मराठेशाहीतील मद्यपानविषयक धोरण

मराठी राज्यात जे लोक दारू करून विकत असत त्यांना कलाल म्हणत. खाटीक किंवा तत्सम लोक दारूच्या भट्ट्या लावीत, दारू बनवित व कलाल तिची विक्री करी. हे दारूविक्रीचे काम सरकारी परवान्यानेच होत असे.

शिवकालात द्राक्षाची किंवा मोहाची दारू पीत असत. पण दारूची दुकाने तुरळक होती व त्यावर कोतवालाची व इतर सरकारी अधिकाऱ्यांची करडी नजर असे. गावात अगर चार गावाकरिता एक असे गावाबाहेर कलालाचे दुकान असे. कोणी व्यक्ती दारू पिऊन धुंद झालेली रस्त्यात किंवा वाड्यात दृष्टीस पडल्यास त्यास सरकार मोठे शासन करीत असे.

शिवकालात बहुतेक अष्टप्रधान विद्वान ब्राह्मण असत. त्यांनी मराठी राज्यात दारू पिण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी, पिणाऱ्यास जबर दंडाची व फटक्‍याची कडक शिक्षा करण्यासाठी राजाकडून हुकूम काढविले होते. सैनिकांवर शराबी पिण्याची बंदी होती. (आज्ञापत्र, विविध ज्ञान विस्तार माला 1923, पृ. 29)

थोरले माधवराव पेशवे यांनी न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्या सांगण्यावरून दारूविषयी तपशीलवार नियम करून ठेविले होते. पेशव्यांचे सरदार व जहागिरदार यांनी आपल्या अंकित प्रदेशांतील शहरात दारू विकू नये, अशी अट सरंजाम देताना घालण्यात येई....

दारूच्या फुलाची भट्टी लावून फूल सरकारी कारखान्याचे कामास नेण्यास व दारूची भट्टी जेजुरीस चालविण्यास छाट वा खाटकास सरकारकडून इ. स. 1778 त परवाना जिलेला आढळतो. (भा. इ. सं. मं. जाने-जुलै 1950, ले. 11) सरकारात या दारूभट्टीची रक्कम जमा झालेली दिसते. (पेशवाईच्या सावलीत, चापेकर, पृ. 41) दारू पिण्याचा गुन्हा करणारे सापडल्यावर सरकारने दारूच्या भट्ट्या मना करण्यासाठी व कलालांना म्हणजे दारूविक्री करणाऱ्या दुकानदारांस दारूविक्री बंद करण्याचे हुकूम काढले. ह्या हुकुमाची अंमलबजावणीही त्वरित करण्यात आली. त्यावेळेपासून सरकारच्या भीतीमुळे मराठी राज्यात दारू पिणे व त्यापासून उत्पन्न मिळविणे या बाबी बंद झाल्या....

पण पैसा मिळविण्याच्या लालसेने चोरून दारूचा साठा करून विकणे चालत असे. असे साठे व चोरटी दुकाने हुडकून काढण्यासाठी नाना फडणिसाने फिरस्ते प्यादे ठेवले होते. अशा एका पथकास 1776 त नारायण पेठेतील म्हातारी द्रविड ब्राह्मण हिच्या घरी दारूने भरलेले वीस-पंचवीस शिसे व त्याजबरोबर खाण्यासाठी शिजविलेले मांस सापडले. ते जप्त करून तिला शासन करण्यात आले. (पेशवे दप्तर 43, ले. 144)

ैजे पेठ पारगाव, तालुका खेड सरकार जुन्नर येथील बाळाजी धोंडदेव कुळकर्णी हा ब्राह्मण कलावंतिणीसमागमे गमन, मांसभक्षण व सुरापान करण्यात अट्टल निघाला. त्यास पंक्तीबाह्य केले व पुण्यातील ब्रह्मवृंदांनी एकत्र येऊन पृथ्वीप्रदक्षिणा व तीर्थस्नाने असे प्रायश्‍चित्त सांगितले. (पे.द. भा. 40, ले. 144)

पेशव्यांच्या कारकीर्दीत ब्राह्मणांनी दारू पिऊ नये असा शासनाचा दंडक होता. दारू पिणाऱ्या ब्राह्मणांना कैद करून किल्ल्यावर पाठवीत असत. नाशिक येथील ब्राह्मणवृंद मद्यपान करतात, त्यात त्यांचा धर्माधिकारीही सामील आहे, हे वृत्त सवाई माधवराव पेशव्यांच्या कानी येताच त्यांनी सर्वोत्तम शंकर नावाच्या खास अधिकाऱ्यास नाशिकला याची चौकशी करण्यास पाठविले आणि आज्ञा दिली, की धर्माधिकारी यात सापडले त्यांचे धर्माधिकारीपण (वतन) जप्त करावे व सरसुभ्याचे हिशेबी जमा करावे. तसेच गुन्हेगार ब्राह्मणास अटक करून त्यांना पक्‍क्‍या बंदोबस्ताने घोडप, पटा व मुल्हेर या किल्ल्यांवर अटकेत ठेवण्यास पाठविणे. (सवाई माधवराव रोजनिशी, भा. 3(8), पृ. 120)

(हा स‌र्व मजकूर महाष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, (म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988) या पुस्तकातून घेतला आहे.)

तुकारामांनी शिवरायांना रामदासांकडे पाठविले हे खरे आहे काय?

समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या संबंधांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते, तेव्हा तेव्हा समर्थभक्तांकडून तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा दाखला दिला जातो. तसे शिव-स‌मर्थांची शके 1571 (स‌न 1650) पूर्वी भेट झाल्याचे अनेक पुरावे दिले जातात. पण त्यातही तुकारामांचा हा 15 ओव्यांचा अभंग महत्त्वाचा. कारण जेव्हा संतशिरोमणी तुकाराम महाराज शिवबांना समर्थांकडे 'मन लावा वेगी' असे सांगतात, तेव्हा त्यातून समर्थांच्या थोरवीवर आपसूकच शिक्कामोर्तब होत असते. शिवाय तुकाराम महाराजांचे निधन जानेवारी 1650 मध्ये झाले, याचा अर्थ त्यांनी रामदासांना शिवाजी महाराजांकडे पाठविले ते तत्पूर्वी. म्हणजे रामदास आणि शिवराय यांची भेट 1650 ला वा त्याआधी झाली हे सिद्धच झाले. तेव्हा हा अभंग महत्त्वाचा.

या अभंगातील पहिल्या तीन ओव्या अशा आहेत -

"राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ।।1।।
रामदास स्वामी सोयरा स‌ज्जन । त्यासी तनमन अर्पीबापा ।।2।।
मारुती अवतार स्वामी प्रकटला । उपदेश केला तूज लागी ।।3।।"

या अभंगाविषयी बोलण्यापूर्वी तुकाराम महाराजांची जी अभंगवाणी आज उपलब्ध व प्रकाशित झालेली आहे, त्याविषयी माहिती घेणे योग्य ठरेल.

तुकारामांचा जन्म देहू या लहानशा खेड्यात इ. स. 1608 मध्ये झाला. त्यांची आई कनकाई आणि वडिल वाल्होबा ऊर्फ बोल्होबा. त्यांचे आंबिले ऊर्फ मोरे घराणे मोठे प्रतिष्ठित होते. त्यांच्याकडे गावाची मानाची महाजनकी होती. जानेवारी 1650 मध्ये तुकारामांचा मृत्यू झाला. ते कसे गेले हे एक गूढच आहे. ते स‌देह वैकुंठाला गेले एथपासून त्यांचा खून झाला येथपर्यंत बरेच प्रवाद आहेत. आपल्या या 42 वर्षांच्या आयुष्यात तुकारामांनी किमान साडेचार हजार कविता केल्या! या कविता वह्यांमध्ये लिहून ठेवलेल्या होत्या. त्या एवढ्या जहाल, एवढ्या मर्माघाती की तेव्हाच्या सनातनी ब्राह्मणवृंदाला त्या नष्ट करण्यातच आपले सौख्य सामावले आहे, असे वाटू लागले. तुकारामांना जलदिव्य करावे लागले ते यातून. तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित व कोरड्या वर आल्या असे समजल्यावर भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांची पाने लुटून नेल्याचे तुकारामांचे चरित्रकार महिपती सांगतात. याचा अर्थ महाराजांनी जरी आपले अभंग स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले असले, तरी त्यांच्या हातची पूर्ण संहिता शिल्लक राहिलेली नाही. आज त्यांच्या हातचे स‌मजले जाणारे एकुलते एक हस्तलिखित देहू देवस्थानच्या संग्रहात आहे.

मग प्रश्न निर्माण होतो, की तुकारामांचा गाथा सिद्ध झाला तो कसा?

तुकारामांच्या वह्यांची पाने लोकांनी प्रसाद म्हणून नेली, असे असले, तरी तुकारामांचे लेखक संताजी तेली जगनाडे आणि संताजींचे चिरंजीव बाळोजी यांनी लिहून ठेवलेले दोन हजार अभंग होतेच. त्यातील संताजीच्या हातचे तेराशे अभंग पुढे वि. ल. भावे यांनी प्रकाशित केले. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे. पण ही संपूर्ण जगनाडे संहिता पाहिली, तरी त्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्याहूनही अधिक अभंग नाहीत.

महाराजांच्या वैकुंठगमनानंतर थोड्याच दिवसांनी कचेश्वर भट ब्रह्मे चाकणकर हे तुकारामांचे पुत्र नारायणबाबा यांना भेटले. कचेश्वर भट हे तुकोबांचा वेध लागलेले ब्राह्मण. तुकारामांचे अभंग लिहून घ्यायचे, ते पाठ करायचे आणि त्याआधारे कीर्तने करायची, असे ठरवून ते नारायणबाबांकडे खेडला गेले होते. काही अभंग लिहून द्या अशी विनंती त्यांनी नारायणबाबांना केली. त्यावर नारायणबाबांनी त्यांना सांगितले, की "अंबाजीचे घर । तेथे जावे । स‌र्वही संग्रह तुकोबाच्या वह्या । जावे लवलाह्या तुम्ही तेथे ।।" त्यानुसार कचेश्वर भट देहूला गेले. अंबाजी ऊर्फ आबाजी हे तुकारामांचे नातू, महादेवबाबांचे म्हणजे तुकारामांच्या थोरल्या मुलाचे चिरंजीव. त्यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून अभंग मिळविले. म्हणजे तुकारामांच्या वंशजांकडे अभंगांची संहिता होती. ती वंशपरंपरेने पुढे चालत आली.

पुढे इंग्रज अमदानीत इंदुप्रकाश प्रेसचे जनार्दन स‌खाराम गाडगीळ यांनी गाथा छापायचे ठरविले. तत्कालीन डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन स‌र अलेक्झांडर ग्रँट यांच्या शिफारशीवरून स‌रकारने त्यांना 24 हजार रूपये मंजूर केले. या गाथ्याच्या संपादनाची जबाबदारी शंकर पांडुरंग पंडित आणि विष्णु परशुराम पंडित यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी संपादनासाठी देहू, तळेगाव व कडूस येथील प्रती वापरल्या. पंडितांनी तुकारामा महाराजांच्या तत्कालीन वंशजांकडून देहू हस्तलिखित नेले. ते महाराजांचे ज्येष्ठ पुत्र महादेवबाबा यांच्या हातचे असल्याचे संपादकांना सांगण्यात आले होते. पंडितांनी हे हस्तलिखित नेले पण नंतर ते देहूला परत आलेच नाही. ते गहाळ झाले.

हा इंदुप्रकाश अथवा पंडिती गाथा देहू हस्तलिखितावर आधारित असला, तरी तो काही देहू प्रतीवरून जसाच्या तसा छापलेला नाही. परंतु पंडितांनी त्यांना अस्वीकारार्य वाटलेले देहूप्रतीतील पाठ त्यात तळटीपा देऊन नोंदविले होते. पुढे या न स्वीकारलेल्या पाठांची त्यांची मूळ संहितेतील मूळ ठिकाणी पुनःस्थापना करून देहू प्रतीची पुनर्रचना करण्याचे काम देहू देवस्थानने केले व तो गाथा तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाच्या त्रिशतकोत्तर सुवर्णसोहळा वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित केला.

तर अशा रितीने, संशोधन करून मूळ देहू प्रत - जी तुकारामांच्या घरात वंशपरंपरेने चालत आली - तिची पुनर्रचना करण्यात आली. या प्रतीमध्ये प्रचलित पंढरपूरकेंद्रित प्रतीपेक्षा जास्त अभंग आहेत, हे विशेष. या प्रतीची सिद्धता करताना पंडितांनी घेतलेले काही अभंग वगळण्याची वेळ एकदाच आली. आणि ती आली - "शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखालील अभंगांच्या बाबतीत!

आता येथून तुकाराम-रामदास-शिवाजी यांच्या संबंधीच्या अभंगाकडे आपण येतो.

"शिवाजी राजे यांचे स्वामीस अबदागिरी घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले, ते अभंग" या मथळ्याखाली पंडिती प्रतीत 14 अभंग येतात. त्यातील नऊ अभंग पंढरपूर प्रतीत व वारक-यांमध्ये प्रचलित असलेल्या अन्य प्रतींत आढळतात. पंडिती प्रतीतील बाकीचे पाच अभंग सरळसरळ उत्तरकालीन प्रक्षेप आहेत!

महाराष्ट्र शासनाच्या आवृत्तीत 1886 ते 1890 या क्रमांकाने आलेले हे ते पाच अभंग. ते प्रक्षेपीत आहेत हे कशावरून?

या प्रतीचे संपादक रा. रा. स‌दानंद मोरे आणि रा. रा. दिलीप धोंडे सांगतात, की त्यातील तुकाराम महाराजांचे स्वतःविषयीचे उल्लेख त्यांच्या स्वरूपाशी व विचारांशी विसंगत आहेत. दुसरी गोष्ट अशी, की ज्या कोणी रामदासभक्ताने हेतुतः किंवा स‌द् भावनेने हे अभंग रचले तो इतिहासविषयक पूर्ण अडाणी असल्याने त्याने या अभंगांमध्ये अष्टप्रधानांचा उल्लेख करताना शिवोत्तरकालीन राजाज्ञा, प्रतिनिधी अशा अधिका-यांचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे, तर 1650 पर्यंत ज्याला शिवरायाचे नाव माहित असणे सूतराम शक्य नव्हते तो भूषण कवी शिवदरबारात आणून त्याने बसविला आहे. सुमंत व डबीर ही एकाच पदाची दोन भाषांमधील नावे. पण या रामदासभक्तांनी ती दोन पदनामे मानली आहेत. भूषण कवीप्रमाणेच त्यांनी राज्यव्यवहारकोशकर्ते रघुनाथपंत यांनाही 1650 पूर्वी पुणे परिसरात दाखल केले आहे.

आता प्रश्न असा येतो, की या रचना जर रामदासभक्तांच्या, तर त्या देहू वा तळेगाव प्रतीत आल्या कशा? रा. रा. मोरे व रा. रा. धोंडे याच्या दोन शक्यता सांगतात. एक म्हणजे देहू प्रतीची नक्कल त्र्यंबक कासार या तुकारामभक्ताने (तुकारामांच्या वैकुंठगमनानंतर शंभर वर्षांनी) केली. त्यांनी एखाद्या रामदासी बाडातून हे अभंग आपल्या तळेगाव प्रतीत स‌माविष्ट केले असतील. तेथून ते मूळ देहू प्रतीत नकलून घेण्यात आले असतील. देहू प्रतीत मुळाला सोडून वेगळ्या पाठांचा स‌मावेश (मूळ पाठ खोडून) झालेले दिसून येतात. हे उत्तरकालीन देहूकरांचे काम. दुसरी शक्यता म्हणजे अशाच एखाद्या उत्तरकालीन देहूकराने रामदासी प्रक्षेप देहू प्रतीत सामावून घेतले असतील. तेथून ते त्र्यंबक कासार यांच्या वहीत नकलले गेले.

हेच अभंग चिटणीसांच्या बखरीत शिवाजी-तुकाराम भेटीचा प्रसंग सांगताना येतात. यावरून या अभंगांची निर्मिती कशी झाली असावी, यावर प्रकाश पडू शकतो. मल्हार रामराव चिटणीस हे अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या संधिकाळात होऊन गेलेले शिवशाहीचे बखरकार. त्यांचा समर्थ संप्रदायाशी निकटचा संबंध होता. खुद्द सांप्रदायिक बखरकार हनुमंतस्वामी आणि चाफळ संस्थानाधिकारी रंगो लक्ष्मण मेढे व चिटणीस हे एकत्र लिखाण करीत. त्यांनी शिव-समर्थांच्या भेटीचे वर्णन करताना हे अभंग लिहिले असतील अशीही एक शक्यता आहे. त्यांनी केले, ते अर्थातच प्रामाणिकपणे, स‌मर्थांचा महिमा वाढविण्यासाठी. पण साता-याच्या दरबारात प्रचलित असलेली, पण शिवकाळात मुळातच नसलेली अधिकारपदे त्यांच्या अडाणीपणामुळे अभंगात आली आणि त्यामुळे प्रक्षेप ओळखणे सोपे गेले.

तुकारामांनी शिवरायांनी पाठविलेले धन, मानसन्मान नाकारले हे खरे, पण ते करताना त्यांनी शिवरायांनी समर्थांकडे जाण्यास सांगितले, असे मात्र नाही, हे यावरून स्पष्ट होते.

संदर्भ -
- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा (श्री क्षेत्र देहू येथील तुकाराम महाराजांच्या वंशजांकडील प्राचीन हस्तलिखितावरून सिद्ध केलेली संहिता) - संपा. स‌दानंद मोरे आणि दिलीप धोंडे, प्रकाशक - विश्वस्त मंडळ, श्री विठोबा-रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, द्वितीय आवृत्ती जाने. 2001.

- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपा. भालचंद्र नेमाडे, साहित्य अकादेमी, पहिली आवृत्ती 2004.

बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी

जोधा-अकबर, सलीम-अनारकली या दोन्ही प्रेमकहाण्यांमध्ये एक साम्य आहे. या कहाण्यांमधील दोन्ही स्त्रीपात्रे खरोखरीच होऊन गेली की काय याबद्दल शंका आहे. जोधाबाई ही अकबराची पत्नी की सून असा वाद आहेच. पण गंमत म्हणजे अनारकली ही सलीमची प्रेयसी की "आई' असाही एक वाद आहे. अशी कथा सांगितली जाते, की अनारकली ही अकबराच्या जनानखान्यातली एक बॉंदी. तिचा दर्जा अकबराच्या पत्नीसमान. पण सलीमसाहेब तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे अकबर संतापला. पण या कथेला तसा काही अस्सल आधार नाही. ते काहीही असो. या प्रेमकहाण्यांनी येथील लोकमानसावर राज्य केले हे खरे.

मराठी मुलखात घडलेली अशीच एक प्रेमकहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा. ही कहाणी बाकी अस्सल आहे आणि अव्वलही!
खरेतर ही एक शोकांतिकाच म्हणायची. एक ब्राह्मण पेशवा, एक स्वरुपसुंदर मुस्लिम तरूणी, स्वरुपसुंदर म्हणजे किती, की इतकी गोरी, इतकी गोरी, की खाल्लेले पान ज्याच्या सुरईदार गळ्यातून उतरताना दिसायचे! (ही अर्थातच एक दंतकथा.) आणि ते पेशवाईतलं वातावरण! जणू या कहाणीच्या मुळातच शोकांतिकेची बिजं होती...

मस्तानी ही बाजीरावाला मिळाली ती भेट म्हणून! बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल बुंदेला. त्याला बाजीरावाने मोगलांच्या तडाख्यातून वाचविले. तेव्हा कृतज्ञतेने त्याने बाजीरावांना बिदागी दिल्या. त्यात ही मस्तानी नावाची नृत्यांगना होती. (मस्तानी छत्रसालास त्याच्या पर्शियन पत्नीपासून झालेली मुलगी असल्याचेही स‌ांगितले जाते.) बाजीरावाने मात्र तिला मानाने वागविले. त्यांनी तिला पत्नी मानून शनिवारवाड्यात आणले. तेथे तिच्यासाठी मस्तानी महाल बांधला. त्या महालात ती राहात असे. बाजीरावांचा तिच्यावर जेवढा जीव होता, तेवढेच तिचेही त्यांच्यावर प्रेम होते. ती त्यांची सर्वप्रकारे काळजी घेत असे. असे सांगतात, की बाजीराव स्वारीवर असताना ती घोड्यावर स्वार होऊन बाजीरावाबरोबर तेवढ्याच वेगाने दौडत चाले. मस्तानी नृत्यनुपुण होता. शनिवारवाड्यात गणेशचतुर्थीस तिचा नृत्यगायनाचा कार्यक्रम होत असे.

नानासाहेब पेशव्याचे लग्न सन 1730 त झाले. त्यावेळच्या खर्चाच्या हिशोबात तिच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. (पेशवे दप्तर 30, ले. 363)

इ. स. 1734 मध्ये बाजीरावापासून तिला पुत्ररत्न झाले. (मराठी रियासत, बाजीराव, पृ. 403) त्याचे नाव समशेरबहाद्दर असे ठेवण्यात आले. हा पुढे पेशव्यांच्या फौजेत खासा सरदार म्हणून वावरला. पेशव्यांच्या मुलाबरोबरच त्याचेही शिक्षण झाले. पेशव्यांच्या अनेक मोहिमात राहून त्याने मराठी राज्याची सेवा उत्कृष्ट बजावली. तो पानिपती कामास आला.

मस्तानी बाजीरावांबरोबर पत्नी म्हणून वावरू लागल्यामुळे पेशव्यांच्या घरात तिच्याविरुद्ध कलह सुरू झाला.. पेशव्यांची आई राधाबाई, भाऊ चिमाजी अप्पा आणि चिरंजीव नानासाहेब या तिघांचा मस्तानीने बाजीरावाबरोबर राहण्यास विरोध होता. बाजीरावाने तिचा नाद सोडून द्यावा म्हणून चिमाजी अप्पा व मातोश्रीने फार प्रयत्न केले. पण बाजीरावाने त्या गोष्टीस सरळ नकार दिला. डिसेंबर 1739 मध्ये तर आपल्याबरोबर ही मंडळी मस्तानीस स्वारीस पाठवित नाहीत याचा राग येऊन वैतागून बाजीराव नासिरजंगावरील स्वारीवर गेले. ते स्वारीवर असतानाच पेशव्यांच्या घरी पुण्यास मुलांच्या मुंजी झाल्या. डिसेंबर 1739 ते 1740 मार्च पर्यंत या स्वारीची कामगिरी त्यांनी व्यथित अंतःकरणाने सिद्धिस नेली.

बाजीराव स्वारीवर आहे याचा फायदा घेऊन या काळात मस्तानीला पुण्यात कैदेत ठेवण्यात आले. एवढेच नव्हे, तर बाजीरावापासून मस्तानीस दूर करण्याची परवानगी शाहू महाराजांकडून मिळविण्याचा प्रयत्नही पेशवे कुटुंबियांनी केला. परंतु शाहू महाराजांनीही त्यांना रास्त सल्ला दिला. मस्तानीस कैदेत ठेवून बाजीरावास दुखवू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""राऊ यास खट्टे न करावे. त्यांचे समाधान राखावे. तिला अटकाव करून सल्ला तोडू नये.''

....नासिरजंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत बाजीराव खर्गोण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यास गेले. तेथे ते ज्वराने आजारी पडले. त्यातच रावरेखेडी येथे 28 एप्रिल 1740 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी बाजीरावांची धर्मपत्नी काशीबाई व मुलगा जनार्दन ही नुकतीच पुण्याहून येऊन पोचली होती. मस्तानी मात्र पुण्यातच कैद होती.

बाजीरावांच्या मृत्यूची हकिकत तिला समजताच तिनेही मृत्यूला कवटाळले. तिचा मृत्यू विष प्राशन करून झाला की मुद्दाम प्राणघात करून घेतला हे समजण्यास मार्ग नाही. शनिवारवाड्यात मृत्यू झाल्यावर तिला तिच्या इनामाचे गाव पाबळ येथे नेऊन दफन करण्यात आले.

बस्स. एवढीच ही प्रेमकहाणी! एक मोठी प्रेमकहाणी!

संदर्भ -
महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 139 - 141)

स‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 3

स‌ंभाजीराजे. मराठी राज्याचे वारसदार. ते स्वराज्याच्या शत्रूस जाऊन मिळाले. गोष्ट मोठी दुर्दैवी आहे. स‌ंभाजी राजांच्या चरित्रावरील हा स‌र्वात मोठा, कोणत्याही युक्तिवादाने, कोणत्याही कारणाने पुसला न जाणारा कलंक आहे.

एरवी स‌रदार, वतनदार यांनी असे पक्षांतर करणे ही तर त्या काळची रीतच होती. माणसं निजामशाहीतून आदिलशाहीत, आदिलशाहीतून मोगलांकडे अशी जात-येत असत. खुद्द औरंगजेबाचा मुलगा मराठ्यांना स‌ामील झाला होता. पण संभाजीराजे हे काही स‌ामान्य जहागिरदार, वतनदार, स‌रदार नव्हते. ते कोणा भोसलेशाहीचे वारसदारही नव्हते. शिवाजीराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. ते रयतेसाठीचे राज्य होते. ते हिंदवी स्वराज्य होते. श्रींच्या इच्छेने झालेले ते राज्य होते. आणि म्हणूनच संभाजीराजांचे पक्षांतर ही स‌र्वांचेच काळीज खाणारी गोष्ट बनली होती. प्रा. वस‌ंतराव कानेटकरांनी तर स‌ंभाजीराजांच्या या कृत्यामुळे शिवरायांना एवढा धक्का बसला, की ते खचलेच, असे म्हटले आहे. "शिवछत्रपतींच्या दिग्विजयाने हिंदवी स्वराज्याचा वृक्ष महाराष्ट्राबाहेरही फोफावत असता, त्याच्या (संभाजीच्या) हातून शत्रूस मिळण्याचा अविचार घडून आला. त्याबद्दल इतिहास त्यास कधीच क्षमा करू शकत नाही," अशा शब्दांत डॉ. जयसिगराव पवार यांनी आपला क्षोभ व्यक्त केला आहे.

हे सर्व असले, तरी एक प्रश्न उरतोच, की छत्रपतींसारख्या युगपुरुषाचा हा पुत्र, छत्रपती आणि जिजाऊंच्या स‌ंस्कारात वाढलेला हा सुसंस्कृत युवराज, एकाएकी उठतो आणि शत्रूच्या गोटास जाऊन मिळतो, ते कोणत्या कारणाने?

औरंगजेबाच्या आदेशाने दिलेरखानाने स‌ंभाजीराजांस आपल्या बाजूस आणण्यासाठी जे पत्र लिहिले त्याला उत्तर म्हणून स‌ंभाजीराजांनी एक गुप्त पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, "माझ्या हिताची म्हणून तुम्ही जी गोष्ट स‌ांगितली ती तशी घडून येईल, याहून वेगळे नाही, असे माझ्या मनात आहे. आपल्या पत्रातून मला असे दिसून आले की, स‌र्वांची मने एकच असतात. परंतु ज्या प्रदेशाची जबाबदारी माझ्यावर स‌ोपवून दुसरा प्रदेश जिंकण्यासाठी अगदी बिनधास्तपणे माझे वडील निघून गेले आहेत ते इथे परत येईपर्यंत मी आपण स‌ुचविलेली मोहीम स्वीकारू शकत नाही. आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही. परंतु आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या वैभवाने मी त्यांना स‌ंतुष्ट करीन. स्वतःची खरी योग्यता स्वीकारण्यात परिश्रम कसले? आणि दिल्लीपती माझ्या बाजूस आल्यावर काय स‌ांगावे? (ही चांगलीच गोष्ट आहे.) माझ्या बाजूचे म्हणून आपण मला पाठविलेले पत्र आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. मैत्रीच्या बाबतीत आधार आहे. आपण आपल्या पत्रामध्ये 'आपला' असे संबोधून स्नेह जुळविला आहे. तो स्नेह प्रत्यक्षात स‌ाकार होईल अथवा नाही, याबद्दल मुळीच संशय नको." (परमानंदकाव्यम्, संपादक - गो. स. स‌रदेसाई, बडोदा, 1952, पृ. 78, श्लोक 22-31)

या पत्रातील 'मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही' हे उद्गार काय सांगतात? मनात चलबिचल असताना, स‌ंभाजीराजांच्या मनात वडिलांबद्दल अशा भावना होत्या. आणि तरीही ते मोगलांना जाऊन मिळाले, म्हणजे त्यासाठी तसेच काही कारण असले पाहिजे, तशीच काही परिस्थिती निर्माण झाली असली पाहिजे किंवा निर्माण केली गेली असली पाहिजे.
काय होते ते कारण? काय होती ती परिस्थिती?

6 जून 1676 रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि 13 डिसेंबर 1678 रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर गृहकलह निर्माण झाला. राजाभिषेक प्रसंगीच आपणास पट्टराणीचा मान मिळाला तरी आपल्या पुत्रास युवराजपदाचा मान न मिळता तो स‌ंभाजीराजांकडे गेला, याचा अर्थ राज्याचा वारसा आपल्या मुलाला मिळणार नाही, याचे दुःख स‌ोयराबाईस झाले असले पाहिजे असा तर्क 'शिवपुत्र स‌ंभाजी'कार डॉ. कमल गोखले करतात. जिजाऊसाहेबांच्या मृत्युनंतर स‌ोयराबाईंच्या मनातील या विचारास प्रकटीकरणाचे धैर्य झाले असणार.

या काळात एकीकडे स‌ोयराबाई अस्वस्थ झाल्या होत्या आणि दुसरीकडे अष्टप्रधानमंडळातील काही प्रधानही संभाजीराजांवर नाराज होते. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स‌ंभाजीराजे राज्यकारभारात लक्ष घालू लागल्यानंतर त्यांच्या आणि प्रधानांच्या वितुष्टास प्रारंभ झाला असावा. यातून रायगडावर अशी परिस्थिती निर्माण झाली, गृहकलह इतका टोकाला गेला, की अखेर राज्याच्या वाटण्या करण्याइतपत पाळी आली. कवि परमानंदाचा पुत्र देवदत्त याने रचलेल्या 'अनुपुराणा'वरून मुळातच शिवाजी महाराजांना राज्याचे विभाजन मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी राजारामासाठी वेगळेच राज्य निर्माण करण्याचा पर्याय शोधून काढला, असे दिसते. पण स‌ोयराबाई आपल्या पुत्रासाठी महाराष्ट्र देशीचे राज्य मागत होती आणि महाराज कर्नाटक देशीचे भावी राज्य त्यास देतो असे म्हणत होते. "1975-76 या कालखंडात राज्यविभाजनाचा प्रस्ताव रायगडावर चर्चिला गेला आणि शिवाजी महाराजांनी थोड्या नाराजीने का होईना पण त्यास आपली संमती दिली. असे वाटते की पितापुत्रांच्या बेबनावाला इथूनच स‌ुरुवात झाली. संभाजीराजास राज्याचे विभाजनच मंजूर नव्हते. कारण महाराज कर्नाचकात जे जिंकणार होते, तोही मराठी राज्याचाच एक भाग बनणार होता." या स‌र्व राजकारणात मोरोपंत, आण्णाजी दत्तो, राहुजी स‌ोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी यांची भूमिका युवराज स‌ंभाजीराजांना विरोध करण्याची व राणी स‌ोयराबाईंचा पक्ष उचलून धरण्याची होती.

याच काळात शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची तयारी स‌ुरू केली होती. 6 ऑक्टोबर 1676 रोजी दस-याच्या मुहुर्तावर महाराजांनी कर्नाटक स्वारीसाठी प्रयाण केले. मात्र आपण रायगडावर नसताना, तेथे स‌ोयराबाई आणि त्यांच्या गटाच्या कोंडाळ्यात स‌ंभाजीराजांना ठेवणे योग्य ठरणार नाही, हे शिवरायांनी जाणले होते. तेव्हा त्यांनी स‌ंभाजीरांना कोकणातील शृंगारपूर येथे धाडले. शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी स‌ंभाजीराजांकडे स‌ोपविली. याच ठिकाणी स‌ंभाजीराजे शाक्त पंथीयांच्या प्रभावाखाली आले. तेथेच कवि कलशाने पुढाकार घेऊन राजांचा कलशाभिषेक केला.

एप्रिल-मे 1678च्या स‌ुमारास शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवरून परतले. पण इतिहासकारांच्या मते त्यानंतर शिवाजीराजे आणि स‌ंभाजीची भेटच झाली नाही. रायगडावर परतल्यानंतर शिवाजीराजांनी स‌ंभाजीराजांना शृंगारपूरहून स‌मर्थभेटीसाठी स‌ज्जनगडास जाण्याचा हुकूम दिला. गडावरील धार्मिक वातावरणात स‌ंभाजीराजांचा राग शांत होईल, असे छत्रपतींना वाटले असावे. 'अनुपुराणा'नुसार शिवाजी महाराजांनी स्वहस्ते पत्र लिहून स‌ंभाजीराजांना कळविले, की "तू प्रजेला अभय देतोस, पण प्रजा कर बुडवीत आहे. तू अमात्यांचा उघड अपमान करीत आहेस‌. तरी शृंगारपुराहून उठून तू स‌ज्जनगडास जा." स‌ंभाजीराजे स‌ज्जनगडावर गेले, पण तेथे रामदासस्वामी नव्हते. तेथेच दिलेरखानास जाऊन मिळण्याचा स‌ंभाजीराजांचा विचार पक्का झाल्याचे दिसते. स‌ंगम माहुलीस तीर्थस्नानास जातो म्हणून त्यांनी स‌ज्जनगडच्या किल्लेदाराचा निरोप घेतला आणि माहुलीवरून ते थेट दिलेरखानाच्या छावणीत जाऊन पोचले.

स‌ंभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे एका ब्राह्मणास दिलेले दानपत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपल्या या कृत्याचे स‌मर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट स‌ल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या स‌ल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. राजाने राणीच्या बाजूने पक्षपात केला. त्यामुळे तो आपल्या विरुद्ध झाला. असे असूनही त्याने आपल्या वडिलांच्या स‌ेवेत आणि निष्ठेत काही म्हणता काही कसूर केली नाही. आपल्या कर्तव्यपालनात तो स्वतः (संभाजी) दशरथी रामाप्रमाणे होता. त्याने दीड कोटी रूपयांची दौलत, किल्ले, राजाचा दर्जा, मान आणि सन्मानही गवताप्रमाणे तुच्छ मानून त्यांचा त्याग केला." (छत्रपती शिवाजी - स‌ेतुमाधवराव पगडी, पृ. 142)एकंदर राणी स‌ोयराबाई आणि प्रधानांनी केलेल्या कुटील कारवायांमुळे स‌ंभाजीराजांना मोगलांना जाऊन मिळण्याचे कृत्य करावे लागले, असा या मजकुराचा मथितार्थ आहे.

या कारवाया कोणत्या होत्या?
संभाजीराजांना राज्य मिळू नये यासाठी या लोकांनी कोणते मार्ग अवलंबले? या प्रश्नाच्या उत्तरातच स‌ंभाजी राजांची बदनामी कोणी केली या स‌वालाचे उत्तरही दडलेले आहे!

डॉ. जयसिंगराव पवार स‌ांगतात -
"...कुटिल राजकारणी व मत्सरग्रस्त प्रधान एकत्र आल्यानंतर या दोहोंच्या स‌मान प्रतिस्पर्ध्यास - स‌ंभाजीराजांस - हतबल करण्यासाठी अनेक डावपेच लढविणे आवश्यक ठरले. स‌ंभाजीराजांचे चारित्र्यहनन हा अशाच एका डावपेचाचा भाग असावा. राजकारणातील स‌त्तास्पर्धेत प्रतिपक्षाचे चारित्र्यहनन करून त्यास बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आपणास अगदी अलीकडच्या इतिहासातस‌ुद्धा स‌ापडू शकतील. स‌ंभाजीराजांच्या चारित्र्याविषयी ज्या अनेक दंतकथा अथवा अफवा त्यांच्या हयातीत निर्माण झाल्या त्यांचा शोध या कुटिल राजकारणाच्या पार्श्वभूमिवर घेतला तर मग खाफीखान, मनुची आदींच्या कानापर्यंत जाऊन पोहचलेल्या स‌ंभाजीराजांच्या 'इष्का'च्या कथा मुळातच कोणी निर्माण केल्या असतील याचा अंदाज बांधता येतो." आणि मग स‌ंभाजीराजांची बदनामी करणारी बखर लिहिणारा मल्हार रामराव याचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असतो, याचे मर्म उलगडते.

('स‌ंभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी?' या लेखाचे तिन्ही भाग पूर्णतः डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मराठेशाहीचा मागोवा' (मंजुश्री प्रकाशन, 1993) या पुस्तकातील 'युवराज स‌ंभाजीराजे - एक चिकित्सा' या प्रकरणाच्या आधारे लिहिले आहेत.)

संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 2

संभाजी महाराजांबद्दल बखरी जे म्हणतात ते खरे मानले, तर मराठ्यांचा हा युवराज बलात्कारी होता. आपला पिता शिक्षा करील या भयाने दिलेरखानाकडे जाऊन त्याने स्वराज्याशी द्रोह केला होता. एवढेच नव्हे, तर इंग्रज पत्रावर भरोसा ठेवायचा, तर त्याने साक्षात् शिवछत्रपतींना विष दिले होते! पण यात ऎतिहासिक स‌त्याचा कणही नाही.

महाराजांवर तेव्हा (1675च्या अखेरीस) विषप्रयोग झालेलाच नव्हता. यावेळी त्यांचा मृत्यूही झालेला नव्हता! ते साता-यावर दीर्घ काळ आजारी होते इतकेच. त्यातही गंमत अशी की, खुद्द इंग्रजांनीच काही दिवसांनंतरच्या बातमीपत्रात (7 एप्रिल 1676) विषप्रयोगाचा कर्ता संभाजी नसून एक न्हावी असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्या पहिल्या बातमीपत्राचा स‌गळाच डोलारा कोसळला की! आणि शिवाजी महाराज संभाजी दिलेरखानाला मिळण्यापूर्वी त्याला हर बहाण्याने पकडून ठार मारण्याच्या प्रयत्नात होते, या कहाणीची तर विचारही करण्याचे काही कारण नाही.

मल्हार रामरावाची बखर, जी सांगते की संभाजीने राजवाड्यात एका महिलेवर बलात्कार केला, तिच्याकडे तर विशेष काळजीने पाहावे लागते. मुळात ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली गेली आहे. त्यामुळे तिच्यात सांगोवांगी कहाण्या पुष्कळच असणार हे उघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही बखर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. त्याची कारणे मल्हार रामरावाच्या इतिहासात आहेत. बाळाजी आवजी चिटणीस हा मल्हार रामरावाचा खापर पणजोबा होता. त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. ही बखर लिहिताना मल्हार रामरावाच्या मनात संभाजीबद्दलचा हा राग नसेलच असे कसे म्हणता येईल? डॉ. जयसिगराव पवार सांगतात, बाळाजी आवजी, खंडो बल्लाळ या आपल्या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत. तथापि संभाजी महाराज गादीवर येऊ नयेत म्हणून झालेल्या कटांत, किंवा त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या आणि अकबराशी संगनमत केल्याच्या कारस्थानांत बाळाजी आवजीचा काही भाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही.

अतिशय विकृत पद्धतीने या मल्हर रामरावाने संभाजी महाराजांची बदनामी केली. त्याने सांगितलेल्या कहाणीवर विसंबून पुढे अनेकांनी संभाजी राजांना काळ्याकुट्ट रंगात रंगविले. पण या बलात्काराच्या कथेत काहीच दम नाही! मल्हार रामरावाने सांगितलेली ही गोष्ट म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. डॉ. पवार सांगतात, "ज्या रायगडावर ही घटना घडली असे सांगण्यात येते, त्या गडावर संभाजीराजे यावेळी नव्हतेच. मल्हार रामराव सांगतो, की ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवून त्याची शिक्षा टाळण्यासाठी संभाजीराजे रायगडाहून दिलेरखानाच्या गोटात पळून गेले. प्रत्यक्षात ते स‌ज्जनगडाहून खानाच्या गोटात गेले आणि त्यापूर्वी त्यांचा मुक्काम द. कोकणात शृंगारपुरी पावणेदोन वर्षे होता."

वास्तविक ऑक्टोबर 1676 पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आलेच नव्हते. तरीही मल्हार रामराव, इंग्रजी बातमीपत्र आणि बुसातिन-उस-सुलातिन ही तिन्ही साधने त्यांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो!

या 'बलात्कार कथे'ची नायिका गोदावरी ही आहे. तिला तर कोणताही ऎतिहासिक आधार नाही. पण मग तिची स‌माधी रायगडाच्या पायथ्याशी दाखविली जाते, ते कसे?
याचे उत्तर आहे - आज रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची जी समाधी दाखविली जाते, ती आहे स‌वाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिची स‌माधी! (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 396-397)

संभाजीच्या आणखी दोन नायिका आपल्याकडील चित्रपट, नाटके आणि कादंब-यांनी रंगविल्या आहेत. त्यातील एक आहे तुळसा आणि दुसरी थोरातांची कमळा. या कमळाची स‌माधी पन्हाळ्याच्या परिसरात दाखविली जाते. पण तिचीही गत गोदावरीसारखीच आहे. ही स‌माधी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडातील यशवंतराव थोरात या शूर पुरुषाची आहे! बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी यशवंतराव धारातीर्थी पडला. त्याची बायको त्याच्याबरोबर स‌ती गेली. या दोघांची ही स‌माधी आहे. आता तेथे उभयतांच्या मूर्ती त्यांच्या वंशजांनी स्थापन केल्या आहेत. (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 306-309)
तुळसा हे पात्र तर तद्दन काल्पनिक. ते आत्माराम मोरेश्वर पाठारे या नाटककाराने 1891 साली आपल्या 'संगीत श्री छत्रपती संभाजी' या नाटकात निर्माण केले. या पात्राला लोककथेतही स्थान नाही.

संभाजी महाराजांच्या स्त्रीलंपटपणाच्या कथांची अशी वासलात लागल्यानंतर त्यांच्या चारित्र्यावर 'डाग' राहतो तो स्वराज्यद्रोहाचा.

शंभूराजे दिलेरखानाला का मिळाले, हा मोठा गहन प्रश्न आहे.

संदर्भ -
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993

संभाजी राजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? : भाग 1


हे वर्णन पाहा -
"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."
हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने.

यातून संभाजीराजांची कोणती प्रतिमा साकारते?

आता हे वर्णन पाहा -
"युवराजपदी असतानाच संभाजीराजांनी 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला होता... एका तत्कालीन कागदात एका खटल्यातील वादी आपली तक्रार प्रल्हाद निराजी व कवि कलश यांच्याकडे सोपविली गेल्याचे पाहून खुद्द संभाजीराजांकडे तक्रार करताना म्हणतात, साहेब स‌र्वज्ञ, शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होय ऎसा करिताती. ऎसे असोन माझे पारिपत्य होत नाही."
हे नमूद केले आहे वा. सी. बेंद्रे यांनी आपल्या 'छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकात. (पान 37, 38)

यातून संभाजीराजांचे कोणते चित्र उभे राहते?

आणि आता संभाजीबद्दल जनमानसात असलेले गैरस‌मज आठवून बघा.
लोक स‌मजतात -
मराठी साम्राज्याचा हा युवराज दुर्वर्तनी होता. दुराचारी होता. मद्यासक्त होता. स्त्रीलंपट होता. बलात्कारी होता. राज्यबुडवा राजा होता! काही तत्कालीन ऎतिहासिक साधनांतूनही संभाजीबद्दलचे असेच काळेकुट्ट चित्र रंगविलेले आढळते.

मल्हार रामरावाची बखर सांगते -
"... परंतु (संभाजीराजे) उग्र प्रकृती. शिवाजीमहाराजांचे मर्जीनुसार वागणे पडेना ऎसे होऊ लागले. काही दिवस राजगडी राहून रायगडी गेले... त्यांचा व्रतबंध करून युवराजाभिषेक करावासे मनात आणून व्रतबंध केला. परंतु संभाजी महाराजांची मर्जी एक प्रकारची! कोण्हे एके दिवशी हळदकुंकू स‌मारंभ शीतलागौरी यास स‌र्व सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात येणार त्यात कोण्ही रुपवान स्त्री आली. तिजला महालात नेऊन बलात्कार - अविचार जाला. हे वृत्त महाराजांसही स‌मजले. ते स‌मयी बहूत तिरस्कार येऊन बोलले जे राज्याचे अधिकारी हे, अगम्यागमन श्रेष्ठ वर्णीचे ठायी जाले; स‌र्व प्रजा हे राजाचे कुटुंब आप्तसमान, हे पुत्र जाले तरी काय करावयाचे? यांचा त्याग करीन, शिक्षा करीन. ऎसे आग्रह करून बोलले. ही बातमी संभाजी महाराज यांस स‌मजली. त्याजवरून दोन घोडियांवरि आपण व स्त्री ऎसे बसोन, पांच पंचवीस माणसे मावले आपले खासगीची घेऊन रात्रीसच निघोन पाचवडास असता तेथून गेले. ते वेळे दिलेलखान औरंगाबादेस होते त्यांजपाशी गेले... बहूत स‌त्कार करून ठेविले... "

म्हणजे संभाजीराजांनी एका महिलेवर राजवाड्यात बलात्कार केला आणि मग शिवाजीराजे शिक्षा करणार या भयाने ते दिलेरखानाकडे पळून गेले, असे मल्हार रामरावाचे म्हणणे आहे. याला महमद झुबेरी याने आपल्या बुसातिन-उस-सलातीन (विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास) या ग्रंथात दुजोरा दिला आहे. या ग्रंथातील कथा अशी -
"संभाजी याणी दिलेरखानापासी जाऊन पोहचण्याची कैफियत अस‌ी आहे की, सिवाजी कित्येक कामाबद्दल संभाजीसी त्रासून कंटाळला होता. या दिवसांत शहरनवीस म्हणदे हुकमाचे शेरे लिहिणारा कामदार होता. त्याचे कन्येवर संभाजी फार आषक, म्हणजे लुब्ध, जाहला होता. येणेकरून संभाजीविसी सिवाचे मनात फारच वाकडेपणा येऊन सिवाजी अत्यंत त्रासला होता. अशा प्रकारे की, संभाजीचा केवळ शत्रूच जाहाला आणि सिवाजीने मनात आणिले की, संभाजीस हरएक बाहान्याने पकडून ठार जिवे मारावा किंवा कैद करावा. संभाजी याणी हा सिवाजीचा इरादा ओळखून संशयांकित जाहाला. आपण दिलेरखानाकडे निघोन जावे असा निश्चय केला. आपण जातीने जाऊन पोहचण्यापूर्वी आधी एक पत्र आम्ही आपलेकडे येतो अशा मजकुराचे लिहून दिलेरखानाकडे पाठविले. त्यानंतर जातीनेही त्या पत्राचे लागोपाठच दिलेरखानाकडे निघाला."

एका इंग्रजी बातमीपत्राने तर याहून कहर केला आहे. त्या पत्रात असे म्हटले आहे, की संभाजीने आपल्या बापास विष देऊन ठार मारले, अशा बातम्या आहेत. ते पत्र असे -
"For these many days here is a continued report of Sevagee being dead and buried, naming the place of his death, distemper, manner and place of burial. It is reported he was poisoned by his son; his son being informed his father had commanded the watch of Rairee Castle to throw him down over the wall, if he left not going out at nights after the watch was set to meet a daughter of one of his chiefest Brahminees, whose daughter he had debauched; that he was sick, we certainly know, and that his distemper proceeded from the violent pain he had in his head, which was almost rotten..." (English Records on Sivaji - Ed. Shiva Charitra Karyalaya, Pune, Vol II, P. 78)

मराठ्यांचे इतिहासाचे थोर भाष्यकार कै. त्र्यं. शं. शेजवलकर या पत्राबद्दल म्हणतात, "इंग्रजांच्या पत्रातील ही नोंद इतकी सहजरित्या स्पष्ट स्वरूपात आली आहे की तीबद्दल शंका घेणे कठीण आहे..." (श्री शिवछत्रपती - संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने - त्र्यं. शं. शेजवलकर, 1964, पृ. 142-143)

या तिन्ही साधनांमध्ये ज्या स्त्रीचा उल्लेख येतो, तिचे लोककथेतील नाव होते गोदावरी. ती अण्णाजी दत्तो यांची मुलगी होती, असे मानले जाते. लोककथेनुसार "गोदावरी नामक एका ब्राह्मणाच्या विधवा मुलीवर मोहित होऊन संभाजीने तिला पळवून नेऊन लिंगाणा किल्ल्यावर लपवून ठेवले. महाराजांना हे कळताच त्यांनी तिची सुटका केली. या गुन्ह्याबद्दल महाराजांनी संभाजीला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फर्मावली. अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी करून आजचा हा युवराज आमचा उद्याचा राजा आहे, असे सांगून शिक्षा रद्द करून घेतली. पण ती माहेरी अगर सासरी जाईना. तिच्यावर भ्रष्ट होण्याचा प्रसंग आल्यामुळे ती स‌ती गेली. संभाजीनेच तिची चिता पेटवली पाहिजे, अशी स‌ती जाताना तिने अट घातली होती. त्याप्रमाणे संभाजीने तिची चिता पेटवली..." ती जिथे स‌ती गेली त्याच ठिकाणी महाराजांनी तिची स‌माधी बांधली. ती अद्यापही तेथे, रायगडाच्या पायथ्याशी आहे, असे सांगण्यात येते.


हे वाचून कोणालाही वाटावे, की हा संभाजी तर सामान्य गुंड होता! पण मग त्याचवेळी तो धर्मवीरही आहे!
आता याची संगती कशी लावायची? की स‌त्य याच्या मध्ये कुठे तरी आहे?
असे तर नाही ना, की कोणीतरी जाणूनबुजून संभाजीची बदनामी केलेली आहे, त्याच्याबद्दलच्या अफवा पस‌रविल्या आहेत?

इतिहासाची पाने चाळली, तर दिसते ते हेच, की मराठ्यांचा हा शंभूराजा कधीच दुराचारी, स्त्रीलंपट असा नव्हता.

संदर्भ -
मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993

महाराष्ट्रातले खलपुरूष 2 - राघोबादादा

राघोबादादा पेशवे यांनी मराठ्यांचा ध्वज अटकेपार नेला. याबद्दल त्यांचा गौरव जरूर केला पाहिजे. पण त्याचबरोबर हा मनुष्य महाराष्ट्राच्या इतिहासातील एका गाजलेल्या राजकीय हत्याकटाचा सूत्रधार होता, हेही विसरता येणार नाही.


पेशवाईची वस्त्रे मिळावीत यासाठी या माणसाने हयातभर कटकारस्थाने केली. नारायणराव पेशवे गादीवर आल्यानंतर राघोबादादांनी त्यांच्याविरुद्ध कारस्थाने सुरू केली. पेशव्यास दादांच्या गुप्त कारस्थानांची वार्ता कळताच ते नाशकाहून लगबगीने परत आले. राघोबा हैदरखानचा वकील आप्पाजीराम याच्यामार्फत हैदरखानाशी संधान साधून होते. तेव्हा आप्पाजीरामला बेड्या घालून पुरंदरावर ठेविले आणि राघोबादादास 11 एप्रिल 1773 रोजी वाड्यातच बंदीत ठेविले. (पृ. 347)

"दादास कैद दुःसह होऊन त्यांच्या मनाने घेतले, की आपणच नारायणरावास अटकेत ठेवून कारभार करावा.' (हरिवंशाची बखर, पृ. 1) दुसरीकडे पेशव्यांनी दादांच्या सर्व हालचाली बंद पाडून त्यांच्यावरील पहारा कडक केला. तेव्हा दादा पेशव्यांविरूद्ध कटाची उभारणी करू लागले. त्यात भवानराव प्रतिनिधी, सखाराम हरि व सखाराम बापू, चिंतो विठ्ठल आदी सरदार त्यांना सामील झाले. दादांचा हुजऱ्या तुळ्या पवार याने कटाची उभारणी केली.(तुळ्या पवारास नारायणराव पेशव्यांनी चाबकाने बडविले होते. म्हणून तो बदला घेण्याच्या विकाराने पछाडला होता.)

दादांच्या कैदेची देखरेख सुमेरसिंगाकडे पेशव्यांनी दिली होती. तुळ्या पवारने त्याला फितवले आणि दादांच्या पक्षास आणले. "सुमेरसिंग, महमद इसफ, बहादुरखान व खरकसिंग या गारदी सरदारांस पैशाची लालूच दाखवून तीन लक्षाचा करार लिहून कारभाऱ्यांनी (बापू व मोरोबा) दिला, की नारायणरावास धरावे. दादांनी ही चिठ्ठी स्वदस्तुरीने पुरी केली. ती चिठ्ठी आनंदीबाईनी पाहिली. त्यात "धरावे' होते त्या ठिकाणी "मारावे' असे केले,'' असा बखरीतला उल्लेख आहे. अशा रीतीने कटाची उभारणी झाली. त्यात मुधोजीचे वकीलही सामील झाले. अशा कटास ऑगस्ट महिना साधारणतः योग्य, कारण यावेळी पाऊस पडून शेतीच्या हंगामात सर्व सैनिक आपल्या वाडीवर जाऊन गुंतलेले असतात. त्यावेळी तीन ते चार हजार सैन्य पुण्यास होते. नारायणरावांच्या मनात आपला खून होईल याबद्दल कधी शंकासुद्धा आली नाही.

मात्र रघुजी आंग्रे यांच्याकडून पेशव्यास धोक्‍याची सूचना मिळाली होती. गारदी दंगा करणार असे पेशव्यांना समजताच त्यांनी हरिपंत फडके यास गारद्यांचा बंदोबस्त करण्यास फर्माविले. गारद्यांचे दंगे हे नेहमीचेच असतात. तेव्हा त्याचा बंदोबस्त आपण संध्याकाळी करू असा विचार करून हरिपंत गावातील भोजन समारंभास गेले.

त्याच दिवशी (30 ऑगस्ट 1773) दुपारच्या प्रहरी पेशवे वामकुक्षी करीत असता दोन हजार गारदी दिल्ली दरवाजाने आत आले. त्यापैकी शे-दोनशे लोक थोरले बाजीरावसाहेब यांचे दिवाणखान्यातून श्री गणपती महालाच्या दरवाजाजवलून मेघडंबरी बंगल्याचे दरवाजातून त पेशवे यांच्या दिवाणखान्यापुढे गाई बांधतात तेथे आले. देवघरच्या रंगमहालाचा दरवाजा बंद करून तेथे नारायणरावास कैद करावे अशा बेतात होते. इतक्‍यात रावसाहेब हुशार होऊन धावत सातखणीतून पार्वतीबाई याजकडे गेले. तेव्हा इच्छारामपंत ढेरे श्रीमंताच्या व गारद्यांच्या मध्ये आले. त्यांची झटापट गारद्यांशी होऊन गारद्यांनी त्यास तोडले. तेव्हा गारद्यांस पाहून देवघरात बसलेला नारोबा फाटक गवई भयभीत होऊन पळू लागला. हे पाहून हेच रावसाहेब असे समजून त्यास पाठीमागून वार करून ठार मारले. पहातात तो रावसाहेब नव्हते. मग गारदी प्रमुख खरकसिंग व सुमेरसिंग व तुळ्या पवार पेशव्यांच्या पिच्छास गेले. पेशवे पार्वतीबाईकडे गेले. तेव्हा बाईंनी सांगितले, की तुम्ही दादासाहेबांकडे संरक्षणास जावे, त्यावरून दादासाहेब दिवाणखान्यात निजले होते तेथे आले आणि समोर येऊन सांगितले, की मला मारावयास तिघे जण पाठीमागे आले आहेत. त्यावरून दादासाहेब यांनी सांगितले, की ""तू इथेच राहा. मी बाहेर जाऊन बंदोबस्त करतो असे सांगून उठावयास लागले.'' तोच रावसाहेब यांनी कमरेस मिठी घातली आणि म्हणू लागले की मला सोडून जाऊ नये. इतक्‍यात तुळाजी पवार वगैरे तीन असामी आत आले आणि नारायणराव याचे पाठीमागे होऊन पाय ओढू लागले. तुळाजी पवार वार करावयास आला. त्यास दादासाहेब यांनी उजवा हात पुढे केला तो तरवारेचा वार त्यांच्या हातास लागला. दुसरा वार खरकसिंग याने केला तो दादासाहेब यांचे पागोट्याचा पेच तुटून पुतळी कानापाठीमागे लागली. रक्तस्त्राव जाहला. तुळाजी पवार याने दुसरा वार केला तो नारायणराव यांचे कमरेवर लागला आणि दादासाहेबास म्हणू लागला की नारायणराव यास सोडावे नाहीपेक्षा दोघासही ठार मारितो. हे ऐकून गोविंद गणेश बारगीर याने येऊन दादासाहेबांचे कमरेची मिठी सोडविली तेव्हा सुमेरसिंग याने वार केला तो नारायणराव यांचे कुशीस लागून ठार जाहले. वाड्यात सर्वत्र एकच हाहाःकार जाहला. दादासाहेबास फडावरच्या खणात आणून बसविले. इतक्‍यात वाड्यात गडबड झाली ही बातमी शहरात पसरली. बातम्यावर बातम्या येऊ लागल्या. पहिली बातमी आली की नारायणराव ठार जाहले.
(ही हकीकत महादजी राम कर्दीकर या नावाच्या दादासाहेबांच्या आश्रिताने लिहून ठेविली. ती महाराष्ट्र अर्काईव्हज बुलेटिन, क्र. 4 मध्ये प्रसिद्ध झाली, त्यातून घेतली आहे.)

या दुष्कृत्यात एकंदर ब्राह्मण आसामी सात, एक हुजऱ्या, एक नाईक, दोन कुणबिणी व एक गाय इतकी ठार झाली. गारद्यांनी नंतर राघोबादादा पेशवे झाल्याची ग्वाही फिरविली. बाहेर मुत्सद्दयांनी शहर कोतवालाकडून शहरची नाकेबंदी करविली. सर्व मुत्सद्दी कोतवाल चावडीत जमले. भवानराव प्रतिनिधी आपल्या लोकास बाहेर ठेवून एकटेच आत गेले. त्यांनी दादांची भेट घेतली. त्यावेळी दादाजवळ तुळाजी पवार, खरकसिंग व सुमेरसिंग होते. त्यांनी अभय मागितले व आपले देणे पुरे करावयास लाविले. दादासाहेबास एकांती घेऊन भवानरावाने दादांच्या संमतीने आपले लोक आत घुसविले आणि ठिकठिकाणी चौकी पहारे बसविले. त्रिंबकराव मामास बोलावणे पाठविल्यावर ते आत येऊन त्यांनी दादांचा निषेध केला.

दादासाहेबांनी उत्तर केले की, होणारास उपाय नाही. तुम्ही आत जाऊन पुढील उपाय काय तो करणे. त्याप्रमाणे उत्तरकार्याची तजवीज पार्वतीबाईचे विचारे केली. श्रीमंतांचे प्रेत ओंकारेश्‍वरापासी नेण्यासाठी दिल्ली दरवाजाने बाहेर काढिले. ओंकारेश्‍वरावर सर्व मुत्सद्दी मंडळी जाऊन प्रायश्‍चित्त संस्कार करून मंत्राग्नि त्रिंबकराव मामा याजकडून दिला. दहन करून चौदा घटिका रात्री आपापले घरी सर्वत्र गेले. (पेशवे बखर, पृ. 71, मराठी दप्तर रूमाल 2, पृ. 101)

भवानराव प्रतिनिधी, मालोजी घोरपडे आणि राजाबा पुरंदरे यांनी राघोबादादांची त्याच रात्री वाड्यात भेट घेतली. तेव्हा त्यास आढळून आले, की दादा स्वतः गारद्यांचे कैदी बनलेले. कारण गारद्यांनी पुरंदर नगर आणि साष्टी येथील तीन किल्ले आणि बक्षिसादाखल पाच लाख रुपये दादासाहेबांकडे मागितले. जर ती रक्कम आपणास मिळाली नाही, तर आम्ही अलिबहादूर यास पेशवा करू अशी धमकी त्यांनी दादास दिली. शेवटी भवानराव प्रतिनिधींच्या मध्यस्तीने गारद्यांचा गुंता उरकला. तीन किल्ल्यांऐवजी पाच लाख रुपयांबरोबर आणखी तीन लाख घेण्याचे कबूल केले.

नारायणरावांबरोबर त्यांची बायको गंगाबाई सती जाण्यासाठी आकांडतांडव करीत होती. पण सतीचा शाप बाधेल या भीतीने दादांची बायको आनंदीबाई यांनी तीस खोलीत कोंडून ठेविली. (खरे, भा. 4, ले. 1257, 1262) शिवाय तिला दिवस गेले होते.

हा बनाव सहा महिने अगोदर शिजत होता. सखारामबापू व दादास साखळदंड घालून कैद करणार असे दोघांनाही समजल्यावरून हा कट सिद्धीस नेण्याची घाई त्यांनी केली. बहुतेक कारभारी नारायणरावास धरावे या कटात होते. ग्रॅंट डफसुद्धा ह्या "ध चा मा'त आनंदीबाईचा हात होता हे कबूल करतो. सखारामबापूचे "नारायणरावास धरावे' या कटात अंग होते. पण त्यांचा वध झाल्यावर मात्र बापू पश्‍चात्तापदग्ध होऊन कित्येक दिवस पर्वतीच्या रानात फिरत होते.

रामशास्त्री प्रभुणे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी खुनाच्या चौकशीचे काम हाती घेतले. त्यात असे दिसून आले, की नारायणरावाचा खून करण्याचा मूळ कट नसून त्यास धरावे असे होते. हा कट राघोबाचे पाठीराखे आणि हितचिंतक यांनी खुनाच्या अगोदर पुरे सहा महिने शिजवला. त्यात मुख्य सूत्रधार राघोबादादा असून आणखी 49 लोकांनी भाग घेतल होता. त्यापैकी 13 गारदी (8 हिंदू व 5 मुसलमान), 26 ब्राह्मण, 3 प्रभू व 7 मराठे गुन्हेगार होते.

सरदारांपैकी नाना फडणीस यास सखारमाबापू व चुलतभाऊ मोरोबा याचा संशय होता, शिवाय आनंदीबाईचाही वहीम होता. नाना फडणीसांनी सत्ताग्रहण केल्यावर पहिल्या दोघांस अन्य कारणास्तव कैदेत ठेविले. आनंदीबाईस नानांनी जिवंत असेपर्यंत कैदेतच जीवन काढण्यास भाग पाडले.

(महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - ड. वि. गो. खोबरेकर, म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, किं. 100, पृ. 350 ते 354)

(टीप - गारदी हे शनिवारवाड्याचे रखवालदार होते. त्यांच्यात भरणा उत्तर हिंदुस्तानातील पठाण, अबिसिरियन अरब, राजपूत पुरभय्या यांचा होता.)

महाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल

रा. रा. विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने महाराष्ट्रात इतिहास घडविला होता. हे नाटक ब्राह्मणविरोधी आहे, त्यातून पेशावाईतील ब्रह्मवृंदाची आणि त्यातही प्रामुख्याने नाना फडणीस यांची बदनामी झाली असल्याचे आरोप या नाटकावर झाले होते. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी आणि त्यासाठी आंदोलनेही झाली होती. आज ते स‌र्व विरून गेले आहे.

मुळात तेंडुलकरांच्या नाटकाचा विषय घाशीराम कोतवाल नावाची व्यक्ती हा नव्हताच. राज्यकर्ते आपल्या स्वार्थासाठी घाशीराम सारखी माणसे (वा संघटना) निर्माण करतात. त्यांच्याकडून आपली स‌र्व प्रकारची अनैतिक कामे करून घेतात आणि ही माणसे डोईजड झालीच तर त्यांचा काटा काढतात. हे तेंडुलकरांना शिवसेनेच्या संदर्भात सांगायचे होते. ते त्यांनी त्या नाटकातून सांगितले. त्यासाठी त्यांच्या कामास आली, ती घाशीरामची दंतकथा. एकंदर 'घाशीराम कोतवाल' या नाटकानंतर घाशीरामचा इतिहास लोकांसमोर फारसा आलाच नाही. आली ती फक्त दंतकथा.

मुळात माधवराव पेशव्यांच्या काळापर्यंत पुण्यास स्वतंत्र कोतवाल नव्हता. त्यांच्या काळात पुण्याचे महत्त्व फार वाढले, तेव्हा मग शहराच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र कोतवाल म्हणजेच पोलिस अधिकारी नेमण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार 18 फेब्रुवारी 1764 रोजी माधवरावांनी बाळाजी नारायण केतकर यांच्याकडे पुणे शहराच्या व्यवस्थेचे काम सोपविले. नाना फडणीस अर्थात बाळाजी जनार्दन फडणीस हे सांगतिल तसे काम करीत जाणे असे त्यांना बजावण्यात आले होते.

नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले. शहराच्या बंदोबस्ताखेरीज लहान गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा स‌त्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली. त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला.

बाळाजी नारायण केतकरांनंतर बाबूराव राम, जनार्दन हरी, धोंडो बाबाजी व आनंदराव काशी असे कोतवाल झाले. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1777 रोजी नानांनी घाशीराम कोतवालाची कोतवालपदावर नेमणूक केली.

हा माणूस अतिशय सुस्वरूप, बुद्धिमान आणि गोडबोल्या होता. नाना फडणीसांची त्याच्यावर मोठी मर्जी होती. फितुरीसाठी, राघोबा दादा, तसेच अन्य काही स‌रदार-दरकदारांवर हेरगिरी करण्यासाठी नाना त्याचा वापर करीत असत. किंबहुना अशा गुप्तरीत्या मिळविलेल्या बातम्यांवरच पंधरा वर्षे नानांचा मुख्य कारभार सुरू होता. फंदफितुरी दाबात ठेवण्यासाठी नानांना घाशीरामच्या गुप्तहेरांकडून मिळणा-या बातम्यांचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याबद्दल नाना बक्षिसे वगैरे देऊन त्याची वारंवार प्रशंसा करीत असत. पण या काळात घाशीरामने अनेकांवर अन्याय केला. अतिशय निर्दयपणे पुण्याचा कारभार केला. त्यामुळे पुढे असा बदनाम कारभार 'घाशीरामी कारभार' म्हणूनच ओळखला जाऊ लागला. पण अखेर घाशीरामचे शंभर घडे भरलेच.

त्याच्या कारकीर्दीत 25 तेलंगी ब्राह्मण पुण्यास आले होते. ते आपल्या देशास जाण्यास निघाले असता, त्यांना घाशीरामच्या शिपायांनी कैद केले आणि भवानी पेठेतील चावडीत खणाचे भुयार होते तेथे कोंडले. त्या भुयारात वारा जाण्यास जागा नव्हती. त्यामुळे कोंडमारा होऊन 21 लोक मृत्यू पावले. (ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3373, पृ. 4536) मानाजी फाकडे नावाच्या गृहस्थांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी ती पेशव्यांच्या कानी घातली. 21 ब्राह्मणांचा कोंडून मृत्यू झाल्याची बातमी पुण्यात कळताच एकच हलकल्लोळ उडाला. पुण्यातील स‌र्व ब्रह्मवृंद पेशव्यांच्या वाड्यासमोर जमला. अत्याचारी घाशीरामाला हत्तीच्या पायी देऊन ठार करावे, अशी त्यांची मागणी होती.

घाशीरामचे म्हणणे मात्र वेगळेच होते. कोंडून ठेवल्याने त्या ब्राह्मणांचा मृत्यू झाला, ही हकीकत खोटी आहे. हे लोक शहरात चो-या करीत असत. त्यांना धरून आणून ठेवले असता, त्यांनी अफू खाऊन जीव दिला, असे त्याने सांगितले. त्यावर त्या ब्राह्मणांना मूठमाती देण्याची परवानगी दिली. त्याबरोबरच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. अय्याशास्त्रीजी यांच्याकडे चौकशीचे काम सोपविण्यात आले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत घाशीराम दोषी ठरला. त्याच्या मुसक्या बांधून गारद्यांच्या पहा-यात ठेवण्यात आले.

घाशीरामला कैद केले तरी ब्रह्मवृंदांचे स‌माधान झाले नव्हते. त्याला हत्तीच्या पायी देण्याचा त्यांचा आग्रह होता. तेव्हा त्याला हत्तीवर बांधून शहरातून फिरविण्यात आले. त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला दगड मारले. त्यात त्याचे डोके फुटले. तरी ब्रह्मवृंद शांत होईना. शेवटी दुस-या दिवशी, 31 ऑगस्ट 1791 रोजी त्याला उंटावर उलटे बसवून गारपिरावर नेऊन सोडले. तेथे 'ब्राह्मणांनी त्यास धोंडे घालून मारिले. अद्यापि शरीर कोतवालाचे पडले आहे. नदीत टाकिले नाही,' असे मिरजकरांच्या वकीलाचे पत्र आहे. (ऎतिहासिक लेखसंग्रह, भाग 9, संपा. वा. वा. खरे, ले. 3374, पृ. 4539) घाशीरामच्या दोघा मुलांना, तसेच त्याच्या दिवाणालाही बेड्या घालण्यात आल्या. घाशीरामच्या घरावरही जप्ती आणण्यात आली. अशा रीतीने घाशीराम प्रकरणाचा शेवट झाला.

तत्कालीन पुण्याच्या ढासळलेल्या नैतिकतेवर प्रकाश टाकणारे असेच हे प्रकरण आहे.

संदर्भ -
महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड भाग 2 - 1707 ते 1818 - डॉ. वि. गो. खोबरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती 1988, पृ. 497-498.

रामदास खरेच बोहल्यावरून पळाले होते?

'शुभमंगल सावधान' हे शब्द कानावर पडले आणि नारायणाने बोहल्यावरून धूम ठोकली.

रामदासांच्या जीवनचरित्रातील ही एक महत्त्वाची घटना. मराठवाड्यातल्या जांब गावातल्या नारायण सूर्याजी ठोसर या मुलाचे समर्थ रामदासस्वामींमध्ये रूपांतर झाले, त्या प्रवासाच्या प्रारंभी ही घटना येते. पण इतिहासातील अनेक घटनांप्रमाणेच हिच्याबद्दलही शंका आहेत. ही घटना अशीच घडली का याबद्दल संशय आहे. म्हणजे रामदास स्वामींनी लहानपणीच घराचा त्याग केला हे खरे. पण ते लग्नातून पळाले याबद्दल मात्र खात्री नाही.

वास्तविक या घटनेबद्दल अनेकांनी लिहिले आहे. नारायण बोहल्यावरूनच पळाले असे जवळजवळ सर्वांचेच म्हणणे आहे. रामदासांची अनेक चरित्रे हीच कथा सांगत आहेत. रामदासांच्या स‌र्व चरित्रांमध्ये हनुमंतस्वामींची बखर जास्त प्रमाण मानली जाते. या कथेबद्दल हनुमंतस्वामी लिहितात -

"पुढे कोणे एके दिवशी श्रेष्ठीस (म्हणजे स‌मर्थांचे थोरले बंधू) मातोश्री आज्ञा करिती जाहली की, नारोबाचे लग्न करावे. श्रेष्ठीने उत्तर केले की, नारोबाचे लग्न कराल, तर नारोबा हातातून जाईल आणि आपणास बहुत दुःख होईल. ही गोष्ट कामाची नाही. मातोश्री बोलली की, आपला वंश फार नाही. वंशवृद्धी जाहली पाहिजे. यास्तव अवश्यमेव लग्न कर्तव्य आहे. असे म्हणून वधूचा शोध करू लागली...."
"... नंतर मातोश्रींनी विचार केला की लग्नाची गोष्ट काढली असता हा असे (म्हणजे रामदास पिसाळल्यासारखे वागत वगैरे) करतो. तरी यास काही बोध करावा असे मनात आणून त्यास एकांती बोलावून बोलली की, बापा मी सांगतो ती गोष्ट मान्य करशील काय? समर्थ बोलले की मी आपले आज्ञेबाहेर नाही. न मातुः परं दैवतम् असे शास्त्र आहे. म्हणून आज्ञा करावी. तेव्हा तुम्ही लग्न करीत नाही. लग्नाची गोष्ट काढली असता रागे भरता. तर असे करू नये. अंतःपट धरीन तोपर्यंत नाही असे म्हणू नये. तुम्हास माझी शपथ आहे. 'उत्तम आहे', असे म्हणून त्यादिवसापासून पूर्वीचे प्रकार सर्व सोडून दिले. नंतर मातोश्रीमी लग्नाचा उद्योग करून आपले बंधू भागजीपंत बादेनापूरकर ह्यांची कन्या योजून निश्चय केल्यानंतर स‌र्व आसनगावी लग्नास गेले. सीमंतपूजनापासून अंतःपट धरीपर्यंत स‌र्व यथासांग झाले. पुढे ब्राह्मणांनी अंतःपट धरून मंगलाष्टके म्हणावयाचे पूर्वी 'स‌ावधान' असे म्हणताच, याचा अर्थ काय, असे स‌मर्थांनी विचारिताच 'इतःपर संसाराची बेडी तुमचे पायात पडली' असे ब्राह्मणाचे वाक्य श्रवण करीन स‌मर्थांनी विचार केला की, पूर्वी मी सावध आहेच, हल्ली ब्राह्मणही म्हणतात आणि मातोश्रींची शपथ एथपर्यंतच होती. आता तिचे वचनातून पार पडलो. अतःपर येथे गुंतून राहणे ठीक नाही. असे म्हणून तेथून पलायन केले. ते जांबगावी अश्वत्थाचे वृक्षावर जाऊन बहुत निबिड व अवघड जागेत बसले. ते त्या वृक्षावर तीन दिवस तसेच राहिले. इकडे लग्नाचे स‌मारंभातून स‌मर्थ पळून गेले, हे ठीक नाही तर शोध करावा असा विचार करून स‌र्वत्रांनी व मातोश्रींनी बहुत शोध केला. परंतु कोठेच ठिकाण लागेना, म्हणून त्या मुलीस दुसरा वर पाहून लग्न केले."

असाच मजकूर 'दासविश्रामधामा'तही येतो.

मात्र समर्थ पलायनाची तपशीलात काहीसा फरक असलेली एक अन्य हकीकतही सांगण्यात येते. 'केसरी'चे माजी स‌ंपादक रा. रा. ज. स. करंदीकर यांनी आपल्या 'श्री समर्थचरित्रा'त लिहिले आहे - "अंतपाट धरून 'शुभंगल सावधान'चा घोष होईपर्यंत नारायण स्तब्ध उभा होता आणि सावधान शब्द ऎकल्याबरोबर तो तेथून निसटला आणि गुप्त झाला, असे जे वर्णन करण्यात येते त्यात कविसंप्रदायाला शोभणारी अतिशयोक्ती असावी असे दिसते." (पान 10)

स‌मर्थांच्या विविहाचा मुहुर्त 'दासविश्रामधामा'त फाल्गुन शु. 8 ला अकरा घटका दिवसाचा असा दिलेला आहे. मात्र 'स‌मर्थ प्रतापा'त हा मुहूर्त रात्रीचा दिलेला आहे. समर्थप्रताप अधिक विश्वसनीय ग्रंथ आहे. त्यात 'स‌मर्था फावली मध्यरात्र' आणि 'स‌मर्थामागे लोक धावले मध्यरात्री। समर्थ कोणासी न दिसती रात्री' असे वर्णन केलेले आहे. भर दुपारी अक्षता टाकण्यासाठी मंडपात स‌र्व लोक जमले असताना त्यांच्यातून पळून जाणे आणि मग कोणासही न सापडणे हे कठीण दिसते. स‌मर्थ प्रताप सांगतो त्याप्रमाणे लग्नाचा मुहूर्त रात्रीचा असेल, तर ती वेळ पळून जाण्यासाठी अधिक योग्य ठरते. एकंदर स‌मर्थ प्रतापानुसार नारायण पळाला तो रात्रीच्या वेळी आणि तेही बोहल्यावरून नव्हे, तर तत्पूर्वी, लग्नघटिकेच्या आधी. रा. रा. स. कृ. जोशी यांनी आपल्या 'जय जय रघुवीर समर्थ' या पुस्तकात लग्नाची वेळ रात्रीची होती असेच म्हटले आहे. "अंधारी रात्र, मंडपात गर्दी झालेली, भराभर दिवे विझवून नारायण पळाला." असे त्यांनी म्हटले आहे. (पान 19)

परंतु याहून स‌र्वस्वी भिन्न अशीही एक हकीकत आहे. स‌मर्थ हे लग्नातून नव्हे, तर अन्य कारणामुळे पळाले असे रा. रा. वि. ल. भावे-तुळपुळे यांनी 'महाराष्ट्र सारस्वता'त (पाचवी आवृत्ती, पान 314) म्हटले आहे. त्यांनी सांगितलेली कहाणी अशी - "लहानपणी रामदासांच्या थोरल्या बंधूला त्यांच्या वडिलांनी मंत्रोपदेश व अनुग्रह दिला. तो आपल्यालाही द्यावा असा आग्रह रामदासांनी धरला. परंतु तुला अधिकार नाही म्हणून बापाने निवारले व मंत्रानुग्रह दिला नाही. या गोष्टीची चीड येऊन नारायण हा रागाने घरातून निघून गेला." या मजकुरावर सारस्वतकारांनी एक टीपही दिली असून, त्यात म्हटले आहे, की

"नारायण ऊर्फ रामदास हा लहानपणी आपल्या लग्नाच्या वेळी अंतःपट धरला असताच, ब्राह्मण अष्टके म्हणत होते तोच नदाचा शेला दूर होण्यापूर्वीच तेथून एकदम पळाला, अशी हकीकत बखरकार सांगतात. ही गोष्ट महाराष्ट्रात स‌र्वभर मानली जाते. पण वर दिलेली हकीकत 'श्री सांप्रदायिक विवध विषय' या पुस्तकात दिली आहे. ती जास्त स्वाभाविक व खरी वाटते. स‌ावधान शब्द ऎकून पळून गेल्याच्या हकीकतीत काव्य आहे. ती सांगण्याला आणि ऎकण्याला गोड आहे. मोठ्या लोकांसंबंधी अशा गोड काव्यमय हकीकती चरित्रकार हौसेने सांगतात व पुष्कळ वेळा स्वतः चरित्रनायक अशा अद्भूत हकीकती पसरविण्यास कारण होतात. पण पुष्कळदा त्या स‌त्यशोधनाच्या आड येऊन चरित्रकारास फसविण्यास व वाचकास रंजविण्यास मात्र कारणीभूत होतात."

'रामदास जन्मकथा'कारानेही तसेच म्हटले आहे.

संदर्भ -
आचार्य अत्रे यांनी 23 डिसेंबर 1968 रोजी 'मराठा' मध्ये लिहिलेला श्री स‌मर्थांची टवाळी (भाग 2) हा लेख.

वाद रामदास-शिवाजी संबंधाचा!स‌मर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते काय, हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय राहिलेला आहे. या वादात स्वाभाविकच दोन पक्ष आहेत. पहिला पक्ष आहे महाराजांची व समर्थांची भेट शके 1571 मध्ये झाली होती असे मानणारांचा, तर दुस-या पक्षाचे म्हणणे आहे, ही भेट शके 1594 मध्ये झाली होती.


पक्ष पहिला

पहिल्या पक्षानुसार छत्रपती आणि रामदास स्वामी यांचे अतिशय निकटचे संबंध होते. शिवाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचे जे कार्य हाती घेतले होते, त्यामागील प्रेरणा समर्थांची होती. यास आधार म्हणून शिवाजी महाराजांनी रामदासांना लिहिलेले एक पत्र सादर करण्यात येते. चाफळची स‌नद म्हणून ते पत्र ओळखले जाते. ते असे -

" श. 1601-2
सु. 1080-81
इ. स. 1679-80

शिवाजी-रामदास

चरणरज शिवाजी राजे यानी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे, मजवर कृपा करूनु स‌नाथ केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव ब्राह्मणांची सेवा, प्रजेची पीडा दूर करून पाळणा रक्षण करावें. हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जें मनीं धराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा; विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऎशीं स्थळें दुर्घट करावी; ऎसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें पूर्ण केलें. या उपरी राज्य संपादिलें. तें चरणीं अर्पण करुनु स‌र्वकाळ सेवा घडावी ऎसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं, तुम्हास पूर्वी धर्म सांगितलें तेच करावे. तीच सेवा होय. ऎसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची स्थापना कोठे तरी होउनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऎशी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगव्हारी वास करुनु चाफळी श्रीची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंतविस्तिर्णता घडली."
(शिवकालीन पत्रसार संग्रह 2237)

या पत्राचा मायना पाहता शिवाजीराजे यांच्या जीवनात रामदासांचे अतिशय महत्त्वाचे स्थान होते, असे दिसते. शिवरायांनी रामदासांच्या झोळीत राज्य टाकले होते, अशी कथा सांगण्यात येते. तिचाही उल्लेख या पत्रात आहे. या पत्राचे महत्त्व हे, की यावरून स्वराज्याची उभारणी होण्यापूर्वीच समर्थांची व शिवरायांची भेट झाली असली पाहिजे हे स्पष्ट होते.

याशिवाय शिव-समर्थांच्या भेटीस अनेक कागदपत्रे आणि ऎतिहासिक संदर्भ यांचे पुरावे आहेत. यातील सर्वांत विश्वसनीय मानला जाणारा पुरावा आहे तो समर्थ वाकेनिशीचा. वाकेनिशी म्हणजे हकीकतीचे टिपण. समर्थ वाकेनिशीमध्ये त्यांच्या दिनचर्येचे वर्णन येते. ती त्यांच्या हयातीतच अनंत गोपाळ कुडाळकर (वाकेनिस) यांनी लिहून ठेवली होती. स‌मर्थ स‌माधिस्त झाल्यानंतर तीनच दिवसांनी (म्हणजे 25 जानेवारी 1682 रोजी), त्यांच्या चरित्रातील महत्त्वाच्या गोष्टींचे टिपण वाकेनिसांनी लिहून ठेवले होते. तीच समर्थ वाकेनिशी या नावाने प्रसिद्ध आहे. या वाकेनिशीतील अठराव्या टिपणात पुढील नोंद आहे. - "शिवाजी महाराज यास अनुग्रह शके 1571त शिंगणवाडीचे बागेत वैशाख शुद्ध नवमीस गुरुवारी झाला."

हनुमंतस्वामी यांच्या बखरीतही हीच तारीख दिलेली आहे. हनुमतस्वामी हे स‌मर्थांच्या घराण्यातीलच. समर्थांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर स्वामी यांच्यापासून ते चौथे पुरुष होत. पूर्वीच्या काळी पूर्वजांच्या आठवणी लिहून ठेवण्याची पद्धत होती, तीनुसार त्यांनी ठोसर घराण्याच्या अनेक आठवणी नोंदविल्या आहेत. हनुमंत स्वामींनी समर्थ चरित्र सांगणारी ही बखर समर्थ स‌माधिस्त झाल्यानंतर एक वर्षाच्या आत लिहिली होती.

शिवाजी महाराजांनी 62 व्यक्तींना स्वतः राज्याभिषेकाचे आमंत्रण दिले होते. साता-याचे इतिहाससंशोधक पारसनीस यांनी या 62 लोकांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यात पहिले नाव रामदासांचे आहे. मात्र रामदास या समारंभास उपस्थित राहिले नव्हते. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो अशी त्यांची वृत्ती असल्याने ते या सोहळ्यास हजर नव्हते इतकेच.

चाफळ, सज्जनगड आणि शिवथर घळ येथे शिव-समर्थांच्या अनेक भेटी झाल्याचे गिरीधर स्वामींनी त्यांच्या समर्थ प्रतापमध्ये नमूद केले आहे.

यावरून शिवाजी महाराज यांची व समर्थ रामदासांची भेट शके 1571 मध्येच झाली आणि रामदास हे शिवाजीचे गुरू होते, असे स्पष्ट होते.


पक्ष दुसरा

शिवाजी महाराज व समर्थांची भेट शके 1571ची म्हटल्यावर शिवरायांच्या कार्यामागे समर्थांची प्रेरणा असल्याचे आपोआपच सिद्ध होऊन जाते. दुस-या पक्षास हे मान्य नसून, त्यांच्या म्हणण्यानुसार राजांच्या स्वराज्य उभारणीशी समर्थांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या मते ही भेट शके 1594 किंवा त्यानंतरची आहे. यावेळेपर्यंत शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभारणीचे काम संपत आले होते. तेव्हा रामदास हे जरी त्यांचे गुरू ठरले तरी ते केवळ मोक्षगुरू ठरतात.

हा 1594चा वाद सुमारे शंभर वर्षांपूर्वी रा. रा. गोविंद चांदोरकर यांनी प्रथम निर्माण केला. चांदोरकर हे वारकरी सांप्रदायाचे अभिमानी होते. आणि वारकरी सांप्रदायाच्या संतमालिकेत रामदासांना स्थान नाही, हे तर सर्वश्रुतच आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी समर्थांची बाजू घेऊन वारकरी संतांना टाळकुटे वगैरे म्हटल्याने चांदोरकर दुखावले होते. तशात त्यांना रामदासी सांप्रदायासंबंधी काही पत्रव्यवहार उपलब्ध झाला. त्यात त्यांनी शके 1594 साली केशव गोसावी यांनी दिवाकर गोसावी यास लिहिलेल्या एका पत्राची नक्कल सापडली. ते पत्र असे -

"श्री गुरुभक्त-परायण राजमान्य राजेश्री दिवाकर गोसावी यासी प्रतिपूर्वक केशव गोसावी नमस्कार. उपरि येथील कुशल. आपण पत्र पाठवले ते पावले. मजकूर समजला. राजेश्री शीवराजे भोसले हे समर्थांचे भेटीस येणार म्हणोन लिहिले ते स‌मजले. मी येणार होतो परंतु माझी प्रकृती फार बिघडली. येणे होत नाही. मी इकडून येणेसाठी लिहिले. परंतु एकाचेही येणे व्हावयाचे नाही. गावी भानजी गोसावी तेथे असतील. राजे ह्यांची पहिलीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटेस आणावे. उपयोग होईल. झाडी बहुत आहे. लोभ करावा मीति चैत्र व।। 1 शके 1594 हे विज्ञाप्त."

या पत्रात 'राजे ह्यांची पहिलीच भेट आहे' असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ राजे व समर्थांची तत्पूर्वी भेटच झाली नव्हती असा होतो. त्यामुळे बाकीच्या बखरींचे स‌र्व पुरावे गळून पडतात व शिवरायांनी समर्थांचा अनुग्रह घेतला असेल, तर तो यानंतर म्हणजे वयाच्या 42व्या वर्षानंतर असे सिद्ध होते.


हे झाले दोन पक्ष. यात पहिल्या पक्षाचे पारडे जड आहे, हे दिसतेच आहे. त्यांच्याकडे भरपूर पुरावे आहेत. त्यातील काहींबाबत संशय घेण्यास जागा असली तरी हे पुरावे शिव-समर्थांचे संबंध शिवरायांनी कार्यारंभ केला तेव्हापासूनचे आहेत हे सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, असे दिसते व दुस-या पक्षाचा स‌र्व डोलारा केवळ पहिलीच भेट झाली या एका वाक्यावर अवलंबून आहे हेही दिसते.


तिसराच पक्ष

मात्र स‌ध्या एक तिसरा पक्ष जोर धरू पाहात आहे. येथे त्याबाबत लिहावे की न लिहावे असा संभ्रम काही क्षण मला पडला होता. या पक्षाचे म्हणणे असे, की रामदास आणि शिवाजी यांची कधी भेटच झाली नव्हती. आता हे काही आजचे मत नाही. प्रा. न. र. फाटक यांनी तर 1929 मध्ये असे मत मांडले होते. जुलै 1929 च्या 'विविधज्ञानविस्तारा'त त्यांनी म्हटले आहे, की "जवळच्या स‌मकालीन लेखकांनी या दोघांच्या आपसातील संबंधांचा ओझरतासुद्धा उल्लेख करू नये व मागून झालेल्या लेखकांनी तोच संबंध कादंबरीसारखा विलक्षण गुंतागुंतीच्या विस्तारासह नमूद करावा ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे." (पृ. 256) मात्र आज हे मत मांडताना स‌भ्यतेच्या किमान मर्यादाही पाळल्या जात नाहीत. त्याचे उदाहरण म्हणून नागपूरच्या प्रा. मा. म. देशमुख यांच्या 'रामदास आणि पेशवाई' या पुस्तकाकडे पाहता येईल.

या पूर्वीच्या दोन लेखांमध्ये आपण रा. रा. पु. ना. ओक आणि रा. रा. आचवल यांचे 'इतिहाससंशोधन' पाहिले होते. त्यांना त्याद्वारे वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व कथन करायचे होते. रा. रा. देशमुख यांना त्यांच्या संशोधनातून ब्राह्मणांना ठोकायचे असून, बहुजन समाजाला पेटवायचे आहे.

रा. रा. देशमुख यांच्या पुस्तकातील रामदासांविषयीच्या प्रकरणाचे नावच मुळी 'रामदास औरंगजेबाचा हेर होता' असे आहे. त्यांच्या मते - रामदास शिवाजीचे गुरू नव्हते. पण दिनायतराव, मुरार जगदेव, मुधोळचा बाजी घोरपडे या विजापूरच्या अदिलशहाच्या अंमलदारांचे, शिवाजीच्या शत्रूंचे ते गुरू होते. या अंमलदारांनी रामदासांच्या नव्या देवस्थानाला जमिनी इनाम दिल्याचा उल्लेख आहे. ज्या वर्षी शिवाजी राजांच्या पुंडाव्याबद्दल अदिलशहाने आपल्या अंमलदारांना जरबेची पत्रे लिहिली, त्याच वर्षी त्याच्याच हुकुमाने रामदासांनी मसुराच्या रामनवमीच्या उत्सवात आलेली आडव्या फांदीची अडचण निस्तरून घेतली.

रामदास आणि औरंगजेबाचे संबंध होते. कधी कधी प्रसंगोपात त्यांच्या भेटी होत. त्या भेटी देव एकच आहे हे सांगण्याकरीता होत, असे 'दासविश्रामधामा'त म्हटल्याचे रा. रा. देशमुख यांनी रा. रा. शंकरराव देव यांच्या 'स‌मर्थचरित्रा'चा हवाला देत आपल्या लेखात म्हटले आहे.

संभाजीराजांचे वर्तन सुधारावे म्हणून शिवरायांनी त्यांना शृंगारपुरी ठेवले होते. संभाजी सोबत तेथे उमाजी पंडित होता. तेथून संभाजी स‌ज्जनगडावर रामदासांची भेट घेण्यासाठी गेला आणि त्याच्या दुस-याच दिवशी स‌ज्जनगडावरून तो थेट औरंगजेबाचा सुभेदार दिलेरखानाकडे गेला. तारीख होती 13 डिसेंबर 1678. ही घटना रा. रा. देशमुख यांनी रामदासांच्या हेरगिरीचा नमुना म्हणून दिली आहे! म्हणे, रामदासांच्या स‌त्संगतीचा संभाजीवर असा परिणाम झाला!

रा. रा. देशमुख यांची एवढी उद्धृते पुरेशी आहेत. या पुस्तकात त्यांनी याहून कहर केला असून, रामदासांवर थेट अनैतिक असल्याचे आरोप केले आहेत.

जातीयवादी प्रचाराचा उत्तम नमुना एवढेच म्हणून या पुस्तकाकडे पाहावे.

-----------------------------------------------------

वास्तविक शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी असे होते, त्यांनी त्यांना स्वराज्यस्थापनेची प्रेरणा दिली असे म्हटल्याने काहीही बिघडत नाही. शिवाजी महाराजांचे तसे गुरू आणखीही काही होते. त्या काळच्या अनेक संतसज्जनांशी त्यांचे संबंध होते. त्यांच्या भेटी ते घेत असत. प्रेरणांचे म्हणावे, तर ती जशी धार्मिक ग्रंथ नि पुरूषांपासून मिळते, तशीच ती आजुबाजूच्या वास्तवातूनही मिळत असते. आणि राजांचा या वास्तवाकडे कधीही काणाडोळा झालेला नाही. फार फार तर येथे एवढे म्हणता येईल, की रामदासांशी संबंध असल्याचे सांगून राजांना उगा हिंदुत्ववाद्यांच्या रथात नेऊन बसवू नये.


संदर्भ -
- महापूर - आचार्य अत्रे, परचुरे प्रकाशन मंदिर, पहिली आवृत्ती ऑगस्ट 1999, या पुस्तकातील स‌मर्थांचे स‌त्वहरण भाग 1 ते 3 हे लेख - पा. 190 ते 203.
- छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे - प्र. न. देशपांडे, स‌ुषमा प्रकाशन, धुळे, पहिली आवृत्ती 1983, पत्र क्र. 193, पा. 243.
- रामदास आणि पेशवाई - प्रा. मा. म. देशमुख, शिवभारती प्रकाशन, पहिली आवृत्ती 1992.
- शिव-समर्थ भेटीचे अनेक पुरावे - सुनिल चिंचोलकर, स‌ज्जनगड मासिक पत्रिका, 16 फेब्रुवारी 2001, पा. 25 ते 28.

आपले पूर्वज काय खात असत?

ऋग्वेदातील आर्य हे पशुपालन करणारे टोळी-संघ होते. त्यांचे कांस्य युगात भारतीय उपखंडात आगमन झाले. पशुपालन करणा-या या आर्यांचे मुख्य पशुधन गोधन होते. साहजिकच त्यांच्या भोजनात गायीगुरांपासून मिळणा-या पदार्थांचा स‌मावेश असणार. भारतीय उपखंडात आल्यानंतर या आर्यांनी शेती करण्यासही सुरुवात केली. पशुपालन जीवनपद्धतीमुळे शेती ही मुख्यतः गायी व अश्व यांना चारा देण्याच्या हेतूने करण्यात येत असे. त्यासंदर्भातले एक सूक्त ऋग्वेदात आहे - क्षेत्रस्य पतीना वयं व हितेन जयामसी गामाश्वं पोशयिन्ता स‌नो मुळातिदृशे (4/57)

ऋग्वेदाचा अंतकाळ, यजुर्वेदकाळ ह्या काळातच शेती व्यवस्थेची सुरूवात झाली. ऋग्वेदात फक्त याव (बार्ली) या धान्याचा उल्लेख आहे. यानंतरचा काळ ब्राह्मणग्रंथांचा काळ. या काळात अगोदरच्या मानाने शेतीतंत्र प्रगल्भ झाले होते. शस्यम या नावाने ओळखला जाणारा तांदूळ हे या काळातले मुख्य पीक. यजुर्वेदात तांदूळ, सातू, बोरे, जव, स‌ाळी या धान्यप्रकारांचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे हविर्भागात तूप, दही, मध, काकडी, साळीच्या लाह्या यांचा स‌मावेश आहे.

ऎतरेय ब्राह्मणात तांदूळ व बार्ली यापासून तयार होणा-या धान, करंभ, परिवाप, पुरोडाश, पायस्या अशा पदार्थांची नावे आहेत. शतपथ ब्राह्मणात युवागुं या अन्नपदार्थाचा उल्लेख आहे. तो याव या धान्यापासून तयार करण्यात येत असावा. तैतिरेय ब्राह्मणात पृथुका, स‌क्तु, लाज (लाह्या. लाजाहोम - लज्जाहोम हा शब्द यापासूनच आला.), धाना, मसूस्य आणि करंभ अशा पदार्थांचा उल्लेख येतो. सायनाचार्य या जुन्या टीकाकाराच्या मते हे स‌र्व पदार्थ तांदूळ व बार्ली यांपासून बनविलेले आहेत. दुर्गाबाई भागवत सांगतात, वेदकाळातला पुरोडाश हा पदार्थ आपल्या इडलीसारखीच, पण मऊसा, लुसलुशीत, फारसा न फुगलेला पदार्थ असावा. तो तेव्हाच्या लोकांच्या नेहमीच्या आहारात असे आणि त्याचा नैवेद्य दाखवित असत. मात्र जयंत गडकरी यांच्या मते पुरोडाश हे दूध व लाह्या यांचे असावे.

मांसाहार

मात्र ब्राह्मणकाळात शेतीतंत्र आधीच्या काळापेक्षा प्रगल्भ झालेले असले, तरी धान्योत्पादन हे अजूनही गुजराण करण्याचे मुख्य साधन झाले नव्हते. या काळातही पशुंचे मांस हेच महत्त्वाचे अन्न होते. त्यांत गाय, बैल, मेंढा, बकरा हेच मुख्य मांसाशन होते. विविध यज्ञांचा भाग म्हणून पशुयज्ञ होत. त्यामध्ये नेहमीच्या ग्राम्य पशूंबरोबर हरीण, मोर, तित्तीर, रेडा अशा विविध वन्य प्राण्यांचीही हत्या केली जाईल. श्राद्धसंसंस्कार विषयक समारंभांत बैलाचे मांस खाल्ले जाई. (जोगीराज बसू यांच्या एज् ऑफ ब्राह्मणाज या ग्रंथात ही माहिती दिली आहे.) शतपथ ब्राह्मणात स्पष्ट शब्दांत सांगितले आहे, की 'राजा किंवा ब्राह्मण घरी पाहुणा आल्यास त्या प्रीत्यर्थ बैल किंवा बकरा मारावा.' (राज्ञे वा ब्राह्मणाय वा महोक्शम् वा महाजाम् वा पचेत्). ऎतरेय ब्राह्मणांतही राजा किंवा प्रतिष्ठित गृहस्थ पाहुणा आल्यास बैल वा वंध्या गाय मारावी, असे सांगितले आहे. (मनुष्यराजे आगते न्यास्मिन् वा अर्हती उक्षाणाम् वा वेहतम् ला क्षदन्तः) शतपथ ब्राह्मणाचे एक कर्ते याज्ञवल्क्य म्हणतात - मी गायबैलाचे मांस खातो, पण ते मऊ असेल तरच! शतपथ ब्राह्मणात मांसाशनाची स‌र्वांत चांगले अन्न म्हणून प्रशंसाही केली आहे. (...एतदू परमम् अन्नाद्यम् यन् मांसम्)

आज मांसाहार आणि गोहत्या निषिद्ध मानण्यात येत असले, तरी प्राचीन आर्य-ब्राह्मणांसाठी तो धर्मकृत्यांचा एक भाग होता. सत्ययुगातल्या सोळा श्रेष्ठ राजांपैकी एक असा जो रन्तिदेव, तो अतिथीधर्मासाठी खूपच प्रसिद्ध होता. महाभारतातील वर्णनानुसार त्याच्या पाकशाळेत रोज दोन हजार गायींचा वध होत असे. त्यांची ओली चामडी पाकशाळेत ठेवलेली असत. त्यांतून झिरपणा-या पाण्याचा एक प्रवाह बनून मग त्याची नदी बनली. चर्मामधून उगम पावणारी नदी म्हणून तिला चर्मण्वती नाव पडलं! महाभारतातला तो श्लोक असा आहे -

राज्ञो महानसे पूर्वं रन्तिदेवस्य वै द्विज
आहन्यहनि वध्यते द्वो स‌हस्त्रो गवां तथा
स‌मासं ददतो हन्नं रन्तिदेवस्य नित्यशः
अतुला कीर्तिरभवन्नृपस्य द्विजसत्तम
(वनपर्व, 208/8-10 )

गायींचा वध करणा-या या रन्तिदेवाचं कीर्तिगायन कालिदासाने मेघदूतामध्ये केले आहे.

पुढे साधारणतः बुद्धोत्तरकालात गोमांसवर्जनास सुरूवात झाली. पं. राहुल ‌सांकृत्यायन यांच्या प्रतिपादनानुसार, ब्राह्मण हे बौद्धांना आपले जबरदस्त प्रतिस्पर्धी मानीत असत. बौद्ध गोमांसभक्षक होते. म्हणून मग ब्राह्मणांनी गोमांसवर्जन आणि गोब्राह्मणसंरक्षण यांचा प्रचार सुरू केला. धर्मसूत्रांत विविध प्राण्यांचे मांस निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. दूध देणारी गाय (धेनू, अनु दुहा) व बैल यांचे मांस खाण्याच्या निषेधाने याची सुरूवात झाली आहे.


चटणी-कोशिंबिर...

महाभारत काळात (इसवीसन पूर्व सुमारे 300 वर्षे हा मूळ महाभारताचा काळ असल्याचे मत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मांडले आहे. मात्र महाभारताची संस्करणे लक्षात घेता हा काळ इसवीसनाच्या आठव्या-नवव्या शतकापर्यंत येतो.) वराहाचे आणि हरिणाचे मांस लोकांचे आवडते होते. त्याचबरोबर याकाळी भाज्या, आमट्या, चटण्या, कोशिंबिरी, गोड पदार्थ तयार होत होते. तांदूळ, गहू, ज्वारी, सत्तू इत्यादी धान्ये लोकांच्या खाण्यात होती. उत्तम कंदमूळे, फळे, मध, तूप, स‌ुंठ घालून पक्वान्ने तयार करीत.


मद्यपान

आपल्या पूर्वजांना मद्यपान निषिद्ध नव्हते. ऋग्वेदापासून मद्याचे उल्लेख आढळतात. ऋग्वेदात सोम हा देव आहे. पण मुळात ते आर्यांचे उत्साहवर्धक पेय आहे. सोमवल्ली नावाच्या वेली कुटून ते केले जाई व कुटण्याची क्रिया ग्राव या कठिण दगडाच्या साह्याने केली जाई असे उल्लेख वारंवार येतात. ऋग्वेदात तर एक ग्रावसुक्त आहे. सोमात दूध घातले जाई. पं. राहुल सांकृत्यायन यांच्या मते सोमात घोडीचे दूध मिस‌ळले जाई. यावरून ते आपण समजतो तसे आधुनिक मद्य नाही. ती भांग होय. हा पदार्थ नित्यसेवनात असे.

पुरुषमेध यज्ञामध्ये तेव्हाच्या स‌र्व कारागिरी व्यवसायांचा एकत्रित उल्लेख आहे. त्यात सुराकार म्हणजे दारू बनविणारा याचाही स‌मावेश आहे.

दुर्गाबाई भागवतांनी सीतेबद्दलही अशीच एक रंजक माहिती दिली आहे. त्या सांगतात, की सीता ही क्षत्रिणी होती, मांसाहारी होती. वनवासाला निघताना सुरूवातीलाच शरयू नदी ओलांडून जायच्या अगोदर तिने तेथील देवीची पूजा केली. तिला सांगितलं, की वनवासातून सुखरूप परत आल्यावर मी स्वतः मांसाचा स्वयंपाक करून तुला नैवेद्य दाखविन आणि मद्य देईन. त्याठिकाणी तो पदार्थ कोणत्या प्राण्याच्या मांसाचा वगैरे काही दिलेले नाही. सीता तांदळापासून मैरेय नावाचे मद्य बनवायची, असाही उल्लेख आहे.

कौटिलिय अर्थशास्त्रात मद्य कसे करायचे याची माहिती दिलेली आहे.


प्राचीनांची पाककला

भीम हा खादाड असल्याचे आपणांस माहित असते. पण तो उत्तम स्वयंपाकीही होता. अज्ञातवासात असताना विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणूनच तो नोकरी करीत होता. (म्हणजे हा तर जगातला पहिला सेलेब्रिटी शेफ!) या भीमाच्या खात्यावर दोन छान पदार्थ जमा आहेत. श्रीखंड कसे करायचे हे त्यानेच शोधून काढले. आज आपण खातो त्या फ्रूट स‌लाडचा शोधही भीमानेच लावला आहे. पण त्याचं फ्रूट सलाड दुधातले नव्हते. दही, साखरेत वेगवेगळी फळे घालून ते केलेले असे. त्याला शिखरिणी असे नाव होते. म्हणजे हे आपले शिकरण!

भीमाप्रमाणे श्रीकृष्णही पाकशास्त्र जाणत होता. त्याने घीवर हा पदार्थ शोधून काढल्याचे सांगितले जाते.

पुराणप्रसिद्ध नलराजा याचे तर पाकशास्त्रावर एक पुस्तकच आहे. तो विविध खाद्यपदार्थ करण्यात पारंगत होता. आपण ज्याला मसाले म्हणतो त्याला तो धातू म्हणतो. पाणी थंडगार कसे ठेवायचे, ते सुवासिक कसे करायचे, पाण्याचा बर्फ कसा करायचा हेही त्याने सांगितले आहे. नलराजा हिमालयाजवळ राहणारा. त्यामुळे त्याने हिमालयावरून बर्फ खाली कसा आणायचा, तो साठवून ठेवायचा कसा हेही सांगितले आहे. या नलराजाची आठवण म्हणून आजही धुंधुरमास केला जातो. (धुंधुरमास म्हणजे पहाटे उठून स्वयंपाक करून सूर्योदयालाच जेवायची पद्धत.)

एकंदर तेव्हाचे पुरूष, एवढेच नव्हे, तर राजे वगैरे लोकही पाककुशल असत. आता पुरुषांनी स्वयंपाक करणे यात काही विशेष नाही. आजही लग्नकार्यासारख्या मोठ्या समारंभात स्वयंपाक करायचा असेल, तर तो पुरुषच करतात.


संदर्भ -
- समाज आणि धर्म - ऋग्वेदकाळ ते पुराणकाळ - जयंत गडकरी, ग्रंथाली, पहिली आवृत्ती - 1989, पाने - 7, 10, 45 ते 47.

- ऎसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे, राजहंस प्रकाशन, नोव्हें. 1999, पाने 151 ते 156.

- वोल्गा ते गंगा - राहुल सांकृत्यायन, लोकवाड्मय गृह, दहावी आवृत्ती 2006, पाने 27, 164, 165, 167.

ख्राईस्ट म्हणजे कृष्ण आणि मुसलमान हे सामवेदी !!!?

गोपाळ गणेश आचवल यांच्यापासून पु. ना. ओक यांनी प्रेरणा घेतली की कसे हे नक्की सांगता येणार नाही, पण ओक यांच्या संशोधनात आणि आचवल यांच्या संशोधनात खूपच साम्य दिसून येते.

ग्रंथाच्या प्रस्तावनेत आचवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकामध्ये त्यांनी मक्केविषयीचा मजकूर पाहिला आणि त्यांना हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मग त्यांनी जयंतराव टिळकांकडून एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाचे खंड आणले. काही संदर्भ पुस्तके विकत घेतली. शिवाय हिंदुधर्माविषयीचा त्यांचा अभ्यास होताच. त्यातून हा 510 पानांचा महाग्रंथ बाहेर पडला. या ग्रंथाची प्रस्तावनाच 140 पाने आहे. या अभ्यासातून आचवल यांना काय सिद्ध करायचे होते तर ते हे, की सर्व जगभर वैदिक धर्म होता.

ग्रंथाच्या पहिल्या दोन प्रकरणात त्यांचा मुख्य भर बायबलवर आहे. बायबलमध्ये कृष्णमयता किती आहे, हे सांगताना ते लिहितात, कृष्णमास आणि ख्रिसमस हे एकच. ख्राईस्ट म्हणजे कृष्ट म्हणजे उटी लावलेला, स‌ेंट जॉन म्हणजे स‌ंत जनार्दन, स‌ेंट मऍथ्यू म्हणजे संत माधव.
जुदा इस्कारियट म्हणजे यदुवंशी अक्रूर याने जेजस ख्राईस्ट म्हणजे यशोदा कृष्ण याला हेरोदी म्हणजे हरिविरोधी कंस याच्याकडे मारावयास हवाली केले. ओकांनीही शब्दोत्पत्तीच्या साम्यावर अशाचप्रकारे भर दिलेला आहे.

मुसलमानांविषयीचे आचवलांचे संशोधन तर अफलातून आहे. त्यांच्या संशोधनानुसार मुसलमान हे स‌ेमेटिक म्हणजे सामवेदी. मुसलमान म्हणजे लढाईत मुसलायुध वापरणारे लोक. ते स‌लाम म्हणतात तो श्रीराम. मुसलमानातले स‌ुनी म्हणजे वैष्णव आणि शिया म्हणजे शैव. मुसलमानांचा शादी हा शब्द स‌ीतेपासून आला. महंमद पैगंबराच्या आईचे नाव अमिना (यमुना) होते. त्याच्या मुलीचे नाव फातमा (पद्मावती) होते. त्याच्या दुस-या बायकोचे नाव Sauda स‌ीता असे होते.

हे काही संशोधन नमुनेही पाहण्यासारखे आहेत. -

इंद्राने जेव्हा अतिवृष्टी केली तेव्हा गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांनी उचलून धरला. त्या कथेला अनुलक्षून girder (गिरिधर) तुळई असा शब्द आहे. Beam म्हणजे तुळई असा शब्द आहे, तोदेखील ती तुळई भीमासारखी मजबूत असावी, अशा अर्थी आहे.

हिप हिप हुर्रा म्हणजे हे प्रभो प्रभो हरे. (पु. ना. ओक यांनी याची व्युत्पत्ती स‌ीप स‌ीप हरे - शीव शीव हरे अशी दिली आहे.)

हनीमून म्हणजे हनुमान. (हनुमानाप्रमाणे ब्रह्मचर्य पाळणे.)

पेशव्यांच्या दरबारी इंग्लिश रेसिडेन्ट मऍलेट - मारूती होता.

क्रुसेड म्हणजे क्रिश्चन - श्रीकृष्णानुयायांनी मुसलमानांबरोबर श्रीकृष्णाप्रीत्यर्थ केलेले युद्ध.

युरोपियन लोक वृंदावनाला ब्रऍंडिवाईन आणि शंकराला शूमेकर म्हणतात.

जोन ऑफ आर्क म्हणजे जनाबाई.


आता याला इतिहास संशोधन म्हणायचे की काय, हे ज्याने त्याने ठरवावे.
पण एक मात्र खरे, की या पु.ना. स्कूलचा प्रभाव अनेकांवर आहे.

मध्यंतरी एक कादंबरी वाचली. 'पाताळयात्रा' नावाची. लेखक आहेत अनिल ज. पाटील. (उन्मेष प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, 2002, पाने 276, किं. 200 रु.) अतिशय मनोरंजक, रहस्यमय अशी ही कादंबरी. हातात घेतली तर वाचल्याशिवाय खाली ठेववणार नाही अशी. बळीराजाला वामनाने पाताळात लोटले या कथेवर ही कादंबरी आधारलेली आहे. पाताळ म्हणजे पेरूदेश आणि तेथे बळीला धाडण्यात आले, असे कल्पून लिहिलेली ही कादंबरी एखाद्या इंग्रजी रहस्यकथेच्या तोडीस तोड अशी आहे. या कादंबरीत रा. रा. पु. ना. ओक यांच्या ऋणाचा निर्देश केला असून, अन्य ग्रंथांप्रमाणेच ओक यांच्या काही पुस्तकांचाही संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केलेला आहे.

रा. रा. अनिल पाटील यांनी पेरू, तेथील इन्का संस्कृती आणि वैदिक व द्रविडी संस्कृती यांत नाते असल्याचे कादंबरीत दाखविले आहे. एकूणच मोठे मनोरंजक, तितकेच गंभीर असे ते आहे.
ते वाचल्यानंतर वाटते, की पुना स्कूलच्या अंगाने जाण्यापेक्षा इतिहाससंशोधकांनी अधिक गंभीर मार्ग चोखाळला तर किती बरे होईल.


संदर्भ -
- आगळं-वेगळं - स. गं. मालशे, सुपर्ण प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती 1986, पाने 146 या पुस्तकातील विश्वव्यापी वैदिक संस्कृती हा लेख.

इतिहास संशोधनाचं 'पुना' स्कूल

'खरा इतिहास' असं काही असतं काय याबद्दल माझ्या मनात शंका आहेत.

आपण उदाहरणार्थ चारशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट अशी अशी घडली हे कशावरून सांगतो, तर त्याबाबतच्या लेखांवरून. ते लेख ग्रंथांतले असतात, बखरींतले, कुणाच्या रोजनिशीतले, पोथीतले, ताम्रपटावर वा शिळेवर कोरलेले वगैरे असतात. तर अशी काही इतिहासाची साधने आपण अभ्यासतो आणि मग सांगतो, की ती घटना अशीच घडली. पण तेवढ्यावरून ती घटना तशीच घडली हे कसे काय बुवा नक्की होते? माझ्यापुढचा प्रश्न हा आहे. स‌मजा एखाद्या घटनेबाबत दोन मतं असलेले पुरावे सापडले. तर मग काय करायचं? मग वाद होतात. दोन्ही पक्ष आपण सांगतो तेच खरं असं मानू लागतात. आपल्याकडे शिवजयंतीचा वाद झाला होता मागे, तसं ते स‌गळं होतं.

म्हणजे आज आपण जे खरं मानून चालतो इतिहासातलं, ते खरं असतं ते आज उपलब्ध असलेल्या पुराव्यांपुरतंच. उद्या आणखी काही पुरावे मिळाले, तर आजचं खरं उद्याचं खोटं ठरू शकेल. तेव्हा इतिहासकारानं उगाच न्यायाधीश बनू नये. स्वतःस ब्रह्मदेव स‌मजण्याची चूक करू नये आणि अस्मितांच्या वगैरे गोंधळात तेल ओतण्याचे उद्योग करू नयेत. त्याने आपलं स्वच्छ सांगावं, की बाबांनो, आज उपलब्ध असलेला पुरावा हा असा असा आहे. त्याचा अन्वयार्थ मी असा असा लावलेला आहे. त्यासाठी माझी अभ्यासाची, विचारांची दिशा ही ही होती. तेव्हा आहे ते एवढंच आहे. बस्स! या पुढे एक अक्षर जास्त नाही की कमी!

आता असं होत नाही का? मी एकाही इतिहासकारावर अप्रामाणिकपणाचा आरोप करण्यास तयार नाही. पण होतं काय की इतिहासकार ही माणसेच असतात. आणि माणसांकडे आपापले दृष्टिकोन असतात. त्या चष्म्यातून ती इतिहासाकडे पाहू जातात. कडवे राष्ट्रवादी, धार्मिक-वांशिक-जातीय अस्मितावाले, स‌माजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीवाले आणि साम्राज्यशाहीवाले... खूपखूप चष्मे आहेत. त्यातलाच एक मोठा गंमतीदार चष्मा आहे. ओकांचा चष्मा!

आमच्या गावाकडच्या जत्रेत एक तंबू यायचा आरशांचा. हे भले भले आरसे. पण स‌गळे वेडेवाकडे. कधी त्यात आपण बुटके दिसायचो, तर कधी फताडे. कधी उंच, तर कधी काटकुळे. चेहरे तर असे दिसायचे की हसून हसून पुरेवाट व्हायची दुस-यांची! तर हा जो गंमतीदार चष्मा आहे, तो या आरशांसारखाच आहे. त्यातून इतिहासही असाच दिसतो. तर सादर आहे ओकांचा चष्मा!

-------------------------------------------------------------------------------------

वैदिक क्षत्रियांचे विश्वसाम्राज्य

रा. रा. पु. ना. ओक हे एक स‌नातन वैदिक धर्मावर असीम श्रद्धा असलेले इतिहासाचे अभ्यासक होते. आपल्या या अभ्यासातून त्यांनी 'भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका' मांडल्या आहेत. त्यांच्या मते, "कौरवपांडवयुद्धापर्यंत जगात स‌र्वत्र वैदिक क्षत्रियांचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात संस्कृत हीच सर्व मानवांची भाषा होती. चार-पाच हजार वर्षांपूर्वी स‌िरिया, असिरिया, बाबिलोनिया, मेसोपोटेमिया ही प्राचीन राष्ट्रे होती. परंतु सुर व असुरांत वैर होते. वैदिक साम्राज्य मोडल्यानंतर सुरांचे राज्य सुरिय (Syria) व असुरांचे Assyria झाले." त्यांच्या मते बाबिलोनीया म्हणजे बाहुबलनीय व मेसोपोटेमिया म्हणजे महिषीपट्टनीयम = राणिपूर. "वैदिक ‌संस्कृती लोप पावत केवळ सिंधु प्रदेशातच टिकून राहिली म्हणून तिचे नाव हिंदू. वैदिक विश्वसाम्राज्याची भाषा ‌संस्कृत असल्याने प्राचीन काळी देशांची, सागरांची वगैरे नावे संस्कृतच होती." त्या नावांचा नंतर अपभ्रंश झाला. "उदा. स‌िंधुस्थानचे हिंदुस्थान, त्याप्रमाणे अर्बस्थान, तुर्गस्थान, कझाकस्थान, बलुचिस्थान, अफगाणिस्थान इत्यादि. रशिया हे मूळचे ऋषिय होते. स‌ैबेरिया - शिबिरिय, प्रशिया - प्रऋषिय, पार्थिया - पार्थीय, ग्रीस - गिरीईश, युरोप - स‌सुरूप, ऑस्ट्रेलिया - अस्त्रालय, अमेरिका - अमरिश, ऑस्ट्रिया - अस्त्रीय, इजिप्त - अजपती, केनडा - कणाद, उरूग्वे - उरूगावः, ग्वाटेमाला - गौतमालय, जर्मनी अर्थात Deutschland - दैत्यस्थान, Dutch - दैत्य."

तर या पुराव्यांवरून विश्वात पूर्वी वैदिक ‌संस्कृती होती!

इस्लामचे वैदिक मूळ

रा. रा. ओक यांच्या म्हणण्यानुसार इस्लाम हा धर्मही मूळचा वैदिकच आहे! `इस्लामचे वैदिक मूळ' या प्रकरणात ते सांगतात, मक्का नगर इस्लामपूर्व आंतरराष्ट्रीय वैदनक धर्माचे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र होते. मक्का = मखः (म्हणजे यज्ञ) आणि मदिना = मेदिनी (म्हणजे पृथ्वी). यावरून मक्कामदिना ही मखमेदिनी म्हणजे यज्ञभूमी होती. मक्का-मदिनेची उत्पत्ती लागली. पण काबाचे काय? तर "मक्केत शेषशायी विष्णूचे विशाल मंदिर होते. त्याच्या गर्भगृहास ‌संक्षेपाने गाभा म्हणत. त्याचाच अपभ्रंश काबा असा झाला." काबा या स्थानी विविध देवदेवतांच्या 360 मूर्ती होत्या. इ. स. 930 ह्या वर्षी कारमेथियन लोकांनी काबा लुटून त्यातले शिवलिंग पळवून नेले," असे ते एन्सायक्लोपेडिया इस्लामिया आणि एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाचा आधार घेऊन सांगतात. शिवाय अर्वा म्हणजे घोडा. यावरून अर्बस्थान - अर्वस्थान म्हणजे घोड्यांचा देश हे नाम तयार झाले. "यावरून वैदिक क्षत्रियांनी तेथे जातिवंत घोड्यांची उत्पत्ती शास्त्रीय पद्धतीने करविली होती."

इस्लामचा प्रेषित महंमद पैगंबर याचे मूळही वैदिकच होते. ते कसे, तर महंमद हा ‌संस्कृत बहुब्रीही स‌मास आहे. 'महान मदः यस्य इति महंमद'. महंमदाच्या कुलाचे नाव कुरेशी. कुर + ईशी. हे कौरव कुलातील लोक होते. अल्ला, अंबा, अक्का ही देवीची द्योतक स‌मानार्थी नावे आहेत. महंमद पैगंबराची कुलदेवता अल्ला (ऊर्फ अंबा) होती.

येशू ख्रिस्त हे काल्पनिक पात्र

पु. ना. ओक यांच्या मते "येशू ख्रिस्तही वास्तविक काल्पनिक आहे. पण तसा कोणी मनुष्य होता हे खरे मानले तरी एखाद्या भंपक आरोपावर असहाय्यपणे धरून खिळे ठोकून भीषण मृत्यू पावलेला मनुष्य कधी स‌र्वशक्तिमान परमेश्वराचा अवतार असतो का?" असा खडा स‌वाल ते टाकतात. कारण त्यांच्या धारणेनुसार "ईश्वरावतारी व्यक्ती अहिंसावादी असूच शकत नाही."

वास्तविक ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनितीच आहे. तो शब्द ख्रिश्चनिटी = कृस्तनिती = कृष्णनिती असा तयार झाला. Constantine = Cons + Tantine = कंस - दैत्यन्. यावरून युरोपात महाभारतात होते, असे रा. रा. ओक यांचे म्हणणे आहे. जेरूसलेम ऊर्फ येरुशालेम म्हणजे यदु ईशालयम्. आफ्रिकेतील एका बंदराचे नाव दारेसलाम असे आहे. हे द्वार ईशालयचा अपभ्रंश आहे. त्यावरून प्राचीन काळी तेथे एक टोलेजंग श्रीकृष्णाचे वा अन्य देवतेचे मंदिर असले पाहिजे, असेही ते सांगतात.

यावरून राम व कृष्ण यांचे प्राचीनत्व ‌िसद्ध होते असा त्यांचा दावा असून, त्या समर्थनार्थ ते सांगतात, की जपानमधील शिंटो हा शब्द म्हणजे िसंधु स‌संस्कृतीचा अपभ्रंश आहे. चीनमध्ये देव शब्दाचा उच्चार ताओ असा आहे. तेथील ताओ म्हणजे देव हे राम-कृष्ण-शिव इ. असल्याने Taoism (ताओईझम) म्हणजे वैदिक ऊर्फ हिंदु संस्कृतीच. रामवरून Rome झाले, रामघाट म्हणजे इंग्लंडमधील Ramsgate, असे अनेक 'पुरावे' देत रा. रा. ओक राम व कृष्णाचे प्राचीनत्वही स‌िद्ध करतात.

वैदिक संस्कृतीतील विज्ञान

ही वैदिक संस्कृती महान होती हे तर झालेच, पण तिने मोठी वैज्ञानिक प्रगतीही केली होती. रा. रा. ओक यांच्या म्हणण्यानुसार "पूर्वी ज्योतिर्लिंगे ही अणुशक्ती निर्माण करणारी केंद्रे असत... म्हणून शंकराच्या पिंडीवर स‌तत पाणी ठिबकत ठेवलेले असते. शंकराच्या पूजेचे सांडपाणी किरणोत्सर्गी असे म्हणून ते ओलांडून न जाता भक्तगण आल्या वाटेने परत येत."

वेद हे पृथ्वीवरील चमत्कार आहेत. ते अपौरूषेय आहेत, अशा शब्दांत रा. रा. ओक वेदांची महती गातानाच सांगतात, की "वेद हे पृथ्वीवरील जीवनास लागू असणा-या स‌मस्त शास्त्रीय ज्ञानाचे भांडार असल्याने एका वर्गाने ते घोकून स‌तत जतन करावे असा ईश्वरी संकेत आहे. त्या भांडारातून मानवास असे प्रात्यक्षिक ज्ञान वेळोवेळी मिळवू पाहणा-यास तीन गुण आवश्यक आहेत. ते असे - 1) वेद हे संस्कृतात असल्याने त्यातून ज्ञानाचे कण घेऊ पाहणारा मनुष्य संस्कृतज्ञ असला पाहिजे. 2) वेदात उच्चतम वैश्विक स्तराचे ज्ञान उद्धृत असल्याने त्यातून काही ज्ञान मिळू पाहणारी व्यक्ती स्वतः उच्च विद्याविभूषित (म्हणजे उदा. एम.एस्सी. उत्तीर्ण श्रेणीची) असावी. 3) ती व्यक्ती अनासक्त, स्थितप्रज्ञ, विरक्त जीवन जगत असावी."


इस्लामचे योगदान शून्य

आता हे स‌गळं झाल्यावर रा. रा. ओक आपणांस भारतीय इतिहाससंशोधनातील आणखी एक घोडचूक सांगू लागतात. इस्लामचे हिंदुस्थानच्या इतिहासात काही योगदानच नस‌ल्याचे त्यांचे मत आहे. "एेतिहासिक म्हणून गणली गेलेली कोणतीच इमारत इस्लामी नाही," असा त्यांचा सिद्धांत आहे. ते विचारतात, "इस्लामी हल्लेखोरांनी स‌र्व कबरीच कबरी व मशीदीच मशीदी कशा बांधल्या? पांडवांपासून पृथ्वीराजापर्यंत स‌ुमारे 6500 वर्षांतील हिंदु राजेरजवाड्यांचे महाल कोठे आहेत? बापाचा व भावांचा वध करून गादी बळकावणारे मुसलमान स‌ुलतान बादशहा पदरचे कोट्यवधी रुपये खर्च करून मारलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रेतांच्या निरर्थक निवा-यासाठी टोलेजंग कबरी व निर्धन सामान्य मुसलमानांना नमाज पढण्यासाठी भव्य मशिदी का उभारतील?...
ताजमहाल, लालकिल्ला, जामा मशीद, मोती मशीद, अजमेरचा दर्गा ते तथाकथित मकब-यांपर्यंत स‌र्व इमारती तसेच फतेपूर सिक्री सारखे शहरही मुस्लिम नाही." हे कशावरून, तर त्याचे भरभक्कम पुरावे रा. रा. ओक यांच्याकडे आहेत. ते सांगतात -

मुमताझमहलचे खरे नाव शाहजहानच्या दरबारी बखरीत मुमताझ उल् झमानी असे आहे. मुमताझमहलमध्ये झ हे अक्षर आहे, तर ताजमहालात ज हे अक्षर येते. शिवाय तत्कालिन परदेशी प्रवासी ताजमहालचा ताज-इ-महल वा ताज-ए-महल असा उल्लेख करतात. त्यावरून तो शब्द मुळात संस्कृत तेजोमहालय असाच तत्समयीच्या आग्र्यातील हिंदूंच्या तोंडून एकलेला पाश्चात्यांच्या नोंदींत उतरला.

लालकिल्ला हेस‌ुद्धा हिंदूच नाव आहे. अहमदनगरमधील नगर हा शब्द हिंदुत्व सिद्ध करतो.
फतेपूर सिक्री मधील फते सोडल्यास पूर व सीकरी ऊर्फ सीकडी हे संस्कृत शब्द आहेत.
अशा प्रकारे काही एेतिहासिक मुस्लिम स्थळे वा वास्तू यांची नावे ही संस्कृत नावांचे अपभ्रंश आहेत वा संस्कृत नावांशी त्यांचे साधर्म्य आहे म्हणून त्या इमारती वा स्थळे मुस्लिम नाहीत. त्याचप्रमाणे काही इमारतींच्या बांधकामासाठी लाल (केशरी) रंगाचा दगड वापरण्यात आला आहे. उदा. लालकिल्ला, जामा मशीद, कुतुबमिनार वगैरे. केशरी रंग हा वैदिक, राजपूत रंग आहे. म्हणून या इमारतीही वैदिक आहेत. त्याचप्रमाणे काही इमारतींच्या बांधकामात हिंदू प्रतिके वा संस्कृतात कोरलेली वचने आढळतात, म्हणून त्या इमारती मुस्लिम नाहीत, असे रा. रा. ओक पुराव्यादाखल सांगतात.

हे झाले इमारती वा शहरांचे. अन्य क्षेत्रातील इस्लामी योगदानाचे काय?

रा. रा. पु. ना. ओक विचारतात, "इस्लाममध्ये कोणत्याही जिवंत प्राण्याची आकृती काढणे निषिद्ध असतां धर्मांध इस्लामी हल्लेखोरांनी चित्रकला जोपासली वा वाढीस लावली असणे शक्यच नाही. इस्लामी चित्रशैली इस्लामी नाही."

संगीताची वाढही मुसलमानांनी केली नाही. "संगीतकला जगाच्या आरंभापासून सामवेदांतून निर्माण झाली आहे. म्हणून पाश्चात्य संगीतदेखील वेदमूलकच आहे, हे sing, song, singer, singin आदी संगीतमूलक शब्दांवरून कळून येईल. इस्लाम व संगीताचे विळ्या-भोपळ्यासारखे वाकडे आहे."


इतिहाससंशोधक गोपाळ गणेश आचवल

पु. ना. ओक यांच्याप्रमाणेच गोपाळ गणेश आचवल यांनीही इतिहाससंशोधन केले आहे. त्यांच्या ग्रंथाचे नाव `विश्वव्यापी वैदिक संस्कृती - भाग पहिला' असे असून, हा ग्रंथ 510 पानांचा आहे. याचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला नाही. आचवल यांचे संशोधन पाहता तेही 'पुना स्कूल'चेच असल्याचे दिसून येते. त्यांचे संशोधन आपण पुढच्या पोस्टमध्ये पाहू या.


संदर्भ -
भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका - पु. ना. ओक, मनोरमा प्रकाशन, जाने. 1992, किं. 150 रु.

Pls read - The Quest for the Origins of Vedic Culture - by Edwin Bryant

सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता!

एखादे असत्य वारंवार सांगितले, की ते सत्यच वाटू लागते. इतिहास वाचताना हे अनेकदा दिसून येतं. मराठ्यांच्या इतिहासातलं असं एक प्रकरण म्हणजे सूर्याजी पिसाळ याची फितुरी. या माणसाने देशमुखीसाठी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या घशात घातली, असा त्याच्यावर आरोप आहे. आज फितुरीचं दुसरं नाव म्हणून त्याचंच नाव घेतलं जात आहे.

या फितुरीची आख्यायिका रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासतीच्या दुस-या, 'स्थिरबुद्धी राजाराम' या खंडात दिली आहे. (पृ.156-157). त्यात म्हटले आहे, -

"शौर्यादि गुणांत मराठे कोणासही हार जाणारे नाहीत; त्यांचे मरण गळेकापू स्वभावात आहे, हा प्रकार रायगड किल्ल्याचे बाबतीत चांगला निदर्शनास आला. किल्ला इतका दुर्भेद्य की लढून तो बहुधा मोगलांस प्राप्त झाला नसता. वेढा घालून आठ महिने झाले, तथापि ईतिकादखानाचे (जुल्फिकारखानाचे) पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. बादशहाने सारखी त्यास निकड लाविली; आणि त्याच्या मागणी प्रमाणे सामान फौजा सर्व काही तयार करून पाठविले. तेव्हा खानाने कपटविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता. त्यास वाईची सुभेदारी देण्याचे आमिष दाखवून खानाने फितूर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्गशीर्ष शु. 2 रविवार ता. 3-11-1689 रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्यावेळी येसूबाईची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. जिवास अपाय करणार नाही अशी खानाकडून शपथ घेववून नशिबाला बोल लावीत ती मुलामंडळींसह खानाचे स्वाधीन झाली."

ही झाली आख्यायिका. वास्तविक सू्र्याजी पिसाळ वतनलोभी होती. संधीसाधू होता. स्वराज्य स्थापनेमागे शिवछत्रपतींचे जे हेतू होते, ते कळूच न शकणारा दगड होता. पण त्याने फितुरी केलेली नाही.

हा गृहस्थ वाई परगण्यातील ओझर्डे गावचा पाटील. संपूर्ण वाई परगण्याचा देशमुख वतनदार बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. शिवाजी राजांच्या कारकीर्दीत वाईच्या देशमुखीवर दत्ताजी केशवजी पिसाळ होता. याचा पुत्र केशव. त्याच्या पत्नीने दीर गंगाजी याचा पुत्र दत्ताजी यास दत्तक घेतले होते. संभाजी राजांच्या काळात, 1688 मध्ये स्वराज्यावर मोगलांनी जोराचा हल्ला केला. वाई परगणा मोगलांच्या ताब्यात गेला. तेव्हा स्वराज्याशी एकनिष्ठ असलेला दत्ताजी परागंदा झाला. त्याचे देशमुखी वतन वाईचा अंमलदार न्याहरखान याने बळकावले. या धामधुमीत सूर्याजीच्या मनाची चलबिचल सुरू होती. त्याने गावचा वसूल सरकारात भरला नव्हता. त्यासाठी रायगडावरून तगादा लावला गेला, तेव्हा सूर्याजी गाव सोडून जो पळाला तो थेट जुल्फिकारखानाच्या फौजेत आला. यावेळी जुल्फिखारखान रायगडावरील मोहिमेवर चालला होता. त्याच्याबरोबर सूर्याजीही रायगड परिसरात आला. याचा अर्थ संभाजीराजांच्या बलिदानापूर्वीच हा माणूस मोगलांना मिळालेला होता.

रायगडाचा वेढा गडावरील मंडळींना अगदीच सोसवेना झाला. सर्वत्र निराशेचा अंधार पसरला. अशावेळी येसूबाई आदी मंडळींनी गड मोगलांच्या स्वाधीन करण्याचा निश्चय केला. त्यानुसार उभयपक्षी वाटाघाटी सुरू झाल्या. यावेळी सूर्याजी खानाच्या फौजेत होता. जुल्फिखारखानाने त्याच्यातील 'गुण' ओळखून त्याच्याहाती वाटाघाटीची सूत्रे सोपविली. त्याने ही भूमिका योग्यरीत्या पार पाडून खानाची मर्जी संपादन केली. सूर्याजीची ही कामगिरी वर्णन करणारा एक उतारा आढळतो. -
"तेथे रायगडचे मसलतेमुळे मनसबा करून (सूर्याजीने) मावळीयांची सरदारी केली. गडास मोर्चे लावले व दरामतीत (मध्यस्तीत) पडोन खानास गड हस्तगत करून दिल्हा. ये गोष्टीकरिता खान मशारनिल्हेची कृपा त्यावरी विशेष जाली. खान हजरतीच्या (औरंगजेबाच्या) दर्शनास आले. तेव्हा सूर्याजीची स्तुती हजरतीपावेतो करून सिरनाहाणी करविली. हा अस्करा (ख्याती) लष्करात बहुत जाला..."

एकंदर सूर्याजीची रायगडाच्या पाडावामधील भूमिका मध्यस्थाची आहे. फितुराची नाही. त्याला फितूर म्हणावे, तर तो आधीच शत्रूला जाऊन मिळाला होता. तो स्वराज्याचा शत्रूच होता. आणि याच्या जोरावर त्याने नंतर वाईची देशमुखी बळकावली.

सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे रायगड मोगलांच्या हाती गेल्यानंतर काही काळात तो पुन्हा राजाराम महाराजांच्या सेवेत रूजू झाला. एवढेच नव्हे, तर राजाराम महाराजांनी त्याला वाईची देशमुखी दिली.

त्याचे असे झाले, की रायगड मोगलांच्या हाती लागल्यानंतर बादशहाने जुल्फिकारखानास जिंजी किल्ल्याच्या मोहिमेवर पाठविले. (30 नोव्हेंबर 1689) त्यावेळी सूर्याजी पिसाळही त्याच्याबरोबर गेला. जिंजीच्या वाटेवर असतानाच त्याने वाईच्या पूर्ण देशमुखीचे वतन मिळविले. पण ते जिंजीला पोहचेपर्यंत परिस्थिती बदलली होती. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांच्या फौजांनी मोगलांनी जिंकलेले गडकोट व ठाणी पुन्हा ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. त्यात वाई परगणाही पुन्हा एकदा मराठ्यांच्या अंमलाखाली आला. आणि पुन्हा एकदा दत्ताजी पिसाळ याला वाईची देशमुखी देण्यात आली. जिंजीचा वेढा सुरू असताना ही बातमी सूर्याजीला समजली असावी. येथपावेतो त्याच्या लक्षात वारा फिरल्याचे आले असावे. त्यामुळे मग त्याने राजाराम महाराजांशी संधान बांधले आणि जुल्फिकारखानास आणि मोगली लष्करास गुंगारा देऊन तो किल्ल्यात छत्रपतींच्या दर्शनास गेला. तेथे त्याने राजाराम महाराजांना त्याच्याकडील जुनी आदिलशाही फर्माने दाखविली. ती पाहून राजाराम महाराजांनी त्याला वाईच्या निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या. त्या घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण रामचंद्रपंत आदी प्रधान व अधिका-यांना वाईच्या देशमुखीचा सर्व इतिहास माहित असल्याने तेथे सूर्याजीची डाळ शिजली नाही. तेव्हा तो पुन्हा कर्नाटकात जिंजीला गेला.

तेथे त्याने आता निराळेच डाव लढविण्यास सुरूवात केली. राजाराम महाराजांची सगुणाबाई नावाची अत्यंत सुंदर नाटकशाळा होती. राजा कर्ण हा तिचा मुलगा. तिला आणखी एक मुलगीही होती. या कन्येबरोबर आपल्या मुलाचा विवाह लावण्याचा प्रस्ताव सूर्याजीने महाराजांजवळ मांडला. सूर्याजीसारखा घरंदाज मराठा आपल्या पुत्राचे लग्न दासीकन्येशी लावण्यास तयार झाल्याचे पाहून राजाराम महाराजांनी त्याला आता वाईची सगळीच देशमुखी दिली.

राजाराम महाराजांनी दत्ताजीकडील देशमुखी काढून घेतल्याचा जो रोखा उपलब्ध आहे, त्यात ते म्हणतात - "सूर्याराऊ पिसाळ... हे मोगलाईतून स्वामीसंनिध येऊन आपल्या वतनाचे वर्तमान विदीत केले.... सूर्याराऊ पिसाळ याणी ... मोगलाईमध्ये मबलग पैके खर्च करून दिवाणात सीरणी देऊन फर्मान करून घेतले, अलीकडे स्वामीच्या पायापासीही येकनिष्ठा धरून संनिध येऊन सेवा करीत आहेत...."

पण यानंतरही देशमुखीची वाद काही मिटला नाही. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी दत्ताजीस त्याचे वतन परत केले. तेव्हा मग सूर्याजी पुन्हा मोगलांना जाऊन मिळाला. मोगलांनी वाईचे ठाणे पुन्हा जिंकले असावे. त्यावर इस्माईलखान मखा याची ठाणेदार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सूर्याजीने त्याला हाताशी धरले. परगण्याचे देशपांड्यांसारखे वतनदार व दत्ताजी यांना बोलावून त्यांना कैद केले आणि त्यांच्याकडून सूर्याजीच्या निम्म्या वतनाचा महजर तयार केला. याच महजरात सूर्याजीने वतन सोडविण्यासाठी एक लक्ष बावीस हजार सातशे रूपये खर्च केल्याचा उल्लेख आहे.

या काळात औरंगजेब बादशहाची छावणी विशाळगडाच्या पायथ्याशी होती. दत्ताजीने तेथे जाऊन फिर्याद नोंदविली. औरंगजेबाला त्याची बाजू न्याय्य वाटल्याने त्याने सूर्याजीने केलेल्या सेवेकडे न पाहता दत्ताजीला त्याच्या वतनाचे फर्मान दिले, एवढेच नव्हे, तर इस्माईलखान मखा याची वाईच्या ठाणेदारपदावरून बदली करून तेथे यासीनखान याला पाठविले. दत्ताजी वाईस येऊन वतनदारी अनुभवू लागला.

इकडे सूर्याजीही इरेस पेटला. छावणीत जाऊन त्याने खूप लटपटी-खटपटी केल्या. मुसलमान धर्म स्वीकारल्यास बादशहाची मर्जी प्रसन्न होते हे त्याला माहित होते. तेव्हा बादशहाची मेहेरबानी मिळविण्यासाठी तोही मुसलमान झाला. पण दत्ताजीची बाजू इतकी न्याय्य होती, की औरंगेब बादशहाने सूर्याजीने धर्मांतर केले तरी त्याला वतन काही दिले नाही.

हे प्रकरण नमूद करून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, "जी गोष्ट मराठ्यांच्या छत्रपतींना (राजाराम महाराजांना) जमली नाही तो औरंगजेबाने करावी, आणि तीही सूर्याजीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर करावी, याची मराठ्यांच्या इतिहासकारांनी खास दखल घेतली पाहिजे.

सूर्याजीचा हा वतनलोभ, त्यासाठी त्याने केलेली कारस्थाने हे सर्व तेव्हाच्या मराठा वतनदारांच्या प्रवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहे.

आणि अखेरीस येथे एक बाब नमूद करायलाच हवी, की भलेही सूर्याजी पिसाळ रायगडचा फितूर नसेल, पण तो त्याच्यासारख्या अनेक वतनदारांप्रमाणे स्वराज्यद्रोही मात्र निश्चित होता.

संदर्भ -
- मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993, पृ. 109 ते 120.

रामायणाविषयी आणखी काही...


'खट्टामिठा'मध्ये रामायणासंबंधीच्या एकूण चार पोस्ट आल्या आहेत. त्यातील पहिल्या पोस्टमध्ये वाल्मीकींनी वर्णिलेला राम आणि लोकमानसात असलेली रामाची प्रतिमा यांत असलेला फरक नोंदविला आहे. त्यानंतर ब-याच काळाने 'मी राम कोण देशीचा?' या तीन पोस्ट लिहिल्या. रा. रा. भास्करराव जाधव यांच्या 'रामायणावर नवा प्रकाश' या पुस्तकातील माहिती त्यात आहे. हे भास्करराव जाधव कोण असा प्रश्न अनेक वाचकांना पडला असणार. तेव्हा ते आधी सांगतो. महात्मा फुल्यांच्या स‌त्यशोधक स‌माजाचे अनुयायी असलेल्या भास्कररावांनी एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. 1895 ते 1921 या काळात त्यांनी करवीर दरबारात सेवा केली. पहिल्या व दुस-या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. ब्राह्मणेतर पक्षाचे ते संस्थापक होत. स‌र्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी वेदांसकट स‌र्व महत्त्वाच्या स‌ंस्कृत ग्रंथांचे परिशिलन केले होते. त्यांचा पिंड ज्ञानोपासकाचा होता.

त्या काळात रामायणाविषयी पंडित, अभ्यासकांमध्ये चाललेल्या वादात भास्करराव जाधव यांनी भाग घेतला. 1934 ते 1936 या कालखंडात त्यांनी ज्ञानमंदिर, महाराष्ट्र शारदा या नियतकालिकांमध्ये लेख लिहून टीकेचे मोहोळ उठविले. रामायणावर नवा प्रकाशमध्ये त्यांच्या या लेखांचेच स‌ंकलन केलेले आहे.

राम हा मूळचा इतिप्तमधला हा निष्कर्ष मल्लादि वेंकटरत्नम यांचा. त्यांच्या ग्रंथाधारे भास्कररावांनी काही लेख लिहिले. ते या ब्लॉगमध्ये अतिशय स‌ंक्षेपाने मांडले आहेत. राम हा मूळचा इजिप्तचा म्हटल्यावर आणि रामेसिसच्या कथेवरूनच रामकथा रचली असे म्हटल्यावर, साहजिकच एक प्रश्न येतो, की मग वाल्मिकी रामायणात जी अन्य पात्रे येतात, उदाहरणार्थ स‌ीता, रावण, हनुमानादि यांचे मूळ कुठले? भास्कररावांनी त्याबाबत त्यांच्या लेखांमध्ये काहीही माहिती दिलेली नाही. त्यासाठी आपणांस मल्लादि वेंकटरत्नम यांच्याकडेच जावे लागेल. (खंत याचीच की अद्याप त्यांचा ग्रंथ काही मला मिळू शकलेला नाही.)

मात्र भास्कररावांनी त्यांच्या लेखांमध्ये रामायणातील वाल्मिकींपासून स‌र्व महत्त्वाच्या पात्रांविषयी स‌ंशोधनात्मक लिहिलेले आहे. तेव्हा त्यांचा ग्रंथ मुळातूनच वाचावयास हवा.

मूळात रामायण या महाकाव्याचेच अनेक पाठभेद, रामाच्या वेगवेगळ्या कथा आपल्याकडे आहेत. म्हणजे वाल्मीकींचे रामायण हे तर झालेच. पण स‌ंस्कृतमध्ये आनंद रामायण, अद् भुत रामायण, अध्यात्म रामायण इत्यादि रामायणे आहेत. रघुवंश, प्रसन्नराघव, उत्तर रामचरित अशी काव्ये आहेत. महाभारतात रामकथा आहे. हरिवंश, भागवत यामध्येही काहीशा फरकाने ती आहे. तुलसीदासाचे रामायण आहेच. जैन आणि बौद्धांचीही वेगळी रामायणे आहेत.

या स‌र्व रामकथा आहेत, त्यांचा आशय जरी सारखा असला, तरी तपशीलांत मात्र त्या खूप वेगवेगळ्या असल्याचे दिसते. त्यातही स‌ीता आणि रावण यांच्या स‌ंबंधांबाबत खूपच भिन्न माहिती मिळते. वाल्मीकी रामायणानुसार स‌ीता ही जनकाची कन्या. जनकाला ती जमीन नांगरत असताना सापडली. परंतु महाभारतातल्या रामकथेत ती जनकात्मजा म्हणजे जनकाची औरस कन्या असे म्हटले आहे. काश्मीरी रामायण, खोतानी रामायण या ग्रंथात ती रावणाची कन्या आहे. शेट लालचंद हिराचंद यांनी लिहिलेल्या 'वाल्मिकी रामायण - एक स्वतंत्र विचार' या पुस्तकातही ती रावणाची कन्या असल्याचे मत मांडले आहे. आनंद रामायण व भावार्थ रामायणात ती अग्निसंभवा असल्याचे म्हटले आहे. तर दशरथजातक आणि जावा-सुमात्रामधील रामायणे ती दशरथकन्या असल्याचे सांगतात.

भास्कररावांनी त्यांच्या स‌ंशोधनासाठी वाल्मिकी रामायण हा ग्रंथ आधारभूत मानलेला आहे. मात्र आधुनिक विद्वानांच्या मते वाल्मीकी रामायण प्रथम पाच कांडांचे म्हणजे अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंतचे होते. बालकांड व उत्तरकांड ही नंतरची भर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या रिडल्स ऑफ राम वरून मोठा वाद झाला होता. वास्तविक त्यावरून वाद होण्याचे काही कारण नव्हते. कारण त्यात त्यांनी रामाबद्दल जे काही लिहिले होते, त्याचा आधार बहुतांशी उत्तरकांडच होते. पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचे 'द रामायण - ए ट्रू रिडिंग' हे अतिशय वादग्रस्त पुस्तक. त्याचा आधारही वाल्मीकी रामायणच आहे. यातून त्यांनी काढलेले निष्कर्ष भाविक, श्रद्धाळू मनास निश्चितच धक्कादायक आहेत. कारण वाल्मीकी रामायणच धक्कादायक आहे.

ज्यांना असा धक्का स‌हन होणार नाही, त्यांच्यासाठी मग 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन' सारखी पुस्तके आहेतच. 'श्री वाल्मीकि रामायण दर्शन'मध्ये पांडुरंगशास्त्री आठवलेंनी वाल्मीकींनाही अभिप्रेत नसलेला राम आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यांच्या रामायणाच्या वाचनानुसार -
"रामकाळात प्रजेला मत द्यावयाचा अधिकार होता.... अर्थव्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी जातीव्यवस्था रामराज्याने मान्य केली होती.... स‌र्व लोक देवासमान होते. स‌र्व लोक स‌ज्जन होते... रामायणात स्त्रियांची अवस्था उत्कृष्ट होती... ब्राह्मण रामराज्याचे आधारस्तंभ होते... " खरंतर पांडुरंगशास्त्रींच्या मते रामायणात वाईट असे काही व कोणी नव्हतेच. अगदी कौसल्यासुद्धा. (वास्तविक पांडुरंगशास्त्रींचे या पुस्तकाचा हेतू त्यांना अभिप्रेत असलेल्या जातीसंस्थात्मक व्यवस्थेची, वर्णव्यवस्थेची आवश्यकता प्रतिपादीत करणे हाच आहे. पण तो मुद्दा वेगळा.)


तर हे म्हणजे एकदम भास्कररावांच्या उलट झाले.
एकंदरच रामकथेची अशी अवघीच गंमत आहे. पुढे मागे त्याबाबत लिहिणे होईलच...


------------------------------------------------------------
वाचन शिफारस -
- रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य स‌ंस्कृती मंडळ, मुंबई, पाने - 340, किं. 145 रू.
- वाल्मीकी रामायण - एक स्वतंत्र विचार - लालचंद हिराचंद, मँजेस्टिक प्रकाशन, गिरगाव, मुंबई, पाने 72, किं. 45 रु.
- महात्मा रावण - डॉ. वि. भि. कोलते, स‌ुगावा प्रकाशन, पुणे, पाने - 16, किं. 10 रू.
- श्री वाल्मीकी रामायण-दर्शन - पांडुरंगशास्त्री आठवले, स‌द्विचार दर्शन ट्रस्ट, मुंबई, पाने - 218, किं. 10 रु.
- The Ramayan (A True Reading) - Periyar E. V. Ramasami, Dravidar Kazhagam Publications, Chennai, Pages - 58, Donation 30 Rs.
- Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol. 4 - Compiled by Vasant Moon, Education Department, Gov. of Mah., Pages - 360, Price - 35 Rs.
- www.valmikiramayan.net

राम कोण देशीचा? - भाग ३.

रामकथा ही मूळची `रामेसुकथा' आहे असं मत मल्लादि वेंकट रत्नम (आणि अर्थातच भास्करराव जाधव ) यांनी व्यक्त केले आहे. तर हा जो रामेसु आहे तो ख्रिस्तपूर्व तेराव्या शतकात, म्हणजे सुमारे स‌व्वा तीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये होऊन गेला. याचा कालखंड १२९२ ते १३२५. त्याच्या आधी इजिप्तमध्ये अठरा वंशांचे राजे होऊन गेले. हा एकोणिसाव्या वंशाचा, पहिल्या वंशाचा राजा जो मेना त्याचा काळ ख्रिस्त्पुर्व ५५००.या मेना राजाने नाईल नदीला जोडणारे एक मोठे स‌रोवर खोदले. हे स‌रोवर आणि नाईल नदीचा भाग यांच्या मधोमध एक शहर होते. त्याचे नाव मेंफिस. भास्करराव सांगतात, की याचे ग्रीक भाषांतर अजोदा असे होते. त्यावरून - अजोदा-अजोध्या-अयोध्या असे झाले. रामायणानुसार अयोध्या नगरी मनूने वसविली. मेंफिस मेनाने वसविले आणि मेनाचे रूपांतर मनू असे करणे साहजिक आहे. जसे रामेसुचे राम करणे स‌ोपे आहे.

रामायणात अयोध्येचे जे वर्णन आले आहे ते फारच अतिशयोक्त आहे. दशरथाचे राज्य फारच लहान होते. अशा छोट्या राज्याची राजधानी अयोध्येसारखी मोठी नगरी असणे शक्य नाही. या उलट मेंफिस हे मोठे शहर असल्याचे ग्रीक व अरब इतिहासकारांनी िलहून ठेवलेले आहे. अयोध्येत उंटांची, गाढवांची गर्दी होती, असे वर्णन रामायणात येते. हे वर्णन हिंदुस्थानातील शहरांस लागू होणारे नाही. पण इजिप्तमधील अजदोंला ते बरोबर लागू पड़ते.

इजिप्त हा नदीमातृक देश. नाईल वा नील ही मोठी नदी वगळता बकिचा देश स‌पाट वालुकामय, मधेमधे थोडे डोंगर असा. रामायणातील वर्णन अशाच प्रकारचे आहे. रामाला कोठेही मोठे डोंगर चढावे लागत नाहीत. रामाने विंध्य पवर्त पार केल्याचाही उल्लेख रामायणात येत नाही.

अयोध्या स‌रयू नदीवर वस‌ली होती व ती मानस स‌रोवरातून उगम पावली असे रामयणात म्हटले आहे. वास्तविक मानस स‌रोवरातून तीन नद्या उगम पावल्या आहेत. ब्रह्मपुत्रा, स‌तलज व सिंधु . अयोध्या या तीन्हींपैकी कोणत्याही नदीतीरी नाही. आजची अयोध्या गोग्रा नदीवर दाखविली जाते. हीच पूर्वीची स‌रयू म्हणावी, तर हिचा उगमही मानस स‌रोवरातून होत नाही. पण रामायणात अयोध्येविषयीचे जे वर्णन आहे ते अजादोंला बरोबर लागू होते. मेनाने नाईल नदीला जोडणारे मोठे स‌रोवर खोदल्याचे उल्लेख आहेत. या स‌रोवरात नाईल नदीच्या वरच्या भागातूनच पाणी घेतले जात असे. यावर अजादो वसले असल्याने मानससरोवरातून उगम पावलेली नदी असे वर्णन करता येते .

रामायणता श्रृंगबेरपूर असे ठिकाण येते. तेथील राजा गृह हा निषादांचा अधिपती होता. निषाद ही चोरीमारी, लुटमार करणारी जमात होती. इजिप्तमध्ये सेरेन -कबिर असे गाव होते. तेथे तेल-एल-कबिर नावाचा डोंगर आहे. तर हे कबिरी लोकही लुटमार करणारेच होते.

रामायणात चित्रकूट नावाचा पर्वत येतो. आज प्रयागपासून ७५ मैंलांवर एक स‌ाधारणशी टेकडी दाखवितात व हा रामाचा चित्रकूट म्हणतात. वास्तविक रामायणात हे अंतप 20-२५ मैलच असल्याचे सांगितले आहे. चित्रकूटमध्ये दोन पदे येतात. चित्र आणि कूट. चित्र म्हणजे चित्रविचित्र रंगाचा, चकचकीत आणि कूट म्हणजे ढीग किंवा शिखर. चित्रकूट पर्वत म्हणजे `चित्रं कूटं यस्य स‌ः', म्हणजे ज्याचे शिखर चित्रविचित्र किंवा चकचकीत आहे तो पर्वत. पण असा पर्वत किंवा डोंगरसुद्धा प्रयागजवळ नाही. इजिप्तमधील मेंफिस किंवा अजादोंजवळ नदीपलीकडील तीरावर स‌गमर्मराच्या खाणी आहेत. त्या उन्हात फार चकचकीत दिसतात. याला तुरा म्हणतात. यालाच स‌मांतर असा उत्तरेकडे दो शिरी म्हणजे रक्तपर्वत आहे. यालाही चित्रं कूटं यस्य स‌ः - चित्रकूट म्हणता येईल. असे चित्रकूट इजिप्तमध्ये अनेक आहेत. एकंदर हा पर्वत रामायणात आला तो इजिप्तमधूनच.

अयोध्येजवळ नंदिग्राम असल्याचा उल्लेख रामायणात येतो. पण अयोध्येजवळ नंदीचे देऊळ असल्याचा दाखला मिळत नाही. इजिप्तच्या प्राचीन इतिहासात या नंदिग्रामचा उलगडा होतो. इजिप्त अर्थात मिसर देशी ऑसिरिस नावाचा देव होता. आपला शंकर आणि ऑसिरिस‌ स‌ारखे वा एकच. या देवाला बैल स‌ोडलेले असत. त्यांना ऑसिरिसचेच अवतार मानत. हे नंदी त्यांच्याकरीता बांधलेल्या खास देवळात ठेवित. नंदी मेले की त्यांच्या ममी करून त्या एका भुयारात ठेवल्या जात. स्राबो नावाच्या ग्रीक इतिहासकाराने या देवळाचे वर्णन करून ठेवले आहे. त्यानुसार मॉरिएट या स‌ंशोधकाने शोध केला असता, 1850 मध्ये हे एपिसचे (नंदीचे) देऊळ व नंदींची ममी ठेवण्याची जागा सापडली. ही जागा मेंफिसजवळच्या स‌क्कारा या गावी होती. तेथे जमिनीखाली खडकात लेणी कोरून बैलांच्या ममी ठेवीत. रामायणातील नंदीग्राम म्हणजे हे स‌क्कारा गाव असावे. दुसरी एक विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे एपिस व बसव हे शब्द एकच आहेत. बसव हा द्रविडी भाषेत नंदीचा वाचक आहे. यानुसार चित्रकूट आणि नंदिग्राम ही दोन्हीही आर्यावर्तातील नव्हे, तर इजिप्तमधील असावीत असा पुरावा सापडतो.

रामायणातील लंकेबाबतही असाच गोंधळ आहे. रावणाची राजधानी लंका म्हणजे स‌िंहलद्विप (आजची श्रीलंका) मानली जाते. परंतु रामायणात दिलेले लंकेचे वर्णन स‌िंहलद्विपाशी मुळीच जुळत नाही. रामेश्वरापासून ते शंभर योजने दूर नाही. ते मोठ्या उंच डोंगरावर वस‌लेले नाही. आर्य लोकांना माहित असलेल्या लंका बेटाचा उल्लेख ज्योतिषशास्रात येतो. हे शहर विषुववृत्तावर अवंतीच्या थेट दक्षिणेस होते. पहिला अक्षांश या दोन स्थळांतून जात असे. श्रीलंका विषुववृत्तावर नाही आणि अवंतीच्या दक्षिणेस नाही. तेव्हा लंका याचा अर्थ कोणतेही बेट असा घ्यावा लागेल.

राम वनवासाला निघाला त्यावेळी भरत त्याच्या आजोळी केकय देशात होता. हा देश नेमका कोणता ? भरताला बोलावण्यासाठी जे दूत पाठविले ते बाल्हिक देशातून गेले असे वर्णन आहे. हे आजचे बाल्ख शहर असावे असा अंदाज करता येतो. केकय देशाचा राजा व भरताचा आजा याचे नाव अश्वपती. या नावालाही मोठा अर्थ आहे. अयोध्याकाण्डातील सर्ग 70, श्लोक 19 त 23 नुसार अश्वपतीने भरताला जी देणगी दिली, त्यात उत्तम चित्रविचित्र कंबले, वाघासारखे बळ अस‌लेले कुत्रे आणि स‌ोळाशे घोडे होते. शिवाय त्यात उत्कृष्ट रीतीचे सामानसुमान घातलेले शिघ्रगामी खर असे धनही होते. खर म्हणजे गाढव. त्याला धन म्हटलेले आहे. म्हणजे ते केकेय देशातील प्रतिष्ठेचे वाहन होते, हे स्पष्ट होते. यावरून हा केकय देश आर्यावर्तातील नसून, हिंदुकुश पर्वताच्या पलीकडील असावा. इतकेच नव्हे, तर आजचा अफगाणिस्तान आणि इराण हा देशही पूर्वी आर्यांचाच असल्याने तो त्याही पलीकडील (?) असावा. तेथून सात दिवसांत भरत अयोध्येस परतला ही गोष्ट स‌ंभवनीय मानायची असल्यास अयोध्या आज दाखवितात ती नस‌ून तिकडेच कोठेतरी - मेंफिस येथे असावी.

भास्करराव जाधव यांनी आपल्या लेखांमध्ये अधिक स‌विस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी ती मूळातूनच वाचावी. ही स‌र्व माहिती देऊन भास्करराव म्हणतात, ``एकंदरीत रामायणात जी गावे हिंदुस्थानात अमुक ठिकाणी होती असे ठाम स‌ांगता येत नाही, त्याच गावांचा पत्ता इजिप्तच्या भूमीत बरोबर लागतो. यावरून रामायणकथा आर्यावर्तात मुळीच घडली नसून ती इजिप्तात घडली असे मल्लादि वेंकट रत्नम म्हणतात हेच खरे दिस‌ते."

मात्र भास्कररावांनी केवळ रामायणातील भूगोलच तपासून हे मत व्यक्त केलेले नाही. त्यांनी रामायणात वर्णन केलेल्या चाली, प्रथा, रूढी, रामाचे व रामायणातील अन्य पात्रांचे आचरण यांचाही अभ्यास केला असून, त्यावरून राम हा आर्यावर्तातील नव्हे, असे स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानात आल्यानंतरची आर्यांची स‌ंस्कृती आणि तत्पूर्वीची त्यांची स‌ंस्कृती यात भेद होता. तो रामायणात दिसतो असे ते सांगतात. याचे काही दाखले येथे पाहू या.

ते सांगतात, "अग्नीत आहुती देण्याच्या तुपातील अवशिष्ट तूप पिण्याची रूढी आर्यांत नाही. ते तूप मागाहून होमात घालावे लागते. रामायणात सांगितलेली चाल (शेष राहिलेले आज्य प्राशन करणे - अयोध्याकाण्ड, स‌र्ग 6, श्लो. 1 ते 4) परदेशाची आहे. कोणत्याही यज्ञ वगैरे विशेष कृत्यांत तुपाचे हवन सांगितले आहे. पण अवशिष्ट तूप यजमानाने प्राशन करणे हा विधी आम्हांस तरी कोठे आढळलेला नाही. फक्त वाजपेययज्ञात यजमानावर हुतशेष आज्याने विधिपूर्वक अभिषेक करण्यात येतो असे सांगितले आहे... पुराणात इजिप्तात होम हा पशूच्या मांसाचा आणि वनस्पतीचा करीत. त्याबरोबर मद्यही थोडे ओतीत व धूप जाळीत. यज्ञात मद्याचा उपयोग आमच्याकडील सोमरसा सारखाच देवाच्या नावाने थोडे अग्नीत टाकावयाचे व बाकीचे ऋत्विजांनी पिऊन टाकावयाचे, असा प्रघात होता. रामायण ग्रंथ बुद्धोत्तर कालात तयार झाला. बुद्धाच्या शिकवणीने यज्ञातील हिंसा व स‌ोमासारखे उन्मत्त करणारे म्हणजे अंगावर येणारे पेय नाहीसे झाले. मद्यसेवनही बंद झाले. मग त्याचा नैवेद्य स‌ोडणे व अवशिष्ट पिणे ही चाल इकडेच नव्हतीच. यामुळे तिकडील काव्याचे रूपांतर करताना मद्याच्या बदला तूप हवन केले गेले असे वर्णन करावे लागले व त्याबरोबर अवशिष्ट तूप पिण्याचा प्रसंग रामावर आला."

स‌र्वांत विचित्र चाल पाहावयास मिळते ती अयोध्याकाण्डात. (सर्ग 66) त्यातील हे श्लोक पाहा -
तैलद्रोणअयां तदामात्याः स‌ंवेश्य जगतीपतिम्
राज्ञः स‌र्वाण्यथादिष्टाः चक्रूः कर्माण्यनन्तरम् ।।14।।
न तु स‌ कालनं राज्ञो विना पुत्रेण मंत्रिणः
स‌र्वज्ञाः कर्तुंनीषुस्ते ततो रक्षति भूमिपम् ।।15।।

याचा अर्थ असा - तदनंतर तेलाने भरलेल्या एका कढईमध्ये अमात्यांनी त्या भूपतीला निजविले आणि वसिष्ठादिकांची आज्ञा झाल्यावर राजाच्या स‌र्व पुढल्या कर्माची व्यवस्था ते करू लागले. (14). त्या स‌र्वज्ञ मंत्र्यांना पुत्रांवाचून राजाचे प्रेत नेणे योग्य न वाटल्यामुळे ते भूपतीला तेलाच्या कढईत ठेवून रक्षण करीत बसले. (15).

पुत्र जवळ नाही म्हणून प्रेतरक्षण करून 12-13 दिवस ठेवणे हा आर्यांचा स‌ंप्रदाय नाही... पण राम व रामायण ही दोन्हीही अनार्य स‌ं‌स्कृतीची व त्यांच्या देशात प्रेताची ममी करण्याचा स‌ंप्रदाय होता. यावरून दशरथ व त्याचे पुत्र इजिप्शियन स‌ंस्कृतीचे होते असे अनुमान निघते.