ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोप

आपल्या संस्कृतीत काम हा पुरुषार्थ मानला गेलेला असला, तरी त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी भल्तीच विचित्र, विकृत असते. त्यात पुन्हा एकपत्नीव्रत आणि पतिव्रता वगैरेंचे ओझेही आपल्या सामाजिक मानगुटीवर असतेच. (यावर काही लोक म्हणतील, की या पवित्र भावना तुम्हाला ओझे वाटतात म्हणजे भल्तेच! या पवित्र गोष्टी नसतील तर मग आपल्या पवित्र संस्कृतीचे व पवित्र कुटुंबसंस्थेचे कसे होणार? तर स‌भ्य स्त्री-पुरुषहो, तसे काही होत नसते. एक स्त्री कुलवधू असण्याच्या काळातही समाज रसरशीत होताच! वाचा - भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - विकार-विचारप्रदर्शनांच्या साधनांची उत्क्रांती इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, लोकवाड्मयगृह, पाने - 118, मूल्य - 50 रु.)

आता हे स‌र्व असे असल्याने होते काय, की एखाद्याची बदनामी करायची म्हटल्यावर त्याच्या कामजीवनाबाबत नसत्या गप्पा पसरवायच्या, की झाले काम सोपे, हे आपण अनुभवाने शिकलेलो आहोत. व आपण एक स‌माज म्हणून अशा बाबतीत चांगलीच महारत मिळविलेली आहे, हे इतिहासात जाऊन पाहिले की लख्खपणे लक्षात येते. 'गीतारहस्य'कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या थोर माणसालाही अस‌ले किटाळ स‌हन करावे लागले होते. त्यांच्यावर चक्क बलात्काराचा आरोप झाला होता, अगदी न्यायालयात झाला होता आणि तो अर्थातच साफ खोटा होता.

लोकमान्यांच्या आयुष्यात त्यांना मनःस्ताप देणारी अनेक प्रकरणे येतात. ताईमहाराज प्रकरण हे त्यातलेच एक. याच खटल्यात त्यांच्यावर हा बलात्काराचा आरोप झाला होता. त्यात जाण्यापूर्वी हे ताईमहाराज प्रकरण काय होते ते थोडक्यात पाहू या...

लोकमान्य टिळकांचे एक स्नेही होते वासुदेव हरी ऊर्फ बाबामहाराज पंडित. हे पुण्यात राहात असत. त्यांना मुंबई स‌रकारने पहिल्या वर्गाचे स‌रदार म्हणून मान्यता दिलेली होती. ही आसामी चांगलीच श्रीमंत होती. पुणे, बेळगाव, सोलापूर या जिल्ह्यांत, तसेच कोल्हापूर संस्थानात त्यांच्या मालकीची मालमत्ता, जमीनजुमला विखुरलेला होता. पहिल्या पत्नीच्या अकाली निधनानंतर बाबामहाराजांनी सिन्नरकर नावाच्या एका पुस्तकविक्रेत्याच्या रुपवान मुलीशी लग्न केले. त्यांचे नाव स‌कवारबाई ऊर्फ ताईमहाराज. त्यांना शांताक्का नावाची मुलगी होती. 7 ऑगस्ट 1897 रोजी बाबामहाराजांचे कॉल-याने निधन झाले. तेव्हा ताईमहाराज गरोदर होत्या व त्यांना मुलगा होईल व आपल्या संपत्तीस वारस मिळेल, अशी मृत्युशय्येवर पडलेल्या बाबामहाराजांना आशा होती.

बाबामहाराज कॉल-याने आजारी पडल्याचे स‌मजल्यावर लोकमान्य त्यांना भेटावयास गेले. त्यांनी बाबामहाराजांना मृत्युपत्र करण्याचा स‌ल्ला दिला. आपल्यामागे आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त नेमणे आवश्यक आहे, असे बाबामहाराजांना वाटले. त्यांनी टिळकांना त्यासाठी गळ घातली. मित्राचे मन राखण्यासाठी टिळकांनी त्याला होकार दिला व बाबामहाराजांच्या इच्छेनुसार टिळकांप्रमाणेच बाबामहाराजांचे व्याही दादासाहेब ऊर्फ गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद स‌खाराम कुंभोजकर व बळवंत मार्तंड नागपूरकर हे विश्वस्त बनले. 7 ऑगस्ट 1897 रोजी स‌काळी बाबामहाराजांनी मृत्युपत्र तयार केले. त्याचा मजकूर टिळकांनीच सांगितला. त्यात म्हटले होते, "आमचे कुटुंब सौ. स‌कवारबाई हल्ली गरोदर आहे. तीस पुत्र न झाल्यास किंवा होऊन तो अल्पायुषी झाल्यास आमचे घराण्याचे नाव चालविण्याकरिता यथाशास्त्र जरूर लागेल तितक्या वेळेस आमचे कुटुंबाचे मांडीवर दत्तक वर लिहिलेल्या गृहस्थांच्या विचारे देऊन त्या मुलाचे वतीने तो वयात येईपर्यंत स‌दर पंचांनी (ट्रस्टी) स्थावर-जंगम इस्टेटीची व्यवस्था करावी."

त्यानंतर 18 जानेवारी 1898 रोजी मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे ताईमहाराजांनी शक्यतो आपल्या नात्यातल्या एखाद्या मुलास दत्तक घ्यावे असा विचार पुढे आला. बाबामहाराजांची मालमत्ता मोठी. बाई एकटी. तिला मुलगा नाही. तशात ती हलक्या कानाची. अशा परिस्थितीत तिच्याभोवती लोभी नातेवाईकांचे कोंडाळे न जमते तर नवलच. पण या नातेवाईकांना दूर सारून टिळक व अन्य विश्वस्तांनी, पंडित घराण्याच्या एका शाखेतील एका लहान मुलास दत्तक म्हणून निवडले. ताईमहाराजांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. हा मुलगा औरंगाबादजवळच्या निघोने गावचा होता. ठरल्यानुसार ताईमहाराज आनंदाने विश्वस्तांसह तेथे गेल्या व तेथे दत्तकविधान स‌मारंभ पार पडला.

पण पंडितांचे नातेवाईक गप्प बसणारे नव्हते. नागपूरकर हे विश्वस्त त्यांना सामील होते. त्यांनी ताईमहाराजांचे कान फुंकण्यास सुरूवात केली, की हा लहान मुलगा दत्तक घेऊन तुम्हांस काहीही फायदा होणार नाही. कारण तो स‌ज्ञान होईपर्यंत मालमत्तेवर विश्वस्तांचे नियंत्रण राहणार. त्यापेक्षा तुम्ही जर पंडित घराण्याच्या कोल्हापूर शाखेतील बाळामहाराज यांना दत्तक घेतले, तर किमान तीस हजाराचे दागिने वगैरे त्यांच्या हाती येतील. ते ऎकून ताईमहाराजांची मती फिरली. त्यांनी बाळामहाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. त्यास कोल्हापूर दरबारचा पाठिंबाही मिळविला. पण टिळकांनी हे दत्तकविधान बेकायदेशीर असल्याने ते थोपविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी कोर्टापासून पुण्याच्या तालिमबाज पठ्ठ्यांपर्यंत स‌र्वांची मदत त्यांनी घेतली. पण अखेर हा दत्तकसमांरभ पुण्याऎवजी कोल्हापूरात झालाच. त्यास शाहू छत्रपती उपस्थित होते. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी शाहू छत्रपती विरोधी बाजू घेतल्याने या प्रकरणात छत्रपतींनी टिळकांच्या विरोधी भूमिका घेतली, एवढाच याचा अर्थ.

या दत्तकविधानाविरोधात टिळकांनी 23 स‌प्टेंबर 1901 रोजी पुण्याच्या प्रथमवर्ग स‌बजज्जांच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. वास्तविक या खटल्यात टिळकांची बाजू अतिशय कमकुवत होती आणि त्याचे एकमेव कारण हेच होते, की न्यायाधीशापासून स‌रकारपर्यंत स‌गळेच त्यांच्याविरोधात होते. या न्यायाधीश अस्टनने तर, खोटी साक्ष देणे, बनावट दस्तऎवज व खोटा पुरावा तयार करून फसवणूक करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे वगैरे टिळकांवरील गंभीर आरोपांबाबत पोलिस चौकशी करून त्यांच्यावर खटला भरावा अशी जोरदार शिफारस स‌रकारला केली. त्यानुसार टिळकांवर फौजदारी खटला भरण्यात आला आणि त्यात 24 ऑगस्ट 1903 रोजी टिळकांना दीड वर्षांची स‌क्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. त्याविरोधात अर्थातच टिळक अपिलात गेले आणि अखरे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. नंतर दिवाणी खटल्यातही टिळकांच्याच बाजूने निकाल लागला. 31 जुलै 1906 रोजी जव्हेरीलाल ठाकोर या न्यायाधीशाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला. त्यावरोधात विरोधी पक्षाने उच्च न्यायलयात अपिल केले. त्यात टिळक हरले. मग ते प्रीव्ही कौन्सिलमध्ये गेले व तेथे जिंकले. बाबामहाराज पंडितांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी या खटल्यांच्या पायी टिळकांना कर्जबाजारी व्हावे लागले.

तर टिळकांवरील या फौजदारी खटल्यात पुरावा म्हणून एक पत्र सादर करण्यात आले होते. ''औरंगाबाद येथील मुक्कामात टिळकांनी ताईमहाराजांवर बलात्कार केला" असा आरोप त्या पत्रात करण्यात आला होता. विशेष म्हणजे खुद्द ताईमहाराज आणि त्याची ब्राह्मण सेविका गोदूबाई यांनी न्यायालयात तसे सूचित व्हावे अशा त-हेने साक्ष दिली होती. टिळक-चरित्रकार तात्यासाहेब केळकर सांगतात, "या जबान्या झाल्या त्या दिवशी कोर्टातून घरी आल्यावर टिळक रागाने लाल झाले होते की तस‌े लाल झालेले एरवी कोणी केव्हा पाहिले नव्हते. ते इतकेच म्हणाले की 'एखादी बाजारबसवी स्त्रीदेखील आपली बेअब्रू आपल्या तोंडाने कबूल करीत नाही, झाकून ठेवते पण एवढ्या मोठ्या स‌रदार घराण्यातील ही स्त्री निष्कारण आपली बेअब्रू आपल्या तोंडाने खोटे बोलून दाखविते तेव्हा तिचा धिक्कार असो.'" (पृ. 151)

टिळकांनी बलात्कार केल्याची ताईमहाराजांनी दिलेली साक्ष खोटीच होती. त्यांचे पत्रही बनावट होते. हे न्यायालयात स‌िद्धही झाले. ही पंडितमहाराज आणि नागपूरकर यांनी खेळलेली एक तेढी चाल होती, हेही लोकांच्या तेव्हा लक्षात आले.

या घाणेरड्या व खोट्या आरोपांनी टिळकांच्या चरित्रावर डाग पडावा एवढे त्यांचे चारित्र्य हलके नव्हते. यातून एकच दिसले, की स‌माजवंद्य माणूस लोकांच्या मनातून उतरावा यासाठी त्याचे चारित्र्यहनन करण्याची चाल विरोधक खेळतात, यातून टिळकही सुटले नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, या दृष्टीने तो काळही आजच्या पेक्षा काही फार वेगळा नव्हता.

संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती, 1986, पृष्ठ - 102 ते 138 व 151.

19 comments:

सर्किट said...

१९०६ च्या निकालानंतरही २ कोर्टांची चढऊतार टिळकांना करावी लागली. म्हणजे विषय पूर्णपणे मिटेपर्यंत १९१० उजाडले असणारच. १८९७ ते १९१० - टिळकांच्या आयुष्यातली मोलाची १३ वर्षे बाबामहाराज आणि ताईमहाराज ह्या बिनमहत्त्वाच्या मूर्खांच्या लफ़ड्यांत वाया गेली. त्यापेक्षा ताईंचं ते पहिलंच पोर जगलं असतं, किंवा टिळक ट्रस्टी बनण्याच्या गळ घालण्यापुढे नमले नसते, तर त्या १३ वर्षांत त्यांची बहुमोल एनर्जी आणि वेळ भारताच्या आणि स्वातंत्र्याच्या सत्कारणी लागला असता!

Anonymous said...

See Please Here

sada said...

junya bhangadi shodhun kay upyog ?
lokana sudhava tyanchya dokyat shanshayacha kida sodu naka!
deshat sagalikade hech udyog suru ahet.

Anonymous said...

sadoba,
bhaltech buva tumhi vinodi.
ani tumhala deshachi kiti buva kalji!
pan amchya dokyat ek sanshyacha kida alay, ki tumhala itihas kashashi khatat te mahit ahe ka? itihas ka janun ghyaycha asto tyachi janiv ahe ka? ki ugach uchalali jeebh ani lavli talyala, sadoba!
- pankaj

Multifuncional said...

Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Impressora e Multifuncional, I hope you enjoy. The address is http://impressora-multifuncional.blogspot.com. A hug.

शमिन् said...

तुमचे सर्व लेखन वाचले. अतिशय चांगले अाहे. खूप खूप लिहा. अशा लेखनाची गरज अाहे.
अभिनंदन!

P K Phadnis said...

हे विषय जुने झाले हे खरे पण तरीहि आपण ते व्यवस्थित मांडत आहात त्याबद्दल अभिनंदन. एखाद्या वादग्रस्त विषयावर लिहिताना एकाच पुस्तकावर विसंबून राहण्याऐवजी काही इतर संदर्भहि वाचून पहावे असे सुचवले तर राग मानू नये.

Hemant said...

15 divas zale ajun 1hi navi post nahi?

kuthe gayab zala ho visoba shetha

Lokmanya nasatya uchapatita adakale mhanun bar nahitar jati bhedacha bawata changalach miravala asata

P K Phadnis said...

विसोबा तुम्ही कोठे गुल झालात?

आजानुकर्ण said...

विसोबा कुठे गेलात??

Andy said...

विसोबा kaka कुठे गेलात??

Waman Parulekar said...

विसोबा कुठे गेलात??

Anonymous said...

visoba, are you allright ?

Pavan V. said...

मला एक अशी लिंक मिळाली आहे ज्यामध्ये गांधीजींच्या म्रुत्युवर प्रश्नचिन्हा उभे केले आहे.
http://hindi.webdunia.com/news/news/mpchg/0908/11/1090811009_1.htm

Anonymous said...

लेख चांगला आहे , पुस्तक देखील वाचण्यात आले आहे परंतु लेखकाने कुठे ही हे दिलेले नाहीए की कोल्हापुरच्या बाळ महाराजना दत्तक घ्यायला टिळकणी का विरोध केला? नात्या तलाच योग्या असा कुठेही नियम नक्कीच नाही , परत तो मुलगा ताई साहेब ह्याचा मुलगा म्हणून जगणार होता मग आईचे मन लक्षात घ्यायचे का? विश्वस्तांचे ? मित्र महत्वाचा का मायतची बायको? विश्वातनी फक्त दत्तक मूळ घेतल्या नंतर कारभारची पाहणी करणे जास्त अपेक्षित आहे ना की कोणता मुलगा घ्यायचा ह्यावरून मत प्रदर्शन करण्यात

सुबोध केंभावी said...

टिळकांवरील मजकूर वाचला. छान लिहिलाय...अशा लिखाणाची गरज आहे. बदनामी-तंत्र फार प्रचीन काळापासून वापरले जाते आहे हे खरेच आहे. टिळकांच्या लढाऊपणाची खरच कमाल आहे....सुबोध केंभावी

the Bhalerao said...

इंग्रजांच्या न्याय व्यवस्थेचेही इथे दर्शन होते. वरच्या कोर्टात टिळक क्रमाने जिंकतात व हरतात.नशीब इथे ताईमहाराजांची जात दिलेली नाही. नाही तर संभाजी ब्रिगेड सारखे दांडगे परत टिळकांची ब्राह्मण जात काढून मोडतोड करते.पवार कुटुंबातला एकजण तीन चार वर्षांपूर्वी पुण्यात आला होता.त्याचा दावा होता की तो एक दत्तक पुत्र असून ब्रिटनचा रहिवासी आहे. टिळकांच्या इतिहासाने ताईमहाराजांची दखल घेतली.पण पवारांच्या इतिहासात असे कोणी दखल घेणे असंभवनीय.ह्यावरून जातींची दहशत समजून येते.

मंदार जोशी said...

इतिहासातल्या थोर पुरुषांची बरीच शक्ती, पैसा, आणि वेळ स्वकियांशीच लढण्यात गेली हे सर्वात मोठे दुर्दैव

Anonymous said...

माझा ब्रिटिश न्याया व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे