जोधा-अकबरची स‌ुरस कहाणी!


आशुतोष गोवारीकरांच्या "जोधा-अकबर' या भव्य ऐतिहासपटावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात जोधाबाई आणि अकबर यांची विवाहोत्तर प्रेमकहाणी रेखाटली आहे. त्यामुळे राजस्थानातील काही लोक संतप्त झाले आहेत. त्यांच्या मते जोधाबाई ही अकबराची नव्हे, तर त्याच्या मुलाची - सलीम अर्थात जहांगीर याची बायको होती. दुसरीकडे गोवारीकर आणि मंडळी सांगतात, की त्यांनी इतिहासाची पाने धुंडाळूनच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यात नेमके खरे कोणाचे?

पंडित जवाहरलाल नेहरूंनी अकबराबाबत लिहिले आहे, ""कोणापुढेही मान न वाकवणारे, शरण न जाणारे कितीतरी अभिमानी रजपूत राणे अकबराने आपल्या बाजूला वळवून घेतले. रजपूत राजकन्येशी त्याने विवाह केला. त्याच्या मुलाच्या - जहांगीरच्या अंगात निम्मे हिंदू रक्त होते, निम्मे मोगल रक्त होते.''
पण पुढे त्यांनी असेही लिहिले आहे, की ""जहांगिरचा मुलगा शहाजहान याची आई हिंदूच होती.''

(यातून मोठा गमतीशीर निष्कर्ष पं. नेहरूंनी काढला आहे. अकबराची बायको हिंदू. (हिचे नाव मानकुँवर.ती अंबर म्हणजे हल्लीचे जयपूरच्या राजाची कन्या.) त्याच्या मुलाच्या-जहांगिरच्या अंगात निम्मे हिंदू रक्त. पुढे जहांगिरची बायको हिंदू. त्यांचा मुलगा शहाजहान यांच्या अंगात पुन्हा हिंदू रक्त. म्हणजे झाले काय, तर नेहरू सांगतात - ""अशा रीतीने तुर्की-मोगल असे हे घराणे तुर्की-मोगल असण्यापेक्षा अधिकाधिक हिंदीच होत गेले.'' पण ते असो.)

लोकहितवादी गोपाळराव हरि देशमुख यांनी आपल्या "उदेपूरचा इतिहास' या ग्रंथात याचा खुलासा केला आहे. ते लिहितात -

"".... त्या वेळी आपल्याला रजपुतांची अनुकूलता मिळविण्यासाठी जें जें करणे इष्ट व उचित वाटलें तें तें अकबरानें करण्यास हयगय केली नाहीं. व त्याप्रमाणें या नुस्त्ये मानसन्मानालाच लुब्ध होणारे लब्धप्रतिष्ठ व व जात्यभिमानशून्य असे अधम रजपूत त्याला पुष्कळ मिळत चालले. त्यांतही मारवाडच्या राठोडानें (ठाकूर मालदेव) तर आपला लोभीपणा आणि हलकट बुद्धि दाखविण्याची कमालच केली. त्याणें रजपूत जातीच्या अभिमानाला व वैभवाला अत्यंत अनुचित असे काम करण्याचा पाया घातला व त्या नीच कामाबद्दल जी त्याला देणगी आणि पदव्या मिळाल्या त्याबद्दल तो आपल्यास मोठें भूषण समजूं लागला. मारवाडच्या मालदेवानें अकबराशीं सख्य करण्याकरितां आपला पुत्र उदेसिंग यास देणगी व नजराणा देऊन पाठविल्याचें व त्याची व अकबराची नागोराजवळ गांठ पडल्याचें जें नुक्तेंच वर सांगितले, त्या उदेसिंगानें अकबराच्या चरणीं बापानें पाठविलेलीं खंडणी व नजर अर्पण करूनच नुस्ते "सख्य' जोडले नाहीं; तर आपली कन्या जोधाबाई ही उपवरा झाली होती. ती अकबर बादशाहाचे मुलास देऊन "सख्यसंबंध' जोडिला; (जोधाबाई ही अकबरपौत्र शहाजहान याची आई असून, तिची सुंदर व भव्य कबर आग्र्याजवळ सिकंदरा नावाच्या गावीं अकबराच्या कबरेजवळच आहे.) बादशाहीशीं केलेल्या या नव्या सोयरीकींबद्दल बादशाहानेंही त्याचे उपकार ठेविले नाहींत. या वधूदानानें उदेसिंग राठोड याचा बादशाहाचे दरबारीं सर्व रजपूत स्नेही राजांपेक्षा फार मोठा मानमरातब वाढला इतकेंच नव्हे; तर या अपूर्व महत्कृत्याबद्दल अकबर बादशाहानें आपल्या या रजपूत व्याह्यास पुढें लिहिलेला पंधरा लाखांचा मुलूख तोडून दिला ः- गोदवाड, 9 लाख; उज्जनप्रांत, 2 लाख; देवलपूर, 1।। लाख; व बडनावर, 2।। लाख. यामुळें मारवाडच्या राजाचें (जोधपूरचें) उत्पन्न दुप्पट वाढलें.''

लोकहितवादी पुढे लिहितात - ""बहुतकरून प्रत्येक रजपूत ठाकूर आपली बहीण, मुलगी किंवा आप्तस्वकीयांतील एखादी वधू मुसलमानी घराण्यांकडे देऊन दिल्ली दरबारचा अंकित सरदार झाला होता. इतकेंच नव्हे; तर किती एक रजपूत ठाकूरांनी स्वधर्मत्याग करून मुसलमानी धर्मही स्वीकारिला.''
यामुळे महाराणा प्रताप अतिशय संतप्त झाले.
""त्याणें मुसलमानांबरोबर कन्याव्यवहार ठेवणाऱ्या एकंदर रजपूत कुळांशी, निष्कलंक राहिलेल्या कोणाही रजपुतानें सोयरगत करूं नये, असा सक्त हुकूम केला... प्रतापसिंगाने जो हा ठराव केला तो त्याच्या अस्तित्वापर्यंत तर चाललाच. परंतु त्याचे पश्‍चात्‌ दिल्लीचें तख्त बुडेपर्यंतही तो नियम अव्याहत चालून जयपूर-जोधपूरच्या घराण्यांशीं मेवाडच्या राणेवंशीयांनीं मुळीच सोरयसंबंध ठेविला नाही.''

गंमत म्हणजे काही इतिहासकारांच्या मते जोधाबाई हे नाव कोणत्याही अकबरकालीन कागदपत्रांत येत नाही. त्याचा उल्लेख येतो तो थेट अठराव्या-एकोणीसाव्या शतकात.

संदर्भ -
- भारताचा शोध - पं. जवाहरलाल नेहरू; अनु. साने गुरुजी, ना. वि. करंदीकर; कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे; पहिली आवृत्ती 1976, पृ. 285.
- निवडक लोकहितवादी - संपादक - डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. ल. रा. नसिराबादकर; फडके बुकसेलर्स, कोल्हापूर; दुसरी आवृत्ती, जुलै, 1989, पृ. 123-125.

टीप - "निवडक लोकहितवादी'च्या प्रस्तावनेत संपादकांनी लोकहितवादींचा "अव्वल इंग्रजीतला पहिला इतिहासचिंतक लेखक' असा गौरव केला आहे. लोकहितवादींनी भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास, 1851), पाणिपतची लढाई (काशीराज पंडित याच्या फारसी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराचा तर्जुमा, 1877), "गुजराथ देशाचा इतिहास' (1855), "उदेपूरचा इतिहास' (कर्नल टॉड्‌च्या "ऍनल्स ऑफ राजस्थान'चा अनुवाद, 1893) आदी इतिहासलेखन केले आहे

No comments: