ज्ञानेश्‍वरीचा कर्ता कोण?

ज्ञानेश्‍वरांची गुरूपरंपरा आदिनाथांपर्यंत मागे जाते. ज्ञानेश्‍वरांचा एक अभंग आहे -

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।1।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।2।।
गहिनीप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवा सार चोजविले ।।3।।

ज्ञानदेव हे नाथपंथीय होते. परंपरेने ते शैव होते. आता या ठिकाणी असा प्रश्‍न पडतो, ती ज्ञानेश्‍वर जर शैव होते तर त्यांनी वैष्णवपंथी भागवत संप्रदायाचा पाया का रचला? ज्ञानेश्‍वरांचं विठ्ठलाची भक्ती करणं एकवेळ समजून घेता येऊ शकतं. कारण विठ्ठल हे शिव आणि विष्णू यांचं संयुक्त साकारलेलं रूप - हरिहर मानलं गेलं आहे. याआधी "विठ्ठल खरा कोण होता?' या प्रकरणात आपण ते पाहिलंच आहे. परंतु तरीही विठ्ठलभक्ती ही वैष्णव मानली गेली आहे. तेव्हा शैव, नाथपंथी ज्ञानदेवांनी निरूपणासाठी वैष्णव कृष्णाची गीता घेतली आहे, हे कसं हा प्रश्‍न उरतोच.

तर त्याचं उत्तर असं दिलं जातं, की भगवद्‌गीतेचा ग्रंथकार कृष्ण हा स्वतःही उपमन्यूपासून पाशुपत दीक्षा घेतलेला शैव होता आणि तो वैदिक संप्रदायाचा अनुयायी होता. मात्र हा कृष्ण वामाचारी शैव नव्हता. भगवद्‌गीता हा शैव ग्रंथ होता. म्हणूनच त्यावर अभिनवगुप्ताने टीका लिहिली. याचाच अर्थ ज्ञानेश्‍वरांची मूळ प्रेरणा शैव होती. परंतु त्यांनी गीतेवरील टीका लिहिताना सांप्रदायिक दृष्टी न ठेवता शंकर, रामानुज इ. वैष्णव टीकाकारांचेही "भाष्यकारांते वाट पुसतु' असं म्हणून आधार घेतला आहे. हे उत्तर अर्थातच समाधानकारक नाही. त्यामुळे मुळचा प्रश्‍न तसाच राहतो. शिवाय भगवद्‌गीता हा ग्रंथ शैव असल्याचा दावाही तसा फुसकाच आहे. असो. नाथपंथी ज्ञानेश्‍वर हा "ज्ञानेश्‍वरी'सारख्या वैष्णव ग्रंथाचा कर्ता आहे असं मानून घ्यावं लागतं!

ज्ञानेश्‍वरांच्या चरित्रातील असाच आणखी एक भाग अभ्यासकांना कोड्यात टाकणारा आहे. ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायात या ग्रंथाची निर्मिती आपण कशी केली ते ज्ञानेश्‍वरांनी सांगितलं आहे. निवृत्तीनाथांचे गुरू गहिनीनाथ. त्यांनी निवृत्तीनाथांना गीतेवर भाष्य करण्याची आज्ञा केली. निवृत्तीनाथांनी गुरूच्या आज्ञेनुसार गीताप्रवचने केली. त्यामागे भोवतीच्या अज्ञजनांच्या उद्धाराची आध्यात्मिक-सांप्रदायिक प्रेरणा होती. ज्ञानेश्‍वरांनी म्हटलं आहे -

आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।

आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ यांच्यापासून जे सांप्रदायिक ज्ञान गुरूपरंपरेने गहिनीनाथ यांना प्राप्त झालं, ते त्यांनी आपला शिष्य निवृत्तीनाथ यांना दिलं. आणि तेच त्यांनी गीताप्रवचनांच्या रूपाने सामान्य माणसांपर्यंत पोचवावं, त्यांना अज्ञानापासून मुक्त करावं, अशी गहिनीनाथांची आज्ञा होती. गुर्वाज्ञेनुसार निवृत्तीनाथांनी गीताप्रवचने केली. त्या प्रवचनांना एक श्रोता म्हणून ज्ञानेश्‍वर उपस्थित असत. जे श्रवण केलं त्यालाच ज्ञानेश्‍वरांनी ग्रंथरूप दिलं. तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्‍वरी.

एकंदर हे असं जर असेल, तर मग ज्ञानेश्‍वरीचं कर्तृत्व निवृत्तीनाथांकडे जातं. या ग्रंथाबद्दल लिहायचं तर ते "भावार्थदीपीका, चिंतन - निवृत्तीनाथ, शब्दांकन - ज्ञानेश्‍वर' असं लिहावं लागेल.

साठच्या दशकात ज्ञानेश्‍वरीच्या कर्त्याबाबत असाच प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. तो केला होता डॉ. मा. गो. देशमुख यांनी. त्यांच्या मते ज्ञानेश्‍वर ही मुळात यादवकालीन व्यक्ती नाहीच. ते विठ्ठलपंत कुळकर्णी यांनी निर्माण केलेलं केवळ एक वाङ्‌मयीन पात्र आहे. ज्ञानेश्‍वरीचा खरा निर्माता विठ्ठलपंत हा आहे!

अर्थात या वादास आज फार काही अर्थ आहे, अशातला भाग नाही. ज्ञानेश्‍वरी कोणी लिहिली यापेक्षा त्या काळात ज्ञानेश्‍वरी का लिहिण्यात आली, तिचं खरं प्रयोजन काय होतं हा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. मात्र त्याबद्दल नंतर पाहू. आज एवढंच म्हणू या, की अखेर नावात आहे तरी काय?

संदर्भ -
"प्रदीर्घ संशोधनाची व्यासंगी फलश्रुती' - डॉ. ग. ना. जोशी (शिवसूत्र - डॉ. ग. वा. तगारे, इम्प्रेशन्स पब्लिशिंग हाऊस, बेळगाव चे पुस्तक परीक्षण), महाराष्ट्र टाईम्स, 27 ऑक्‍टोबर 1996
निर्मितीचे श्रेय - डॉ. द. भि. कुलकर्णी, रूची, मे 1998, पान 2-3.

वेगवेगळा कृष्ण


राम ही ज्याप्रमाणे एखादी ऐतिहासिक व्यक्ती असण्याची शक्‍यता आहे, त्याप्रमाणेच कृष्णही अगदीच काल्पनिक नसावा असं पुराणसंशोधकांचं मत आहे. पण कृष्णाचं चरित्र हे इतके गुंतागुंतीचं - कॉम्प्लेक्‍स आहे, की त्यातून "खरा' कृष्ण कोणता हे शोधून काढणं जरा कठीणच आहे. आज कृष्णाचं जे चरित्र लोकप्रिय आहे ते पाहिलं की सहज लक्षात येतं, की इथं एक नाही तर अनेक वेगवेगळे कृष्ण एकाच कृष्णचरित्रात समाविष्ट करण्यात आहेत. त्यामुळेच आपणांस दिसणारा कृष्ण हा बालक्रीडा करणारा खोडकर कृष्ण आहे. सोळा हजार बायका करणारा कृष्ण आहे. राजकारणी कृष्ण आहे. योद्धा कृष्ण आहे. आणि त्याचवेळी तो तत्त्वज्ञानी कृष्णही आहे. अर्थात हा सर्व वेगवेगळ्या परंपरांमधील कृष्ण आहे आणि नंतरच्या काळात म्हणजेच नारयणीय भक्तिमार्ग वाढू लागल्यानंतरच्या काळात या वेगवेगळ्या परंपरांच्या कथा एका कृष्णात एकत्र आणण्यात आल्या आहेत.

कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (3.7.6) आला आहे. "वासुदेव कृष्णा'चा अर्जुनाबरोबर उल्लेख पाणिनीने केला आहे. विशेष म्हणजे पाणिनीच्या काळात कृष्ण आणि अर्जुन या दोघांनाही क्षत्रिय म्हणून मान्यता नसावी, असं दिसतं.

मूळ महाभारत (इ.स.पू. सुमारे 300), हरिवंश (इ.स.पू. सुमारे दुसरे-तिसरे शतक), विष्णुपुराणाचा (सुमारे पाचवे शतक) पाचवा अंश, भागवताचा (नववे शतक) दशमस्कंध आणि अखेरीस ब्रह्मवैवर्तपुराण (सुमारे पंधरावे शतक) हे कृष्णचरित्राचे ऐतिहासिक क्रमाने मुख्य आधार आहेत.

दुर्दैवाने आपल्याकडं मूळ ग्रंथांचं पावित्र्य सांभाळण्याची पद्धतच नव्हती. त्यामुळे आपल्या सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये नंतर ज्याला जशी पाहिजे तशी भर घालण्यात आली आहे. अनेक ग्रंथांमध्ये असा प्रक्षिप्त भाग आढळतो, तसेच अनेक ग्रंथांची सरमिसळही झालेली दिसून येते. उदाहरणार्थ महाभारताच्या सभापर्वात भीष्माने जे कृष्णचरित्र सांगितले आहे, ते हरिवंशातून जवळजवळ सगळं उचललेलं आहे. मूळच्या महाभारतात फक्त कौरव-पांडवांच्या संदर्भात सांगितलेल्या कृष्णकथाच होत्या. सभापर्वातील भीष्मोक्त कृष्णचरित्र ही हरिवंशातून घेतलेली भर आहे. विष्णुपुराणातील कृष्णकथा ही हरिवंशच्याच कथेत काही भर टाकून सांगितलेली आहे. आज सर्वत्र प्रसृत असलेली कृष्णकथा ही मुख्यतः भागवताच्या दशमस्कंधातील कथा आहे.

या पौराणिक परंपरेनुसार कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापार आणि कली यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या पूर्वी झाला. दाशरथी रामाने अयोध्येत राज्य करण्यास प्रारंभ केला तेव्हा द्वापार युगाची सुरूवात झाली. त्यानंतर पांचाल, पौरव, चेदी, मगध, यादव आणि आनव या क्षत्रिय वंशांची भरभराट झाली. राम सूर्यवंशातला. त्याच्यानंतर त्याचा हा वंश अस्ताकडे झुकला. त्याच्या वंशातला अखेरचा पुरूष म्हणजे बृहद्‌बल. त्याला कर्णाने पराजित केलं होतं आणि नंतर कुरूक्षेत्रावर तो अभिमन्यूच्या हातून मारला गेला. असो.

तर यादव वंशातील महापुरूष म्हणजे बलराम आणि कृष्ण. इ.स.पूर्व चौदावे शतक हा कृष्णाचा काळ मानला जातो. भारतीय युद्ध इ.स.पूर्व 1200च्या सुमारास झाले. त्यावेळी कृष्णाचं वय होतं 100 किंवा त्याहून थोडी अधिक वर्षे! कृष्ण हा वासुदेव-देवकीचा पुत्र. कंस हा त्याचा चुलत मामा. त्याच कृष्णाने वध केला. पांडव हे कृष्णाचे सख्खे आतेभाऊ. भारतीय युद्धात तो पांडवांच्या बाजूने लढला. या युद्धाच्या सुरूवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला "गीता' सांगितली असं मानलं जातं. तर हा वयाच्या शंभराव्या वर्षी गीतेसारखा अनेक तत्त्वमतांचा समन्वय असणारा ग्रंथ सांगणारा कृष्ण तारुण्यात गोपींशी उत्तान शृंगार करणारा होता असंही दाखविण्यात आलं आहे.

भागवतात गोपी आणि कृष्ण यांच्या शृंगाराचं उत्तान वर्णन करण्यात आलं आहे. कृष्ण आणि गोपींची रासक्रीडा अत्यंत खुलवून सांगितली आहे. हरिवंशात मात्र हे सर्व सूचकतेने मांडलेलं आहे. मात्र महाभारत, हरिवंश, एवढंच काय पण भागवतातही राधेचा अजिबात उल्लेख नाही. मग राधा आणि कृष्णाची ही प्रणयकथा आली कोठून? पाचव्या शतकातील हालाच्या "गाथासप्तशती'त त्यांच्या प्रणयाचा उल्लेख आलेला आहे. ब्रह्मवैवर्तपुराण आणि जयदेवाचं "गीतगोविंद' यात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे.

म्हणजे मूळ महाभारतातला कृष्ण गोपींशी क्रीडा करणारा नाही. त्याच्या बाजूला राधा नाही. तो सोळा हजार बायतांचा नवराही नाही आणि वृंदेचा पतीही नाही. मूळ कृष्ण हा यादव गणतंत्राचा एक नेता आहे. त्याच्यावर विविध प्रकारच्या शृंगाराचे रंग उत्तरकाळात चढविले गेले. त्याचा संबंध वैष्णवांच्या मधुराभक्तीशी आहे. तेव्हा कृष्णाच्या रासक्रीडेच्या कहाण्यांना इसवी सन पूर्व परंपरा नाही. मूळ कृष्ण वेगळा होता. नंतरचा कृष्ण त्याहून भिन्न आहे.


संदर्भ -
अभिवादन - नरहर कुरुंदकर, इंद्रायणी साहित्य, 1987 या पुस्तकातील "प्रो. कोसंबी आणि भगवद्‌गीता' हा लेख
विचारशिल्प - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांचे निवडक निबंध - संपादक रा. ग. जाधव, कॉण्टिनेन्टल प्रकाशन, 1994 मधील "कृष्ण' हा निबंध.

नॉस्ट्रडॅमसची "कुंडली' - भाग 2

भविष्यवाणी - किती खरी, किती खोटी?

नॉस्ट्रडॅमस हा भविष्यवेत्ता म्हणून विश्‍वप्रसिद्ध आहे. त्याने वर्तविलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत, असं सांगितलं जातं. उदाहरणार्थ सोळाव्या लुईचं पलायन, नेपोलियन, हिटलर, इराणच्या शहाची पदभ्रष्टता, पर्शिया-तुर्कस्तान यांच्यातील ऑक्‍टोबर 1727चा तह, लुई पाश्‍चर, स्पॅनिश यादवी युद्ध अशा अनेक घटना त्याला आधीच "दिसल्या' होत्या. काही वर्षांपूर्वी प्रिन्सेस डायना आणि डोडी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्याचं भाकितही नॉस्ट्रडॅमसने केलं होतं, असं नंतर सांगण्यात आलं.

आता हे जर खरं असेल, तर मग असं मानावं लागतं की पुढं काय होणार हे आधीच ठरून गेलेलं आहे. कोणीतरी ते आधीच निश्‍चित केलेलं आहे. आणि ते "कोणीतरी' म्हणजे दुसरं कोण असणार? अल्ला, भगवान, आकाशातला बाप्पा! पुन्हा याचा अर्थ असा होतो, की भगवद्‌गीतेत सांगितल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात जो ईश्‍वर आहे, तो सर्व प्राणीमात्रांना यंत्राप्रमाणे चालवतो. मग मानवी प्रयत्नांना काहीच अर्थ राहात नाही. नॉस्ट्रडॅमसची भाकितं खरी ठरली, ठरत आहेत हे एकदा नक्की झालं, की मग परमेश्‍वर, नियती या संकल्पनांना सुखाने शरण जाण्यावाचून अन्य गत्यंतर नाही! असं शरण जाण्याकडेच अनेकांचा कल असतो. बहुतेकांचा देव आणि दैवावर विश्‍वास असतो आणि म्हणूनच त्यांची नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवेत्तेपणावरही श्रद्धा असते.

तेव्हा आता हे पाहिलं पाहिजे, की खरोखरच नॉस्ट्रडॅमसने वर्तविलेली भाकितं खरी ठरली आहेत का? खरोखरच त्याच्याकडे भविष्यात डोकावण्याची शक्ती होती का?
आपण आधी पाहिलंच आहे, की नॉस्ट्रडॅमसला खगोलशास्त्र आणि गूढविज्ञान या विषयांत कमालीची रूची आणि गती होती. 1544 मध्ये सलोनमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्याने वैद्यकीचा जवळजवळ त्याग केला होता आणि ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला होता. असं सांगतात, की रात्रीच्या वेळी तो एक काश्‍याचं भांडं घ्यायचा. पाण्याने ते काठोकाठ भरून एका तिपाईवर ठेवायचा. मग स्वतःला संमोहित करायचा आणि त्या पाण्यामध्ये तास न्‌ तास पाहात बसायचा. त्यात त्याला भविष्य "दिसत' असे. हे जे भविष्य त्याने पाहिलं ते त्याने काव्यात, चार-चार ओळींच्या छंदात लिहून ठेवलेलं आहे. ग्रीक, हिब्रू, लॅटिन, इटालियन, स्पॅनिश आणि सेल्टिक भाषेचा वापर करून त्याने हे भविष्यकाव्य लिहिलेलं आहे. पुन्हा ते सगळं सांकेतिक पद्धतीने, अलंकारिक, रूपकात्मक शैलीत लिहिलेलं आहे. "इन्क्विझिशन'पासून स्वतःला वाचविण्यासाठी आणि सामान्यजनांना भविष्याचं स्पष्ट दर्शन होऊ नये यासाठी त्याने आपलं भविष्यकाव्य गूढ करून ठेवलं असं सांगितलं जातं. या गोष्टींमुळे त्याच्या काव्याची उकल करणं अवघड झालेलं आहे. त्याचबरोबर त्यातून हवे ते अर्थ काढणंही शक्‍य झालेलं आहे. थोडक्‍यात नॉस्ट्रडॅमसची सर्व भविष्यवाणी अत्यंत मोघम स्वरूपाची असून, त्यातून "जो जे वांछिल तो ते लाहो' अशा प्रकारचा अर्थ काढता येतो.

उदाहरणार्थ नॉस्ट्रडॅमसने केलेलं हे फ्रेंच राज्यक्रांतीचं भाकित पाहा. तो लिहितो -
When the litters are overturned by the whirlwind
and faces are covered by cloaks,
the new republic will be troubled by its people.
At this time the reds and the whites will rule wrongly. (शतक 1, छंद 3)

म्हणजे - जेव्हा झंझावाती वावटळीने पालख्या उलटल्या जातील आणि चेहरे बुरख्याने झाकून घेतले जातील, नवे गणराज्य आपल्या जनतेमुळेच संकटात सापडेल. यावेळी लाल आणि पांढरे वाईटप्रकारे राज्य करतील.

हे जे भाकित आहे ते 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीबद्दलचं आहे असं एरिका चिथम यांनी म्हटलेलं आहे. हा अन्वयार्थ त्यांनी कसा लावला, तर पालख्या हे सरंजामशाहीचं प्रतिक आहे. त्या क्रांतीच्या झंझावातात उलथून पडतील. "चेहरे बुरख्याने झाकून घेतले जातील', ही ओळ फ्रान्समधून पलायन करणारांबाबत असावी किंवा गिलोटिनद्वारे कापल्या गेलेल्या आणि नजरेआड ठेवण्यात आलेल्या मुंडक्‍यांसंदर्भात असावी, अशं चिथम हिने म्हटलेलं आहे. लाल या शब्दाने क्रांतिकारकांचा उल्लेख होतो, तर पांढरा हा फ्रान्सच्या बोर्बन राजघराण्याचा निदर्शक रंग आहे. हे सर्व ठीक आहे. पण असाच शब्द ताणूनताणून अर्थ काढायचा तर हे भाकित कोणत्याही उठावाबद्दलचं असू शकेल. ते 1857च्या बंडाबद्दलचं आहे असं कोणी म्हणालं तर काय करणार?

नॉस्ट्रडॅमसच्या या भाकिताचा अर्थ आपण असाही लावू शकतो, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या झंझावाती प्रचारामुळे कॉंग्रेसी सरंजामदारांच्या पालख्या निवडणुकीत उलथून पडल्या. शरद पवार, छगन भुजबळ आदींना त्यांच्यावरील आरोपांमुळे चेहरे बुरख्याने झाकून घ्यावे लागले. म्हणजे त्यांचे खरे चेहरे उघडे पडले म्हणून ते आपले तोंड लपवू लागले. पण तरीही महाराष्ट्रातल्या मतदारांनी सुस्पष्ट कौल न दिल्याने ही नवी शिवशाही, हे लोकांचे राज्य संकटात सापडले. पुढे सत्तेवर आलेले भगवे (लाल) आणि त्यांना पाठिंबा देणारे पांढरे अपक्ष (कॉंग्रेस बंडखोर) यांना राज्यकारभार नीट चालवता आला नाही. याचा अर्थ हे भाकित झालं महाराष्ट्रातील सत्तांतराचं! आता याला काय म्हणणार?!

अशीच अनेक भाकितं आहेत, की ज्यांचा अर्थ काहीही होऊ शकतो. शतक 1, छंद 16 मध्ये विसाव्या शतकाअखेरीस युद्ध, सोबत रोगराई व दुष्काळ येणार असं म्हटलेलं आहे. पण स्वतः एरिका चिथम यांनीच हे भाकित कुठल्याही शतकाचं असू शकतं असं म्हटलं आहे!

शतक 1, छंद 25 मध्ये नॉस्ट्रडॅमस सांगतो -
The lost thing is discovered hidden for many centuries. Pasteur will be celebrated almost as a God-like figure. This is when the moon completes her great cycle, but by other rumours he shall be dishonoured.
(अनेक शतकांपासून लपविलेली गोष्ट शोधण्यात येईल. पाश्‍चरला जवळजवळ एखाद्या देवाप्रमाणे गौरविले जाईल. चंद्र आपली महाप्रदक्षिणा पूर्ण करील तेव्हा हे घडेल, पण अन्य काही अफवांमुळे त्याला अपमानीत केले जाईल.)
या भाकितात पाश्‍चर हे नाव असल्यामुळे ते लुई पाश्‍चर यांच्याबद्दलचं आहे, असं मानण्यात आलं. पण याचा आणखीही वेगळा अर्थ निघू शकतो. पुन्हा पाश्‍चरने "खूप शतके लपविण्यात आलेली लॉस्ट थिंग शोधली' याचा अर्थ त्याने रोगजंतूंचा शोध लावला असं म्हणणं म्हणजे खूपच झालं! रोगजंतू ही काही लॉस्ट थिंग नव्हे. तसं असेल तर ते कोणी हरविले? अनेक शतकं कोणी लपविले? पण तरीही नॉस्ट्रडॅमसचं हे पाश्‍चरबद्दलचं भाकित खरं ठरलं असं सांगण्यात येतं.

नॉस्ट्रडॅमसची फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियन याबाबतची भविष्यवाणी पाहिली तर तो जणू काही समकालिन इतिहासकारच होता असं वाटावं! त्याने वायरलेस यंत्रणा, ट्रांझिस्टर, टेलिव्हिजन, स्कूटर, वीज, विमाने, पाणबुड्या, लढाऊ विमाने, त्यांचे पायलट यांचंही भाकित केलं होतं असं विविध छंदांच्या अर्थाची ओढाताण करून सांगण्यात येत आहे.नॉस्ट्रडॅमस आणि भारत देश

काही वर्षांपूर्वी आपल्याकडच्या जयकुमार आळंदकर यांनी (हे कुणाचं तरी टोपणनाव असावं.) "जयभाष्य नॉस्ट्रडॅमस' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. (अमित तेजस प्रकाशन, सोलापूर, पृष्ठे 440, किं. 230 रू.). या ग्रंथात आळंदकरांनी असं मत मांडलंय, की नॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी म्हणजे बृहद्‌ कादंबरीच आहे आणि तिचा नायक आहे भारताच थोर पुरूष आणि भारत देश! आळंदकर सांगतात, की नॉस्ट्रडॅमसचं असं भाकित आहे, की एक चिनी मुस्लिम नेता हा महान ख्रिश्‍चन विरोधक म्हणून पुढे येईल. येथे नोव्हेंबर 1999 पासून तिसरे जागतिक महायुद्ध सुरू होईल. हा तिसरा ख्रिस्तविरोधक युरोपवर आक्रमण करील. तो नेपोलियन, हिटलर यांच्याप्रमाणे विश्‍वातील महान खलनायक असेल. युरोपला चिनी मुस्लिमांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी महान विश्‍वनायक, थोर भारतीय पुरूष श्रेयन (Chyren) पुढाकार घेईल. इ.स. 2000 नंतर सुमारे 1700 वर्षे भारत देशच सर्व विश्‍वराष्ट्रांचा मार्गदर्शक ठरेल.

आळंदकर सांगतात, की दक्षिण भारतात, महाराष्ट्रात हा महान विश्‍वपुरूष जन्म घेणार आहे. तो दत्त संप्रदायी असेल. हा अवतारी पुरूष म्हणजेच कल्की. आणि सर्वात आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे 23 एप्रिल 1974 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी करवीर पाटण येथे जी व्यक्ती जन्मली आहे, ती व्यक्ती म्हणजेच भारताचा महान कल्की होय!

आळंदकरांच्या म्हणण्यानुसार नॉस्ट्रडॅमसने शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा व राजीव गांधी, गुरू गोविंदसिंग, महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचीही नोंद केलेली आहे. "मुंबई शहर सर्व विश्‍वातील गुन्हेगारांचे आणि महान कलावंतांचे स्थान बनेल,' असंही नॉस्ट्रडॅमसने लिहून ठेवल्याचं ते सांगतात.

शतक 5, छंद 65 मध्ये त्याने राजीव गांधींची 21 मे 1991 रोजी बॉम्बस्फोटात हत्या होणार असं म्हटलं असल्याचं आळंदकर आपल्या ग्रंथात सांगतात. मुळात या ठिकाणी नॉस्ट्रडॅमसने असं लिहिलंय -

Suddenly appeared, the terror will be great, hidden by the ringleaders of the affair. The women on the charcoal will no longer be seen, thus, little by little the great ones will be angered.

(अचानक निर्माण झालेली दहशत अतिशय प्रचंड असेल. विशिष्ट कामासाठी तयार करण्यात आलेल्या टोळीच्या म्होरक्‍यांनी ती गुप्त ठेवली असेल. कोळशावरील महिला यापुढे दिसणार नाहीत, अशाप्रकारे हळूहळू थोर व्यक्ती संतापतील.)
या भाकितातील शब्द न्‌ शब्द अगदी कितीही ताणला, तरी त्यातून राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोटाने मृत्यू होण?र हे कसे काय स्पष्ट होईल?

नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाणीतील सर्वच छंदांबाबत असं झालेलं आहे. म्हणजे काय तर, त्याचा एखादा छंद घ्यायचा. त्याच्या अर्थाची ओढाताण करून पाहायचं, की त्यात एखादी ऐतिहासिक घटना बसते की नाही. ती तशी बसली, की मग लगेच जाहीर करायचं की त्या अमूक-अमूक घटनेचं भाकित नॉस्ट्रडॅमसने आधीच वर्तविलं होतं! असा हा एकूण सगळा प्रकार आहे.

भारतीय पुरूष विश्‍वनायक बनेल, चिनी मुस्लिम युरोपवर आक्रमण करील वगैरे अर्थ आळंदकरांनी नॉस्ट्रडॅमसच्या ज्या भविष्यछंदातून काढला आहे, ते पाहिलं तर शब्दार्थाच्या ओढाताणीचा हा प्रकार स्पष्ट होईल.

शतक 2, छंद 28 मध्ये नॉस्ट्रडॅमस सांगतो -
The last but one of the prophet's name, will take monday for his day of rest. He will wander far in his frenzy delivering a great nation from subjection.
(प्रेषिताचं शेवटून दुसरं नाव असलेली व्यक्ती सोमवार हा त्याच्या विश्रांतीचा दिवस मुक्रर करील. तो त्याच्या उन्मादात भटकत राहून एका महान राष्ट्राची गुलामगिरीतून सुटका करील.)

शतक 2, छंद 29 सांगतो -
The man from the east will come out of his seat and will cross the Apennines to see France. He will cross through the sk, the seas and the snows and he will strike with his rod.
(पूर्वेकडील एक पुरूष आपली जागा सोडून येईल आणि ऍपेनाईन्स ओलांडून फ्रान्सला भेट देईल. तो आकाश, समुद्र आणि बर्फ ओलांडून येईल आणि आपल्या दंडाचा आघात सर्वांवर करील.)

शतक 5, छंद 54 -
From beyond the Black sea and great Tartery, there will be a king who come to see France. He will pass through Alenia and Armenia and leave his bloody rod in Byzantium.
(काळा समुद्र आणि महातार्तार किंवा चीन या पलिकडून एक राजा फ्रान्समध्ये येईल. दक्षिण रशियातील ऍलेनिया आणि आर्मेनिया या मार्गे तो कॉन्स्टॅंटिनोपल येथे येईल आणि त्याचा रक्ताळलेला दंड तो तेथे सोडून देईल.)

शतक 10, छंद 72 -
In the year 1999 and seven months, from the sky will come the great King of Terror. He will bring back to life the great King of Mongols. Before and after war reigns happily.
(इ.स. 1999च्या जुलै महिन्यात आकाशातून दहशतीचा सम्राट येईल. महान मंगोल राजाला (म्हणजे त्याच्या आठवणींना?) तो जिवंत करील. त्यापूर्वी व त्यानंतर युद्ध होईल. - हा दहशतीचा सम्राट म्हणजेच तिसरा ख्रिस्तविरोधक असेल.)

शतक 2, छंद 79 -
The man with the curly, black beard will subdue the cruel and proud nation through skill. The great CHIREN will take from afar all those captured by the Turkish banner.
(काळीकुरळी दाढीधारी मनुष्य आपल्या कौशल्याने क्रूर, अभिमानी राष्ट्राला जिंकील. हा महान शिरेन तुर्कांनी जिंकलेले सर्व काही त्यांच्याकडून जिंकून घेईल.)

या आणि अशाप्रकारच्या छंदांमधून भारतीय पुरूषाच्या विश्‍वविजयाची कहाणी रचण्यात आली आहे. गमतीचा भाग म्हणजे शिरेन किंवा श्रेयन या ज्या नावाभोवती हे सर्व कल्पनेचं जाळं विणण्यात आलं आहे, ते नाव हेन्री या नावाचं निदर्शक असून, हा छंदच मुळी 1571मध्ये झालेल्या लेपॅंटोच्या लढाईसंदर्भात असल्याचे नॉस्ट्रडॅमसच्या भाष्यकार एरिका चीथम यांचं मत आहे!

इथं आणखी एक महत्त्वाची बाब नमूद केली पाहिजे. ती म्हणजे, जगावर भारतीय राज्य करतील असं नॉस्ट्रडॅमसच्या भारतीय भाष्यकारांना दिसत असलं, तरी पाश्‍चात्य भाष्यकारांना मात्र तसं मुळीच वाटत नाही. नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाणीचा अर्थ लावत असताना भारत हा देश त्यांच्या खिजगणतीतही नसतो. नॉस्ट्रडॅमसच्या संपूर्ण भविष्यवाणीत भारताच, हिंदुस्थानचा पुसटसाही उल्लेख नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.


मनी वसे ते भाकितात दिसे!

नॉस्ट्रडॅमसची अनेक भाकितं खरी ठरली आहेत असं त्याचे भाष्यकार सांगतात. त्यांच्या या विधानाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. त्या विधानाचा गर्भितार्थ असा असतो, की ज्या अर्थी नॉस्ट्रडॅमसची अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत, त्या अर्थी त्याची बाकीची भाकितंही खरीच ठरणार आहेत.

आता एरिका चीथम यांच्या ग्रंथात ही जी "खरी' ठरलेली भाकितं दिली आहेत, त्यांच्याकडे जरा दृष्टिक्षेप टाकला की एक गोष्ट लक्षात येते, की ही सर्व भाकितं 1979 पूर्वीच्या घटनांबाबतची आहेत. एरिका चीथम ही नॉस्ट्रडॅमसची अधिकारी भाष्यकार मानली जाते. तिने संपादित केलेला "प्रॉफेसिस ऑफ नॉस्ट्रडॅमस' हा जो आज प्रमाणग्रंथ मानला जातो, तो प्रकाशित झाला डिसेंबर 1979 मध्ये. त्यातून हेच स्पष्ट होतं, की एरिकाबाईंनी 1979 पूर्वीच्या ऐतिहासिक घटना नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यछंदांमध्ये बसविल्या व मग त्या घटना नॉस्ट्रडॅमसला कशा दिसल्या होत्या असा डंका पिटविला. अन्य भाष्यकारांनीही असंच केलेलं आहे. हे एवढ्या ठामपणे आपण म्हणू शकतो, कारण 1979नंतरच्या कालखंडाबद्दल नॉस्ट्रडॅमसने जे भविष्य वर्तविलं आहे, सर्व भाष्यकारांनी आपापल्या परीने त्याचा जो अन्वयार्थ लावलेला आहे, तो साफ चुकीचा ठरला आहे. 1979नंतरची नॉस्ट्रडॅमसची निदान आतापर्यंतची सर्व भाकितं तद्दन खोटी ठरली आहेत!

यासंदर्भात त्याचं "किंग ऑफ टेरर' म्हणून गाजलेलं जे भाकित आहे (शतक 10, छंद 72) ते पाहण्यासारखं आहे.

(In the year 1999 and seven months, from the sky will come the great King of Terror. He will bring back to life the great King of Mongols. Before and after war reigns happily.
इ.स. 1999च्या जुलै महिन्यात आकाशातून दहशतीचा सम्राट येईल. महान मंगोल राजाला (म्हणजे त्याच्या आठवणींना?) तो जिवंत करील. त्यापूर्वी व त्यानंतर युद्ध होईल. - हा दहशतीचा सम्राट म्हणजेच तिसरा ख्रिस्तविरोधक असेल.)

या भाकिताने काही वर्षांपूर्वी सर्व जगात खळबळ उडवून दिली होती. या भाकितानुसार विसाव्या शतकाच्या अखेरीस जुले 1999 च्या सुमारास जगबुडी होणार होती. महायुद्ध होऊन जगाचा संहार होणार होता. तसं काही घडलेलं नाही, हे आपण पाहतोच. पण तसंच होणार याबद्दल तेव्हा कोट्यवधी लोकांची खात्री होती. जपानमध्ये 1999 मध्ये एक पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार 20 टक्के जपानी लोकांचा या भाकितावर विश्‍वास होता. भारतात काही अशी पाहणी झाल्याचं ऐकिवात नाही. पण येथील किमान 60 टक्के लोकांना तरी जगबुडीची भीती होती. कारण येथील अनेक बाबा, महाराजांनी नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाणीच्या आधारे जगबुडण्याच्या तारखाच जाहीर केल्या होत्या. आसाराम बापू, नरेंद्र महाराज, गगनगिरी महाराज ही त्यातलीच काही बाबामंडळी. पण नॉस्ट्रडॅमसचं हे भविष्य खोटंच ठरलं.

नॉस्ट्रडॅमसने तिसऱ्या महायुद्धाचं भाकित वर्तविलेलं आहे. एरिका चीथम यांच्या मते शतक 2, छंद 41 नुसार तिसरं महायुद्ध 1983 मध्ये किंवा शतक 1, छंद 51 नुसार 1985 मध्ये किंवा शतक 2, छंद 5 नुसार 23 मार्च 1986 रोजी होईल असा नॉस्ट्रडॅमसचा होरा आहे. तिसरं महायुद्ध 1999 मध्ये सुरू होईल, अशी शक्‍यताही नॉस्ट्रडॅमसने वर्तविली असल्याचं (शतक 2, छंद 46) चीथम सांगतात. परंतु हे सर्व खोटं ठरलेलं आहे.


तात्पर्य

नॉस्ट्रडॅमसला खरोखरच भविष्यातील घटना त्याच्या त्या पाण्याच्या परातीत दिसत होत्या, तर मग असंच म्हणावं लागेल की त्याला 1979 पर्यंतच्याच घटना दिसल्या! तेवढ्यांचंच खरं भाकित तो वर्तवू शकला! किंवा मग असं म्हणावं लागेल, की घटना घडून गेल्यानंतरच त्याच्या भविष्याचा अर्थ लागावा अशी काही त्याची "योजना' असावी! आणि असं जर असेल, तर त्याच्या भविष्यवाणीला काही अर्थच राहात नाही!!

खरंतर नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाणीचा अर्थ आहे तो एवढाच, की युरोपातील मध्ययुगीन अंधःकारात जन्मास आलेल्या नॉस्ट्रडॅमस नावाच्या ज्योतिष आणि गूढशास्त्राच्या अभ्यासकाला, स्वसंमोहित अवस्थेत झालेले भ्रम त्याने लिहून काढले आणि त्याला भविष्यवाणी असे नाव दिले. यापलीकडं त्यात काही एक खरं नाही. त्याची भविष्यवाणी खरी ठरते असं म्हटलं जातं. पण त्याचं श्रेय नॉस्ट्रडॅमसचं नाही. ते त्याच्या भाष्यकारांचं आहे. कारण त्यांनीच तर नॉस्ट्रडॅमसच्या अमूर्त काव्यात त्यांना वाटेल ती भाकितं कोंबून बसविली आहेत!!


संदर्भ -
- The Profesis of Nostradamus - Erika Chetham
- नॉस्ट्रडॅमसची स्फोटक भविष्यवाणी - अशोक पाध्ये (खंड -1)
- जयभाष्य नॉस्ट्रडॅमस - जयकुमार आळंदकर, अमित तेजस प्रकाशन, सोलापूर या पुस्तकाचे प्रा. शशिकांत लोखंडे यांनी केलेले परीक्षण - रविवारची नवशक्ति, 20 जून 1999

नॉस्ट्रडॅमसची "कुंडली' (भाग 1)


नॉस्ट्रडॅमस!

मायकल डी नॉस्ट्रडॅमस!!

या नावाबद्दल आजही मोठं कुतूहल आहे. आपल्याकडं तर जरा अधिकच. आपल्या हिंदु मनाला एकूणच भविष्य वगैरे गोष्टींत खूप रस असतो. तशात नॉस्ट्रडॅमसने म्हणे लिहून ठेवलंय, की एकविसाव्या शतकात एक हिंदु राजा सर्व जगावर राज्य करणार आहे.

म्हणजे बघा, आपली आधीच खात्री असते, की या जगात जे जे ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, थोडक्‍यात जेवढं म्हणून नाव घेण्यासारखं आहे, त्या सर्वाचा उगम भारतातच झालेला आहे! परवाच कुणीतरी सांगत होतं, की बिझनेस मॅनेजमेन्टच्या काय बाता मारता? ते तर आमच्या रामदासांनी दासबोधात आधीच लिहून ठेवलं आहे!!
अशा परिस्थितीत जगावर हिंदु राजा राज्य करणार असं भविष्य आणि ते सांगणारा नॉस्ट्रडॅमस यांच्याबद्दल आपलं काळीज प्रेमभावनेनं वगैरे भरून गेलं नसतं तर नवलच!

तर अशा या नॉस्ट्रडॅमसने विसाव्या शतकाच्या अखेरीस तिसरं महायुद्ध होणार, जगबुडी होणार असं भविष्य वर्तविलेलं आहे! नेपोलियन, हिटलर, दुसरा हेन्री, शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, राजीव गांधी, महात्मा गांधी, गुरू गोविंदसिंग यांच्यासारख्या अनेकांचं भविष्यही त्याने सांगितलं होतं. महायुद्ध, अमेरिका-इराक खाडीयुद्ध, विविध नैसर्गिक आपत्ती, एवढंच काय वायरलेस यंत्रणा, विमानं, रेडियो यांच्या शोधाची भाकितही त्याने लिहून ठेवली होती. हे केव्हा, तर थेट सोळाव्या शतकात.

सोळाव्या शतकात, अगदी नेमकं सांगायचं तर, 14 डिसेंबर 1503 रोजीचा त्याचा जन्म. दक्षिण फ्रान्समधल्या एका प्रांतात जॅकस डी नॉस्ट्रडेम यांच्या पोटी तो जन्मास आला. आता होतं काय, की चरित्रनायक हा उच्चकुलीन असावा, खानदानी असावा असं उगाचंच लोकांना वाटत असतं. अशा या अपेक्षेपोटी नॉस्ट्रडॅमसच्या चरित्रकारांनी त्याच्या आजोबांना इटालियन-ज्यू डॉक्‍टर बनवून टाकलं. पण तसं काही नव्हतं. त्याचे आजोबा - पायरो किंवा पिएर डी नॉस्ट्रडेम हे एक साधे धान्य-व्यापारी होते. त्याच्या वडिलांनी मात्र नंतर हा व्यवसाय सोडून दिला.

नॉस्ट्रडॅमसचा जन्म ज्यू कुटुंबातला. पण पुढं, तो नऊ वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबानं ज्यू धर्माचा त्याग करून रोमन कॅथॉलिक ख्रिश्‍चन धर्माचा स्वीकार केला. नॉस्ट्रडॅमसच्या धमन्यांतलं हे ज्यू रक्त फार महत्त्वाचं! भविष्यवेत्ता म्हणून नाव कमावण्यापूर्वी त्याने त्याने ज्यूंच्या अनेक गूढ ग्रंथांचा अभ्यास केला होता. आपल्या आजोबांच्या हाताखाली त्याने अन्य विषयांबरोबरच खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. त्याला त्या विषयात विशेष रस होता. विशेष म्हणजे "पृथ्वी गोल आहे' हा कोपर्निकसचा दावा त्याला पूर्णतः मान्य होता. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते या कोपर्निकसच्या सिद्धांताला त्याचा पूर्ण पाठिंबा होता आणि हे केव्हा तप याच विचारांबद्दल गॅलिलिओला शिक्षेस सामोरं जावं लागलं, त्या घटनेच्या आधी तब्बल 100 वर्ष! नॉस्ट्रडॅमसच्या या अशा विचारांमुळे त्याचे घरचे मात्र भलतेच काळजीत असायचे. त्यामुळे घाबरून त्यांनी त्याला मॉंपेलिए इथं घरापासून दूर वैद्यकशास्त्र शिकायला पाठवलं. त्यावेळी त्याचं वय होतं अवघ्या 19 वर्षांचं. त्यानंतर तीन वर्षांत त्याने पदवी मिळविली.

सोळाव्या शतकात, विशेषतः द. फ्रान्समध्ये प्लेगनं थैमान घातलं होतं. वैद्यकशास्त्रातली पदवी संपादन केल्यानंतर नॉस्ट्रडॅमसने प्लेगच्या रूग्णांवर उपचार सुरू केले. प्लेगवर स्वतः तयार केलेली वा शोधलेली औषधं घेऊन तो गावांगावांतून फिरू लागला. या कालखंडात, 1525च्या सुमारास त्याची धन्वंतरी म्हणून सर्वत्र त्याची कीर्ति पसरू लागली. याच काळात त्याला पुन्हा जादू, गूढ ज्ञान यांत रस वाटू लागला. या सुमारे चार वर्षांच्या भटकंतीनंतर तो मॉंपेलिएला परतला आणि 23 ऑक्‍टोबर 1529रोजी त्याला डॉक्‍टरेट मिळाली. त्यानंतर त्याने वर्षभर तिथेच शिक्षक म्हणून काम केलं.

हळूहळू त्याच्यातल्या "द्रष्टे'पणाची प्रसिद्धी होऊ लागली. लोकांना त्याची प्रचीती येऊ लागली. असं सांगतात, की एकदा इटलीतल्या एका रस्त्यावरून जात असताना त्याला एक तरूण धर्मगुरू दिसला. त्याबरोबर नॉस्ट्रडॅमसने त्याच्या समोर "युवर होलिनेस' म्हणून गुडघे टेकले. हाच धर्मगुरू - फेलिसी पेरिटी - पुढे 1585 मध्ये पोप बनला.

1554 मध्ये नॉस्ट्रडॅमस मार्सेली इथं स्थायिक झाला. पण त्याच वर्षी त्या भागात प्रचंड पूर आला. प्लेगच्या साथीने थैमान घातलं. ही साथ आटोक्‍यात आल्यानंतर तो सलोन या गावी गेला. तिथेच आता कायमचं स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला होता. यापूर्वी प्लेगच्या साथीने त्याची पत्नी आणि दोन मुलांचा बळी घेतला होता. तेव्हापासून तो एकटाच राहात होता. पण आता सलोनमध्ये आल्यानंतर त्याने लग्न करायचं ठरवलं. आणि त्यानुसार एका श्रीमंत विधवेशी त्याने विवाह केला. याकाळात गूढज्ञानावरील त्याचा विश्‍वास अधिकच दृढ झालेला होता. आपल्या घरातील एका खोलीत त्याने खास अभ्यासिका तयार केली होती. तिथं रात्र-रात्र जागून तो गूढज्ञानाचा अभ्यास करीत असे. या विषयावरचे अनेक ग्रंथ त्याच्या संग्रही होते. परंतु त्यातही त्याच्यावर सर्वाधिक प्रभाव होता, तो "डि मिस्टरिज इजिप्टोरियम' या ग्रंथाचा. त्याच्या काही भाकितांमध्ये याच ग्रंथातील ओळी उद्‌धृत केलेल्या दिसून येतात. 1555 मध्ये नॉस्ट्रडॅमसने आपल्या भविष्यग्रंथाचा पहिला भाग पूर्ण केला. या ग्रंथामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी, भरपूर पैसे आणि राजमान्यताही मिळाली.

1566 मध्ये तो आजारी पडला. त्याला आपला मृत्यु जवळ आल्याची चाहूल लागली. 17 जून 1566 रोजी त्याने आपलं इच्छापत्र तयार केलं. 1 जुलै रोजी त्याने एका स्थानिक धर्मगुरूला पाचारण केलं. त्याला अंतिम विधी, प्रार्थना करायला लावली. दुसऱ्याच दिवशी सकाळी लोकांना दिसला तो नॉस्ट्रडॅमसचा मृतदेहच. त्या रात्रीच त्याचं देहावसान झालं होतं.

नॉस्ट्रडॅमसचं हे त्रोटक चरित्र. पण यातूनही एक बाब दिसून येते, की त्याचं आयुष्य फार काही सुखात गेलं नव्हतं. त्याच्यावर दुःखाचे अनेक प्रहार झाले होते. तो स्वतः डॉक्‍टर. पण स्वतःच्या पत्नीला, मुलांना तो वाचवू शकला नव्हता. त्या धक्‍क्‍याने तर त्याने आपली प्रॅक्‍टिस जवळपास बंदच केली होती. आयुष्यातली अखेरची काही वर्ष वगळता त्याचं सगळं जीवन धावपळीतच व्यतीत झालं होतं. या सर्व अस्थिरतेमुळेच त्याच्या मनात लहानपणापासून असलेली गूढज्ञानाविषयीची आवड अधिक दृढ झाली असावी. त्यातूनच त्याने पुढं आपला भविष्यविषयक ग्रंथ रचला. असा ग्रंथ की ज्याचा प्रभाव अजूनही लोकमानसावर आहे. नॉस्ट्रडॅमसच्या मृत्युनंतर आजतागायत हा ग्रंथ कधीही "आऊट ऑफ प्रिंट' झालेला नाही. प्रत्येक शतकात त्याच्या या ग्रंथाच्या आवृत्त्या वा तद्विषयक ग्रंथ अशी किमान तिसेकतरी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

नॉस्ट्रडॅमसच्या ग्रंथांमध्ये 1568 मध्ये बेनॉं रिगॉड यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ आज विश्‍वसनीय मानला जातो. याच ग्रंथाच्या आधारे एरिका चीथम यांनी संपादित, भाषांतरित केलेला "द प्रॉफेसिस ऑफ नॉस्ट्रडॅमस' हा ग्रंथ अधिकृत मानला जातो. या पुस्तकात दहा शतकं असून, सातव्या शतकाचा अपवाद करता प्रत्येक शतकात 100 छंद आहेत. यातील प्रत्येक छंद म्हणजे स्वतंत्र भाकित आहे.

शोध गणपतीच्या मूळ रूपाचा

"सुखकर्ता दुःखहर्ता' हे गणपतीचे आजचे रूप. त्याला धर्मशास्त्राने अग्रपूजेचा मान दिलेला आहे. म्हणजे गणपती ही शुभंकर देवता मानण्यात आली आहे. त्याचे हे रूप पाहूनच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले.

प्रश्‍न असा आहे, की गणपतीचे आजचे हे जे रूप आहे, ते मुळातूनच तसे होते, की शेंदराच्या पुटांप्रमाणे त्याच्यावरही ही "सुखकर्ता दुःखहर्ता'ची पुटे चढविण्यात आली आहेत. दैवतशास्त्रानुसार तरी ते तसेच आहे. म्हणजे हे शास्त्र असे मानते, की गणपती ही देवता यक्षश्रेणीतून उत्क्रांत झाली आहे. यक्ष हे अत्यंत क्रूर असत. माणसांना झपाटणे, त्यांच्या कार्यात विघ्ने आणणे, ती आणू नयेत म्हणून माणसांकडून बली घेणे, माणसांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना आपली पूजा करायला लावणे ही या यक्षांची स्वभाववैशिष्ट्ये. त्यांचे रूपही पाहण्यासारखे आहे. सुटलेले पोट, बेडौल शरीर, माणसाचे शरीर आणि प्राण्याचे शीर ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. गणपतीचे रूप असेच क्रूर आणि स्वभाव विघ्नसंतोषी होता. म्हणून तर गणेश, वि-नायक, विघ्नेश, विघ्नविनायक ही त्याची नावे आहेत. त्याने मंगलकार्यात विघ्न आणू नये म्हणून कार्यारंभी त्याची पूजा करून त्याला संतुष्ट करीत. या पूजेला "विनायकशांती' म्हणत.

पुराणांतून गणेशजन्माच्या विविध कथा सांगितलेल्या आहेत. त्या कथा नीट पाहिल्या तर त्यातूनही गणपतीचे अमंगल रूपच स्पष्ट होते. काही कथांत तो पार्वतीच्या शरीराच्या मळापासून झाल्याचे सांगितलेले आहे. काही कथांमध्ये तो पार्वतीच्या मासिक स्त्रावापासून किंवा त्यातून जन्मला आणि म्हणून रक्तवर्ण झाला, असे म्हटलेले आहे.
असा हा गणपती "स्तेनानां पतिः', मूषकराज म्हणजे चोरांचा प्रमुख आहे. दक्षिण भारतात अनेक भागांमध्ये तो जारण-मारण (भूत-भानामती) या क्रियांसाठी पूजला जातो.

गणपतीची आणखीही एक गंमत आहे. आपण मंगळ हा क्रूर ग्रह मानतो. तो पृथ्वीचा पुत्र आहे असेही मानतो. मंगळाचा रंगही लाल आहे. आता पृथ्वी आणि पार्वती एकरूप आहे. म्हणूनच गणेश आणि मंगल यांचा संबंध आहे. कसा, तर दोघेही पृथ्वी म्हणजेच पार्वतीचे पुत्र. आता गणपतीच्या पूजेत, उपासनेत मंगळवारचे एवढे महत्त्व का ते आले ना लक्षात? मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका किंवा अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारक म्हणजेच मंगळ. या सर्व गोष्टी गणपतीच्या क्रूर रूपाकडेच निर्देश करणाऱ्या आहेत.

तर गणपती मूळचा असा असताना त्याला आजचे सोज्वळ रूप कसे प्राप्त झाले? याचे असे उत्तर देण्यात येते, की भीतीच्या भावनेतून ईश्‍वरपूजन केले जावे हे समाजधुरीण आणि संतमंडळींना मान्य नव्हते. पण लोकांच्या मनावर या क्रूर देवतांचा जो प्रभाव होता तोही त्यांना दूर करता येत नव्हता. मग त्यांनी काय केले, तर या क्रूर देवतांचे उन्नयन केले. त्यातून गणपतीला आजचे हे "सुखकर्ता-दुःखहर्ता' रूप प्राप्त झाले.


(संदर्भ ः अ. द. मराठे यांचा लेख, मैफल पुरवणी, महाराष्ट्र टाइम्स, 15 सप्टें. 1996)

राम - आपला आणि वाल्मिकींचा

लोकांच्या, आपल्या दृष्टीकोनातून राम हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. तो सर्वगुणसंपन्न आहे, मातृपितृभक्ती, पितृप्रेम,

बंधुप्रेम, शौर्य, न्यायबुद्धी आदी सर्व बाबतीत राम म्हणजे एक आदर्श आहे. तो मर्यादा पुरूषोत्तम आहे, एकपत्नीव्रती, एकवचनी, एकबाणी आहे. तो प्रजाहीतदक्ष, थोर न्यायी राजा आहे. आपला राम आपल्यासाठी भगवान आहे. पण रामायणकर्त्या वाल्मिकींचा राम कसा आहे? वाल्मिकींनी रामाचे जे चरित्र सांगितले आहे, ते खरोखरच आश्‍चर्यजनक ठरणारं आहे. कारण त्यांच्या आणि आपल्या रामात खूप खूप अंतर आहे.

ते कसं?

दशरथाने रामाला वनवासात धाडण्याचा आपला निर्णय सांगितल्यानंतर वाल्मिकींचा राम लक्ष्मणाला म्हणतो, ""जी व्यक्ती सदोदित आपल्याच इच्छांचे पालन करीत आहे, तिला एखादा मूर्ख तरी वनात पाठविल काय?''
इथं आपल्या पितृभक्त रामाने दशरथाला "मूर्ख' म्हटलेलं आहे. कैकेयी दशरथाची हत्या करील अशी भीतीही वाल्मिकींच्या रामाने एका ठिकाणी व्यक्त केली आहे.
रामाचं बंधुप्रेम असं, की "मी वनवासावरून परत येईपर्यंत तुम्हीच राजगादी सांभाळा. तिच्यावर दुसऱ्या कोणाला बसू देऊ नका,'" असं त्यानं दशरथाला सुचविलं होतं. (अरण्यकांड-34) दुर्दैवानं राम वनवासाला निघाला, त्याच दिवशी दशरथाचा मृत्यु झाला.

रामाला वनवासाला जाताना सीतेला बरोबर न्यायची इच्छा नव्हती. हे त्याचं पत्नीप्रेम समजायचं, तर त्यावेळी तो तिला सांगतो, की "तू जपून राहा. विशेषतः शत्रुघ्न आणि भरताकडे भ्रातृभावाने पाहा किंवा वत्सलपणे पाहा. भरताची मर्जी राखून राहा.'
यात गैर काय आहे, असं कोणी म्हणेल, पण दिरांनी भावजयीला भावामागे पत्नी म्हणून स्वीकारणे किंवा वडिल भावाच्या पत्नीकडं इतरांनीही त्याच भावनेने पाहणं, या प्रथा अस्तित्वात असणाऱ्या भूमीत रामकथा जन्मली आहे, हे लक्षात घेतलं, की भरताची मर्जी राखून राहा या रामाच्या उपदेशाचा अर्थ लागतो. ही अतिशयोक्ती म्हणायची किंवा इथं ओढून-ताणून तसा अर्थ लावण्यात आला आहे, असं म्हणायचं तर रावणवधानंतर स्वतः रामाने सीतेला अगदी स्पष्ट शब्दांत हेच सुचविलं आहे. त्यावेळी हा राम सीतेला म्हणाला होता ः ""हा संग्राम मी तुजसाठी केला नाही. मी तो स्वतःवरचा कलंक टाळण्यासाठी केला.... तुझा स्वीकार आता कोणता शीलवान पुरूष करील? तू वर्षभर परपुरूषाकडे राहिली आहेस. आता तुला दहा दिशा मोकळ्या आहेत... आता तू इच्छा असेल, तर लक्ष्मणाकडे जा किंवा भरताकडे जा. शत्रुघ्न, सुग्रीव किंवा बिभिषण यांच्याजवळ राहावेसे वाटले तर त्यांच्यापाशी राहा.''

म्हणजे सीतेची काहीही चूक नसताना, रामाला तिच्याबद्दल संशय होता. सीता या रामाला चांगलीच ओळखून अशली पाहिजे. म्हणूनच तो जेव्हा "भरताची मर्जी राख' असे सांगतो तेव्हा ती अत्यंत संतापून त्याला "स्त्रैण', "शैलूष' म्हणजे "बायल्या' अशी विशेषणे वापरते. ""भरताची मर्जी राख असे सांगणारा आपला नवरा बाईच्या जीवावर जगणाऱ्या अधम पुरूषासारखा वागतो आहे,'' (अयोध्याकांड - 30) असे त्यावेळी सीता तीव्र संतापाने म्हणते.

वाल्मिकींच्या रामाने वालीची हत्या तर झाडाआड लपून केली आहे. अगदी योजनाबद्ध कट रचून केलेली हत्या असं त्या हत्येचं स्वरूप होतं.

रावणवधानंतर राम अयोध्येचा राजा झाला. पण त्यानंतर त्याने स्वतः असा राज्यकारभार केलाच नाही. सकाळपासून दुपारपर्यंत वाल्मिकींच्या रामाची पूजाअर्चा व अन्य कर्मकांडे चालत आणि त्यानंतरचा काल तो कधी विदूषक तर कधी जनान्यात व्यतीत करीत असे, (उत्तरकांड -43.1) असं स्वतः वाल्मिकींनीच नमूद करून ठेवलेलं आहे. त्यांचा राम मद्यही पीत असे. (उत्तरकांड-42.8)

एकूण काय, तर आपला आणि वाल्मिकींचा राम यात खूपच फरक आहे. खरं तर हे सगळं स्पष्टपणे नमूद करून वाल्मिकींनी आपल्या रामाची बदनामीच केली आहे! कोणी आजपर्यंत त्यांच्याविरूद्ध निषेधमोर्चा कसा काढला नाही, हे एक कोडंच म्हणायचं!

संदर्भ ः
द रामायण - ए ट्रू रिडिंग ः पेरियार ई. व्ही. रामस्वामी (अधिक स‌ंदर्भासाठी पाहा - http://en.wikipedia.org/wiki/E._V._Ramasami_Naicker)
डॉ. बाबासाहोब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस - खंड 4 - संपादन - वसंत मून
सीतेची शोकांतिका ः अरुणा ढेरे, लेख - सा. सकाळ दिवाळी अंक "94

विठ्ठल कोण होता?


अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. संतांनी तो विष्णुकृष्णरूप मानलेला आहे. पण गंमत म्हणजे श्रुती-स्मृती-पुराणांनी कोठेही विठ्ठलाचा निर्देश केलेला नाही की विष्णुच्या अवतारगणनेत आणि नामगणनेत त्याचा समावेश नाही. मग इसवीसनाच्या अकराव्या-बाराव्या शतकापासून वैष्णवप्रतिष्ठा प्राप्त झालेला हा विठ्ठल आला कोठून?

विठ्ठल आणि पंढरपूर याविषयीचे पौराणिक प्रकृतीचे तीन संस्कृत ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत. त्यातील सर्वात आधीचा ग्रंथ आहे स्कंदपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. दुसरा आहे पद्मपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य' आणि तिसरा आहे विष्णुपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. स्कांद पांडुरंगमाहात्म्य निवृत्ती-ज्ञानदेव आदी संतांच्या उदयापूर्वी, हेमाद्री पंडिताच्या काळापूर्वी रचले गेलेले आहे. त्या ग्रंथामुळे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसांभार दृढ पायावर स्थिर झालेला आहे.

विठ्ठल या नावाची समाधानकारक व्युत्पत्ती अद्याप सांगता आलेली नाही. त्याचे पांडुरंग हे नाव मात्र पंढरपूरपासून तयार झालेले आहे. पंढरपूरचे मूळ कन्नड नाव आहे पंडरगे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर होयसळ नृपती सोमेश्वराचा लेख (शके 1159) आहे. त्यात या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या पंडरगेपासूनच पांडुरंग हे देवनाम आणि पांडुरंग-पंढरपूर-पंढरी हे क्षेत्रनाम आणि पुंडरीक हे भक्तनाम कृत्रिम संस्कृतीकरणातून साधले गेले आहे. पुन्हा विठ्ठल या नावाची स्पष्टिकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहिल्याची कथा ठोकून देण्यात आलेली आहे.

विठ्ठलाचे पांडुरंग हे संतप्रिय नाव आहे; पण या नावामुळे एक विसंवाद निर्माण झालेला आहे. कारण पांडुरंग हे नाव दृश्‍यतः शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूरगौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक आहे. असे हे नाव सावळ्या विठ्ठलाला देण्यात आले आहे, ही मोठीच गंमत आहे.

संतांनी विठ्ठलाला "कानडा विठ्ठलु कर्नाटकू' असे म्हटलेले आहे. म्हणजे महाराष्ट्राचे हे दैवत कानडी आहे. भौगोलिकदृष्ट्याही यात तथ्य असल्याचे दिसून येते. कारण पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरच आहे. पंढरपूर जवळचे मंगळवेढे तर बसवेश्‍वराचे आद्य कार्यक्षेत्र होते. वर सांगितल्याप्रमाणे पंढरपूरचे पुरातन पंडरगे हे नाव पूर्णपणे कन्नड आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीय आहेत आणि त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातलेच आहेत. या व अशा अन्य काही लहान-सहान बाबींवरून विठ्ठलाचे कानडेपण निःसंदिग्धपणे स्पष्ट होते.

पंढरपूरच्या या कानडी विठ्ठलाचा आद्य भक्त आहे पुंडलिक. जर विठ्ठलाचे मूळ रूप काही वेगळेच होते; तर मग हा पुंडलिक आला कोठून? तर पुंडलिक म्हणजे पुंडरिक. पंडरगे या क्षेत्रनामाच्या कृत्रिम संस्कृतीकरणातून पुंडरिक हे नाव सिद्ध झाले आहे. पंढरपूर हे पुंडरिकपूरही आहे. पुंडरिक हा मूळचा पुंडरिकेश्‍वर आहे आणि पंडरगे या गावाचा तोच मूळचा अधिष्ठाता देव आहे. पंढरपुरात विठ्ठलाची विष्णु-कृष्ण म्हणून नव्याने प्रतिष्ठा वाढविण्याऱ्या वैष्णवांनी, वैष्णव क्षेत्रोपाध्यांनी पंढरपुरातील मूळच्या लोकप्रिय दैवताचे वैष्णवीकरण करून त्यांना विठ्ठल परिवारात समाविष्ट केले. त्यातीलच पुंडरिकेश्‍वर हा देव. त्याला त्यांनी भक्तराज पुंडरिकाचे नवे वैष्णवचरित्र देऊन विष्णुदास बनविले. आज सांगितली जाणारी पुंडलिक कथा ज्ञानेश्‍वरांच्या काळापासून जनमानसाने स्वीकारलेली आहे; पण त्यात काडीमात्र ऐतिहासिकता नाही. ती विठ्ठलाची शुद्ध पौराणिक अवतरण कथा आहे.

तर विठ्ठल हा मूळचा लोकदेव आहे. तो गोपजनांचा, गवळी-धनगरांचा देव आहे. विठ्ठल हे दैवत गोपजनांच्या, गवळी-धनगरांच्या परंपरेत आजही आले आदिम रूप सांभाळून आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने संबोधतात. त्यांच्या मंदिरात दोन पिंडी ठेऊन ते या जोडदेवाची पूजा-अर्चा करतात. बीरप्पा किंवा बिरोबा हा धनगरांचा मुख्य देव आहे. बहुसंख्य कथांमध्ये विठ्ठल हा बीरप्पाचा निकटतम सहयोगी देव किंवा भाऊ म्हणून येतो. विठ्ठल आणि तिरूमलैचा वेंकटेश या दोघांच्याही उन्नत रूपाचं आदिबीज गोपजनांच्या, गवळी-धनगर-कुरूबांच्या विठ्ठल-बीरप्पा नामक जोडदेवात आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट. बिरोबा अथवा बीरप्पाचे अनेक ठिकाणी वीरभद्रात रूपांतर झालेले आहे. वीरभद्र हा शैव आहे; तर विठ्ठल विष्णु. नरहरी सोनाराच्या कथेत त्याला विठ्ठल मंदिरात शिवलिंगाचे दर्शन होते असे दाखविण्यात आले आहे. त्या कथेचा सांधा येथे नीट जुळतो.


विठ्ठल आणि वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णुच्या पुरामप्रसिद्ध रूपांशी, अवतारांशी संबंध नसलेले आहेत आणि तरीही ते विष्उरूप पावलेले आहेत. एवढेच नव्हे; तर संपूर्ण दक्षिण भारतात पुरातन विष्णुरूपांहून अधिक लोकप्रियता लाबलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण नावाने ओळखला जातो; तर वेंकटेशाला बालाजी म्हणतात. विठ्ठल-बिरोबा आणि विठ्ठल-वेंकटेश यांच्यातील साम्यही पाहण्यासारखे आहे. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सागून दिंडिरवनात रूसून बसलेली आहे; तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सहन केल्यामुळे तिरूमलैपा,ून पूर्वेस तीन मैलावर वेगळी राहिलेली आहे. वेंकटेशाच्या पत्नाचे नाव पद्मावती; तर विठ्ठलाच्या प्रेयसीचे पद्मा. विठ्ठल-बीरप्पाच्या पत्नीचे नाव पदूबाई आहे आणि तीही पतीवर रूसलेली आहे. किंबहुना तीच पंढरपुरात रुक्‍मिणी होऊन प्रकटली आहे, अशी धनगरांची धारणा आहे.

विठ्ठलाला प्रिय असलेला गोपाळकाला; तसेच विठ्ठलभक्त संतांनी रचलेली भारूडे यांचा संबंधही गोपजन-धनगर संस्कृतीशी येतो. काही अभ्यासकांनी गोपाळकाल्याचा संबंध वैदिक "करंभा'शी जोडलेला आहे. करंभ हे खाद्य गोपाळकाल्याचेच पूर्वरूप असावे, कारण "करंभः दधिसक्तवः' असे त्याचे स्पष्टिकरम वेदज्ञांनी दिलेले आहे. हा पदार्थ सातूचे पीठ आणि दही एकत्र कालवून बनवितात. वैदिक पूषन्‌ देवाला तो खास आवडतो. हा देव वृषभमुखाची काठी हाती धारण करणारा, कांबळे पांघरणारा, गायागुरांची खिल्लारे राखणारा आणि गोपजनांना वाटा दाखविणारा आहे. तो गोपजनांचा देव आहे. तो अहिंसकही आहे. त्याला दही आणि पीठ आवडते. तर पंढरपूरचा विठ्ठल ताक आणि पीठाने संतुष्ट होतो. त्याच्या या प्रेमाची स्मृती "ताकपिठ्या विठोबा'च्या रूपाने पाहावयास मिळते.
दुसरी गोष्ट भारूडाची. या शब्दाचा मूळ अर्थ धनगर असा आहे. गुजरातमध्ये आजही भरवाड या नावाची पशुपालक जमात आहे. तिचे नाव भारूड या धनगरवाचक नावाशी जवळचे आहे.

पुन्हा पंढरपूर हे स्थानही प्राचीन काळी धनगरांचा जो स्थलांतराचा मार्ग होता, त्या मार्गावरच येते, हे प्रा. कोसंबी यांनी दाखवून दिले आहे. पंढरपूर हे या फिरत्या जमातीचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे. तिचा वैष्णव विठ्ठलाशी मूळात संबंध नाही.

(संदर्भ ः
विठ्ठल ः एक महासमन्वय - रा. चिं. ढेरे, श्रीविद्या, प्रथमावृत्ती 1984
An Introduction to the study of Indian History - Prof. D. D. Kosambi)