निमित्त मस्तानी
मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानची मोठी झालेली आहे. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतिण वा वारयोषिता नाही. पण पिंगा गाण्यावर आक्षेप घेणारांना फक्त काशीबाईची प्रतिष्ठा तेवढी दिसते आणि मस्तानीबाबत शब्दही काढावा वाटत नाही, याचे कारण आजवरच्या कथाकादंब-या आणि बखरींनी बनविलेली तिची प्रतिमा.

लोकप्रभाच्या २७ नोव्हेंबर २०१५च्या अंकातील 
टाचणी आणि टोचणी या रवि आमले यांच्या सदरातील लेख.काही वाक्ये टाळ्याखाऊ असतात. पण वास्तवापासून खूप दूर असतात. त्यामुळे ती अंतिमतः धोकादायक ठरतात. अशा वाक्यांपैकी एक म्हणजे – महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी प्रांतांना फक्त भूगोल हे वाक्य. अत्यंत अतिशयोक्त आणि तेवढेच चुकीचे. त्यामुळे आपण कधी महाराष्ट्राहून अन्य राज्यांच्या इतिहासाकडे नीट पाहूच शकलो नाही. बरे म्हणून आपण महाराष्ट्राचा इतिहास नीट समजून घेतला आहे का? तर तसेही दिसत नाही. याचे कारण या थोर राष्ट्रातील अनेकांचा इतिहासच मुळी छत्रपती शिवरायांपासून सुरू होतो आणि त्यांच्यापाशीच संपतो. मराठेशाही अनेकांना माहीत असते. एवढेच. त्या पलीकडेही या राष्ट्राला मोठा इतिहास आहे. त्यात सातवाहन येतात, वाकाटक येतात, चक्रधर, ज्ञानेश्वरांपासून पुढची मोठी संतपरंपरा येते, अजंठा-वेरूळ येते, मलिक अंबर येतो, आदिलशाही, निजामशाही येते. पण आपणांस त्याच्याशी फारसे काही देणेघेणे नसते. त्या खोलात जाण्याकरीता अनेकांकडे आवड आणि सवड नसते हे मान्य. सगळेच काही इतिहासकार होऊ शकत नसतात हेही मान्य. पण मग इतिहासाचा जो तुकडा आपणांस आस्थेचा आणि अस्मितेचा भाग वाटतो, तो तरी नीट जाणून घ्यावा. पण तसेही होताना दिसत नाही. याचे कारण आपली इतिहासाभ्यासाची लोकप्रिय साधने.

इतिहास हा प्रेरणादायी असतो. तो शूरांना प्रेरणा देतो, तशीच शाहीरांनाही देतो. त्यातील शौर्याच्या, बलिदानाच्या, सुखाच्या, वेदनांच्या कहाण्या स्फूर्तीदायक असतात. रंजक असतात. त्यामुळे त्या साहित्यिक, कलावंतांना नेहमीच खुणावत असतात. मराठीत अशा इतिहास लेखनाची मोठी परंपरा आहे. चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र हे त्याचे मराठीतील आद्य उदाहरण. पुढे शाहिरी काव्यांतून, बखरींतून, पोथ्यांतून आणि इंग्रजी काळानंतर येथे जन्मास आलेल्या कादंबरी या साहित्यप्रकारातून इतिहास मांडण्यात आला. मौखिक परंपरा तर होतीच. त्यामानाने इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा फारच अलीकडचा, आंग्ल अमदानीतला. इंग्रज येथे आल्यानंतर ज्या अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्यातील ही एक महत्वाची गोष्ट मानावी लागेल. की त्यांच्यामुळे एतद्देशियांनी आपल्या इतिहासाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाकडे वळावे वाटले. पण हा अभ्यास म्हणजे अरण्यातील वाट. काट्याकुट्यांनी भरलेली. धूळ आणि धुक्याची. त्रासाची. शिवाय तो इतिहासही तसा रूक्ष. त्याचे कामच मुळात आख्यायिका आणि कहाण्यांच्या पुटांआड दडलेले वास्तव शोधण्याचे. त्यात रंजकता कोठून येणार? सर्वसामान्यांना तो भावणे कठीणच. त्यामुळे त्यांची मजल कायम कथा-कादंब-यांपर्यंतच राहिली. त्यातूनच त्यांच्यापर्यंत इतिहास जात राहिला.

आजही एखाद्या तरूणाला विचारले की तू महाराष्ट्राच्या इतिहासा विषयी काय वाचले आहे? तर तो राजवाडे, शेजवलकर, पगडी, फाटक, मेहंदळे अशी नावे घेणार नाही. तो श्रीमान योगी, स्वामी, पानिपत अशी नावे घेईल. एखादा अगदीच पट्टीचा वाचक असेल तर तो थेट मागे जाऊन नाथमाधव वा हरिभाऊ आपट्यांना जाऊन भिडेल. एखादा पुढे जाऊन रायगडाला जेव्हा जाग येते यासारखी नाटके किंवा स्वामी सारख्या मालिकेचे वा तशा एखाद्या चित्रपटाचे नाव घेईल. पाठ्यपुस्तकांतील इतिहासानंतर उडी मारायची ती थेट या रंजक, लोकप्रिय साधनांवरच ही मराठीतील इतिहासवाचनाची परंपराच बनलेली आहे. त्यातून हा कादंबरीमय इतिहास हाच खरा इतिहास असा एक भ्रम निर्माण झाला आहे. कारण तोच आपल्या सामाजिक भावविश्वाचा भाग बनला आहे. त्यावरचा आपला विश्वास एवढा प्रगाढ असतो, की उद्या साक्षात् शिवराय जरी आपल्यासमोर येऊन उभे राहिले तरी आपण त्यांना तोतयाच ठरवू. कारण ते शिवराय मावळात वाढलेले, मावळ्याबरोबर राहिलेले. ते मावळी मराठी बोलणारे असणार. आणि आपला शिवाजी मात्र नेहमीच कंसात तलवार उपसून पुणेरी मराठीत बोलणारा. शिवचरित्रात तर अशी अनेक ठिकाणे आहेत. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचे प्रकरण. ते सगळे प्रकरणच मुळात असत्य आहे. शिवाजी महाराज स्त्रियांची प्रतिष्ठा, सन्मान याबाबत दक्ष असत हे काही वेगळे सांगायला नको. अगदी लढाईच्या काळातही ते शत्रूच्या बायकांना सन्मानाने वागवत असत हे खाफीखान या इतिहासकारानेच लिहून ठेवलेले आहे. तेव्हा वेगळी साक्ष काढण्याचीही आवश्यकता नाही. तरीही शिवाजी राजांचे हे मोठेपण सांगण्यासाठी ही कहाणी रचण्यात आली. त्यातील ते – ‘अशीच असती माता आमुची सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती’ हे कवन रचण्यात आले. ते सारेच असत्य असल्याचे माहीत असूनही रणजीत देसाईंसारख्या तालेवार लेखकाने तो प्रसंग श्रीमान योगीमध्ये वापरला. त्यातून आपली आई सुंदर नसल्याची खंत राजांच्या मनी वसत असल्याचा वाईट अर्थ निघतो हे कुणाच्याच ध्यानी येत नाही. कारण सगळ्यांचेच लक्ष राजांना मोठे करण्यात असते. जे मुळातच मोठे आहेत त्यांना थोरवी देणारे आपण कोण टिकोजीराव लागून गेलो हेही मग ध्यानात येईनासे होते. शिवचरित्रात असे अनेक प्रसंग सांगता येतील. वस्तुतः शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अशा चमत्कृतीपूर्ण वास्तव घटनांची लांबच्या लांब सरस माळ असताना, अशा सुरस पण खोट्या कहाण्या सांगण्याची गरजच नाही. पण तशा कहाण्याही आज शिवेतिहासाचा भाग बनून गेल्या आहेत. अशा कहाण्या रंजक असतात, त्याने कदाचित आजच्या वर्तमानाच्या भावनिक गरजाही भागतात, पण त्या खोट्या असतात. अनेकदा ऐतिहासिक व्यक्तींवर, घटनांवर अन्याय करणा-या असतात. याचे आज चर्चेत असलेले उदाहरण म्हणजे बाजीरावपत्नी मस्तानी.

मस्तानीची हकीकत आपणांस जी माहीत आहे त्यानुसार ती एक कलावंतीण. नाच-गाणे करणारी. यवनी. अत्यंत नाजूक. एवढी की विडा खाऊन पिंक गिळली तरी दिसावी. थोरल्या बाजीरावांना ती भेट म्हणून मिळाली. त्यांनी तिला स्वीकारले. त्यांना एक मुलगाही झाला. बाजीरावांच्या निधनानंतर तीही मेली. एवढेच. या कहाणीवरच मस्तानीबाबतच्या इतिहासाचे सारे इमले रचण्यात आले आहेत. ही कहाणी कोठून आली, तर बखरीतून. कृष्णाजी विनायक सोहनी यांच्या ‘पेशव्यांची बखर’ या ग्रंथातून. त्यातील मस्तानीची जी कथा आहे ती अशी –

‘मस्तानी ही मुघल सरदार शहाजतखान याची कलावंतीण होती. मुघलांवर केलेल्या हल्ल्यात ती प्रथम चिमाजी आप्पाच्या हाती पडली. ती फार नाजूक होती. तिने विडा खाऊन पिंक गिळली तर दिसावी. तिचे पिस्वादीचे गुंडीस लाख रूपये किमतीचा हिरा होता. आणि तिच्याजवळ जवाहिरही पुष्कळ होते. अशी तिची बरदास्त शहाजखान याने ठेवली असता तिजवर असा वख्त पडला तेव्हा ती विष खाऊन मरू लागली. त्या समयी चिमाजी आप्पा यांनी विचारले – तू विष का खातेस? तेव्हा तिने उत्तर केले की, माझा सांभाळ करील असा आता कोणी नाही. तुम्ही आपले अंगाखाली ठेवाल तर मी जीव देणार नाही. यावर चिमाजी आप्पा बोलले की, माझे वडील भाऊ बाजीरावसाहेब बुंदेलखंडात गेले आहेत. ते आल्यावर तुझा प्रतिपाळ करतील. असे सांगितल्यावरून ती बरे म्हणून आप्पासाहेब यांजबरोबर राहिली.
चिमाजी आप्पा साता-यास आले व बाजीरावसाहेब बुंदेलखंडात गेले होते तेही आले. आपले स्वारीचा मजकूर चिमाजी आप्पा यांनी बाजीरावसाहेब यांस सांगितला.
मस्तानी कलावंतीण आणली आहे. तिचे म्हणणे जे – मजला अंगाखाली घालावे. त्यावरून तिजली मी सांगितले की आमचे वडील बंधू बाजीराव बुंदेलखंडात गेले आहेत. ते आल्यावर तुझा प्रतिपाळ करतील. असे सांगून तिचे सरंजामसुद्धा तिजला बरोबर आणली आहे. आता आपले मर्जीस येईल तसे करावे.
त्याजवरून बाजीरावसाहेब यांनी तिला बोलावणे पाठवून आपले डे-यात आणली. तिचे स्वरूप पाहून बाजीरावसाहेब भुलले आणि तिजला सांगितले की तुजला मी आपले अंगाखाली घालतो.’

हे सगळेच साफ खोटे आहे. मस्तानी, बाजीराव यांच्यावर अन्याय करणारे आहे. हे आता पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. ही बखर लिहिणारे सोहनी हे पेशव्यांचे पोष्य. दुस-या बाजीरावाच्या कारकिर्दीत ते सुभेदारीच्या हुद्द्यावर होते. १८१८ ला पेशवाई संपली. त्यानंतर ते विरक्त होऊन कोकणात जाऊन राहिले. तेथे त्यांनी आपल्या आठवणींच्या साह्याने ही बखर लिहिली. त्यातील बराचसा भाग हा ऐकीव माहितीवरूनच लिहिण्यात आलेला आहे. मस्तानीबाबत तर तिच्या हयातीतच अनेक कंड्या पिकविण्यात आल्या होत्या. ती राजकन्या. पण तिला वेश्या ठरवले गेले. ती मुस्लिम नव्हे. ती प्रणामी पंथाची. पण तिला मुस्लिम ठरविण्यात आले. तो पेशवाईतील एका मोठ्या कटाचा भाग होता आणि त्यात बाजीरावांच्या मातोश्री, बंधु चिमाजी आप्पा आणि पुत्र नानासाहेब यांचा हात होता. हा कट एवढा किळसवाणा होता, की त्यात मस्तानीचे नानासाहेबांबरोबर म्हणजे तिच्या मुलाबरोबरच प्रेमसंबंध असल्याचे दाखवून तिचा काटा काढण्याचाही प्रयत्न झाला होता. आज हा कट काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि मस्तानीची कलावंतीण म्हणून प्रतिमा तेवढीच शिल्लक उरली आहे. विडा खाल्ला तर गळ्यातून उतरणारी पिंक दिसावी असे नाजूक गोरेपण एवढ्यापुरतीच तिची ओळख समाजमनात शिल्लक आहे.

तिची कलावंतीण म्हणून असलेली प्रतिमा किती खोल रूजली आहे, हे पाहायचे असेल तर सध्या सुरू असलेल्या पिंगा या गाण्याबाबतच्या वादाकडे पाहावे. बाजीराव-मस्तानी या आगामी चित्रपटातील हे गाणे सध्या दूरचित्रवाणीवरून गाजत आहे. त्यात मस्तानी आणि काशीबाई या दोघी नाचताना दिसतात. त्याला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे हे, की काशीबाई या पायाने अधू होत्या. त्या कशा नाचतील? त्याहून गंभीर आक्षेप असा, की त्यात काशीबाई या राजस्त्रीस नाचताना दाखविले आहे. नृत्य म्हणजे उठवळपणा. पेशवाईच्या त्या कर्मठ वातावरणात तो कोणती राजस्त्री करील? मराठी नागर संस्कृतीत नृत्याला स्थान नाही. तेथे फक्त लोकनृत्ये येतात आणि म्हणून पेशव्यांच्या वाड्यांतील महिला नाचणार नाहीत असे म्हणता येईल. पेशव्यांच्या वाड्यांतील स्त्रिया भोंडला आदी नृत्येही करीत नसत असेही म्हणता येईल. तशात काशीबाई या पायाने अधू. त्या नाचूच शकणार नाहीत, असेही म्हणता येईल. तेव्हा हे आक्षेप योग्यच मानता येतील. परंतु ते घेताना मस्तानीवर अन्याय होत आहे याचे काय? मस्तानी ही कलावंतीण होती, नर्तकी होती हे आपण धरूनच चाललो आहोत त्याचे काय? ती नाचणारी होती असे मानले तरी बाजीरावाशी विवाह केल्यानंतर ती पेशवीण झालेली आहे. तेव्हा तिचे नाचणेही गैर, असे कोणी म्हणताना दिसत नाही. याचा अर्थ आपण तिला उठवळ म्हणूनच धरून चाललो आहेत त्याचे काय?

मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानची मोठी झालेली आहे. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतिण वा वारयोषिता नाही. पण पिंगा गाण्यावर आक्षेप घेणारांना फक्त काशीबाईची प्रतिष्ठा तेवढी दिसते आणि मस्तानीबाबत शब्दही काढावा वाटत नाही, याचे कारण आजवरच्या कथाकादंब-या आणि बखरींनी बनविलेली तिची प्रतिमा.

अशा प्रतिमा बनविण्याचे, इतिहासाचा असा अपलाप करण्याचे स्वातंत्र्य जर आपण कथा-कादंब-यांना देत असू, तर ते आजच्या चित्रपटांना का असू नये, असा सवाल आता कोणी केला तर त्यावर आपण काय म्हणणार? एकाला एक न्याय आणि दुस-याला दुसरा हा अन्याय झाला.

मुद्दा असा, की अशा चित्रपटांतून, कथा-कादंब-यांतून इतिहास सांगितला जात नाही. सांगितल्या जातात त्या दंतकथा आणि आख्यायिका हे एकदा नीट लक्षात घेतले पाहिजे. त्यांवर बंदीची मागणी करणे हा काही उपाय नव्हे. त्याने अपायाचीच अधिक शक्यता असते. अखेर बंदीच्या प्रयोजनात बंदी घालणारांचे हितसंबंध नसतीलच हे कसे ठरविणार? तेव्हा एखादी कादंबरी, एखादी कथा चुकीची असेल तर त्याचा प्रतिवाद अशा जोरदार पुराव्यांनी करावा की ती सर्व असत्ये पालापाचोळ्यासारखी उडून जावीत. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे कथा-कादंब-या ही इतिहासाची क्षुद्र साधने आहेत. किंबहुना ती साधनेच नाहीत हे सर्वसामान्यांना पटवून द्यावे. त्यातून कदाचित ख-या इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी तरी मिळेल. अन्यथा आपण सारे असेच इतिहास गौरवाच्या चकव्यात अडकून याच्यावर नाही तर त्याच्यावर आक्षेप घेत बसू.

(पूर्वार्ध)


2 comments:

Prasad Salvi said...

Uttam Lekh. Ek goshta sangitlit tar bara hoil. Jo tumhee mastanicha khara itihas asa sangta aahaat, tyaachi saadhne konti? Aapan kuthun sandarbha ghetla aahe te spashtapane saangaave. Kaaran te disle naahe lekhaat.

Unknown said...

खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली असेल.

नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.