वेगवेगळा कृष्ण
राम ही ज्याप्रमाणे एखादी ऐतिहासिक व्यक्ती असण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणेच कृष्णही अगदीच काल्पनिक नसावा असं पुराणसंशोधकांचं मत आहे. पण कृष्णाचं चरित्र हे इतके गुंतागुंतीचं - कॉम्प्लेक्स आहे, की त्यातून "खरा' कृष्ण कोणता हे शोधून काढणं जरा कठीणच आहे. आज कृष्णाचं जे चरित्र लोकप्रिय आहे ते पाहिलं की सहज लक्षात येतं, की इथं एक नाही तर अनेक वेगवेगळे कृष्ण एकाच कृष्णचरित्रात समाविष्ट करण्यात आहेत. त्यामुळेच आपणांस दिसणारा कृष्ण हा बालक्रीडा करणारा खोडकर कृष्ण आहे. सोळा हजार बायका करणारा कृष्ण आहे. राजकारणी कृष्ण आहे. योद्धा कृष्ण आहे. आणि त्याचवेळी तो तत्त्वज्ञानी कृष्णही आहे. अर्थात हा सर्व वेगवेगळ्या परंपरांमधील कृष्ण आहे आणि नंतरच्या काळात म्हणजेच नारयणीय भक्तिमार्ग वाढू लागल्यानंतरच्या काळात या वेगवेगळ्या परंपरांच्या कथा एका कृष्णात एकत्र आणण्यात आल्या आहेत.
कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (3.7.6) आला आहे. "वासुदेव कृष्णा'चा अर्जुनाबरोबर उल्लेख पाणिनीने केला आहे. विशेष म्हणजे पाणिनीच्या काळात कृष्ण आणि अर्जुन या दोघांनाही क्षत्रिय म्हणून मान्यता नसावी, असं दिसतं.
मूळ महाभारत (इ.स.पू. सुमारे 300), हरिवंश (इ.स.पू. सुमारे दुसरे-तिसरे शतक), विष्णुपुराणाचा (सुमारे पाचवे शतक) पाचवा अंश, भागवताचा (नववे शतक) दशमस्कंध आणि अखेरीस ब्रह्मवैवर्तपुराण (सुमारे पंधरावे शतक) हे कृष्णचरित्राचे ऐतिहासिक क्रमाने मुख्य आधार आहेत.
दुर्दैवाने आपल्याकडं मूळ ग्रंथांचं पावित्र्य सांभाळण्याची पद्धतच नव्हती. त्यामुळे आपल्या सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये नंतर ज्याला जशी पाहिजे तशी भर घालण्यात आली आहे. अनेक ग्रंथांमध्ये असा प्रक्षिप्त भाग आढळतो, तसेच अनेक ग्रंथांची सरमिसळही झालेली दिसून येते. उदाहरणार्थ महाभारताच्या सभापर्वात भीष्माने जे कृष्णचरित्र सांगितले आहे, ते हरिवंशातून जवळजवळ सगळं उचललेलं आहे. मूळच्या महाभारतात फक्त कौरव-पांडवांच्या संदर्भात सांगितलेल्या कृष्णकथाच होत्या. सभापर्वातील भीष्मोक्त कृष्णचरित्र ही हरिवंशातून घेतलेली भर आहे. विष्णुपुराणातील कृष्णकथा ही हरिवंशच्याच कथेत काही भर टाकून सांगितलेली आहे. आज सर्वत्र प्रसृत असलेली कृष्णकथा ही मुख्यतः भागवताच्या दशमस्कंधातील कथा आहे.
या पौराणिक परंपरेनुसार कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापार आणि कली यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या पूर्वी झाला. दाशरथी रामाने अयोध्येत राज्य करण्यास प्रारंभ केला तेव्हा द्वापार युगाची सुरूवात झाली. त्यानंतर पांचाल, पौरव, चेदी, मगध, यादव आणि आनव या क्षत्रिय वंशांची भरभराट झाली. राम सूर्यवंशातला. त्याच्यानंतर त्याचा हा वंश अस्ताकडे झुकला. त्याच्या वंशातला अखेरचा पुरूष म्हणजे बृहद्बल. त्याला कर्णाने पराजित केलं होतं आणि नंतर कुरूक्षेत्रावर तो अभिमन्यूच्या हातून मारला गेला. असो.
तर यादव वंशातील महापुरूष म्हणजे बलराम आणि कृष्ण. इ.स.पूर्व चौदावे शतक हा कृष्णाचा काळ मानला जातो. भारतीय युद्ध इ.स.पूर्व 1200च्या सुमारास झाले. त्यावेळी कृष्णाचं वय होतं 100 किंवा त्याहून थोडी अधिक वर्षे! कृष्ण हा वासुदेव-देवकीचा पुत्र. कंस हा त्याचा चुलत मामा. त्याच कृष्णाने वध केला. पांडव हे कृष्णाचे सख्खे आतेभाऊ. भारतीय युद्धात तो पांडवांच्या बाजूने लढला. या युद्धाच्या सुरूवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला "गीता' सांगितली असं मानलं जातं. तर हा वयाच्या शंभराव्या वर्षी गीतेसारखा अनेक तत्त्वमतांचा समन्वय असणारा ग्रंथ सांगणारा कृष्ण तारुण्यात गोपींशी उत्तान शृंगार करणारा होता असंही दाखविण्यात आलं आहे.
भागवतात गोपी आणि कृष्ण यांच्या शृंगाराचं उत्तान वर्णन करण्यात आलं आहे. कृष्ण आणि गोपींची रासक्रीडा अत्यंत खुलवून सांगितली आहे. हरिवंशात मात्र हे सर्व सूचकतेने मांडलेलं आहे. मात्र महाभारत, हरिवंश, एवढंच काय पण भागवतातही राधेचा अजिबात उल्लेख नाही. मग राधा आणि कृष्णाची ही प्रणयकथा आली कोठून? पाचव्या शतकातील हालाच्या "गाथासप्तशती'त त्यांच्या प्रणयाचा उल्लेख आलेला आहे. ब्रह्मवैवर्तपुराण आणि जयदेवाचं "गीतगोविंद' यात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे.
म्हणजे मूळ महाभारतातला कृष्ण गोपींशी क्रीडा करणारा नाही. त्याच्या बाजूला राधा नाही. तो सोळा हजार बायतांचा नवराही नाही आणि वृंदेचा पतीही नाही. मूळ कृष्ण हा यादव गणतंत्राचा एक नेता आहे. त्याच्यावर विविध प्रकारच्या शृंगाराचे रंग उत्तरकाळात चढविले गेले. त्याचा संबंध वैष्णवांच्या मधुराभक्तीशी आहे. तेव्हा कृष्णाच्या रासक्रीडेच्या कहाण्यांना इसवी सन पूर्व परंपरा नाही. मूळ कृष्ण वेगळा होता. नंतरचा कृष्ण त्याहून भिन्न आहे.
संदर्भ -
अभिवादन - नरहर कुरुंदकर, इंद्रायणी साहित्य, 1987 या पुस्तकातील "प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता' हा लेख
विचारशिल्प - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांचे निवडक निबंध - संपादक रा. ग. जाधव, कॉण्टिनेन्टल प्रकाशन, 1994 मधील "कृष्ण' हा निबंध.
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
सुरेख लेख आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. एक शंका होती. मूळ महाभारत इ.स.पू. ३०० याचा संदर्भ कळू शकेल काय. नुकताच गौरी लाड यांचा महाभारत एक पुरातत्वीय दृष्टीकोन ( भा. इ. सं. मं. त्रैमासिक ६४, १ जुलै १९८५) हा लेख वाचनात आला. यात त्यांनी मूळ महाभारताची तिथी इ.स.पू. ६००च्या आधी कधीतरी अशी काढली आहे. सुंदर लेख आहे. मिळाल्यास जरूर वाचावा.
राज, कॉमेन्ट आणि माहितीबद्दल धन्यवाद! मूळ महाभारताची कालनिश्चिती करण्याचा प्रयत्न पुण्यातल्या भांडारकर संस्थेने केला आहे. कुरुंदकरांनी तिच कालनिश्चिती ग्राह्य मानल्याचे दिसते.
Ajun kahi sandarbha pustake...
Iravati Karve - Yugantar
Narhar Kurundar - Vyasache Mahabharat
१ त्याला कर्णाने पराजित केलं होतं आणि नंतर
२ कुरूक्षेत्रावर तो अभिमन्यूच्या हातून मारला गेला.
हे वाक्य पारसपार विरोधी वाटतंय,म्हणजे नेमका कोणत्या बाजूला होता?
सुरेख लेख फक्त एक सांगाल काय ?
कंसाचा खरा पिता द्र्मील हा असूर आणि उग्रसेनाची पत्नी यापासून कंस जन्माला आला तर त्याच्या आईचे म्हणजे उग्रसेनाच्या पत्नीचे नाव काय ? आणि नंतर द्रुमिल कोणाच्या हातून मारला गेला.
Post a Comment