'शुभमंगल सावधान' हे शब्द कानावर पडले आणि नारायणाने बोहल्यावरून धूम ठोकली.
रामदासांच्या जीवनचरित्रातील ही एक महत्त्वाची घटना. मराठवाड्यातल्या जांब गावातल्या नारायण सूर्याजी ठोसर या मुलाचे समर्थ रामदासस्वामींमध्ये रूपांतर झाले, त्या प्रवासाच्या प्रारंभी ही घटना येते. पण इतिहासातील अनेक घटनांप्रमाणेच हिच्याबद्दलही शंका आहेत. ही घटना अशीच घडली का याबद्दल संशय आहे. म्हणजे रामदास स्वामींनी लहानपणीच घराचा त्याग केला हे खरे. पण ते लग्नातून पळाले याबद्दल मात्र खात्री नाही.
वास्तविक या घटनेबद्दल अनेकांनी लिहिले आहे. नारायण बोहल्यावरूनच पळाले असे जवळजवळ सर्वांचेच म्हणणे आहे. रामदासांची अनेक चरित्रे हीच कथा सांगत आहेत. रामदासांच्या सर्व चरित्रांमध्ये हनुमंतस्वामींची बखर जास्त प्रमाण मानली जाते. या कथेबद्दल हनुमंतस्वामी लिहितात -
"पुढे कोणे एके दिवशी श्रेष्ठीस (म्हणजे समर्थांचे थोरले बंधू) मातोश्री आज्ञा करिती जाहली की, नारोबाचे लग्न करावे. श्रेष्ठीने उत्तर केले की, नारोबाचे लग्न कराल, तर नारोबा हातातून जाईल आणि आपणास बहुत दुःख होईल. ही गोष्ट कामाची नाही. मातोश्री बोलली की, आपला वंश फार नाही. वंशवृद्धी जाहली पाहिजे. यास्तव अवश्यमेव लग्न कर्तव्य आहे. असे म्हणून वधूचा शोध करू लागली...."
"... नंतर मातोश्रींनी विचार केला की लग्नाची गोष्ट काढली असता हा असे (म्हणजे रामदास पिसाळल्यासारखे वागत वगैरे) करतो. तरी यास काही बोध करावा असे मनात आणून त्यास एकांती बोलावून बोलली की, बापा मी सांगतो ती गोष्ट मान्य करशील काय? समर्थ बोलले की मी आपले आज्ञेबाहेर नाही. न मातुः परं दैवतम् असे शास्त्र आहे. म्हणून आज्ञा करावी. तेव्हा तुम्ही लग्न करीत नाही. लग्नाची गोष्ट काढली असता रागे भरता. तर असे करू नये. अंतःपट धरीन तोपर्यंत नाही असे म्हणू नये. तुम्हास माझी शपथ आहे. 'उत्तम आहे', असे म्हणून त्यादिवसापासून पूर्वीचे प्रकार सर्व सोडून दिले. नंतर मातोश्रीमी लग्नाचा उद्योग करून आपले बंधू भागजीपंत बादेनापूरकर ह्यांची कन्या योजून निश्चय केल्यानंतर सर्व आसनगावी लग्नास गेले. सीमंतपूजनापासून अंतःपट धरीपर्यंत सर्व यथासांग झाले. पुढे ब्राह्मणांनी अंतःपट धरून मंगलाष्टके म्हणावयाचे पूर्वी 'सावधान' असे म्हणताच, याचा अर्थ काय, असे समर्थांनी विचारिताच 'इतःपर संसाराची बेडी तुमचे पायात पडली' असे ब्राह्मणाचे वाक्य श्रवण करीन समर्थांनी विचार केला की, पूर्वी मी सावध आहेच, हल्ली ब्राह्मणही म्हणतात आणि मातोश्रींची शपथ एथपर्यंतच होती. आता तिचे वचनातून पार पडलो. अतःपर येथे गुंतून राहणे ठीक नाही. असे म्हणून तेथून पलायन केले. ते जांबगावी अश्वत्थाचे वृक्षावर जाऊन बहुत निबिड व अवघड जागेत बसले. ते त्या वृक्षावर तीन दिवस तसेच राहिले. इकडे लग्नाचे समारंभातून समर्थ पळून गेले, हे ठीक नाही तर शोध करावा असा विचार करून सर्वत्रांनी व मातोश्रींनी बहुत शोध केला. परंतु कोठेच ठिकाण लागेना, म्हणून त्या मुलीस दुसरा वर पाहून लग्न केले."
असाच मजकूर 'दासविश्रामधामा'तही येतो.
मात्र समर्थ पलायनाची तपशीलात काहीसा फरक असलेली एक अन्य हकीकतही सांगण्यात येते. 'केसरी'चे माजी संपादक रा. रा. ज. स. करंदीकर यांनी आपल्या 'श्री समर्थचरित्रा'त लिहिले आहे - "अंतपाट धरून 'शुभंगल सावधान'चा घोष होईपर्यंत नारायण स्तब्ध उभा होता आणि सावधान शब्द ऎकल्याबरोबर तो तेथून निसटला आणि गुप्त झाला, असे जे वर्णन करण्यात येते त्यात कविसंप्रदायाला शोभणारी अतिशयोक्ती असावी असे दिसते." (पान 10)
समर्थांच्या विविहाचा मुहुर्त 'दासविश्रामधामा'त फाल्गुन शु. 8 ला अकरा घटका दिवसाचा असा दिलेला आहे. मात्र 'समर्थ प्रतापा'त हा मुहूर्त रात्रीचा दिलेला आहे. समर्थप्रताप अधिक विश्वसनीय ग्रंथ आहे. त्यात 'समर्था फावली मध्यरात्र' आणि 'समर्थामागे लोक धावले मध्यरात्री। समर्थ कोणासी न दिसती रात्री' असे वर्णन केलेले आहे. भर दुपारी अक्षता टाकण्यासाठी मंडपात सर्व लोक जमले असताना त्यांच्यातून पळून जाणे आणि मग कोणासही न सापडणे हे कठीण दिसते. समर्थ प्रताप सांगतो त्याप्रमाणे लग्नाचा मुहूर्त रात्रीचा असेल, तर ती वेळ पळून जाण्यासाठी अधिक योग्य ठरते. एकंदर समर्थ प्रतापानुसार नारायण पळाला तो रात्रीच्या वेळी आणि तेही बोहल्यावरून नव्हे, तर तत्पूर्वी, लग्नघटिकेच्या आधी. रा. रा. स. कृ. जोशी यांनी आपल्या 'जय जय रघुवीर समर्थ' या पुस्तकात लग्नाची वेळ रात्रीची होती असेच म्हटले आहे. "अंधारी रात्र, मंडपात गर्दी झालेली, भराभर दिवे विझवून नारायण पळाला." असे त्यांनी म्हटले आहे. (पान 19)
परंतु याहून सर्वस्वी भिन्न अशीही एक हकीकत आहे. समर्थ हे लग्नातून नव्हे, तर अन्य कारणामुळे पळाले असे रा. रा. वि. ल. भावे-तुळपुळे यांनी 'महाराष्ट्र सारस्वता'त (पाचवी आवृत्ती, पान 314) म्हटले आहे. त्यांनी सांगितलेली कहाणी अशी - "लहानपणी रामदासांच्या थोरल्या बंधूला त्यांच्या वडिलांनी मंत्रोपदेश व अनुग्रह दिला. तो आपल्यालाही द्यावा असा आग्रह रामदासांनी धरला. परंतु तुला अधिकार नाही म्हणून बापाने निवारले व मंत्रानुग्रह दिला नाही. या गोष्टीची चीड येऊन नारायण हा रागाने घरातून निघून गेला." या मजकुरावर सारस्वतकारांनी एक टीपही दिली असून, त्यात म्हटले आहे, की
"नारायण ऊर्फ रामदास हा लहानपणी आपल्या लग्नाच्या वेळी अंतःपट धरला असताच, ब्राह्मण अष्टके म्हणत होते तोच नदाचा शेला दूर होण्यापूर्वीच तेथून एकदम पळाला, अशी हकीकत बखरकार सांगतात. ही गोष्ट महाराष्ट्रात सर्वभर मानली जाते. पण वर दिलेली हकीकत 'श्री सांप्रदायिक विवध विषय' या पुस्तकात दिली आहे. ती जास्त स्वाभाविक व खरी वाटते. सावधान शब्द ऎकून पळून गेल्याच्या हकीकतीत काव्य आहे. ती सांगण्याला आणि ऎकण्याला गोड आहे. मोठ्या लोकांसंबंधी अशा गोड काव्यमय हकीकती चरित्रकार हौसेने सांगतात व पुष्कळ वेळा स्वतः चरित्रनायक अशा अद्भूत हकीकती पसरविण्यास कारण होतात. पण पुष्कळदा त्या सत्यशोधनाच्या आड येऊन चरित्रकारास फसविण्यास व वाचकास रंजविण्यास मात्र कारणीभूत होतात."
'रामदास जन्मकथा'कारानेही तसेच म्हटले आहे.
संदर्भ -
आचार्य अत्रे यांनी 23 डिसेंबर 1968 रोजी 'मराठा' मध्ये लिहिलेला श्री समर्थांची टवाळी (भाग 2) हा लेख.
4 comments:
तुम्ही छान लिहिता ...
ढे-यांचा "शिंगणापुरचा शंभुमहादेव" या नावाच्या पुस्तकाबद्दल ऐकले आहे. एकदा तुमचे त्यावरील परिक्षण वाचायचे आहे.
धन्यवाद
आचार्य अत्र्यांचा लेख वाचलेला नव्हता. तुमच्या लेखामुळे चांगली माहिती वाचावयास मिळाली. जनमानसावरचा दंतकथेचा पगडा मात्र सहजासहजीं कमी होणार नाही.
Please,Dont try to change HISTORY ,to make HISTORY..
(Selfish)
Mothi labadi he ki Ramdas mhantat Jai Jai Raghuvir Samarth Tenvha Khudda Ramdas yanhach 'Samarth' Koni Banvile
Post a Comment