ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप

आपल्या संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानला गेलेला असला, तरी त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी भल्तीच विचित्र, विकृत असते. त्यात पुन्हा एकपत्नीव्रत आणि पतिव्रता वगैरेंचे ओझेही आपल्या सामाजिक मानगुटीवर असतेच. (यावर काही लोक म्हणतील, की या पवित्र भावना तुम्हाला ओझे वाटतात म्हणजे भल्तेच! या पवित्र गोष्टी नसतील तर मग आपल्या पवित्र संस्कृतीचे व पवित्र कुटुंबसंस्थेचे कसे होणार? तर स‌भ्य स्त्री-पुरुषहो, तसे काही होत नसते. एक स्त्री कुलवधू असण्याच्या काळातही समाज रसरशीत होताच! वाचा - भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - विकार-विचारप्रदर्शनांच्या साधनांची उत्क्रांती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, लोकवाड्मयगृह, पाने - 118, मूल्य - 50 रु.)

आता हे स‌र्व असे असल्याने होते काय, की एखाद्याची बदनामी करायची म्हटल्यावर त्याच्या कामजीवनाबाबत नसत्या गप्पा पसरवायच्या, की झाले काम सोपे, हे आपण अनुभवाने शिकलेलो आहोत. व आपण एक स‌माज म्हणून अशा बाबतीत चांगलीच महारत मिळविलेली आहे, हे इतिहासात जाऊन पाहिले की लख्खपणे लक्षात येते. 'गीतारहस्य'कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या थोर माणसालाही अस‌ले किटाळ स‌हन करावे लागले होते. त्यांच्यावर चक्क बलात्काराचा आरोप झाला होता, अगदी न्यायालयात झाला होता आणि तो अर्थातच साफ खोटा होता.

लोकमान्यांच्या आयुष्यात त्यांना मनःस्ताप देणारी अनेक प्रकरणे येतात. ताईमहाराज प्रकरण हे त्यातलेच एक. याच खटल्यात त्यांच्यावर हा बलात्काराचा आरोप झाला होता. त्यात जाण्यापूर्वी हे ताईमहाराज प्रकरण काय होते ते थोडक्यात पाहू या...

लोकमान्य टिळकांचे एक स्नेही होते वासुदेव हरी ऊर्फ बाबामहाराज पंडित. हे पुण्यात राहात असत. त्यांना मुंबई स‌रकारने पहिल्या वर्गाचे स‌रदार म्हणून मान्यता दिलेली होती. ही आसामी चांगलीच श्रीमंत होती. पुणे, बेळगाव, सोलापूर या जिल्ह्यांत, तसेच कोल्हापूर संस्थानात त्यांच्या मालकीची मालमत्ता, जमीनजुमला विखुरलेला होता. पहिल्या पत्नीच्या अकाली निधनानंतर बाबामहाराजांनी सिन्नरकर नावाच्या एका पुस्तकविक्रेत्याच्या रुपवान मुलीशी लग्न केले. त्यांचे नाव स‌कवारबाई ऊर्फ ताईमहाराज. त्यांना शांताक्का नावाची मुलगी होती. 7 ऑगस्ट 1897 रोजी बाबामहाराजांचे कॉल-याने निधन झाले. तेव्हा ताईमहाराज गरोदर होत्या व त्यांना मुलगा होईल व आपल्या संपत्तीस वारस मिळेल, अशी मृत्युशय्येवर पडलेल्या बाबामहाराजांना आशा होती.

बाबामहाराज कॉल-याने आजारी पडल्याचे स‌मजल्यावर लोकमान्य त्यांना भेटावयास गेले. त्यांनी बाबामहाराजांना मृत्युपत्र करण्याचा स‌ल्ला दिला. आपल्यामागे आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त नेमणे आवश्यक आहे, असे बाबामहाराजांना वाटले. त्यांनी टिळकांना त्यासाठी गळ घातली. मित्राचे मन राखण्यासाठी टिळकांनी त्याला होकार दिला व बाबामहाराजांच्या इच्छेनुसार टिळकांप्रमाणेच बाबामहाराजांचे व्याही दादासाहेब ऊर्फ गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद स‌खाराम कुंभोजकर व बळवंत मार्तंड नागपूरकर हे विश्वस्त बनले. 7 ऑगस्ट 1897 रोजी स‌काळी बाबामहाराजांनी मृत्युपत्र तयार केले. त्याचा मजकूर टिळकांनीच सांगितला. त्यात म्हटले होते, "आमचे कुटुंब सौ. स‌कवारबाई हल्ली गरोदर आहे. तीस पुत्र न झाल्यास किंवा होऊन तो अल्पायुषी झाल्यास आमचे घराण्याचे नाव चालविण्याकरिता यथाशास्त्र जरूर लागेल तितक्या वेळेस आमचे कुटुंबाचे मांडीवर दत्तक वर लिहिलेल्या गृहस्थांच्या विचारे देऊन त्या मुलाचे वतीने तो वयात येईपर्यंत स‌दर पंचांनी (ट्रस्टी) स्थावर-जंगम इस्टेटीची व्यवस्था करावी."

त्यानंतर 18 जानेवारी 1898 रोजी मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे ताईमहाराजांनी शक्यतो आपल्या नात्यातल्या एखाद्या मुलास दत्तक घ्यावे असा विचार पुढे आला. बाबामहाराजांची मालमत्ता मोठी. बाई एकटी. तिला मुलगा नाही. तशात ती हलक्या कानाची. अशा परिस्थितीत तिच्याभोवती लोभी नातेवाईकांचे कोंडाळे न जमते तर नवलच. पण या नातेवाईकांना दूर सारून टिळक व अन्य विश्वस्तांनी, पंडित घराण्याच्या एका शाखेतील एका लहान मुलास दत्तक म्हणून निवडले. ताईमहाराजांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. हा मुलगा औरंगाबादजवळच्या निघोने गावचा होता. ठरल्यानुसार ताईमहाराज आनंदाने विश्वस्तांसह तेथे गेल्या व तेथे दत्तकविधान स‌मारंभ पार पडला.

पण पंडितांचे नातेवाईक गप्प बसणारे नव्हते. नागपूरकर हे विश्वस्त त्यांना सामील होते. त्यांनी ताईमहाराजांचे कान फुंकण्यास सुरूवात केली, की हा लहान मुलगा दत्तक घेऊन तुम्हांस काहीही फायदा होणार नाही. कारण तो स‌ज्ञान होईपर्यंत मालमत्तेवर विश्वस्तांचे नियंत्रण राहणार. त्यापेक्षा तुम्ही जर पंडित घराण्याच्या कोल्हापूर शाखेतील बाळामहाराज यांना दत्तक घेतले, तर किमान तीस हजाराचे दागिने वगैरे त्यांच्या हाती येतील. ते ऎकून ताईमहाराजांची मती फिरली. त्यांनी बाळामहाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. त्यास कोल्हापूर दरबारचा पाठिंबाही मिळविला. पण टिळकांनी हे दत्तकविधान बेकायदेशीर असल्याने ते थोपविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी कोर्टापासून पुण्याच्या तालिमबाज पठ्ठ्यांपर्यंत स‌र्वांची मदत त्यांनी घेतली. पण अखेर हा दत्तकसमांरभ पुण्याऎवजी कोल्हापूरात झालाच. त्यास शाहू छत्रपती उपस्थित होते. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी शाहू छत्रपती विरोधी बाजू घेतल्याने या प्रकरणात छत्रपतींनी टिळकांच्या विरोधी भूमिका घेतली, एवढाच याचा अर्थ.

या दत्तकविधानाविरोधात टिळकांनी 23 स‌प्टेंबर 1901 रोजी पुण्याच्या प्रथमवर्ग स‌बजज्जांच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. वास्तविक या खटल्यात टिळकांची बाजू अतिशय कमकुवत होती आणि त्याचे एकमेव कारण हेच होते, की न्यायाधीशापासून स‌रकारपर्यंत स‌गळेच त्यांच्याविरोधात होते. या न्यायाधीश अस्टनने तर, खोटी साक्ष देणे, बनावट दस्तऎवज व खोटा पुरावा तयार करून फसवणूक करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे वगैरे टिळकांवरील गंभीर आरोपांबाबत पोलिस चौकशी करून त्यांच्यावर खटला भरावा अशी जोरदार शिफारस स‌रकारला केली. त्यानुसार टिळकांवर फौजदारी खटला भरण्यात आला आणि त्यात 24 ऑगस्ट 1903 रोजी टिळकांना दीड वर्षांची स‌क्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. त्याविरोधात अर्थातच टिळक अपिलात गेले आणि अखरे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. नंतर दिवाणी खटल्यातही टिळकांच्याच बाजूने निकाल लागला. 31 जुलै 1906 रोजी जव्हेरीलाल ठाकोर या न्यायाधीशाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला. त्यावरोधात विरोधी पक्षाने उच्च न्यायलयात अपिल केले. त्यात टिळक हरले. मग ते प्रीव्ही कौन्सिलमध्ये गेले व तेथे जिंकले. बाबामहाराज पंडितांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी या खटल्यांच्या पायी टिळकांना कर्जबाजारी व्हावे लागले.

तर टिळकांवरील या फौजदारी खटल्यात पुरावा म्हणून एक पत्र सादर करण्यात आले होते. ''औरंगाबाद येथील मुक्कामात टिळकांनी ताईमहाराजांवर बलात्कार केला" असा आरोप त्या पत्रात करण्यात आला होता. विशेष म्हणजे खुद्द ताईमहाराज आणि त्याची ब्राह्मण सेविका गोदूबाई यांनी न्यायालयात तसे सूचित व्हावे अशा त-हेने साक्ष दिली होती. टिळक-चरित्रकार तात्यासाहेब केळकर सांगतात, "या जबान्या झाल्या त्या दिवशी कोर्टातून घरी आल्यावर टिळक रागाने लाल झाले होते की तस‌े लाल झालेले एरवी कोणी केव्हा पाहिले नव्हते. ते इतकेच म्हणाले की 'एखादी बाजारबसवी स्त्रीदेखील आपली बेअब्रू आपल्या तोंडाने कबूल करीत नाही, झाकून ठेवते पण एवढ्या मोठ्या स‌रदार घराण्यातील ही स्त्री निष्कारण आपली बेअब्रू आपल्या तोंडाने खोटे बोलून दाखविते तेव्हा तिचा धिक्कार असो.'" (पृ. 151)

टिळकांनी बलात्कार केल्याची ताईमहाराजांनी दिलेली साक्ष खोटीच होती. त्यांचे पत्रही बनावट होते. हे न्यायालयात स‌िद्धही झाले. ही पंडितमहाराज आणि नागपूरकर यांनी खेळलेली एक तेढी चाल होती, हेही लोकांच्या तेव्हा लक्षात आले.

या घाणेरड्या व खोट्या आरोपांनी टिळकांच्या चरित्रावर डाग पडावा एवढे त्यांचे चारित्र्य हलके नव्हते. यातून एकच दिसले, की स‌माजवंद्य माणूस लोकांच्या मनातून उतरावा यासाठी त्याचे चारित्र्यहनन करण्याची चाल विरोधक खेळतात, यातून टिळकही सुटले नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या दृष्टीने तो काळही आजच्या पेक्षा काही फार वेगळा नव्हता.

संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती, 1986, पृष्ठ - 102 ते 138 व 151.

वाद वेदोक्ताचा - 3

वेदोक्त प्रकरणाचा वणवा पेटला तो एका उर्मट, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उद्धट उद्गारांनी.

तो 1899 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा काळ होता. नेहमीच्या रिवाजानुसार त्या काळात शाहू छत्रपती पंचगंगेवर कार्तिकस्नानासाठी गेले होते. त्यांच्या स‌मवेत बरीच मंडळी होती. त्यात विख्यात ग्रंथकार राजारामशास्त्री भागवत हेही होते. महाराज स्नान करीत होते. नारायणभट नावाचा ब्राह्मण मंत्र म्हणत होता. पण तो वेदोक्त नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्री भागवतांच्या बरोबर लक्षात आले. त्यांनी ती गोष्ट महाराजांना सांगितली. महाराजांनी नारायण भटाला त्याबाबत विचारले. तेव्हा तो म्हणाला, शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगायचे असतात. ते म्हणण्यापूर्वी भटजीने स्वतः आंघोळ केली नसली तरी चालते. त्याच्या या जबाबाने महाराज साहजिकच संतापले.

कोल्हापूर छत्रपतींच्या पदरी असलेल्या सोळा शास्त्री घराण्यांपैकी एका घराण्यातील शास्त्री बाळाचार्य खुपरेकर यांनी याबाबतची आपली आठवण सांगितली आहे. त्यानुसार हा नारायण भट बाहेरख्याली होता. "या घटनेच्या आदल्या रात्री त्याचे त्याच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले होते व त्याने तिला मारहाणही केली होती. पहाटे वाड्यावरची गाडी आली, तेव्हा त्या भटजीच्या बायकोने ते घरात नाहीत म्हणून सांगितले. कुठे गेले म्हणून विचारल्यावर, गेले शेण खायला असे उत्तर दिले. गाडीवानाने अर्थ स‌मजून वेश्यावस्तीत जाऊन त्याला शोधून काढले व घरी जाण्यासाठी गाडी वळवली व आंघोळ लवकर उरकायला सांगितले. त्यावेळी आपले बिंग बाहेर पडले व आपली छीथू होणार हे पाहून रागावलेल्या स्थितीत त्याने हे उद्गार काढले. हुज-याने महाराजांना हा प्रकार सांगताच त्यांनी त्याला चाबकाने फोडून काढले. महाराज म्हणाले, आम्ही श्रद्धेने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही असले आचरण ठेवूऩ वर गाढवासारखं बडबडता! (1)

1901च्या भाद्रपदातील पितृपक्षात महाराज पन्हाळगडावर राहात होते. तेथे श्राद्धासारखी धर्मकृत्ये करण्यासाठी त्यांनी नारायण स‌दाशिव ऊर्फ अप्पासाहेब राजोपाध्ये यांना बोलावणे पाठविले. हे राजोपाध्ये म्हणजे कोल्हापूरकर भोसल्यांचे कुलगुरू व कुलोपाध्याय होते. पण ते छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास तयार नव्हते. तेव्हा 7 ऑगस्ट 1901ला महाराजांनी लेखी आदेशच दिला. राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जावीत असे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते. पण राजोपाध्यांनी या आदेशाची अंमलबजावणी काही काळ स्थगित ठेवावी अशी विनंती केली.

अशात नवरात्र उजाडले आणि कोल्हापूरात देवी विटाळल्याची बोंब झाली.ते प्रकरणही औरच होते. कोल्हापूरात नारायणशास्त्री गोविंद सेवेकरी वैद्य नावाचे ब्राह्मण होते. ते वेदोक्तास अनुकूल होते. त्यांनी 29 ऑगस्ट 1901 रोजी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांची श्रावणी केली. बापूसाहेब कागलकरांचीही श्रावणी त्यांनी केली. त्यामुळे स‌नातन्यांनी त्यांना वाळीत टाकले होते. या नारायणशास्त्र्यांनी 14 ऑक्टोबर 1901 रोजी अंबाबाईच्या देवळात जाऊन पूजा केली. शाहू छत्रपतींनीच त्यांना पूजेसाठी पाठविले होते. पण त्यांच्या स्पर्शाने देवी विटाळली असा आरडाओरडा स‌नातनी ब्राह्मणांनी केला. नारायणशास्त्रांना वाळीत टाकले असल्याची माहिती स‌नातन्यांच्या वतीने तेरा भिक्षुकांनी नायब कारभा-यांच्या कानावर घातली. याच तेरा भिक्षुकांनी नंतर शाहू छत्रपतींचीही भेट घेतली. तेव्हा छत्रपतींनी या तेरा जणांना देवळात प्रवेश करण्यास मनाई केली. तेव्हा ही ब्राह्मणमंडळी शाहू छत्रपतींच्या विरोधात इंग्रज स‌रकारकडे गेली. या ब्राह्मणांशी महाराजांच्याच कुलगुरूने हातमिळवणी केली असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

अप्पासाहेब राजोपाध्ये हे महाराजांचे कुलगुरू व कुलोपाध्याय. तेच वेदोक्ताच्या विरोधात होते, हे पाहिल्यावर मग महाराजांनी त्यांनाही धडा शिकविण्याचा निर्धार केला. 26 ऑक्टोबर 1901 रोजीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राजवाड्यावर जी धर्मकृत्ये करायची, ती वेदोक्ताने करणार नसाल, तर वाड्यावर येऊ नका, असा निरोप त्यांना छत्रपतींनी पाठविला. त्यानंतर रोजच स‌काळी त्यांना असाच तोंडी निरोप पाठविण्यात येत असे. हा प्रकार 8 नोव्हेंबरपर्यंत चालला. राजोपाध्ये पूजेस येत नव्हते आणि म्हणून त्यांना दक्षिणाही दिली जात नव्हती.

याच सुमारास लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी परजली आणि राजोपाध्यांच्या बाजूने त्यांनी 22 व 29 नोव्हेंबरच्या अंकात वेदोक्तावरचे अग्रलेख लिहिले. तेव्हाची बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांच्या हातातील असल्याने त्यांनीही शाहू छत्रपतींच्या विरोधात जणू आघाडी उघडली. टिळकांचा केसरी-मराठी तर त्यात होताच, पण प्रा. विजापूरकरांच्या प्रभावाखालील स‌मर्थ साप्ताहिक, शंकरशास्त्री गोखले यांचे विद्याविलास हे साप्ताहिक, साता-याचे प्रतोद, वाईचे भाऊशास्त्री लेल्यांचे मोदवृत्त, सोलापुरचे कल्पतरू, ठाण्याचे अरूणोदय व हिंदूपंच, नाशिकचे गुराखी या नियतकालिकांनीही छत्रपतींच्या विरोधात प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. स‌ावळाराम अमृतराव विचारे यांचे मराठा दिनबंधु हे कोल्हापुरातले वृत्तपत्र त्यांना आपल्यापरीने उत्तर देत होते. पण या स‌र्व कोलाहलात त्याचा आवाज कोणाला ऎकू जाणार?

वेदोक्ताच्या प्रकरणातील स‌त्य शोधण्यासाठी याच सुमारास शाहू छत्रपतींनी एक स‌मितीही नेमली. रा. ब. कृष्णाजी नारायण पंडित, स‌रन्यायाधीश विश्वनाथ बळवंत गोखले आणि विशेष म्हणजे आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचा या स‌मितीत स‌मावेश होता. 16 एप्रिल 1902 रोजी या स‌मितीने आपला अहवाल दिला. छत्रपती बाबासाहेब महाराज (1837-1866) यांच्या कारकीर्दीपर्यंत कोल्हापूरच्या राजघराण्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जात होती. बाबासाहेब महाराजांची मुले जगत नव्हती, तेव्हा रघुनाथशास्त्री पर्वते यांच्या स‌ल्ल्यावरून काही गृहकृत्ये पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरूवात करण्यात आली. हे पाहता छत्रपतींना वेदोक्त पद्धतीने गृहकृत्ये करायची असल्यास त्यांना ती करता येतील, अशी शिफारस स‌मितीने केली. पण या अहवालावर स‌ही करण्यास राजोपाध्ये यांनी नकार दिला. स‌मितीपुढे साक्ष देण्यास येण्यास बाहेरचे लोक येत नव्हते, महाराजांचे अधिकारी दबाव आणित होते, असा त्यांचा आरोप होता. पण विशेष म्हणजे स‌मितीचे कामकाज त्यांच्याच घरात पाच महिने चालले होते, त्यावेळी मात्र ते याबाबत चकार शब्दानेही बोलले नव्हते. तेव्हा अहवाल प्रतिकूल जाताच त्यांनी त्यास विरोध दर्शविला हे उघड आहे. अखेर शाहू महाराजांनी 6 मे 1902 रोजी राजोपाध्ये यांना रीतसर राजोपाध्येपदावरून काढून टाकले. त्यांची स‌र्व इनामे, वतने व त्यांचे दिवाणी, फौजदारी व महसूलविषयक अधिकार काढून घेतले. या निर्णयामुळे तर मोठाच गदारोळ झाला. राजोपाध्यांच्या पाठिराख्यांनी तर महाराजांविरोधात जणू बंडच पुकारले. अशा वातावरणात महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी एक परिपत्रक काढून कोल्हापूरातील स‌रकारी नोक-यांत मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण जाहीर केले. यामुळे तर ब्राह्मणवर्गात संतापाची लाट उसळली. केसरी-मराठ्यासकट स‌गळी ब्राह्मणी वृत्तपत्रे महाराजांवर तुटून पडली.

या वादाने किती उग्र रूप घेतले होते, ते महाराजांच्या दत्तक राजमातेचे निधन झाले तेव्हाच्या घटनांतून दिसून येते. 14 स‌प्टेंबर 1902 रोजी चौथ्या शिवाजीराजांच्या पत्नी मातोश्री आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी वेदोक्त पद्धतीने करण्यात येत होता, तर त्याला तेथेच काही ब्राह्मणांनी विरोध केला. त्यावर मोठी वादावादी झाली. अखेर अंत्यस‌ंस्कार वेदोक्त पद्धतीनेच करण्यात आले. त्याच दिवशी मध्यरात्री जुन्या राजवाड्याला आग लागली. ही आग काही उपद्व्यापी ब्राह्मणांनीच लावली असावी असा महाराजांना संशय होता. या आगीत जुन्या राजवाड्यातील प्रचंड दप्तरखाना खाक झाला. दुस-या दिवशी सकाळी कोल्हापुरातल्या अनेक घरांवर रक्ताची बोटे उमटलेली लोकांनी दिसली. हा महाराजांना 'इशारा' होता!

तिकडे राजोपाध्ये यांचे आपले इनाम व वतन वाचविण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी प्रथम गव्हर्नरकडे अर्ज केला होता. पण गव्हर्नरने छत्रपतींच्या बाजूने निकाल दिला. तेव्हा राजोपाध्यांनी थेट गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनकडे धाव घेतली. पण तेथेही राजोपाध्यांचा पराभव झाला. या निकालाने लोकमान्यांना मोठेच दुःख झाले. त्यांनी लिहिले, "राजोपाध्ये यांचे इनाम संस्थानात सामील झाले. याच न्यायाने पुढेमागे कोल्हापूर संस्थान इंग्रजी राज्यात सामील झाल्यास लोकांस‌ही स‌माधान वाटेल." राजोपाध्यांचे इनाम जप्त केल्याने संतापलेले लोकमान्य कोल्हापूर संस्थान जप्त करावे, असे सुचवित होते. जणू छत्रपतींनी राजोपाध्यांवर मोठा अन्यायच केला होता. वास्तविक त्यांचे इनाम हे चाकरी इनाम होते. पगाराप्रमाणे. काम करा, पगार घ्या, काम बंद, पगार बंद असे. जेव्हा चाकरी बंद तेव्हा इनामही बंद अशी त्याची कायदेशीर बाजू होती व ती लोकमान्य विसरले होते.

कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाप्रमाणेच तेथील शंकराचार्यही वेदोक्ताच्या विरोधात होते. शंकराचार्यांच्या मठावर 23 फेब्रुवारी 1903 रोजी काशीनाथ गोविंद ब्रह्मनाळकर या कीर्तनकाराची नेमणूक झाली. हा ब्रह्मनाळकरबुवा म्हणजे एक प्रकरणच होते. संन्याशी झाला, तरी त्याची धनसंपत्तीची हाव संपली नव्हती. पुढे त्याने त्या मठात एवढे गैरव्यवहार केले, की या पदाची सर्व इज्जत त्यांनी धुळीस मिळवली. लेलेशास्त्र्यांनीच पुढे त्यांच्या या लीला उजेडात आणल्या. ते भस्मात अत्तर घालून ते अंगास चोपडित असत. पानतंबाखू खात असत. झोपण्यासाठी शंकराचार्यांना मखमखलीच्या गाद्या लागत आणि ते नेहमी बायांकडून अंग रगडून घेत असत, वगैरे गोष्टी सांगून लेलेशास्त्र्यांनी त्याचा हा संन्याशाचा संसार किती विलासी होता, हे लोकांसमोर आणले. पण हे कधी तर शंकराचार्यांनी वेदोक्तास संमती दिली त्यानंतर. तत्पूर्वी शंकराचार्य ब्रह्मवृंदाचे नेतेच होते. शंकराचार्यांनी, शाहू महाराज हे शूद्र असल्याने त्यांना वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे मत दिल्यावर शाहू महाराजांनी त्यांनाही दणका दिला. त्यांनी मठाची स्थावरजंगम मालमत्ता जप्त करून स्वामीचे स‌र्व धार्मिक अधिकार बरखास्त केल्याची राजाज्ञा काढली.(मे 1903)

त्यामुळे चवताळलेल्या ब्रह्मनाळकरबुवांनी मग हवी तशी मुक्ताफळे उधळण्यास सुरूवात केली. ब्रह्मवृंदाची जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात दौरा काढला. पुण्यात त्यांची पालकी वाहणा-यांत लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे अशी खाशी मंडळी होती. याच दौ-यात त्यांचा मुक्काम महाड येथे असताना तेथील प्रभू जातीच्या काही लोकांनी त्यांची पाद्यपूजा वेदोक्त मंत्र म्हणून करण्याचे ठरविले. पण त्यांनी व महाडच्या ब्राह्मणांनी तो बेत हाणून पाडला. याच वेळी शंकराचार्यांच्या या उत्तराधिका-याने शिवछत्रपती क्षत्रिय नव्हते व त्यांनी गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतले, त्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला, असे उद्गार काढले.

पण आता या वादात छत्रपतींचीच स‌रशी होणार अशी चिन्हे दिसू लागली होती. राजोपाध्यांना इंग्रज स‌रकारने मोठी आशा होती. पण आता ती मावळली होती आणि त्यामुळे ब्रह्मवृंद आणि शंकराचार्यही हवेतून जमिनीवर उतरले होते.

शेवटी या प्रकरणात तडजोड झाली आणि जुलै 1905 मध्ये छत्रपतींचे भोसले घराणे क्षत्रिय असल्याचे आणि त्याला वेदोक्ताचा अधिकार असल्याचे शंकराचार्यांनी मान्य केले. 20 डिसेंबर 1905 रोजी कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाने स‌भा घेऊन शंकराचार्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि पाच-सात वर्षे चाललेला हा संघर्ष छत्रपतींच्या विजयाने समाप्त झाला.

पण हा संघर्ष खरेच स‌माप्त झाला?

1 जून 1909 च्या धर्म पाक्षिकात लेलेशास्त्र्यांनी लिहिले, "शूद्राला वेदाधिकारदान, गुरूद्रोह इत्यादी पातकांमुळे" ब्रह्मनाळकरांना क्षयरोग झाला!


संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पाने 62 ते 97
- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा संघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.

वाद वेदोक्ताचा - 2

सर्व क्षुद्रांचा गलबला!

तुमचे शिवाजी महाराज असतील शककर्ते, किंबहुना ते नसते तर आमची सुंता वगैरे झाली असती असे जे कवि भूषणने म्हटले ते आम्हालाही मान्यच आहे. त्यासाठी आम्ही त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणू. पण त्यांना आम्ही क्षत्रिय मात्र म्हणणार नाही, कारण कलीत क्षत्रिय नाहीत, अशी अवघी पुराणमतवादी मानसिकता होती. गागाभट्टाने त्यांना आधी शूद्र म्हटले ते यातूनच.

त्याचे असे झाले, की शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांच्या मुलाचा व्रतबंध करायचा होता. ते ऎकल्यावर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी त्यांची कुचेष्टाच केली. कारण बाळाजी आवजी हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आणि ब्राह्मणांच्या लेखी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही जात तर वर्णसंकरातून तयार झालेली. तेव्हा त्यांना कसले आले वेदोक्त कर्माचे वगैरे अधिकार ! पण कायस्त प्रभूंना मात्र हे मत मान्य नव्हते. त्यांच्या मते ही क्षत्रिय जात असून, 'गोविंदभट्टी' या ग्रंथानुसार पंधराव्या शतकात त्यांचा वेदाधिकार मान्य झालेला आहे आणि स‌न 1663मध्ये कायस्थ प्रभूंचा मुंजीसारखे संस्कार करण्याचा अधिकार प्रस्थापित झालेला आहे. पण तरीही 1669 साली मोरोपंत पिंगळ्यांनी प्रभूंना हा हक्क नसल्याचे म्हटल्यावर बाळाजी काशीच्या पंडितांकडे धाव घेतली. पण हाय रे चिटणीसांचे दैव! काशीच्या विद्वान ब्राह्मणांनी महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या म्हणण्यावरच शिक्कामोर्तब केले. त्यांनी बाळआजी आवजींनाच शूद्र ठरविले असे नाही, तर शिवाजी महाराजांनाही ते क्षत्रिय नस‌ल्याने छत्रसिंहासनाचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. तशा आशयाचे गागाभट्ट या पंडिताचे पत्र घेऊन केशवभट्ट पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित आणि सोमनाथभट्ट कात्रे महाराष्ट्रात आले. हा निर्णय पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी निळो येसाजी प्रभू पारस‌नीस यांना काशीला पाठविले. त्यानंतर गागाभट्ट स्वतः रायगडावर आले आणि त्यांचे मत बदलल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला.

महाराष्ट्रातल्या स‌नातनी ब्रह्मवृंदाला मात्र गागाभट्टांची ही करणी कधीच पसंत पडली नाही. वाई येथून निघणा-या 'धर्म' या साप्ताहिकाचे संपादक काशिनाथ वामन ऊर्फ भाऊशास्त्री लेले यांनी तर असे जाहीर केले, की शिवाजी महाराजांना वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक करणारे गागाभट्ट काशीकर हे शिवाजी महाराजांचे उपदेशगुरूही नव्हते व कुलगुरूही नव्हते, तर ते एक भाडोत्री विद्वान होते. "जातिविषयक प्रश्न उपस्थित झाल्यास शिवाजी महाराज शूद्र होते असे एक वेळच नव्हे परंतु अनंत वेळा जरी 'धर्म'संपादकाने प्रसिद्ध केले तरी त्यात त्याचा अपराध तो काय होणार आहे?" असा लेलेशास्त्रींचा स‌वाल होता.

तिकडे स‌याजीराव गायकवाड जेव्हा वेदोक्ताबाबत ब्राह्मण पंडितांचा स‌ल्ला घेत होते, तेव्हा राजारामशास्त्री टोपले हे महाराजांना इषारा देत होते, की "महाराज, आपण क्षत्रिय आहात वगैरे गोष्टी ख-या, परंतु या नव्या भानगडीत आपण पडणे इष्ट नाही, वेदोक्त हे विष आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून त्याजबद्दलचा हट्ट धरला त्यांचे कल्याण झाले नाही. त्यांच्या राज्यास अवनती प्राप्त झाली. स‌बब त्या विषाची परीक्षा आपण पाहू नये. " शिवछत्रपती शूद्र असताना त्यांनी वेदोक्त पद्धतीने आपणांस राज्याभिषेक करवून घेतला त्यामुळे त्यांना फार काळ राज्य लाभले नाही आणि त्यांच्या नंतर त्यांनी स्थापिलेल्या स्वराज्यावर गंडांतरे आली आणि राज्याचे तुकडे पडले. प्रा. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी तर याहीपुढे जाऊन लिहिले, की "शककर्ते शिवाजी महाराजांस ज्यांनी रायगडी राज्याभिषेक केला व 'क्षत्रियकुलावतंस' म्हटले त्यांचे (गागभट्टांचे) निधन शौचकूपात पतन पावून झाले अशी दंतकथा आहे. एकंदर काय बीज असेल ते असो. 'परमेश्वरो वै वेत्ति' मूळ अस्सल क्षत्रियकुळी असेल परंतु स‌हवास व शरीरसंबंधांचा परिणाम देवास आवडत नसेल."

शिवछत्रती क्षत्रिय असून, त्यांना छत्रसिंहासनाचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी बाळाजी आवजीने मोठी मुत्सद्देगिरीची कामगिरी केली. त्यांनी काय केले, तर भोसल्यांच्या वंशावळीचा धागा थेट उदेपूरच्या रजपूत राजघराण्याशी नेऊन भिडविला, असे प्रबोधनकार ठाकरे सांगतात. पण हे तरी स‌नातनी ब्राह्मणांना कुठे मान्य होते? त्या थोर ब्रह्मवृंदाचा धोशा एकच होता. कलीत क्षत्रिय नाहीत, असे स्मृती सांगत असल्याने रजपुतांना तरी क्षत्रिय कसे म्हणता येईल? लेलेशास्त्री लिहितात, "रजपूत हे क्षत्रिय नसून ते त्याहून निराळे आहेत. संस्कृतमध्ये त्यांना उग्र असे नाव आहे. त्यांची कर्मे गागाभट्टाच्या वंशातील गागभट्टापासून तिसरा पुरुष जो कमलाकरभट्ट त्याने शूद्र कमलाकरात सांगितली आहेत... शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी क्षत्रियापासून जो पुत्र उत्पन्न होतो त्याची जाती उग्र ही होय. शिवाजी हा रजपुतांचा वंशज होता असे जरी मानिले तरीही तो क्षत्रिय ठरणे मुळीच शक्य नाही. शिवाय शिवाजी हा जर क्षत्रिय असेल, तर विवाहापूर्वीच त्याचे उपनयनही व्हावयास पाहिजे होते, परंतु तसे मुळीच झालेले नाही. आजच्या मराठे जातीस एका विवाहावाचून दुसरा कोणताही संस्कार मुळीच माहीत नाही, हे निर्विवाद आहे.... 'विवाहमात्रं संस्कारं शूद्रोSपि लभते स‌दा' (शूद्रासही विवाह हा एकच संस्कार प्राप्त होतो) या स्मृतिवचनाप्रमाणे मराठे हे शूद्रच आहेत असे मानणे भागच आहे."

अर्थात जातीदंभ केवळ स‌नातनी भटभिक्षुकांमध्ये होता असे मानण्याचे काही कारण नाही. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी पंडितांची महासभा घेऊन स‌र्व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून घेतले. पण मग त्यांनाही ही जातिश्रेष्ठत्वाची बाधा झाली. स‌र्व मराठे क्षत्रिय आहेत हे या पंडितसभेत मान्य झाल्यानंतर ते स्वतःस सिसोदे राजे भोसले असे म्हणवून घेऊ लागले आणि ग्वाल्हेरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड यांना कुणबी म्हणून कमी लेखू लागले. "अलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातीत फितुर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही... हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरिक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक" अशी छत्रपती प्रतापसिंहांची स‌मजूत होती.

स‌याजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यानंतर असा हा स‌र्व क्षुद्र मतांचा गलबला सुरू होता.

बडोद्यास स‌याजीराव गायकवाडांना या शूद्रत्त्वाचा मोठा मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी वेदोक्ताचा आग्रह धरला. पण त्याला तेथील ब्रह्मवृंद त्यास तयार नव्हता. तेव्हा मग त्यांनी स‌रळ आपल्या सेवेतील ब्राह्मणांची हकालपट्टी करून, त्यांऎवजी गुजराती, मारवाडी ब्राह्मण नेमून वेदोक्तानुसार धर्मकर्मे सुरू केली. ते प्रकरण काही फारसे पेटले नाही. पण इकडे शाहू महाराजांनी वेदोक्ताचा आग्रह धरल्यावर मात्र जणू आभाळच कोसळले असे झाले. पुण्यात, कोल्हापुरात सनातन्यांचे जणू बंड माजले.

आधी म्हटल्याप्रमाणे हा वणवा पेटला, तो एका उद्धट, बाहेरख्याली ब्राह्मणाच्या उर्मट उद्गारांनी. काय होते ते उद्रार, की जे ऎकून शाहूंसारखा राजर्षि कोपायमान झाला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला चाबकाने फोडून काढले?


संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पृ. 39 -52

वाद वेदोक्ताचा (1)

शिवछत्रपती शककर्ते, तरीही स‌नातन्यांच्या लेखी ते शूद्रच!

"शिवाजी क्षत्रिय नव्हताच. त्याने गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतलं. त्याच्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा स‌त्यानाश झाला."- कोल्हापूरचे शंकराचार्य ब्रह्मनाळकर स्वामी (इ.स. 1903 मध्ये शंकराचार्यांनी महाड मुक्कामी काढलेले उद्गार) (1)

"शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने करून त्यांचा क्षत्रियकुलावतंस असा जयजयकार करणा-या गागाभट्टाला त्याच्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणजे त्यास शौचकूपात पडून मृत्यू पत्करावा लागला."
- प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर, करवीर ब्रह्मवृंदाचे तत्कालिन नेते. (ग्रंथमाला मासिकातील वेदोक्तप्रकरणावरील लेखातील विचार.) (2)

विसाव्या शतकाच्या प्रारंभी करवीर संस्थानात वेदोक्त प्रकरणावरून वातावरण किती विषारी झाले होते, हे या दोन वाक्यांवरून लक्षात यावे. महाराष्ट्राच्या पुढील स‌र्व स‌माजकारणावर मोठा परिणाम घडवून आणणा-या या प्रकरणात अटीतटीला आलेली, एकमेकांविरोधात उभी ठाकलेली माणसे कोणी सामान्य नव्हती. शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारखे दिग्गज नेते तर या वादात एकमेकांविरोधात वाक्-शस्त्रे परजून होतेच, पण कोल्हापूर संस्थान व पुण्यातील ब्रह्मवृंदाची तसेच स‌त्यशोधक विचारसरणीची थोर नेतेमंडळीही त्यात होती. या प्रकरणाचा शेवट अखेर शाहू छत्रपतींच्या विजयाने झाला. विजय त्यांचा झाला, पण त्या संघर्षात महाराष्ट्रपुरुषाच्या काळजावर ज्या जखमा झाल्या त्या अजूनही पुरत्या भरलेल्या नाहीत.

एका सामान्य, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उर्मटपणातून सुरू झालेले हे प्रकरण. पण त्याची मुळं जातात ते थेट शिवकालापर्यंत, शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत की नाहीत या वादापर्यंत. गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. पण त्याने तो वाद काही मिटला नाही. मराठी राजसत्ता लयास गेल्यावर अव्वल आंग्लाईत सातारच्या प्रतापसिंह महाराजांच्या कारकिर्दीत स‌न 1832 मध्ये हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला गेला होता. प्रतापसिंह महाराजांनी सातारच्या वेदशालेत ब्राह्मण पक्ष आणि क्षत्रिय पक्षाची धर्मपरिषद घेतली. ब्राह्मण पक्षाला सांगलीच्या पटवर्धनांचा पाठिंबा होता. क्षत्रियांची बाजू आबा पारसनीस या कायस्थ प्रभू पंडिताने मांडली होती. त्या वादविवादात अखेर क्षत्रियांचाच विजय झाला व भोसले, घाटगे, जाधव, शिर्के इ. मराठा घराणी क्षत्रिय असल्याचे सिद्ध झाले. यानंतर असाच प्रसंग बडोद्यात घडला. ऑक्टो. 1896 मध्ये स‌याजीराव महाराजांना त्यांच्या पुरोहिताने सुनावले, की ते शूद्र आहेत व वेदोक्ताचा अधिकार त्यांना नाही. (3)

येथे ही वेदोक्ताच्या अधिकाराची भानगड स‌मजून घेतली पाहिजे.

वेद हे आपल्या महान हिंदुधर्माचे आधारस्तंभ आहेत. ती ईश्वरी वाणी आहे. आपल्या थोरथोर ऋषिमुनींच्या नावे वेदांतील ऋचा येतात. पण ते काही त्या ऋचांचे रचनाकार नसतात. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. तेव्हा ती दैवीवाणीच. आणि म्हणून ती ऎकण्याची, म्हणण्याची मुभा फक्त द्विजांना.

हे द्विज म्हणजे काय, तर ज्यांचा दुसरा जन्म झाला आहे असे. दुसरा जन्म केव्हा होतो, तर मौंजीबंधनानंतर. हा मुंज करण्याचा अधिकार कोणाला तर फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना. म्हणून हे तीन वर्ण झाले द्विज. उरलेल्या शूद्रांना वेदश्रवणाचाही अधिकार नाही. कारण शूद्र जातीतील व्यक्ती हे हिंडते फिरते स्मशान असल्याने त्याच्याजवळ बसून वेदाध्ययन करण्यासही मनाई. शूद्र वेदश्रवण करू लागला तर त्याच्या कानात शिसे व लाख ही पातळ करून ओतावी, अशी शिक्षा तर स्मृतींनीच सांगितलेली. (4) हे प्रकरण एवढे कडक, की शंबूक नावाचा शूद्र वेदाध्ययन करत होता व त्याच्या या पापाचरणामुळे रामराज्यातील ब्राह्मणाचा पूत्र अकाली मरण पावला, हे स‌मजल्यानंतर स्वतः प्रभू रामचंद्राने त्या शंबुकाचे मस्तक धडावेगळे केले. रावणवधाइतकाच हा शंबूकवधही महत्त्वाचा!

बरे ही झाली खूप पूर्वीची गोष्ट. तेव्हा क्षत्रिय, वैश्य यांनाही वेदश्रवणाचा अधिकार होता. पण पुढे नंद घराण्याचा अंत झाला आणि त्याबरोबर समस्त पृथ्वीवरील क्षत्रियकुल संपले. आपल्या पवित्र पुराणांनी ही गोष्ट उच्चरवाने सांगितली आहे, की कलियुगात वैश्यांसह क्षत्रियांचा अभाव असेल. (5)

आता कलियुगात क्षत्रिय, वैश्य नाहीत, असा जाहीरनामा पुराणे व व्रात्यनिर्णय यांसारख्या ग्रंथांनी काढल्यामुळे शिवछत्रपतींनाही स‌नातनी भटभिक्षुक शूद्च स‌मजत असत. फार काय खुद्द गागाभट्टही शिवाजी महाराजांना शूद्रच स‌मजत होते... (क्रमशः)


संदर्भ -
1. राजर्षि विशेषांक (रविवार दिनांक), पृ. 10
2. उक्त, पृ. 11
3. उक्त, पृ. 9
4. शाहू छत्रपती आणि लोकमान्य, पृ. 42-43
5. उक्त, पृ. 42

- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 1986
- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा स‌ंघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.

येशू ख्रिस्ताचे धर्मशिक्षण हिंदुस्थानात झाले होते?


येशू ख्रिस्ताचा जन्म फिलीस्तीनमधील नाझरेथ या शहरात झाला. त्याच्या जन्मसालाची एक गंमतच आहे. म्हणजे असे मानले जाते, की ख्रिस्ती स‌न सुरू होण्यापूर्वी दोन-तीन वर्षे आधी (2-3 बी.सी.) त्याचा जन्म झाला! या काळात फिलीस्तीनवर रोमन स‌म्राट सीझरची सार्वभौम स‌त्ता होती आणि तेथे हेरोद राजा रोमन स‌म्राटाचा मांडलिक म्हणून राज्य करीत होता.

येशू लहानपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीचा असल्याचे उल्लेख शुभवार्तेत येतात. जॉन द बाप्टिस्ट हा त्याचा मावसभाऊ. त्याच्याकडूनच येशूने पुढे दीक्षा घेतली. त्यानंतर येशू तडक पहाडात गेला. चाळीस दिवस तेथे त्याने तप केले. त्यातून तावून-सुलाखून निघून तो खाली उतरला आणि मग कौफरनाम या ग्यालीली प्रांतातील शहरात आला. तेथे त्याने आपले पहिले प्रवचन दिले. त्यावेळी तो 26-27 वर्षांचा होता. बायबलमध्ये ही माहिती येते.

येथे बायबल म्हणजे नेमके काय हे पाहायला हवे. बायबल या शब्दाचे मूळ ग्रीक बिब्लियन (biblion) असे आहे. त्याचा अर्थ ग्रंथ. बायबलचे दोन भाग आहेत. एक जुना टेस्टामेन्ट आणि दुसरा नवा टेस्टामेन्ट. टेस्टामेन्ट म्हणजे साक्षपुरावा. जुना टेस्टामेन्ट हा ज्यूंचा धर्मग्रंथ आहे. त्यात त्यांचे धर्मशास्त्र, प्रेषित आणि ग्रंथ यांची माहिती आहे. नव्या टेस्टामेन्टमध्ये येशूचे चरित्र आहे. त्याचे 27 भाग आहेत. पहिल्या चार भागांना इंग्रजीत गॉस्पेल (शुभवार्ता) म्हणतात. त्यात येशूचे जीवन सांगितले आहे. हे चार भाग असे - म्याथ्यूची शुभवार्ता, मार्कची शुभवार्ता, ल्यूकची शुभवार्ता आणि जॉनची शुभवार्ता. यातील म्याथ्यू हा येशूच्या प्रत्यक्ष संबंधात आला होता असे म्हणतात. मात्र इतिहासकारांच्या मते म्याथ्यूची शुभवार्ता ख्रिस्तानंतर 70च्या पुढे लिहिली गेली असावी, असे म्हणतात. एकंदर हे चारही शुभवार्ताकार भक्त-संत येशूच्या नंतर 60 ते 100 वर्षांच्या काळात झालेले आहेत. त्यांनी येशूचे शिष्य वा अनुशिष्य यांच्या तोंडून ऎकलेल्या कथा आपापल्या शुभवार्तेत सांगितल्या. हा स‌र्व भाग मुळात ग्रीकमध्ये आहे. आजचे इंग्रजी बायबल हे इंग्लंडच्या पहिल्या जेम्स राजाने इ. स. 1611 मध्ये करून घेतलेले भाषांतर आहे. तेच अधिकृत म्हणून प्रचलित आहे.

तर या शुभवार्तांमध्ये येशूचे बालपण ते मृत्यू व त्याचे पुन्हा जिवंत होणे वगैरे हकिकती येतात. असे असले, तरी रशियन संशोधक निकोलाय नातोविच यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत येशू कोठे होता याचा खुलासा काही होत नाही. एवढेच नव्हे तर मृत्युनंतर तिस-या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाला. पण त्यानंतर काय? त्यानंतर त्याचे काय झाले? तो कोठे गेला? या प्रश्नांची उत्तरेही सापडत नाहीत. नातोविच यांनी इ. स. 1890मध्ये 'द अननोन लाइफ ऑफ जीजस ख्राईस्ट' हे पुस्तक लिहिले. त्यावर पोपने तत्काळ बंदी घातली. तर या पुस्तकानुसार "तिस-या शतकापर्यंतच्या ऎतिहासिक नोंदींमध्ये येशूचा उल्लेखच येत नाही. येशूला सुळावर दिल्यानंतर सुमारे 80 वर्षांनंतर रोमन इतिहासकारांनी आपल्या बखरींत ख्रिश्चन सेक्टचा उल्लेख केलेला आहे. पण त्यात जीजस ख्राईस्ट या व्यक्तीचा नामोल्लेख नाही. इ. स. 98 मध्ये जोसेफ फ्लेव्हियस या ज्यू इतिहासकाराने 'ज्युईश अँटिक्विटीज' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात तत्कालिन ज्ञात इतिहास शक्य त्या विस्ताराने दिला आहे. नीरो या रोमन स‌म्राटाच्या कारकीर्दीचे वर्णन त्यात आहे. जॉन द बाप्टिस्ट, हेरोद (अँटिपस) आणि (रोमच्या बादशहाचा प्रतिनिधी पाँटिअस) पायलेट यांचे वर्णन आहे. तत्कालिन स‌माजजीवनाचेही वर्णन आहे. पण त्यात जीजस किंवा इसाचे नाव येत नाही. येशूने केलेल चमत्कार व येशू पुन्हा जिवंत झाला याचा निर्वाळा रोमन इतिहासकार जोसेफस याने दिला, असा उल्लेख प्रथम तिस-या शतकात एका रोमन इतिहासकाराने केला आहे."

नातोविच विचारतात, या अनुल्लेखामागचे रहस्य काय? वयाच्या बाराव्या वर्षापासून तिशीपर्यंत इसा कोठे होता? या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी ते 1867मध्ये काश्मीरमध्ये आले. तेथून ते लेहला गेले व हेमिस या बुद्धमठात असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्या हस्तलिखितांमध्ये काय लिहिलेले होते?

इस्त्रायलमध्ये जन्माला आलेला इसा हा यशोदा पुत्र कृष्ण या हिंदू अवतारमालिकेतील नवा अवतार असून, तो बुद्धानंतरचा युरोपातील अवलोकितेश्वर म्हणून ओळखला जाईल, अशी भाकिते त्या जुन्या पोथ्यांमध्ये होती!!

नंतर 19व्या शतकात लेव्ही डाऊलिंग यांचे 'The Aquarion Gospel' नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी नातोविच यांच्या 'संशोधना'स पुष्टीच दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या बारा ते एकोणिस वर्षांपर्यंत येशू हिंदुस्थानात होता!

या पुस्तकात डाऊलिंग यांनी म्हटले आहे, की "ओरिसाच्या एका राजपुत्राने एका देवळात बारा वर्षांच्या मुलास पाहिले. तो बुद्धिवान आहे असे दिसले व त्यास घरी आणून शिक्षण दिले. जगन्नाथाच्या भव्य देवालयात त्याला विद्यार्थी म्हणून स्वीकृत करण्यात आले. वेदांचा व मनूच्या धर्मशास्त्राचा प्राथमिक अभ्यास करण्याची संधी त्याला येथे मिळाली. येथे गुरुजनांशी वाद करताना त्याने बुद्धिवाद केल्यामुळे त्याला ब्राह्मणवर्गाचा रोषही पत्करावा लागला."

यात कितपत तथ्य आहे? माहित नाही.
पण येशूचे हिंदुत्व सांगण्यासाठी या पुस्तकांचा वापर करण्यात येतो.
हा लेखही ज्या लेखावरून बेतला त्याचे नाव आहे 'येशूच्या हिंदुत्वाचा एक आगळा शोध' व तो प्रसिद्ध झाला होता 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये!

एकूण गंमत आहे, इतकेच!


संदर्भ -

- येशूच्या हिंदुत्वाचा एक आगळा शोध ! - वसंत गडकर, दै. सामना, 25 डिसेंबर 1994.
- मानवाचा पुत्र येशू - भाऊ धर्माधिकारी, ग्रंथाली प्रकाशन, पहिली आवृत्ती, 1983.
- येशू काश्मीरमध्ये आला होता?

टिळक-आगरकरांची वृत्तपत्रीय परंपरा - दुसरी बाजू


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी "केसरी-मराठा'तून, तसेच नंतर आगरकरांनी स्वतंत्रपणे "सुधारक'मधून केलेली पत्रकारिता हा आजही आदर्श मानली जाते. ती आदर्श आहेच, यात शंकाच नाही. मात्र त्यांची पत्रकारिताही निष्कलंक नव्हती! रा. के. लेले यांनी आपल्या इतिहासग्रंथात हे स्पष्टपणे नोंदविण्याचे धैर्य दाखविले आहे.

त्यांच्या पुस्तकातील हा उतारा टिळक-आगरकरांच्या पत्रकारितेची दुसरी बाजू लख्ख प्रकाशात आणतो. -
""1893 च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत हिंद-मुसलमानांचा भयंकर दंगा झाला. हिंदुंनी चालविलेल्या गोरक्षणासारख्या चळवळीमुळे दोन्ही जमातींत वैमनस्य निर्माण होते व त्याची परिणती जातीय दंगलीत होते, असे मत ऍक्‍स्वर्थ व व्हिन्सेंट यांच्यासारखे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व "टाइम्स ऑफ इंडिया' सारखे अँग्लो-इंडियन वर्तमानपत्र सतत मांडीत होते.... अशा स्थितीत "आपले मत काय आहे ते स्पष्टपणे सरकारला वेळीच कळविले पाहिजे' असे वाटल्यामुळे टिळक व माधवराव नामजोशी यांनी पुढाकार घेऊन 10 सप्टेंबर 1893 रोजी शनिवारवाड्यापुढे हिंदूंची एक जंगी सभा भरवली. ही सभा भरवू नये म्हणून न्या. मू. रानडे यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले. त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी साथ दिली. आगरकरांनी टिळकांविरुद्ध रानडे-गोखल्यांची बाजू उचलून धरली. पण टिळकांनी विरोध बाजूला सारून सभा भरविलीच. सभा झाल्यानंतर "ज्ञानप्रकाश' पत्राने 14 सप्टेंबरच्या अंकात "तीन खोट्या गोष्टी' लिहिल्या. त्यातून वाद पेटला.

18 सप्टेंबरच्या "सुधारका'च्या अंकात आगरकर वादात उतरले. "हिंदूंच्या जंगी सभेने कोणता दिग्विजय लावला?' या मथळ्याचे संपादकीय लिहून आगरकरांनी टिळकांवर हल्ला चढवला. "ज्यांच्या मेंदूस धनुर्वात किंवा अर्धांगवायू झाला नाही; ज्यांचे भाषण, लेखन व आचरण पाहिले असता विधात्याने सर्व शहाणपण एकत्र करून त्याचे हे मूर्तिमंत पुतळे ओतले आहेत की काय, असा भास होतो; ज्यांचा शब्ददुंदुभी वाजू लागला की सारा समाज ते सांगतील तसे नाचण्यास सज्ज होतो; सारांश, ज्यांना या महाराष्ट्रभूमीचे अनभिषिक्त राजे म्हणण्यास हरकत नाही त्यांनी स्वल्प अडचण दिसल्याबरोबर ग्रामसिंहाप्रमाणे शेपटी खाली घालावी, आपल्या शीलास अगदी उलट वर्तन करावे ही केवढी शरमेची गोष्ट आहे बरे! ज्यांचा संसर्ग लोकास महारोग्याच्या संसर्गाप्रमाणे वाटू लागला आहे त्यांनी त्याशी फिरून सलगी व जे जात्या खुनशी, घमेंडखोर व अत्यंत नीच आहेत, त्यांनी वंद्य सज्जनावर निष्कारण तुटून पडण्याचा व त्यावर भलतेच आरोप आणण्याचा अधमपणाचा प्रयत्न करू नये तर केव्हा करावा?' अशा प्रकारची टीका व विशेषतः आगरकरांनी केलेला अपशब्दांचा वर्षाव यामुळे टिळक अगदी प्रक्षुब्ध होऊन गेले. त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या सर्वांचा सणसणीत समाचार घेतला.

"अधीर तरतरीचे व अविचारी अतएव परप्रत्ययनेय बुद्धीचे तरुण सेक्रेटरी,' असा टोला गोखल्यांना टिळकांनी मारला. पण आगरकरांवर मात्र ते तुटून पडले, त्यांनी लिहिले, "स्वतः करवत नाही व दुसऱ्याने केलेले पाहवत नाही अशा मनुष्यास गवताच्या गंजीवरील कुत्र्याची उपमा देत असतात. चतुःशृंगीच्या मैदानावरील गंजी जळल्यामुळे अगर दुसऱ्या काही कारणामुळे आमच्या येथील अशा प्रकारचा एक गंजीवरील कुत्रा अगदी पिसाळला आहे व ज्याच्या त्याच्यावर तोंड टाकण्याखेरीज त्यास दुसरा मार्ग काहीच दिसत नाही. सभेचे हेतू, उद्देश आणि ठराव हे या लेखकास मान्य आहेत, असे त्याच्या पहिल्या लेकावरून सिद्ध होते, मग आमच्या सभेच्या चालकास व्यर्थ शिव्या देण्याचा हेतू एम. ए. झालेल्या मनुष्याचा मेंदू किती सडका असतो हे दाखविण्यापेक्षा दुसरा काही एक नव्हता, असे म्हणावे लागते... सुधारकांच्या अग्रणीचे राजकीय बाबतीत अनुकरण न केले तर आमच्यावर मोठा प्रसंग गुजरेल असे गावाबाहेर महारोग्याप्रमाणे राहणाऱ्या या सुधारकाच्या पितमाह एडिटरास वाटत आहे... सभेचे उद्देश व ठराव काय आहेत याची पूर्ण माहिती झाली असताही पुन्हा खोट्यानाट्या गोष्टी लिहून आपल्या व्यवसायबंधूबद्दल सरकारचे मन कलुषित करणे यापेक्षा जास्त नीचतेचा किंवा अधमपणाचा प्रकार मनुष्य अशी संज्ञा धारण करणाऱ्याकडून घडेल असे आम्हा वाटत नाही... गवताच्या गंजीजवळ राहून हे राजेश्री गवत खात नाहीत हे भर्तुहरी म्हणतात त्याप्रमाणे पशूंचे भाग्य समजावयाचे!' (केसरी, 19 सप्टेंबर 1893)

टिळक आगरकर यांची आणखी एका प्रसंगाने अशीच झटापट होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाण्याचा प्रसंग आला होता.... ''

हे प्रसंग सांगून लेले लिहितात, ""टिळक व आगरकर यांच्यामधील वाग्‌युद्धाचा हा इतिहास उद्वेगजनक आहे. समाजसेवेचे कंकण बांधून पत्रव्यवसाय करणाऱ्या या दोन थोर संपादकांनी एकदा वादाला तोंड फुटल्यावर तारतम्य न ठेवता एकमेकांवर हवी तशी चिखलफेक केली.... टिळक-आगरकरांतील वाद आता ऐतिहासिक बाब झाली असली तरी वैयक्तिक टीकेची अनिष्ट परंपरा पुष्ट करण्यास या दोघा मातबर संपादकांनी हातभार लावला ही गोष्ट नाकारता येणार नाही.''

"केसरी' व "सुधारक' या दोन्ही पत्रांमधील अशा मजकूरामुळे त्यांच्यावर तत्कालीन वाचकांनी, अन्य संपादकांनी टीका केली होती. "अरुणोदय' या पत्राने आधी एका प्रसंगी टीका केली होती, ती अशी -
दोघेही "विचारशून्य, ज्ञानशून्य व हलकट' ""... मंगळवारची सिंव्हगर्जना ऐकावी अशी उत्सुकता होऊन व सिंव्ह हा राजा असल्यामुळे आपल्या थोर स्वभावावर जाईल असे वाटले होते पण तोही बिचारा विकारवशतेच्या पिंजऱ्यात सापडून कोल्ह्यासारखी कोल्हेकुई करू लागला हे वाचल्याबरोबर मात्र अतिशय वाईट वाटले.... गेल्या सुधारकात तुळशीबागेतील 5000 लोकांस "विचारशून्य', "ज्ञानशून्य' व "हलकट' असे म्हणण्यात आले आहे व गेल्या केसरीत राव. ब. रानडे प्रभृती मंडळीस अशा प्रकारच्या पण किंचित सभ्य अशा शिव्या देण्यात आल्या आहेत.'' (अरूणोदय, 2 नोवहेंबर 1890)

यावर वेगळी मल्लीनाथी करण्याची काही आवश्‍यकता आहे काय? पुढे अनेक पत्रांनी टिळक-आगरकरांचा हा वारसा नेटाने चालविला!

संदर्भ -
वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, प्रथमावृत्ती 1984, पृ. 331 ते 334.

तुकारामांची गुरूपरंपरा सुफी मुस्लिम?

क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों स‌ब जग ही भुला ।।1।।
खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ।।धृ.।।
काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऎसी लोक बिराणी ।।2।।
गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ।।3।।
(तुकाराम गाथा - देहू प्रत, पृ. 260, अभंग 1146)

मराठी सारस्वताला ललामभूत अशा तुकोबारायांचे असे काही हिंदी अभंग पाहिले, की नाही म्हटले तरी आश्चर्य वाटतेच! तुकोबांनी हे हिंदी अभंग का आणि कुणासाठी रचले असावेत असा एक प्रश्न स‌हजच मनात येतो. तुकोबांचे गाव देहू. त्यांच्या काळात तो विजापूरच्या आदिलशाहीचा भाग होता. तुकोबांचे घराणे महाजनांचे. तेव्हा आदिलशाहीतील अधिका-यांशी त्यांचे या ना त्या कारणाने संबंध येतच असणार. मुद्दा असा की ही दखनी बोली काही त्यांना परकी नव्हती. कदाचित त्यांनी अगदी स‌हजच त्या बोलीत काही पदं रचली असतील. हा आपला एक अंदाज.

पण जेव्हा तुकोबांच्या गुरूपरंपरेचे नाते मुस्लिम सुफी संप्रदायाशी असल्याचे सांगितले जाते, तेव्हा मग वाटते, की तुकोबांच्या दखनी काव्यात आश्चर्य करावे असे काहीच नाही.

पण आता अविश्वसनिय वाटावी अशी वेगळीच गोष्ट स‌मोर येते. तुकोबांच्या गुरुपरंपरेचे नाते सुफी या मुस्लिम संप्रदायाशी?
हे म्हणजे काहीच्या काही होतेय!
तुकोबांचे गुरु तर बाबाजी चैतन्य. त्यांच्या अभंगाचीच तशी साक्ष आहे.
ते म्हणतात -

सद्गुरुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा काहीं ।।
सांपडविले वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।।धृ।।
भोजना माहती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ।।2।।
कांही कळहे उपजला अंतराय । ह्मणोनियां काय त्वरा जाली ।।3।।
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ।।4।।
बाबाजी आपलें सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ।।5।।
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका ह्णणे ।।6।।
(तुकाराम गाथा - देहू प्रत, पृ. 80, अभंग 368)

पण तरीही तुकारामांची गुरुपरंपरा सुफी असल्याचेही एक मत मांडले जाते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या नाहीसे होण्याबद्दल बोलताना, त्यांनी आपल्या सुफी गुरुपरंपरेनुसार जीवंत स‌माधी घेतली असावी असाही एक तर्क मांडला जातो.

वरील अभंगावरून असे दिसते, की राघवचैतन्य, केशवचैतन्य आणि बाबाजीचैतन्य अशी तुकोबांची गुरुपरंपरा आहे. म्हणजे राघवचैतन्य हे तुकोबांचे आजेगुरू, कैशवचैतन्य हे त्यांचे शिष्य आणि बाबाजी दीक्षित हे त्यांचे शिष्य अशी ही मालिका आहे. रा. रा. भालचंद्र नेमाडे यांनी तुकाराम गाथेतील निवडक अभंगांचे संपादन केले आहे. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी ही मालिका नोंदली आहे. पण श्री निरंजन स्वामीकृत 'चैतन्य विजय' हा ग्रंथ काही वेगळीच माहिती देतो. श्री निरंजन स्वामी तथा ह. भ. प. निरंजनबाबा नाशिककर यांचा हा ग्रंथ शके 1709चा. (इ. स. 1788) हा ग्रंथ बाबाजीचैतन्य आणि केशवचैतन्य हे एकच असल्याचे सांगतो. (स‌र्वजन म्हणती केशव चैतन्य । भाविक म्हणती बाबाचैतन्य । दोन्ही नामें एकची जाण । अत्यादरें बोलती ।। - अध्याय 3, ओवी 114) या ग्रंथाच्या प्रास्ताविकात अनंत श्रीधर भवाळकर ऊर्फ चैतन्यदास यांनी हेच मत दिले आहे. ते म्हणतात, "(तुकारामांच्या) अभंगात मालिकेची हा शब्द आहे. ही मालिका त्रयीची असते. राघवचैतन्य हे आपले गुरु श्रीमत् व्यास यांची परंपरा सांगतात व त्यांचे शिष्य केशवचैतन्य होत. त्यादृष्टीने ही त्रयीची मालिका बरोबर जुळते. इतिहाससंशोधक या मालिकेच्या संबंधात मुग्ध आहेत." (या ठिकाणी चैतन्यदास यांचा रोख वा. सी. बेंद्रे यांच्याकडे असावा. त्यांनी तुकोबांचे चरित्र लिहिले असून, तुकारामांच्या गुरुपरंपरेचा इतिहासही कथन केला आहे.) गंमत म्हणजे याच ग्रंथातील 37 व्या पानावरील एका तळटीपेत राघव, केशव व बाबाजी चैतन्य हे वेगळे असल्याचे नमूद केले आहे! तर ते असो.

मुद्दा असा, की जर तुकारामच बाबाजीचैतन्य हे आपले गुरू असल्याचे सांगत असतील व राघवचैतन्य हे त्यांचे परात्पर गुरु असतील, तर मग ही सुफी परंपरा कोठून आली?

हे पाहण्यापूर्वी राघवचैतन्य व केशवचैतन्य यांचे चरित्र जाणून घ्यावे लागेल. राघवचैतन्य हे तंत्रमार्गी होते. त्यांनी महागणपती आणि ज्वालामुखी देवी यांची तांत्रिक स्तोत्रे रचली आहेत. त्यांचा काळ इ. स. 1500 च्या सुमाराचा. 'चैतन्य विजय'नुसार त्यांची वस्ती काही काळ ओतूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे मांडवी-पुष्पावतीच्या तीरी होती. तेथे ते गुप्तपणे राहात होते. तेथेच त्यांना विश्वनाथबाबा हा ब्राह्मण गृहस्थ भेटला. यांचा जन्म पुणें वाडीचा. त्याच्यावर राघवचैतन्य यांनी अनुग्रह केला व त्याचे नाव केशवचैतन्य असे ठेवले. त्यांनी उत्तरखंडातील स‌र्व तीर्थांची यात्रा केली व बारा वर्षांनी ते कर्नाटकातील गुलबर्ग्यास आले. तेथून जवळच, 16 मैल अंतरावर असलेल्या आळंद (आळंद-गुंजोटी) येथे त्यांनी बराच काळ निवास केला. तेथेच आनंदीदेवीच्या मंदिरात राघवचैतन्य यांनी महासमाधी घेतली. 'चैतन्य विजय'नुसार कलबुरगे येथे राघवचैतन्य यांनी मशीद उडविण्याचा चमत्कार केला. तो पाहून निजामशहा बादशहा अचंबित झाला व राघवचैतन्य यांची भक्ती करू लागला. त्याच्या आग्रहावरून राघवचैतन्य हे आळंद गुंजोटी येथे राहिले व तेथेच त्यांनी स‌माधी घेतली आणि आपले शिष्य केशवचैतन्य यांना त्यांनी ओतूरला पाठवून दिले. तर ही स‌माधी राघवदराज म्हणून ओळखली जाते. चैतन्यविजय सांगतो, की हे नाव यवनांनी ठेविले. ब्राह्मणांनी मात्र त्यांना राघवचैतन्य असेच म्हणावे. या स‌माधीच्या "एकभागी पूजा करिती ब्राह्मण । एकभागी पूजा करिती यवन । अद्यापि तेथील महिमान । चालले असे यापरी ।। " (अध्याय 3, ओवी 96)

तर ही राघवचैतन्यांची स‌माधी लाडले मशायख या नावाने ओळखली जाते. आणि त्यांचे शिष्य केशवचैतन्य हे गेसू दराज बंदेनवाज व बाबाजीचैतन्य शेखसाहेब या नावाने ओळखले जातात. (चैतन्यविजय, पा. 37)

ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मते मुळात राघवचैतन्य यांचे चरित्रांतर नंतर झालेले आहे. "त्यांनी स‌माधी घेतल्यानंतर लौकरच, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुसलमान आक्रमकांनी या स्थानाचा (म्हणजे आळंदचा) कब्जा मिळविला, इथली मंदिरे उद्ध्वस्त केली, राघवचैतन्यांच्या स‌माधीचे रूपांतर एका काल्पनिक सूफी अवलियाच्या स्मारकात केले, त्या काल्पनिक स‌ूफी अवलियाचे चरित्र लाडले मशायख या नावाने रचले," असे रा. रा. बेंद्रे यांचे प्रतिपादन आहे.

गेसू दराज आणि शेखसाहेब ऊर्फ ख्वाजा शेखसाहेब यांच्याबद्दल एक वेगळी माहिती मिळते. "दक्षिणेत बहमनी राज्य स्थापन झाल्यानंतर निजामुद्दीन अवलिया यांच्या आज्ञेने सातशे सूफी दरवेशी दिल्लीहून धर्मप्रचारार्थ निघाले होते. त्यात ख्वाजा शेख, बंदेनवाज, सैयद मीर गेसू दराज हे प्रमुख होते. ते बहमनी सुलतानाची राजधानी गुलबर्गा येथे स्थायिक झाले. (स‌ैयद मीर गेसू दराज हे) बहामनी सुलतानाचे राजगुरू होते... त्यांचा मृत्यू गुलबर्ग्यात इ. स. 1422 मध्ये झाला." (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 29)

परंतु येथे महत्त्वाची ठरते ती एकच गोष्ट की, तुकारामांवर गुरुकृपा होण्यापूर्वीपासून कित्येक वर्षे आधी राघवचैतन्य यांचे चरित्र लाडले मशायख ऊर्फ शेख अलाउद्दीन अन्सारी लाडले या नावाने रचले गेलेले आहे.

---------------------------------------------------

येथे एका गोष्टीचा उल्लेख करावयास पाहिजे, की सूफी साधू आणि हिंदू संत-सज्जन यांचे संबंध त्याकाळी अतिशय स‌लोख्याचे असल्याचे दाखले आहेत. उदाहरणार्थ जनार्दनस्वामी (1426, चाळीसगाव) यांना चांद बोधले या सूफी मलंगाने अनुग्रह केला होता, तर स्याहगढच्या सूफी साधुला मौला दत्त असे नाव आहे. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 38) फार काय, शेख लतीफ, शेख मुहम्मद यांना वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहेच, पण सोळाव्या शतकात बहमनी राजघराण्यातील मुन्तोजी बहमनी या सुलतानाचे नावही वारकरी संतांच्या सूचीत आढळते. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 40)

महानुभाव पंथाशीही सूफी संप्रदायाचे निकटचे संबंध होते. महानुभाव साधू मुस्लिम पिरांप्रमाणे काळी वस्त्रे परिधान करीत व स्वतःला स्याह फकीर म्हणवत असत. आपल्या श्री दत्त या आराध्य दैवताचे वर्णन मुस्लिम पद्धतीने करीत असत. (स्याहगड से मौला दत्त डुले वगैरे) (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 42)

पुढे ज्ञानोबांनी गीतेवरील टीका लिहून वैदिक धर्ममतास बळ दिले. त्यामुळे सूफी वा अन्य कोणतेही अवैदिक संप्रदाय वा पंथ महाराष्ट्रात फारसे रूजू शकले नाहीत. परंतु स‌माजजीवनावरील धर्मपंथ-संप्रदायांची असणारी छाप काही अशीच विरून जात नसते.

--------------------------------------------------------------

तुकोबांचे परात्परगुरू जन्माने सूफी मुस्लिम होते की काय, हे खरे तर महत्त्वाचे नसतेच. त्यांचे एक चरित्र सूफी अवलियाचे आहे आणि त्यांच्या भक्तगणांत हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही आहेत, ही गोष्ट महत्त्वाची!


संदर्भ -
- चैतन्य विजय - प्रकाशक - सुधाकर राजर्षि, ओतूर, आवृत्ती दुसरी, 1982.
- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा - प्रकाशक विठोबा रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, दुसरी आवृत्ती, जाने. 2001.
- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपादक - भालचंद्र नेमाडे, प्रकाशक - साहित्य अकादमी, पहिली आवृत्ती 2004.
- शिरडीचे श्री साईबाबा व सूफी पंथ - संपादक - डॉ. गुरूनाथ व्यंकटेश दिवेकर, शलाका प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती जुलै 1993

मराठेशाहीतील मद्यपानविषयक धोरण

मराठी राज्यात जे लोक दारू करून विकत असत त्यांना कलाल म्हणत. खाटीक किंवा तत्सम लोक दारूच्या भट्ट्या लावीत, दारू बनवित व कलाल तिची विक्री करी. हे दारूविक्रीचे काम सरकारी परवान्यानेच होत असे.

शिवकालात द्राक्षाची किंवा मोहाची दारू पीत असत. पण दारूची दुकाने तुरळक होती व त्यावर कोतवालाची व इतर सरकारी अधिकाऱ्यांची करडी नजर असे. गावात अगर चार गावाकरिता एक असे गावाबाहेर कलालाचे दुकान असे. कोणी व्यक्ती दारू पिऊन धुंद झालेली रस्त्यात किंवा वाड्यात दृष्टीस पडल्यास त्यास सरकार मोठे शासन करीत असे.

शिवकालात बहुतेक अष्टप्रधान विद्वान ब्राह्मण असत. त्यांनी मराठी राज्यात दारू पिण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी, पिणाऱ्यास जबर दंडाची व फटक्‍याची कडक शिक्षा करण्यासाठी राजाकडून हुकूम काढविले होते. सैनिकांवर शराबी पिण्याची बंदी होती. (आज्ञापत्र, विविध ज्ञान विस्तार माला 1923, पृ. 29)

थोरले माधवराव पेशवे यांनी न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्या सांगण्यावरून दारूविषयी तपशीलवार नियम करून ठेविले होते. पेशव्यांचे सरदार व जहागिरदार यांनी आपल्या अंकित प्रदेशांतील शहरात दारू विकू नये, अशी अट सरंजाम देताना घालण्यात येई....

दारूच्या फुलाची भट्टी लावून फूल सरकारी कारखान्याचे कामास नेण्यास व दारूची भट्टी जेजुरीस चालविण्यास छाट वा खाटकास सरकारकडून इ. स. 1778 त परवाना जिलेला आढळतो. (भा. इ. सं. मं. जाने-जुलै 1950, ले. 11) सरकारात या दारूभट्टीची रक्कम जमा झालेली दिसते. (पेशवाईच्या सावलीत, चापेकर, पृ. 41) दारू पिण्याचा गुन्हा करणारे सापडल्यावर सरकारने दारूच्या भट्ट्या मना करण्यासाठी व कलालांना म्हणजे दारूविक्री करणाऱ्या दुकानदारांस दारूविक्री बंद करण्याचे हुकूम काढले. ह्या हुकुमाची अंमलबजावणीही त्वरित करण्यात आली. त्यावेळेपासून सरकारच्या भीतीमुळे मराठी राज्यात दारू पिणे व त्यापासून उत्पन्न मिळविणे या बाबी बंद झाल्या....

पण पैसा मिळविण्याच्या लालसेने चोरून दारूचा साठा करून विकणे चालत असे. असे साठे व चोरटी दुकाने हुडकून काढण्यासाठी नाना फडणिसाने फिरस्ते प्यादे ठेवले होते. अशा एका पथकास 1776 त नारायण पेठेतील म्हातारी द्रविड ब्राह्मण हिच्या घरी दारूने भरलेले वीस-पंचवीस शिसे व त्याजबरोबर खाण्यासाठी शिजविलेले मांस सापडले. ते जप्त करून तिला शासन करण्यात आले. (पेशवे दप्तर 43, ले. 144)

ैजे पेठ पारगाव, तालुका खेड सरकार जुन्नर येथील बाळाजी धोंडदेव कुळकर्णी हा ब्राह्मण कलावंतिणीसमागमे गमन, मांसभक्षण व सुरापान करण्यात अट्टल निघाला. त्यास पंक्तीबाह्य केले व पुण्यातील ब्रह्मवृंदांनी एकत्र येऊन पृथ्वीप्रदक्षिणा व तीर्थस्नाने असे प्रायश्‍चित्त सांगितले. (पे.द. भा. 40, ले. 144)

पेशव्यांच्या कारकीर्दीत ब्राह्मणांनी दारू पिऊ नये असा शासनाचा दंडक होता. दारू पिणाऱ्या ब्राह्मणांना कैद करून किल्ल्यावर पाठवीत असत. नाशिक येथील ब्राह्मणवृंद मद्यपान करतात, त्यात त्यांचा धर्माधिकारीही सामील आहे, हे वृत्त सवाई माधवराव पेशव्यांच्या कानी येताच त्यांनी सर्वोत्तम शंकर नावाच्या खास अधिकाऱ्यास नाशिकला याची चौकशी करण्यास पाठविले आणि आज्ञा दिली, की धर्माधिकारी यात सापडले त्यांचे धर्माधिकारीपण (वतन) जप्त करावे व सरसुभ्याचे हिशेबी जमा करावे. तसेच गुन्हेगार ब्राह्मणास अटक करून त्यांना पक्‍क्‍या बंदोबस्ताने घोडप, पटा व मुल्हेर या किल्ल्यांवर अटकेत ठेवण्यास पाठविणे. (सवाई माधवराव रोजनिशी, भा. 3(8), पृ. 120)

(हा स‌र्व मजकूर महाष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, (म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988) या पुस्तकातून घेतला आहे.)

तुकारामांनी शिवरायांना रामदासांकडे पाठविले हे खरे आहे काय?

समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या संबंधांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा तेव्हा समर्थभक्तांकडून तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा दाखला दिला जातो. तसे शिव-स‌मर्थांची शके 1571 (स‌न 1650) पूर्वी भेट झाल्याचे अनेक पुरावे दिले जातात. पण त्यातही तुकारामांचा हा 15 ओव्यांचा अभंग महत्त्वाचा. कारण जेव्हा संतशिरोमणी तुकाराम महाराज शिवबांना समर्थांकडे 'मन लावा वेगी' असे सांगतात, तेव्हा त्यातून समर्थांच्या थोरवीवर आपसूकच शिक्कामोर्तब होत असते. शिवाय तुकाराम महाराजांचे निधन जानेवारी 1650 मध्ये झाले, याचा अर्थ त्यांनी रामदासांना शिवाजी महाराजांकडे पाठविले ते तत्पूर्वी. म्हणजे रामदास आणि शिवराय यांची भेट 1650 ला वा त्याआधी झाली हे सिद्धच झाले. तेव्हा हा अभंग महत्त्वाचा.

या अभंगातील पहिल्या तीन ओव्या अशा आहेत -

"राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ।।1।।
रामदास स्वामी सोयरा स‌ज्जन । त्यासी तनमन अर्पीबापा ।।2।।
मारुती अवतार स्वामी प्रकटला । उपदेश केला तूज लागी ।।3।।"

या अभंगाविषयी बोलण्यापूर्वी तुकाराम महाराजांची जी अभंगवाणी आज उपलब्ध व प्रकाशित झालेली आहे, त्याविषयी माहिती घेणे योग्य ठरेल.

तुकारामांचा जन्म देहू या लहानशा खेड्यात इ. स. 1608 मध्ये झाला. त्यांची आई कनकाई आणि वडिल वाल्होबा ऊर्फ बोल्होबा. त्यांचे आंबिले ऊर्फ मोरे घराणे मोठे प्रतिष्ठित होते. त्यांच्याकडे गावाची मानाची महाजनकी होती. जानेवारी 1650 मध्ये तुकारामांचा मृत्यू झाला. ते कसे गेले हे एक गूढच आहे. ते स‌देह वैकुंठाला गेले एथपासून त्यांचा खून झाला येथपर्यंत बरेच प्रवाद आहेत. आपल्या या 42 वर्षांच्या आयुष्यात तुकारामांनी किमान साडेचार हजार कविता केल्या! या कविता वह्यांमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या. त्या एवढ्या जहाल, एवढ्या मर्माघाती की तेव्हाच्या सनातनी ब्राह्मणवृंदाला त्या नष्ट करण्यातच आपले सौख्य सामावले आहे, असे वाटू लागले. तुकारामांना जलदिव्य करावे लागले ते यातून. तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित व कोरड्या वर आल्या असे समजल्यावर भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांची पाने लुटून नेल्याचे तुकारामांचे चरित्रकार महिपती सांगतात. याचा अर्थ महाराजांनी जरी आपले अभंग स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले असले, तरी त्यांच्या हातची पूर्ण संहिता शिल्लक राहिलेली नाही. आज त्यांच्या हातचे स‌मजले जाणारे एकुलते एक हस्तलिखित देहू देवस्थानच्या संग्रहात आहे.

मग प्रश्न निर्माण होतो, की तुकारामांचा गाथा सिद्ध झाला तो कसा?

तुकारामांच्या वह्यांची पाने लोकांनी प्रसाद म्हणून नेली, असे असले, तरी तुकारामांचे लेखक संताजी तेली जगनाडे आणि संताजींचे चिरंजीव बाळोजी यांनी लिहून ठेवलेले दोन हजार अभंग होतेच. त्यातील संताजीच्या हातचे तेराशे अभंग पुढे वि. ल. भावे यांनी प्रकाशित केले. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे. पण ही संपूर्ण जगनाडे संहिता पाहिली, तरी त्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्याहूनही अधिक अभंग नाहीत.

महाराजांच्या वैकुंठगमनानंतर थोड्याच दिवसांनी कचेश्वर भट ब्रह्मे चाकणकर हे तुकारामांचे पुत्र नारायणबाबा यांना भेटले. कचेश्वर भट हे तुकोबांचा वेध लागलेले ब्राह्मण. तुकारामांचे अभंग लिहून घ्यायचे, ते पाठ करायचे आणि त्याआधारे कीर्तने करायची, असे ठरवून ते नारायणबाबांकडे खेडला गेले होते. काही अभंग लिहून द्या अशी विनंती त्यांनी नारायणबाबांना केली. त्यावर नारायणबाबांनी त्यांना सांगितले, की "अंबाजीचे घर । तेथे जावे । स‌र्वही संग्रह तुकोबाच्या वह्या । जावे लवलाह्या तुम्ही तेथे ।।" त्यानुसार कचेश्वर भट देहूला गेले. अंबाजी ऊर्फ आबाजी हे तुकारामांचे नातू, महादेवबाबांचे म्हणजे तुकारामांच्या थोरल्या मुलाचे चिरंजीव. त्यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून अभंग मिळविले. म्हणजे तुकारामांच्या वंशजांकडे अभंगांची संहिता होती. ती वंशपरंपरेने पुढे चालत आली.

पुढे इंग्रज अमदानीत इंदुप्रकाश प्रेसचे जनार्दन स‌खाराम गाडगीळ यांनी गाथा छापायचे ठरविले. तत्कालीन डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स‌र अलेक्झांडर ग्रँट यांच्या शिफारशीवरून स‌रकारने त्यांना 24 हजार रूपये मंजूर केले. या गाथ्याच्या संपादनाची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित आणि विष्णु परशुराम पंडित यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी संपादनासाठी देहू, तळेगाव व कडूस येथील प्रती वापरल्या. पंडितांनी तुकारामा महाराजांच्या तत्कालीन वंशजांकडून देहू हस्तलिखित नेले. ते महाराजांचे ज्येष्ठ पुत्र महादेवबाबा यांच्या हातचे असल्याचे संपादकांना सांगण्यात आले होते. पंडितांनी हे हस्तलिखित नेले पण नंतर ते देहूला परत आलेच नाही. ते गहाळ झाले.

हा इंदुप्रकाश अथवा पंडिती गाथा देहू हस्तलिखितावर आधारित असला, तरी तो काही देहू प्रतीवरून जसाच्या तसा छापलेला नाही. परंतु पंडितांनी त्यांना अस्वीकारार्य वाटलेले देहूप्रतीतील पाठ त्यात तळटीपा देऊन नोंदविले होते. पुढे या न स्वीकारलेल्या पाठांची त्यांची मूळ संहितेतील मूळ ठिकाणी पुनःस्थापना करून देहू प्रतीची पुनर्रचना करण्याचे काम देहू देवस्थानने केले व तो गाथा तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या त्रिशतकोत्तर सुवर्णसोहळा वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित केला.

तर अशा रितीने, संशोधन करून मूळ देहू प्रत - जी तुकारामांच्या घरात वंशपरंपरेने चालत आली - तिची पुनर्रचना करण्यात आली. या प्रतीमध्ये प्रचलित पंढरपूरकेंद्रित प्रतीपेक्षा जास्त अभंग आहेत, हे विशेष. या प्रतीची सिद्धता करताना पंडितांनी घेतलेले काही अभंग वगळण्याची वेळ एकदाच आली. आणि ती आली - "शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखालील अभंगांच्या बाबतीत!

आता येथून तुकाराम-रामदास-शिवाजी यांच्या संबंधीच्या अभंगाकडे आपण येतो.

"शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखाली पंडिती प्रतीत 14 अभंग येतात. त्यातील नऊ अभंग पंढरपूर प्रतीत व वारक-यांमध्ये प्रचलित असलेल्या अन्य प्रतींत आढळतात. पंडिती प्रतीतील बाकीचे पाच अभंग सरळसरळ उत्तरकालीन प्रक्षेप आहेत!

महाराष्ट्र शासनाच्या आवृत्तीत 1886 ते 1890 या क्रमांकाने आलेले हे ते पाच अभंग. ते प्रक्षेपीत आहेत हे कशावरून?

या प्रतीचे संपादक रा. रा. स‌दानंद मोरे आणि रा. रा. दिलीप धोंडे सांगतात, की त्यातील तुकाराम महाराजांचे स्वतःविषयीचे उल्लेख त्यांच्या स्वरूपाशी व विचारांशी विसंगत आहेत. दुसरी गोष्ट अशी, की ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा स‌द् भावनेने हे अभंग रचले तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्याने त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना शिवोत्तरकालीन राजाज्ञा, प्रतिनिधी अशा अधिका-यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, तर 1650 पर्यंत ज्याला शिवरायाचे नाव माहित असणे सूतराम शक्य नव्हते तो भूषण कवी शिवदरबारात आणून त्याने बसविला आहे. सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील नावे. पण या रामदासभक्तांनी ती दोन पदनामे मानली आहेत. भूषण कवीप्रमाणेच त्यांनी राज्यव्यवहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही 1650 पूर्वी पुणे परिसरात दाखल केले आहे.

आता प्रश्न असा येतो, की या रचना जर रामदासभक्तांच्या, तर त्या देहू वा तळेगाव प्रतीत आल्या कशा? रा. रा. मोरे व रा. रा. धोंडे याच्या दोन शक्यता सांगतात. एक म्हणजे देहू प्रतीची नक्कल त्र्यंबक कासार या तुकारामभक्ताने (तुकारामांच्या वैकुंठगमनानंतर शंभर वर्षांनी) केली. त्यांनी एखाद्या रामदासी बाडातून हे अभंग आपल्या तळेगाव प्रतीत स‌माविष्ट केले असतील. तेथून ते मूळ देहू प्रतीत नकलून घेण्यात आले असतील. देहू प्रतीत मुळाला सोडून वेगळ्या पाठांचा स‌मावेश (मूळ पाठ खोडून) झालेले दिसून येतात. हे उत्तरकालीन देहूकरांचे काम. दुसरी शक्यता म्हणजे अशाच एखाद्या उत्तरकालीन देहूकराने रामदासी प्रक्षेप देहू प्रतीत सामावून घेतले असतील. तेथून ते त्र्यंबक कासार यांच्या वहीत नकलले गेले.

हेच अभंग चिटणीसांच्या बखरीत शिवाजी-तुकाराम भेटीचा प्रसंग सांगताना येतात. यावरून या अभंगांची निर्मिती कशी झाली असावी, यावर प्रकाश पडू शकतो. मल्हार रामराव चिटणीस हे अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेलेले शिवशाहीचे बखरकार. त्यांचा समर्थ संप्रदायाशी निकटचा संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. त्यांनी शिव-समर्थांच्या भेटीचे वर्णन करताना हे अभंग लिहिले असतील अशीही एक शक्यता आहे. त्यांनी केले, ते अर्थातच प्रामाणिकपणे, स‌मर्थांचा महिमा वाढविण्यासाठी. पण साता-याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांच्या अडाणीपणामुळे अभंगात आली आणि त्यामुळे प्रक्षेप ओळखणे सोपे गेले.

तुकारामांनी शिवरायांनी पाठविलेले धन, मानसन्मान नाकारले हे खरे, पण ते करताना त्यांनी शिवरायांनी समर्थांकडे जाण्यास सांगितले, असे मात्र नाही, हे यावरून स्पष्ट होते.

संदर्भ -
- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा (श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराजांच्या वंशजांकडील प्राचीन हस्तलिखितावरून सिद्ध केलेली संहिता) - संपा. स‌दानंद मोरे आणि दिलीप धोंडे, प्रकाशक - विश्वस्त मंडळ, श्री विठोबा-रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, द्वितीय आवृत्ती जाने. 2001.

- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपा. भालचंद्र नेमाडे, साहित्य अकादेमी, पहिली आवृत्ती 2004.

बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी

जोधा-अकबर, सलीम-अनारकली या दोन्ही प्रेमकहाण्यांमध्ये एक साम्य आहे. या कहाण्यांमधील दोन्ही स्त्रीपात्रे खरोखरीच होऊन गेली की काय याबद्दल शंका आहे. जोधाबाई ही अकबराची पत्नी की सून असा वाद आहेच. पण गंमत म्हणजे अनारकली ही सलीमची प्रेयसी की "आई' असाही एक वाद आहे. अशी कथा सांगितली जाते, की अनारकली ही अकबराच्या जनानखान्यातली एक बॉंदी. तिचा दर्जा अकबराच्या पत्नीसमान. पण सलीमसाहेब तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे अकबर संतापला. पण या कथेला तसा काही अस्सल आधार नाही. ते काहीही असो. या प्रेमकहाण्यांनी येथील लोकमानसावर राज्य केले हे खरे.

मराठी मुलखात घडलेली अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा. ही कहाणी बाकी अस्सल आहे आणि अव्वलही!
खरेतर ही एक शोकांतिकाच म्हणायची. एक ब्राह्मण पेशवा, एक स्वरुपसुंदर मुस्लिम तरूणी, स्वरुपसुंदर म्हणजे किती, की इतकी गोरी, इतकी गोरी, की खाल्लेले पान ज्याच्या सुरईदार गळ्यातून उतरताना दिसायचे! (ही अर्थातच एक दंतकथा.) आणि ते पेशवाईतलं वातावरण! जणू या कहाणीच्या मुळातच शोकांतिकेची बिजं होती...

मस्तानी ही बाजीरावाला मिळाली ती भेट म्हणून! बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल बुंदेला. त्याला बाजीरावाने मोगलांच्या तडाख्यातून वाचविले. तेव्हा कृतज्ञतेने त्याने बाजीरावांना बिदागी दिल्या. त्यात ही मस्तानी नावाची नृत्यांगना होती. (मस्तानी छत्रसालास त्याच्या पर्शियन पत्नीपासून झालेली मुलगी असल्याचेही स‌ांगितले जाते.) बाजीरावाने मात्र तिला मानाने वागविले. त्यांनी तिला पत्नी मानून शनिवारवाड्यात आणले. तेथे तिच्यासाठी मस्तानी महाल बांधला. त्या महालात ती राहात असे. बाजीरावांचा तिच्यावर जेवढा जीव होता, तेवढेच तिचेही त्यांच्यावर प्रेम होते. ती त्यांची सर्वप्रकारे काळजी घेत असे. असे सांगतात, की बाजीराव स्वारीवर असताना ती घोड्यावर स्वार होऊन बाजीरावाबरोबर तेवढ्याच वेगाने दौडत चाले. मस्तानी नृत्यनुपुण होता. शनिवारवाड्यात गणेशचतुर्थीस तिचा नृत्यगायनाचा कार्यक्रम होत असे.

नानासाहेब पेशव्याचे लग्न सन 1730 त झाले. त्यावेळच्या खर्चाच्या हिशोबात तिच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. (पेशवे दप्तर 30, ले. 363)

इ. स. 1734 मध्ये बाजीरावापासून तिला पुत्ररत्न झाले. (मराठी रियासत, बाजीराव, पृ. 403) त्याचे नाव समशेरबहाद्दर असे ठेवण्यात आले. हा पुढे पेशव्यांच्या फौजेत खासा सरदार म्हणून वावरला. पेशव्यांच्या मुलाबरोबरच त्याचेही शिक्षण झाले. पेशव्यांच्या अनेक मोहिमात राहून त्याने मराठी राज्याची सेवा उत्कृष्ट बजावली. तो पानिपती कामास आला.

मस्तानी बाजीरावांबरोबर पत्नी म्हणून वावरू लागल्यामुळे पेशव्यांच्या घरात तिच्याविरुद्ध कलह सुरू झाला.. पेशव्यांची आई राधाबाई, भाऊ चिमाजी अप्पा आणि चिरंजीव नानासाहेब या तिघांचा मस्तानीने बाजीरावाबरोबर राहण्यास विरोध होता. बाजीरावाने तिचा नाद सोडून द्यावा म्हणून चिमाजी अप्पा व मातोश्रीने फार प्रयत्न केले. पण बाजीरावाने त्या गोष्टीस सरळ नकार दिला. डिसेंबर 1739 मध्ये तर आपल्याबरोबर ही मंडळी मस्तानीस स्वारीस पाठवित नाहीत याचा राग येऊन वैतागून बाजीराव नासिरजंगावरील स्वारीवर गेले. ते स्वारीवर असतानाच पेशव्यांच्या घरी पुण्यास मुलांच्या मुंजी झाल्या. डिसेंबर 1739 ते 1740 मार्च पर्यंत या स्वारीची कामगिरी त्यांनी व्यथित अंतःकरणाने सिद्धिस नेली.

बाजीराव स्वारीवर आहे याचा फायदा घेऊन या काळात मस्तानीला पुण्यात कैदेत ठेवण्यात आले. एवढेच नव्हे, तर बाजीरावापासून मस्तानीस दूर करण्याची परवानगी शाहू महाराजांकडून मिळविण्याचा प्रयत्नही पेशवे कुटुंबियांनी केला. परंतु शाहू महाराजांनीही त्यांना रास्त सल्ला दिला. मस्तानीस कैदेत ठेवून बाजीरावास दुखवू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""राऊ यास खट्टे न करावे. त्यांचे समाधान राखावे. तिला अटकाव करून सल्ला तोडू नये.''

....नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत बाजीराव खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यास गेले. तेथे ते ज्वराने आजारी पडले. त्यातच रावरेखेडी येथे 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी बाजीरावांची धर्मपत्नी काशीबाई व मुलगा जनार्दन ही नुकतीच पुण्याहून येऊन पोचली होती. मस्तानी मात्र पुण्यातच कैद होती.

बाजीरावांच्या मृत्यूची हकिकत तिला समजताच तिनेही मृत्यूला कवटाळले. तिचा मृत्यू विष प्राशन करून झाला की मुद्दाम प्राणघात करून घेतला हे समजण्यास मार्ग नाही. शनिवारवाड्यात मृत्यू झाल्यावर तिला तिच्या इनामाचे गाव पाबळ येथे नेऊन दफन करण्यात आले.

बस्स. एवढीच ही प्रेमकहाणी! एक मोठी प्रेमकहाणी!

संदर्भ -
महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 139 - 141)

स‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 3

स‌ंभाजीराजे. मराठी राज्याचे वारसदार. ते स्वराज्याच्या शत्रूस जाऊन मिळाले. गोष्ट मोठी दुर्दैवी आहे. स‌ंभाजी राजांच्या चरित्रावरील हा स‌र्वात मोठा, कोणत्याही युक्तिवादाने, कोणत्याही कारणाने पुसला न जाणारा कलंक आहे.

एरवी स‌रदार, वतनदार यांनी असे पक्षांतर करणे ही तर त्या काळची रीतच होती. माणसं निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून मोगलांकडे अशी जात-येत असत. खुद्द औरंगजेबाचा मुलगा मराठ्यांना स‌ामील झाला होता. पण संभाजीराजे हे काही स‌ामान्य जहागिरदार, वतनदार, स‌रदार नव्हते. ते कोणा भोसलेशाहीचे वारसदारही नव्हते. शिवाजीराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. ते रयतेसाठीचे राज्य होते. ते हिंदवी स्वराज्य होते. श्रींच्या इच्छेने झालेले ते राज्य होते. आणि म्हणूनच संभाजीराजांचे पक्षांतर ही स‌र्वांचेच काळीज खाणारी गोष्ट बनली होती. प्रा. वस‌ंतराव कानेटकरांनी तर स‌ंभाजीराजांच्या या कृत्यामुळे शिवरायांना एवढा धक्का बसला, की ते खचलेच, असे म्हटले आहे. "शिवछत्रपतींच्या दिग्विजयाने हिंदवी स्वराज्याचा वृक्ष महाराष्ट्राबाहेरही फोफावत असता, त्याच्या (संभाजीच्या) हातून शत्रूस मिळण्याचा अविचार घडून आला. त्याबद्दल इतिहास त्यास कधीच क्षमा करू शकत नाही," अशा शब्दांत डॉ. जयसिगराव पवार यांनी आपला क्षोभ व्यक्त केला आहे.

हे सर्व असले, तरी एक प्रश्न उरतोच, की छत्रपतींसारख्या युगपुरुषाचा हा पुत्र, छत्रपती आणि जिजाऊंच्या स‌ंस्कारात वाढलेला हा सुसंस्कृत युवराज, एकाएकी उठतो आणि शत्रूच्या गोटास जाऊन मिळतो, ते कोणत्या कारणाने?

औरंगजेबाच्या आदेशाने दिलेरखानाने स‌ंभाजीराजांस आपल्या बाजूस आणण्यासाठी जे पत्र लिहिले त्याला उत्तर म्हणून स‌ंभाजीराजांनी एक गुप्त पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, "माझ्या हिताची म्हणून तुम्ही जी गोष्ट स‌ांगितली ती तशी घडून येईल, याहून वेगळे नाही, असे माझ्या मनात आहे. आपल्या पत्रातून मला असे दिसून आले की, स‌र्वांची मने एकच असतात. परंतु ज्या प्रदेशाची जबाबदारी माझ्यावर स‌ोपवून दुसरा प्रदेश जिंकण्यासाठी अगदी बिनधास्तपणे माझे वडील निघून गेले आहेत ते इथे परत येईपर्यंत मी आपण स‌ुचविलेली मोहीम स्वीकारू शकत नाही. आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही. परंतु आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या वैभवाने मी त्यांना स‌ंतुष्ट करीन. स्वतःची खरी योग्यता स्वीकारण्यात परिश्रम कसले? आणि दिल्लीपती माझ्या बाजूस आल्यावर काय स‌ांगावे? (ही चांगलीच गोष्ट आहे.) माझ्या बाजूचे म्हणून आपण मला पाठविलेले पत्र आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. मैत्रीच्या बाबतीत आधार आहे. आपण आपल्या पत्रामध्ये 'आपला' असे संबोधून स्नेह जुळविला आहे. तो स्नेह प्रत्यक्षात स‌ाकार होईल अथवा नाही, याबद्दल मुळीच संशय नको." (परमानंदकाव्यम्, संपादक - गो. स. स‌रदेसाई, बडोदा, 1952, पृ. 78, श्लोक 22-31)

या पत्रातील 'मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही' हे उद्गार काय सांगतात? मनात चलबिचल असताना, स‌ंभाजीराजांच्या मनात वडिलांबद्दल अशा भावना होत्या. आणि तरीही ते मोगलांना जाऊन मिळाले, म्हणजे त्यासाठी तसेच काही कारण असले पाहिजे, तशीच काही परिस्थिती निर्माण झाली असली पाहिजे किंवा निर्माण केली गेली असली पाहिजे.
काय होते ते कारण? काय होती ती परिस्थिती?

6 जून 1676 रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर गृहकलह निर्माण झाला. राजाभिषेक प्रसंगीच आपणास पट्टराणीचा मान मिळाला तरी आपल्या पुत्रास युवराजपदाचा मान न मिळता तो स‌ंभाजीराजांकडे गेला, याचा अर्थ राज्याचा वारसा आपल्या मुलाला मिळणार नाही, याचे दुःख स‌ोयराबाईस झाले असले पाहिजे असा तर्क 'शिवपुत्र स‌ंभाजी'कार डॉ. कमल गोखले करतात. जिजाऊसाहेबांच्या मृत्युनंतर स‌ोयराबाईंच्या मनातील या विचारास प्रकटीकरणाचे धैर्य झाले असणार.

या काळात एकीकडे स‌ोयराबाई अस्वस्थ झाल्या होत्या आणि दुसरीकडे अष्टप्रधानमंडळातील काही प्रधानही संभाजीराजांवर नाराज होते. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स‌ंभाजीराजे राज्यकारभारात लक्ष घालू लागल्यानंतर त्यांच्या आणि प्रधानांच्या वितुष्टास प्रारंभ झाला असावा. यातून रायगडावर अशी परिस्थिती निर्माण झाली, गृहकलह इतका टोकाला गेला, की अखेर राज्याच्या वाटण्या करण्याइतपत पाळी आली. कवि परमानंदाचा पुत्र देवदत्त याने रचलेल्या 'अनुपुराणा'वरून मुळातच शिवाजी महाराजांना राज्याचे विभाजन मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी राजारामासाठी वेगळेच राज्य निर्माण करण्याचा पर्याय शोधून काढला, असे दिसते. पण स‌ोयराबाई आपल्या पुत्रासाठी महाराष्ट्र देशीचे राज्य मागत होती आणि महाराज कर्नाटक देशीचे भावी राज्य त्यास देतो असे म्हणत होते. "1975-76 या कालखंडात राज्यविभाजनाचा प्रस्ताव रायगडावर चर्चिला गेला आणि शिवाजी महाराजांनी थोड्या नाराजीने का होईना पण त्यास आपली संमती दिली. असे वाटते की पितापुत्रांच्या बेबनावाला इथूनच स‌ुरुवात झाली. संभाजीराजास राज्याचे विभाजनच मंजूर नव्हते. कारण महाराज कर्नाचकात जे जिंकणार होते, तोही मराठी राज्याचाच एक भाग बनणार होता." या स‌र्व राजकारणात मोरोपंत, आण्णाजी दत्तो, राहुजी स‌ोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी यांची भूमिका युवराज स‌ंभाजीराजांना विरोध करण्याची व राणी स‌ोयराबाईंचा पक्ष उचलून धरण्याची होती.

याच काळात शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची तयारी स‌ुरू केली होती. 6 ऑक्टोबर 1676 रोजी दस-याच्या मुहुर्तावर महाराजांनी कर्नाटक स्वारीसाठी प्रयाण केले. मात्र आपण रायगडावर नसताना, तेथे स‌ोयराबाई आणि त्यांच्या गटाच्या कोंडाळ्यात स‌ंभाजीराजांना ठेवणे योग्य ठरणार नाही, हे शिवरायांनी जाणले होते. तेव्हा त्यांनी स‌ंभाजीरांना कोकणातील शृंगारपूर येथे धाडले. शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी स‌ंभाजीराजांकडे स‌ोपविली. याच ठिकाणी स‌ंभाजीराजे शाक्त पंथीयांच्या प्रभावाखाली आले. तेथेच कवि कलशाने पुढाकार घेऊन राजांचा कलशाभिषेक केला.

एप्रिल-मे 1678च्या स‌ुमारास शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवरून परतले. पण इतिहासकारांच्या मते त्यानंतर शिवाजीराजे आणि स‌ंभाजीची भेटच झाली नाही. रायगडावर परतल्यानंतर शिवाजीराजांनी स‌ंभाजीराजांना शृंगारपूरहून स‌मर्थभेटीसाठी स‌ज्जनगडास जाण्याचा हुकूम दिला. गडावरील धार्मिक वातावरणात स‌ंभाजीराजांचा राग शांत होईल, असे छत्रपतींना वाटले असावे. 'अनुपुराणा'नुसार शिवाजी महाराजांनी स्वहस्ते पत्र लिहून स‌ंभाजीराजांना कळविले, की "तू प्रजेला अभय देतोस, पण प्रजा कर बुडवीत आहे. तू अमात्यांचा उघड अपमान करीत आहेस‌. तरी शृंगारपुराहून उठून तू स‌ज्जनगडास जा." स‌ंभाजीराजे स‌ज्जनगडावर गेले, पण तेथे रामदासस्वामी नव्हते. तेथेच दिलेरखानास जाऊन मिळण्याचा स‌ंभाजीराजांचा विचार पक्का झाल्याचे दिसते. स‌ंगम माहुलीस तीर्थस्नानास जातो म्हणून त्यांनी स‌ज्जनगडच्या किल्लेदाराचा निरोप घेतला आणि माहुलीवरून ते थेट दिलेरखानाच्या छावणीत जाऊन पोचले.

स‌ंभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे एका ब्राह्मणास दिलेले दानपत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपल्या या कृत्याचे स‌मर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट स‌ल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या स‌ल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. राजाने राणीच्या बाजूने पक्षपात केला. त्यामुळे तो आपल्या विरुद्ध झाला. असे असूनही त्याने आपल्या वडिलांच्या स‌ेवेत आणि निष्ठेत काही म्हणता काही कसूर केली नाही. आपल्या कर्तव्यपालनात तो स्वतः (संभाजी) दशरथी रामाप्रमाणे होता. त्याने दीड कोटी रूपयांची दौलत, किल्ले, राजाचा दर्जा, मान आणि सन्मानही गवताप्रमाणे तुच्छ मानून त्यांचा त्याग केला." (छत्रपती शिवाजी - स‌ेतुमाधवराव पगडी, पृ. 142)एकंदर राणी स‌ोयराबाई आणि प्रधानांनी केलेल्या कुटील कारवायांमुळे स‌ंभाजीराजांना मोगलांना जाऊन मिळण्याचे कृत्य करावे लागले, असा या मजकुराचा मथितार्थ आहे.

या कारवाया कोणत्या होत्या?
संभाजीराजांना राज्य मिळू नये यासाठी या लोकांनी कोणते मार्ग अवलंबले? या प्रश्नाच्या उत्तरातच स‌ंभाजी राजांची बदनामी कोणी केली या स‌वालाचे उत्तरही दडलेले आहे!

डॉ. जयसिंगराव पवार स‌ांगतात -
"...कुटिल राजकारणी व मत्सरग्रस्त प्रधान एकत्र आल्यानंतर या दोहोंच्या स‌मान प्रतिस्पर्ध्यास - स‌ंभाजीराजांस - हतबल करण्यासाठी अनेक डावपेच लढविणे आवश्यक ठरले. स‌ंभाजीराजांचे चारित्र्यहनन हा अशाच एका डावपेचाचा भाग असावा. राजकारणातील स‌त्तास्पर्धेत प्रतिपक्षाचे चारित्र्यहनन करून त्यास बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आपणास अगदी अलीकडच्या इतिहासातस‌ुद्धा स‌ापडू शकतील. स‌ंभाजीराजांच्या चारित्र्याविषयी ज्या अनेक दंतकथा अथवा अफवा त्यांच्या हयातीत निर्माण झाल्या त्यांचा शोध या कुटिल राजकारणाच्या पार्श्वभूमिवर घेतला तर मग खाफीखान, मनुची आदींच्या कानापर्यंत जाऊन पोहचलेल्या स‌ंभाजीराजांच्या 'इष्का'च्या कथा मुळातच कोणी निर्माण केल्या असतील याचा अंदाज बांधता येतो." आणि मग स‌ंभाजीराजांची बदनामी करणारी बखर लिहिणारा मल्हार रामराव याचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असतो, याचे मर्म उलगडते.

('स‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी?' या लेखाचे तिन्ही भाग पूर्णतः डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मराठेशाहीचा मागोवा' (मंजुश्री प्रकाशन, 1993) या पुस्तकातील 'युवराज स‌ंभाजीराजे - एक चिकित्सा' या प्रकरणाच्या आधारे लिहिले आहेत.)

संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 2

संभाजी महाराजांबद्दल बखरी जे म्हणतात ते खरे मानले, तर मराठ्यांचा हा युवराज बलात्कारी होता. आपला पिता शिक्षा करील या भयाने दिलेरखानाकडे जाऊन त्याने स्वराज्याशी द्रोह केला होता. एवढेच नव्हे, तर इंग्रज पत्रावर भरोसा ठेवायचा, तर त्याने साक्षात् शिवछत्रपतींना विष दिले होते! पण यात ऎतिहासिक स‌त्याचा कणही नाही.

महाराजांवर तेव्हा (1675च्या अखेरीस) विषप्रयोग झालेलाच नव्हता. यावेळी त्यांचा मृत्यूही झालेला नव्हता! ते साता-यावर दीर्घ काळ आजारी होते इतकेच. त्यातही गंमत अशी की, खुद्द इंग्रजांनीच काही दिवसांनंतरच्या बातमीपत्रात (7 एप्रिल 1676) विषप्रयोगाचा कर्ता संभाजी नसून एक न्हावी असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्या पहिल्या बातमीपत्राचा स‌गळाच डोलारा कोसळला की! आणि शिवाजी महाराज संभाजी दिलेरखानाला मिळण्यापूर्वी त्याला हर बहाण्याने पकडून ठार मारण्याच्या प्रयत्नात होते, या कहाणीची तर विचारही करण्याचे काही कारण नाही.

मल्हार रामरावाची बखर, जी सांगते की संभाजीने राजवाड्यात एका महिलेवर बलात्कार केला, तिच्याकडे तर विशेष काळजीने पाहावे लागते. मुळात ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली गेली आहे. त्यामुळे तिच्यात सांगोवांगी कहाण्या पुष्कळच असणार हे उघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही बखर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. त्याची कारणे मल्हार रामरावाच्या इतिहासात आहेत. बाळाजी आवजी चिटणीस हा मल्हार रामरावाचा खापर पणजोबा होता. त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. ही बखर लिहिताना मल्हार रामरावाच्या मनात संभाजीबद्दलचा हा राग नसेलच असे कसे म्हणता येईल? डॉ. जयसिगराव पवार सांगतात, बाळाजी आवजी, खंडो बल्लाळ या आपल्या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत. तथापि संभाजी महाराज गादीवर येऊ नयेत म्हणून झालेल्या कटांत, किंवा त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या आणि अकबराशी संगनमत केल्याच्या कारस्थानांत बाळाजी आवजीचा काही भाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही.

अतिशय विकृत पद्धतीने या मल्हर रामरावाने संभाजी महाराजांची बदनामी केली. त्याने सांगितलेल्या कहाणीवर विसंबून पुढे अनेकांनी संभाजी राजांना काळ्याकुट्ट रंगात रंगविले. पण या बलात्काराच्या कथेत काहीच दम नाही! मल्हार रामरावाने सांगितलेली ही गोष्ट म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. डॉ. पवार सांगतात, "ज्या रायगडावर ही घटना घडली असे सांगण्यात येते, त्या गडावर संभाजीराजे यावेळी नव्हतेच. मल्हार रामराव सांगतो, की ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवून त्याची शिक्षा टाळण्यासाठी संभाजीराजे रायगडाहून दिलेरखानाच्या गोटात पळून गेले. प्रत्यक्षात ते स‌ज्जनगडाहून खानाच्या गोटात गेले आणि त्यापूर्वी त्यांचा मुक्काम द. कोकणात शृंगारपुरी पावणेदोन वर्षे होता."

वास्तविक ऑक्टोबर 1676 पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आलेच नव्हते. तरीही मल्हार रामराव, इंग्रजी बातमीपत्र आणि बुसातिन-उस-सुलातिन ही तिन्ही साधने त्यांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो!

या 'बलात्कार कथे'ची नायिका गोदावरी ही आहे. तिला तर कोणताही ऎतिहासिक आधार नाही. पण मग तिची स‌माधी रायगडाच्या पायथ्याशी दाखविली जाते, ते कसे?
याचे उत्तर आहे - आज रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची जी समाधी दाखविली जाते, ती आहे स‌वाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिची स‌माधी! (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 396-397)

संभाजीच्या आणखी दोन नायिका आपल्याकडील चित्रपट, नाटके आणि कादंब-यांनी रंगविल्या आहेत. त्यातील एक आहे तुळसा आणि दुसरी थोरातांची कमळा. या कमळाची स‌माधी पन्हाळ्याच्या परिसरात दाखविली जाते. पण तिचीही गत गोदावरीसारखीच आहे. ही स‌माधी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडातील यशवंतराव थोरात या शूर पुरुषाची आहे! बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी यशवंतराव धारातीर्थी पडला. त्याची बायको त्याच्याबरोबर स‌ती गेली. या दोघांची ही स‌माधी आहे. आता तेथे उभयतांच्या मूर्ती त्यांच्या वंशजांनी स्थापन केल्या आहेत. (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 306-309)
तुळसा हे पात्र तर तद्दन काल्पनिक. ते आत्माराम मोरेश्वर पाठारे या नाटककाराने 1891 साली आपल्या 'संगीत श्री छत्रपती संभाजी' या नाटकात निर्माण केले. या पात्राला लोककथेतही स्थान नाही.

संभाजी महाराजांच्या स्त्रीलंपटपणाच्या कथांची अशी वासलात लागल्यानंतर त्यांच्या चारित्र्यावर 'डाग' राहतो तो स्वराज्यद्रोहाचा.

शंभूराजे दिलेरखानाला का मिळाले, हा मोठा गहन प्रश्न आहे.

संदर्भ -
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993

संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? : भाग 1


हे वर्णन पाहा -
"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."
हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने.

यातून संभाजीराजांची कोणती प्रतिमा साकारते?

आता हे वर्णन पाहा -
"युवराजपदी असतानाच संभाजीराजांनी 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला होता... एका तत्कालीन कागदात एका खटल्यातील वादी आपली तक्रार प्रल्हाद निराजी व कवि कलश यांच्याकडे सोपविली गेल्याचे पाहून खुद्द संभाजीराजांकडे तक्रार करताना म्हणतात, साहेब स‌र्वज्ञ, शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होय ऎसा करिताती. ऎसे असोन माझे पारिपत्य होत नाही."
हे नमूद केले आहे वा. सी. बेंद्रे यांनी आपल्या 'छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकात. (पान 37, 38)

यातून संभाजीराजांचे कोणते चित्र उभे राहते?

आणि आता संभाजीबद्दल जनमानसात असलेले गैरस‌मज आठवून बघा.
लोक स‌मजतात -
मराठी साम्राज्याचा हा युवराज दुर्वर्तनी होता. दुराचारी होता. मद्यासक्त होता. स्त्रीलंपट होता. बलात्कारी होता. राज्यबुडवा राजा होता! काही तत्कालीन ऎतिहासिक साधनांतूनही संभाजीबद्दलचे असेच काळेकुट्ट चित्र रंगविलेले आढळते.

मल्हार रामरावाची बखर सांगते -
"... परंतु (संभाजीराजे) उग्र प्रकृती. शिवाजीमहाराजांचे मर्जीनुसार वागणे पडेना ऎसे होऊ लागले. काही दिवस राजगडी राहून रायगडी गेले... त्यांचा व्रतबंध करून युवराजाभिषेक करावासे मनात आणून व्रतबंध केला. परंतु संभाजी महाराजांची मर्जी एक प्रकारची! कोण्हे एके दिवशी हळदकुंकू स‌मारंभ शीतलागौरी यास स‌र्व सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात येणार त्यात कोण्ही रुपवान स्त्री आली. तिजला महालात नेऊन बलात्कार - अविचार जाला. हे वृत्त महाराजांसही स‌मजले. ते स‌मयी बहूत तिरस्कार येऊन बोलले जे राज्याचे अधिकारी हे, अगम्यागमन श्रेष्ठ वर्णीचे ठायी जाले; स‌र्व प्रजा हे राजाचे कुटुंब आप्तसमान, हे पुत्र जाले तरी काय करावयाचे? यांचा त्याग करीन, शिक्षा करीन. ऎसे आग्रह करून बोलले. ही बातमी संभाजी महाराज यांस स‌मजली. त्याजवरून दोन घोडियांवरि आपण व स्त्री ऎसे बसोन, पांच पंचवीस माणसे मावले आपले खासगीची घेऊन रात्रीसच निघोन पाचवडास असता तेथून गेले. ते वेळे दिलेलखान औरंगाबादेस होते त्यांजपाशी गेले... बहूत स‌त्कार करून ठेविले... "

म्हणजे संभाजीराजांनी एका महिलेवर राजवाड्यात बलात्कार केला आणि मग शिवाजीराजे शिक्षा करणार या भयाने ते दिलेरखानाकडे पळून गेले, असे मल्हार रामरावाचे म्हणणे आहे. याला महमद झुबेरी याने आपल्या बुसातिन-उस-सलातीन (विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास) या ग्रंथात दुजोरा दिला आहे. या ग्रंथातील कथा अशी -
"संभाजी याणी दिलेरखानापासी जाऊन पोहचण्याची कैफियत अस‌ी आहे की, सिवाजी कित्येक कामाबद्दल संभाजीसी त्रासून कंटाळला होता. या दिवसांत शहरनवीस म्हणदे हुकमाचे शेरे लिहिणारा कामदार होता. त्याचे कन्येवर संभाजी फार आषक, म्हणजे लुब्ध, जाहला होता. येणेकरून संभाजीविसी सिवाचे मनात फारच वाकडेपणा येऊन सिवाजी अत्यंत त्रासला होता. अशा प्रकारे की, संभाजीचा केवळ शत्रूच जाहाला आणि सिवाजीने मनात आणिले की, संभाजीस हरएक बाहान्याने पकडून ठार जिवे मारावा किंवा कैद करावा. संभाजी याणी हा सिवाजीचा इरादा ओळखून संशयांकित जाहाला. आपण दिलेरखानाकडे निघोन जावे असा निश्चय केला. आपण जातीने जाऊन पोहचण्यापूर्वी आधी एक पत्र आम्ही आपलेकडे येतो अशा मजकुराचे लिहून दिलेरखानाकडे पाठविले. त्यानंतर जातीनेही त्या पत्राचे लागोपाठच दिलेरखानाकडे निघाला."

एका इंग्रजी बातमीपत्राने तर याहून कहर केला आहे. त्या पत्रात असे म्हटले आहे, की संभाजीने आपल्या बापास विष देऊन ठार मारले, अशा बातम्या आहेत. ते पत्र असे -
"For these many days here is a continued report of Sevagee being dead and buried, naming the place of his death, distemper, manner and place of burial. It is reported he was poisoned by his son; his son being informed his father had commanded the watch of Rairee Castle to throw him down over the wall, if he left not going out at nights after the watch was set to meet a daughter of one of his chiefest Brahminees, whose daughter he had debauched; that he was sick, we certainly know, and that his distemper proceeded from the violent pain he had in his head, which was almost rotten..." (English Records on Sivaji - Ed. Shiva Charitra Karyalaya, Pune, Vol II, P. 78)

मराठ्यांचे इतिहासाचे थोर भाष्यकार कै. त्र्यं. शं. शेजवलकर या पत्राबद्दल म्हणतात, "इंग्रजांच्या पत्रातील ही नोंद इतकी सहजरित्या स्पष्ट स्वरूपात आली आहे की तीबद्दल शंका घेणे कठीण आहे..." (श्री शिवछत्रपती - संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने - त्र्यं. शं. शेजवलकर, 1964, पृ. 142-143)

या तिन्ही साधनांमध्ये ज्या स्त्रीचा उल्लेख येतो, तिचे लोककथेतील नाव होते गोदावरी. ती अण्णाजी दत्तो यांची मुलगी होती, असे मानले जाते. लोककथेनुसार "गोदावरी नामक एका ब्राह्मणाच्या विधवा मुलीवर मोहित होऊन संभाजीने तिला पळवून नेऊन लिंगाणा किल्ल्यावर लपवून ठेवले. महाराजांना हे कळताच त्यांनी तिची सुटका केली. या गुन्ह्याबद्दल महाराजांनी संभाजीला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फर्मावली. अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी करून आजचा हा युवराज आमचा उद्याचा राजा आहे, असे सांगून शिक्षा रद्द करून घेतली. पण ती माहेरी अगर सासरी जाईना. तिच्यावर भ्रष्ट होण्याचा प्रसंग आल्यामुळे ती स‌ती गेली. संभाजीनेच तिची चिता पेटवली पाहिजे, अशी स‌ती जाताना तिने अट घातली होती. त्याप्रमाणे संभाजीने तिची चिता पेटवली..." ती जिथे स‌ती गेली त्याच ठिकाणी महाराजांनी तिची स‌माधी बांधली. ती अद्यापही तेथे, रायगडाच्या पायथ्याशी आहे, असे सांगण्यात येते.


हे वाचून कोणालाही वाटावे, की हा संभाजी तर सामान्य गुंड होता! पण मग त्याचवेळी तो धर्मवीरही आहे!
आता याची संगती कशी लावायची? की स‌त्य याच्या मध्ये कुठे तरी आहे?
असे तर नाही ना, की कोणीतरी जाणूनबुजून संभाजीची बदनामी केलेली आहे, त्याच्याबद्दलच्या अफवा पस‌रविल्या आहेत?

इतिहासाची पाने चाळली, तर दिसते ते हेच, की मराठ्यांचा हा शंभूराजा कधीच दुराचारी, स्त्रीलंपट असा नव्हता.

संदर्भ -
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993

महाराष्ट्रातले खलपुरूष 2 - राघोबादादा

राघोबादादा पेशवे यांनी मराठ्यांचा ध्वज अटकेपार नेला. याबद्दल त्यांचा गौरव जरूर केला पाहिजे. पण त्याचबरोबर हा मनुष्य महाराष्ट्राच्या इतिहासातील एका गाजलेल्या राजकीय हत्याकटाचा सूत्रधार होता, हेही विसरता येणार नाही.


पेशवाईची वस्त्रे मिळावीत यासाठी या माणसाने हयातभर कटकारस्थाने केली. नारायणराव पेशवे गादीवर आल्यानंतर राघोबादादांनी त्यांच्याविरुद्ध कारस्थाने सुरू केली. पेशव्यास दादांच्या गुप्त कारस्थानांची वार्ता कळताच ते नाशकाहून लगबगीने परत आले. राघोबा हैदरखानचा वकील आप्पाजीराम याच्यामार्फत हैदरखानाशी संधान साधून होते. तेव्हा आप्पाजीरामला बेड्या घालून पुरंदरावर ठेविले आणि राघोबादादास 11 एप्रिल 1773 रोजी वाड्यातच बंदीत ठेविले. (पृ. 347)

"दादास कैद दुःसह होऊन त्यांच्या मनाने घेतले, की आपणच नारायणरावास अटकेत ठेवून कारभार करावा.' (हरिवंशाची बखर, पृ. 1) दुसरीकडे पेशव्यांनी दादांच्या सर्व हालचाली बंद पाडून त्यांच्यावरील पहारा कडक केला. तेव्हा दादा पेशव्यांविरूद्ध कटाची उभारणी करू लागले. त्यात भवानराव प्रतिनिधी, सखाराम हरि व सखाराम बापू, चिंतो विठ्ठल आदी सरदार त्यांना सामील झाले. दादांचा हुजऱ्या तुळ्या पवार याने कटाची उभारणी केली.(तुळ्या पवारास नारायणराव पेशव्यांनी चाबकाने बडविले होते. म्हणून तो बदला घेण्याच्या विकाराने पछाडला होता.)

दादांच्या कैदेची देखरेख सुमेरसिंगाकडे पेशव्यांनी दिली होती. तुळ्या पवारने त्याला फितवले आणि दादांच्या पक्षास आणले. "सुमेरसिंग, महमद इसफ, बहादुरखान व खरकसिंग या गारदी सरदारांस पैशाची लालूच दाखवून तीन लक्षाचा करार लिहून कारभाऱ्यांनी (बापू व मोरोबा) दिला, की नारायणरावास धरावे. दादांनी ही चिठ्ठी स्वदस्तुरीने पुरी केली. ती चिठ्ठी आनंदीबाईनी पाहिली. त्यात "धरावे' होते त्या ठिकाणी "मारावे' असे केले,'' असा बखरीतला उल्लेख आहे. अशा रीतीने कटाची उभारणी झाली. त्यात मुधोजीचे वकीलही सामील झाले. अशा कटास ऑगस्ट महिना साधारणतः योग्य, कारण यावेळी पाऊस पडून शेतीच्या हंगामात सर्व सैनिक आपल्या वाडीवर जाऊन गुंतलेले असतात. त्यावेळी तीन ते चार हजार सैन्य पुण्यास होते. नारायणरावांच्या मनात आपला खून होईल याबद्दल कधी शंकासुद्धा आली नाही.

मात्र रघुजी आंग्रे यांच्याकडून पेशव्यास धोक्‍याची सूचना मिळाली होती. गारदी दंगा करणार असे पेशव्यांना समजताच त्यांनी हरिपंत फडके यास गारद्यांचा बंदोबस्त करण्यास फर्माविले. गारद्यांचे दंगे हे नेहमीचेच असतात. तेव्हा त्याचा बंदोबस्त आपण संध्याकाळी करू असा विचार करून हरिपंत गावातील भोजन समारंभास गेले.

त्याच दिवशी (30 ऑगस्ट 1773) दुपारच्या प्रहरी पेशवे वामकुक्षी करीत असता दोन हजार गारदी दिल्ली दरवाजाने आत आले. त्यापैकी शे-दोनशे लोक थोरले बाजीरावसाहेब यांचे दिवाणखान्यातून श्री गणपती महालाच्या दरवाजाजवलून मेघडंबरी बंगल्याचे दरवाजातून त पेशवे यांच्या दिवाणखान्यापुढे गाई बांधतात तेथे आले. देवघरच्या रंगमहालाचा दरवाजा बंद करून तेथे नारायणरावास कैद करावे अशा बेतात होते. इतक्‍यात रावसाहेब हुशार होऊन धावत सातखणीतून पार्वतीबाई याजकडे गेले. तेव्हा इच्छारामपंत ढेरे श्रीमंताच्या व गारद्यांच्या मध्ये आले. त्यांची झटापट गारद्यांशी होऊन गारद्यांनी त्यास तोडले. तेव्हा गारद्यांस पाहून देवघरात बसलेला नारोबा फाटक गवई भयभीत होऊन पळू लागला. हे पाहून हेच रावसाहेब असे समजून त्यास पाठीमागून वार करून ठार मारले. पहातात तो रावसाहेब नव्हते. मग गारदी प्रमुख खरकसिंग व सुमेरसिंग व तुळ्या पवार पेशव्यांच्या पिच्छास गेले. पेशवे पार्वतीबाईकडे गेले. तेव्हा बाईंनी सांगितले, की तुम्ही दादासाहेबांकडे संरक्षणास जावे, त्यावरून दादासाहेब दिवाणखान्यात निजले होते तेथे आले आणि समोर येऊन सांगितले, की मला मारावयास तिघे जण पाठीमागे आले आहेत. त्यावरून दादासाहेब यांनी सांगितले, की ""तू इथेच राहा. मी बाहेर जाऊन बंदोबस्त करतो असे सांगून उठावयास लागले.'' तोच रावसाहेब यांनी कमरेस मिठी घातली आणि म्हणू लागले की मला सोडून जाऊ नये. इतक्‍यात तुळाजी पवार वगैरे तीन असामी आत आले आणि नारायणराव याचे पाठीमागे होऊन पाय ओढू लागले. तुळाजी पवार वार करावयास आला. त्यास दादासाहेब यांनी उजवा हात पुढे केला तो तरवारेचा वार त्यांच्या हातास लागला. दुसरा वार खरकसिंग याने केला तो दादासाहेब यांचे पागोट्याचा पेच तुटून पुतळी कानापाठीमागे लागली. रक्तस्त्राव जाहला. तुळाजी पवार याने दुसरा वार केला तो नारायणराव यांचे कमरेवर लागला आणि दादासाहेबास म्हणू लागला की नारायणराव यास सोडावे नाहीपेक्षा दोघासही ठार मारितो. हे ऐकून गोविंद गणेश बारगीर याने येऊन दादासाहेबांचे कमरेची मिठी सोडविली तेव्हा सुमेरसिंग याने वार केला तो नारायणराव यांचे कुशीस लागून ठार जाहले. वाड्यात सर्वत्र एकच हाहाःकार जाहला. दादासाहेबास फडावरच्या खणात आणून बसविले. इतक्‍यात वाड्यात गडबड झाली ही बातमी शहरात पसरली. बातम्यावर बातम्या येऊ लागल्या. पहिली बातमी आली की नारायणराव ठार जाहले.
(ही हकीकत महादजी राम कर्दीकर या नावाच्या दादासाहेबांच्या आश्रिताने लिहून ठेविली. ती महाराष्ट्र अर्काईव्हज बुलेटिन, क्र. 4 मध्ये प्रसिद्ध झाली, त्यातून घेतली आहे.)

या दुष्कृत्यात एकंदर ब्राह्मण आसामी सात, एक हुजऱ्या, एक नाईक, दोन कुणबिणी व एक गाय इतकी ठार झाली. गारद्यांनी नंतर राघोबादादा पेशवे झाल्याची ग्वाही फिरविली. बाहेर मुत्सद्दयांनी शहर कोतवालाकडून शहरची नाकेबंदी करविली. सर्व मुत्सद्दी कोतवाल चावडीत जमले. भवानराव प्रतिनिधी आपल्या लोकास बाहेर ठेवून एकटेच आत गेले. त्यांनी दादांची भेट घेतली. त्यावेळी दादाजवळ तुळाजी पवार, खरकसिंग व सुमेरसिंग होते. त्यांनी अभय मागितले व आपले देणे पुरे करावयास लाविले. दादासाहेबास एकांती घेऊन भवानरावाने दादांच्या संमतीने आपले लोक आत घुसविले आणि ठिकठिकाणी चौकी पहारे बसविले. त्रिंबकराव मामास बोलावणे पाठविल्यावर ते आत येऊन त्यांनी दादांचा निषेध केला.

दादासाहेबांनी उत्तर केले की, होणारास उपाय नाही. तुम्ही आत जाऊन पुढील उपाय काय तो करणे. त्याप्रमाणे उत्तरकार्याची तजवीज पार्वतीबाईचे विचारे केली. श्रीमंतांचे प्रेत ओंकारेश्‍वरापासी नेण्यासाठी दिल्ली दरवाजाने बाहेर काढिले. ओंकारेश्‍वरावर सर्व मुत्सद्दी मंडळी जाऊन प्रायश्‍चित्त संस्कार करून मंत्राग्नि त्रिंबकराव मामा याजकडून दिला. दहन करून चौदा घटिका रात्री आपापले घरी सर्वत्र गेले. (पेशवे बखर, पृ. 71, मराठी दप्तर रूमाल 2, पृ. 101)

भवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे आणि राजाबा पुरंदरे यांनी राघोबादादांची त्याच रात्री वाड्यात भेट घेतली. तेव्हा त्यास आढळून आले, की दादा स्वतः गारद्यांचे कैदी बनलेले. कारण गारद्यांनी पुरंदर नगर आणि साष्टी येथील तीन किल्ले आणि बक्षिसादाखल पाच लाख रुपये दादासाहेबांकडे मागितले. जर ती रक्कम आपणास मिळाली नाही, तर आम्ही अलिबहादूर यास पेशवा करू अशी धमकी त्यांनी दादास दिली. शेवटी भवानराव प्रतिनिधींच्या मध्यस्तीने गारद्यांचा गुंता उरकला. तीन किल्ल्यांऐवजी पाच लाख रुपयांबरोबर आणखी तीन लाख घेण्याचे कबूल केले.

नारायणरावांबरोबर त्यांची बायको गंगाबाई सती जाण्यासाठी आकांडतांडव करीत होती. पण सतीचा शाप बाधेल या भीतीने दादांची बायको आनंदीबाई यांनी तीस खोलीत कोंडून ठेविली. (खरे, भा. 4, ले. 1257, 1262) शिवाय तिला दिवस गेले होते.

हा बनाव सहा महिने अगोदर शिजत होता. सखारामबापू व दादास साखळदंड घालून कैद करणार असे दोघांनाही समजल्यावरून हा कट सिद्धीस नेण्याची घाई त्यांनी केली. बहुतेक कारभारी नारायणरावास धरावे या कटात होते. ग्रॅंट डफसुद्धा ह्या "ध चा मा'त आनंदीबाईचा हात होता हे कबूल करतो. सखारामबापूचे "नारायणरावास धरावे' या कटात अंग होते. पण त्यांचा वध झाल्यावर मात्र बापू पश्‍चात्तापदग्ध होऊन कित्येक दिवस पर्वतीच्या रानात फिरत होते.

रामशास्त्री प्रभुणे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी खुनाच्या चौकशीचे काम हाती घेतले. त्यात असे दिसून आले, की नारायणरावाचा खून करण्याचा मूळ कट नसून त्यास धरावे असे होते. हा कट राघोबाचे पाठीराखे आणि हितचिंतक यांनी खुनाच्या अगोदर पुरे सहा महिने शिजवला. त्यात मुख्य सूत्रधार राघोबादादा असून आणखी 49 लोकांनी भाग घेतल होता. त्यापैकी 13 गारदी (8 हिंदू व 5 मुसलमान), 26 ब्राह्मण, 3 प्रभू व 7 मराठे गुन्हेगार होते.

सरदारांपैकी नाना फडणीस यास सखारमाबापू व चुलतभाऊ मोरोबा याचा संशय होता, शिवाय आनंदीबाईचाही वहीम होता. नाना फडणीसांनी सत्ताग्रहण केल्यावर पहिल्या दोघांस अन्य कारणास्तव कैदेत ठेविले. आनंदीबाईस नानांनी जिवंत असेपर्यंत कैदेतच जीवन काढण्यास भाग पाडले.

(महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - ड. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 350 ते 354)

(टीप - गारदी हे शनिवारवाड्याचे रखवालदार होते. त्यांच्यात भरणा उत्तर हिंदुस्तानातील पठाण, अबिसिरियन अरब, राजपूत पुरभय्या यांचा होता.)

महाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल

रा. रा. विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने महाराष्ट्रात इतिहास घडविला होता. हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्रह्मवृंदाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती. आज ते स‌र्व विरून गेले आहे.

मुळात तेंडुलकरांच्या नाटकाचा विषय घाशीराम कोतवाल नावाची व्यक्ती हा नव्हताच. राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी घाशीराम सारखी माणसे (वा संघटना) निर्माण करतात. त्यांच्याकडून आपली स‌र्व प्रकारची अनैतिक कामे करून घेतात आणि ही माणसे डोईजड झालीच तर त्यांचा काटा काढतात. हे तेंडुलकरांना शिवसेनेच्या संदर्भात सांगायचे होते. ते त्यांनी त्या नाटकातून सांगितले. त्यासाठी त्यांच्या कामास आली, ती घाशीरामची दंतकथा. एकंदर 'घाशीराम कोतवाल' या नाटकानंतर घाशीरामचा इतिहास लोकांसमोर फारसा आलाच नाही. आली ती फक्त दंतकथा.

मुळात माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत पुण्यास स्वतंत्र कोतवाल नव्हता. त्यांच्या काळात पुण्याचे महत्त्व फार वाढले, तेव्हा मग शहराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कोतवाल म्हणजेच पोलिस अधिकारी नेमण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार 18 फेब्रुवारी 1764 रोजी माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुणे शहराच्या व्यवस्थेचे काम सोपविले. नाना फडणीस अर्थात बाळाजी जनार्दन फडणीस हे सांगतिल तसे काम करीत जाणे असे त्यांना बजावण्यात आले होते.

नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले. शहराच्या बंदोबस्ताखेरीज लहान गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा स‌त्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली. त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला.

बाळाजी नारायण केतकरांनंतर बाबूराव राम, जनार्दन हरी, धोंडो बाबाजी व आनंदराव काशी असे कोतवाल झाले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1777 रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.

हा माणूस अतिशय सुस्वरूप, बुद्धिमान आणि गोडबोल्या होता. नाना फडणीसांची त्याच्यावर मोठी मर्जी होती. फितुरीसाठी, राघोबा दादा, तसेच अन्य काही स‌रदार-दरकदारांवर हेरगिरी करण्यासाठी नाना त्याचा वापर करीत असत. किंबहुना अशा गुप्तरीत्या मिळविलेल्या बातम्यांवरच पंधरा वर्षे नानांचा मुख्य कारभार सुरू होता. फंदफितुरी दाबात ठेवण्यासाठी नानांना घाशीरामच्या गुप्तहेरांकडून मिळणा-या बातम्यांचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याबद्दल नाना बक्षिसे वगैरे देऊन त्याची वारंवार प्रशंसा करीत असत. पण या काळात घाशीरामने अनेकांवर अन्याय केला. अतिशय निर्दयपणे पुण्याचा कारभार केला. त्यामुळे पुढे असा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण अखेर घाशीरामचे शंभर घडे भरलेच.

त्याच्या कारकीर्दीत 25 तेलंगी ब्राह्मण पुण्यास आले होते. ते आपल्या देशास जाण्यास निघाले असता, त्यांना घाशीरामच्या शिपायांनी कैद केले आणि भवानी पेठेतील चावडीत खणाचे भुयार होते तेथे कोंडले. त्या भुयारात वारा जाण्यास जागा नव्हती. त्यामुळे कोंडमारा होऊन 21 लोक मृत्यू पावले. (ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3373, पृ. 4536) मानाजी फाकडे नावाच्या गृहस्थांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी ती पेशव्यांच्या कानी घातली. 21 ब्राह्मणांचा कोंडून मृत्यू झाल्याची बातमी पुण्यात कळताच एकच हलकल्लोळ उडाला. पुण्यातील स‌र्व ब्रह्मवृंद पेशव्यांच्या वाड्यासमोर जमला. अत्याचारी घाशीरामाला हत्तीच्या पायी देऊन ठार करावे, अशी त्यांची मागणी होती.

घाशीरामचे म्हणणे मात्र वेगळेच होते. कोंडून ठेवल्याने त्या ब्राह्मणांचा मृत्यू झाला, ही हकीकत खोटी आहे. हे लोक शहरात चो-या करीत असत. त्यांना धरून आणून ठेवले असता, त्यांनी अफू खाऊन जीव दिला, असे त्याने सांगितले. त्यावर त्या ब्राह्मणांना मूठमाती देण्याची परवानगी दिली. त्याबरोबरच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. अय्याशास्त्रीजी यांच्याकडे चौकशीचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत घाशीराम दोषी ठरला. त्याच्या मुसक्या बांधून गारद्यांच्या पहा-यात ठेवण्यात आले.

घाशीरामला कैद केले तरी ब्रह्मवृंदांचे स‌माधान झाले नव्हते. त्याला हत्तीच्या पायी देण्याचा त्यांचा आग्रह होता. तेव्हा त्याला हत्तीवर बांधून शहरातून फिरविण्यात आले. त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला दगड मारले. त्यात त्याचे डोके फुटले. तरी ब्रह्मवृंद शांत होईना. शेवटी दुस-या दिवशी, 31 ऑगस्ट 1791 रोजी त्याला उंटावर उलटे बसवून गारपिरावर नेऊन सोडले. तेथे 'ब्राह्मणांनी त्यास धोंडे घालून मारिले. अद्यापि शरीर कोतवालाचे पडले आहे. नदीत टाकिले नाही,' असे मिरजकरांच्या वकीलाचे पत्र आहे. (ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3374, पृ. 4539) घाशीरामच्या दोघा मुलांना, तसेच त्याच्या दिवाणालाही बेड्या घालण्यात आल्या. घाशीरामच्या घरावरही जप्ती आणण्यात आली. अशा रीतीने घाशीराम प्रकरणाचा शेवट झाला.

तत्कालीन पुण्याच्या ढासळलेल्या नैतिकतेवर प्रकाश टाकणारे असेच हे प्रकरण आहे.

संदर्भ -
महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, पृ. 497-498.

रामदास खरेच बोहल्यावरून पळाले होते?

'शुभमंगल सावधान' हे शब्द कानावर पडले आणि नारायणाने बोहल्यावरून धूम ठोकली.

रामदासांच्या जीवनचरित्रातील ही एक महत्त्वाची घटना. मराठवाड्यातल्या जांब गावातल्या नारायण सूर्याजी ठोसर या मुलाचे समर्थ रामदासस्वामींमध्ये रूपांतर झाले, त्या प्रवासाच्या प्रारंभी ही घटना येते. पण इतिहासातील अनेक घटनांप्रमाणेच हिच्याबद्दलही शंका आहेत. ही घटना अशीच घडली का याबद्दल संशय आहे. म्हणजे रामदास स्वामींनी लहानपणीच घराचा त्याग केला हे खरे. पण ते लग्नातून पळाले याबद्दल मात्र खात्री नाही.

वास्तविक या घटनेबद्दल अनेकांनी लिहिले आहे. नारायण बोहल्यावरूनच पळाले असे जवळजवळ सर्वांचेच म्हणणे आहे. रामदासांची अनेक चरित्रे हीच कथा सांगत आहेत. रामदासांच्या स‌र्व चरित्रांमध्ये हनुमंतस्वामींची बखर जास्त प्रमाण मानली जाते. या कथेबद्दल हनुमंतस्वामी लिहितात -

"पुढे कोणे एके दिवशी श्रेष्ठीस (म्हणजे स‌मर्थांचे थोरले बंधू) मातोश्री आज्ञा करिती जाहली की, नारोबाचे लग्न करावे. श्रेष्ठीने उत्तर केले की, नारोबाचे लग्न कराल, तर नारोबा हातातून जाईल आणि आपणास बहुत दुःख होईल. ही गोष्ट कामाची नाही. मातोश्री बोलली की, आपला वंश फार नाही. वंशवृद्धी जाहली पाहिजे. यास्तव अवश्यमेव लग्न कर्तव्य आहे. असे म्हणून वधूचा शोध करू लागली...."
"... नंतर मातोश्रींनी विचार केला की लग्नाची गोष्ट काढली असता हा असे (म्हणजे रामदास पिसाळल्यासारखे वागत वगैरे) करतो. तरी यास काही बोध करावा असे मनात आणून त्यास एकांती बोलावून बोलली की, बापा मी सांगतो ती गोष्ट मान्य करशील काय? समर्थ बोलले की मी आपले आज्ञेबाहेर नाही. न मातुः परं दैवतम् असे शास्त्र आहे. म्हणून आज्ञा करावी. तेव्हा तुम्ही लग्न करीत नाही. लग्नाची गोष्ट काढली असता रागे भरता. तर असे करू नये. अंतःपट धरीन तोपर्यंत नाही असे म्हणू नये. तुम्हास माझी शपथ आहे. 'उत्तम आहे', असे म्हणून त्यादिवसापासून पूर्वीचे प्रकार सर्व सोडून दिले. नंतर मातोश्रीमी लग्नाचा उद्योग करून आपले बंधू भागजीपंत बादेनापूरकर ह्यांची कन्या योजून निश्चय केल्यानंतर स‌र्व आसनगावी लग्नास गेले. सीमंतपूजनापासून अंतःपट धरीपर्यंत स‌र्व यथासांग झाले. पुढे ब्राह्मणांनी अंतःपट धरून मंगलाष्टके म्हणावयाचे पूर्वी 'स‌ावधान' असे म्हणताच, याचा अर्थ काय, असे स‌मर्थांनी विचारिताच 'इतःपर संसाराची बेडी तुमचे पायात पडली' असे ब्राह्मणाचे वाक्य श्रवण करीन स‌मर्थांनी विचार केला की, पूर्वी मी सावध आहेच, हल्ली ब्राह्मणही म्हणतात आणि मातोश्रींची शपथ एथपर्यंतच होती. आता तिचे वचनातून पार पडलो. अतःपर येथे गुंतून राहणे ठीक नाही. असे म्हणून तेथून पलायन केले. ते जांबगावी अश्वत्थाचे वृक्षावर जाऊन बहुत निबिड व अवघड जागेत बसले. ते त्या वृक्षावर तीन दिवस तसेच राहिले. इकडे लग्नाचे स‌मारंभातून स‌मर्थ पळून गेले, हे ठीक नाही तर शोध करावा असा विचार करून स‌र्वत्रांनी व मातोश्रींनी बहुत शोध केला. परंतु कोठेच ठिकाण लागेना, म्हणून त्या मुलीस दुसरा वर पाहून लग्न केले."

असाच मजकूर 'दासविश्रामधामा'तही येतो.

मात्र समर्थ पलायनाची तपशीलात काहीसा फरक असलेली एक अन्य हकीकतही सांगण्यात येते. 'केसरी'चे माजी स‌ंपादक रा. रा. ज. स. करंदीकर यांनी आपल्या 'श्री समर्थचरित्रा'त लिहिले आहे - "अंतपाट धरून 'शुभंगल सावधान'चा घोष होईपर्यंत नारायण स्तब्ध उभा होता आणि सावधान शब्द ऎकल्याबरोबर तो तेथून निसटला आणि गुप्त झाला, असे जे वर्णन करण्यात येते त्यात कविसंप्रदायाला शोभणारी अतिशयोक्ती असावी असे दिसते." (पान 10)

स‌मर्थांच्या विविहाचा मुहुर्त 'दासविश्रामधामा'त फाल्गुन शु. 8 ला अकरा घटका दिवसाचा असा दिलेला आहे. मात्र 'स‌मर्थ प्रतापा'त हा मुहूर्त रात्रीचा दिलेला आहे. समर्थप्रताप अधिक विश्वसनीय ग्रंथ आहे. त्यात 'स‌मर्था फावली मध्यरात्र' आणि 'स‌मर्थामागे लोक धावले मध्यरात्री। समर्थ कोणासी न दिसती रात्री' असे वर्णन केलेले आहे. भर दुपारी अक्षता टाकण्यासाठी मंडपात स‌र्व लोक जमले असताना त्यांच्यातून पळून जाणे आणि मग कोणासही न सापडणे हे कठीण दिसते. स‌मर्थ प्रताप सांगतो त्याप्रमाणे लग्नाचा मुहूर्त रात्रीचा असेल, तर ती वेळ पळून जाण्यासाठी अधिक योग्य ठरते. एकंदर स‌मर्थ प्रतापानुसार नारायण पळाला तो रात्रीच्या वेळी आणि तेही बोहल्यावरून नव्हे, तर तत्पूर्वी, लग्नघटिकेच्या आधी. रा. रा. स. कृ. जोशी यांनी आपल्या 'जय जय रघुवीर समर्थ' या पुस्तकात लग्नाची वेळ रात्रीची होती असेच म्हटले आहे. "अंधारी रात्र, मंडपात गर्दी झालेली, भराभर दिवे विझवून नारायण पळाला." असे त्यांनी म्हटले आहे. (पान 19)

परंतु याहून स‌र्वस्वी भिन्न अशीही एक हकीकत आहे. स‌मर्थ हे लग्नातून नव्हे, तर अन्य कारणामुळे पळाले असे रा. रा. वि. ल. भावे-तुळपुळे यांनी 'महाराष्ट्र सारस्वता'त (पाचवी आवृत्ती, पान 314) म्हटले आहे. त्यांनी सांगितलेली कहाणी अशी - "लहानपणी रामदासांच्या थोरल्या बंधूला त्यांच्या वडिलांनी मंत्रोपदेश व अनुग्रह दिला. तो आपल्यालाही द्यावा असा आग्रह रामदासांनी धरला. परंतु तुला अधिकार नाही म्हणून बापाने निवारले व मंत्रानुग्रह दिला नाही. या गोष्टीची चीड येऊन नारायण हा रागाने घरातून निघून गेला." या मजकुरावर सारस्वतकारांनी एक टीपही दिली असून, त्यात म्हटले आहे, की

"नारायण ऊर्फ रामदास हा लहानपणी आपल्या लग्नाच्या वेळी अंतःपट धरला असताच, ब्राह्मण अष्टके म्हणत होते तोच नदाचा शेला दूर होण्यापूर्वीच तेथून एकदम पळाला, अशी हकीकत बखरकार सांगतात. ही गोष्ट महाराष्ट्रात स‌र्वभर मानली जाते. पण वर दिलेली हकीकत 'श्री सांप्रदायिक विवध विषय' या पुस्तकात दिली आहे. ती जास्त स्वाभाविक व खरी वाटते. स‌ावधान शब्द ऎकून पळून गेल्याच्या हकीकतीत काव्य आहे. ती सांगण्याला आणि ऎकण्याला गोड आहे. मोठ्या लोकांसंबंधी अशा गोड काव्यमय हकीकती चरित्रकार हौसेने सांगतात व पुष्कळ वेळा स्वतः चरित्रनायक अशा अद्भूत हकीकती पसरविण्यास कारण होतात. पण पुष्कळदा त्या स‌त्यशोधनाच्या आड येऊन चरित्रकारास फसविण्यास व वाचकास रंजविण्यास मात्र कारणीभूत होतात."

'रामदास जन्मकथा'कारानेही तसेच म्हटले आहे.

संदर्भ -
आचार्य अत्रे यांनी 23 डिसेंबर 1968 रोजी 'मराठा' मध्ये लिहिलेला श्री स‌मर्थांची टवाळी (भाग 2) हा लेख.