हीस‌ुद्धा आपलीच संस्कृती!

लिंग आणि योनी या शब्दांचा जाहीर उच्चरही अश्‍लील, अशिष्ट आणि लज्जास्पद मानल्या जाणाऱ्या आपल्या संस्कृतीत आजही लिंग आणि योनीची राजरोस पूजा केली जात आहे. ही गोष्ट काहीशी चमत्कारिक वाटत असली, तरी ती आपल्या धार्मिक-सामाजिक ढोंगिपणास साजेशीच आहे.

शंकर ही देवता तर लिंग स्वरूपातच पूजली जाते. पण खंडोबा, तसेच जोतिबा हे लोकदेवही मूळचे लिंगस्वरूपच आहेत. जोतिबाचे मूर्तीरूप हे त्याचे परिणत रूप आहे. त्याचे क्षेत्रपाळत्व ध्यानात घेऊन पूर्वप्रतिष्ठित क्षेत्रपाळ भैरवाशी त्याचे एकत्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नातून त्याला मूर्तीरूप लाभलेले आहे. तो प्रथम लिंगरूप होता. खंडोबाही प्रथम लिंगरूपातच पूजला जात होता. त्याचे मूर्तीरूपही नंतर असेच सिद्ध झालेले आहे. पण त्याची मूर्ती सिद्ध झाल्यानंतरही त्याचे मूळ लिंगरूप जेजुरी येथील मंदिरातील पूजेत राहिलेले आहे. रत्नागिरीवर जोतिबाच्या मंदिरात त्याचे मूळचे लिंगरूप आजही पूजले जात आहे.
कोकणात असे लिंगदेव गावोगावी दिसून येतात. त्यांना कोणतेही विवक्षित नाव नसते. या लिंगांना शाळुंका नसते. वरवंट्यासारखे, कमी-अधिक उंचीचे, ओबडधोबड उभे पाषाण "लिंग' या सामान्य नावाने ओळखले जातात आणि पूजले जातात.या लिंगस्वरूप देवतांप्रमाणेच योनीस्वरूप मातृकाही भक्तिभावाने पूजल्या जातात. रेणुका, एलम्मा, भूदेवी, जोगुळांबा, मातंगी, लज्जागौरी आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या मातृकांची पूजा त्यांच्या योनीरूपातच केली जाते. रेणुका या शब्दाचा अर्थ वारूळ असा आहे. ते योनीचेच एक प्रतिक आहे. जेव्हा धड सोडून शिराची, फक्त मुखवट्यांची म्हणजे तांदळ्याची पूजा करतो, तेव्हा आपण देवीची पूजा करीत नसून घटाची म्हणजे पुन्हा योनीचीच पूजा करीत असतो.शिवाची ज्याप्रमाणे लिंगरूपात पूजा केली जाते, त्याच प्रमाणे या देवींच्याही योनीरूपात पूजा केल्या जातात आणि तशा प्रकारच्या मूर्तीही अस्तित्वात आहेत. कर्नाटकमध्ये विजापूर जिल्ह्यातील बदामी तालुक्‍यात नंदिकेश्‍वर नावाचे गाव आहे. हे गाल पूर्वचालुक्‍यांची राजधानी असलेल्या बदामीपासून तीन मैलांवर आहे. बदामीपासून नंदिकेश्‍वरापर्यंतचा जवळचा मार्ग दगडी पायऱ्यांचा आहे. बदामीच्या परिसरातच समाविष्ट असलेल्या या स्थानी अनेक पुरातन अवशेष विखुरलेले आहेत. विशेषत येथील महाकूट नामक मंदिरसमूह वास्तुशिल्पाच्या आणि मूर्तीशिल्पाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. क्षेत्रमाहात्म्यकाराने त्याच्या पावित्र्याची कीर्ती "दक्षिणकाशी' या बिरूदाने गाजविलेली आहे. हे सर्व क्षेत्र शिवलिंगमय आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही एवढी शिवलिंगे येथे आहेत. लज्जागौरी हे येथील अधिष्ठात्री देवतेचे नाव आहे. या देवीची मूर्ती फार चमत्कारिक आहे. ती नग्न व उताणी निजलेली असून, रतिकाली स्त्रियांची जशी स्थिती असते, तशा स्थितीची आहे. तिचे सर्व अवयव उत्तम आहेत; पण तिला मस्तक नाही. अशाच प्रकारच्या मूर्ती आलंपूर (ता. आलंपूर, जि, मेहबूबनगर, आंध्र प्रदेश), नागार्जूनकोंडा (आंध्र प्रदेश), सिद्धनकोट्टे (उत्तर कर्नाटक), संगमेश्‍वर (ता. नंदिकोटकूर), व्याघ्रेश्‍वरी (होसपेटजवळ), वडगाव (जि. सातारा) या ठिकाणी आहेत. नेवासे (नगर), तेर (उस्मानाबाद), माहूरझरी (नागपूर), भोकरदन (औरंगाबाद), भीटा (उत्तर प्रदेश), कौशांबी (उत्तर प्रदेश) आणि नागार्जुनकोंडा येथील उत्खननात अशा प्रकारच्या खापरी मूर्ती मिळाल्या आहेत. या सर्व मूर्तींचे वैशिष्ट्य असे, की योनीच्या दर्शनाला उठाव देण्यासाठी पाय गुडघ्यात दुमडून बाजूला घेतलेले दाखविले आहेत. त्यातल्या काही मूर्ती नाभीच्या खालच्या भागाच्या आहेतट तर क
ाही खांद्यापासून. शीर मुद्दाम बसवलेले नाही. जिथे खांद्यापर्यंतचा भाग बनविलेला आहे, तिथे स्तनांना उठाव देण्यासाठी हातही बाजूला घेतलेले आहेत.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ज्या देवीची उपासना केवळ अनघड तांदळ्याच्या स्वरूपातच केली जात असे, त्याच देवीच्या योनीमूर्ती बनविल्या जात होत्या. तिचे प्राकृत नाव एल्लम्मा होते, तर संस्कृत नाव रेणुका होते. नाव कोणतेही असले, तरी ती भूदेवी आहे, अशीही लोकांची पक्की श्रद्धा होती आणि संतानप्राप्तीसाठी स्त्रिया अत्यंत निष्ठेने तिची उपासना करीत होत्या.
परशुरामाने आपल्या पित्याच्या आज्ञेवरून आपल्या मातेचे, रेणुकेचे शीर परशूने छाटले अशी एक कथा सांगितली जाते. खरे तर ही कथा मूर्तीच्या शिरोविहिनतेच्या स्पष्टिकरणासाठीच निर्माण करण्यात आलेली आहे.

दुसरी एक गंमत म्हणजे, माहूरला जी देवी रेणुका या नावाने अधिष्ठित झालेली आहे, तीच मातंगी देवी आहे. ही मातंगी देवी म्हणजेच मरीआई आणि तीच धरणीदेवी. ती महारंची देवी आहे. महार पूर्वीपासून आपणां भूमिपूत्र किंवा धरणीचे पूत म्हणवितात. मरीआई ही त्यांची मुख्य देवता. ती जेथे जेथे मातंगी या नावाने गावात नांदते आहे, तेथे तेथे तिचे पूजारी हे महारच (क्वचित मांगही) आहेत.

आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे, "येळ' या शब्दाचा अर्थ होतो एल्लम्मा आणि 'कोट्ट'चा अर्थ आहे नग्ना. "येळकोट'चा अर्थ आहे नग्न एल्लम्मा. खंडोबा हा देव मूळचा लिंगरूप आहे. त्याचा हा असा संदर्भ लागतो.

(संदर्भ ः लज्जागौरी - रा. चिं. ढेरे, श्रीविद्या, 1988
परिचय - नरहर कुरूंदकर, इंद्रायणी साहित्य, 1987, पृ. 23-24. )

व्यभिचाराचे अध्यात्म

।।1।।
वामचार ही तंत्राची एक शाखा आहे. त्याची दुसरी शाखा आहे दक्षिणाचार. दक्षिणाचारात केवळ उपासनेचे अवडंबर असते; तर वामाचारात वामा म्हणजे स्त्री आवश्‍यक असते. त्यात स्त्रीसंभोगाला अतिशय महत्त्व असते. या तांत्रिक आचार-विचाराच्या ग्रंथांना आगम म्हणतात. याच्या उलट निगम. निगमात आपले वेद, पुराणे, इतिहास, उपनिषदे आदी येतात.
तंत्रवाद्यांचा प्रवाह हिंदुंमध्ये प्रामुख्याने शैव आणि शाक्त म्हणून वावरतो. कालमुख, पाशुपत, कापालिक, लकुलिश, गामपत्य, सौर, शाक्त, भैरवनाथ हे सगळे तांत्रिकांचे संप्रदाय आहेत. काश्‍मीर, आसाम आणि दक्षिणेत श्रीशैल ही शैव तांत्रिकांची प्रमुख केंद्रे होती. कोणार्क आणि खजुराहो येथील शिल्प या तांत्रिक शैवांचे आहे.

बौद्ध धर्मातही हा तंत्रमार्ग प्रतिष्ठा पावलेला आहे. बौद्धांच्या महायान पंथाचा एक भाग योगाचार आहे. हा योगाचार पंथच नंतर तंत्रमार्गात रूपांतरीत झाला. या तांत्रिक बौद्धांना वज्रयान, मंत्रयान, सहजयान, कालचक्रयान अशी वेगवेगळी अवस्थानुसारी नावे आहेत.

योगिनी कौलमत हा या तांत्रिक संप्रदायातील एक प्रख्यात संप्रदाय आहे. त्रिक (अद्वैती) शैव परंपरेचा प्रवर्तक जो त्र्यंबक, त्याच्या त्र्यंबकमठिकेची एक शाखा कामरूपात प्रस्थापित झालेली होती. ही शाखा अर्धत्र्यंबकमठिका अथवा उत्तरत्र्यंबकमठिका म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे प्रवर्तन त्र्यंबकाच्या दुहितपरंपरेतील मच्छंद अथवा मीन (मत्स्येंद्रनाथ) या सिद्धाने इसवी सनाच्या पाचव्या शतकात केले. या मठिकेशी निडित असणारा तांत्रिक संप्रदाय योगिनी कौलमत या नावाने ओळखला जातो. तर ही जी त्र्यंबकमठिका आहे, ती म्हणजे आपले महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्‍वर. येथून द्वैती, अद्वैती आणि द्वैताद्वैती शैव तांत्रिकांचे संप्रदाय उदय पावले. योगिनी कौलमत परंपरेतील पंधरावा पुरूष येथूच काश्‍मिरात गेला आणि त्याने तेथे प्रत्याभिज्ञा संप्रदायाचा प्रसार केला.
योगिनी कौलमताचा प्रवर्तक मच्छंद याच्या पत्नीचे नाव कुंकणांबा असे आहे. कुंकणा हे रेणुकेचे एक पर्यायनाम आहे. रेणुका अथवा कुंकणा देवीची उपासना दक्षिण भारतात, विशेषतः आंध्र, कर्नाटक, कोंकण आणि गोमांतकात वारूळ रूपात केली जाते. वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतिक आहे. कुंकणा ही ज्या प्रदेशाची अधिष्ठात्री देवी आहे, तो प्रदेश कौंकण अथवा कोंकण. कोंकणाचा आणि परशुरामाचा निकटचा संबंध आहे आणि परशुरामाची माता असे हे सर्व नाते आहे. असो.


।।2।।
सर्व भारतभरच्या शैव परंपरेतला एकमुखाने वंदनीय असणारा त्यांचा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणून अभिनव गुप्त याचे नाव घेतले जाते. हा दहाव्या शतकाच्या शेवटी काश्‍मिरात होऊन गेला. त्याने कामाचा जो अध्यात्मविचार मांडला आहे तो असा ः
जगात ज्याला आपण अनैतिक म्हणतो किंवा बिभत्स म्हणतो त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही. कोणतीही वस्तू अथवा क्रिया शुद्ध-अशुद्ध , नैतिक-अनैतिक होत असेल, तर ती हेतूमुळे होते.

आत्मा हा आनंदमय आहे. या आनंदाची प्राप्ती आणि या आनंदात विक्षांती हे जीवनाचे सर्वश्रेष्ठ साध्य म्हणजेच मोक्ष आहे. हा मोक्ष शांतस्वरूप असल्यामुळे अर्हभावरहीत मनाने रतिक्रीडा केली; तर त्या ठिकाणी मोक्षोपयोगी शांतरसच ाहे. रतिक्रीडेचा आनंद आणि मोक्षाचा आनंद यांची जात एकच आहे. अहंभाव आणि नीजत्व विसरल्यानंतर जो रतिभोग होतो तो मोक्षाचा मार्ग आहे. या साठी पतीने स्वतःला शिवस्वरूप समजावे आणि पत्नीला शक्तिस्वरूप. या दिव्य अवस्थेत जी रतिक्रीडा चालते, त्यातून श्रेष्ठ मानवाचा जन्म होतो.

रतिक्रीडेत असणारा आनंद अधिक उत्कट आणि मुक्त व्हायला हवा. हा मुक्त आनंद अडथळ्याचे निवारण झाल्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाही. त्यासाठी त्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग मदिरा हा आहे. याला शैव परंपरेत शिवरस असे म्हणतात. ही दारू कशी प्यावी? तर कुलार्णवतंत्रात सांगितले आहे -

पीत्वा पीत्वा पुनः पीत्वा यावत्‌ पतती भूतले।
उत्थाय च पुनः पीत्वा पुनर्जन्म म विद्यते।।
आनन्दात्‌ तृप्यते देवी, मूर्च्छनाद्‌ भैरवः स्वयम्‌।
वमनात्‌ सर्वदेवश्‍च तस्मात्‌ त्रिविधमाचरत्‌।।

म्हणजे दारू पुन्हा पुन्हा प्यावी, पीता पीता जमिनीवर पडावे, उठल्यावर पुन्हा प्यावी म्हणजे पुनर्जन्म संपतो. दारू पिताना आनंदस्थानी देवी, मुर्च्छास्थानी भैरव आणि वमनस्थानी सर्व देवता संतुष्ट होतात. हिच्या गंधमात्राने पापनाश होतो, स्पर्शमात्राने पुण्य मिळते कारण हा शिवरस आनंदाची अभिव्यक्ती करणारा आहे.

तांत्रिक संप्रदायामध्ये मत्स्य, मांस, मदिरा, मुद्रा आणि मैथून या पंच "म'कारांना खूप महत्त्व आहे. अभिनवगुप्त मात्र मकार तीन मानतात.
यातील मैथूनासाठी एक दूती हवी असते. ती देखणी व तरूण हवी. शिवाय ती या साधनेत एकरूप होणारी हवी. अभिनव गुप्ताच्या मते मोक्षसाधनेत पत्नी दूती चालत नाही कारण तिथे सांसारिक भाव जागृत होतात. पण दूती निकट नातेवाईक असणे हे ते उचित मानतात. कारण शिवशक्ती तादात्म्याला त्याचा उपयोग होतो. म्हणून अभिनव गुप्ताने आई, बहिण, मुलगी, सासू या श्रेष्ठ दूती मानल्या आहेत. त्या न मिळाल्यास कोणत्याही जाती-धर्माची दूती चालते.

या साधनेत परिग्रह म्हणजे एक पुरूष व अनेक स्त्रिया, अनेक पुरूष व एक स्त्री, अनेक स्त्री-पुरूष यांची सामुदायिक रतिक्रीडा याचे अनेकविध विधी आहेत. ठिकठिकाणी रेतविसर्जनाचे श्रेष्ठ ठिकाण तोंड सांगितलेले आहे. म्हणून तिथे औपरिष्टक आहे. मद्यमांस यांची धुंदी व मस्ती आहे. त्याबरोबर विसर्जित रेताचे परस्पर चुंबनव्यवहारात आदान-प्रदान आहे.

।।3।।
हे असे अध्यात्म सांगणाऱ्या अभिनव गुप्तांनंतर त्या तोलामोलाचा तंत्रचक्रवर्ती म्हणून ज्याचे नाव घ्यावे लागेल, असे भास्करराय अथवा भासुरानंदनाथ हे महान कौल तांत्रिक सतराव्या-अठराव्या शतकात महाराष्ट्र-कर्नाटक-तामिळनाडू या दक्षिण प्रदेशात गाजत होते. अनेक ज्ञानशाखांवर त्यांचा अधिकार होता. त्यांनी अनेक यज्ञ केले, मंदिरे उभारली, काशी ते रामेश्‍वर विजययात्रा केली. अनेक शिष्य तयार केले. महाराष्ट्रातील चंद्रसेन जाधव त्यांचा अनुयायी होता आणि तंजावरच्या मराठी राज्यकर्त्यांनीही त्याचा सत्कार केला होता. "नित्योत्सव' या ग्रंथाचा कर्ता उमानंदनाथ; तसेच मराठवाड्यातील देशिकानंद, शुकानंद हे त्याचे शिष्य महाराष्ट्रीयच होते. त्यांचे उमरी, वसमत, कहाळे येथील मठ भास्कररायांच्या परंपरेतील होते.
योगिनी कौलमताप्रमाणेच "चोळीका पंथ' हाही एक वामाचारी पंथ. त्याचे अस्तित्व आजही आहे. हिमालय प्रदेशात हा पंथ चोळीका मार्ग, राजस्थानात लाजधर्म, कांचली पंथ, कुंडापंथ; तर पुण्यात घटकंचुकी पंथ या नावाने ओळखला जातो. जुन्नरमध्येही या पंथाचे अनुयायी होते. तुकोबांचे अनुयायी कचेश्‍वरभट ब्रह्मे यांच्या आत्मकथेत त्याचा उल्लेख आहे.

सहजिया वैष्णव संप्रदाय हासुद्धा बौद्धांच्या वज्रयान-सहजयान या तांत्रिक संप्रदायांच्या प्रभावातून उद्‌भूत झालेला आहे. या सहजिया वैष्णव संप्रदायाचे चंडिदास, चैतन्य गौरांग प्रभू हे अनुयायी होते. विशेष म्हणजे गौडिय वैष्णव आजही वैष्णवींशी तसलेच संबंध राखून आहेत. तर या चैतन्यांच्या अनुयायांनी मधुरभावाचे पीक अमाप पिकविले.

गुजरातमधील वल्लभ नावाच्या साधूंचा पुष्टीसंप्रदाय असाच आहे. अनिल अवचट यांनी आपल्या "संभ्रम' या पुस्तकात या साधुंची एक मनोरंजक हकिकत सांगितली आहे. हे वल्लभ साधू स्वतःस कृष्ण समजत आणि बायका स्वतःस राधा समजून सर्वतऱ्हेच्या क्रीडा ते करत. मोठमोठ्यांच्या बायका यांच्या नादी लागू लागल्या तेव्हा 1862च्या सुमारास प्रसिद्ध गुजराती समाजसुधारक करसनदास मुळजी यांनी आपल्या "सत्यार्थप्रकाश' या पत्रातून जोरदार टीका चालविली. तेव्हा वल्लभपंथी साधूंनी त्यांच्यावर खटला भरला. त्या खटल्यात प्रसिद्ध आद्यप्रबोधनकार डॉ. भाऊ दाजी लाड यांची साक्ष झाली. वकिलाने त्यांना या साधूंना ओळखता का, असे विचारता ते म्हणाले, "होय. औषधोपचार करण्यासाठी मी त्यांच्याकडे जात असतो.' "कोणत्या रोगासाठी?' असे विचारता, वैद्यकीय नीतिमत्तेमुळे त्यांनी उत्तर नाकारले. पण न्यायमूर्तींच्या सांगण्यावरून त्यांनी शेवटी सांगितले, "गुप्तरोगासाठी मी त्यांच्यावर उपचार करतो.'!!

संत मीराबाई स्वतःला राधा समजून कृष्णाची भक्ती करीत होती. त्यालाच आपला पती मानीत होती. तिच्या या भक्तीला तिच्या सासरच्यांचा तीव्र विरोध होता. एवढा की त्यांनी तिला एकदा वीषप्रयोग केला होता, याची येथे सहजच आठवण होते.
कृष्णाच्या भक्तांनीच हा मार्ग अवलंबिला होता, असेही नव्हे. रामाच्या उपासकांनी अशाच "रसिक संप्रदाया'ची स्थापना केली होती.

या तांत्रिक आचार-विचाराचे जे ग्रंथ आहेत, त्यांत "भगमालिनी रजस्वला स्तोत्र' (यात रजस्वलेच्या सर्जनेंद्रियाच्या पूजेचे महत्त्व गायलेले आहे.), "सौभाग्यभास्कर' (कौलमत भाष्यकार भास्करराय हे या ग्रंथाचे लेखक), तसेच "कौलज्ञाननिर्णय', मच्छंद वा मच्छेंद्रनाथांचे "कुलार्णवतंत्र' यांचा समावेश होतो. गोरक्षनाथांचे गुरू मच्छेंद्रनाथ वा मत्स्येंद्रनाथ आणि कुलार्णवतंत्राचे लेखक वेगळे अन्‌ बरेच उत्तरकालीन आहेत. पण गंमतीचा भाग म्हणजे गोरक्षनाथांचे गुरू मच्छेंद्रनाथसुद?धा स्त्रीराज्यात म्हणजे तांत्रिक योगिनींच्या जाळ्यात अडकले होते, अशी कथा आहे.

असा हा कामाचा अध्यात्मविचार चौथ्या-पाचव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू होता. या काळात शेकडो लेखक, हजारो आचार्य आणि लाखो अनुयायी हाच विचार करीत होते. अगदी अलीकडे ओशो रजनीशांनी या विचारांना मोठा उजाळा दिला.

(संदर्भ ः महाराष्ट्राचा देव्हारा - रा. चिं. ढेरे, विश्‍वकर्मा साहित्यालय, 1978, पृ. 40 ते 60
लज्जागौरी - रा. चिं. ढेरे, श्रीविद्या, 1988, पृ. 190 ते 192
यात्रा - नरहर कुरंदकर, शारदा, 1977, पृ. 76 ते 83
संभ्रम - अनिल अवचट, अमेय, 1982, पृ. 8)