राम कोण देशीचा? - भाग 2

रामकथा मूळची इजिप्तची असे मत मल्लादि वेंकटरत्नम्‌ यांनी मांडले आहे. इजिप्तच्या राजवंशापैकी एका वंशाचा रामेसु (रामेसिस) हा मोठा पराक्रमी राजा होता. त्याची कथा ऐकून कोणी कवीने त्या कथेवर आपल्या कल्पनेच्या जोराने रामायण हे काव्य लिहिले, असे त्यांचे म्हणणे आहे. "परभाषेतील पुस्तकाचे भाषांतर करण्याची प्रथा पूर्वीपासून आहे. पैशाची भाषेतील बृहत्कथेचे संस्कृतीकरण केल्याचे प्रसिद्धच आहे. परकीकथा व वंशावळी भाषांतरित करून आपल्या ग्रंथात दडपून देण्याचा संप्रेदाय भविष्यपुराणात ढळढळीतपणे दिसतो. जुन्या करारातील राजांच्या वंशावळी जशाच्या तशा त्या पुराणात उतरून घेतलेल्या आढळतात.... रामायणातील कथेचे मिसरी मूळ झाकून व तिकडील काही नावांस संस्कृतरूप देऊन व काहींची पूर्ण बदलून हा ग्रंथ तयार झाला,'' असे त्यांचे प्रतिपादन आहे.

भास्करराव जाधव याविषयी लिहितात, "... अगस्त्य हा रोमन बादशहा आगस्टस, लोपामुद्रा ही त्याची पत्नी लिबिया अशाप्रकारे त्यांच्या (पक्षी : वेंकटरत्नम्‌) शोधात पुष्कळच अतिशयोक्ती झालेली आहे. यासाठी त्याची छाननी करणे अवश्‍य आहे.''

तर त्यानुसार भास्कररावांनी रामायणाची तशी छाननी केली आणि त्यातून त्यांच्या हाती जे "सत्य' लागले ते लोकांसमोर मांडले. ते असे :

"वर्तमानकाळी या भूलोकावर बहुगुणसंपन्न असा कोण आहे?' या वाल्मिकींनी नारदास विचारलेल्या प्रश्‍नाने रामायणाची सुरूवात होते. बालकांडाच्या पहिल्या सर्गात या प्रश्‍नाचे श्‍लोक आले आहेत. ते व त्यांस नारदाने दिलेल्या उत्तरानुसार अशी अनुमाने निघतात, की राम, वाल्मिकी व नारद हे समकालीन होते. नारदाला रामचरित्राची चांगलीच माहिती होती. वाल्मिकीला रामाची काहीच माहिती नव्हती. राम आर्यावर्तातील राजा असता, तर त्याची माहिती त्यास असावयास पाहिजे होती. परदेशात प्रवास करून आलेल्या बहुश्रुताजवळ वाल्मिकीने चौकशी केली; अशी चौकशी करणे साहजिक आहे. यावरून वाल्मिकी व राम हे समकालीन असले तरी ते भिन्न देशांतली होते. वाल्मिकी एतद्देशीय होते यात संशय नाही. त्यावरून राम हा दूरवरच्या देशातील पुरूष असला पाहिजे असे अनुमान होते.

तर रामाचा हा देश कोणता?

भास्करराव जाधव यांनी रामायणात वर्णिलेल्या भूगोलाचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. ते सांगतात ः

बालकांड सर्ग 5 मध्ये वर्णन केल्यानुसार रामाची अयोध्या ही नगरी सरयू नदीतीरावरील कोशल या देशात होती. ती 48 कोस लांब व 12 कोस रूंद अशी नगरी होती. तिचा आकार अष्टकोनी होता. ही सर्व नगरी घरांनी खच्चून भरली होती व तिच्याभोवती कोट व खंदक वगैरे होते. यावरून या अयोध्येची वस्ती मुंबईच्या वस्तीच्या (ही मुंबई 1935 सालची!) बरीचपट असली पाहिजे असे अनुमान होते. आजची अयोध्या गोग्रा नदीच्या काठी दाखविली जाते. रामायणात ती सरयू नदीकाठी होती. नावात असा बदल का व कसा झाला हे कळत नाही.

बालकांडातील पाचव्या सर्गातील तेराव्या श्‍लोकाचा उत्तरार्ध "वाजिवारणसंपूर्णां गोभिरुष्ट्रैः खरे स्तथा।।' असा आहे. म्हणजे उंट व गाढवे यांनी अयोध्या भरलेली होती! हे प्राणी अयोध्येत एवढ्या मोठ्या संख्येने कसे आले? गंगा-यमुना नद्यांच्या काठावरील सुपिक प्रदेशात उंटांचा उपयोग नाही. अयोध्येत तर त्यांची, तशीच गर्दभांची गर्दी. हा प्राणी तर आर्यांच्या मते अशुभ! त्यावर बसलेल्या द्विजांचे उपनयन पुन्हा केले पाहिजे अशी शास्त्राज्ञा. अशा प्राण्यांची अयोध्येत गर्दी होती असे सांगणे म्हणजे अयोध्या आर्यावर्ताबाहेर असावी हे सांगण्यासारखेच आहे!

राम वनवासाला निघाल्यानंतर प्रथम श्रुंगवेरपूर व तेथून प्रयागला गेला. प्रयागनजिक चित्रकुटावर राम-भरत भेट झाली. रामायणातील भूगोलानुसार अयोध्या, श्रुंगवेरपूर आणि प्रयाग ही स्थाने तीन दिशांना आहेत. अयोध्येपासून श्रुंगवेरपूरचे अंतर जेवढे, तेवढेच अयोध्येपासून प्रयागचे आणि तेवढेच श्रुंगवेरपासून प्रयागचे. तेव्हा रामास प्रयाग येथे जाण्याकरीता श्रुंगवेरपुरास वळसा घालण्याचे काही कारण नव्हते. पण तो तसा गेला. विशेष म्हणजे नंतर भरतही त्याच मार्गाने गेला! हे चमत्कारिक आहे! मुळात हे श्रुंगवेरपूर कोठे आहे त्याचा पत्ताच लागत नाही. हे नावही हिंदी असण्याचा संभव नाही.

प्रयागला आल्यानंतर राम भरद्वाजाच्या आश्रमात गेला. भरद्वाजाने त्यास तेथून दहा कोसांवर असलेल्या चित्रकूट पर्वतावर राहा असे सांगितले. रामायणातील वर्णनानुसार हा एक उंच व विस्तृत व खूप शिखरे असलेला पर्वत आहे. पण अलाहाबाद आणि प्रयाग यांच्या आसपास शंभर कोसांतही अशी टेकडीदेखील नाही. गंगा, यमुना नद्या तशाच राहिल्या, पण तेव्हाचा चित्रकूट पर्वत मात्र नाहिसा झाला असे म्हणणेही विश्‍वसनीय होणार नाही.

रामाची भेट घेऊन भरत परत आला. पण तो अयोध्येत गेला नाही, तर त्याने नंदिग्राममध्ये राहून राज्य केले. हे गाव अयोध्येपासून एक कोसाच्या अंतरावर होते, असे वर्णन आहे. पण आज अयोध्येजवळ या गावाचा पत्ता लागत नाही. अशाच नावाची गावे दक्षिण भारतात मात्र आहेत.

लंकानगरीबाबतही असाच घोळ आहे. किष्किंधाकांडातील सर्ग 60, श्‍लोक 40 नुसार अंगद-हनुमानादी वानरांना संपाती विंध्यावर भेटला व कलिंग देशातल्या पर्वतावरून त्याने लंकेत उडी घेतली.
महिंद्र पर्वत कलिंग देशात आहे. कलिंग म्हणजे जगन्नाथ ते कृष्णेपर्यंतचा पूर्वेकडचा प्रदेश. हा विंध्याच्या पूर्वेस आहे.
महिंद्र पर्वतापासून शंभर योजनांच्या अंतरावर असलेल्या त्रिकूटाचलाच्या लंबसंज्ञक शिखरावर हनुमान उतरला. (सुंदरकांड, सर्ग 1, श्‍लो. 202) तेथून पर्वतशिखरांवर असलेली लंका पाहिली. (सर्ग 2, श्‍लो. 8) यावरून आजचे सिंहलद्वीप वा सिलोन अर्थात श्रीलंका ही रावणाची लंका नसली पाहिजे, असे दिसते. सिलोन हीच रावणाची लंका हे सिद्ध करण्याकरिता तिनेवेल्ली जिल्ह्यातील एका साधारणशा डोंगराला महेंद्र पर्वत हे नाव दिले आहे. ती जागा रामेश्‍वर म्हणून प्रसिद्ध आहे. पण पुराणप्रसिद्ध महेंद्र पर्वत हा कृष्णा व महानदी यांच्यामध्ये आहे!

रामायणातील दंडकारण्य, जनस्थान, पंपा सरोवर, किष्किंधा, पंचवटी आदी ठिकाणे व प्रदेश यांबाबतही अशाच प्रकारच्या शंका असल्याचे भास्करराव जाधव यांनी दाखवून दिले आहे.

अर्थात यावरून असे मान्य केले, की रामकथा ही या देशीची नव्हे, तरी ती इजिप्तमधील हे कसे म्हणता येईल? त्याचा परामर्ष पुढच्या लेखात घेऊ या.

संदर्भ :
- रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, पहिल्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण, 1991.

4 comments:

Anonymous said...

यात काहीच नविन नाही आहे. ही थिअरी लाल बावट्यावाल्यांनी रामजन्मभुमी वरील विश्व हिंदु परिषदेशी चर्चांमधे मांडली होती. ज्याविरुध्द विहिंप च्या लोकांनी पुरावे दिल्यावर मुस्लिम व त्यांचे लाल बावटावाले नेते यांनी राममंदीर त्या ठिकाणी नव्हतेच हे सिध्द करायला काहीही राहिलेले नाही हे जाणुन त्या बैठकांना जाणेच बंद केले होते. ही एक कॉंट्रव्हर्सी थिअरी आहे ज्यात फ़क्त तर्कांचे बाण मारले गेले आहेत.

Anonymous said...

आपल्या देशात आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. फार थोडे लेखक अभ्यासपूर्ण लेखन करतात. आपले लेख अभ्यासपूर्ण आहेत. आपला निम्मा समाज
रुढी,परंपरा,अज्ञान,धर्माचे राजकारण याने ग्रासलेला आहे त्यामुळे तुम्हाला विरोध होइल हे स्पष्ट आहे. पण लिखाण चालु ठेवा स्पष्ट आणि सडेतोड.

Anonymous said...

अबकर महान होता असे ईतिहासात लिहिले आहे. मग आता अकबरावरुन एवढा गोंधळ का चालू आहे? हे मतांचे राजकारण आहे का? कृपया अकबर राजाविषयी काहीतरी प्रकाश टाका.

Yogesh said...

mast.
yeu dya pudhacha bhaag.
vachayla maja yet ahe. :)