'खरा इतिहास' असं काही असतं काय याबद्दल माझ्या मनात शंका आहेत.
आपण उदाहरणार्थ चारशे वर्षांपूर्वी एखादी गोष्ट अशी अशी घडली हे कशावरून सांगतो, तर त्याबाबतच्या लेखांवरून. ते लेख ग्रंथांतले असतात, बखरींतले, कुणाच्या रोजनिशीतले, पोथीतले, ताम्रपटावर वा शिळेवर कोरलेले वगैरे असतात. तर अशी काही इतिहासाची साधने आपण अभ्यासतो आणि मग सांगतो, की ती घटना अशीच घडली. पण तेवढ्यावरून ती घटना तशीच घडली हे कसे काय बुवा नक्की होते? माझ्यापुढचा प्रश्न हा आहे. समजा एखाद्या घटनेबाबत दोन मतं असलेले पुरावे सापडले. तर मग काय करायचं? मग वाद होतात. दोन्ही पक्ष आपण सांगतो तेच खरं असं मानू लागतात. आपल्याकडे शिवजयंतीचा वाद झाला होता मागे, तसं ते सगळं होतं.
म्हणजे आज आपण जे खरं मानून चालतो इतिहासातलं, ते खरं असतं ते आज उपलब्ध असलेल्या पुराव्यांपुरतंच. उद्या आणखी काही पुरावे मिळाले, तर आजचं खरं उद्याचं खोटं ठरू शकेल. तेव्हा इतिहासकारानं उगाच न्यायाधीश बनू नये. स्वतःस ब्रह्मदेव समजण्याची चूक करू नये आणि अस्मितांच्या वगैरे गोंधळात तेल ओतण्याचे उद्योग करू नयेत. त्याने आपलं स्वच्छ सांगावं, की बाबांनो, आज उपलब्ध असलेला पुरावा हा असा असा आहे. त्याचा अन्वयार्थ मी असा असा लावलेला आहे. त्यासाठी माझी अभ्यासाची, विचारांची दिशा ही ही होती. तेव्हा आहे ते एवढंच आहे. बस्स! या पुढे एक अक्षर जास्त नाही की कमी!
आता असं होत नाही का? मी एकाही इतिहासकारावर अप्रामाणिकपणाचा आरोप करण्यास तयार नाही. पण होतं काय की इतिहासकार ही माणसेच असतात. आणि माणसांकडे आपापले दृष्टिकोन असतात. त्या चष्म्यातून ती इतिहासाकडे पाहू जातात. कडवे राष्ट्रवादी, धार्मिक-वांशिक-जातीय अस्मितावाले, समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीवाले आणि साम्राज्यशाहीवाले... खूपखूप चष्मे आहेत. त्यातलाच एक मोठा गंमतीदार चष्मा आहे. ओकांचा चष्मा!
आमच्या गावाकडच्या जत्रेत एक तंबू यायचा आरशांचा. हे भले भले आरसे. पण सगळे वेडेवाकडे. कधी त्यात आपण बुटके दिसायचो, तर कधी फताडे. कधी उंच, तर कधी काटकुळे. चेहरे तर असे दिसायचे की हसून हसून पुरेवाट व्हायची दुस-यांची! तर हा जो गंमतीदार चष्मा आहे, तो या आरशांसारखाच आहे. त्यातून इतिहासही असाच दिसतो. तर सादर आहे ओकांचा चष्मा!
-------------------------------------------------------------------------------------
वैदिक क्षत्रियांचे विश्वसाम्राज्य
रा. रा. पु. ना. ओक हे एक सनातन वैदिक धर्मावर असीम श्रद्धा असलेले इतिहासाचे अभ्यासक होते. आपल्या या अभ्यासातून त्यांनी 'भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका' मांडल्या आहेत. त्यांच्या मते, "कौरवपांडवयुद्धापर्यंत जगात सर्वत्र वैदिक क्षत्रियांचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात संस्कृत हीच सर्व मानवांची भाषा होती. चार-पाच हजार वर्षांपूर्वी सिरिया, असिरिया, बाबिलोनिया, मेसोपोटेमिया ही प्राचीन राष्ट्रे होती. परंतु सुर व असुरांत वैर होते. वैदिक साम्राज्य मोडल्यानंतर सुरांचे राज्य सुरिय (Syria) व असुरांचे Assyria झाले." त्यांच्या मते बाबिलोनीया म्हणजे बाहुबलनीय व मेसोपोटेमिया म्हणजे महिषीपट्टनीयम = राणिपूर. "वैदिक संस्कृती लोप पावत केवळ सिंधु प्रदेशातच टिकून राहिली म्हणून तिचे नाव हिंदू. वैदिक विश्वसाम्राज्याची भाषा संस्कृत असल्याने प्राचीन काळी देशांची, सागरांची वगैरे नावे संस्कृतच होती." त्या नावांचा नंतर अपभ्रंश झाला. "उदा. सिंधुस्थानचे हिंदुस्थान, त्याप्रमाणे अर्बस्थान, तुर्गस्थान, कझाकस्थान, बलुचिस्थान, अफगाणिस्थान इत्यादि. रशिया हे मूळचे ऋषिय होते. सैबेरिया - शिबिरिय, प्रशिया - प्रऋषिय, पार्थिया - पार्थीय, ग्रीस - गिरीईश, युरोप - ससुरूप, ऑस्ट्रेलिया - अस्त्रालय, अमेरिका - अमरिश, ऑस्ट्रिया - अस्त्रीय, इजिप्त - अजपती, केनडा - कणाद, उरूग्वे - उरूगावः, ग्वाटेमाला - गौतमालय, जर्मनी अर्थात Deutschland - दैत्यस्थान, Dutch - दैत्य."
तर या पुराव्यांवरून विश्वात पूर्वी वैदिक संस्कृती होती!
इस्लामचे वैदिक मूळ
रा. रा. ओक यांच्या म्हणण्यानुसार इस्लाम हा धर्मही मूळचा वैदिकच आहे! `इस्लामचे वैदिक मूळ' या प्रकरणात ते सांगतात, मक्का नगर इस्लामपूर्व आंतरराष्ट्रीय वैदनक धर्माचे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र होते. मक्का = मखः (म्हणजे यज्ञ) आणि मदिना = मेदिनी (म्हणजे पृथ्वी). यावरून मक्कामदिना ही मखमेदिनी म्हणजे यज्ञभूमी होती. मक्का-मदिनेची उत्पत्ती लागली. पण काबाचे काय? तर "मक्केत शेषशायी विष्णूचे विशाल मंदिर होते. त्याच्या गर्भगृहास संक्षेपाने गाभा म्हणत. त्याचाच अपभ्रंश काबा असा झाला." काबा या स्थानी विविध देवदेवतांच्या 360 मूर्ती होत्या. इ. स. 930 ह्या वर्षी कारमेथियन लोकांनी काबा लुटून त्यातले शिवलिंग पळवून नेले," असे ते एन्सायक्लोपेडिया इस्लामिया आणि एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाचा आधार घेऊन सांगतात. शिवाय अर्वा म्हणजे घोडा. यावरून अर्बस्थान - अर्वस्थान म्हणजे घोड्यांचा देश हे नाम तयार झाले. "यावरून वैदिक क्षत्रियांनी तेथे जातिवंत घोड्यांची उत्पत्ती शास्त्रीय पद्धतीने करविली होती."
इस्लामचा प्रेषित महंमद पैगंबर याचे मूळही वैदिकच होते. ते कसे, तर महंमद हा संस्कृत बहुब्रीही समास आहे. 'महान मदः यस्य इति महंमद'. महंमदाच्या कुलाचे नाव कुरेशी. कुर + ईशी. हे कौरव कुलातील लोक होते. अल्ला, अंबा, अक्का ही देवीची द्योतक समानार्थी नावे आहेत. महंमद पैगंबराची कुलदेवता अल्ला (ऊर्फ अंबा) होती.
येशू ख्रिस्त हे काल्पनिक पात्र
पु. ना. ओक यांच्या मते "येशू ख्रिस्तही वास्तविक काल्पनिक आहे. पण तसा कोणी मनुष्य होता हे खरे मानले तरी एखाद्या भंपक आरोपावर असहाय्यपणे धरून खिळे ठोकून भीषण मृत्यू पावलेला मनुष्य कधी सर्वशक्तिमान परमेश्वराचा अवतार असतो का?" असा खडा सवाल ते टाकतात. कारण त्यांच्या धारणेनुसार "ईश्वरावतारी व्यक्ती अहिंसावादी असूच शकत नाही."
वास्तविक ख्रिश्चनिटी म्हणजे कृष्णनितीच आहे. तो शब्द ख्रिश्चनिटी = कृस्तनिती = कृष्णनिती असा तयार झाला. Constantine = Cons + Tantine = कंस - दैत्यन्. यावरून युरोपात महाभारतात होते, असे रा. रा. ओक यांचे म्हणणे आहे. जेरूसलेम ऊर्फ येरुशालेम म्हणजे यदु ईशालयम्. आफ्रिकेतील एका बंदराचे नाव दारेसलाम असे आहे. हे द्वार ईशालयचा अपभ्रंश आहे. त्यावरून प्राचीन काळी तेथे एक टोलेजंग श्रीकृष्णाचे वा अन्य देवतेचे मंदिर असले पाहिजे, असेही ते सांगतात.
यावरून राम व कृष्ण यांचे प्राचीनत्व िसद्ध होते असा त्यांचा दावा असून, त्या समर्थनार्थ ते सांगतात, की जपानमधील शिंटो हा शब्द म्हणजे िसंधु ससंस्कृतीचा अपभ्रंश आहे. चीनमध्ये देव शब्दाचा उच्चार ताओ असा आहे. तेथील ताओ म्हणजे देव हे राम-कृष्ण-शिव इ. असल्याने Taoism (ताओईझम) म्हणजे वैदिक ऊर्फ हिंदु संस्कृतीच. रामवरून Rome झाले, रामघाट म्हणजे इंग्लंडमधील Ramsgate, असे अनेक 'पुरावे' देत रा. रा. ओक राम व कृष्णाचे प्राचीनत्वही सिद्ध करतात.
वैदिक संस्कृतीतील विज्ञान
ही वैदिक संस्कृती महान होती हे तर झालेच, पण तिने मोठी वैज्ञानिक प्रगतीही केली होती. रा. रा. ओक यांच्या म्हणण्यानुसार "पूर्वी ज्योतिर्लिंगे ही अणुशक्ती निर्माण करणारी केंद्रे असत... म्हणून शंकराच्या पिंडीवर सतत पाणी ठिबकत ठेवलेले असते. शंकराच्या पूजेचे सांडपाणी किरणोत्सर्गी असे म्हणून ते ओलांडून न जाता भक्तगण आल्या वाटेने परत येत."
वेद हे पृथ्वीवरील चमत्कार आहेत. ते अपौरूषेय आहेत, अशा शब्दांत रा. रा. ओक वेदांची महती गातानाच सांगतात, की "वेद हे पृथ्वीवरील जीवनास लागू असणा-या समस्त शास्त्रीय ज्ञानाचे भांडार असल्याने एका वर्गाने ते घोकून सतत जतन करावे असा ईश्वरी संकेत आहे. त्या भांडारातून मानवास असे प्रात्यक्षिक ज्ञान वेळोवेळी मिळवू पाहणा-यास तीन गुण आवश्यक आहेत. ते असे - 1) वेद हे संस्कृतात असल्याने त्यातून ज्ञानाचे कण घेऊ पाहणारा मनुष्य संस्कृतज्ञ असला पाहिजे. 2) वेदात उच्चतम वैश्विक स्तराचे ज्ञान उद्धृत असल्याने त्यातून काही ज्ञान मिळू पाहणारी व्यक्ती स्वतः उच्च विद्याविभूषित (म्हणजे उदा. एम.एस्सी. उत्तीर्ण श्रेणीची) असावी. 3) ती व्यक्ती अनासक्त, स्थितप्रज्ञ, विरक्त जीवन जगत असावी."
इस्लामचे योगदान शून्य
आता हे सगळं झाल्यावर रा. रा. ओक आपणांस भारतीय इतिहाससंशोधनातील आणखी एक घोडचूक सांगू लागतात. इस्लामचे हिंदुस्थानच्या इतिहासात काही योगदानच नसल्याचे त्यांचे मत आहे. "एेतिहासिक म्हणून गणली गेलेली कोणतीच इमारत इस्लामी नाही," असा त्यांचा सिद्धांत आहे. ते विचारतात, "इस्लामी हल्लेखोरांनी सर्व कबरीच कबरी व मशीदीच मशीदी कशा बांधल्या? पांडवांपासून पृथ्वीराजापर्यंत सुमारे 6500 वर्षांतील हिंदु राजेरजवाड्यांचे महाल कोठे आहेत? बापाचा व भावांचा वध करून गादी बळकावणारे मुसलमान सुलतान बादशहा पदरचे कोट्यवधी रुपये खर्च करून मारलेल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रेतांच्या निरर्थक निवा-यासाठी टोलेजंग कबरी व निर्धन सामान्य मुसलमानांना नमाज पढण्यासाठी भव्य मशिदी का उभारतील?...
ताजमहाल, लालकिल्ला, जामा मशीद, मोती मशीद, अजमेरचा दर्गा ते तथाकथित मकब-यांपर्यंत सर्व इमारती तसेच फतेपूर सिक्री सारखे शहरही मुस्लिम नाही." हे कशावरून, तर त्याचे भरभक्कम पुरावे रा. रा. ओक यांच्याकडे आहेत. ते सांगतात -
मुमताझमहलचे खरे नाव शाहजहानच्या दरबारी बखरीत मुमताझ उल् झमानी असे आहे. मुमताझमहलमध्ये झ हे अक्षर आहे, तर ताजमहालात ज हे अक्षर येते. शिवाय तत्कालिन परदेशी प्रवासी ताजमहालचा ताज-इ-महल वा ताज-ए-महल असा उल्लेख करतात. त्यावरून तो शब्द मुळात संस्कृत तेजोमहालय असाच तत्समयीच्या आग्र्यातील हिंदूंच्या तोंडून एकलेला पाश्चात्यांच्या नोंदींत उतरला.
लालकिल्ला हेसुद्धा हिंदूच नाव आहे. अहमदनगरमधील नगर हा शब्द हिंदुत्व सिद्ध करतो.
फतेपूर सिक्री मधील फते सोडल्यास पूर व सीकरी ऊर्फ सीकडी हे संस्कृत शब्द आहेत.
अशा प्रकारे काही एेतिहासिक मुस्लिम स्थळे वा वास्तू यांची नावे ही संस्कृत नावांचे अपभ्रंश आहेत वा संस्कृत नावांशी त्यांचे साधर्म्य आहे म्हणून त्या इमारती वा स्थळे मुस्लिम नाहीत. त्याचप्रमाणे काही इमारतींच्या बांधकामासाठी लाल (केशरी) रंगाचा दगड वापरण्यात आला आहे. उदा. लालकिल्ला, जामा मशीद, कुतुबमिनार वगैरे. केशरी रंग हा वैदिक, राजपूत रंग आहे. म्हणून या इमारतीही वैदिक आहेत. त्याचप्रमाणे काही इमारतींच्या बांधकामात हिंदू प्रतिके वा संस्कृतात कोरलेली वचने आढळतात, म्हणून त्या इमारती मुस्लिम नाहीत, असे रा. रा. ओक पुराव्यादाखल सांगतात.
हे झाले इमारती वा शहरांचे. अन्य क्षेत्रातील इस्लामी योगदानाचे काय?
रा. रा. पु. ना. ओक विचारतात, "इस्लाममध्ये कोणत्याही जिवंत प्राण्याची आकृती काढणे निषिद्ध असतां धर्मांध इस्लामी हल्लेखोरांनी चित्रकला जोपासली वा वाढीस लावली असणे शक्यच नाही. इस्लामी चित्रशैली इस्लामी नाही."
संगीताची वाढही मुसलमानांनी केली नाही. "संगीतकला जगाच्या आरंभापासून सामवेदांतून निर्माण झाली आहे. म्हणून पाश्चात्य संगीतदेखील वेदमूलकच आहे, हे sing, song, singer, singin आदी संगीतमूलक शब्दांवरून कळून येईल. इस्लाम व संगीताचे विळ्या-भोपळ्यासारखे वाकडे आहे."
इतिहाससंशोधक गोपाळ गणेश आचवल
पु. ना. ओक यांच्याप्रमाणेच गोपाळ गणेश आचवल यांनीही इतिहाससंशोधन केले आहे. त्यांच्या ग्रंथाचे नाव `विश्वव्यापी वैदिक संस्कृती - भाग पहिला' असे असून, हा ग्रंथ 510 पानांचा आहे. याचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला नाही. आचवल यांचे संशोधन पाहता तेही 'पुना स्कूल'चेच असल्याचे दिसून येते. त्यांचे संशोधन आपण पुढच्या पोस्टमध्ये पाहू या.
संदर्भ -
भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका - पु. ना. ओक, मनोरमा प्रकाशन, जाने. 1992, किं. 150 रु.
Pls read - The Quest for the Origins of Vedic Culture - by Edwin Bryant
12 comments:
आता आपण ओकांचा विषय काढलाच आहे तर एक नमुना सादर आहे:
'अकबर थोर नव्हताच' मध्ये ऐन-ए-अकबरी चे हे पान संदर्भ म्हणून त्यानी सांगीतले आहे. आणि यावरुन ओकांचा निष्कर्ष काय तर...
"अकबराच्या राहत्या महालाजवळ एक कुंटणखाना असे. त्यावर अकबराची स्वत:ची देखरेख असे. त्यासंबंधीचा तपशील अबुल फजलच्या आईने `अकबरी' ग्रंथात पृष्ठ २७६ वर दिला आहे. तो असा, `अकबराने महालासमीपच एक मद्यशाला स्थापन केली होती. तिच्याशी संलग्न एक वेश्यागृहही होते. राज्यातून सतत भरणा होत असलेल्या त्या महिला भांडारात असंख्य वेश्या होत्या. त्यांची गणना करता येत नसे. त्यांतील कोण अजून कुमारी आहे वा कोणाचे कौमार्य कोणी भंग केले, इ. बित्तंबातमी अकबर त्या वेश्यांशी स्वत: बोलून काढून घेई. मदिरा व मदिराक्षींच्या त्या संयुक्त आवारास `शैतानपुरा' म्हणत.' अशा शैतानपुर्याच्या निकट राहून त्या आवाराची पूर्ण देखरेख स्वत:कडे ठेवून त्या अंत:पुरातील सर्व बित्तंबातमी जातीने ठेवणारा अकबर हा स्वत: सैतान होता, हे आपोआप सिद्ध होते."
दोन्ही उतार्यांची तुलना केल्यास ओकांचा चष्मा कसा होता ते सहज कळते.
ha.ha.pu.va. :-D
oak ratrichi "jara jaast" zalyavarach ase lekh lihayala ghyayache, asa mala full doubt ahe. ;)
mruNmay cheshtaa karaNe sope aahe.
sanshodhan awaghad
BRAVO!!!! mast aahe post...
इतिहासकाराने कोणा एका पक्षाची बाजू न घेता (हे तसे अशक्य किंवा कठीण काम असले तरी) प्रामाणिकपणे आलेले पुरावे सादर करावे. इतिहासकार म्हणजे भाट नाही. शाहीर किंवा कवीही नाही. त्यांचा उद्देश वेगळा. इतिहासकाराचा उद्देश याहून वेगळा हवा असे मला वाटते. तुमचे लेखन अतिशय आवडते. पुढील पोस्टसाठी उत्सुक.
रा.रा. dipak40, माझ्या प्रतिक्रीया चेष्टेसाठी नव्हती. मी केवळ एक fact सादर केला आहे. संशोधन करणे अवघड हे मान्यच, पण ओकांचे निष्कर्ष खर्या संशोधकास साजेसे नव्हते. आपण दोन्ही उतार्यांची तुलना केल्यास आपल्याला ही हे जाणवावे.
~ मृण्मय
OAK YAANCHAA PROBLEM ASAA HOTAA KI TYANCHE NISHKARSHA AADHEE TAYAAR HOTE.SANSHODHAN HE MAGAHOON AALE. TYAANAA HINDU DHARMAACHI SHRESHTHATAA SIDDHA KARAAYCHI HOTI. ITIHAAS HE TYAANCHE HATYAAR HOTE. TYAA ARTHAANE OAK HE ITIHAAS-NISHTHA ITIHAASKAR NAVHATECH. "ATLANTIC OCEAN" LA TE ATAL ANTIC (READ T FOR taraju)MHANAT. MHANJE JYAALAA ANT (end)NAAHI ASAA.MOSCOW MHANJE moksha! TE KAHI PATNAARI UDAHAARNEHI DET. sakhar= SUGAR.maAatru= MOTHER, pitru = FATHER. bhraatru= BROTHER.gharma matra= THERMAMETER etc. (Bhasheche aadaan pradaan he vyaapaari kinvaa raajkiy aparihaaryatemule hote. Sansrit, Latin Bhaashaanche tase zaale hote khare)ASO.HINDUNCHE SFULLINGA(!)CHETAVNYAASAATHI TYAANI ITIHAASAACHI FUNKNI KELEE HOTI ITKECH.THODKYAAT TYAANCHA HINDU ITIHAAS HA HINDU BHOOGOL HOTA!
पु ना ओक यांच्या लेखाचा संदर्भ दिल्या बद्दल धन्यवाद! या मुळे त्यांचे लेखन वाचलेच पाहिजे असे वाटले.
एकुणच त्यांची मते जरा वेगळीच आहेत असे जाणवते.
इतिहासाचा विचार करतांना पाश्चात्य विचारकांच्या कुबड्या घेवून चालण्याची गरज नाही. लक्षात घ्या की मॅक्समुल्लर पासून भारतीय लोक भंपक आहेत असे भासवण्याची पद्धत सुरु झाली. मॅक्समुल्लरच्या लेखातील, फक्त युरोपीयच स्रेष्ठ अशा प्रकारचा गाळीव मजकूरच पद्धतशीर प्रसिद्ध केला गेला होता, हे विसरू नका!
त्याला किती बळी पडायचे हे आपणच ठरवायचे आहे.
पु ना ओक काही वेळा सरसकट विधाने करत असले तरी
इस्लामच्या आधी अरबस्तानात मुर्तीपुजा अस्तित्त्वात होतीच. म्हणून तर इस्लाम ला त्यावर बंदी घालावी लागली ना?
आपला
गुंडोपंत
पुना ओक यांच्या लिखाणाबद्दल टीका , चेष्टा वगेरे ठीक आहे .
पण रात्रीची जास्त झाली वगेरे म्हणणे त्यांचा अपमान आहे .
ते एक स्वातंत्रसैनिक होते हे विसरत आहात .
नेताजींच्या आझाद हिंद सेनेत ते भारतीय सैनिक म्हणून लढलेले आहेत .
जय वैदिक धर्म
ह्या ब्लॉगचा लेखक अतिमूर्ख आणि पु. ना.ओंक दोघेही महामूर्ख आहेत."अमेरिका - अमरिश" हे ह्यांच्या बापाने पहिले होते का?अमेरिका हे नाव अमेरिगो वेस्पुची मुळे पडले हे माहिती नाही का ह्या भडव्यांना?
Anonymous,evadh tapayala kay zal.? Tyanni fakt mudde mandlet. shivyanaivaji changle shabd ahet Marathimadhye, tyancha vapar karava social sitesvar...
Evadhe manners tar nakkich astil,Amerikecha kholat study kelyane..! :)
पु ना ओक ला पुना पूना वकायची बिमारी होती!
पुराव्याची गरज नाही..नावातूनच सिद्ध होतंय ते!☺
Post a Comment