शेक्‍सपियर खरा कोण होता?

"माझ्याकडे कान द्या. अफवा बोलू लागल्यावर कान देणार नाही असा महाभाग येथे असू शकेल काय?''
"किंग हेन्री चौथा' या नाटकात शेक्‍सपियरने चक्क अफवा (रूमर) नावाचं पात्रच रंगभूमीवर आणलं आहे. जिभाच जिभा चितारलेले वस्त्र लेवून हे पात्र रंगमंचावर प्रवेश करते आणि उपरोक्त शब्दांत स्वतःचा परिचय करून देते. गंमत म्हणजे खुद्द शेक्‍सपियरचा लौकिकही या पात्राच्या तावडीतून सुटलेला नाही! अफवा अशी आहे, की शेक्‍सपियरची नाटकं त्याने लिहिलीच नाहीत. खरं तर ही अफवा आहे की सत्य याचा निकाल अजून लागलेला नाही. तो लागेलच असंही सांगता येणार नाही.

विल्यम शेक्‍सपियरचा जन्म 1564 चा. 1616 मध्ये त्याचं निधन झालं. (त्यानंतर चौदा वर्षांनी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. म्हणजे काळ किती लोटला आहे पाहा.) तेव्हा आता चारशे वर्षांनंतर ती 37 नाटके शेक्‍सपियरच्याच लेखणीने प्रसवली याचा शुद्ध पुरावा कोण कोठून आणणार? पण त्याबाबत गेली तीन शतके वाद सुरूच आहे. बिस्मार्क, मार्क ट्‌वेन, सिग्मंड फ्रॉईड यांसारख्या मातब्बरांपासून ते आजच्या चार्ल्‌स ऑगबर्न, जॉन मिशेल, रिचर्ड व्हॅलेन आणि जोसेफ सोब्रान यांसारख्या संशोधकांपर्यंत अनेकांनी या वादात हिरिरीने भाग घेतलेला आहे.

ब्रिटनमधील "दी द-व्हिरे सोसायटी' या साहित्यिक संघटनेच्या म्हणण्यानुसार "अर्ल ऑफ ऑक्‍सफर्ड' एडवर्ड द-व्हिरे (1550-1604) यांनीच शेक्‍सपियरची सर्व नाटकं लिहिलेली आहेत. स्ट्रॅटफर्ड अपॉन ऍव्हॉन या शेक्‍सपियरच्या गावातल्या "शेक्‍सपियर बर्थप्लेस ट्रस्ट'ने अर्थातच हा दावा फेटाळून लावलेला आहे. हा पक्ष "स्ट्रॅटफर्डियन्स' म्हणून ओळखला जातो, तर एडवर्ड द-व्हिरे यांना शेक्‍सपियरच्या नाटकांच्या जनकत्वाचा मान देणारा पक्ष "ऑक्‍सफर्डियन्स' या नावाने संबोधला जातो.

गेल्या काही वर्षांत या पक्षाचा पुरस्कार करणारी "हू रोट शेक्‍सपियर?' (जॉन मिशेल, थेम्स अँड हडसन), "शेक्‍सपियर ः हू वॉज ही?' (रिचर्ड एफ. व्हॅलेन, प्रायेजर) आणि "एलियास शेक्‍सपियर' (जोसेफ सोब्रान, द फ्री प्रेस) अशी तीन महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. यातील जॉन मिशेल यांच्या मते शेक्‍सपियरचं सगळं वाङ्‌मय पाहता त्याच्याकडे अफाट शब्दसंग्रह होता हे दिसून येतं. त्याच्या संग्रहात किमान 15 हजार शब्द होते. पण त्याने आपलं जे विस्तृत आणि सखोल नोंदी असलेलं मृत्युपत्र लिहिलेलं आहे, त्यात ग्रंथसंग्रहाचा तर राहोच, साध्या एका पुस्तकाचाही उल्लेख नाही. त्याचे वडील जॉन शेक्‍सपियर आणि आई मेरी आर्डेन हे निरक्षर होते, असं मानलं जातं. ऍन हॅथवे ही त्याची पत्नी. सुसान आणि ज्युडीथ आणि हॅम्नेट या जुळ्या मुली अशा तीन मुली त्यांना होत्या. त्यांतील ज्युडिथलाही त्याने आपल्या आई-वडिलांप्रमाणेच निरक्षर ठेवलं होतं, याकडे मिशेल यांनी लक्ष वेधलं आहे. स्वतः शेक्‍सपियरचं शिक्षणही ग्रामर स्कूलच्या पुढं गेलेलं नव्हतं.

मिशेल सांगतात, की हॅम्लेट हे नाटक, तसेच शेक्‍सपियरची काही सुनीतं यांची थीम द-व्हिरे यांच्या वैयक्तिक जीवनाशी खूपच मिळती-जुळती आहे. शेक्‍सपियरच्या अनेक साहित्यकृतींची कथाबीजं, कथा यांचा स्रोत इटली हा देश असल्याचं आढळतं. पण शेक्‍सपियरने कधीही परदेश प्रवास केलेला नाही. द-व्हिरे यांनी मात्र इटलीला भेट दिली होती. त्यांच्याकडे "जिनिव्हा बायबल'ची 1569 ची प्रत होती. त्यातील अनेक परिच्छेद, वाक्‍ये त्यांनी अधोरेखित केलेले असल्याचं रॉजर स्ट्रीटमॅटर या संशोधकास 1994 मध्ये आढळून आलं. ते परिच्छेद, ती वाक्‍यं थोड्याफार फरकाने शेक्‍सपियरच्या साहित्यकृतींमध्ये आढळून आली आहेत. असे अनेक पुरावे(!) सोब्रान यांनीही सादर केले आहेत.
ते असं नोंदवतात, की वास्तविक शेक्‍सपियरची निर्मितीक्षमता त्याच्या पन्नाशी आणि साठीत, म्हणजे 1604 ते 1616 या कालावधीत सर्वाधिक असणं हे तर्कास धरून आहे. पण प्रत्यक्षात 1604 नंतर त्याने काहीही प्रसवलेलं दिसत नाही. कारण त्याच वर्षी एडवर्ड द-व्हिरे यांचं निधन झालं होतं!

सोब्रान यांनी आणखी एका गोष्टीकडे निर्देश केला आहे. "मिऱ्हा मदर ऑफ ऍडॉनिस' या विल्यम बर्कस्टीड यांच्या 1607 मधील पुस्तकात शेक्‍सपियरचा मृत्यु झाला असल्याची नोंद आहे. पण त्याचा मृत्यु तर 1616 मध्ये झाला. मग हा शेक्‍सपियर कोण? तो एकतर मार्लोवी असावा किंवा द-व्हिरे. द-व्हिरे यांचा मृत्यु 1604 मध्ये झाला. त्यांनी 1595 ते 1602 या काळात लिहिलेल्या चार पत्रांमध्ये स्वतःचा उल्लेख "लेम' असा केला आहे. शेक्‍सपियरच्या 37 आणि 89 क्रमांकाच्या सुनितांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेखही लेम असाच केला आहे.

आता प्रश्‍न असा उभा राहतो, की मग द-व्हिरे यांनी आपलं नाव गुप्त का ठेवलं? सोब्रान सुचवितात, की द-व्हिरे हे पहिल्या एलिझाबेथ राणीच्या दरबारातले एक प्रतिष्ठित सरदार होते. त्यांचं एका कुप्रसिद्ध, विक्षिप्त व्यक्तीशी प्रेमप्रकरण होतं. ते उजेडात येऊ नये म्हणून त्यांनी ही अशी लपवाछपवी केली!

शेक्‍सपियरच्या नाटकांचा कर्ता म्हणून आणखीही काही नावं घेतली जात आहेत. त्यात सर फ्रान्सिस बेकन, "काऊंटेस ऑफ पेम्ब्रुक' मेरी सिडने यांचा समावेश आहे.

खरं तर या बाबतीत कुसुमाग्रजांची भूमिका अत्यंत विवेकी आहे. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, ""शेक्‍सपियरच्या बाबतीत हे सर्व वाद निरर्थक निखळून पडतात. ज्या कोणी ही नाटके लिहिली असतील तो शेक्‍सपियर.''

No comments: