राणी पद्मिनीची भाकडकथा

चितोडची राणी पद्मिनी आणि तिने केलेला जोहार म्हणजे रजपुतांच्या आणि भारताच्या इतिहासातलं तेजस्वी पान आहे. शत्रूच्या, त्याही मुस्लिमधर्मी शत्रूच्या हाती लागून आपल्या देहाची विटंबना होऊ नये म्हणून या मानी, तेजस्वी राजपूत कन्येने आत्मबलिदानाचा मार्ग निडरतेने स्वीकारला. म्हणून तिचा तो सर्व इतिहास आजही गौरवाने सांगितला जातो. आजही चितोडमध्ये राणी पद्मिनीने आपल्या वास्तव्याने पुनित केलेला राजमहाल (छायाचित्र पाहा) दाखविला जातो. ज्या सज्ज्यातून अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीचं आरशातलं प्रतिबिंब दाखविण्यात आलं होतं, तो सज्जाही दाखविण्यात येतो. पण....

पण राणी पद्मिनीचा हा इतिहास कधी घडलाच नव्हता! राणी पद्मिनी - जिचं वर्णन या कथेत केलं जातं - अशी कोणी स्त्री इतिहासात झालीच नाही! ही गोष्ट तद्दन काल्पनिक आहे.

पद्मिनीची ही कथा येते ती "पद्मावर्त' या काव्यात. सोळाव्या शतकात मलिक मुहम्मद जायसी याने हे रूपक लिहिलं. त्याने चितोड म्हणजे शरीर, राणा रतनसिंह म्हणजे मन, पद्मिनी म्हणजे शक्ती आणि अल्लाऊद्दीन म्हणजे वासना असं कल्पून हे काव्य रचलं आहे. आज त्याच काल्पनिक कथेला ऐतिहासिक समजून गौरविण्यात येत आहे.

पुराणांना, दंतकथांना इतिहास समजणाऱ्या देशात यापरतं वेगळ काय होणार?

संदर्भ -
इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998

(माहितीसाठी - http://en.wikipedia.org/wiki/Rani_Padmini)

3 comments:

kasakaay said...

पचायला अतिशय जड विषय तुम्ही मांडता आहात, ह्याबद्दल तुमचे अभिनंदनच केले पाहिजे. तुमच्या कुठल्याही एका लेखाशी सहमत किंव असहमत आहे असे म्हणु शकत नाही कारण माझा तेव्हढा अभ्यास नाही. पण असे प्रवाहाविरुद्धचे विचार मांडले गेले पाहिजेत असे मात्रं नक्की वाटते.
आपण इतिहासाचे अभ्यासक आहात का?

visoba said...

रा.रा. कसंकाय, पचायला जड असा हा विषय आहेच. कारण झालेय काय, की आपल्याकडील स‌ंस्कृतीसंरक्षकांपासून इतिहासकारांपर्यंत कोणीही लोकांची पचनशक्ती वाढावी, असे फारसे प्रयत्नच केलेले नाहीत. अपवाद अर्थात आहेत. पण ते फारच कमी.
इतिहासाचा अभ्यास आणि मुख्यतः पुस्तक वाचन हा माझा छंद. त्यातून स‌ापडलेलं आपल्या मित्रांसमोर मांडावं असं वाटलं, म्हणून हा प्रपंच.

kasakaay said...

रा.रा.विसोबा,
"आपल्याकडील स‌ंस्कृतीसंरक्षकांपासून इतिहासकारांपर्यंत कोणीही लोकांची पचनशक्ती वाढावी, असे फारसे प्रयत्नच केलेले नाहीत."
हे खरं आहे. काही महिन्यांपुर्वीचा एक प्रसंग आठवला. इथे डयुक विद्यापिठात "द हिस्टोरियन इन द वर्ल्ड" या विषयावर एक चर्चा होती. अमेरिकेतील जॉन होप फ्रँकलिन भारतातील रोमिला थापर ह्या दोन प्रसिद्ध इतिहासकारांमधील गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
(http://www.dukenews.duke.edu/2007/10/conversation.html)
एरवी अशा कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणारे आम्ही एकमेव (द्विमेव? म्हणजे मी आणि माझा नवरा) असे श्रोते असतो!!! पण त्यादिवशी मात्रं बरीच भारतिय मंडळी सभागृहात उपस्थित असल्याचे पाहुन बरे वाटले.
कार्यक्रम एकुण छानच झाला. बरीच नविन माहिती मिळाली. पण कार्यक्रम संपल्यावर मात्रं या भारतिय श्रोत्यांच्या उपस्थितीचे खरे कारण कळले.
त्यांच्यामते रोमिला थापर या हिंदुविरोधक आहेत आणि त्यांना विरोध करण्यासाठीच हे संस्कृतीरक्षक मंडळी तिथे आली होती.
एकुणच थापर यांच्या भाषणात किंवा विचारात हिंदुविरोधी असे मला तरी काही आढळले नाही.
पण इतर मंडळी मात्रं त्यांच्यावर तुटुन पडली.
मी थापर यांना प्रश्न विचारला की इतिहासकारांचा दृष्टिकोन मांडणारे पण सामान्य माणसाला कळेल असे भारतिय इतिहासाचे एखादे पुस्तक सुचवा.
त्यावर थापर उत्तर होते की सामान्य माणसाला कळेल असे एकही पुस्तक मी सुचवु शकत नाही.
मला वाटते इतिहासकारांच्या आणि सामान्य माणसांच्या मतांमधे असलेली दरी ही ह्या अशा पुस्तकांच्या अभावामुळे असावी.
"युगांत" हे महाभारताच्या संशोधित आवृतीवरून लिहीलेल सामान्य माणसाला कळेल असे एक पुस्तक आठवते. इतर पुस्तकांसाठी मात्रं पाश्चात्त्य इतिहासकारांकडेच वळावे लागते.