राम कोण देशीचा? : भाग 1

हिंदी चित्रपटसृष्टीत अलीकडे "डीव्हीडी एडिटर' अशी एक संज्ञा ऐकावयास मिळते. तर हे डीव्हीडी एडिटर करतात काय, तर हॉलिवूडच्या एखाद्या गाजलेल्या चित्रपटाची डीव्हीडी घेतात, त्यातील पात्रे, त्यांची नावे, देश-काल वगैरे पार्श्‍वभूमी बदलतात आणि "माशी टू माशी' असा हिंदी चित्रपट काढतात! म्हणजे असे, की "इट हॅपन्ड वन नाईट'मधील राजकन्या "दिल है के मानता नही'मध्ये उद्योगपतीची मुलगी बनते. कधी हे लोक एखाद्या इंग्रजी कादंबरीवरूनही चित्रपट काढतात. उदाहरणार्थ आयर्विन वॅलेसच्या "द सेकंड लेडी'वरून हेमामालिनीने "शरारा' काढला. "सेकंड लेडी' म्हणजे अमेरिकी अध्यक्षाची पत्नी. ती आपल्या या हिंदीकरणात एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी बनते. तर अशी अवघी गंमत.

आता हे आठवण्याचे कारण म्हणजे आपले रामायण.

आपली अशी समजूत असते, की रामकथा हा आपला प्राचीन इतिहास आहे, म्हणजे ती प्रत्यक्ष घडलेली आहे आणि ती याच देशात घडली आहे. उपनिषद्‌काली इतिहास शब्दाचा प्रयोग छांदोग्य आणि बृहदारण्य या दोन उपनिषदांत आढळतो. छांदोग्याच्या काली व पुढेही शंकराचार्यांच्या वेळी "भारत' हा इतिहास आहे असे मान्य होते. पण आपल्या रामायणाला इतिहास म्हणण्याची चाल पूर्वी नव्हती. ती अलीकडे पडली. असो. तर रामायण हा आपल्यादृष्टीने इतिहासच आहे. आता ही झाली आपली धार्मिक श्रद्धा. परंतु तिला आता आर्थिक आणि राजकीय संदर्भही प्राप्त झाले आहेत. त्यामुळे होते काय, की रामायणात ज्या स्थळाचा पंचवटी म्हणून उल्लेख केलेला असतो, ते स्थळ नाशकातही असते आणि राजमहेंद्रीजवळील पर्णशाला या गावातही! तसेच मग राममंदिरापासून रामसेतूपर्यंतचे राजकारणही सुरू होते. रामकथा जर हिंदुस्थानातीलच व रावणाची लंका म्हणजे आजची श्रीलंका, तर मग या दोन देशांना जोडणारा ऍडम्स ब्रिज म्हणजेच रामसेतू असे म्हणता येते. त्यासाठी मग नासा वगैरेचीही साक्ष काढण्यात येते. आता नासाने म्हटले आहे, की त्या ठिकाणी तुम्ही सेतू वगैरे जो म्हणता तो आहे. तो उपग्रहातून स्पष्ट दिसतो. नासाचे म्हणणे असते ते एवढेच. आपण मात्र तो सेतू रामानेच बांधल्याचे पुरावे मिळाल्यासारखे मारे खुशी म्हणत नाचतो!

तर ए. एल. बॅशॅम यांच्या "वंडर दॅट वॉज इंडिया', तसेच सानुजित घोष यांच्या "लिजेन्ड ऑफ राम' या ग्रंथांनुसार, रामकथेचे काहीसे आपल्या वर उल्लेख केलेल्या हिंदी चित्रपटांप्रमाणेच झाले आहे. म्हणजे असे की मूळ रामकथा ही वेगळ्याच ठिकाणी घडली आणि मग आपल्याकडील वाल्मिकी वगैरे कवींनी तीवर हिंदुस्थानी साज चढवून, तिच्यातील पात्रांच्या नावांचे संस्कृतीकरण करून, तसेच त्यात आपल्याकडील गावांची, शहरांची, नद्यांची, सरोवरांची नावे घुसडून वगैरे तिचे एतद्देशीकरण केले. दशरथ आणि राम हे भारताबाहेरच्या एका किरकोळ राज्याचे राजे होते, असे अनुमान काढण्यास जागा आहे, असे बॅशॅम यांनी म्हटले आहे.

सानुजित घोष हे आयएएस अधिकारी. त्यांनी रामकथेचा लोकसाहित्य, पुरातत्त्वशास्त्र, खगोलशास्त्र अशा अनेक अंगांनी अभ्यास केला. त्यावरून ते अशा निष्कर्षावर आले, की दशरथ आणि रामाचा मूळ देश इराण! पूर्वेकडे स्थलांतर करताना आर्यांनी आपली ही कथा बरोबर नेली. वाल्मिकीने या लोककथेचे रूपांतर नितांत सुंदर महाकाव्यात केले. राम हे निःसंशय आर्यांच्या पूर्वेकडच्या आक्रमणाचे प्रतीक आहे. आर्यांनी आपल्याबरोबर आपल्या गावांची, नद्यांची नावेही आणली. अमेरिकेत वसाहत करणाऱ्यांनी आपल्या नव्या गावांना न्यू यॉर्क, न्यू ऑर्लिन्स, जिनेव्हा अशी नावे दिली, त्याचप्रमाणे या आर्यांनी आपल्या मूळ गावांची नावे येथील गावांना व नद्यांची नावे येथील नद्यांना दिली. त्यामुळे झाले काय, की इराणमधील होरावती येथे सरस्वती बनली. होरायू शरयू बनली आणि कोशल, पांचाल, किष्किंधा या नावांचे प्रांत येथेही दिसू लागले.

मल्लादी वेंकटरत्नम्‌ या विद्वान संशोधकाने याहून जरा वेगळे मत मांडले आहे. त्यांच्या मते रामकथा इराणमध्ये नव्हे, तर जरा पलीकडे इजिप्तमध्ये घडली! स्वातंत्र्यपूर्व काळात याविषयी आपल्याकडे मोठी चर्चा घडली होती. "महाराष्ट्र शारदे'च्या फेब्रुवारी, मार्च व मे 1935 च्या अंकात वेंकटरत्नम्‌ यांच्या ग्रंथाच्या आधारे "वाल्मिकीचे वाङ्‌मयचौर्य' व 'रामायणाचे मूळ इतिप्तमध्ये' या मथळ्याचे लेख छापून आले होते. त्यावरून केवढा गदारोळ झाला असेल, याची आज कल्पनाच केलेली बरी!

तर या वेंकटरत्नम्‌ यांच्या ग्रंथाच्या आधारे थोर सत्यशोधक विचारवंत व नेते भास्करराव जाधव यांनी "महाराष्ट्र शारदा'मध्ये काही लेख लिहिले. "इतिहासदृष्टीने रामायण काव्याची योग्यता' (सप्टें. 1935), "रामायणाची ऐतिहासिक योग्यता' (ऑक्‍टो. 1935), "रामायणातील आणखी काही स्थळे' (फेब्रु. 1936), "रामायणाचे मूळ' (एप्रिल 1936) असे या लेखांचे मथळे. त्यांचे हे आणि "ज्ञानमंदिर' या नियतकालिकात याच काळात प्रसिद्ध झालेले रामायणासंबंधीचे अन्य काही संशोधनात्मक लेख "रामायणावर नवा प्रकाश' या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत.

भास्करराव जाधव यांनी या ग्रंथाधारे, तसेच वाल्मिकी रामायणाच्या अभ्यासातून मांडलेली मते आपण वेगळ्या लेखात पाहू.

संदर्भ -
- रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, पहिल्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण, 1991.
- राम रंगी रंगले - वाग्‌वैजयंती, "सप्तरंग' या सकाळच्या रविवार पुरवणीतील "पिंपळपान' या सदरातील लेख, 24 एप्रिल 2005.

3 comments:

Yogesh said...

mhanaje? ayodhyecha vaad kasala aahe mag? aaNi aamhi kaar sevesathi dilele paishe parat ghyave mhanata? (milatil ki nahi shanka aahe)

Anonymous said...

kharach chan topic niwadalat tumhi...
pudhachya lekhachi chatakapramane wat paahat aahe..

Great work

Tech Guru said...

Great imagination? so we can assume that Walmiki went to Egypt referred a book in library and translated with Indian or Hindu ethos.