वेदोक्त प्रकरणाचा वणवा पेटला तो एका उर्मट, बाहेरख्याली भिक्षुकाच्या उद्धट उद्गारांनी.
तो 1899 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा काळ होता. नेहमीच्या रिवाजानुसार त्या काळात शाहू छत्रपती पंचगंगेवर कार्तिकस्नानासाठी गेले होते. त्यांच्या समवेत बरीच मंडळी होती. त्यात विख्यात ग्रंथकार राजारामशास्त्री भागवत हेही होते. महाराज स्नान करीत होते. नारायणभट नावाचा ब्राह्मण मंत्र म्हणत होता. पण तो वेदोक्त नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्री भागवतांच्या बरोबर लक्षात आले. त्यांनी ती गोष्ट महाराजांना सांगितली. महाराजांनी नारायण भटाला त्याबाबत विचारले. तेव्हा तो म्हणाला, शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगायचे असतात. ते म्हणण्यापूर्वी भटजीने स्वतः आंघोळ केली नसली तरी चालते. त्याच्या या जबाबाने महाराज साहजिकच संतापले.
कोल्हापूर छत्रपतींच्या पदरी असलेल्या सोळा शास्त्री घराण्यांपैकी एका घराण्यातील शास्त्री बाळाचार्य खुपरेकर यांनी याबाबतची आपली आठवण सांगितली आहे. त्यानुसार हा नारायण भट बाहेरख्याली होता. "या घटनेच्या आदल्या रात्री त्याचे त्याच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले होते व त्याने तिला मारहाणही केली होती. पहाटे वाड्यावरची गाडी आली, तेव्हा त्या भटजीच्या बायकोने ते घरात नाहीत म्हणून सांगितले. कुठे गेले म्हणून विचारल्यावर, गेले शेण खायला असे उत्तर दिले. गाडीवानाने अर्थ समजून वेश्यावस्तीत जाऊन त्याला शोधून काढले व घरी जाण्यासाठी गाडी वळवली व आंघोळ लवकर उरकायला सांगितले. त्यावेळी आपले बिंग बाहेर पडले व आपली छीथू होणार हे पाहून रागावलेल्या स्थितीत त्याने हे उद्गार काढले. हुज-याने महाराजांना हा प्रकार सांगताच त्यांनी त्याला चाबकाने फोडून काढले. महाराज म्हणाले, आम्ही श्रद्धेने तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही असले आचरण ठेवूऩ वर गाढवासारखं बडबडता! (1)
1901च्या भाद्रपदातील पितृपक्षात महाराज पन्हाळगडावर राहात होते. तेथे श्राद्धासारखी धर्मकृत्ये करण्यासाठी त्यांनी नारायण सदाशिव ऊर्फ अप्पासाहेब राजोपाध्ये यांना बोलावणे पाठविले. हे राजोपाध्ये म्हणजे कोल्हापूरकर भोसल्यांचे कुलगुरू व कुलोपाध्याय होते. पण ते छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास तयार नव्हते. तेव्हा 7 ऑगस्ट 1901ला महाराजांनी लेखी आदेशच दिला. राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जावीत असे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते. पण राजोपाध्यांनी या आदेशाची अंमलबजावणी काही काळ स्थगित ठेवावी अशी विनंती केली.
अशात नवरात्र उजाडले आणि कोल्हापूरात देवी विटाळल्याची बोंब झाली.ते प्रकरणही औरच होते. कोल्हापूरात नारायणशास्त्री गोविंद सेवेकरी वैद्य नावाचे ब्राह्मण होते. ते वेदोक्तास अनुकूल होते. त्यांनी 29 ऑगस्ट 1901 रोजी वेदोक्त पद्धतीने मराठ्यांची श्रावणी केली. बापूसाहेब कागलकरांचीही श्रावणी त्यांनी केली. त्यामुळे सनातन्यांनी त्यांना वाळीत टाकले होते. या नारायणशास्त्र्यांनी 14 ऑक्टोबर 1901 रोजी अंबाबाईच्या देवळात जाऊन पूजा केली. शाहू छत्रपतींनीच त्यांना पूजेसाठी पाठविले होते. पण त्यांच्या स्पर्शाने देवी विटाळली असा आरडाओरडा सनातनी ब्राह्मणांनी केला. नारायणशास्त्रांना वाळीत टाकले असल्याची माहिती सनातन्यांच्या वतीने तेरा भिक्षुकांनी नायब कारभा-यांच्या कानावर घातली. याच तेरा भिक्षुकांनी नंतर शाहू छत्रपतींचीही भेट घेतली. तेव्हा छत्रपतींनी या तेरा जणांना देवळात प्रवेश करण्यास मनाई केली. तेव्हा ही ब्राह्मणमंडळी शाहू छत्रपतींच्या विरोधात इंग्रज सरकारकडे गेली. या ब्राह्मणांशी महाराजांच्याच कुलगुरूने हातमिळवणी केली असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
अप्पासाहेब राजोपाध्ये हे महाराजांचे कुलगुरू व कुलोपाध्याय. तेच वेदोक्ताच्या विरोधात होते, हे पाहिल्यावर मग महाराजांनी त्यांनाही धडा शिकविण्याचा निर्धार केला. 26 ऑक्टोबर 1901 रोजीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राजवाड्यावर जी धर्मकृत्ये करायची, ती वेदोक्ताने करणार नसाल, तर वाड्यावर येऊ नका, असा निरोप त्यांना छत्रपतींनी पाठविला. त्यानंतर रोजच सकाळी त्यांना असाच तोंडी निरोप पाठविण्यात येत असे. हा प्रकार 8 नोव्हेंबरपर्यंत चालला. राजोपाध्ये पूजेस येत नव्हते आणि म्हणून त्यांना दक्षिणाही दिली जात नव्हती.
याच सुमारास लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी परजली आणि राजोपाध्यांच्या बाजूने त्यांनी 22 व 29 नोव्हेंबरच्या अंकात वेदोक्तावरचे अग्रलेख लिहिले. तेव्हाची बहुतेक वृत्तपत्रे ब्राह्मणांच्या हातातील असल्याने त्यांनीही शाहू छत्रपतींच्या विरोधात जणू आघाडी उघडली. टिळकांचा केसरी-मराठी तर त्यात होताच, पण प्रा. विजापूरकरांच्या प्रभावाखालील समर्थ साप्ताहिक, शंकरशास्त्री गोखले यांचे विद्याविलास हे साप्ताहिक, साता-याचे प्रतोद, वाईचे भाऊशास्त्री लेल्यांचे मोदवृत्त, सोलापुरचे कल्पतरू, ठाण्याचे अरूणोदय व हिंदूपंच, नाशिकचे गुराखी या नियतकालिकांनीही छत्रपतींच्या विरोधात प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. सावळाराम अमृतराव विचारे यांचे मराठा दिनबंधु हे कोल्हापुरातले वृत्तपत्र त्यांना आपल्यापरीने उत्तर देत होते. पण या सर्व कोलाहलात त्याचा आवाज कोणाला ऎकू जाणार?
वेदोक्ताच्या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी याच सुमारास शाहू छत्रपतींनी एक समितीही नेमली. रा. ब. कृष्णाजी नारायण पंडित, सरन्यायाधीश विश्वनाथ बळवंत गोखले आणि विशेष म्हणजे आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचा या समितीत समावेश होता. 16 एप्रिल 1902 रोजी या समितीने आपला अहवाल दिला. छत्रपती बाबासाहेब महाराज (1837-1866) यांच्या कारकीर्दीपर्यंत कोल्हापूरच्या राजघराण्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच केली जात होती. बाबासाहेब महाराजांची मुले जगत नव्हती, तेव्हा रघुनाथशास्त्री पर्वते यांच्या सल्ल्यावरून काही गृहकृत्ये पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरूवात करण्यात आली. हे पाहता छत्रपतींना वेदोक्त पद्धतीने गृहकृत्ये करायची असल्यास त्यांना ती करता येतील, अशी शिफारस समितीने केली. पण या अहवालावर सही करण्यास राजोपाध्ये यांनी नकार दिला. समितीपुढे साक्ष देण्यास येण्यास बाहेरचे लोक येत नव्हते, महाराजांचे अधिकारी दबाव आणित होते, असा त्यांचा आरोप होता. पण विशेष म्हणजे समितीचे कामकाज त्यांच्याच घरात पाच महिने चालले होते, त्यावेळी मात्र ते याबाबत चकार शब्दानेही बोलले नव्हते. तेव्हा अहवाल प्रतिकूल जाताच त्यांनी त्यास विरोध दर्शविला हे उघड आहे. अखेर शाहू महाराजांनी 6 मे 1902 रोजी राजोपाध्ये यांना रीतसर राजोपाध्येपदावरून काढून टाकले. त्यांची सर्व इनामे, वतने व त्यांचे दिवाणी, फौजदारी व महसूलविषयक अधिकार काढून घेतले. या निर्णयामुळे तर मोठाच गदारोळ झाला. राजोपाध्यांच्या पाठिराख्यांनी तर महाराजांविरोधात जणू बंडच पुकारले. अशा वातावरणात महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी एक परिपत्रक काढून कोल्हापूरातील सरकारी नोक-यांत मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण जाहीर केले. यामुळे तर ब्राह्मणवर्गात संतापाची लाट उसळली. केसरी-मराठ्यासकट सगळी ब्राह्मणी वृत्तपत्रे महाराजांवर तुटून पडली.
या वादाने किती उग्र रूप घेतले होते, ते महाराजांच्या दत्तक राजमातेचे निधन झाले तेव्हाच्या घटनांतून दिसून येते. 14 सप्टेंबर 1902 रोजी चौथ्या शिवाजीराजांच्या पत्नी मातोश्री आनंदीबाई राणीसाहेब यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी वेदोक्त पद्धतीने करण्यात येत होता, तर त्याला तेथेच काही ब्राह्मणांनी विरोध केला. त्यावर मोठी वादावादी झाली. अखेर अंत्यसंस्कार वेदोक्त पद्धतीनेच करण्यात आले. त्याच दिवशी मध्यरात्री जुन्या राजवाड्याला आग लागली. ही आग काही उपद्व्यापी ब्राह्मणांनीच लावली असावी असा महाराजांना संशय होता. या आगीत जुन्या राजवाड्यातील प्रचंड दप्तरखाना खाक झाला. दुस-या दिवशी सकाळी कोल्हापुरातल्या अनेक घरांवर रक्ताची बोटे उमटलेली लोकांनी दिसली. हा महाराजांना 'इशारा' होता!
तिकडे राजोपाध्ये यांचे आपले इनाम व वतन वाचविण्याचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी प्रथम गव्हर्नरकडे अर्ज केला होता. पण गव्हर्नरने छत्रपतींच्या बाजूने निकाल दिला. तेव्हा राजोपाध्यांनी थेट गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनकडे धाव घेतली. पण तेथेही राजोपाध्यांचा पराभव झाला. या निकालाने लोकमान्यांना मोठेच दुःख झाले. त्यांनी लिहिले, "राजोपाध्ये यांचे इनाम संस्थानात सामील झाले. याच न्यायाने पुढेमागे कोल्हापूर संस्थान इंग्रजी राज्यात सामील झाल्यास लोकांसही समाधान वाटेल." राजोपाध्यांचे इनाम जप्त केल्याने संतापलेले लोकमान्य कोल्हापूर संस्थान जप्त करावे, असे सुचवित होते. जणू छत्रपतींनी राजोपाध्यांवर मोठा अन्यायच केला होता. वास्तविक त्यांचे इनाम हे चाकरी इनाम होते. पगाराप्रमाणे. काम करा, पगार घ्या, काम बंद, पगार बंद असे. जेव्हा चाकरी बंद तेव्हा इनामही बंद अशी त्याची कायदेशीर बाजू होती व ती लोकमान्य विसरले होते.
कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाप्रमाणेच तेथील शंकराचार्यही वेदोक्ताच्या विरोधात होते. शंकराचार्यांच्या मठावर 23 फेब्रुवारी 1903 रोजी काशीनाथ गोविंद ब्रह्मनाळकर या कीर्तनकाराची नेमणूक झाली. हा ब्रह्मनाळकरबुवा म्हणजे एक प्रकरणच होते. संन्याशी झाला, तरी त्याची धनसंपत्तीची हाव संपली नव्हती. पुढे त्याने त्या मठात एवढे गैरव्यवहार केले, की या पदाची सर्व इज्जत त्यांनी धुळीस मिळवली. लेलेशास्त्र्यांनीच पुढे त्यांच्या या लीला उजेडात आणल्या. ते भस्मात अत्तर घालून ते अंगास चोपडित असत. पानतंबाखू खात असत. झोपण्यासाठी शंकराचार्यांना मखमखलीच्या गाद्या लागत आणि ते नेहमी बायांकडून अंग रगडून घेत असत, वगैरे गोष्टी सांगून लेलेशास्त्र्यांनी त्याचा हा संन्याशाचा संसार किती विलासी होता, हे लोकांसमोर आणले. पण हे कधी तर शंकराचार्यांनी वेदोक्तास संमती दिली त्यानंतर. तत्पूर्वी शंकराचार्य ब्रह्मवृंदाचे नेतेच होते. शंकराचार्यांनी, शाहू महाराज हे शूद्र असल्याने त्यांना वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे मत दिल्यावर शाहू महाराजांनी त्यांनाही दणका दिला. त्यांनी मठाची स्थावरजंगम मालमत्ता जप्त करून स्वामीचे सर्व धार्मिक अधिकार बरखास्त केल्याची राजाज्ञा काढली.(मे 1903)
त्यामुळे चवताळलेल्या ब्रह्मनाळकरबुवांनी मग हवी तशी मुक्ताफळे उधळण्यास सुरूवात केली. ब्रह्मवृंदाची जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात दौरा काढला. पुण्यात त्यांची पालकी वाहणा-यांत लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे अशी खाशी मंडळी होती. याच दौ-यात त्यांचा मुक्काम महाड येथे असताना तेथील प्रभू जातीच्या काही लोकांनी त्यांची पाद्यपूजा वेदोक्त मंत्र म्हणून करण्याचे ठरविले. पण त्यांनी व महाडच्या ब्राह्मणांनी तो बेत हाणून पाडला. याच वेळी शंकराचार्यांच्या या उत्तराधिका-याने शिवछत्रपती क्षत्रिय नव्हते व त्यांनी गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतले, त्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा सत्यानाश झाला, असे उद्गार काढले.
पण आता या वादात छत्रपतींचीच सरशी होणार अशी चिन्हे दिसू लागली होती. राजोपाध्यांना इंग्रज सरकारने मोठी आशा होती. पण आता ती मावळली होती आणि त्यामुळे ब्रह्मवृंद आणि शंकराचार्यही हवेतून जमिनीवर उतरले होते.
शेवटी या प्रकरणात तडजोड झाली आणि जुलै 1905 मध्ये छत्रपतींचे भोसले घराणे क्षत्रिय असल्याचे आणि त्याला वेदोक्ताचा अधिकार असल्याचे शंकराचार्यांनी मान्य केले. 20 डिसेंबर 1905 रोजी कोल्हापूरच्या ब्रह्मवृंदाने सभा घेऊन शंकराचार्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि पाच-सात वर्षे चाललेला हा संघर्ष छत्रपतींच्या विजयाने समाप्त झाला.
पण हा संघर्ष खरेच समाप्त झाला?
1 जून 1909 च्या धर्म पाक्षिकात लेलेशास्त्र्यांनी लिहिले, "शूद्राला वेदाधिकारदान, गुरूद्रोह इत्यादी पातकांमुळे" ब्रह्मनाळकरांना क्षयरोग झाला!
संदर्भ -
- शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती 1986, पाने 62 ते 97
- वेदोक्त प्रकरण - ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा खडा संघर्ष - डॉ. जयसिंगराव पवार, राजर्षि - राज्यारोहण शताब्दी विशेषांक, रविवार दिनांक, 3 एप्रिल 1994.
14 comments:
रा.रा. विसोबा काका
माफ करा पण माझ्यासारख्या अडाण्याला पहिले वेदोक्त पध्दत आणि पुरोणोक्त पध्दत यातील फरक सांगा...
शाहू महाराजांबद्दल थोडी माहिती यात मिळाली आहेच पण मी अपेक्षेत केलेली माहिती जेव्हा द्याल तेव्हा महाराजांच्या जन्मापासुन म्रुत्युपर्यंत घडलेले महत्वाचे, दोन्हि पैलू दाखवणारे प्रसंग सांगावेत ही विनंती...माहीति मोठिच आहे... नाहितर शाहू महाराजांवर लिखित एखाद्या पुस्तकाचे नाव सांगा..
रा.रा. विसोबा काका,
लेख आवडला. तुमची लेखनशैली प्रवाही आणि रसाळ आहे. अल्पाक्षरी शब्दयोजनेमुळे कमी शब्दांमध्ये खूप सारे सांगून जाता. पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील कुप्रसिद्ध ब्राम्हण - ब्राम्हणेतर वादाचे मूळ असलेला वाद तो हाच का?
लेख आवडला.
mag tilakanna lokamanya padavi koni dili buaa?
he sagale tyanche wedoktanche laad tyanni palale nahit mhanun tar haa manus Engrajanshi bhandala nahi na?
Jati bheda itaka jya manasachya manat asel to lokmanya hou shakat nahi
-Hemant
विसोबा काका तुमचा लेख फारच आवडला.
हेमंत यांच्या मताशी सहमत आहे. टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषाने जर अशा पद्धतीचा जातीयवाद पाळला तर, त्यांना राष्ट्रपुरुष तरी का मानावे? म्हणजे एकीकडे देशासाठी भांडण्याचा आव आणा्यचा आणी दूसरीकडे आपल्याच देशबांधवांना हिन वागणूक द्यायची.मग शिवजयंती सारखा उत्सव सुरु करायची तरी काय गरज होती?की तेही आपली ’इमेज’ वाचवण्याचे एक राजकारण होते?
good work ...
greate people greate histry .
upload lot of new bloogs .
once again thanks
atyanta utkrushta lekh aahe. wicharancha navin khadya milale.
lekha ava
dala.....
वेदोक्त. तीनही लेख सुंदर. या वादात त्या काळी अनेक इंग्रज अभ्यासकांनी आपली मते मांडली होती, असे वाटते. AMT Jackson (नाशिकचे कलेक्टर) यांनी शिवाजी व जातीव्यवस्था याचे विवेचन करणारा सप्टेंबर १९०६ च्या एम्पायर रिव्यू च्या अंकात लिहिला होता असे मी हर्बर्ट रीसली यांच्या पुस्तकात वाचले आहे. अन्य कुणी काही लिहिले असे तुम्हास माहित असेल तर कळवा
rajalahi jativevaste virudh ladtana naki-nau ale hot,mang samanyanche kai hal asel,phakt vichar kelelach bara. tethe agarkaranchi philosophy kashi pachni padali asel. good work.
नमस्कार सर
ती तडजोड जी झाली ती उदगाव या गावी झाला इथे छत्रपती शाहू महाराज 15 दिवस राहिले होते..अस माझ्या वाचनात आले आहे तसा संदर्भ आपल्या लेखनात नाही दिसला...तुमची लेखणी अप्रतिम आहे.. पण उदगाव हे माझं गाव..माझ्या गावचा ऐतिहासिक वारसा हा खूप मोठा...
संदर्भ…shahu chatrapati. by..keer d.v
Page no 142,143
Chatrapati shahu maharaj gaurav granth..
Post a Comment