तुकारामांनी शिवरायांना रामदासांकडे पाठविले हे खरे आहे काय?

समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या संबंधांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा तेव्हा समर्थभक्तांकडून तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा दाखला दिला जातो. तसे शिव-स‌मर्थांची शके 1571 (स‌न 1650) पूर्वी भेट झाल्याचे अनेक पुरावे दिले जातात. पण त्यातही तुकारामांचा हा 15 ओव्यांचा अभंग महत्त्वाचा. कारण जेव्हा संतशिरोमणी तुकाराम महाराज शिवबांना समर्थांकडे 'मन लावा वेगी' असे सांगतात, तेव्हा त्यातून समर्थांच्या थोरवीवर आपसूकच शिक्कामोर्तब होत असते. शिवाय तुकाराम महाराजांचे निधन जानेवारी 1650 मध्ये झाले, याचा अर्थ त्यांनी रामदासांना शिवाजी महाराजांकडे पाठविले ते तत्पूर्वी. म्हणजे रामदास आणि शिवराय यांची भेट 1650 ला वा त्याआधी झाली हे सिद्धच झाले. तेव्हा हा अभंग महत्त्वाचा.

या अभंगातील पहिल्या तीन ओव्या अशा आहेत -

"राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ।।1।।
रामदास स्वामी सोयरा स‌ज्जन । त्यासी तनमन अर्पीबापा ।।2।।
मारुती अवतार स्वामी प्रकटला । उपदेश केला तूज लागी ।।3।।"

या अभंगाविषयी बोलण्यापूर्वी तुकाराम महाराजांची जी अभंगवाणी आज उपलब्ध व प्रकाशित झालेली आहे, त्याविषयी माहिती घेणे योग्य ठरेल.

तुकारामांचा जन्म देहू या लहानशा खेड्यात इ. स. 1608 मध्ये झाला. त्यांची आई कनकाई आणि वडिल वाल्होबा ऊर्फ बोल्होबा. त्यांचे आंबिले ऊर्फ मोरे घराणे मोठे प्रतिष्ठित होते. त्यांच्याकडे गावाची मानाची महाजनकी होती. जानेवारी 1650 मध्ये तुकारामांचा मृत्यू झाला. ते कसे गेले हे एक गूढच आहे. ते स‌देह वैकुंठाला गेले एथपासून त्यांचा खून झाला येथपर्यंत बरेच प्रवाद आहेत. आपल्या या 42 वर्षांच्या आयुष्यात तुकारामांनी किमान साडेचार हजार कविता केल्या! या कविता वह्यांमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या. त्या एवढ्या जहाल, एवढ्या मर्माघाती की तेव्हाच्या सनातनी ब्राह्मणवृंदाला त्या नष्ट करण्यातच आपले सौख्य सामावले आहे, असे वाटू लागले. तुकारामांना जलदिव्य करावे लागले ते यातून. तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित व कोरड्या वर आल्या असे समजल्यावर भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांची पाने लुटून नेल्याचे तुकारामांचे चरित्रकार महिपती सांगतात. याचा अर्थ महाराजांनी जरी आपले अभंग स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले असले, तरी त्यांच्या हातची पूर्ण संहिता शिल्लक राहिलेली नाही. आज त्यांच्या हातचे स‌मजले जाणारे एकुलते एक हस्तलिखित देहू देवस्थानच्या संग्रहात आहे.

मग प्रश्न निर्माण होतो, की तुकारामांचा गाथा सिद्ध झाला तो कसा?

तुकारामांच्या वह्यांची पाने लोकांनी प्रसाद म्हणून नेली, असे असले, तरी तुकारामांचे लेखक संताजी तेली जगनाडे आणि संताजींचे चिरंजीव बाळोजी यांनी लिहून ठेवलेले दोन हजार अभंग होतेच. त्यातील संताजीच्या हातचे तेराशे अभंग पुढे वि. ल. भावे यांनी प्रकाशित केले. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे. पण ही संपूर्ण जगनाडे संहिता पाहिली, तरी त्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्याहूनही अधिक अभंग नाहीत.

महाराजांच्या वैकुंठगमनानंतर थोड्याच दिवसांनी कचेश्वर भट ब्रह्मे चाकणकर हे तुकारामांचे पुत्र नारायणबाबा यांना भेटले. कचेश्वर भट हे तुकोबांचा वेध लागलेले ब्राह्मण. तुकारामांचे अभंग लिहून घ्यायचे, ते पाठ करायचे आणि त्याआधारे कीर्तने करायची, असे ठरवून ते नारायणबाबांकडे खेडला गेले होते. काही अभंग लिहून द्या अशी विनंती त्यांनी नारायणबाबांना केली. त्यावर नारायणबाबांनी त्यांना सांगितले, की "अंबाजीचे घर । तेथे जावे । स‌र्वही संग्रह तुकोबाच्या वह्या । जावे लवलाह्या तुम्ही तेथे ।।" त्यानुसार कचेश्वर भट देहूला गेले. अंबाजी ऊर्फ आबाजी हे तुकारामांचे नातू, महादेवबाबांचे म्हणजे तुकारामांच्या थोरल्या मुलाचे चिरंजीव. त्यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून अभंग मिळविले. म्हणजे तुकारामांच्या वंशजांकडे अभंगांची संहिता होती. ती वंशपरंपरेने पुढे चालत आली.

पुढे इंग्रज अमदानीत इंदुप्रकाश प्रेसचे जनार्दन स‌खाराम गाडगीळ यांनी गाथा छापायचे ठरविले. तत्कालीन डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स‌र अलेक्झांडर ग्रँट यांच्या शिफारशीवरून स‌रकारने त्यांना 24 हजार रूपये मंजूर केले. या गाथ्याच्या संपादनाची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित आणि विष्णु परशुराम पंडित यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी संपादनासाठी देहू, तळेगाव व कडूस येथील प्रती वापरल्या. पंडितांनी तुकारामा महाराजांच्या तत्कालीन वंशजांकडून देहू हस्तलिखित नेले. ते महाराजांचे ज्येष्ठ पुत्र महादेवबाबा यांच्या हातचे असल्याचे संपादकांना सांगण्यात आले होते. पंडितांनी हे हस्तलिखित नेले पण नंतर ते देहूला परत आलेच नाही. ते गहाळ झाले.

हा इंदुप्रकाश अथवा पंडिती गाथा देहू हस्तलिखितावर आधारित असला, तरी तो काही देहू प्रतीवरून जसाच्या तसा छापलेला नाही. परंतु पंडितांनी त्यांना अस्वीकारार्य वाटलेले देहूप्रतीतील पाठ त्यात तळटीपा देऊन नोंदविले होते. पुढे या न स्वीकारलेल्या पाठांची त्यांची मूळ संहितेतील मूळ ठिकाणी पुनःस्थापना करून देहू प्रतीची पुनर्रचना करण्याचे काम देहू देवस्थानने केले व तो गाथा तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या त्रिशतकोत्तर सुवर्णसोहळा वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित केला.

तर अशा रितीने, संशोधन करून मूळ देहू प्रत - जी तुकारामांच्या घरात वंशपरंपरेने चालत आली - तिची पुनर्रचना करण्यात आली. या प्रतीमध्ये प्रचलित पंढरपूरकेंद्रित प्रतीपेक्षा जास्त अभंग आहेत, हे विशेष. या प्रतीची सिद्धता करताना पंडितांनी घेतलेले काही अभंग वगळण्याची वेळ एकदाच आली. आणि ती आली - "शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखालील अभंगांच्या बाबतीत!

आता येथून तुकाराम-रामदास-शिवाजी यांच्या संबंधीच्या अभंगाकडे आपण येतो.

"शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखाली पंडिती प्रतीत 14 अभंग येतात. त्यातील नऊ अभंग पंढरपूर प्रतीत व वारक-यांमध्ये प्रचलित असलेल्या अन्य प्रतींत आढळतात. पंडिती प्रतीतील बाकीचे पाच अभंग सरळसरळ उत्तरकालीन प्रक्षेप आहेत!

महाराष्ट्र शासनाच्या आवृत्तीत 1886 ते 1890 या क्रमांकाने आलेले हे ते पाच अभंग. ते प्रक्षेपीत आहेत हे कशावरून?

या प्रतीचे संपादक रा. रा. स‌दानंद मोरे आणि रा. रा. दिलीप धोंडे सांगतात, की त्यातील तुकाराम महाराजांचे स्वतःविषयीचे उल्लेख त्यांच्या स्वरूपाशी व विचारांशी विसंगत आहेत. दुसरी गोष्ट अशी, की ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा स‌द् भावनेने हे अभंग रचले तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्याने त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना शिवोत्तरकालीन राजाज्ञा, प्रतिनिधी अशा अधिका-यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, तर 1650 पर्यंत ज्याला शिवरायाचे नाव माहित असणे सूतराम शक्य नव्हते तो भूषण कवी शिवदरबारात आणून त्याने बसविला आहे. सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील नावे. पण या रामदासभक्तांनी ती दोन पदनामे मानली आहेत. भूषण कवीप्रमाणेच त्यांनी राज्यव्यवहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही 1650 पूर्वी पुणे परिसरात दाखल केले आहे.

आता प्रश्न असा येतो, की या रचना जर रामदासभक्तांच्या, तर त्या देहू वा तळेगाव प्रतीत आल्या कशा? रा. रा. मोरे व रा. रा. धोंडे याच्या दोन शक्यता सांगतात. एक म्हणजे देहू प्रतीची नक्कल त्र्यंबक कासार या तुकारामभक्ताने (तुकारामांच्या वैकुंठगमनानंतर शंभर वर्षांनी) केली. त्यांनी एखाद्या रामदासी बाडातून हे अभंग आपल्या तळेगाव प्रतीत स‌माविष्ट केले असतील. तेथून ते मूळ देहू प्रतीत नकलून घेण्यात आले असतील. देहू प्रतीत मुळाला सोडून वेगळ्या पाठांचा स‌मावेश (मूळ पाठ खोडून) झालेले दिसून येतात. हे उत्तरकालीन देहूकरांचे काम. दुसरी शक्यता म्हणजे अशाच एखाद्या उत्तरकालीन देहूकराने रामदासी प्रक्षेप देहू प्रतीत सामावून घेतले असतील. तेथून ते त्र्यंबक कासार यांच्या वहीत नकलले गेले.

हेच अभंग चिटणीसांच्या बखरीत शिवाजी-तुकाराम भेटीचा प्रसंग सांगताना येतात. यावरून या अभंगांची निर्मिती कशी झाली असावी, यावर प्रकाश पडू शकतो. मल्हार रामराव चिटणीस हे अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेलेले शिवशाहीचे बखरकार. त्यांचा समर्थ संप्रदायाशी निकटचा संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. त्यांनी शिव-समर्थांच्या भेटीचे वर्णन करताना हे अभंग लिहिले असतील अशीही एक शक्यता आहे. त्यांनी केले, ते अर्थातच प्रामाणिकपणे, स‌मर्थांचा महिमा वाढविण्यासाठी. पण साता-याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांच्या अडाणीपणामुळे अभंगात आली आणि त्यामुळे प्रक्षेप ओळखणे सोपे गेले.

तुकारामांनी शिवरायांनी पाठविलेले धन, मानसन्मान नाकारले हे खरे, पण ते करताना त्यांनी शिवरायांनी समर्थांकडे जाण्यास सांगितले, असे मात्र नाही, हे यावरून स्पष्ट होते.

संदर्भ -
- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा (श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराजांच्या वंशजांकडील प्राचीन हस्तलिखितावरून सिद्ध केलेली संहिता) - संपा. स‌दानंद मोरे आणि दिलीप धोंडे, प्रकाशक - विश्वस्त मंडळ, श्री विठोबा-रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, द्वितीय आवृत्ती जाने. 2001.

- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपा. भालचंद्र नेमाडे, साहित्य अकादेमी, पहिली आवृत्ती 2004.

4 comments:

प्रशांत बुवा said...

आम्हांस संपूर्ण अभंग वाचावयास मिळेल काय?

विशाल said...

प्रशांतजी हा अभंग बहुदा एवढाच आहे. त्यानंतर १६५० च्या फ़ेब्रुवारी महिन्यात बहुदा तुकोबा वैकुंठाला गेले. त्यानंतर काही काळाने समर्थांनी स्वत:च राजांशी संपर्क साधला. दिवाकर आणि उद्धव गोसावी यांच्यामार्फ़त राजांना समर्थांनी पाठवलेले पत्र एक विलक्षण पत्र आहे
***********************************


निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥१॥

परोपकाराचिया रासी । उदंड घडती जयासी ।
तया गुण महत्वासी । तुळणा कैंची ॥२॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥३॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥४॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥५॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥६॥

तीर्थें क्षेत्रें तें मोडलीं । ब्राह्मणें स्थानभ्रष्ट जालीं ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥७॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥८॥

शूर पंडित पुराणिक । कवेश्वर वैदिक याज्ञिक ।
धूर्त तार्किक सभानायेक । तुमचा ठाई ॥९॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥१०॥

आणीक हि धर्मकृत्यें चालती । आश्रित होऊनी कितेक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥११॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥१२॥

तुमचे देसीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें ॥१३॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काये तयांप्रती ।

धर्म स्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥१४॥
राजकारण उदंड दाटले । तेणें चीत विभागलें ।

प्रसंग नस्तां लिहिलें । क्षमा केलें पाहिजे ॥१५॥
इति लिखित नाम समास ॥१॥
*******************************

धन्य ते गुरू्वर्य आणि धन्य तो शिष्योत्तम !

Bhanudas Rawade said...

राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ।।

ह्या ओवी तुकाराम महाराजांच्या असणे शक्य नाही कारण
राया छत्रपति हे शब्द
तुकाराम महाराजांच्या हयाती मधे महाराजांचा राज्याभिषेक झालेला नव्हता म्हणजे महाराज छत्रपति झाले नव्हते

Sunil Pawar said...

कधी कधी हे भक्त असेही म्हणतात मग गुरु तुकोबारायांनी हे असे कसे लिहिले
शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे...संत तुकाराम महाराज
हे सत्य कसे असेल