महाभारत - काही टिपणं


1.
आज ज्या अवस्थेत महाभारत आहे, त्या अवस्थेत ते व्यासांनी लिहिलेले नाही हे अगदी उघड आहे. आज्या महाभारतातील यात्रावर्णने, तीर्थवर्णने आणि तात्त्विक संवाद हे तर फारच उत्तरकालीन आहेत. उपाख्यानांपैकी काही उपाख्याने वीरगाथा असून त्या मूळ महाभारतात बसवून दिल्या आहेत; तर उरलेल्या कथा नारायणीय धर्माच्या उदयानंतरच्या आणि सूतांचे वाङ्‌मय ब्राह्मणांनी आत्मसात केल्यानंतरच्या अशा आहेत. उत्तरकालीन बुद्ध वाङ्‌मयात पांडव हे जातिवाचक नाम म्हणून आलेले असल्यामुळे मूळ महाभारतात कौरव-पांडव हे एकाच कुलातील होते, असे तरी सांगितले असेल काय हेसुद्धा सांगता येत नाही.

2.
दुष्यंत-शकुंतलेचे मीलन आयुष्यात एकदाच होते. या घटनेनंतर भरताचा जन्म मूळ महाभारतात तीन वर्षांनी होतो.

3.
महाभारतात सांगितल्याप्रमाणे खरोखरच भारतीय युद्ध अठरा दिवस लढले गेले असेल आणि या युद्धात दोन्ही बाजूंनी मिळून अठरा अक्षौहिणी सेना भाग घेत असतील, तर मग सुमारे 50 लक्ष लोक या युद्धात भाग घेत होते, असे म्हणावे लागेल. आणि एक लक्ष 30 हजार रथ, तितकेच हत्ती, त्याच्या तिप्पट घोडे आणि एवढ्या प्रचंड सैन्याची पिछाडी सांभाळणे हाही प्रश्‍न जर विचारात घेतला तर 20 कोटींच्या लोकसंख्येशिवाय एवढ्यामोठ्या सैन्याची उभारणी होऊ शकत नाही हे उघड दिसते. रथ, धनुष्यबाण आणि तलवारी यांच्यासाठी विपुल प्रमाणात लोखंड व पोलाद उपलब्ध असले पाहिजे.
ऐतिहासिक पुरावा लक्षात घेता शेती करण्यासाठीसुद्धा नांगर-वखरांचे फाळ म्हणून पुरेसे लोखंड भारतात इ. स. पूर्व सहाव्या शतकापर्यंत उपलब्ध होत नव्हते. ज्ञात असणारी सर्वात प्रचंड ऐतिहासिक भारतीय सेना चंद्रगुप्त मौर्याची आहे. पण ही सेनासुद्धा चार लक्षाची होती. आणि तिची उभारणी त्याने नुकत्याच ताब्यात आलेल्या गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशाच्या बळावर केली आहे. पत्ती, गुल्म, अक्षौहिणी या शब्दांना जे अर्थ उत्तर काळात प्राप्त झाले ते जुन्या काळात नव्हतेच. म्हणून भारतीय युद्धाचा आढावा पुष्कळसा काल्पनिकच मानला पाहिजे. भारतीय युद्ध 18 दिवस चालू होते, हाही कल्पनेचा खेळच मानला पाहिजे.

4.
द्रौपदीशी पाचांनी लग्न केले याचे कारण केवळ मातृज्ञा नसून सर्वांच्याच मनात तिजविषयी निर्माण झालेली अभिलाषा होती. द्रौपदीची दोन महिने 12 दिवस अशी पाच भावांतील वाटणी प्रक्षिप्त आहे.

5.
पाडवांनी वारणावतप्रसंगी लाक्षागृहात कुणाचा तरी बळी देता यावा यासाठी पद्धतशीर ब्राह्मणभोजने घातली व बळी जाण्यासाठी योग्य जीव सापडताच सहा बळी देऊन ते खुशाल निसटून गेले.

6.
अभिमन्यूचे वय मृत्यूसमयी सोळा वर्षांचे होते अशी सर्वसाधारण समजूत होती. परंतु त्याचे वय विवाहसमयी चांगलेच प्रौढ होते आणि मृत्यूसमयी 32 वर्षांचे होते. विराटपर्वातील अर्जुन, उत्तर गोग्राहणात गांडीव धनुष्य आपल्या हाती घेऊन 65 वर्षे झाली असे म्हणतो. गांडीव अर्जुनाच्या हाती येण्याच्या सुमारास अभिमन्यू जन्मला. पण सर्व विद्वानांनी या ठिकाणी वर्ष हा शब्द सहा महिने याचा बोधक गृहीत धरला आहे. त्यामुळे मृत्युसमयी अभिमन्यूचे वय 32 वर्षांच्या आसपास होते हे सिद्ध झाले आहे.

7.
महाभारत सूतांनी राजदरबारी गायिलेले आहे. या मूळ महाभारतीय सूतकथेत कृष्णाला किंवा नारायणीय धर्माला काही जागा असेलसे वाटत नाही. विशेषतः नारायणाच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की "नारायणं नमस्कृत्य' हा महाभारताच्या नमनाचा श्‍लोक सुखटणकरांनी आधीच प्रक्षिप्त ठरवलेला आहे. सर्वच पुराणे आणि महाभारत यांना गुप्तकाळात नव्याने संस्करण मिळाले. संस्करणाचा हा काळ आहे सहावे शतक.

8.
ज्या व्याधाने कृष्णाला बाण मारला तो कृष्णाचाच भाऊ होता असा उल्लेख परंपरेत सापडतो. इंद्र आणि कृष्ण या दोघांचेही मूलभूत पाप मातृसत्तेचे नियम तोडणे हे असावे. गोकूळ हे पशुपालनाच्या अवस्थेत असल्यामुळे पितृसत्ताक असले, तरी वृंदावन मातृसत्ताक होते. पुढे ही वृंदा तुळस झालेली आहे. जिच्याशी दरसाल कृष्णाचे लग्न होते. मुळात हा दरसाल नवा मिळविणारा मातृसत्तेतील विधी होता. ग्रीक हॅरिक्‍लेसप्रमाणे आपल्याकडील कृष्णानेही मातृसत्तांच्या परंपरा तोडल्या असाव्यात. हॅरिक्‍लेसने ज्याप्रमाणे पाणसर्प पराभूत केला आहे तसे काळाच्या सुमारासच कृष्ण आणि अर्जुन यांची गणना पुरूषोत्तमांत होऊ लागलेली होती. पुढे चालून कृष्णाला शुंगांच्या काळानंतर "भागवत' ही म्हणू लागले. जे मुळात गौतम बुद्धाचे विशेषण होते. कृष्णाविषयी अजून एक विचारात घेण्याजोगी गोष्ट आहे, की त्याचे प्रमुख हत्यार चक्र हे होते. वैदिक वाङ्‌मयात हे हत्यार आढळत नाही. बुद्धोत्तर काळातही हे हत्यार आढळत नाही. पण इ. स. पूर्व 800च्या सुमारासच्या मिर्झापूर येथील एका गुहेत चक्रधारी योद्धा रथी म्हणून दाखविलेला आढळतो. तेव्हा चक्र हे हत्यार वेदोत्तर व बुद्धपूर्व काळात आले आणि गेले असावे.

संदर्भ ः
अभिवादन - नरहर कुरुंदकर, इंद्रायणी साहित्य 1987
या पुस्तकातील "मूक्त मयुरांची भारते' आणि "प्रो. कोसंबी आणि महाभारत' हे दोन लेख.