तुकारामांची गुरूपरंपरा सुफी मुस्लिम?

क्या गाऊं कोई सुननवाला । देखें तों स‌ब जग ही भुला ।।1।।
खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ।।धृ.।।
काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऎसी लोक बिराणी ।।2।।
गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ।।3।।
(तुकाराम गाथा - देहू प्रत, पृ. 260, अभंग 1146)

मराठी सारस्वताला ललामभूत अशा तुकोबारायांचे असे काही हिंदी अभंग पाहिले, की नाही म्हटले तरी आश्चर्य वाटतेच! तुकोबांनी हे हिंदी अभंग का आणि कुणासाठी रचले असावेत असा एक प्रश्न स‌हजच मनात येतो. तुकोबांचे गाव देहू. त्यांच्या काळात तो विजापूरच्या आदिलशाहीचा भाग होता. तुकोबांचे घराणे महाजनांचे. तेव्हा आदिलशाहीतील अधिका-यांशी त्यांचे या ना त्या कारणाने संबंध येतच असणार. मुद्दा असा की ही दखनी बोली काही त्यांना परकी नव्हती. कदाचित त्यांनी अगदी स‌हजच त्या बोलीत काही पदं रचली असतील. हा आपला एक अंदाज.

पण जेव्हा तुकोबांच्या गुरूपरंपरेचे नाते मुस्लिम सुफी संप्रदायाशी असल्याचे सांगितले जाते, तेव्हा मग वाटते, की तुकोबांच्या दखनी काव्यात आश्चर्य करावे असे काहीच नाही.

पण आता अविश्वसनिय वाटावी अशी वेगळीच गोष्ट स‌मोर येते. तुकोबांच्या गुरुपरंपरेचे नाते सुफी या मुस्लिम संप्रदायाशी?
हे म्हणजे काहीच्या काही होतेय!
तुकोबांचे गुरु तर बाबाजी चैतन्य. त्यांच्या अभंगाचीच तशी साक्ष आहे.
ते म्हणतात -

सद्गुरुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा काहीं ।।
सांपडविले वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।।धृ।।
भोजना माहती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ।।2।।
कांही कळहे उपजला अंतराय । ह्मणोनियां काय त्वरा जाली ।।3।।
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ।।4।।
बाबाजी आपलें सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ।।5।।
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका ह्णणे ।।6।।
(तुकाराम गाथा - देहू प्रत, पृ. 80, अभंग 368)

पण तरीही तुकारामांची गुरुपरंपरा सुफी असल्याचेही एक मत मांडले जाते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या नाहीसे होण्याबद्दल बोलताना, त्यांनी आपल्या सुफी गुरुपरंपरेनुसार जीवंत स‌माधी घेतली असावी असाही एक तर्क मांडला जातो.

वरील अभंगावरून असे दिसते, की राघवचैतन्य, केशवचैतन्य आणि बाबाजीचैतन्य अशी तुकोबांची गुरुपरंपरा आहे. म्हणजे राघवचैतन्य हे तुकोबांचे आजेगुरू, कैशवचैतन्य हे त्यांचे शिष्य आणि बाबाजी दीक्षित हे त्यांचे शिष्य अशी ही मालिका आहे. रा. रा. भालचंद्र नेमाडे यांनी तुकाराम गाथेतील निवडक अभंगांचे संपादन केले आहे. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी ही मालिका नोंदली आहे. पण श्री निरंजन स्वामीकृत 'चैतन्य विजय' हा ग्रंथ काही वेगळीच माहिती देतो. श्री निरंजन स्वामी तथा ह. भ. प. निरंजनबाबा नाशिककर यांचा हा ग्रंथ शके 1709चा. (इ. स. 1788) हा ग्रंथ बाबाजीचैतन्य आणि केशवचैतन्य हे एकच असल्याचे सांगतो. (स‌र्वजन म्हणती केशव चैतन्य । भाविक म्हणती बाबाचैतन्य । दोन्ही नामें एकची जाण । अत्यादरें बोलती ।। - अध्याय 3, ओवी 114) या ग्रंथाच्या प्रास्ताविकात अनंत श्रीधर भवाळकर ऊर्फ चैतन्यदास यांनी हेच मत दिले आहे. ते म्हणतात, "(तुकारामांच्या) अभंगात मालिकेची हा शब्द आहे. ही मालिका त्रयीची असते. राघवचैतन्य हे आपले गुरु श्रीमत् व्यास यांची परंपरा सांगतात व त्यांचे शिष्य केशवचैतन्य होत. त्यादृष्टीने ही त्रयीची मालिका बरोबर जुळते. इतिहाससंशोधक या मालिकेच्या संबंधात मुग्ध आहेत." (या ठिकाणी चैतन्यदास यांचा रोख वा. सी. बेंद्रे यांच्याकडे असावा. त्यांनी तुकोबांचे चरित्र लिहिले असून, तुकारामांच्या गुरुपरंपरेचा इतिहासही कथन केला आहे.) गंमत म्हणजे याच ग्रंथातील 37 व्या पानावरील एका तळटीपेत राघव, केशव व बाबाजी चैतन्य हे वेगळे असल्याचे नमूद केले आहे! तर ते असो.

मुद्दा असा, की जर तुकारामच बाबाजीचैतन्य हे आपले गुरू असल्याचे सांगत असतील व राघवचैतन्य हे त्यांचे परात्पर गुरु असतील, तर मग ही सुफी परंपरा कोठून आली?

हे पाहण्यापूर्वी राघवचैतन्य व केशवचैतन्य यांचे चरित्र जाणून घ्यावे लागेल. राघवचैतन्य हे तंत्रमार्गी होते. त्यांनी महागणपती आणि ज्वालामुखी देवी यांची तांत्रिक स्तोत्रे रचली आहेत. त्यांचा काळ इ. स. 1500 च्या सुमाराचा. 'चैतन्य विजय'नुसार त्यांची वस्ती काही काळ ओतूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे मांडवी-पुष्पावतीच्या तीरी होती. तेथे ते गुप्तपणे राहात होते. तेथेच त्यांना विश्वनाथबाबा हा ब्राह्मण गृहस्थ भेटला. यांचा जन्म पुणें वाडीचा. त्याच्यावर राघवचैतन्य यांनी अनुग्रह केला व त्याचे नाव केशवचैतन्य असे ठेवले. त्यांनी उत्तरखंडातील स‌र्व तीर्थांची यात्रा केली व बारा वर्षांनी ते कर्नाटकातील गुलबर्ग्यास आले. तेथून जवळच, 16 मैल अंतरावर असलेल्या आळंद (आळंद-गुंजोटी) येथे त्यांनी बराच काळ निवास केला. तेथेच आनंदीदेवीच्या मंदिरात राघवचैतन्य यांनी महासमाधी घेतली. 'चैतन्य विजय'नुसार कलबुरगे येथे राघवचैतन्य यांनी मशीद उडविण्याचा चमत्कार केला. तो पाहून निजामशहा बादशहा अचंबित झाला व राघवचैतन्य यांची भक्ती करू लागला. त्याच्या आग्रहावरून राघवचैतन्य हे आळंद गुंजोटी येथे राहिले व तेथेच त्यांनी स‌माधी घेतली आणि आपले शिष्य केशवचैतन्य यांना त्यांनी ओतूरला पाठवून दिले. तर ही स‌माधी राघवदराज म्हणून ओळखली जाते. चैतन्यविजय सांगतो, की हे नाव यवनांनी ठेविले. ब्राह्मणांनी मात्र त्यांना राघवचैतन्य असेच म्हणावे. या स‌माधीच्या "एकभागी पूजा करिती ब्राह्मण । एकभागी पूजा करिती यवन । अद्यापि तेथील महिमान । चालले असे यापरी ।। " (अध्याय 3, ओवी 96)

तर ही राघवचैतन्यांची स‌माधी लाडले मशायख या नावाने ओळखली जाते. आणि त्यांचे शिष्य केशवचैतन्य हे गेसू दराज बंदेनवाज व बाबाजीचैतन्य शेखसाहेब या नावाने ओळखले जातात. (चैतन्यविजय, पा. 37)

ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मते मुळात राघवचैतन्य यांचे चरित्रांतर नंतर झालेले आहे. "त्यांनी स‌माधी घेतल्यानंतर लौकरच, सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुसलमान आक्रमकांनी या स्थानाचा (म्हणजे आळंदचा) कब्जा मिळविला, इथली मंदिरे उद्ध्वस्त केली, राघवचैतन्यांच्या स‌माधीचे रूपांतर एका काल्पनिक सूफी अवलियाच्या स्मारकात केले, त्या काल्पनिक स‌ूफी अवलियाचे चरित्र लाडले मशायख या नावाने रचले," असे रा. रा. बेंद्रे यांचे प्रतिपादन आहे.

गेसू दराज आणि शेखसाहेब ऊर्फ ख्वाजा शेखसाहेब यांच्याबद्दल एक वेगळी माहिती मिळते. "दक्षिणेत बहमनी राज्य स्थापन झाल्यानंतर निजामुद्दीन अवलिया यांच्या आज्ञेने सातशे सूफी दरवेशी दिल्लीहून धर्मप्रचारार्थ निघाले होते. त्यात ख्वाजा शेख, बंदेनवाज, सैयद मीर गेसू दराज हे प्रमुख होते. ते बहमनी सुलतानाची राजधानी गुलबर्गा येथे स्थायिक झाले. (स‌ैयद मीर गेसू दराज हे) बहामनी सुलतानाचे राजगुरू होते... त्यांचा मृत्यू गुलबर्ग्यात इ. स. 1422 मध्ये झाला." (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 29)

परंतु येथे महत्त्वाची ठरते ती एकच गोष्ट की, तुकारामांवर गुरुकृपा होण्यापूर्वीपासून कित्येक वर्षे आधी राघवचैतन्य यांचे चरित्र लाडले मशायख ऊर्फ शेख अलाउद्दीन अन्सारी लाडले या नावाने रचले गेलेले आहे.

---------------------------------------------------

येथे एका गोष्टीचा उल्लेख करावयास पाहिजे, की सूफी साधू आणि हिंदू संत-सज्जन यांचे संबंध त्याकाळी अतिशय स‌लोख्याचे असल्याचे दाखले आहेत. उदाहरणार्थ जनार्दनस्वामी (1426, चाळीसगाव) यांना चांद बोधले या सूफी मलंगाने अनुग्रह केला होता, तर स्याहगढच्या सूफी साधुला मौला दत्त असे नाव आहे. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 38) फार काय, शेख लतीफ, शेख मुहम्मद यांना वारकरी संप्रदायात मानाचे स्थान आहेच, पण सोळाव्या शतकात बहमनी राजघराण्यातील मुन्तोजी बहमनी या सुलतानाचे नावही वारकरी संतांच्या सूचीत आढळते. (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 40)

महानुभाव पंथाशीही सूफी संप्रदायाचे निकटचे संबंध होते. महानुभाव साधू मुस्लिम पिरांप्रमाणे काळी वस्त्रे परिधान करीत व स्वतःला स्याह फकीर म्हणवत असत. आपल्या श्री दत्त या आराध्य दैवताचे वर्णन मुस्लिम पद्धतीने करीत असत. (स्याहगड से मौला दत्त डुले वगैरे) (शिरडीचे साईबाबा व सूफी पंथ, पा. 42)

पुढे ज्ञानोबांनी गीतेवरील टीका लिहून वैदिक धर्ममतास बळ दिले. त्यामुळे सूफी वा अन्य कोणतेही अवैदिक संप्रदाय वा पंथ महाराष्ट्रात फारसे रूजू शकले नाहीत. परंतु स‌माजजीवनावरील धर्मपंथ-संप्रदायांची असणारी छाप काही अशीच विरून जात नसते.

--------------------------------------------------------------

तुकोबांचे परात्परगुरू जन्माने सूफी मुस्लिम होते की काय, हे खरे तर महत्त्वाचे नसतेच. त्यांचे एक चरित्र सूफी अवलियाचे आहे आणि त्यांच्या भक्तगणांत हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही आहेत, ही गोष्ट महत्त्वाची!


संदर्भ -
- चैतन्य विजय - प्रकाशक - सुधाकर राजर्षि, ओतूर, आवृत्ती दुसरी, 1982.
- जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा - प्रकाशक विठोबा रखुमाई देवस्थान संस्थान, देहू, दुसरी आवृत्ती, जाने. 2001.
- तुकाराम गाथा (निवडक अभंग) - संपादक - भालचंद्र नेमाडे, प्रकाशक - साहित्य अकादमी, पहिली आवृत्ती 2004.
- शिरडीचे श्री साईबाबा व सूफी पंथ - संपादक - डॉ. गुरूनाथ व्यंकटेश दिवेकर, शलाका प्रकाशन, मुंबई, प्रथमावृत्ती जुलै 1993

16 comments:

Anand Kale said...

विसोबा काका...
मागची पोस्ट आणि या पोस्ट फक्त वाचुन काढाव्या लागल्या... घेण्यासारखे खास काही नव्हते हो...

काहिशी माहीती मिळाली पण उत्साहाने वाचावी आणि दुस~यांनाही सांगावी अशी नाही हो.. [;)]

. said...

ra. ra. ananda, bhavna pochali! kalji ghein..

रवि आमले said...

मित्रांनो,
रा. रा. पी. के. फडणीस हे आपल्या ब्लॉगविश्वातले ज्येष्ठ स‌ोबती. त्यांचा http://pkphadnis.blogspot.com/
हा ब्लॉग जरूर वाचावा असा आहे.
स‌ोमनाथ मंदिराविषयी त्यात चांगली माहिती आहे.
मेहरबानांस जाहीर व्हावे,
आपला,
विसोबा.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

विसोबा हा तुमचा लेख मला आवडला. तुकारामांचा हिंदी अभंग (दुसरा एक)प्रथम परिचित झाला तेव्हा मलाहि नवल वाटले होते. तो अभंग आहे ’मै भूलि घर जानी बाट। गोरस बेचन आयो हाट। ... वगैरे ’. मी गाथा काढून खात्री करून घेतली कीं खरंच तुकारामांचे हिंदी अभंग /गौळणी आहेत! ते अर्थातच मराठीसारखेच सरस आहेत यात नवल नाही.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

माझ्या ब्लॉगची ओळख इतराना करून दिल्याबद्दलहि धन्यवाद. माझा mymahabharat.blogspot.com हाहि ब्लॉग आपण जरूर पहावा.

Yogesh said...

रा.रा. विसोबा,

तुकारामांविषयीचे दोन्ही लेख अतिशय आवडले. तुम्ही खूप उत्तम काम करत आहात हे वेगळे सांगणे नलगे. नेमाड्यांनी साहित्य अकादमीसाठी लिहिलेल्या 'तुकाराम' नावाच्या छोटेखानी पुस्तकात तुकारामांवर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचाही मोठा प्रभाव पडला होता असे लिहिले आहे. किंबहुना विठ्ठल या एकाच देवाची भक्ती वारकरी भक्तीसंप्रदायातील सर्वांनी करावी यामागे तुकारामांवर एकेश्वरवादी इतरधर्मीयांचा असलेला प्रभाव हे महत्त्वाचे कारण आहे.

तुकारामांविषयी अधिक काही माहिती मिळाल्यास जरूर द्यावी.

लोभ असावा ही विनंती.

. said...

ra. ra. aajanukarn,
ekeshwari bhakti aani tukaram... ha ek mahatvacha mudda aapan namud kela aahe.
khare tar to adhik vistarane lihayala hava.
thank you.

केदार जोशी said...

विसोबा,

तुकोबांच्या काळात मुस्लीम राजवटीचा प्रभाव असल्यामुळे त्यांचे काही भक्त सुफी असले तर त्यात काय नवल. पण तुम्ही गुरु ही सुफी होते ते लिहीता तेव्हा तो वाचन्यासारखा विषय होतो. माझ्या काकांनी संत तुकारामावर संशोधन केले आहे. ( संत तुकारामांची जिवननिष्टा - डॉ ल.का. मोहरीर). पण त्यात त्यांनी तुकारामचे गुरु सुफी वा ईतर धर्मीय असतील असे लिहीलेले नाही. त्यांनी तो ग्रंथ लिहीताना ढेर्यांसोबत काम केले आहे. मराठी व्यतिरिक्त लेखन फक्त तुकोबांनीच केलेले नाही तर नामदेवाने पण केले आहे. शिखांच्या धर्मग्रंथात त्यांचा अनेक ओव्या दिसतील. त्यामुळे फक्त हिंदीत लिखान केल्यामुळे गुरु सुफी असतील असे वाटत नाही.
राहीला प्रश्न त्यांच्या गुरु पैकीं कोणी सुफी धर्माशी निगडीत होत का? असले तरी काय फरक पडतो. शिवाजी राजांना अनेक गुरु होते पण त्या गुरुंचा प्रभाव त्यांचावर म्हणावा तितका न्हवता तसेच तुकोबांचे पण होऊ शकते. ( जात जाता तुकोबा पण शिवाजींचे गुरु असल्यामुळे शिवाजी पण सुफी होतात का?)

Anonymous said...

dear kedar,

तुकोबांचे परात्परगुरू जन्माने सूफी मुस्लिम होते की काय, हे खरे तर महत्त्वाचे नसतेच. त्यांचे एक चरित्र सूफी अवलियाचे आहे आणि त्यांच्या भक्तगणांत हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही आहेत, ही गोष्ट महत्त्वाची!

visobane lihilele varil vakya aapan vachalet kay?
tyat tyanchi bhumika ali ahe ase mala vatate.

Pankaj Jadhav said...

faar chaan !!!

अविनाश said...

सुफि पंथ म्हणजे देव भोळ्या हिंदुना धर्मांतरा साठी उद्युक्त करण्यासाठी निघालेला पंथ होता..रहिम व राम एकच होता असे सांगत अनेक लोकांचे धर्मांतर झाले होते..मुसलमान लोक अल्ला शिवाय कुणालाच मानत नाहित..मुगल राजवटीतले ते एक षडयंत्र होते..

Unknown said...

तुकोबारायांच नात सुफि पंतासी जोडण म्हणजे महाराजांचा अपमानजनकच

Unknown said...

आज च्या परिस्थिथिमधे प्रथम श्री तुकाराम महाराज समजन्यसाठी स्वताहाचे आत्म परीक्षण व् दीर्घ मनाचा अट्टहास, मानस ठेवून च ध्यान साधनेतील व्यक्तीच् वेळ काढू शकते ...तर वाट्याला फलित आहे ....

Unknown said...

तुकाराम महाराज सुफी संता प्रमाणे जिवंत समाधी घेतलेली नाही तर ती एका समाजाची भूल आहेत कि ते सदेह वैकुंठी गेलेत. वास्तवात त्यांना जिवंत जाळण्यात आलेले आहे.

Unknown said...

Tukaram maharaj pandharpurla jatastana gavat mukkamala konihi jaga n dilyane mashidit rahile hote tya veli tyanni abhe Hindi abhang rachale hote tyamule ha sarv bhram pasarala aahe tyanchya guruparampatebabat shanka aslyas sant nilibha yancha abhang pahava-Mukhya mahavishnu chaitanyache mul
Rahata rahila prashna vikut gamanababat tar je tukarammaharaj swabhaktine shivaji maharajanna musalmanachya tavditun sodavatat te swatahche rakshan karu shakat nahit itake dubale hote ka?
Dusare ase ki manasachya karyavarun tyache mulyamapan vhave n ki tyacha shevatavarun

Unknown said...

तुकाराम महाराज पंढरीला जाताना गावात मुक्कामाला कोणीही जागा न दिल्याने मशिदीमध्ये राहिले होते त्यावेळी त्यांनी हे हिंदी अभंग रचले होते त्यामुळे हा सर्व भ्रम पसरला आहे त्यांच्या गुरु परंपरेबाबत शंका असल्यास संत निळोबा यांचा अभंग पहावा- मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ
राहता राहिला प्रश्न वैकुंठ गमनाबाबत तर जे तुकाराम महाराज स्वभक्तीने शिवाजी महाराजांना मुसलमानांच्या तावडीतून सोडवतात ते स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत इतके दुबळे होते का?
दुसरे असे की माणसांच्या कार्यावरून त्याचे मूल्यमापन व्हावे न की त्याच्या शेवटा वरून