चांदबिबीचा महाल मूळचा सलाबतखानाचा!

अहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्याला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. तो चांदबिबीचा म्हणून ओळखला जात असला, तरी तो मूळचा सलाबतखानाचा महाल आहे.

सलाबतखान हा निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली. सलाबतखान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्याने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.

अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर हा पठारी प्रदेश. लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा. त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामे उभारण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा महाल असे मानण्यात येते. हा महाल अशा ठिकाणी आहे, की जेथून अहमदनगरकडे चाल करून येणारी फौज सहज दिसू शकते. या महालाचे दुसरे नाव दुर्बिण महाल असेही आहे, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.
काहींच्या मते ही सलाबतखानाची आराम फर्मावण्याची जागा होती. दौलताबाद हा सलाबतखानाचा आवडता किल्ला. त्याचे सतत दर्शन व्हावे या हेतूने या महालाची उंची वाढविण्याचा त्याचा इरादा होता. पण तत्पूर्वीच (१६१९?) त्याचे तळेगाव-दाभाडे येथे निधन झाले. मोगल परंपरेनुसार या महालात, तळघरामध्ये सलाबतखानाने आपल्या कबरीची व्यवस्था आधीच केली होती. त्याप्रमाणे तेथे तो व त्याची पत्नी चीरनिद्रा घेत आहेत. त्या दोघांच्या कबरी तेथे आहेत. शिवाय तळघरातच, जरा बाहेरच्या बाजूला त्याची दुसरी पत्नी, मुलगा आणि एका कुत्र्याची कबर आहे.

असे असताना या महालाला चांदबिबीचे नाव चिकटले, ही इतिहासातील एक मौजच आहे.
वास्तविक चांदबिबी आणि या महालाचा काहीही संबंध नाही. ही निजामशहाची मुलगी. सलाबतखान आणि तिच्या भेटीचे पुरावे नाहीत. तिच्या कर्तृत्त्वाचा काळ १५८५ नंतरचा मानला जातो. या महालाचे बांधकाम या काळात पूर्ण झाले होते.

इतिहास असा असला, तरी आजही सलाबतखानाचे हे स्मारक चांदबिबीच्या नावानेच ओळखले जात आहे.

7 comments:

Unknown said...

Wa Braech diwasani navin kahitari wachayal amilale tumachya Blog war

waiting for new

बाबासाहेब जगताप said...

लेखातली ज्ञानात भर घालणारी माहिती आवडली. एकूणच ब्लॉग आणि त्याची मध्यवर्ती कल्पनासुद्धा एकदम छान.
माणूस म्हणून जगण्यासाठी...माणुसकी नावाचं स‌त्य जपण्यासाठी.

हे सर्वात आवडलं.

Waman Parulekar said...

पुन्हा एकदा सुंदर लेख. मला मलिक अंबर बद्दल जाणुन घ्यायच होत. कृपया त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारा लेख लिहा जेणेकरुन आमच्या ज्ञानात भर पडेल.

धन्यवाद

We r waiting for new article...

. said...

http://khattamitha.blogspot.com/2008/02/blog-post_26.html

रा. रा. वामनराव,
मलिक अंबरबद्दल थोडंस यापूर्वी लिहिलं होतं.
वर लिंक दिलीय.
अधिक काही वाचनात येताच आपणांस नक्की कळवीन.
आणि

धन्यवाद.
- विसोबा

Panchtarankit said...

माहितीपूर्ण लेख

राम चौरे said...

माहिती चांगलीच होती पण अष्टकोनी महाल नसून तो षटकोनी आहे.दुरूस्तीची दक्षता घ्यावी.

राम चौरे said...

माहिती चांगलीच होती पण अष्टकोनी महाल नसून तो षटकोनी आहे.दुरूस्तीची दक्षता घ्यावी.