवाने सांगितली आहे, की कलियुगात वैश्यांसह क्षत्रियांचा अभाव असेल. (5)

आता कलियुगात क्षत्रिय, वैश्य नाहीत, असा जाहीरनामा पुराणे व व्रात्यनिर्णय यांसारख्या ग्रंथांनी काढल्यामुळे शिवछत्रपतींनाही स‌नातनी भटभिक्षुक शूद्च स‌मजत असत. फार काय खुद्द गागाभट्टही शिवाजी महाराजांना शूद्रच स‌मजत होते... (क्रमशः)


संदर्भ -
1. राजर्षि विशेषांक (रविवार दिनांक), पृ. 10
2. उक्त, पृ. 11
3. उक्त, पृ. 9
4. शाहू छत्रपती आणि लोकमान्य, पृ. 42-43
5. उक्त, पृ. 42

- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 1986
- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा स‌ंघर्ष - डॉ. जयसिंगराव पवा