बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी

जोधा-अकबर, सलीम-अनारकली या दोन्ही प्रेमकहाण्यांमध्ये एक साम्य आहे. या कहाण्यांमधील दोन्ही स्त्रीपात्रे खरोखरीच होऊन गेली की काय याबद्दल शंका आहे. जोधाबाई ही अकबराची पत्नी की सून असा वाद आहेच. पण गंमत म्हणजे अनारकली ही सलीमची प्रेयसी की "आई' असाही एक वाद आहे. अशी कथा सांगितली जाते, की अनारकली ही अकबराच्या जनानखान्यातली एक बॉंदी. तिचा दर्जा अकबराच्या पत्नीसमान. पण सलीमसाहेब तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे अकबर संतापला. पण या कथेला तसा काही अस्सल आधार नाही. ते काहीही असो. या प्रेमकहाण्यांनी येथील लोकमानसावर राज्य केले हे खरे.

मराठी मुलखात घडलेली अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा. ही कहाणी बाकी अस्सल आहे आणि अव्वलही!
खरेतर ही एक शोकांतिकाच म्हणायची. एक ब्राह्मण पेशवा, एक स्वरुपसुंदर मुस्लिम तरूणी, स्वरुपसुंदर म्हणजे किती, की इतकी गोरी, इतकी गोरी, की खाल्लेले पान ज्याच्या सुरईदार गळ्यातून उतरताना दिसायचे! (ही अर्थातच एक दंतकथा.) आणि ते पेशवाईतलं वातावरण! जणू या कहाणीच्या मुळातच शोकांतिकेची बिजं होती...

मस्तानी ही बाजीरावाला मिळाली ती भेट म्हणून! बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल बुंदेला. त्याला बाजीरावाने मोगलांच्या तडाख्यातून वाचविले. तेव्हा कृतज्ञतेने त्याने बाजीरावांना बिदागी दिल्या. त्यात ही मस्तानी नावाची नृत्यांगना होती. (मस्तानी छत्रसालास त्याच्या पर्शियन पत्नीपासून झालेली मुलगी असल्याचेही स‌ांगितले जाते.) बाजीरावाने मात्र तिला मानाने वागविले. त्यांनी तिला पत्नी मानून शनिवारवाड्यात आणले. तेथे तिच्यासाठी मस्तानी महाल बांधला. त्या महालात ती राहात असे. बाजीरावांचा तिच्यावर जेवढा जीव होता, तेवढेच तिचेही त्यांच्यावर प्रेम होते. ती त्यांची सर्वप्रकारे काळजी घेत असे. असे सांगतात, की बाजीराव स्वारीवर असताना ती घोड्यावर स्वार होऊन बाजीरावाबरोबर तेवढ्याच वेगाने दौडत चाले. मस्तानी नृत्यनुपुण होता. शनिवारवाड्यात गणेशचतुर्थीस तिचा नृत्यगायनाचा कार्यक्रम होत असे.

नानासाहेब पेशव्याचे लग्न सन 1730 त झाले. त्यावेळच्या खर्चाच्या हिशोबात तिच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. (पेशवे दप्तर 30, ले. 363)

इ. स. 1734 मध्ये बाजीरावापासून तिला पुत्ररत्न झाले. (मराठी रियासत, बाजीराव, पृ. 403) त्याचे नाव समशेरबहाद्दर असे ठेवण्यात आले. हा पुढे पेशव्यांच्या फौजेत खासा सरदार म्हणून वावरला. पेशव्यांच्या मुलाबरोबरच त्याचेही शिक्षण झाले. पेशव्यांच्या अनेक मोहिमात राहून त्याने मराठी राज्याची सेवा उत्कृष्ट बजावली. तो पानिपती कामास आला.

मस्तानी बाजीरावांबरोबर पत्नी म्हणून वावरू लागल्यामुळे पेशव्यांच्या घरात तिच्याविरुद्ध कलह सुरू झाला.. पेशव्यांची आई राधाबाई, भाऊ चिमाजी अप्पा आणि चिरंजीव नानासाहेब या तिघांचा मस्तानीने बाजीरावाबरोबर राहण्यास विरोध होता. बाजीरावाने तिचा नाद सोडून द्यावा म्हणून चिमाजी अप्पा व मातोश्रीने फार प्रयत्न केले. पण बाजीरावाने त्या गोष्टीस सरळ नकार दिला. डिसेंबर 1739 मध्ये तर आपल्याबरोबर ही मंडळी मस्तानीस स्वारीस पाठवित नाहीत याचा राग येऊन वैतागून बाजीराव नासिरजंगावरील स्वारीवर गेले. ते स्वारीवर असतानाच पेशव्यांच्या घरी पुण्यास मुलांच्या मुंजी झाल्या. डिसेंबर 1739 ते 1740 मार्च पर्यंत या स्वारीची कामगिरी त्यांनी व्यथित अंतःकरणाने सिद्धिस नेली.

बाजीराव स्वारीवर आहे याचा फायदा घेऊन या काळात मस्तानीला पुण्यात कैदेत ठेवण्यात आले. एवढेच नव्हे, तर बाजीरावापासून मस्तानीस दूर करण्याची परवानगी शाहू महाराजांकडून मिळविण्याचा प्रयत्नही पेशवे कुटुंबियांनी केला. परंतु शाहू महाराजांनीही त्यांना रास्त सल्ला दिला. मस्तानीस कैदेत ठेवून बाजीरावास दुखवू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""राऊ यास खट्टे न करावे. त्यांचे समाधान राखावे. तिला अटकाव करून सल्ला तोडू नये.''

....नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत बाजीराव खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यास गेले. तेथे ते ज्वराने आजारी पडले. त्यातच रावरेखेडी येथे 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी बाजीरावांची धर्मपत्नी काशीबाई व मुलगा जनार्दन ही नुकतीच पुण्याहून येऊन पोचली होती. मस्तानी मात्र पुण्यातच कैद होती.

बाजीरावांच्या मृत्यूची हकिकत तिला समजताच तिनेही मृत्यूला कवटाळले. तिचा मृत्यू विष प्राशन करून झाला की मुद्दाम प्राणघात करून घेतला हे समजण्यास मार्ग नाही. शनिवारवाड्यात मृत्यू झाल्यावर तिला तिच्या इनामाचे गाव पाबळ येथे नेऊन दफन करण्यात आले.

बस्स. एवढीच ही प्रेमकहाणी! एक मोठी प्रेमकहाणी!

संदर्भ -
महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 139 - 141)

5 comments:

तुमचा आनंद said...

बाजिराव-मस्तानी याबद्दल जाणून घ्यायचे होतेच.. बरं झाल याबद्दल माहिती पोस्ट केलीत ...

शाहू महाराजांबद्दल खुप कमी माहिती आहे...
त्याचांबद्दल एखादी series चालु करुन माहिती मिळेल का ??

मोरपीस said...

बाजिराव-मस्तानी विषयी माहिती दिल्याबद्द्ल आपले आभार

visoba said...

anand, nakki!

P K Phadnis said...

मस्तानीबद्दल सविस्तर माहिती श्री. सेतुमाधवराव पगडी यांच्या पुस्तकात दिलेली आहे. ती छत्रसालाची मुलगी होती असे ते साधार म्हणतात. छत्रसालावर स्वारी महंमद बंगष याने केली होती. मोगल बादशहाने नव्हे. बाजीरावाने त्याचा पराभव करून ’परत छत्रसालावर स्वारी करणार नाही’ असे कबूल करून घेतले. छत्रसालाने बाजीरावाला राज्याचा तृतीयांश हिस्सा दिला पण तो सुखासुखी पेशव्यांना मिळाला नाही. झगडे करावे लागले.

Shantanu Chaudhari said...

विसू भाऊ ,


खऱ्या गोष्टी सांगाव्या . मस्तानी प्रणामी पंथाची . मुस्लिम नाही , ती छत्रसालची मु लगी. तो सुद्धा प्रणामी पंथाचा . यात श्रीकृष्णाची मुख्यत्वे पूजा करतात .